श्रद्धेची बेडी तोडावी

माणसाने बुद्धिप्रामाण्यवादी असावे. सत्य काय, असत्य काय ते स्वबुद्धीने विचार करून जाणावे. सत्याचा स्वीकार करावा. असत्याचा त्याग करावा. हे कोणत्याही बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असते.

जगन्निर्माता, जगन्नियंता, पूजा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव आहे असे बहुसंख्य आस्तिक माणसे मानतात. खरेतर असा देव अस्तित्वात नाही हे सहज समजते. कारण वर वर्णन केलेल्या दैवी गुणांचा कोणालाही, कधीही प्रत्यय आलेला नाही, येत नाही. तसेच अमर आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, मोक्ष अश्या संकल्पना सत्य आहेत असेही अनेक जण मानतात. वस्तुत: या सर्व गोष्टी खोट्या, काल्पनिक आहेत. कारण या संकल्पनांचा कोणाला कधीही प्रत्यक्ष अनुभव येत नाही. तसेच त्यांचे अस्तित्व तर्कशुद्ध युक्तिवादाने सिद्धही करता येत नाही.

वरील सर्व असत्य संकल्पना बहुसंख्य लोक सत्य मानतात याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या मनात दृढ झालेली श्रद्धाभावना. असत्याचा त्याग आणि सत्याचा स्वीकार करण्यासाठी ही श्रद्धेची बेडी तोडणे आवश्यक आहे. त्या संदर्भात हा लेख आहे.

गतवर्षीची गोष्ट. प्रा.नेने रस्त्यात भेटले. “काय, कसं काय?” मी विचारले.

म्हणाले, “माझा सध्या अडचणीचा काळ आहे.”

“का हो? काय झाले?”

“गेल्या सोमवारपासून शनीची साडेसाती सुरू झाली आहे. आता साडेसात वर्षे बिकट काळ.” ते उत्तरले.

“असे पाहा नेनेसर, शनीग्रह इथून १३० कोटी कि.मि.दूर आहे. तो वायुचा भला मोठा गोळा आहे. तो निर्जीव, निर्बुद्ध आहे. तो…”

मध्येच घाईघाईत, “माझी श्रद्धा आहे बुवा. माझी शनिदेवावर श्रद्धा आहेच.” असे मोठ्याने बोलत ते झपझप पुढे गेले.

“इथे शनिची निंदा चालली आहे आणि मी ती ऐकतो आहे; हे जर शनिदेवाला समजले तर या साडेसातीत माझी धडगत नाही.” अशी भीती त्यांना वाटली असावी. सध्या ते शनिमहात्म्य वाचत असावे. त्यात आहे:-

..एकदा राजा विक्रमादित्याने दरबारात शनिची निंदा केली…

त्यासमयीं शनिदेव विमानी। जात होते बैसोनी।
राजाचे वाक्य ऐकता क्षणी। विमान खाली उतरले॥
अकस्मात येऊनिया सभेत । बैसले तेव्हा विमानासहित।…(ओवी ६६)

दरबारात शनीने विक्रमादित्याला शाप दिला. पुढे साडेसात वर्षे त्या राजाची काय दुर्दशा झाली ती गोष्ट अनेकांना ठाऊक असेलच.

महाविद्यालयात शिकविणारे प्रा.नेने यांना साडेसाती खरी वाटते याचे कारण म्हणजे त्यांच्या मनातील अढळ श्रद्धा.

या श्रद्धेविषयी म्हटले आहे :

श्रद्धेनेच मनुष्या केले निर्बुद्ध या जगामाजी।
न दिसे एकही व्यक्ती श्रद्धाळू बुद्धिमान आहे जी॥

(व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ती व्यक्ती. तो व्यक्ती नव्हे. मग स्त्री असो वा पुरुष)

श्रद्धेशी निगडित असलेल्या विषयांत श्रद्धाळूंची बुद्धी कुंठित होते. ते विचारच करू शकत नाहीत. अन्य विषयांत त्यांची बुद्धी चालते. श्रद्धेशी निगडित विषय म्हणजे देव, धर्म, कर्मकांडे, मंत्रपठण, होमहवन, उपासना, फलज्योतिष, इत्यादी. म्हणून श्रद्धेचा त्याग करायलाच हवा.

