बुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता

‘ब्राईट’ (ठाणे)चे श्री. कुमार नागे यांचेकडून मला मोबाईलवर आलेल्या एका मेजेसमध्ये, ‘आजचा सुधारक’ला  बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य (नास्तिकता) ह्या विषयावर एक विषेशांक काढण्याचा मानस आहे असे व त्या अंकाची मध्यवर्ती कल्पना ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा मानवास हितकारक आहे’ ही असेल असे लिहिले होते. त्यासाठी लिहिलेल्या या लेखात आधी आपण ‘बुद्धी’ व ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ म्हणजे काय ते पाहू. नंतर तो बुद्धिप्रामाण्यवाद मानवाला कसा हितकारक आहे ते समजून घेऊ व त्यानंतर अखेरीस त्याचा नास्तिकतेशी काय संबंध आहे ते पाहू.

बुद्धीचा अर्थ ‘ज्ञानशक्ति’ म्हणजे ‘मानवी मेंदूची योग्य तर्क करण्याची क्षमता किंवा विवेकी विचार करण्याची क्षमता’ होय. ही बुद्धी हे ‘सत्य आणि असत्य’ म्हणजे ‘खरे आणि खोटे’ यांचा विवेक करण्याचे मनुष्यजातीचे एकमेव साधन आहे. निसर्ग आणि उत्क्रांती यांचेकडून बुद्धीचे देणे मूलत: लाभलेल्या आजच्या प्रगट बुद्धीच्या मनुष्यजातीला फक्त ह्या मानवी बुद्धीच्या कसोटीला उतरतील अश्याच गोष्टींचा स्विकार करणे शहाणपणाचे आहे.

बुद्धिप्रामाण्य म्हणजे ‘फक्त ह्या मानवी बुद्धीला प्रमाण मानणे’ किंवा ‘तर्कप्रामाण्य’ होय. म्हणजे ‘लहानपणापासून मनावर बिंबवलेल्या मनाला’ किंवा ‘कुणा थोराने काय सांगितले’ ह्याला किंवा ‘श्रद्धे’ला प्रमाण न मानता ‘तर्कबुद्धी’ला प्रमाण मानणे होय. बुद्धिप्रामाण्यवाद हा कुठला ईझम किंवा वाद किंवा भांडण नसून ती फक्त एक प्रक्रिया आहे, जिला ‘वैज्ञानिक पद्धत’ असेही म्हणतात. बुद्धिप्रामाण्यवादाला विवेकवाद, वास्तववाद, भौतिकवाद किंवा ‘पुरोगामी विचार’ अशी संदर्भसूचक इतर नावेही असून त्यात पुरावा असल्याशिवाय कुठल्याही मताचा आग्रह धरता येत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन त्याला स्वतंत्र विचार करायला शिकवील.

बुद्धिप्रामाण्यवाद स्वत: काहीच करीत नाही. आपण मात्र त्याचा मानवी जीवनातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग करू शकतो. सर्व उद्दीष्टे आपणच ठरवितो, निरीक्षणे आपणच करतो; प्रमेये, गृहिते इत्यादि आपणच ठरवितो, तर्कबुद्धी आपणच वापरतो. नंतर प्रमेये सिद्ध तरी होतात किंवा त्यांचे खंडन तरी होते. बुद्धिप्रामाण्यवादात ‘वैज्ञानिक सत्या’ला विश्वसनीय प्रमाणाची मान्यता दिली जाते कारण ते वरील पद्धतीने प्राप्त झालेले ‘वैश्विक ज्ञान’ असते व ते मानवजातीचे ‘प्रत्यक्ष प्रमाण’ मानले जाते. तर असा हा बुद्धिप्रामाण्यवाद स्विकारण्यासाठी व्यक्ति फार बुद्धिमान असण्याची  आवश्यकता नाही. मात्र व्यक्ति स्वतंत्र विचार करणारी असली पाहिजे.

