बुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न

आम्हां नास्तिक मित्रांचा एक छोटासा गट आहे. या गटात चर्चा करताना, आम्ही काही महत्त्वाचे नियम पाळतो ते असे. चर्चेचा विषय ठरल्यावर विषयबाह्य लिहायचे नाही, चर्चा करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. ‘मला माहीत नाही’, असे उत्तर दिले तरी चालते पण ते द्यायचे. अशा नियमबद्ध चर्चेचा प्रत्येकाला चांगला फायदा होतो. एक तर प्रश्नांच्या खाचाखोचा कळतात. आणि दुसरे म्हणजे आपल्या गैरसमजुती दूर होतात.

तर या गटात भरतने रसेलच्या एका निबंधाकडे आमचे लक्ष वेधले. हा निबंध ‘तत्त्वज्ञानातील कूट प्रश्न’ (problems of philosophy) या रसेलच्या पुस्तकात आला आहे. रसेलच्या या निबंधांचे शीर्षक आहे ‘सार्वत्रिकांचे जग’ (world of universals). हा निबंध वाचल्यावर भरतला असे वाटले की सार्वत्रिकांचे जग आणि स्वर्ग कल्पना यांत खूप साम्य आहे. सार्वत्रिक ही बुद्धिप्रामाण्यात येणारी महत्त्वाची संकल्पना आणि स्वर्ग ही आध्यात्मिक/धार्मिक वादातील संकल्पना, तेव्हा विषय चर्चेला घेण्यात आला. चर्चेदरम्यान असे लक्षात आले की बुद्धिप्रामाण्यातील हा भाग मनोरंजक तर आहेच पण तो आपल्याला, म्हणजे, जे स्वतःस बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवतात त्यांना अंतर्मुख करणारा आहे.

मी तत्त्वज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ नाही. तत्त्वज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेला नाही. तेव्हा मी येथे मांडलेली मते अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत हे वाचताना लक्षात घ्यावे. बुद्धिप्रामाण्यवादावर जी टीका मी करणार आहे ती विचारांना चालना देण्यासाठी आहे. या कारणाने थोडया ललित अंगाने हा लेख लिहीत आहे.

हे जग कसे आहे? ते खरोखरचे वास्तव जग आहे की माझे कल्पनाविश्व आहे? या प्रश्नांची उत्तरे निरीक्षण आणि तर्क यांच्या बळावर देणे दुरापास्त आहे. मला आवडते म्हणून मी वास्तववादी जग स्वीकारतो. बहुतेक जण वास्तव जगाच्या संकल्पनेचा स्वीकार करतात असे माझे निरीक्षण आहे. या वास्तव जगाचे ज्ञान मला कसे होते? ‘माझ्या ज्ञानेंद्रियांनी मला जे ज्ञान होते त्या ज्ञानाचे मी तर्काच्या बळावर विश्लेषण करतो. नंतर विश्लेषणाच्या बळावर काही प्रयोग करतो. प्रयोगातील उत्तरानुसार माझ्या विश्लेषणावर शिक्कामोर्तब करून ते विश्लेषणदेखील ज्ञान म्हणून स्वीकारतो.’ असे उत्तर दिले जाते. पण आपल्या बुद्धिप्रामाण्यवादास तेही पुरेसे नाही. कारण आपल्याला ज्ञानेंद्रियांनी मिळालेले हे विश्लेषण केलेले ज्ञान वस्तुनिष्ठ असत नाही. तेव्हा ते वस्तुनिष्ठ आहे की नाही याचीही खातरजमा आपण करतो. ज्ञानाची खानेसुमारी करणे, त्याचे तार्किक विश्लेषण करणे इत्यादी क्रिया बुद्धिप्रामाण्यवादात सामावल्या आहेत. हे सर्व न करणाऱ्यास आपण बुद्धिप्रामाण्यवादी मानत नाही. पण या सर्व मूलभूत मुद्द्यांमध्ये किंवा प्रक्रियेत एक तत्त्वज्ञानात्मक दोष येतो. तो म्हणजे सार्वत्रिकांचा प्रश्न.

