बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग १)

आपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः ‘वडील’ ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टीनिर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने ‘निर्माता दिसला नाही तरी आहे’ याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो. याशिवाय सृष्टिनिर्मात्याबरोबर त्याचे ‘पदाधिकारी’देखील आहेत. पुराणकथांमधून आपण हे वाचलेलं असतं. उदा. भारतीय परंपरेतील पर्जन्याचा देव वरुण, ग्रीक पुराणातील प्रेमाची देवता अ‍ॅफ्रोडाइट आणि असे अनेक! माणसाचा मूळ ईश्वर विचार आणि त्याचा होत गेलेला विकास हा एक दीर्घ आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे. त्याला समांतर असा निरीश्वरवादाचादेखील प्रवास आहे. खरं म्हणजे ईश्वर देहरूपात अस्तित्वात आहे या एका टोकापासून ईश्वर कुठल्याच रूपात अस्तित्वात नाही या दुसऱ्या टोकापर्यंतचा एक स्पेक्ट्रम आहे असं आपल्या लक्षात येईल. या पूर्ण स्पेक्ट्रमभर ईश्वरी अस्तित्वाविषयीचे विविध दृष्टिकोन, श्रद्धा, विश्वास विसावलेले आहेत. भारतीय दर्शनपरंपरेत ‘आस्तिक’ म्हणजे वेदप्रामाण्य मानणारी दर्शने आणि ‘नास्तिक’ म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारी दर्शने अशी विभागणी आहे. या अर्थाने चार्वाक, जैन व बौद्ध ही तीन दर्शने नास्तिक ठरतात आणि न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा (मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (वेदांत) ही आस्तिक ठरतात. आस्तिकांपैकी सांख्य आणि पूर्वमीमांसा ईश्वराचं अस्तित्व नाकारतात. पण ते वेदप्रामाण्य मानत असल्याने आस्तिक ठरतात. आस्तिक याचा आजचा रूढ अर्थ – सृष्टीचा निर्माता कुणीएक आहे आणि तो ईश्वर आहे – लक्षात घेता चार्वाक, जैन, बौद्ध, सांख्य आणि पूर्वमीमांसा ही दर्शने पूर्णपणे नास्तिक ठरतात. याशिवाय प्राचीन वैदिक वाङ्मयातदेखील इहलोकवादी विचारांचं अस्तित्व जाणवतं असं स. रा. गाडगीळांसारख्या अभ्यासकांनी नमूद केलं आहे. युरोपातील ‘रिनेसाँ’ (पंधरावे व सोळावे शतक) आणि ‘एज ऑफ रीझन’ (सतरावे व अठरावे शतक) या कालखंडात नास्तिकतेची बीजं दिसतात. आस्तिक-नास्तिक मत, ईश्वर सृष्टिनिर्माता आहे (क्रिएशनिझम) – सजीव उत्क्रांत होत गेले आहेत (इव्होल्यूशन) याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. जडवाद विरुद्ध चैतन्यवाद म्हणून ओळखला जाणारा हा संघर्ष शतकानुशतकं जगभर चालूच आहे. त्यावर लिखित स्वरूपात पुष्कळ साहित्य उपलब्ध आहे. त्याचं परिशीलन आपल्याला अनेकविध बारकाव्यांची ओळख करून देऊ शकेल.