अशा या बुद्धिप्रामाण्याला पुरोहितशाहिचा कडाडून विरोध असतो कारण त्यामुळे त्यांच्या मंत्रतंत्र व श्रद्धा यांवर अवलंबून असलेल्या वर्चस्वाला आघात पोचतो. धर्मांवरील किंवा पुरोहितांवरील श्रद्धेमध्ये, स्वतंत्र बुद्धीच्या वापराला अंगभूत विरोध असतो. धर्माला व पुरोहितांना श्रद्धेवरील प्रामाण्य हवे असते, बुद्धीवरील, विवेकावरील किंवा तर्कावरील नव्हे.

बुद्धिप्रामाण्यवाद जेव्हा आपण ‘जीवनाचे तत्त्वज्ञान’ म्हणून स्विकारतो, तेव्हा त्यात ‘वैयक्तिक व सामाजिक नीती’ आपोआपच येते. कारण जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी स्विकारण्याची त्याला संपूर्ण मुभा आहे. मात्र ती नीती ‘धार्मिक नीती’ नव्हे. उदाहरणार्थ ‘बालविवाह ही गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत धार्मिक नीती होती. आज ती अनीती आहे. नीतीकल्पना काळानुसार व परिस्थितीनुसार बदलत असतात, बदलल्या पाहिजेतच आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोक नवनवीन समाजहितकारक नीतीकल्पना सतत सुचवित आणि अंगिकारीत असतात. याउलट श्रद्धावादी, धर्मवादी लोक मात्र नीतीत बदल करण्याला विरोध करीत असतात.

पृथ्वीवरील मानवी जीवनातील अनेकविध प्रश्नांतून मार्ग शोधण्यासाठी ‘प्राकृतिक विज्ञान’ हे जरी अपुरे वाटत असले तरी बुद्धिप्रामाण्यवादात मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन व नवनवीन ज्ञानाच्या व अनुभवाच्या प्रकाशात आपली मते ‘पुन्हा तपासण्याची’ खुली तयारी असल्यामुळे तसेच ‘नीतीची चाड’ आणि विशेषतः ‘निसर्ग व पर्यावरणाविषयी प्रेम’ आणि ‘अखिल मानवजातीच्या हितासाठी धडपड’ असल्यामुळे काही लोक बुद्धिप्रामाण्यवादाला ‘विज्ञाननिष्ठ मानवता’ असे नाव देतात व तोच ‘ईश्वरकल्पनेला, धर्माला व अध्यात्माला अधिक चांगला पर्याय’ आहे असे ते मानतात. आमच्या मते ते बरोबर व महत्ताचे आहे.

धार्मिक कल्पना नाकारून, बुद्धिप्रामाण्यवाद स्विकारणारी ही माणसे अधिक जबाबदार व आधिक प्रामाणिक बनतील हीच शक्यता जास्त आहे कारण जी अनेक तथाकथित धार्मिक ईश्वरवादी माणसे भ्रष्टाचार, अत्याचार वगैरे करीत असतात ती माणसे तीर्थस्नान, नमाज किंवा काही पूजाप्रार्थना करून त्यांचे ‘पाप’ धुतले जाते असे मानीत असतात. याउलट बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला आपल्या पापामुळे समाजाचे अहित होईल याची जाण असते; असलीच पाहिजे. त्यामुळे ईश्वर व धर्म यांचेऐवजी बुद्धिप्रामाण्यवाद प्रचलित व प्रसारित होऊनच ‘सुखी, समाधानी व सुसंस्कृत मानवी समाज’ निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे.