सार्वत्रिक (universal) म्हणजे अश्या संकल्पना ज्या प्रसंग, ठिकाण व काळ यांच्यामुळे संपत नाहीत. माणूस मेला तरी त्याचे विचार मरत नाहीत. हे विधान बुद्धिप्रामाण्यवादी करताना दिसतात. ते अतिशयोक्त असले तरी बुद्धिप्रामाण्यवादाच्या दृष्टीने खरेही असू शकते. हे न मरणारे विचार म्हणजे सार्वत्रिक. हे न मरणारे विचार कुठेतरी असतात असे मानणे हे बुद्धिप्रामाण्यवादात चालते.

एखादा प्राणी घोड्यासारखा दिसत असेल तर त्याला आपण घोडा म्हणतो. हे कशाच्या बळावर? अॅरिस्टॉटलच्या मते परिपूर्ण घोड्याची एक संकल्पना आपल्या मनात असते. आपण जो प्राणी बघतो तो प्राणी ऐंशी-नव्वद टक्के या परिपूर्ण घोड्यासारखा असतो म्हणून त्याला आपण घोडा म्हणतो. हे प्रमाण जर ५० टक्के झाले आणि उरलेले ५० टक्के तो गाढवासारखा असेल तर त्याला आपण खेचर म्हणतो. अशीच कल्पना निर्जीव वस्तूंना करता येते. अश्याच रीतीने प्रत्येक नावासाठी एका परिपूर्ण प्राण्याची वा वस्तुची संकल्पना करता येते. या संकल्पना आपण एकमेकांत संवादासाठी वापरतो. त्यामुळे अश्या संकल्पनांना आपल्या मनाबाहेर एक स्वतंत्र आणि सार्वत्रिक अस्तित्व आहे. हे अस्तित्व आपल्या वास्तव जगात नसते कारण संकल्पना आपण वस्तुसारख्या अनुभवू शकत नाही. तेव्हा या संकल्पनांचे एक वेगळे जग अस्तित्वात असते असे मानावे लागते.

म्हणून का होईना या जगाची काटछाट केली गेली तर बरे असे वाटणे साहजिक आहे. परिपूर्ण घोड्याची संकल्पना ही अतिशयोक्त आहे असे सहज ठरवता येते. कारण ज्यावेळेस पृथ्वीवर फक्त एकपेशीय प्राणी होते त्यावेळेस परिपूर्ण घोड्याची संकल्पना मूर्खपणाची ठरणार. तसेच भविष्यकाळात घोडा उत्क्रांत होऊन वेगळा प्राणी तयार झाला तर परिपूर्ण घोड्याची संकल्पना बदलणार. म्हणजे परिपूर्ण घोड्याची संकल्पना ही अनादि अनंत नाही. यावरून असेही म्हणता येईल की परिपूर्ण घोड्याची संकल्पना ही मानवी मेंदूशी सीमित आहे. परग्रहावरील अधिक उत्क्रांत जीव त्याच्या ग्रहावरील प्राणीसृष्टीमुळे परिपूर्ण घोड्याची वेगळी संकल्पना बाळगू शकतो.

भरतच्या मते हे सार्वत्रिकांचे जग आणि स्वर्गकल्पना यात खूप साम्य आहे. स्वर्गातील वस्तू जशा परिपूर्ण असतात, अमर असतात तसेच हे सार्वत्रिक पण अमर आणि परिपूर्ण असतात. तेव्हा त्यांचे जग हे स्वर्गासारखे असले पाहिजे. ही समांतरता मनोरंजक असली तरी त्या दोघांना समान बनवत नाही. असे सांगितले जाते की स्वर्गातील अनुभव घेता येतो. आत्मे जसे या जगात अनुभव घेतात तसाच ते स्वर्गसुखाचा अनुभव घेतात. स्वर्गातील परिपूर्ण वस्तू/प्राणी, मानव इत्यादी एकमेकांशी संवाद साधू शकतात. सार्वत्रिकांच्या जगाचे मात्र तसे नाही. ते जग अनुभवता येत नाही. त्याची तुलना स्वर्गाबरोबर करता आली तरी ते स्वर्ग होत नाही. मात्र आपल्या अनुभवापलिकडे एक जग असते हे त्यातील प्रमेय स्वीकारावे लागते. हे स्वीकारणे कित्येकांना बोचते.