श्रद्धेमुळे भयानक विकृत घटनाही घडू शकतात. चार वर्षांपूर्वीची (दि.२० मार्च १६) म.टा.(पुणे) मधील बातमी, ‘नातवासह आजोबांचा अंत’. आजोबा (सुधीर शहा, ६५ वर्षे) यांनी नातू (जिनय १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर आठव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात लिहिले, “कोर्ट खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे.”

त्यांची दृढ श्रद्धा होती की ते दोघे स्वर्गात जाणार. सुखात राहणार. स्वर्गात दु:ख नसतेच.

आमच्या मृतदेहांचे दहन होईल. मग देह परत कसे मिळतील? शरीरे नसतील तर स्वर्गात कोणत्या रूपात जाणार? एकमेकांना कसे ओळखणार? कसे बोलणार? स्वर्गसुख कसे भोगणार? अश्या शंका त्यांच्या बुद्धीत उद्भवतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे बुद्धी कुंठित होते. विचारशक्ती थांबते.

आत्मघातकी अतिरेक्यांच्या मनावर अशी श्रद्धा बिंबवलेली असते की, ‘तुम्ही धर्मासाठी शहीद होणार आहात. म्हणून मृत्युनंतर तुम्ही स्वर्गात जाणारच. तिथे सर्व सुखे तुमच्यासाठी सज्ज आहेत. त्या सुखांवर तुमचा हक्क आहेच.’ हे त्यांना खरे वाटते. प्रथम इथेच त्यांच्या मृतदेहांचे दफन होणार हा विचार त्यांच्या डोक्यातच येत नाही. आपण सदेह स्वर्गाला जाणार असेच त्यांना वाटत असते.

तसेच अर्जुनाला युद्धप्रवृत्त करताना, “हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।” [अर्थ: “(अर्जुना, या युद्धात ) तू धारातीर्थी पडलास तर स्वर्गात जाशील. जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील.] असा भगवानुवाच गीतेत आहे. त्यावर, “मी स्वर्गात सदेह जाणार काय?” असा प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला नाही. श्रीकृष्णावरील श्रद्धेमुळे त्याच्या मनात शंका उद्भवलीच नाही.

श्रद्धा आणि विश्वास या शब्दांचा वापर साधारणपणे समानार्थी म्हणून होतो. या शब्दांच्या व्याख्या पुढीलप्रमाणे करता येतील:

श्रद्धा:– जी गोष्ट (तत्त्व, विधान, संकल्पना) खरी असणे शक्य नाही हे तर्कबुद्धीला पटते, म्हणून ती खोटी आहे, तिचा त्याग करायला हवा असे बुद्धीला वाटते. ती गोष्ट परंपरा, गतानुगतिकता, शब्दप्रामाण्य अशा पूर्वग्रहांमुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. थोडक्यात सांगायचे तर बुद्धीला जे खरे वाटत नाही ते भावनेच्या आधारे खरे मानणे म्हणजे श्रद्धा.

श्रद्धा ही भावना आहे, विचार नव्हे. श्रद्धेचा संबंध मनाशी आहे, बुद्धीशी नाही. विज्ञानात श्रद्धेला स्थान नाही.

विश्वास:- आपले ज्ञान, अनुभव, कॉमनसेन्स यांच्या आधारे जी गोष्ट खरी असणे शक्य आहे हे बुद्धीला पटते, तीच गोष्ट खरी मानणे म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवणे. (मात्र त्यात कुणाचे चारित्र्यहनन नसावे.)

विश्वास हा विचार आहे, भावना नव्हे. विश्वासाचा संबंध बुद्धीशी आहे, मनाशी नाही. प्रत्येक वैज्ञानिक तत्त्व हे विश्वासार्ह असतेच.

