पुन्हा-पुन्हा घडणारे अघटित

२५ मे २०२०. घटना तशी नेहमीची होती. मिनियापोलीस शहरात एका श्वेतवर्णी पोलिसाद्वारे एका कृष्णवर्णीयाची हत्या झाली. जॉर्ज फ्लॉईड असहाय्यपणे ‘मी श्वास घेऊ शकत नाही’ असे सांगत असताना इतर ३ अकृष्ण पोलीस नुसते पाहत असतात पण डेरेक चौहीनला जॉर्जच्या मानेवर गुडघा रोवून खून करताना थांबवत नाहीत. हा प्रकार केवळ दहा पंधरा सेकंद चालला नाही तर जवळजवळ नऊ मिनिटे चालला. पाचशे सेकंदांपेक्षाही अधिक. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला जितका वेळ लागतो त्याहीपेक्षा जास्त वेळ.

खरेतर हा नेहमीचाच प्रकार आहे. अशा प्रकारे पोलीसांद्वारे थोड्याफार फरकाने अनेक हत्या याआधीही झाल्या आहेत. यावेळी वेगळे हे होते की काही बघ्यांनी हा निघृण प्रकार फोनच्या व्हिडिओ कॅमेऱ्यांवर टिपला आणि लगोलग सोशल मीडियावर प्रसृत केला. बातमी इंटरनेटच्या वेगाने जगभर पसरली.

यामुळे संपूर्ण अमेरिकेतील अनेक कृष्णवर्णीयांचा राग पराकोटीला गेला. ते दृश्यच असे होते की केवळ कृष्णवर्णीयच नाही तर सर्व वर्णांचे मानवतावादी लोक हादरले. नेहमीप्रमाणे निदर्शने झाली, मोर्चे निघाले, काही ठिकाणी तोडफोडही झाली. पण शांततेने मोर्चे काढणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने जास्त होती. तरीही अनेकदा होते त्याप्रमाणे तोडफोड करणारे जे काही लोक होते त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा वापर करायचा प्रयत्न करून वर्णभेदी लोक पोलिसांच्या अत्याचाराचा मुद्दा डावलून त्या तोडफोडीबद्दलच बोलू लागले. यावेळी पहिल्यांदाच टीव्ही, वर्तमानपत्रे, इंटरनेट या सर्व माध्यमांनी समजून-सवरून त्या तोडफोडीला अवाजवी महत्त्व दिले नाही आणि झालेल्या खुनाबद्दलच आणि तश्या गोष्टींसाठी सक्षम आणि प्रवृत्त करणाऱ्या यंत्रणेबाबत सखोल माहिती पुरवू लागले.

त्याचे अनेक पडसाद उमटले. कोरोना व्हायरससारख्या महा-संसर्गजन्य विषाणूमुळे ग्रस्त आणि त्रस्त असूनसुद्धा या घटनेविरुद्ध आवाज उठवणे इतके महत्त्वाचे वाटले की निदर्शने करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. जेव्हा एकमेकांपासून दूर राहायची आवश्यकता होती तेव्हासुद्धा! लोक मास्क घालत होते, एकमेकांपासून अंतर राखायचा प्रयत्न करत होते आणि तरी निदर्शने करत होते. याला अनेकांनी साथ दिली. अमेरिकेबाहेरही निदर्शने झाली. जे झाले ते पुरेसे की नाही ते काळच ठरवेल.
‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ हा हॅशटॅग पुन्हा प्रकटला. वर्णभेदी लोक किंवा हा प्रकार नीट न समजलेले लोक विचारतात ‘डोन्ट ऑल लाइव्ह्ज मॅटर’? अर्थात सगळ्यांचाच जीव महत्त्वाचा नाही का? तो असतोच; पण येथे आपण काळ्या लोकांकडे लक्ष वेधू इच्छितो कारण अमेरिकेत गुलामगिरीमुळे त्यांच्यावर शतकानुशतके झालेले आणि अजूनही होत असलेले अत्याचार. अनेक लोकांनी काळ्यांच्या संस्थांना आपापल्या परीने देणग्या देणे सुरू केले. निदर्शनांमध्ये अटक झालेल्यांचा जामीन भरण्याकरता लोक पैसे देऊ लागले. काही लोक इंटरनेटवर त्याबद्दल वरचेवर लिहू लागले. वर्णभेद कुठे आणि किती मुरला आहे याबद्दलची उदाहरणे पुढे येऊ लागली. काळे लोक काही टक्केच असले तरी अटक झालेल्यांच्या आकडेवारीकडे पाहिताना असे दिसून येते की गोऱ्यांपेक्षा काळे कितीतरी पटीने जास्त पकडले जातात. कृष्णवर्णीय लोकांची भीती वाटावी असेच चित्रण माध्यमांद्वारे केले गेले आहे.