ईश्वरी अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारा आणि जीवसृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया संशोधनाद्वारे मांडणारा डार्विनचा सिद्धांत ईश्वराविषयीच्या चर्चेला ऐतिहासिक वळण देणारा ठरला. तोही पुढे विकसित होत गेला आहेच. उत्क्रांती ही ‘वस्तुस्थिती’ आहे की ‘सिद्धांत’ आहे यावरही चर्चा सुरू असते. परंतु उत्क्रांतीची दिशा माणसाला गवसलेली एक क्रांतिकारक दिशा आहे यात संशयच नाही. आपल्या अस्तित्वाभोवती साचलेल्या गूढतेला छेद देणारी, जीवशास्त्रीय संशोधनात मौलिक भर घालणारी, या संशोधनाला गती देणारी, वेगळी दिशा देणारी आणि माणसाला आश्वस्त करणारी ही दिशा आहे. (‘आजचा सुधारक’ने ऑगस्ट २००९ मध्ये काढलेला ‘डार्विन विशेषांक’ आणि पुढे त्याला ‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ हे मनोविकास प्रकाशनाने दिलेलं पुस्तकरूप मराठीतील एक मौलिक दस्तावेज आहे.) उत्क्रांतीचा समावेश औपचारिक शिक्षणात करण्यात आला असला तरी अजून आपल्या सांस्कृतिक जीवनावर त्याचा काहीही प्रभाव नसल्याने, आपल्या विचारविश्वात उत्क्रांतीची बैठक अद्याप तयार न झाल्याने सामूहिक जाणिवेत उत्क्रांतीचं स्थान अद्याप पक्कं झालेलं नाही. ते होणं गरजेचं आहे – उत्क्रांती हा दुर्लाघ्य श्रद्धेचा विषय न होता!

या प्रास्ताविकानंतर आपण या विशेषांकाचा आणि प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या संकल्पनेकडे वळू. ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या संकल्पनेविषयी मे. पुं. रेगे यांनी अत्यंत उद्बोधक विवेचन केलं आहे. त्यांच्या एका अवतरणानेच चर्चेचा प्रारंभ करू. अवतरण बरंच मोठं आहे, पण महत्त्वाचं असल्याने जसंच्या तसं देत आहे.

बुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये, अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.

बुद्धिप्रामाण्यवादाच्या या व्याख्येत असे अभिप्रेत आहे की, बुद्धी अशी एक विशिष्ट, ओळखता येण्याजोगी मनःशक्ती आहे आणि तिला कित्येक गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत असे दिसून येते. ज्या गोष्टी तिला सत्य किंवा योग्य म्हणून दिसून येतात किंवा आलेल्या असतात, तेवढ्याच सत्य किंवा योग्य म्हणून जो स्वीकारतो तो बुद्धिप्रामाण्यवादी असतो. बुद्धिप्रामाण्यवादाच्या या मांडणीवर दोन आक्षेप घेता येतील. बुद्धी अशी एक विशिष्ट शक्ती आहे आणि ती काहीतरी करते किंवा तिच्या द्वारा, तिच्या माध्यमातून काहीतरी घडते असे मानायला आधार नाही. माणसे वस्तू उचलतात त्या सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात. पण अपवादभूत प्रसंगी आपल्या पायांचा किंवा कोपरांचा उपयोग करूनही माणसे वस्तू उचलू शकतात. तेव्हा ‘ही वस्तू कुणी उचलली असेल?’ या प्रश्नाचा सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ ‘ही वस्तू कुणाच्या हातांनी येथून उचलली गेली असेल?’ असा असतो. गुप्त पोलिस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या वस्तूवर बोटांचे ठसे न्याहाळीत बसतात हे सर्वांना माहीत आहेच. अर्थात चाणाक्ष गुप्त पोलिस ती वस्तू पायांनी किंवा कोपरांनी उचलता येण्याजोगी असली, तर त्या प्रकारेही ती उचलली गेली असण्याची शक्यता ध्यानात बाळगतो.

आता, याच न्यायाने आपल्याला असे म्हणावे लागेल की, वस्तू ज्याप्रमाणे माणसे उचलतात त्याप्रमाणे गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत हे माणसांना पटते. आणि माणसे वस्तू उचलतात, ती ज्याप्रमाणे सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात, त्याप्रमाणे ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून माणसांना पटलेल्या असतात, त्या सामान्यपणे (किंवा अनेकदा किंवा कित्येकदा) आपल्या बुद्धीचा त्यांनी वापर केल्यामुळे सत्य किंवा योग्य म्हणून त्यांना दिसलेल्या असतात. पण अपवादभूत प्रसंगी (किंवा कित्येकदा किंवा अन्य प्रसंगी) दुसऱ्या एखाद्या मनःशक्तीचा वापर केल्याने त्यांना त्या सत्य किंवा योग्य म्हणून दिसलेल्या असतात. आता बुद्धिप्रामाण्यवादी तो, की जो बुद्धीला दिसलेल्या गोष्टीच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारतो, अन्य शक्तींचा वापर केल्याने दिसलेल्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारत नाही.

