वर्जितांची संस्कृती

संस्कृती या शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. पण मला सगळ्यांत जास्त भावलेला अर्थ, म्हणजे ‘समाजात रूढ असलेला सामायिक मूल्यांचा संच.’ समाजात असलेल्या अनेक घटकांना एका धाग्यात विणण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्कृती पार पाडते. त्या अर्थाने, संस्कृती ही सामाजिक वस्त्रांची शिवण समजली जावी. एखाद्या समाजाची संस्कृती जितकी कालसुसंगत असते, तितकी त्या समाजाची वैचारिक प्रगतीसुद्धा वाढत जाते. आणि उलट दिशेने, ज्या समाजाची हीच शिवण कालबाह्य होते, तो समाज मागे पडतो, काळाच्या पडद्याआड जातो. याची अनेक उदाहरणे देता येतील. पण जेव्हा याचे प्रत्यय व्यक्तिगत पातळीवर येतात, तेव्हा ते प्रकर्षाने जाणवतात.

कालचीच गोष्ट ! 

जिगरी दोस्तांच्या एका व्हॉटसॲप समूहावर, ‘ऑडियो बुक्स’विषयी चर्चा सुरू होती. 
बंड्या मला विचारात होता – “अमेय.. मराठीत ऑडियो बुक्स ऐकतोस का रे?”
मी – नाही रे ..इंग्लिश ऐकतो.

आणखी थोड्या अवांतर बोलण्यानंतर बंड्याबरोबरचं व्हॉट्सॲप संभाषण तिथेच संपलं. पण हा विषय माझ्या मनातून जात नव्हता. एरवी मराठीशी खूप जवळचा संबंध असलेला मी, ऑडियो बुक्स मराठीत का ऐकत नाही…(?).. याचं कारण मी नकळतपणे शोधत होतो.

सुमारे तासभर डोक्याला त्रास करून झाल्यावर, कुतूहल म्हणून आमच्या लायब्ररीचं ऑडियोबुक ॲप उघडलं.. रिचर्ड डॉकिन्स, जॅरेड डायमंड, हिचेन्स, ब्रॅड ब्लांटन वगैरे मंडळींनी लिहिलेली पुस्तकं ‘Recently borrowed’च्या यादीत होती. अर्थातच, माझ्या वाचनात नास्तिक्य, विवेकवाद, radical honesty हे विषय असतात. त्यामुळे ही पुस्तकं समोर आली.

“मग अशी पुस्तकं मी मराठीत का वाचत नाही ? … खरंतर वाचायला हवीत ना!!” (मनात!)

पण लगेच पुढचा विचार मनात आला .. . 
“मराठीत, या विषयांवर पुस्तकं आहेत?? कुठे??..”

कुरुंदकर, दाभोळकर वगैरे बोटांवर मोजण्याइतकीच नावं संपली, की मराठी साहित्यामध्ये ‘नास्तिक्य’ या विषयावर उघडपणे उहापोह झालाय का? विवेकवाद, स्केप्टिसिझम (scepticism) या विषयांवर थेट चर्चा, मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत का?

आणि असले, तरी सर्वसामान्यांना माहिती कुठे आहेत? (मी स्वतःशीच बोलत होतो). 

माझ्या बालपणीचं वातावरण तसं सहित्यमय! आसपास सगळे चांगले वाचक, लेखक. पण पुस्तकं तर दूर, नास्तिक्य, विवेकवाद हे विषय, अगदी ही नावंसुद्धा कधी ऐकली नव्हती. 

तर एकूण मराठी भाषेत साहित्य जरी बरंच असलं तरी नास्तिकता, विवेकवाद यांवर उपलब्ध साहित्य हेच मुळात खूप कमी आहे. आणि असलं, तरी त्याला हवी तितकी प्रसिद्धी, पुस्तकांची उपलब्धता आणि वाचकवर्ग मिळत नाहीत! मागणी कमी असेल तर लेखक आणि साहित्य कमी असणं स्वाभाविक आहे…

(स्वतःलाच पुढचा प्रश्न) “पण मराठी वाचकांमध्ये नास्तिकता या विषयाबद्दलची मागणी इतकी कमी का असेल?” 

कारण साहित्याची मागणी ही समाजाच्या आवडीनिवडींवर ठरते. आणि अगदी इथेच या सगळ्यांशी ‘संस्कृती’चा संबंध येतो. ज्या समाजात नास्तिक असणं हा सामाजिक गुन्हा समजला जातो, तिथे नास्तिकतेवर ऊहापोह करणे दुरापास्त. लहानपणापासून जिथे ‘उलट प्रश्न विचारू नका’ असं शिकवलं जातं तिथे चिकित्सा करण्याला तरी काय वाव असणार?

अगदी थोडक्यात सांगायचं तर प्रश्न विचारून चिकित्सा करणे, हे आपल्या संस्कृतीत नाही. किंबहुना, आपल्या संस्कृतीने प्रश्नरूपी चिकित्सेचा त्याग केला आहे. 

आणि जे संस्कृतीत नाही, ते संभाषणात नाही.
जे संभाषणात नाही, त्यावर विचार नाही
ज्यावर विचार नाही, त्यावर संशोधन नाही
आणि ज्यावर संशोधन नाही, त्यावर साहित्य तरी कसं निर्माण व्हावं!! 