वर्णभेदामागच्या कारणांच्या मुळाशी कसे जाता येईल? भारतातील जातिभेद आणि इथला वर्णभेद यांचे समीकरण अनेकदा बनवले गेले आहे. दोन्ही गोष्टी भयानक आहेत पण बरेच फरकही आहेत. उदाहरणार्थ इथले काळे आणि गोरे दोन्ही प्रकारचे लोक बहुतांशी ख्रिश्चन आहेत. त्यामुळे इथल्या वर्णभेदात धर्माचा थेट सहभाग तितकासा नाही. भारतात मात्र जातिभेद धर्मनिर्दिष्ट असल्यामुळे लोक भेदभाव करायला मोकळे असतात आणि निदान काही ठिकाणी ज्यांच्यावर अत्याचार होतात तेही ते जास्त सहजपणे सहन करतात. इथे धर्मापलीकडे जाऊन मुळातच कृष्णवर्णीयांमध्ये काही खोट आहे किंवा ते अमानवी आहेत असे स्वतःला आणि इतरांना भासवून आणि पटवून सर्व कारभार चालतात. वैज्ञानिकदृष्ट्या मानवा-मानवात असलेले फरक नगण्य आहेत. आपल्या सर्वांची गुणसूत्रे जवळजवळ सारखीच आहेत. थोडेफार फरक हे वातावरणामुळे आणि कालांतराने झालेले बाह्य फरक आहेत – कातडीचा रंग, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, उंची, अंगकाठी वगैरे. पण मेंदू, हृदय आणि इतर अवयव सगळे सारखेच असतात. तरीही मानवा-मानवात जो भेदभाव केला जातो तो एकविसाव्या शतकाला साजेसा नक्कीच नाही. त्यासाठी निसर्गापेक्षा लोकांवरील संस्कार जास्त जबाबदार आहेत.

श्वेत अमेरिकेत एक अश्वेत असल्यामुळे मला स्वतःला सुरुवातीला छोट्या-मोठ्या भेदांना सामोरे जावे लागले आहे. पण ते अगदीच किरकोळ. शैक्षणिक क्षेत्रात आणि तेही कॅलिफोर्नियात पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे येथे बबलमध्ये राहता येणे शक्य आहे. अमेरिकेत आजही काळ्यांवर जे बेतते ते कल्पनातीत आहे. वर्णभेदाच्या मुळाशी जायचे असेल तर इथला इतिहास जाणून घेतला पाहिजे, पैशांचा प्रवाह समजून घेतला पाहिजे, राजकारणाचे आणि लागे-बाध्यांचे धागे उलगडायला हवेत.

१० जून २०२०ला ‘शटडाऊन अकॅडेमिक्स’ या हॅशटॅगद्वारे शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्वांना संपावर जाण्याचे आवाहन करण्यात आले. समाजाच्या एका गटाने जर सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवले तर बाकीचे लोक जी निदर्शने करतात त्याला काही अर्थ राहत नाही म्हणून या संपाचा प्रपंच. पण संप करायचा म्हणजे सुट्टी घेऊन घरी बसायचे नाही, आपल्याला हवे ते करायचे नाही, तर इतरांबरोबर मिळून देशातील वर्णभेदाचा समूळ नायनाट करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचा आणि स्वतः त्याबद्दल कोणती पावले उचलू शकतो आणि ती कशी उचलता येतील याबद्दल चिंतन करायचे. संशोधनासाठी अनेक स्रोत उपलब्ध आहेत: पुस्तके आहेत, माहितीपट आहेत. त्यादिवशी ‘कॅलटेक’मध्येही एक झूम-मीटिंग दिवसभर सुरू ठेवली होती. लोक सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असे तीनदा एकत्र येऊन एकमेकांशी बोलले, एकमेकांचे शंकासमाधान केले, इतरांच्या निग्रहांबद्दल, निश्चयांबद्दल जाणून घेतले. आपण ठरवलेल्या गोष्टी इतरांना सांगितल्या.