आता, ही वस्तू ह्या माणसाने उचलली असेल तर ती त्याने कशी उचलली, आपल्या हातांचा उपयोग करून, की कोपरांचा की पायांचा? ह्या प्रश्नाचा निर्णय करता येतो. पण ह्या माणसाला ही गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली, ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी शक्तीचा वापर केल्याने जाणवली, ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता? आपण आपले व इतरांचे हात ओळखू शकतो आणि एखाद्या प्रसंगी ते वापरले जात आहेत की नाहीत हे निरीक्षणाने ठरवू शकतो. आता ह्या प्रकारे बुद्धी अशी आपली एक विशिष्ट शक्ती आपण ओळखू शकत नाही आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात येत आहे की नाही हे निरीक्षणाने ठरवू शकत नाही. तेव्हा, ‘आपल्या बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते, तेवढेच स्वीकारणे योग्य असते’ असे घोषवाक्य उच्चारणे सोयीचे असले, तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल.

बुद्धिप्रामाण्यवादाच्या वरील मांडणीवर घेता येण्याजोगा दुसरा आक्षेप असा; बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारा ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत असेल की ‘बुद्धीशिवाय इतरही मनःशक्ती आहेत, पण त्यांच्यातील कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही; फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय.’ मग बुद्धीच्या बाबतीत आपण असा पक्षपात का करतो हा प्रश्न उपस्थित होईल आणि ‘हा पक्षपात करणे योग्य आहे, किंबहुना हा पक्षपातच नाही, कारण फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे ह्याचे आकलन होऊ शकते, इतर शक्तींना होऊ शकत नाही’, असे त्याचे उत्तर असेल, तर हे आपल्याला कसे समजले हा पुढील प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. आणि हे आपल्या बुद्धीला समजते असे त्याचे उत्तर देऊन भागणार नाही; कारण ते वर्तुळात्मक ठरेल. इतर शक्तींच्या बाजूनेही असाच दावा करता येईल. बुद्धिप्रामाण्यवाद हा अनेक पंथांमधील एक पंथ ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवाद, भावनाप्रामाण्यवाद असे अनेक पंथ असू शकतील आणि ह्या पंथांमधून निवड कशी करावी ह्याला काही तात्त्विक अधिष्ठान असणार नाही. ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल.

किंवा आपली भूमिका अशी असेल : ‘बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते, तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत नाही की, बुद्धीशिवाय इतरही ज्ञानशक्ती किंवा मनःशक्ती आहेत, त्याही सत्य म्हणून कशाचे तरी ग्रहण करतात. तो सत्याभास असतो. खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते. बुद्धी हीच केवळ ज्ञानशक्ती आहे आणि केवळ तीच सत्य ग्रहण करू शकते. पण अशी जर आपली भूमिका असेल तर जे ‘बुद्धीला पटले आहे तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात स्वारस्य तरी काय? आपण फक्त तोंडाने खाऊ शकतो, इतर कशाने खाऊ शकत नाही. म्हणून, ‘तुम्ही रोज एक सफरचंद खा’ असा सल्ला डॉक्टर देईल; पण ‘तुम्ही रोज एक सफरचंद तोंडाने खा’ असा सल्ला तो काही देणार नाही. तोंडाने खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही. तसेच ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे म्हणता येईल; पण तुमच्या ‘बुद्धी’ला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा असे म्हणण्याचे कारण नाही. पण ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय? जे आपल्याला सत्य म्हणून आकलन झालेले नसते; दिसलेले, जाणवलेले नसते; त्याचा सत्य म्हणून कुणी स्वीकार करीत असतो काय? हा अनावश्यक सल्ला तर नव्हे?
– मे.पुं. रेगे (विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा या पुस्तकातील ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या प्रकरणातून)

