स्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत

एका गोष्टीत अकबर एकदा बिरबलाला विचारतो की आपल्याला सर्वांत प्रिय काय असते. उत्तरादाखल बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासोबत एका रिकाम्या हौदात उतरवतो व हौदातील पाण्याची पातळी वाढवणे सुरू करतो. सुरुवातीला पिल्लाला वाचवायचे म्हणून माकडीण त्याला आपल्या डोक्यावर घेते. पण पुढे जेव्हा तिच्या जीवावर बेतते, तेव्हा ती सरळ पिल्लाला खाली टाकून त्याच्यावर चढून स्वत:चा जीव वाचवू पहाते.

गोष्टींवरून व उदाहरणांवरून स्वार्थासारख्या गुंतागुंतीच्या विषयाची काही अंगे कळली व कदाचित पटली जरी, तरी काही वेगळ्या परिस्थितींमधे इतर अनेक पैलू समोर येऊ शकतात. पृथ्वीतलावरील सर्वांत स्वार्थी प्राणी निर्विवादपणे मानव आहे. हे बहुधा आपल्या विचारांमध्ये आपल्या जनुकांकडून (genes) आले असावे. आपली जनुके स्वार्थी असल्यानेच आपण निसर्गात टिकलो, विविध परिस्थितींमधे जगायला व फोफावयाला शिकलो. या स्वार्थाचे केंद्र नेमके काय आहे व त्याचा परीघ किती आहे याचा थांग लागणे तसे कठीण! पण धार्मिक, प्रादेशिक व त्यामुळे राजकीय पैलूंद्वारे एक छोटा प्रयत्न करूया. जास्त कळीचा मुद्दा अर्थात हा आहे की त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे का? ते शक्य आहे का? व असल्यास कसे?

स्वार्थाच्या केंद्राच्या जवळपास स्वत्व नक्कीच असते. त्याचमुळे

(१) माझी खेळणी, माझा पैसा, माझी गाडी इत्यादी विचार डोकावतात. याचबरोबर
(२) माझे मित्र, माझे कुटुंबीय अशी थोडी पसरट भावना पण असते.
यापुढील जास्त व्यापक आणि त्यामुळेच कदाचित जास्त धूसर अश्या
(३) माझा देश, माझे राज्य, माझे गाव, माझा परिसर, माझे शेजारी या संकल्पना.

पृथ्वीवर वरील (१) व (२) क्रमांकाच्या गोष्टी सर्व मानवांमधे आढळतात. (३) मधील ‘माझा देश’ ही भावना सद्य परिस्थितीत दुर्दैवाने वैश्विक असली तरी राज्य/गाव/परिसर यांवरील प्रेमाची तीव्रता देशाच्या घडणीवरून आणि इतिहासानुसार ठरते. उदा. काही देशांचा भौगोलिक आकार छोटा असल्याने ते देश राज्यांमध्ये विभागलेले नाहीत.

वरील तिन्ही प्रकार मूर्त आहेत, भौतिक आहेत. या सर्वांना छेदणार्‍या आणि त्यापलिकडे जाणार्‍या दोन संकल्पना आहेत त्या म्हणजे:

(४) माझा धर्म (जात या अर्थाने) आणि (५) माझी संस्कृती (आणि त्या अनुषंगाने येणारी भाषा, पेहराव इत्यादी अंगे).

(१) मधील सर्व गोष्टी, (२) मधील मित्र (व क्वचित प्रसंगी कुटुंबीय) तसेच (३) मधील देश सोडून इतर गोष्टी. देश/भाषा व धर्म यांवरून ओवाळून टाकायला लोक तयार होतात. बहुतांश देशांकरता देश व भाषा या गोष्टी वेगळ्या नसतात. कारण बहुतांश नागरिक एकच बोली बोलतात. अनेक देशांमधे बहुजनधर्मही एकच असतो (ऐतिहासिक कारणांमुळे किंवा राज्यकर्त्यांच्या असमावेशक धोरणांमुळे). स्वतंत्र भारताची परिस्थिती एकमेवाद्वितीय आहे. या भूमीवर अनेक धर्मांचा जन्म व प्रसार झाला. बहुसंख्य असलेले हिंदू, बौद्ध इत्यादी धर्म जात्याच सोशिक. स्वातंत्र्याच्या वेळी असे ठरविले गेले की या देशात सर्व धर्मियांना समान हक्क असतील, स्त्रियांना व पुरुषांना मतदानाचा हक्क असेल. देशाच्या आकारमानामुळे राज्यांमधे विभागणी आवश्यक होती. ती भाषेच्या अनुषंगाने करण्यात आली. या विभागणीप्रमाणे प्रत्येक राज्यात विविध धर्मांचे, पण सर्वसाधारणपणे एकच भाषा बोलणारे नागरिक होते. अश्या तर्‍हेने जन्मला अर्वाचीन काळातील राज्यशासनाचा एक अभूतपूर्व प्रयोग*.

