नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी

नास्तिकता हा शब्दप्रयोगच आपल्यासारख्या विचार करून निर्णय घेणाऱ्यावर, न्यायोचित व नैतिक कृती करणाऱ्यावर अन्याय करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण नास्तिक हा शब्द सामान्यपणे आस्तिक नसणाऱ्यांसाठी म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसाठी वापरला जातो. परंतु नास्तिकता फक्त परमेश्वर ही संकल्पनाच नव्हे तर या संकल्पनेच्या अवतीभोवती असलेल्या एकूणएक गोष्टी नाकारत असते. परमेश्वर या संकल्पनेभोवती असलेल्या बहुतेक संकल्पना, रीती-रिवाजांच्या, रूढी-परंपरांच्या, बुद्धीच्या, तार्किकतेच्या व काही वेळा ऐहिक सुखाच्या कसोटीला उतरत नसतात. कदाचित परमेश्वर ही संकल्पना मेंदूचा विकास प्राथमिक टप्प्यावर असताना केव्हातरी प्रचलित झाली असावी व आज माणूस विकासाच्या होमो सेपियन या टप्प्यावर पोचला तरी टिकून आहे व प्रभावीसुद्धा आहे. परमेश्वराचे अधिष्ठान मानणाऱ्या व जगभरातील सर्व परमेश्वरकेंद्रित धर्मपरंपरा कदाचित अज्ञानापोटी व/वा भीतीपोटी अजुनही भरभराटीत आहेत, एवढेच नव्हे तर मानवी समाजावर सत्ता गाजवत आहेत. धर्मपरंपरेत नैतिकता, मानवीयता यांसारख्या मूल्यांना स्थान असले तरी अश्या मूल्यांच्या पालनासाठी धर्मपरंपरेला चिकटून राहण्याची अजिबात गरज नाही.

त्याचप्रमाणे निधर्मवादी हा शब्दसुद्धा खटकतो. कारण या शब्दाद्वारे आपण फक्त धर्म नाकारतो, देवाला नाही. कदाचित एकेकाळी या जगाची निर्मिती करणारी एखादी शक्ती होती व या शक्तीमुळे निसर्गाची, सर्व सृष्टीची रचना, नियामकता व नियंत्रण होत आहे असे वाटले असेल. परंतु आज हा विचार कालबाह्य झाला आहे. अशी एखादी शक्ती असूच शकत नाही या निष्कर्षाप्रत आपण पोचलेलो आहोत. जगभरात आपल्यासारखी विचारसरणी असलेल्यांना – Humanist, Secular-Humanist, Non-believer, Non-theist, Free-thinker, Bright, Skeptic, Critic, Anti-religious, Anti-superstitious, यांप्रकारच्या नावाने ओळखत असतात. त्यामुळे आपल्या विचारांशी सुसंगत अशी एखादी नवी शब्दरचना आपल्याला हवी आहे. तोपर्यंत आपण नास्तिकता हाच शब्दप्रयोग वापरत पुढे जाऊ या.

माझ्या मते नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी आहे. पहिली अट आहे, पहिली शर्त आहे. आपल्या देशातील कौटुंबिकव्यवस्था व समाजव्यवस्था, संस्कृती व धार्मिक वातावरण यांच्या दबावामुळे नास्तिकता अपरूप वाटत आहे. परंतु बुद्धिनिष्ठतेकडे वाटचाल करत असताना या सर्व दबावांना झुगारून पुढे जावे लागत आहे. आपल्या समाजातील बहुतांश लोकांना बुद्धिनिष्ठतेच्या किमान पातळीवर आणण्यासाठी नास्तिकतेला पर्याय नाही. कारण आपल्यातील चिकित्सक वृत्ती विकसित होत आहे याचे दृश्य स्वरूपातील द्योतक नास्तिकता असते. आपल्यात चिकित्सक वृत्ती विकसित झाल्यास आपल्या अनेक समस्यांना नक्कीच उत्तरे सापडत जातील. कदाचित उत्तरे उशिरा मिळतील. परंतु योग्य उत्तरे मिळतील याची खात्री असावी. काहीतरी गोलमोल, संदिग्ध, ओबडधोबड, नरो वा कुंजरो वा या पद्धतीची ती नसतील.