बुद्धी आणि मन या दोन्ही गोष्टींचा उद्भव मेंदूत होतो. दोन्ही अमूर्त आहेत. त्यांना वस्तुरूप अस्तित्व नाही. मेंदूला वस्तुरूप अस्तित्व आहे हे आपण जाणतोच. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. “मनसस्तु परा बुद्धि:।” असे गीतेतही आहे. मनावर बुद्धीचा अंकुश हवा. म्हणजे माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो.

श्रद्धा ही मुख्यत्वेकरून देव, धर्म, कर्मकांडे यांच्याशी निगडित असते. देवाचे अस्तित्व तर्कबुद्धीला पटेल असा कोणताही पुरावा, युक्तिवाद उपलब्ध नाही. त्यामुळे ते केवळ श्रद्धेनेच खरे मानता येते. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवता येत नाही.

‘भाव तेथे देव।’ असे म्हणतात ते याच अर्थाने. इथे ‘भाव’ शब्दाचा अर्थ श्रद्धा असाच आहे. म्हणजे श्रद्धेनेच देव मानता येतो. श्रद्धा नसेल तर देव नाहीच. मराठी संतसाहित्यात श्रद्धा हा शब्द नाही. श्रद्धेसाठी भाव हा शब्द वापरला आहे, तर श्रद्धाळूसाठी भाविक. (ज्ञानेश्वरीत श्रद्धा शब्द आहे. कारण गीतेत आहे.)

देवाचे अस्तित्व बुद्धीला पटत नाही. म्हणून ते श्रद्धेने खरे मानायचे. माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. त्यामुळे जे बुद्धीला पटत नाही ते तो फार काळ सत्य मानणार नाही. भक्त श्रद्धाळू नसतील तर धर्मगुरूंना आणि धर्मग्रंथाला विचारणार कोण? म्हणून माणसाला श्रद्धेच्या दाव्याला बांधून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक धर्मग्रंथात श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. त्यासंबंधी काही ओव्या:

देव अस्तित्व प्रश्नांकित। यास्तव धर्मगुरू चिंतित।
धार्मिकांची श्रद्धा सतत। राखण्या युक्त्या योजिल्या॥१॥

श्रद्धा असता जोडे पुण्य। श्रद्धाळूचे जीवन धन्य।
श्रद्धा पवित्र सर्वमान्य। संकटीं बळ श्रद्धेने॥ २

श्रद्धावाना लाभे ज्ञान। ऐसे आहे गीता वचन।
श्रद्धेविना मानवी जीवन। अशक्य आहे निश्चये॥ ३

श्रद्धेचा ऐसा बडिवार। धर्मांनी माजविला थोर।
कारण श्रद्धेविना ईश्वर। सत्य मानणे अशक्य॥ ४

श्रद्धेचे डांगोरे पिटले। महत्त्व बहुत वाढविले।
मानसी दृढ बिंबविले। लोकां केले श्रद्धाळू॥५

तयांची बुद्धी चालेना। श्रद्धा कुणाची ढळेना।
भक्त लाभती धर्मगुरूंना। शब्दपालना तत्पर॥६

श्रद्धेचे महत्त्व बिंबविण्यासाठी पुराणिकांनी अनेक खोट्या कथा रचल्या. त्यांवर आधारित किर्तने, प्रवचने केली. ती लोकांच्या कानांवर आदळून आदळून त्यांचा बुद्धिभ्रंश केला. तर्कबुद्धीचे खच्चीकरण केले. श्रद्धा ही परम पवित्र आहे, मंगल आहे, दिव्य आहे, उदात्त आहे, विश्वासाहून श्रेष्ठ आहे असा खोटा समज निर्माण केला. माणसाच्या उपजत तर्कबुद्धीचे दमन करून त्याला आपला अंकित बनविण्यासाठी धर्मगुरूंनी योजलेला प्रभावी उपाय म्हणजे श्रद्धा, असेही म्हणता येईल.

श्रद्धेचा प्रारंभ कसा झाला ?