स्वार्थ : इकडे, तिकडे, चोहीकडे

जगायला अन्न अत्यावश्यक. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गोष्टी प्राप्त झाल्या की मानव अत्याधुनिकतेच्या मागे लागतो. पण त्या देवाणघेवाणीतदेखील जगणे कसे महत्त्वाचे आहे हे दर्शवणारा हा एक (थोडाफार केविलवाणा) विनोद पहा : “बरे नसले की वैद्याकडे जावे (कारण ते जगायला हवेत), त्याने सांगितलेले औषध औषधविक्रेत्याकडून आणावे (कारण तो जगायला हवा), घरी येऊन ते टाकून द्यावे (कारण आपणही जगायला हवे).” बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे असले विनोद केवळ त्यांच्या तात्पर्याकरता! वेगवेगळ्या लोकांचे स्वार्थ वेगवेगळ्या ठिकाणी असतात, कमी-अधिक असतात. प्रत्येक व्यक्ती कळत-नकळतपणे निदान खालील तीन पातळ्यांवर विचार करत असते.

(१) आपले/आपल्या परिवाराचे उत्थान व्हायला हवे (तरच जन्माचे सार्थक होणार).
(२) देश/धर्म/संस्कृती यांचे भले व्हायला हवे (या कल्पना कितीही कृत्रिम आणि विभाजक असल्या तरी आपापल्या जागी त्यांचे महत्त्व आहे).
(३) मानवता वृद्धिंगत व्हायला हवी (त्यातच इतरांचे – आणि पर्यायाने त्यांच्या दृष्टीत आपले हक्कसुद्धा समाविष्ट असतात).

एकतर या तिन्ही संकल्पना (‘स्व-आ’दी, ‘देश-आ’दी आणि मानवता) तश्या निसटत्या आहेत, आणि सहज वेगळ्या करता येण्यासारख्या नाहीत. तसाही प्रत्येक स्वार्थ ‘स्व’पर्यंत पोचतोच. उदा. धर्म – एकतर इहलोकातील, नाही तर परलोकातील, – ‘स्व’ करता असतो. श्रद्धेपोटी असो वा भीतीपोटी असो, किंवा निव्वळ रोजच्या जीवनातील एक साथ देणारी नियमितता म्हणून असो. धर्मप्रसारही ‘स्व’ करताच असतो, आमचा एकनाथ स्वीकारला तरच खरे म्हणणारा ख्रिश्चन असो, की तसे सगळे हिंदूच असे म्हणणारा साईभक्त असो. दोघेही खात्री करत असतात की ते इतरांना पटू शकेल असे असले तर खरे असावे. नाहीतर लोक सुसंघटित धर्मामागे न लागते! ‘स्वत:पुरता’चा धर्म इतरांना साधारणपणे त्रास देत नाही.

धर्माच्या मानाने देशप्रेम समजायला जास्त अवघड आहे. बहुदा बाळकडूचा तो एक प्रकार असावा व त्याचा सतत पुनरुच्चार न झाल्यामुळे असेल, देश बदलणे हे धर्म बदलण्यापेक्षा सोपे जात असावे. अर्थात फक्त जन्माने एका धर्माचे असून प्रत्यक्षात निधर्मी असलेले लोक अनेक धर्मांत व देशांमधे असतातच. आपल्या मुळाची, स्रोताची ओढ कुठेतरी असतेच. कदाचित हे सालमन मासे व मोनार्क फुलपाखरे यांच्यासारखे आपल्या जनुकांमुळेच होत असावे. त्यामुळे स्वदेशाचे आकर्षण वाटत असावे. सुसंघटित धर्माप्रमाणेच लष्करी राजवट किंवा अपूर्ण साम्यवाद (आणि तो संपूर्ण असणे अशक्यच) अडचणीचे असतात. लोकशाही विनाअडचण नसते, पण सध्या उपलब्ध असलेले ते सर्वोत्तम साधन आहे. एक शासन करण्याचा घटक म्हणून, एखाद्या कुटुंबाप्रमाणे, ती स्वीकार्य आहे.