नास्तिकतेचा स्वीकार करण्यापूर्वीच्या सुरुवातीच्या काळात अवतीभोवतीचे आस्तिकतेचे वातावरण, सण-उत्सव, त्यासाठी करत असलेली जय्यत तयारी, उपास-तापास, इत्यादी गोष्टींत काही चूक आहे असे वाटतही नव्हते व त्यात आपण स्वतःहून झोकून देत होतो. त्यातल्या अनेक गोष्टी आवडतही असत. उदबत्त्यांचा वास, भजनं-कीर्तनं, धार्मिक सणादिवशीचे गोड गोड जेवण यांचा आनंद आपण उपभोगत होतो. पुराणातील त्या चित्तथरारक कथांमध्ये आपण तल्लीन होत होतो. रोज किंवा सठीसामाशी का होईना, देवाजवळ स्वतःच्या मनातल्या मनात, मन मोकळं केलं किंवा ईश्वराची स्तुती केली, काही लडिवाळ म्हणा, मंगल म्हणा, स्तोत्रे म्हटली तर मूड एकदम चीअर-अप होऊन जातो असे वाटत असे. इतर करतात वा सांगतात म्हणून पूजा-अर्चना, मंदिरात जाणे, प्रार्थना म्हणणे अशा गोष्टीही करत होतो. मन खरंच प्रसन्न होत होते की नाही हे कळण्यास कुठलाही मार्ग नव्हता. परंतु इतर सांगतात म्हणून आपण हो म्हणत होतो. आस्तिकांना तर या गोष्टी करत राहिल्यामुळे काहीतरी उत्तम मिळवले (अ‍कम्प्लिश केले) असे काहीसे वाटत असावे. ‘जय श्रीराम’ म्हटले की समाधान, मनाला टॉनिक, समस्यांचा विसर, उभारी असे काही तरी वाटत असावे. परंतु जेव्हा मानसिकता नास्तिकतेकडे वळू लागते तेव्हा मात्र या प्रकारांतील खोटेपणा हळूहळू लक्षात येऊ लागतो. नंतर या गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. काहीवेळा त्याबद्दल तिरस्कार वाटू लागतो. खरे पाहता हे सर्व मनाचे खेळ असतात वा रूढी-परंपरा यांच्या दबावामुळे माइंड कंडिशनिंग झालेले असते. जेव्हा हे लक्षात येते तेव्हा आपण यातून मुक्त होण्यासाठी नास्तिकतेकडे वळू लागतो.

नास्तिकता आपणास परमेश्वर व परमेश्वरकेंद्रित देव, देवता, जात, धर्म, धर्मस्थळं, पाप, पुण्य, स्वर्ग-नरक, धार्मिक रूढी, परंपरा, इत्यादी गोष्टींची चिकित्सा करण्यास भाग पाडते. धर्मग्रंथातील सांगो-पांगी गोष्टींचा योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. या चिकित्सकतेतून जगाकडे पाहण्याची एक आगळी-वेगळी दृष्टी लाभते व ही दृष्टी आपल्याला निर्भयपणे जगण्यास, जगण्यातील आनंद मिळविण्यास मदत करते. ही चिकित्सक बुद्धी वा चौकसवृत्ती आयुष्यातील कुठलेही लहान-मोठे निर्णय घेत असताना उपयोगी पडू शकते. भावनेच्या आहारी न जाता डोळे उघडे ठेवून व आपल्या प्रत्येक कृतीला आपणच जबाबदार असतो या जाणीवेत आपण आयुष्य जगू शकतो.

नास्तिकतेत आपणच आपले शिल्पकार असतो, आपल्याला घडवत असतो. आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या कृतीला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आपल्याला निर्भयपणाने मान वर करून जगता येते. आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा दबाव नसतो. हे केल्यास काय होईल, ते नाही केल्यास काय होईल वा मृत्युनंतर काय होईल, याचीa काळजी करत बसण्याचे कारणच उरणार नाही. पाप-पुण्याचा हिशोब मांडणारा तेथे नसणार. आपल्या कृतीचे आपणच मूल्यमापन करत जगणे ही एक समाधानाची बाब ठरेल.