ही काटछाट करून झाल्यावर जी सार्वत्रिके शिल्लक राहतात त्यांचा प्रश्न मात्र अश्या रीतिने सोडवता येत नाही. न्याय, बंधुता, समता, हक्क इत्यादी संकल्पना या मानवी मनातून तयार झाल्या आहेत का? का या संकल्पना परग्रहावरील जीवसृष्टीसही लागू होतील? या संकल्पना जर तेथेही लागू होतील तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करावे लागेल. म्हणजे सार्वत्रिके आणि त्यांचे जग आलेच. काही जण या संकल्पनांना परिपूर्ण घोड्यासारखे दूर करतात, काही नाही.

या नीतिजगतातील संकल्पना काढल्या तरी काही संकल्पना शिल्लक राहतातच. गणितातील ‘पाय’ ही संकल्पना तशी आहे. या संकल्पनेची व्याप्ती कुठलीही जीवसृष्टी नसली तरी अबाधित राहते. आकडे, त्यांच्यातील संबंध आणि अंकगणित, तसेच भूमिती, तर्कशास्त्रातील नियम ही आणखी अशीच उदाहरणे. याशिवाय गुरुत्वाकर्षण, विद्युत कणांचे नियम इत्यादीदेखील बहुधा अबाधित राहतात असे मानले जाऊ शकते. म्हणून या सर्वांचा वापर करून आपण महास्फोटापर्यंत विचार करू शकतो.

एखादा परग्रहावरील उन्नत जीव आपल्या संपर्कात आला तर त्याच्या नीतिमत्तेच्या संकल्पना आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात का? आपण जी तर्कबुद्धी वापरतो त्यापेक्षा त्याचे तर्काचे नियम निराळे असू शकतात का? ‘पाय’ची किंमत वेगळी असू शकते का? तो एक अधिक एक चार म्हणू शकतो का? हे असे घडणे शक्य आहे असे मानणारे या सार्वत्रिकांचा त्याग करू शकतात. यांना नाममात्रवादी (nominalist) म्हणतात.

इंग्रजीत हुडकून काढणे (discover) आणि तयार करणे (invent) यासाठी दोन शब्द आहेत. जर सार्वत्रिकांचे बोचणारे जग नष्ट करायचे असेल तर ‘पाय’ ही संकल्पना हुडकून काढली नसून ती मानवी मेंदूने ‘तयार केलेली’ आहे असे मानावे लागेल. म्हणजे असे म्हणणे होईल की गुरुत्वाकर्षण ही न्यूटनने तयार केलेली संकल्पना आहे. गुरुत्वाकर्षण हे न्यूटनपूर्वी अस्तित्वात नव्हते. असेच ‘पाय’ वगैरे गोष्टींबाबत म्हणता येईल.

असे म्हणणारा स्वतःस बुद्धिप्रामाण्यवादी म्हणत नाही. त्याऐवजी तो स्वतःस नाममात्रवादी (nominalist) म्हणवून घेतो. त्यांच्या मते अबाधित असे काही नसते सर्व तयार केलेले असते. आमच्या गटात एक जण पूर्वीपासून नाममात्रवादी होता. हा वाद चालू झाल्यावर अजून एक जण नाममात्रवादी झाला. ज्याप्रमाणे ‘हे जग माझे कल्पनाविश्व आहे’ हे मत तर्काने वा अनुभवाने खोडून काढता येत नाही. तसेच नाममात्रवादाला तर्काने वा अनुभवाने खोडून टाकता येत नाही. ‘ओकमचा वस्तरा’ (Ockham’s razor) या नावाने ज्या ओकमला ओळखले जाते तो नाममात्रवादी होता. सार्वत्रिकांना ओकमच्या वस्तऱ्याने छाटून टाकता येते असे नाममात्रवाद्यांचे म्हणणे आहे.