पुष्कळ लोकाना असे वाटते की आधुनिक काळात जगभर अस्तित्वात असलेले सर्व धर्म हे फार प्राचीन काळी निर्माण झालेले आहेत. पण हे खरे नसून, हे सर्व धर्म, गेल्या अवघ्या पाच हजार वर्षांत आशिया खंडात निर्माण होऊन मग जगभर पसरलेले आहेत. त्यात पश्चिम आशियात निर्माण झालेल्या धर्मांपैकी ‘ज्यू’ हा धर्म सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी व इराणमधील ‘झरत्रुष्टाचा फारसी धर्म सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेले असावेत. खिस्ती व *** हे लोकसंख्येच्या दृष्टिने जगात सर्वांत मोठे असलेले धर्म अनुक्रमे फक्त दोन व दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेले आहेत. भारतात निर्माण झालेल्या धर्मांपैकी हिंदू (वैदिक) धर्म सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी जैन व बौद्ध हे दोन धर्म सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी व शीख धर्म, गुरुनानकांनी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी स्थापन केलेला आहे. चीनमधील लाओ त्से व कन्फ्यूशिअस्‌ यांचे धर्मसुद्धा सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेले आहेत. म्हणजे आजच्या जगातील कुठल्याही धर्माची प्राचीनता पाच-साडेपाच हजार वर्षांहून जास्त नाही.

आज विज्ञान आपणाला सांगते की सुमारे साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी सूर्यापासून जन्मलेल्या आपल्या पृथ्वीवर, आपोआप झालेल्या काही रासायनिक प्रक्रियांतून आधी अतिसूक्ष्म सजीव निर्मिती होऊन त्यांतून दोनतीन शतकोटी(!) वर्षांच्या ‘उत्क्रांती’ प्रक्रियेने ‘उभ्याने ताठ चालू शकणारा आदिमानवप्राणी’ उर्फ ‘होमो ईरेक्टस्‌’ हा सुमारे दहा लाख(!) वर्षांपूर्वी त्याच्या पुच्छविहिन ‘ऑस्ट्रेलो पिथेकस’ ह्या मर्कट अवस्थेतून उत्क्रांत झालेला आहे. त्यामुळे सुमारे आठ लाख वर्षांनी म्हणजे आजपासून दीडदोन लाख वर्षांपूर्वी त्याचा, आजचा शहाणा मानव उर्फ ‘होमो सेपियन’ बनला. परन्तु त्याचेही जीवन स्थिर नसून, रानावनात भटकंतीचे, शिकार करणे व अन्न गोळा करण्याचे होते. आफ्रिका व युरेशियात पसरलेल्या ह्या सेपियनच्या, निसर्गाच्या अज्ञानामुळे व त्याला वाटलेल्या भीतीमुळे ‘ईश्वर’ आणि ‘माणसाच्या मृत्यूनंतरचे परलोकजीवन’ अश्या काहिश्या कल्पना तेव्हा त्याला सुचल्या असाव्यात असे मानायला पुरावे आहेत, तरी त्या माणसाला तेव्हा ‘धर्म’ काही सुचले नव्हते. म्हणजे मानवजातीच्या अस्तित्वाच्या शेवटच्या फक्त ५ हजार वर्षांत म्हणजे ९७% काळ उलटून अवघ्या २-३ टक्के काळात, त्याला आपण वर पाहिलेल्या ‘जगातील सर्व धर्मकल्पना’ सुचलेल्या आहेत. तेही शेवटच्या फक्त दहा हजार वर्षांत(!) जगात जिकडेतिकडे शेती करण्याचा शोध लागून, स्थिर व सुसंस्कृत जीवन जगणे शक्य झाले म्हणूनच होय!

