नास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता

नास्तिक्य हा काही या लेखाच्या वाचक मंडळीस नवा विषय नसेल याची खात्री आहे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या निरंतर प्रवासात सापडणारा एक टप्पा म्हणून आपल्याला नास्तिक्य ओळखीचे आहे. माणूस जन्मल्यापासून ते तो स्वतंत्र विचार करू लागेपर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते बरेचदा तर्कशुद्ध विचारांच्या प्रवाहाने नंतरच्या आयुष्यात धुतले न गेल्याने आपल्याला धार्मिकांची संख्या लक्षणीय दिसत असते. जसजसे तर्कशुद्ध विचारप्रवाह माणसाच्या मनातील कोपऱ्यांना स्पर्श करू लागतात तसतशी ही जळमटे दूर होतात आणि माणूस अधार्मिक, अश्रद्ध आणि मग नास्तिक असा प्रवास करतो. हे घडत असताना सदर बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला दैनंदिन वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मात्र नास्तिक नसलेल्या, बुद्धिप्रामाण्यवादी नसलेल्या धर्माचे संमिश्र असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला आणि काही नैतिक कोड्यांना सामोरे जावे लागते. या लेखाचा उद्देश हा नास्तिक्याच्या, बुद्धिप्रामाण्यवादी जीवनाच्या अशा सांस्कृतिक आणि नैतिक बाजूबद्दल ऊहापोह करणे हा आहे. 

बरेचदा ‘संस्कृती’ या नावाखाली धर्म थोपवणे हा उपद्व्याप नास्तिकांना सहन करावा लागतो. आपल्याकडे असे प्रयत्न पार सर्वोच्च न्यायिक यंत्रणा, सरकारी पदांवरील व्यक्ती आणि अन्य सामाजिक आयुष्यातील माननीय व्यक्तींकडून केले गेले आहेत. हिंदू हा कसा धर्मच नाही, आम्ही तर महान संस्कृती आहोत अशा थाटात केली जाणारी विधाने ही वस्तुतः ज्याप्रमाणे कडू औषधास साखरेचे आवरण घातले जाते त्यातला प्रकार असतो! यातून धार्मिक नसलेल्यांना संस्कृती म्हणून किंवा जीवनपद्धती म्हणून का होईना धर्माची गोळी गिळायला भाग पाडणे हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न होत असतो. अर्थात हे काही हिंदूंपुरते मर्यादित आहे किंवा हिंदूंचे असे वैशिष्ट्य आहे असे मुळीच नव्हे. पश्चिमेतही जे धार्मिक नाहीत अशांना धर्माची शिकवण पाजता यावी यासाठी जुडियो-ख्रिश्चन सांस्कृतिक परंपरा, जीवनपद्धती यांचा तिथल्या परंपरावाद्यांकडून वारंवार प्रचार केला जातो. 

आता अमुक एक गोष्ट जीवनपद्धती, संस्कृती आहे असं म्हणणं यात बरीच तार्किक करामत दडलेली असते. कारण जीवनपद्धती आणि संस्कृती या सतत समावर्ती आणि प्रचंड वैविध्यपूर्ण अशा न-नैतिक संकल्पना असतात. त्या व्यक्तिपरत्वे, प्रदेशपरत्वे आणि कालपरत्वे बदलत असतात. त्यामुळे आमच्या सव्वाशे करोड लोकांची किंवा त्यांच्या पूर्वजांची एकच एक अशी काही निश्चित संस्कृती किंवा जीवनपद्धती होती हे तथ्य म्हणजे तर्कावर न टिकणारे विधान आहे. दुसरी बाजू संस्कृती आणि जीवनपद्धती यांच्या न-नैतिक असण्याची. न-नैतिक म्हणजे नैतिकतेशी देणं-घेणं नसलेले या अर्थी! अमुक एखादी गोष्ट हा संस्कृतीचा हिस्सा आहे म्हणून ती वंदनीय होत नाही. अमुक एखादी गोष्ट माझ्या जीवनपद्धतीचा भाग आहे असे म्हणून ती गोष्ट चांगलीच आहे हे ठरत नाही. 

