अंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील

मुख्य रस्त्यावरची ती वेश्या वस्ती… काही बायका बाजेवर बसल्या होत्या… अगदी रिकाम्या… काहीच काम नसल्यासारख्या…

तशीही ही वस्ती दिवसभर गडद मेकअप उतरलेल्या चेहऱ्यासारखी… झगमग लायटिंगमधील बंद केलेल्या बल्बसारखी…

लॉकडाऊनमध्ये थोडा भकासपणा वाढल्यासारखा…

स्थानिक कार्यकर्ते व आम्ही बाजेवर बसलेल्या बायकांशी बोलायला गेलो. एक बाई थोडे बोलू लागली. पत्रकाराने कॅमेरा काढताच लाईट बंद व्हावा तशी ती गप्प (mute) झाली.

चटकन म्हणाली,

“कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही, वस्तीत हवे तर एकत्र बोलू. पण वस्तीतही पुढे-पुढे बोलणार नाही. उगाच बाकीच्या बायका वैतागतात…”

थोडा अंतर्गत राजकारणाचा विषय होता.

आम्ही चिंचोळ्या गल्लीत शिरलो. चढ उंच होता. दोन्ही बाजूने दाटीवाटीच्या खोल्या. पत्रकार आणि तीन चार जण एका खोलीजवळ थांबले. तिथे पाच सहा बायका जमा झाल्या. सध्याची परिस्थिती, अन्नदान कसे सुरू आहे, इतर प्रश्न ह्यावर त्या हळूहळू बोलत होत्या…

सध्या लॉकडाऊनमध्ये परिस्थिती बिकट होत चालली होती… स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मदत पोहोचवत होते पण घरे भरपूर असल्याने जे पुढे-पुढे करतात त्यांनाच मदत मिळते असेही काहींचे म्हणणे होते.

मी तिथून काढता पाय घेतला. गल्लीतून पुढे चालत राहिले… सगळ्यांचे लक्ष माईककडे होते.

मी एका खोलीसमोर थांबले.. आत पस्तिशीची बाई होती..

“अंदर आऊं क्या?”

काही क्षण ती बावचळली. जिन्याखाली असते तेवढीच खोली होती ती. दाराला लागून एका बाजूला मोरी. समोर दोन फूट जागा सोडून एक पडदा. अजून एक दिवाण…

“आओ ना..!!”

मी आत गेले… ती रंगाने गोरी होती.. त्यामुळे दंडाजवळचे डाग स्पष्ट दिसत होते..

मी विचारले, “हे काय झालं ग बाई..!!”

तर म्हणे ती इथे आली तेव्हा जाडी होती.. आता वजन अचानक कमी झाल्याने ते डाग पडलेत… आमच्या गप्पा सुरू झाल्या…

खोलीचे भाडे दहा हजार, सध्या लॉकडाऊनमुळे सगळे बंद आहे. बाकी कुटुंब गावी असल्याने तिथे पैसे पाठवायला सध्या जमत नाही. धंदा बंद आहे पण तरीही रात्री-अपरात्री लोक वस्तीत येतात. हट्टाने मागणी करतात.. राडे घालतात.. झवायला दिले नाही तर अगदी दगड डोक्यात घालेपर्यंत प्रकरणे जातात..

आम्हाला विचारतात, “तुम्ही रांडा ‘नाही’ म्हणायला लागलात तर काय आता रस्त्यावरच्या पोरी उचलून बलात्कार करू का?”

“अशा वेळेस काय करायचे समजत नाही.. मी नाही म्हणाले तर तो पुढे जातोच.. कुणी ना कुणी त्याच्यासाठी उलपब्ध होतेच.. मग मीच का नको करू धंदा? ती तर पैसे कमावते, मग मी पण कमावते…!! संकट जिवावरच असलं तरी जिवाला पोट पण आहेच ना..?”

तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते… गावी आंधळे आई-बाप आहेत. मुलाचाही खर्च आहेच. तिच्या डोळ्यात संघर्ष, हतबलता सगळे एकत्र झाले होते. मी आले तेव्हा तिने वेगळे नाव सांगितले होते. निघताना तिने खरे नाव सांगितले. शरीर मेले असले तरी मन हळवे असते. अनेकदा अनेकांनी फसवूनही ह्या विश्वास ठेवतात.

मी वाकून दारातून बाहेर आले. एव्हाना कॅमेरा खूप पुढे निघून गेला होता. मी वस्तीतून फिरत राहिले.. ही वस्ती म्हणजे सर्व अर्थाने भुलभुलैयाच आहे.. जागोजागी बायकांचे गुच्छ बसले होते.. गप्पा सुरू होत्या..

“काय गं, तिला दुसरी मुलगीच झाली ना..!” ओझरते वाक्य कानी पडले..