भूकंप, चक्रीवादळे, रानात लागणारे वणवे, अतिवृष्टी, महापूर, अवर्षणे अशा नैसर्गिक उत्पातांनी माणूस भयभीत झाला असेल. या संकटांतून आपल्याला वाचवण्यासाठी त्याला सर्वसमर्थ देवाची कल्पना सुचली असेल. हा देव आपल्याला संकटातून वाचवील असे वाटून त्याने त्या काल्पनिक देवावर श्रद्धा ठेवून तो खरोखरच अस्तित्वात आहे असे मानले असेल. त्या श्रद्धेच्या बळावर माणूस वाचला म्हणून मानव प्रजाती तगून राहिली हेसुद्धा खरे असेल. पण श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे आणि होत आहे. हे सत्य आहे. म्हणून आता श्रद्धेचे विसर्जन करणे आवश्यकच आहे. अन्यथा माणसाची प्रगती होणार नाही.

देवा-धर्माच्या नावावर भोळ्या भाविकांची फसवणूक शतकानुशतके होत आहे. त्याचे मूळ कारण श्रद्धा हेच आहे. पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांना पावणारा, संकटांत धावून येणारा देव आहे, हे सत्य मानणे. तसेच अमर आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष अश्या गोष्टी सत्य मानणे या मूळ श्रद्धा आहेत. श्रद्धा म्हणजे धादांत खोट्या गोष्टी खर्‍या मानण्याची तर्कहीन मानसिकता. असत्याचा स्वीकार केला की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणारच. म्हणून श्रद्धेचे विसर्जन करायलाच हवे.

श्रद्धेविषयी काही सत्यवचने:

* श्रद्धा म्हणजे सत्यशोधनाची तीव्र नावड आणि अज्ञानात गुरफटून राहण्याची अतीव आवड.
* श्रद्धा म्हणजे असत्याचा स्वीकार, सत्याला नकार, वास्तवाचा धिक्कार आणि अवास्तवाचा अंगिकार.
* श्रद्धेकरिता सर्वाधिक। अज्ञान आहे आवश्यक। ज्ञान असे त्या स्थानी देख। अस्तित्व नसे श्रद्धेचे॥
* स्वबुद्धी, चिकित्सा, विचार। श्रद्धेस नसे तिथे थार। कोसळती श्रद्धा मिनार। रचना जैसी पत्त्यांची॥
* श्रद्धेने जो बरबटला। तो सत्यज्ञानासी मुकला। श्रद्धासंभार विसर्जिला। ज्ञानप्राप्तीस पात्र तो॥

माणसाच्या डोक्यातील म्हणजे मेंदूतील श्रद्धा गेली की देव संपतील. कारण देवांचे अस्तित्व केवळ मनोकल्पित आहे, खोटे आहे. श्रद्धेच्या आधारे ते तगून आहे. ‘भाव तेथेच देव.’ हे सत्य आहे. भाव म्हणजे श्रद्धा. भाव नसेल तर देव नाहीच. धर्मासाठी देव हवा. देवाविना धर्म नाही. म्हणून देव संपले की धर्मही जातील. याप्रमाणे श्रद्धा विसर्जित झाली की देव आणि धर्म जातील. मानवता (माणुसकी) हा जगातील सर्व माणसांचा एकच धर्म होईल. केवळ धर्मग्रंथ राहतील. पुढच्या पिढ्या ते धर्मग्रंथ विनोदी वाङ्मय म्हणून वाचतील.