‘मानवता’ म्हणत जेंव्हा काही केले जाते तेंव्हा ‘तश्या परिस्थितीत आपण असतो तर लोकांनी आपल्याकरता काय करावे असे आपल्याला वाटले असते?’ हा सुप्त प्रश्न मनात असतो. पुन्हा स्वार्थच, पण दुसर्‍याला मदत करणारा.

कोणतीही गोष्ट, छोटी अथवा मोठी, करत असताना ती वरील तीनपैकी कोणकोणत्या प्रकारांत मोडते हे सांगणे कठीण असते. तसेच त्याबद्दल जाणीवपूर्वक विचार क्वचितच केला जातो. त्यामुळे भ्रष्टाचार (केवळ ‘स्व’ला महत्त्व देणे), देशद्रोह/वांशिक शुद्धिकरण (ethnic cleansing) (दुसर्‍या मुद्याला अवाजवी महत्त्व देणे), आणि अमानुषता (तिसर्‍या घटकाला दुय्यम लेखणे) यांसारख्या गोष्टी राजरोसपणे घडतात.

भारतासंबंधित काही उदाहरणे

काळाबाजार करणे, पावत्या न देणे (कर चुकवणे), भेसळ करणे, लाच घेणे/देणे, मतदान न करणे हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार झाले. त्याबद्दल इथे जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही.

बॉम्ब पेरायला मदत करणारे देशद्रोही असतातच, पण तोच प्रकार वेगळ्या स्वरूपात हळूहळू करणारेही असतात. राखीव जागांचे उदाहरण घ्या. आधी अनेक शतके जातव्यवस्थेमुळे पिडीत लोकांसाठी स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी काही दशकांकरता राखीव जागा निर्माण केल्या गेल्या. त्या अजूनही आहेत व वाढल्या आहेत. आधीची ‘उच्च’ जातींची अमानवी वागणूक पाहता प्रायश्चित्त म्हणून पुढील काही शतकेही तसे चालायला हरकत नाही. परंतु दुर्दैवाने आज त्याचे बाजारीकरण झाले आहे, राजकारण झाले आहे आणि मोबदला म्हणून त्याकडे पाहिले न जाता दोन्ही बाजू त्याकडे ‘बदला’ म्हणून पाहत आहेत. या दुरुपयोगामुळे पसरणारे विष देशाला पोखरते आहे. नियंत्रित आणि सुयोग्य स्वरूपात राखीव जागा लागू करून थेट स्वार्थाचे देशप्रेमाच्या स्वार्थाला शह देणे थांबवायला हवे.

दुसरे उदाहरण नद्यांमधील पाणी मिळवण्यावरून आहे. उदा. दिल्ली, पंजाब, हरयाणामधे यमुनेच्या पाण्यावरून तर कर्नाटक व तमिळनाडू दरम्यान कावेरीवरून. (कृष्णा-गोदावरी प्रकरणात महाराष्ट्राचापण हातभार होता). याबाबतीत प्रांतिक स्वार्थ देशस्वार्थावर मात करू पाहतो. राज्यांच्या नागरिकांना घालवण्यावरूनचे तंटे हे असेच. महाराष्ट्राचेच बोलायचे झाल्यास काही राजकीय पार्ट्यांमुळे सुरुवातीला दक्षिण भारतातील लोकांना तर पुढे जाऊन बिहारच्या व उत्तरप्रदेशच्या लोकांना महाराष्ट्रात त्रास दिला गेला आहे.