मला असे वाटते की सार्वत्रिकांना छाटून टाकले तर विज्ञान आणि भाषा छाटाव्या लागतील. कारण या दोन्हींत संकल्पनांचा वापर करावाच लागतो. त्यातील काही संकल्पना या अनुभवाने आलेल्या नाहीत म्हणून शाश्वत आहेत. म्हणून मी नाममात्रवादी नाही. तसे पहिले तर मला अस्तित्त्ववाद (existentialism) अधिक रुचतो. कारण त्यात वस्तुनिष्ठतेचे अवडंबर कमी आहे.

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य मानणाऱ्यांना अबाधित सार्वत्रिके रुचली नाहीत तर त्यांना नाममात्रवादाचा मार्ग मोकळा आहे. सर्वसाधारणपणे विशिष्ट शब्दप्रामाण्य (उदा. धर्मग्रंथ) न मानणारा तो बुद्धिप्रामाण्यवादी अशी एक ढोबळ व्याख्या केली जाते. नाममात्रवादी, सार्वत्रिकांना मानणारे बुद्धिप्रामाण्यवादी, अस्तित्त्ववादी, अनुभववादी (empiricism) इत्यादी प्रकार त्यात मोडतील. बहुतांशाने लोक बुद्धिप्रामाण्यवादाची हीच व्याख्या करतात. पण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तसे चालत नाही. तेथे हा भेद महत्त्वाचा. आपले विचार आणि त्यातील खाचाखोचा तपासून पाहणे हे एक उत्तम करमणुकीचे साधन आहे असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे हा विषय करमणूक व्हावी म्हणून मांडला. अधिक अभ्यासासाठी तत्त्वज्ञानातील गंभीर लिखाण वाचणे योग्य होईल.

अभिप्राय 6

  • Gravity did not exist before Newton? Something wrong with the statement. Also Pi was always there as the ratio of circumference and diameter in flat geometry. It was discovered and not invented. There are more such issues in the article.

  • Gravity doesnt exist even today for those who haven’t realised it. pi doesnt exist for those who have no relation with circles.

    How is wastunishthata less in existentialism ?

    The concept of heaven and hell are the natural outcomes of a suggestion to the society to follow laws like common good, in good faith etc.
    For some, like Nallathur or phasepardhis, theft is a way of life. In their belief you would be in heaven if you follow that.

  • Vivek,

    That’s a nominalist claim. They claim that concepts are not eternal. Therefore they are formed and not discovered. According to them concept of gravity and pi is invented. I am not a nominalist.

    Rationalists claim that concepts are eternal. This claim runs into problems too. If there is no life can concepts exist?

  • Bharat,

    Existentialism accepts both objective and subjective knowledge. Rationalism sort of demeans subjective knowledge.

  • In Indian philosophies there are broadly three views about universals:

    (1) न्याय-वैशेषिक: This is a realist view in which the universal is a real entity which is distinct from, but inheres in, many individuals.

    (2) बौद्ध: This is a nominalist view according to which universal is a mere name; it has no objective existence. Only the particular at a point of time has objective existence. Two particulars though different from each other are identified together in the universal due to their more pronounced contrast with the third object. For example, the so called sameness of cows is exclusion of non-cows.

    (3) जैन आणि अद्वैत वेदांत: This is a contextual view. Both reject concept of universal as a real (sensate or objective) and independent entity. It is only a concept in our mind constituted by the essential common attributes of individuals that are present in the object of our experience. Concepts are useful or otherwise in a given context; beyond that they do not have reality.

    As against these views there is Mathematical Platonism in which mathematical concepts are real, permanent and universal concepts. For examples, numbers, sets, geometric objects etc are valid on earth as well as on Mars .. today as well as tomorrow. They have permanent existence in their own Platonic world. Heaven, Hell etc are not mathematical concepts.

    Interestingly, in logic (Set Theory) Universal Set does not exist in modern ZFC set theory which is most commonly taught today. However, it is possible to introduce such a Universal set by proper selection of axioms. Thus, mathematical world is fragmented and many opposing theories can exist in the Mathematical world.

    See my own article elsewhere in which Popper and Penrose “three world” hypothesis is mentioned.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.