य.ना.वालावलकर
बी-१३, सुयोगनगर
सेनापती बापट मार्ग, पुणे 411016
9404609126, ynwala@gmail.com

अभिप्राय 3

 • आपणच एका परिच्छेदात म्हणता; आदिमानव देवावरील श्रध्देमुळे कदाचित वाचला असेलही, आणि त्याच वाक्यात म्हणता ‘श्रध्देमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे आणि होत आहे’. आपण कवीसुध्दा आहात. आपल्या विचारांच्या प्रुष्ठ्यर्थ आपण एखाद्या ग्रंथात असाव्यात, तशा ओव्याही लिहिल्या आहेत. हे जग सश्रध्द लोकांमुळेच टिकून आहे. आपणच लिहिले आहेना ‘श्रध्देच्या बळावर माणूस वाचला म्हणून मानव प्रजाती तगून राहिली हे सुध्दा खरे असेल’. मग त्या आदीमानवाच्या श्रध्देमुळेच आज श्रध्देविरुध्द लिहायला आपण अस्तित्वात आहात, हेही मान्य कराकी. या जगात वेगवेगळ्या धर्माचे ९९% लोक श्रध्दाळू असून देवाचे आस्तित्व मानतात. नास्तिकांची संख्या नगण्य आहे. कदाचित आम्हा सश्रध्द लोकांमुळेच तुम्ही सुखेनैव जगत असावेत हे मान्य करा. उगाच का आपल्या नास्तिकत्वाचा टेंभा मिरवत आहात?

  • नमस्कार रमेशजी! श्रद्धेची बेडी …हा लेख तुम्ही वाचला. प्रतिसाद लिहिला.याबद्दल धन्यवाद.
   “देव अस्तित्वात आहे.” असा दावा जे करतात, त्यांच्यावरच ते अस्तित्व सिद्ध करण्याचे दायित्व असते. समजा कोणी म्हणाला की त्याच्याजवळ परीस आहे, तर मी ते सत्य मानणार नाही. परीसाचे अस्तित्व त्यानेच सिद्ध करायला हवे. त्याच्याजवळ परीस नाही हे मी कसे सिद्ध करणार? या संदर्भात “Russel’s Tea pot ” असे गूगलवर लिहून शोध घ्यावा. म्हणजे स्पष्ट होईल.
    आपल्या आदिपूर्वजांच्या काळी विज्ञान माहीत नव्हते. निसर्गनियम ठावूक नव्हते. सर्वत्र अज्ञान होते.  आपण कायम त्या अज्ञानात राहायचे का? आज कितीतरी प्रगती झाली आहे.
   निरीश्वर वादावर लिहितो.हेतू एवढाच की लोकांनी, विशेषत: श्रमिक आणि
   निम्‍नमध्यम वर्गीयांनी, आपली श्रमा-घामाची कमाई देव-धर्म-कर्मकांडे यांवर खर्च करू नये. हा सर्व खर्च व्यर्थ जातो. देव संकटात धावून येतो असा कोणाचाही अनुभव नाही. संकटात माणूसच माणसाला मदत करतो. “तो देवासारखा धावून आला.” असे म्हणणे चूक आहे. माणुसकीचा अपमान आहे. तो मणसासारखाच धावून आलेला असतो. देव कधीच येत नाही.स्वबुद्धीने विचार करावा. प्रत्येक सज्ञान व्यक्तीला बुद्धी असते. कुणाच्याही आहारी जाऊ नये.
   *खालील प्रश्नांच्या उत्तरांवर विचार करावा:
   * देवा समोरील दानपेटी फोडून पैसे कसे चोरता येतात.?
   * देवाच्या अंगावरील दागिने, मुकुट चोरीला कसे जाऊं शकतात ?
   * निष्पाप, निरपराध बालिकेवर अत्याचार होतो तेव्हा देव काहीच करू शकत नाही हे कसे?
   * समाजात अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक असतात. त्यांचे देव निर्दालन का करत नाही ? मग देव न्यायी कसा?
   * देवदर्शनाला गेलेले भक्त कधी गर्दीत चिरडून मरतात हे कसे ? देव आपल्या भक्तांना वाचवू शकत नाही का ?
   असे अनेक प्रश्न आहेत. पण सर्वांत गहन प्रश्न असा की * हे सगळे धडधडीत सत्य दिसते त्यावर काही विचार न करता तुमच्यासारखे सुशिक्षित लोक देवाचे अस्तित्व खरे कसे मानतात ? ”
   …यनावालावलकर

 • सत्यशोधक विश्‍लेषण…. आवडले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.