धर्माचा अनाठायी स्वार्थही देशाला तसाच वेठीस धरतो. खरेतर देशाप्रमाणेच धर्माचेही. चुकून/योगायोगाने आपण ज्या धर्मात जन्मलो त्याला सर्वांत थोर मानून त्याच्यावर प्रेम करायचे (हे जनुकांपेक्षा जास्त मनुकांमुळे**). स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात राज्ये होती व त्याआधीचा काही शतकांचा इतिहास परकीय आक्रमणांचा! त्याआधीही अधूनमधून या ना त्या राज्यकर्त्याच्या ध्वजाखाली (जो शेजारी प्रदेशांवर आक्रमण करण्याइतका बलाढ्य असेल) मोठा प्रांत एकत्र होत असे. पण सध्यासारखी देशाची संकल्पना नव्हती, निवडणुका नव्हत्या, राज्यकर्त्यांना मुदती व बांधिलक्या नव्हत्या. सध्याचे बहुतांश भारतीय स्वतंत्र भारतात जन्मले आहेत. सर्व धर्मांना सारख्या वागणुकीचे स्वप्न दाखवणाऱ्या भारतात जन्मले आहेत. तरीही अधूनमधून अनेकांच्या धार्मिकतेची व भारतीयत्वाची टक्कर होत असते. मी भारतीय की हिंदू, मी भारतीय की मुसलमान असे संघर्ष सुरू असतात. या दोन, तश्या विरुद्ध नसलेल्या विचाराधारांच्या दरम्यानचा तणाव अजाणतेपणी अस्तित्वात येतो व नकळतपणे फोफावतो. हा प्रकार देशाच्या संघटनेला जास्तच शहनाक आहे.

काही राष्ट्रे मुस्लिम राष्ट्रे आहेत. उदा. पाकिस्तानचा जन्मच त्या तत्त्वावर झाला. टर्की, मलेशिया यांसारख्या देशांमधे मात्र मुस्लिम बहुसंख्य असले, तरी इतर धर्मियांना देशघटनेविरुद्ध जाणार्‍या विचारांना कवटाळण्याची गरज सहसा भासत नाही.

भारताचा जन्म फाळणीतून झाला. मुस्लिम राष्ट्र हवे असलेले पाकिस्तानात गेले तर इतर भारतात राहिले. मुस्लिम धर्मानुसार ‘उम्माह’ हा देशापेक्षा श्रेष्ठ समजायचा असतो. त्यामुळे अधूनमधून त्या धर्माच्या काही लोकांना फूस लावण्यात विघटनवादी शक्ती सफल होतात. घटनेप्रमाणे सर्वांना समान लेखता आले तर असे होणे कठीण होईल. पण त्याबाबतीत राजकारण्यांकरवी आपणच आपले हात बांधून घेतले आहेत. याची दोन ठळक उदाहरणे म्हणजे
(१) अजूनही समान नागरी कायदा लागू न होणे, आणि (२) शाहबानो खटल्यानंतरच्या घटना.

न्यायकारण व धर्मकारण यांना विभाजित न ठेवल्याने विवाहसंस्था (जी की न्यायालयाची अखत्यारी असावी) ही एकसंध न होता विविध धर्मांप्रमाणे विभाजित राहिली. शाहबानोने घटस्फोटानंतर पोटगीचा दावा जिंकला खरा, पण एक चांगला बदल घडवून आणण्याची संधी सोडून न्यायसंस्थेने फतवा काढला की तिला जरी पोटगी बहाल झाली तरी त्या निकालाचा फायदा इतर पीडित व पराभूत, घटस्फोटित मुस्लिम महिला घेऊ शकणार नाहीत. मुस्लिम धर्म कर्मठ असल्याने त्यातील ज्या लोकांना हा विरोधाभास दिसतो, त्यांना त्याबद्दल उघडपणे बोलणे सोपे नसते. तसे जरी असले तरी कुठून तरी सुरुवात व्हायला हवी व ती जाणीव पसरायला हवी. लष्करी राजवटींना उलथवून टाकता येते तर भारतासारख्या देशात उघडपणे समोर येणे तितकेसे कठीण नसावे. खासकरून जर त्यामुळे अनेकांचे, अनेक पिढ्यांचे भले होणार असेल तर. ‘पहिले आप’ म्हणत राहण्याची ही वेळ नव्हे. धर्मांधता अमान्य असलेले मुस्लिम पुढे आले नाही तर सर्व मुसलमान अतिरेकी व देशद्रोही असतात हा चुकीचा विचार पसरायला मदत होईल.