या संपाचे निमित्त साधून इथल्या वर्णभेदाबद्दलच मी स्वतःला शिक्षित करून घ्यायचे ठरवले. सुरुवात पोलिसांपासून केली. इतर मोहिमांबरोबरच यावेळी एक मोहीम पुढे आली ती म्हणजे ‘डी-फंड पोलीस’ (हॅशटॅग). पोलिसांना जो पैसा दिला जातो तो कमी करायचा. काही ठिकाणी तर असाही बोलबाला झाला की पोलीसयंत्रणेलाच रजा द्यायची म्हणजे काय तर ती पूर्ण काढून टाकायची (उदा. मिनीयापोलिस जिथे ही घटना घडली). असे खरेच झाल्यास, तिथल्या गुन्ह्यांचे आणि गुन्हेगारांचे काय हा प्रश्न पडू शकतो. त्याचप्रमाणे तिथले बेकार पोलिस इतर ठिकाणी जाणार नाहीत का हाही एक साधा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांच्या उत्तराबद्दल उपलब्ध स्रोतांकडून थोडे जाणून घ्यायचे मी ठरवले.

याबद्दलचा शोध घेताना एक कार्टून सापडले. त्यात संख्याशास्त्र वापरून थोड्या वेगळ्या प्रकारे हा मुद्दा मांडला आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये शहराच्या कराचा सर्वांत मोठा हिस्सा हा पोलीस आणि फायर विभागांसाठी असतो. या संस्था आपली रक्षा करत असल्यामुळे हे महत्त्वाचा आहे असे अनेकांना वाटते. अनेक प्रकारे तसे ते आहेही. पण सर्वसाधारणपणे लोकांना हे माहीत नसते की पोलिसांना जे कॉल्स येतात त्यांपैकी बहुतांश कॉल्स हे मनोविकारासंबंधित असतात आणि पोलीस मनोविकारासंबंधित समस्या हाताळण्यास प्रशिक्षित नसतात आणि त्यामुळे समर्थ नसतात. जसे भारतामध्ये शिक्षकांवर मुलांना खिचडी करून खाऊ घालण्याची जबाबदारी टाकली जाते त्यामुळे अनेक ठिकाणी खिचडी जास्त शिक्षण कमी असे होऊ शकते तसाच थोडाफार हा प्रकार आहे.

दुसरे असे की जेव्हा सशस्त्र गुन्हे किंवा दरोडे होतात, त्यातले साधारण काही टक्केच गुन्हेगार पकडले जातात. आमच्या बिल्डिंगच्या असोसिएशनमध्ये मी होतो तेव्हा तेथील काही चोर्‍यांची नोंद करावी लागली होती. पोलीस सरळ सांगतात की छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल ते फार काही करू शकत नाहीत.

मनोविकारासंबंधीच्या गोष्टी जर वेगळ्या काढता आल्या तर बरेच पैसे वाचतील आणि वर्णभेदपण कमी होईल. अर्थातच पोलीसखाते पूर्णपणे रद्द करता येऊ शकत नाही, तसे व्हायलाही नको. पण पोलिसांनी ज्या गोष्टी करायला हव्या त्याच त्यांना काम म्हणून दिल्या तर जास्त चांगले. पोलिसांनी केवळ पोलिसगिरी केली आणि तीही माणुसकीच्या अंगाने केली – म्हणजे जिथे शिक्षा व्हायला पाहिजे तिथे व्हायलाच पाहिजे (पण पोलिसांनी ती थेट करायला नको. त्याकरता न्यायव्यवस्था आहे) अन्यथा इतर कारवाई समजून-उमजूनच व्हायला हवी.

ह्या कार्टूनमध्ये एक उल्लेख आहे की वॉल-मार्ट, होल फुड्स वगैरेसारख्या नेहमीच्या काही साखळ्या वर्णभेदाच्या वाईट प्रकाराला हातभार लावतात. ते कसे हे मला माहीत नसल्याने मी लोकांना विचारले. मला ‘13th’ नावाच्या माहितीपटाबद्दल सांगितले गेले. तो माहितीपट पाहिला नसल्यास जरुर पहा. नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

त्यातून दोन तीन मुद्दे प्रकर्षाने जाणवले. तुरूंग बांधणारी एक प्रायव्हेट संस्था आहे – Corrections Corporation of America. त्यांच्या काही कंत्राटांमध्ये ‘तुरूंग जवळजवळ शंभर टक्के भरलेला हवा’ असे कलम आहेत. कंपनीच्या मंडळावर एखाद्या न्यायाधीशाचा मुलगा, एखाद्या फेडरल तुरूंगाचा अधिकारी वगैरे लोक असत. मग हे तुरूंग भरण्यासाठी असे कायदे बनवले गेले की न्यायाधीश एखाद्या कायद्याची शिक्षा कमी करू शकत नाही. पॅरोल बंद केले गेले. त्यामुळे कैदी चांगले वागले तरी लवकर सुटू शकत नाही. थ्री स्ट्राइक्सचा कायदा बनवला गेला. या सर्व गोष्टींमुळे कैद्यांची संख्या वाढू लागली. ते जास्त वर्षांकरता तुरुंगात कैद राहू लागले आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य पण खचू लागले. अशाप्रकारे काही दशकांमध्येच जगाच्या केवळ पाच टक्के लोकसंख्या असलेल्या या देशात कैद्यांची संख्या मात्र अवाजवी वाढली. जगातल्या एकूण कैद्यांच्या २५ टक्के कैदी एकट्या अमेरिकेत आहेत. अनेक क्षुल्लक, नगण्य कारणांवरून आणि अनेकदा विनाकारणही. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्हीकडच्या राष्ट्राध्यक्षांनी या तुरूंग भरण्याच्या प्रक्रियेला मदत केली. त्यात सर्वांत जास्त भरडले गेले ते काळे.