‘बुद्धी’ या ‘मनःशक्ती’विषयीचं रेगे यांचं विवेचन रोचक आहे. बुद्धी आणि भावना असं द्वैत असून माणूस जेव्हा बुद्धीच्या आधारे निर्णय घेतो तेव्हा ते योग्य ठरतात कारण त्यात दूरदृष्टी असते आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो तेव्हा ते चुकतात कारण त्यात क्षणिक सुखाचा विचार असतो असं आपण म्हणतो. परंतु ‘जाणीव’ हे मूळ आहे, बुद्धी ही जाणिवेने ग्रहण केलेली, जाणिवेबरोबर विकसित होणारी गोष्ट आहे आणि त्यातून माणसाला निर्णयशक्ती मिळते. रेग्यांनी म्हटल्याप्रमाणे कल्पना, प्रतिभा, भावना अश्या इतर शक्तीही असल्या तरी त्या मूळ बुद्धीच्या शाखा आहेत किंवा खरं तर बुद्धीमध्येच त्यांचा अंतर्भाव होतो असं प्रस्तुत लेखकाचं मत आहे. त्यामुळे एखादा मनुष्य त्याच्या बुद्धीमुळेच श्रद्धाळूही असतो किंवा अश्रद्धही असतो. परंतु प्रत्येकजण बुद्धीशी प्रामाण्य राखूनच वागतो, निर्णय घेतो असं म्हटलं तर कृतीची योग्यायोग्यताच निकालात निघते. त्यामुळे ‘बुद्धी वापरणे’ हा मुद्दा नसून ‘बुद्धीची कक्षा विस्तारणे’ हा मुद्दा पुढे येतो.

रेगे या लेखात पुढे बुद्धिप्रामाण्यवादाची व्याख्या करतात. बुद्धिप्रामाण्यवादी असणे म्हणजे काय? तर पुरेशा पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून न स्वीकारणे किंवा असत्य म्हणून न नाकारणे. पण मग पुराव्याअभावी एखादे विधान अनिर्णित मानावे इतकेच जर बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल तर तर बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करण्याचे कारण काय? असा प्रश्न ते विचारतात. कारण सत्य, असत्य किंवा अनिर्णित अशा तीन साध्या-सरळ शक्यता असताना माणूस बुद्धिप्रामाण्यविरोधी वागेलच कसा? पण असे होत नाही. माणसाच्या भावना, त्याच्या अंतर्मनातील अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती माणूस स्वीकारतो. रेगे लिहितात, ‘या प्रेरणांचे समाधान कल्पनेच्या विश्वातच होऊ शकते. स्वप्ने आणि दिवास्वप्ने ह्या स्वरूपातच ह्या प्रेरणा सफल होऊ शकतात. पण ही स्वप्ने आणि पुराव्याच्या आधारे सत्य ठरणाऱ्या तार्किक समजुती माणूस अलग ठेवू शकत नाही. ह्या तर्कसिद्ध समजुतीचे विषय असलेल्या वस्तुस्थिती आणि ही स्वप्ने ह्यांचे बेमालूम मिश्रण असलेल्या जगात माणूस जगत असतो.’

तर्क, कल्पना, प्रतिभा, भावना यांच्याप्रमाणेच अंतर्मनातील अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती या सर्व मूळ बुद्धीच्या शाखा आहेत (किंवा बुद्धीच्या आतच हे सगळं काही आहे) हे मान्य असेल तर मग बुद्धीला पटेल त्यानुसारच वागा असं म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही. परंतु बुद्धीअंतर्गत जे जे येतं त्या सगळ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यायचं बुद्धीचं सामर्थ्य म्हणजे विवेक. या गुणाचा विकास व्हावा आणि या गुणाच्या आधारेच निर्णय घ्यावेत असं मात्र निश्चित म्हणता येईल. पण इथेही ‘मी माझ्या आजारी आईला बरं वाटावं म्हणून बरेच उपचार केले, पण गुण येईना. शेवटी देवीसमोर बोकडाचा बळी द्यायचं ठरवलं. माझ्या दृष्टीने हा विवेकी निर्णय होता’ असं कुणी म्हटलं तर? तर त्यासाठी विवेक म्हणजे काय यावर आपल्याला अधिक बोलावं लागेल. मे. पुं. रेगे यांनी वरील पुस्तकात विवेकवाद, विज्ञाननिष्ठा, श्रद्धा यांविषयी विस्तृत मांडणी केली आहे. प्रस्तुत चर्चाविषयाच्या संदर्भाने हे पुस्तक अवश्य वाचावं. 