काहीही कारणाने असेल, पण त्या सुसंस्कृत मानवी जीवनात असे घडले की, जरी मानवाला ‘ईश्वर आणि धर्म’ ह्या कल्पना गेल्या पाच हजार वर्षांत सुचल्या, तरी त्याला ‘भौतिक प्राकृतिक विज्ञान’ ही कल्पना मात्र गेल्या अवघ्या ‘चार पाच शतकांत’ सुचलेली आहे. हेच समजा जर उलट घडले असते, म्हणजे जर विज्ञानाचे शोध पाच हजार वर्षांपूर्वीच लागले असते, माणसाची वैज्ञानिक प्रगतीसुद्धा तेव्हाच झाली असती आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे विश्वाच्या भौतिकतेचे सत्य ज्ञान माणसाला तेव्हाच प्राप्त झाले असते आणि जर वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा माणसाला तेव्हाच मिळाला असता तर कदाचित्‌ ‘ईश्वर आणि धर्म’ अश्या भन्नाट कल्पना माणसाला सुचल्याच नसत्या, किंवा सुचल्या असत्या तरी त्याच्या जीवनात त्या आजच्याएवढ्या बलवत्तर म्हणजे प्रभावी ठरल्या नसत्या.

जगातल्या सर्व धर्मांमध्ये आहे तरी काय हे थोडक्यात सांगायचे तर ते खालीलप्रमाणे सांगता येईल. जगातील बहुतेक धर्म ईश्वराधारित आहेत व त्यात त्या त्या धर्माचा तो तो ईश्वर कसा आहे व त्याची ‘उपासना’ कशी कशी करावी ते प्रामुख्याने सांगितलेले असते. सर्व धर्मांचे त्यांचे त्यांचे ‘तत्त्वज्ञान’ हे धर्मांचे दुसरे अंग असते ज्यात विश्व, निसर्ग व मानव ह्यांची निर्मिती ईश्वराने कशी केली ते, आणि त्यांचे परस्परांशी व ईश्वराशी काय संबंध आहेत व असावेत हे सांगितलेले असते. याशिवाय सर्व धर्मांमध्ये त्यांच्या ‘नीतीकल्पना’ हे तिसरे महत्त्वाचे अंग असते आणि ‘मानवी जीवन जगण्याविषयींचे अनेक नियम व आदेश’ हे धर्मांचे चौथे महत्त्वाचे अंग असते. ह्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक धर्म आपापली वेगवेगळी कथा सांगत असतो. ‘वेगवेगळी’, कारण त्या सर्व कथा त्या त्या धर्माच्या निर्मितीकाळी असलेल्या स्थळकाल परिस्थितीप्रमाणे मानवाने स्वतःच रचलेल्या असतात. असो. विशेषतः भारतात निर्माण झालेल्या धर्मांपैकी एखाद दुसर्‍या धर्मात, ईश्वराचे अस्तित्व चक्क नाकारलेले असणे किंवा स्पष्टपणे सांगितलेले नसणे शक्य आहे. (उदाहरणार्थ जैन व बौद्ध धर्म). पण अशा धर्मांमध्येसुद्धा कालांतराने मार्गदर्शकांच्या पूजाप्रार्थना, नवस व विविध श्रद्धा, अंधश्रद्धा ह्यांचा शिरकाव होतो, झालेला आहे. सारांश असा की ईश्वर मानलेला असो वा नसो, सगळे धर्म हे सारखेच ‘श्रद्धांवर आधारित’ व ‘शब्दप्रामाण्यवादी’ आहेत. त्यामुळेच जगांतील सर्व धर्म हे ‘बुद्धीची फसवणूक’ आहेत असे म्हणता येते. बुद्धिप्रामाण्यवादी असलेला असा एकही धर्म आजच्या जगात अस्तित्वात नाही.