त्याज्य केलेल्या विषयांची अनेक उदाहरणं सहज देता येतील. पटकन अठवणारी अशी उदाहरणं म्हणजे लैंगिकता, सेक्स हे अत्यंत महत्त्वाचे विषय! पण या विषयांवर सर्वसामान्य लोकांमध्ये होणाऱ्या चर्चा या हळू आवाजात किंवा फक्त उपभोग्य साधन म्हणून होताना दिसतात. उघडपणे, मनमोकळी चर्चा अजूनही होत नाहीत. घरी आई-बापाबरोबर, किंवा पर्यायाने मुलांबरोबर टीव्हीवर चुंबनाचे दृश्यसुद्धा बघताना अस्वस्थ होणारे कित्येक लोक मी बघितले आहेत. दुर्दैवाने, आमची पिढी सेक्सविषयी आईबापाकडून न शिकता, भाड्याने घेतलेल्या आणि चोरून बघितलेल्या पोर्न फिल्म्समधून शिकली. आणि पुढच्या आणि मागच्या पिढीतील दरी आणखीच वाढत गेली. 

असंच आणखी एक उदाहरण म्हणजे आपल्या संस्कृतीने वर्ज्य केलेले अन्नपदार्थ. महाराष्ट्रात गोमांसबंदी असल्याने काही वर्षांनी मराठीत त्याची रेसिपी का नाही? त्यावर संशोधन का नाही? असा विचार करणारा एखादा निरागस प्रश्न लोकांना पडू शकेल. 

जसे आपल्या संस्कृतीमधून काही विषय वर्ज्य झालेत, तसेच काही विषयांना देवत्वसुद्धा बहाल केले गेले आहे. या देवत्व बहाल केलेल्या विषयांवर, प्रश्न तर सोडा, साधी चर्चासुद्धा होत नाही. त्यावर कुणीही काहीही बोललं, तर अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जातात आणि गदारोळ माजतो. असेच देवत्व बहाल झालेल्या ऐतिहासिक महापुरुषांचे कार्य असो किंवा धर्मग्रंथात दिली गेलेली शिकवण असो, सामाजिक पातळीवर त्यावरील चिकित्सा वर्ज्य करणे, हेच आपल्या बुद्धीचं अपयश आहे. 

अशाप्रकारे संस्कृतीतून वर्ज्य केले गेलेले कित्येक विषय हे सामाजिक आयुष्यातून उठतात. त्यावर ना संशोधन होतं, ना प्रगती! एखाद्या खुरटलेल्या झाडाप्रमाणे हे विषय सांस्कृतिकदृष्ट्या दुर्बल होऊन काळाच्या ओघात वाहून जातात. दुर्दैवाने, पुढची पिढी जेव्हा मागे वळून बघते, तेव्हा एक खूप मोठी दरी निर्माण झाल्याचं दिसून येतं. 

पण उलट दिशेने विचार केला तर हे चित्र अचानक बदलतं. आस्तिकता, श्रद्धा, शब्दप्रामाण्य हे समाजात रुजवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो आहे. संस्कृती या महत्त्वपूर्ण धाग्याचा वापर करून जमेल त्या पद्धतीने परमेश्वरावर विश्वास निर्माण करण्याचे काम झाले आहे आणि सातत्याने होत आहे. जवळपास सगळे सण, उत्सव, महत्त्वाच्या सुट्ट्या, सणासुदीला होणारे कार्यक्रम हे सर्वसामान्य माणसाला श्रद्धावान बनवण्यास मदत करतात. लहान, अजाण वयात “बाप्पाला मोरया करा”पासून होणारी सुरुवात, “देवबाप्पा शिक्षा करेल”, “परीक्षेच्या आधी दर्शन घेतलं तर चांगले गुण मिळतील”, असं करत करत मनात भिनवली जाते. 

सांगण्याचा हेतू, जी संकल्पना समाजाच्या सर्व थरांमध्ये पोहोचावी असं वाटतं असेल, तिला संस्कृतीचा भाग बनवणं हितकारक ठरतं! 

समाजात बदल घडावा आणि चिकित्सक प्रवृत्तीला वाव मिळावा असे एक विवेकवादी नास्तिक या नात्याने मला वाटते. हा बदल सांस्कृतिक आणि त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर करता यायला हवा. यासाठी होणारी सुरुवात वैयक्तिक पातळीवर होऊन, ती संस्कृतीमध्ये मिसळली तर बऱ्याच सामाजिक स्तरांवर परिणाम दिसून येतील. आपल्या सणांचा, सोहळ्याचा वापर यासाठी होऊ शकतो. लहान मुलांच्या कथांचा वापर होऊ शकतो. संस्कृतीच्या धाग्याची किनार पकडून मुख्य प्रवाहात प्रवेश करता येणे, हे नास्तिकता आणि चिकित्सक प्रवृत्तीसाठी महत्त्वाचे ठरेल.  शेवटी गाडगेबाबांनी जनजागृती करण्यासाठी पंढरपूरच्या देवळाबाहेर उभं राहणं पसंत केलं, हे याचं सर्वोत्तम उदाहरण होय!

अमेय गोखले
टोरोंटो (कॅनडा)
ईमेल: ameya@ameyagokhale.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.