आस्तिकांच्या बरोबर वितंडवाद करून आपला वेळ, श्रम व्यर्थ करण्यात हशील नाही. नास्तिकता ही एक मानसिकता किंवा प्रवृत्ती (ॲटिट्यूड) आहे. आपण त्याला एक गुणविशेष (कॅरेक्टरिस्टिक) म्हणून दर्जा देण्याचीही गरज नाही. आपण फार वेगळे आहोत असेही समजण्याची गरज नाही. इतर धार्मिकांप्रमाणे आपण आपला पंथ वाढावा म्हणून प्रयत्न करण्याचीसुद्धा गरज नाही. ही एक हळूहळू वाढत जाणारी आणि पुढे पुढे स्वतःत आमूलाग्र बदल घडवू शकणारी मानसिकता असते. कुणीतरी सांगितले म्हणून वा कुणाचे तरी अनुकरण करणार म्हणून वा त्यातून काही फार मोठा फायदा मिळणार आहे म्हणून कुणीही नास्तिक होत नाही. ही मानसिकता कशामुळे तयार होते; ती कशी वाढते; वाढलेल्या मानसिकतेला जपण्यासाठी नेमके काय काय करावे लागेल; हे प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न असू शकतील. आपापल्या क्षमतेप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे सापडत जातील, मानसिकता वर्धिष्णू होत राहील.

एक मात्र खरे की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. चार-चौघांत रमणारा आहे. नातेवाईकांत-मित्रमंडळीत सुख-दुःख, आनंद-समाधान वाटून घेण्यात त्याला रस असतो. एकमेकांना काही ना काही सांगावेसे वाटते, इतरांचे ऐकावेसे वाटते. आपण एकलकोंडे राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या विचाराचे कुणी सापडल्यास मनाला बरे वाटते. समविचारी मान्यवरांच्या अनुभवाचे बोल ऐकून आपण परत आपापल्या कामाला लागतो. परंतु हे एवढे पुरेसे आहे का? आपल्या विचारांच्या बांधिलकीसाठी यापेक्षा जास्त काही आपण करू शकतो का? याचाही विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. कारण आपण ज्या खडतर मार्गावरून जात नास्तिकतेची धुरा सांभाळली, त्याच खाचखळग्यांतून पुढच्या पिढीनेही जावे ही अपेक्षा योग्य ठरणार नाही.

एकेकाळी संपर्कमाध्यमांची उणीव होती. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण सुलभ नव्हती. परंतु आता माहितीतंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे एका क्षणात आपण आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतो. शेकडो लोकांपर्यंत पोचवू शकतो. फक्त त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी नेमके काय करावे, त्याची वारंवारता काय असावी याचीही चर्चा व्हावी असे वाटते. नास्तिक विचारांची परिपक्वता बालपणापासूनच येण्यासाठी काय करता येईल याचाही आपण सर्व मिळून विचार केल्यास आपल्या हाती काही लागले असे वाटेल. यासाठी कदाचित डेडिकेटेड व्हाट्सअॅप ग्रुपची रचना, अशा प्रकारच्या इतर समविचारी ग्रुप्सशी संपर्क, मराठी/हिंदी/इंग्रजी वेबसाइटची निर्मिती, ३ ते ६ महिन्यांचा ऑनलाइन करस्पाँडन्स कोर्स, जमेल तसे साप्ताहिक/पाक्षिक बैठका इत्यादींचा विचार करता येईल. याचबरोबर आपल्या आचार-विचारात नेमकेपणा येण्यासाठी वाचन, लेखन यांचीही अत्यंत गरज आहे. काही पुस्तिका लिहून छापता आल्यास कुंपणावर असलेल्यांच्यात वितरण करता येईल. आपल्यातील काहींनी यासंबंधी पुढाकार घेतल्यास वर्षभरात नास्तिकतेविषयी काही भरीव काम केल्याचे लक्षात येईल. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, मानवता इत्यादी प्रकारची आधुनिक जीवनमूल्ये जपण्यासाठी व या मूल्यांच्या आधारावर समाजरचना हवी याची जाण नास्तिकतेतून येऊ शकते. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगू नये इत्यादी बुद्धिनिष्ठ स्वप्नं पाहत ‘सुधारक’कार आगरकर जीवन जगले व त्यांनी आपला देह झिजवला. रूढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. या गोष्टींची आपल्याला थोडी जरी जाणीव असल्यास नास्तिकता हाच आयुष्याचा पाया असावा व त्यावरच आपल्या आयुष्याची इमारत बांधणे सूक्त ठरेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.