लक्षात घेऊया की धर्मांप्रमाणे, ईश्वरसंकल्पनेबाबतही तेच खरे आहे. एक तर ईश्वराचे अस्तित्व कुणीही कधीही सिद्ध करू शकलेले नाही, शकत नाही. बरे ईश्वर मानणारे सर्व धर्म एकच म्हणजेच सारखाच ईश्वर मानतात असेही नाही. जर एखाद्या थोर माणसाने सांगितले की ‘मीच विश्वनिर्माता ईश्वर आहे’ तर आपण तसेच मानतो (उदा: श्रीकृष्ण). जर दुसर्‍या थोराने सांगितले की ‘मी ईश्वराचा एकमेव प्रत्यक्ष पुत्र आहे’ (उदा: येशू – जीझस्‌) तर आपण तसेच मानतो. जर तिसर्‍या थोराने सांगितले की ‘मी ईश्वराचा शेवटचा प्रेषित आहे’ तर तेही आपण खरेच मानतो (उदा: मुहमद). त्याचप्रमाणे दुसर्‍या एखाद्या थोराने सांगितले की मानव ही ईश्वराची ‘निर्मिती’ आणि ईश्वर व मानवअ हे वेगवेगळे आहेत (द्वैत) तर आपण तसेच मानतो. जर आणखी कुणी म्हटले की मानव हा ईश्वराचा अंशच आहे (अद्वैत), तर आपण तेही खरेच मानतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न घ्या की माणसाला एकच जन्म आहे की लाखो पुनर्जन्म आहेत हा. तर त्याबाबतीतही तीच रडकथा आहे. ईश्वर ‘अवतार’ घेतो की नाही, याबाबतीतही तेच आहे. जर सबंध पृथ्वीचा एकच ईश्वर असेल तर त्याने सबंध जगाला एकच ईश्वर व एकच धर्म का सांगितला नाही? सारखेच ज्ञान का दिले नाही? आणि ‘उत्तर नसलेल्या’ अशा अनंत शंका काढून आम्ही ईश्वराचे अस्तित्वच नाकारले आणि ‘ईश्वर व धर्म’ ह्या विस्कळित असलेल्या केवळ मानवी कल्पना आहेत, सत्य नव्हेत असे म्हटले, तर सगळे आम्हांला ‘नास्तिक’ म्हणतात. म्हणा लेकांनो. आम्ही ‘नास्तिकता’ हे दूषण न मानता भूषणच मानतो.

तर बुद्धिप्रामाण्याचा व नास्तिकतेचा परस्परसंबंध थोडक्यात असा आहे.

आता क्षणभर पुन्हा ‘ईश्वर व धर्म’ ह्या जोडीकडे वळून पाहिले तर प्रश्न असा पडतो की जर सर्व धर्म मूलतः प्रेम, नीती व बंधुभावाची शिकवण देणारे आहेत तर धर्माधर्मात व पंथापंथांमध्ये होणारे सर्व व्यवहार जगभर व नेहमीच हिंसेचे आणि अमानुषतेचे का होतात? ते प्रेम व तो बंधुभाव सर्व माणूसजातीसाठी नसून फक्त आपापल्या धर्माच्या, पंथाच्या माणसांसाठीच असतो का? ह्या संस्था त्यांच्यामधील वेगळेपणाच्या महत्त्वामुळे, धर्मपंथाभिमानाच्या आधारावर सतत विद्वेष, कडवेपणा व अतिरेकीपणा अश्या भावना निर्माण करून, सबंध जग सतत हिंसाग्रस्त, युद्धमय व  दुःखी ठेवीत आहे. अगदी आजही हेच घडत आहे. तर मग आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की असली ही ‘ईश्वर व धर्म’ ह्यांची जोडी मानवी हिताची आहे व आपल्याला हवी आहे? की आपण वर पाहिल्याप्रमाणे सुसंस्कृत, सुखी व समाधानी मानवसमाज निर्माण होण्याची, त्यातून जास्त शक्यता आहे, असा बुद्धिप्रामाण्यवाद मानवजातीच्या जास्त हिताचा आहे व आपल्याला हवा असावा? उत्तर स्पष्ट आहे.

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकता’ असे सुरुवातीला सांगितलेले शीर्षक ह्या लेखाला देण्यात अर्थाची द्विरुक्ति होईल असे मला वाटते. कारण पूर्णतः बुद्धिप्रामाण्यवादी नसलेला एखादा माणूस ‘नास्तिक नसणे’ जरी शक्य असले तरी खरा नास्तिक बनलेला माणूस पूर्णतः बुद्धिप्रामाण्यवादी असलाच पाहिजे. तो तसा नसणे काही शक्य नाही. म्हणून मी प्रस्तुत लेखाचे शीर्षक बदलले आहे.