एका दारात वयस्कर काकू आणि बाजूला खुर्चीत काका बसले होते.. काकू सांगत होत्या, “लोक अन्नदान करून जात आहेत मात्र बाकीचाही खर्च आहेच ना.. औषधे कुठून आणायची? नवऱ्याला दम्याचा त्रास आहे..!!” ते एका खुर्चीवर शांत बसलेले होते.. श्वास फुललेला.. शरीरयष्टी किरकोळ..

मी पुढे चालत राहते.. निमुळत्या गल्ल्या वाढत होत्या.. सळसळत्या सापासारख्या.. त्यातच रंगा नावाचा मुलगा भेटला.. सात आठ वर्षांचा असेल.. तोच मला इकडे-तिकडे गल्ल्या दाखवत होता..

इतक्यात एका खोलीतल्या उंबऱ्यातून पाणी वाहत होते.. मी आत डोकावले. खाटेवर तीन-चार वर्षांचे नागडे मुल झोपले होते. घरात चांगलीच वाफ पसरली होती. मे महिन्यामुळे पत्रे तापले होते. थोडा थंडावा हवा म्हणून तिने फरशीवर पाणी ओतले होते.

दिवसभर घरात बसवत नाही, त्यामुळे बाहेरच बसतात सगळ्या. अस्वच्छतेचाही मोठा प्रश्न आहे तिथे. स्थानिक मदत आहे, पण स्थानिक नगरसेवक मात्र उदासीन. धंदा बंद असल्याचेच तीही सांगते. पण बाहेरच दारू पिऊन बसलेल्या पुरुषाची नजर मात्र काहीतरी वेगळेच सांगू पाहते. ह्या वस्तीतले प्रश्न नेहमीचे आहेतच. लॉकडाऊनच्या काळात ही वस्ती बेशुद्ध झाल्यासारखी दिसते. तरीही पोटाची व पोटाखालची आग ह्यात मधूनच धुगधुगी भरू पाहते…

रंगा मध्येच दृष्टिआड होत होता.. मी त्याच्या मागे पळत होते..

“आज लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच वेश्या विस्थापित झाल्या आहेत”, वेश्यांच्या प्रश्नांवर काम करणारे समीर गायकवाड सांगतात. लॉकडाऊनच्या काळात वाढणाऱ्या गरिबीमुळे वेश्यांची अवस्था आणखीन बिकट होणार आहे. झारखंडमधून व इतरही भागांतून ‘ह्यूमन ट्रॅफिकिंग’ला सुरुवात झाली असेल.. पण सध्या कुणीच त्या आकड्यांकडे पाहत नाही आहे..

ज्या वेश्या विस्थापित झाल्यात त्यांच्या जागेवर आता नवीन आणि तरुण मुलींचा भरणा होईल.. परतून आलेल्याना धंद्यात त्रास होईल.. कमी किमतीत बायका पुरवल्या व मिळवल्या जातील.. वाढलेली स्पर्धा जिवावरची जोखमी घ्यायलाही तयार होईल.. ह्यातून हा मोठा गट रोगांचा वाहक होण्याची शक्यता बळावू शकतेय…

किन्नरांची अवस्थाही ह्याहून वेगळी नाही. पैशांचा प्रश्न आहे. सगळे व्यवसाय बंद असल्याने रोजगार नाही. किन्नरांत तीन-चार जणांपासून ते बारा-पंधरा जणांपर्यंत सगळे एकाच लहानश्या खोलीत राहतात. आहे त्यात ते सगळे एकत्र राहताहेत.

ही सगळी माणसे आहेत… ही माणसे भेटतात.. बोलतात.. त्यांचे संघर्ष सांगतात.. आणि अभूतपूर्व प्रेम देतात…

ही माणसेच आहेत हे मात्र आपण विसरतो.. ते तुम्हाला घरात घेतात.. जेवू घालतात.. आपण का अंतर राखतो त्यांच्यापासून?? बरेचदा त्यांना मदतही नको असते.. समोरचे माणूस आपल्यासारखेच एक माणूस आहे ही भावना त्यांची पोकळी भरून काढू शकते…

इथे मुद्दाम ठिकाणांचा आणि व्यक्तिरेखांचा उल्लेख टाळला आहे.

ह्या वस्त्या आपल्या आजूबाजूच्याच आहेत… त्या आपल्याला कधीच नाकारत नाहीत. आपल्या दोघांच्या मध्ये येत असेल ते आपल्याच मनाचे कंडीशनिंग…

त्यांचे-त्यांचे जगणे आहे… त्यांचे त्यांचे संघर्ष आहेत… ह्यातून कुणीतरी त्यांना बाहेर काढेल अशी त्यांची अपेक्षाच नाही… पण कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय त्यांच्याकडे नुसते पाहायला तरी काय हरकत आहे ना?? प्रेमभुकेली माणसे सर्वत्र असतात… ह्या अंधाऱ्या वस्त्यांतही…!!

लेखिका, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या लेखनही करतात.

पूर्वप्रकाशित: कर्तव्य साधना, १३ जून २०२०