त्यामानाने हिंदू धर्म सोशिक समजला जातो. हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे असे म्हणणारे अनेक असतात. पण त्या समावेशकतेला काही छोट्या का होईना अटी असतात (नाहीतर मशिदी न पाडल्या जात्या – मंदिरे भूतकाळात पाडली गेली असो वा नसो). दुर्दैवाने भारतीय राज्यघटनाही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष नाही. यालाही कारणीभूत राज्यकर्तेच. अप्रत्यक्षरित्या ते धर्मांना राज्यघटनेत ढवळाढवळ करू देतात. जी थोडीफार धर्मनिरपेक्ष कलमे आहेत ती वापरायचा प्रयत्न करणार्‍यांना छद्म-धर्मनिरपेक्ष (pseudo-secular) म्हणायला हे लोक मागे-पुढे पहात नाहीत. दोष घटनेचा नाही तर घटनेला वाकवू पाहणाऱ्यांचा आहे आणि त्यांना तसे करू देणार्‍या आपलाही आहे. हे बदलवून राष्ट्र बलाढ्य करण्याकरता जबाबदार लोकांना निवडून द्यायची जबाबदारी आपलीच आहे, त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी आपलीच आहे. चुकीच्या बाबतीत सोशिक असायची गरज नाही, पण असोशिक/असहिष्णु बनताना त्यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही हेही पाहणे महत्त्वाचे.

कृती

थोडक्यात काय, तर सर्व स्वार्थ हे ‘स्व’ अर्थीच असतात, पण काही ‘स्व’ जास्त व्यापक असतात. कुटुंब, परिवार, धर्म, देश, मानवता ही जास्त समावेशक वर्तुळे आहेत. रोजच्या आचारांमधे हे विचार जाणीवपूर्वक आणल्यास अधिकाधिक पृथ्वीवासीयांचे जीवन सुकर होऊ शकेल.

आसिमोव्हने ज्याप्रमाणे रोबोटिक्सचे इमल्यांप्रमाणे असलेले तीन नियम बनविले, तसेच स्वार्थाचे बनवायला हवे. रोबोटिक्सचे नियम आहेत***:

(१) रोबो मानवाला सहेतुक इजा करणार नाही आणि काही न केल्याने इजा होऊ देणार नाही.
(२) मानवाने दिलेल्या आज्ञा रोबोने पाळाव्या, जर त्यामुळे पहिल्या नियमांचे उल्लंघन होणार नसेल तर.
(३) रोबोने स्वत:चे अस्तित्व जपावे जर त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या नियमांचे उल्लंघन होणार नसेल तर.

स्वार्थाबाबत खालील नियम बनवता येतील:

(१) मानवाने मानवतेला हानी पोचेल असे काही करू नये, त्याचप्रमाणे निष्क्रीयतेमुळे हानी पोचू देऊ नये.
(२) मानवाने आपल्या देशाकरता (प्रांताकरता) व धर्माकरता (जातीकरता, श्रद्धास्थानाकरता, नास्तिकतेकरता, गटाकरता, भाषेकरता, संस्कृतीकरता) सर्व काही करावे, जर त्यामुळे पहिल्या नियमाला बाधा येणार नसेल तर.
(३) मानवाने स्वत:च्या/कुटुंबाच्या/आप्तांच्या भरभराटीसाठी सर्व करावे, जर त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होणार नसेल.

आपले केंद्रस्थान आपण आपल्या व्यतिरिक्त टप्प्याटप्याने वाढणारे बनविले तर पूर्ण मानवतेला त्याचा फायदा होईल. स्वत:, कुटुंब, परिसर, गाव, राज्य, देश, मानवता यातील राज्य व देश हे घटक कृत्रिम आहेत. देशावर प्रेम करायचेच असेल तर ते अख्ख्या देशावर करा. वरील नियमांप्रमाणे वागायचे झाल्यास प्रत्येकाने स्वत:बाबत ठरवायला हवे की ‘मी आधी मानवतावादी मानव आहे. त्यानंतर(च) हिंदू/मुसलमान/नास्तिक/भारतीय/अमेरिकन इत्यादी आहे. मग माझ्या कुटुंबाचा/गावाचा/परिसराचा आहे व सर्वांत शेवटी मी स्व-वादी व्यक्ती आहे.’

संदर्भ –

* गौतम अधिकारी यांचे ‘The Intolerant Indian’ हे पुस्तक (हार्पर कॉलीन्स २०११)
** २०१० चा मायबोली दिवाळी अंकातील लेख: http://vishesh.maayboli.com/node/787
*** http://en.wikipedia.org/wiki/Runaround

पूर्वप्रकाशन: ‘उपक्रम’ चा २०११ चा दिवाळी अंक

लेखक एक खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे सर्व शिक्षण महाराष्ट्रात झाले असून गेले २०+ वर्षांपासून ते कॅलटेक (Caltech), पॅसॅडेना, कॅलिफोर्निया येथे असतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.