आता ‘नास्तिकते’बाबत पूर्वी प्रत्यक्ष घडलेली एक घटना ऐका:

वीसपंचवीस माणसांच्या एका सभेत, एका ज्येष्ठ सद्‌गृहस्थाने ‘rational atheist’ (बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक) असा शब्दप्रयोग केल्यावर त्यावर हरकत घेत मी म्हणालो, की नास्तिक नेहमीच बुद्धिप्रामाण्यवादी असतो, असलाच पाहिजे. नास्तिक हा नास्तिकच व रॅशनलच असतो. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की ‘irrational नास्तिका’चे उदाहरण मी देऊ शकतो. आणि त्याने उदाहरण दिले ते (हिंदुहृदयसम्राट) बाळासाहेब ठाकरे यांचे. बाळासाहेबांची पत्नी वारली तेव्हा एका सभेत ते म्हणाले होते की “नेमके औषध वेळीच हाती न लागल्यामुळे, माझी पत्नी ज्या ईश्वरामुळे वारली त्याला मी मानीत नाही. मी नास्तिक (झालो) आहे.” त्याबाबत मी म्हणालो की बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट, कर्तृत्ववान, थोर व बुद्धिमानही आहेत (होते) हे सर्व खरे, पण तुमच्या उदाहरणावरून ते काही ‘नास्तिक’ ठरत नाहीत. यावर त्या गृहस्थांचे म्हणणे असे की “पण ते स्वतः तसे म्हणाले ना?” पण मला वाटते की ‘मी नास्तिक आहे’ असे सांगून किंवा ‘देवाने माझ्यावर अन्याय केला आहे’ असे सांगून, किंवा एखादा ईश्वर नाकारूनही कुणी नास्तिक (atheist) ठरत नाही. जगाचा ईश्वर असा कुणी अस्तित्वातच नाही हे ज्याला स्वबुद्धीने, स्वविचाराने पटले आहे व म्हणून आजच्या जगातील सर्व धर्म व सर्व ईश्वर स्पष्टपणे नाकारणारा व ते सर्व मानवनिर्मित आहेत व मानवी बुद्धीची फसवणूक आहेत, असे जो मानतो तो माणूसच खरा नास्तिक ठरू शकतो असे मला वाटते. मात्र त्या गृहस्थाने atheist ला rational असे विशेषण जोडलेच पाहिजे हे त्याचे मत शेवटपर्यंत सोडले नाही. त्यावेळी सभेची वेळ संपत आलेली असल्यामुळे शेवटी सभा तशीच आटोपली गेली.

(लेखक हे ‘Triumph of Man’ ह्या अमेझॉन किंडलवर उपलब्ध असलेल्या भाषांतरित इंग्रजी पुस्तकाचे व ‘समग्र निरीश्वरवाद’ ह्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका’ ह्यांचा ‘वैचारिक ग्रंथ पुरस्कार’ प्राप्त, लोकवाङमय गृह प्रकाशित पुस्तकाचे, तसेच ह्याच ‘निरीश्वरवाद’ विषयावर गेल्या ३० वर्षांत लिहिलेल्या अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत.)