रेग्यांच्या मांडणीतला एक मुख्य धागा माणसाच्या मनाशी, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाशी निगडित आहे. वरील पुस्तकातील ‘मी आस्तिक का आहे?’ या प्रकरणातील त्यांचं एक म्हणणं लक्षवेधी आहे. ‘सृष्टीची रचना सहेतुकपणे केली गेली आहे यावरील आक्षेप मला माहीत असूनही मी माझी बालपणातील श्रद्धा सोडून का दिली नाही? मी ‘आस्तिक’ का राहिलो? याचं थोडक्यात उत्तर असं की ही माझी स्वाभाविक श्रद्धा आहे. माणूस म्हणून असणारी ही स्वाभाविक श्रद्धा आहे. तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ती सोडून द्यावी लागेल असं काही घडलेलं नाही.’ आपण जेव्हा ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्या’चा विचार करतो तेव्हा आपल्याला माणसाच्या या ‘स्वाभाविक श्रद्धा’ विचारात घ्याव्या लागतात. या श्रद्धा, त्या निर्माण होण्यामागचं कौटुंबिक आणि मानसिक पर्यावरण, आधीच्या अवतरणात रेग्यांनी उल्लेख केलेलं ‘वस्तुस्थिती आणि स्वप्ने यांचं मिश्रण’, माणसाच्या मनाचं ‘अनेकदिश’ असणं, ‘विसंगतीसह’ विचार करण्याची मनाची वृत्ती असणं हे सगळं आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाचं सामाजिक स्थान लक्षात घ्यावं लागतं.

इथवरच्या मांडणीतून मला ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ ऐवजी ‘विवेकवाद’ हा शब्द अधिक योग्य वाटतो हे वाचकांच्या लक्षात आलं असेल. मी आस्तिक नाही, पण तांत्रिकदृष्ट्या पाहता नास्तिकही नाही. काही असलोच तर – म्हणजे माझ्या मनात या विषयासंदर्भाने जी आंदोलनं सुरू असतात त्यांना काही नाव द्यायचं झालंच तर – मी अज्ञेयवादी आहे. मला एक मूलभूत प्रश्न असा पडतो की, आपल्याला सत्याकडे जाण्यासाठी संकल्पनांची खरंच गरज आहे का? सत्य काय आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी आस्तिक अथवा नास्तिक असण्याची गरज काय आहे? ‘मला काय वाटतं’ हे सृष्टीच्या अफाट पसाऱ्यापुढे प्रस्तुत कसं ठरू शकेल? परंतु या तात्त्विक पार्श्वभूमीवरही एक गोष्ट नक्की की मी समाजाचा भाग आहे आणि माझ्या विचारशक्तीनुसार सामूहिक हितासाठी काय आवश्यक आहे याचा मी विचार केलाच पाहिजे. त्यासाठी माझी एक निश्चित भूमिका असली पाहिजे. आणि त्यासाठी ‘आज समाज कोणत्या वास्तवात जगतो आहे’ याचं मला आकलन असलं पाहिजे. सर्व संकल्पनांच्या आणि त्यांच्यातील संघर्षांच्या, त्यांच्या आंतरसंबंधांच्या पार्श्वभूमीवर विचार करताना मला असं जाणवतं की ‘हितकारक’ काही असेल तर तो ‘विवेक’ आहे कारण ती प्रवाही संकल्पना आहे. स्वतःला कप्प्यात बंद करून घेणारी नाही. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे विवेकाविषयीदेखील अधिक बोलावं लागेल. लेखाच्या पुढील भागात त्याविषयी आणि ‘सामाजिकदृष्ट्या हितकारक’ काय आहे याविषयी बोलूया.

ईमेल: utpalvb@gmail.com

अभिप्राय 1

  • इतका गंभीर व गहन विषय ,
    पण लिखाण त्या प्रमाने नाही.बुद्धि आंनी विवेक हे टाइटल ह्या लिख्नना ला दिले तर योग्य होइल.
    डार्विन तर लेखात कुठल्या कुठे गेला,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.