मनोगत

आजचे वर्तमान उद्याचा इतिहास असतो असे जेव्हा जेव्हा म्हटले जाते तेव्हा इतिहासाचे सामान्यीकरण होते असे नाही. तसेही इतिहास हा कधीच खूप भव्य-दिव्य किंवा काळवंडलेला नसतो. तथ्यांचे तपशील, (मग ती तथ्ये कधी उजळवून टाकणारी, आशादायी किंवा कधी उदासीन करणारी, हिंसक अशी असू शकतात) त्यांचे दस्तावेजीकरण हे इतिहासाचे महत्त्वाचे अंग आहे.

कोरोनाची नोंद उद्याच्या इतिहासात होईल. आजवर असे अनेक साथीचे रोग इतिहासजमा झाले आहेत. त्या त्या वेळी ह्या रोगांनी केवळ शरीरालाच नव्हे तर समाजमनांनाही पोखरले. तसेच त्या आपत्तीने अनेक संधीही दिल्या. आरोग्यशास्त्रात नवनवीन शोध लागले. पहिल्या महायुद्धातून पुढे आलेला युरिआ काही काळ हरितक्रांतीचा झेंडा रोवून अभिमानाने उभा राहिला आणि पुढे जाऊन शेतजमिनीस हानिकारक ठरण्याच्या विवादाचे कारण ठरला.

कोरोनाकाळात नेमके असेच सारे होत आहे. एकीकडे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, केन्द्रीय नेतृत्व, राज्याधिकारी आणि अनेक ठिकाणचे प्रशासन तर जणू दिशाहीनच झाले आहेत. तर दुसरीकडे शिक्षणक्षेत्रांत, उद्योगधंद्यांत, विज्ञानाच्या शाखांमध्ये नवनवीन प्रयोगाच्या संधी उघडत आहेत.

‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकात अशा अनेक विषयांचा आढावा घेतला आहे.

डॉ. तृप्ती प्रभुणे ह्यांनी प्लेग, स्पॅनिश फ्लू, कॉलरा आणि देवी अशा सगळ्या रोगांविषयीची एक लेखमालिका ‘जागतिक साथींचा इतिहास’ ह्या शीर्षकाखाली लिहिली आहे. त्यातील कॉलराविषयीचा लेख आपण घेतला आहे. त्यांचे इतर लेख मराठी ‘द वायर’च्या संकेतस्थळावर मिळू शकतील. यशोदा घाणेकर ह्यांचा ‘उत्क्रांती’ हा लेख तर केतकी घाटे ह्यांची ‘पर्यावरणीय दृष्टिकोणातून……’ ही लेखमालिका केवळ कोरोनाच नव्हे तर एकंदरीतच माणसाची वैज्ञानिक प्रगती, तिला दिला गेलेला प्रतिसाद, केलेल्या/ झालेल्या चुका आणि त्यातून पुढे जाण्याची आपली धडपड ह्यांविषयी बोलते.

‘मुलं वाचवा’ ह्या लेखात कोरोना शरीर-मनात रुळेपर्यंत शाळा सुरू करू नये हा विचार दिसतो तर ‘ऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ…..’ ह्या लेखात घरी बसून शिक्षण देण्याच्या नव्या प्रयोगाविषयीची साशंकता दिसते.

विविध कार्यक्षेत्रांपैकी न्यायव्यवस्था, वेश्याव्यवसाय, संघटित आणि असंघटित मजूरवर्ग, अर्थव्यवस्था ह्यांवर कोरोनामुळे झालेले, होत असलेले आणि होऊ घातलेले परिणाम (सकारात्मक व नकारात्मक) असे काही इतर लेखांमधून मांडले आहेत.
अमेरिकेतील मिनियापोलीस शहरात एका श्वेतवर्णी पोलिसाद्वारे एका कृष्णवर्णीयाच्या झालेल्या हत्येच्या दुःखद घटनेनंतर तेथील वर्णभेदाला वाचा फोडणारा अमेरिकास्थित आशीष महाबळ ह्यांचा लेख आपल्याकडील वंशभेद-जातिभेद ह्यांविषयीही बरेच काही बोलून जातो.

डॉ. राहुल बैस ह्यांनी आपल्या लेखाच्या शीर्षकात ‘बालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे’ असे जरी म्हटले असले तरी ते बोल १३ वर्षांच्या एका लहानग्या मुलीच्या तोंडचे आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आर्थिक चणचण दूर करणारी आणि साधारण राहणीमान उंचावू शकणारी, निव्वळ रोटी, कपडा, घर नव्हे तर शिक्षणाच्या, आरोग्याच्या समान संधी उपलब्ध करून देणारी मजूरी जर असंघटित कामगारांसकट सर्वांनाच मिळू लागली, तर बालमजुरी संपू शकणार नाही का? एवढा साधा प्रश्न तेवढ्याच साध्या शब्दांत ह्या मुलीने आपल्यापुढे उभा केला आहे. ह्याचे उत्तरदायित्व आपणां सर्वांवरच आहे.

ह्या अंकात दोन कविता प्रकाशित केल्या आहेत. ते कवी आणि लेखांमध्ये पेरलेली चित्रे पाठवणारे कलाकार ह्यांचेही विशेष कौतुक.

‘आजचा सुधारक’मधील लेख आपल्याला विचारप्रवृत्त करणारे असावेत असे आमचे प्रयत्न नेहमीच राहतील. वाचकांनी लेखांविषयीचे आपले अभिप्राय कळवले तर हे साध्य करण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा ठरेल.

जुलैच्या अंकासाठी सहभाग देणाऱ्या सर्वांचेच आभार.

प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक
०९३७२२०४६४१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.