याच कारणाने हिंदू ही एक संस्कृती आहे या कारणाखाली हिंदू धर्माला चिकित्सेच्या, धर्मनिरपेक्षतेच्या मर्यादेच्या नजरेतून सूट देण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक धर्म हा निश्चितपणे त्या धार्मिक प्रक्रियेच्या भोवतालच्या संस्कृती (Culture) आणि सभ्यता (Civilization) यांच्यावर आपली छाप सोडतच असतो. ही छाप इस्लाम ‘जकात’सारख्या कररचनेद्वारे, व्याज घेणे पाप समजण्याच्या रुढीतून सोडत असेल, ख्रिश्चन धर्म त्यांच्या रविवारी सुट्टी घेण्यातून सोडत असेल तर हिंदू धर्म कशालाही पाय लागल्यावर पटकन नमस्कार करणे, दिसेल त्या देवाला हात जोडणे या सहजभाव बनलेल्या गोष्टींतून सोडत असतो. ती छाप ही त्या धार्मिक प्रक्रियेची ऐतिहासिक बाह्यता (Externality) असते. ती काहीवेळा सोयीची असते, काहीवेळा उपद्रवी असते तर काहीवेळा नुसतीच निरर्थक निरुपद्रवी असते. अशा धार्मिक इतिहासाच्या सांस्कृतिक प्रभावामुळे वर्तमानातील व्यक्तीच्या बुद्धिप्रामाण्यवादी वाटचालीस बाधा येण्याचे कोणतेही ठोस असे कारण दिसत नाही. 

त्यामुळे आपला आहार, आपला पोशाख, आपली भाषा, आपले आविर्भाव आणि आपले सामाजिक संकेत यांच्यावर असलेला धर्माचा प्रभाव हा संस्कृतीच्या मार्गाने आपल्यालाही स्पर्श करतो म्हणून आपण काही लगेच त्या धार्मिकांचे सांस्कृतिक दास झालो असा अर्थ काढायची कोणाही नास्तिकाला, अश्रद्धाला, अधार्मिकाला गरज नाही. किंबहुना असे मानसिक सोवळे पाळणे हे खचितच बुद्धिप्रामाण्यवादी लक्षण नव्हे! त्यामुळे “तुम्ही नास्तिक आहात ना, मग उकडीचे मोदक का खाता?” यासारख्या विचित्र जाब विचारणाऱ्या प्रवृत्तींना बुद्धिप्रामाण्यवादी मंडळींनी भीक नं घालणेच श्रेयस्कर! असे मोदक, केक किंवा शीरखुरमा खाऊन बाटायला आपण काही धार्मिक नव्हे!!

आता ह्या लेखाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे नास्तिक्याच्या नैतिक मूल्यांवरील परिणामांकडे वळू. नैतिकता ही काही नुसती मूठभर तत्त्ववेत्त्या मंडळींच्या गप्पांची गोष्ट नाही हे याठिकाणी सुरुवातीलाच समजून घेतले पाहिजे. नैतिक मूल्यव्यवस्था (Value Structure) हा सामाजिक आणि व्यक्तीच्या पातळीवरील दैनंदिन वर्तणुकीचा एक महत्त्वाचा भाग असतो. आपण चोरी का करू नये, दुसऱ्यांना इजा का करू नये, एखाद्याला मदत का करावी या रोज पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, ही माणसाची मूल्यव्यवस्था पुरवत असते.

सध्या ही मूल्यव्यवस्था मोठ्या प्रमाणात धार्मिक श्रद्धांच्या पायांवर उभी आहे. म्हणजे अगदी लहान मुलालादेखील संस्कार म्हणून काही गोष्टी शिकवताना “हे बघ, चोरी करायची नाही, नाहीतर पाप लागते आणि देव शिक्षा करतो” असं म्हटलं जातं. धर्म हा गेली काही शतके सामाजिक मूल्यव्यवस्थेला आधारभूत ठरला आहे हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. आपण देव मानायचं बंद केलं, धर्म सोडला, दृश्य श्रद्धा आणि सोपस्कार यांचा त्याग केला तरी त्यामुळे आपण जगत असलेल्या मूल्यव्यवस्थेवरील धर्माचा प्रभाव काही लगेच कमी होत नाही. तसे व्हायला बराच नैतिक विचारकलह माणसाला भोगावा लागतो. मूल्यांना नवे आधार शोधावे लागतात. तत्त्वज्ञानाची बाराखडी गिरवावी लागते. आपल्या अधार्मिक, अश्रद्ध जीवनाला लागणारी नवी नैतिक चौकट ही नास्तिकाला स्वतःच बनवावी लागते.

याठिकाणी नित्शेच्या ‘द गे सायन्स’ मधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असे विधान उद्धृत करणे प्रस्तुत ठरेल.