वॉलमार्ट वगैरेसारख्या संस्था अगदी कमी पैसे देऊन या कैद्यांकडून कामे करून घेतात. ते पैसेही थेट कैद्यांना जातच नाहीत. या धनाढ्य कंपन्यांच्या दृष्टीनेपण हे तुरूंग भरलेले राहणे महत्त्वाचे आहे. खजिन्यातील पैशांच्या मदतीने ते सद्यःपरिस्थिती बदलणार नाही याची काळजी घ्यायचा पूर्ण प्रयत्न करत असतात. चीनच्या स्वेट-शॉप्सना नावे ठेवताना अमेरिकेत अमेरिकेचेच नागरिक तुरूंगांमध्ये त्याहीपेक्षा वाईट परिस्थितीत आहेत. आजही व्हॅनगार्डसारख्या संस्थेकडे या CCAचे १४ टक्के भाग आहेत. जोपर्यंत या भांडवलदारी संस्था, श्रीमंत लोक, तथाकथित प्रतिष्ठित लोक जनसामान्यांच्या भल्याकरता वागायचे ठरवत नाहीत किंवा इतर लोक त्यांना तसे वागण्यास भाग पडत नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार.

अर्थात भावनाविवश होऊन अविचारी भूमिका घेणेही योग्य नाही. सीऍटलमध्ये कॅपिटॉल हिल भागाचा ताबा लोकांनी घेतला आहे आणि त्या भागातून सर्व पोलीस निघून गेले आहेत. सध्या तरी तेथे आनंदी वातावरण आहे. सीऍटलच्या नगराध्यक्षांनीपण या अधिग्रहणाला पाठिंबा दर्शवला आहे. हा एक अविचारी टोकाचा प्रकार आहे की पोलीस डी-फंडिंगकडे जाणारे पहिले योग्य पाऊल आहे हे आपल्याला कालांतराने कळेलच. पण बदल आवश्यक आहे हे वादातीत.

वीस वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. भारतात सर्व थरांवर भ्रष्टाचार दिसतो. येथे मात्र मनुष्याच्या दैनंदिन जीवनात भ्रष्टाचाराला स्थान नसते. लोक वाहतुकीचे नियम पाळतात, कर भरतात, रस्त्याने जाताना एकमेकांकडे पाहून स्मित करतात आणि सगळे काही सुरळीत सुरू आहे असे दिसते. पण जॉर्ज फ्लॉईडच्या खुनासारख्या घटनांनी असे दिसते की भांडवलशाहीने आपले हात-पाय नको तेथे आणि नको तसे पसरवल्यामुळे देशातील निदान काही टक्के लोकांचे आयुष्य भरडले जात आहे. ही गोष्ट थांबायलाच हवी. भारतातील भ्रष्टाचाराचे मूळसुद्धा पैसा हेच आहे. भारतात जरी इथल्याइतकी भांडवलशाही नसली किंवा निदान तितकी स्पष्टपणे दिसत नसली तरी तेथे पण असेच लागेबांधे किती आणि कसे आहेत हे शोधून काढणे शक्य आहे का? त्यावरील 13th सारखे काही दस्तऐवज उपलब्ध आहेत का हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.

महत्त्वाचे हे आहे की आपण सगळ्यांनी सजग व्हायला हवे. या गोष्टींच्या मुळाशी जे आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि या सर्व जाळ्यामधून मानवतेसाठी काय योग्य आहे ते समजून त्या दिशेने योग्य पावले टाकण्यासाठी आवश्यक ते त्याग करण्याचे धैर्य एकमेकांना द्यायला हवे. ही तपश्चर्या साधी नक्कीच नाही पण अशक्य नसेल अशी आशा आहे. जॉर्ज फ्लाईडने अनाहूतपणे केलेला त्याच्या जीवनाचा त्याग ही त्यासाठीची प्रेरणा ठरू शकेल का? की असे आणखी अनेक जीव जावे लागतील? निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.