अभिप्राय 8

 • आँक्टोबरच्या अंकातील शरद बेडेकर यांचा ‘बुध्दीप्रामाण्यवाद आणि नास्तिकता’ हा लेख धर्म आणि ईश्वर यांची गल्लत करणाराच म्हणावा लागेल. धर्म या शब्दाचा अर्थ आचारसंहिता असा आहे. सहाजिकच आदीमानव शेतीच्या शोधानंतर एकेठिकाणी स्थिरस्थावर झाल्यानंतरच सामाजिक स्वस्थ्य राखण्यासाठी नितीनियम म्हणजेच आचारसंहिता निर्माण करण्याच्या हेतूने प्रुथ्वीवरील सर्व धर्मांचा उदय झालेला आहे. आता त्याकाळात लोकांवर नितीनियम पाळण्याच्या हेतूने धर्माची सांगड ईश्वराशी घालण्यांत आली. याचा अर्थ धर्म आस्तित्वात येण्यापूर्वी ईश्वरीय संकल्पना आस्तित्वात होती. पुढे काही रुढींची, जसेकी बालविवाह वगैरेचीही सांगड धर्माशी घालण्यात आली. या स्रुष्टीची निर्मिती झाली त्यामागे ईश्वरीय शक्ती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज विज्ञानाच्या सहाय्याने रोबोर्ट निर्माण करणाय्रा मानवाला क्रुत्रीम मानवी मेंदू किंवा रक्त निर्माण करणे शक्य झालेले नाही. आजही मानवाला माणसाच्या डीएनए/आरएनएच्या बाबतीत यश आलेले नाही. त्यामुळे ईश्वराचे आस्तित्व नाकारणे हा त्या जग्नियंत्याच्या बाबतीत क्रुतघ्नपणाच म्हणावा लागेल.

 • नास्तिकता म्हणजेच (मानवतावादी) नैतिकता हे समीकरण बाळबोध वाटते. हिटलर, स्टॅलिन, पॉल पॉट, माओ, किम-२, मुसोलिनी, जेफ्री डामर, आणि कित्येक नास्तिक हे नेहमीच्या अर्थानं नैतिक नव्हेत, यात वर्णद्वेषी आहेत, हुकुमशहा आहेत, विकृत मानसिकता असलेले ही आहेत. डॉकिन्स त्यांना खऱ्या अर्थानं नास्तिक मानायला तयार नाही, पण ते पटणारे नाही. हिटलरने कॅथलिक धर्माचा राजकारणासाठी वापर केला पण हिटलर होता उत्क्रांतिवादी नास्तिक! ..

  In Hitler’s eyes, Christianity was a religion fit only for slaves; he detested its ethics in particular. Its teaching, he declared, was a rebellion against the natural law of selection by struggle and the survival of the fittest.

  — Alan Bullock, Hitler: A Study in Tyranny

  नास्तिक लोक नेहमी निष्पक्ष बुद्धीप्रामाण्यवादी असतात हे ही तितकेसे खरे नाही. कित्येक सहज प्रवृत्तीने नास्तिक असतात. त्यांचा बुद्धीप्रामाण्याशी किंवा चिकित्सेशी विशेष संबंध असतोच असे नाही. शिवाय बेडेकर म्हणतात तसे स्वत:ला नास्तिक म्हणवणारे तसे असतीलच असे नाही, आणि स्वत:ला आस्तिक म्हणवणारे खरेखुरे आस्तिक असतीलच असेही नाही.

  शेवटी काय तर मूल्यव्यवस्था आणि त्यानुसार होणारी वर्तणूक ही महत्त्वाची. आस्तिकता, नास्तिकता ही मूल्यांचीच अभिव्यक्ती.

 • बुध्दीप्रामाण्यवादी मांडणी

 • काही जुजबी मतभेद होऊ शकत असले तरी लेख चांगला आहे.
  हा लेख अनेक लोकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे.
  मी समाज माध्यमातून मला शक्य तितक्या लोकांपर्यंत हा लेख पोचवतो.

 • खूप छान..विवेकी विचार

 • दर्जेदार लेख. त्यावरील अभिप्रायही वाचनीय!
  पहिल्यांदाच ह्या संकेतस्थळावर आलो. आता पुनःपुन्हा येईल.
  एक प्रश्न “खिस्ती व *** हे लोकसंख्येच्या दृष्टिने …” ह्यात *** चा वापर का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.