  • ‘God is dead; but given the way of men, there may still be caves for thousands of years in which his shadow will be shown. — And we — we still have to vanquish his shadow, too. ’ (Sec. 108) 
  • God is dead! God remains dead! And we have killed him. How shall we comfort ourselves, the murderers of all murderers? What was holiest and mightiest of all that the world has yet owned has bled to death under our knives: who will wipe this blood off us? What water is there for us to clean ourselves? What festivals of atonement, what sacred games shall we have to invent? Is not the greatness of this deed too great for us? Must we ourselves not become gods simply to appear worthy of it? (Sec. 125) 

बऱ्याचदा नित्शेचे हे प्रसिद्ध विधान – ‘God is dead’ हे एखाद्या विजयगर्जनेच्या सुरात वाचले जाते. नित्शेला जणू काही देवाच्या मृत्यूचा आनंद झाला आणि त्याने ही अशी आरोळी ठोकली अशा थाटात त्याचे हे विधान सामायिक झालेले मी बऱ्याच बुद्धिवादी चर्चा-वर्तुळांत पाहिले आहे. इथे एक महत्त्वाची बाब अशी की नित्शेचं ‘God is dead’ हे विधान, हा त्याचा उत्स्फूर्त आनंद किंवा त्याने सांगितलेली विजयाची वार्ता नसून त्याने व्यक्त केलेली चिंता आहे, काळजी आहे! नित्शेचं म्हणणं हे ‘द गे सायन्स’ मधील वर उद्धृत केलेली विधाने लक्षपूर्वक वाचल्यास जास्त साकल्याने समजून घेता येईल. देव जरी संपला असला म्हणजे श्रद्धेला बुद्धिवादाने हद्दपार केले असले, तरी त्याची सावली ही माणसाला अजून बराच काळ छळणार आहे! ही सावली म्हणजे देव/धर्म यांची आपल्या मूल्यव्यवस्थेवरील पकड होय.

भारतातल्या बुद्धिवादी चळवळीने आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरुवात करत त्यानंतर ठाम नास्तिक्याकडे जो आश्वासक प्रवास केला आहे त्याची पुढची दिशा ही भारतीय माणसाच्या मूल्यव्यवस्थेवरील धर्माची सावली संपवण्याकडे वळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. धर्मविरहित, देवाचा आधार नसलेली एक बुद्धिप्रामाण्यवादी नैतिक चौकट उभी करणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. याचे प्रयत्न खुद्द नित्शेने आपल्या तात्त्विक साहित्यातून केले आहेत. त्याचबरोबर पश्चिमेत घडलेले अन्य नास्तिक विचारवंत, बुद्धिवादी लेखक यांनीही या प्रकारची मांडणी केली आहे. भारतामध्ये मात्र अजून आपल्याकडच्या बुद्धिवादी प्रवाहाचा परीसस्पर्श मूल्यव्यवस्थेला घडणे बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहिले आहे. या लेखाचा एक प्रमुख उद्देश हा बुद्धिवादी मूल्यव्यवस्थेच्या मांडणीकडे नास्तिकांचे, अश्रद्ध मंडळीचे आणि अधार्मिक गटांचे लक्ष वेधावे हा आहे!

येणारी पिढी ही धर्माच्या जोखडातून मागच्या पिढ्यांपेक्षा नक्कीच जास्त मोकळी असणार आहे. देव नाकारणे, अश्रद्ध राहणे, धार्मिक संस्कार झुगारणे हे आता आपल्याकडे काही टॅबू राहिलेला नाही. मात्र देव-धर्म नाकारणारी पिढी तयार होत असताना तिची मूल्ये, तिची नैतिक चौकट ही त्याच देव-धर्माने घातलेल्या आणि आता गंजून गेलेल्या पायावर उभी असणे खचितच निरोगी समाजाचे लक्षण नाही! यासाठी जास्तीतजास्त नास्तिकांनी आणि बुद्धिवादी चळवळींनी या विषयावर चिंतन, लेखन आणि संवाद घडवावे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढ्यांवर ‘देव शिक्षा करेल’ या आधारावर टिकलेली सडकी, प्रतिगामी, अवैज्ञानिक मूल्ये लादण्याऐवजी बुद्धिवादी प्रवाहाने एक बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध अशा मूल्यव्यवस्थेची मांडणी उभी करावी हे त्या प्रवाहाला आव्हान देणारे एक नवे आव्हानात्मक क्षितिज आहे. अशा नव्या दमाच्या मूल्यव्यवस्थेवर आधारित समाज निर्माण होणे हे भारताच्या आणि एकंदरच मानवजातीच्या हिताचे आहे. तूर्तास तो ‘सोन्याचा दिन’ येवो अशी आशा व्यक्त करत या लेखाला पूर्णविराम देत आहे! 

मकरंद देसाई
रत्नागिरी, महाराष्ट्र
ईमेल: makaranddesai2@yahoo.in
ब्लॉग: makaranddesaimarathi.blogspot.com

अभिप्राय 7

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.