बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग ३)

मागील दोन लेखांमध्ये बुद्धिप्रामाण्य, नास्तिक्य, विवेक, वास्तवाचं आव्हान या संदर्भाने आपण काही बोललो. या लेखात आपण विवेकवादाची मूळ मांडणी, विवेक-अविवेक हा निर्णय करण्याच्या कसोट्या याबाबत बोलूया. तत्पूर्वी एक नोंद –

माणसाविषयी बोलताना सहसा ‘तो’ हे पुल्लिंगी संबोधन वापरलं जातं. वास्तविक ‘माणूस’ म्हणजे स्त्री, पुरुष यांच्यासह आज अस्तित्वात असलेले अनेक इतर लिंगभेद आणि लिंगभावदेखील. सवयीचा, सोयीचा भाग म्हणून ‘तो’ वापरलं जातं. पण संबोधने लिंगसापेक्ष असल्याने ती वाचल्यावर मनात विशिष्ट लिंगाच्या मनुष्याची आकृती तयार होतेच. वस्तूंच्या बाबतीतही हे होतं. ‘पुस्तक’ म्हटलं की लिंगनिरपेक्ष प्रतिमा डोळ्यांपुढे येते. पण ‘ग्रंथ’ म्हटलं की पुरुषविशिष्ट आणि ‘पुस्तिका’ म्हटलं की स्त्रीविशिष्ट प्रतिमा डोळ्यांपुढे येतात. अशी इतरही उदाहरणं देता येतील. ‘मानव’, ‘माणूस’ या संज्ञानांही ‘तो’ म्हटलं गेल्याने माणूस म्हणून ‘पुरुष’च डोळ्यांसमोर येतो. ‘तिथे सगळ्या बायकाच होत्या, माणूस कुणीच नव्हता’ अशा प्रकारची, ‘माणूस’ म्हणजे ‘पुरुष’ आणि ‘बाई’ म्हणजे ‘बाई’ अशी वर्गवारी सहजपणे गृहीत धरणारी वाक्यं मी काही संभाषणांमध्ये ऐकली आहेत. त्या त्या वेळी मी दुरूस्ती केली, पण एकूणात हा गोंधळ बराच मोठा आहे. माणसाच्या बाबतीत ‘तो’ प्रामुख्याने वापरलं जायचं मला दिसतं ते कारण असं की आदिम काळापासून विविध सामाजिक-राजकीय तत्त्वज्ञानं आणि संबंधित व्यवस्था निर्माण होण्यामागे, ईश्वर-धर्म-सत्ता या संकल्पनांना आकार आणण्यामागे, अस्तित्वाच्या हिंसक लढाईत वर्चस्व प्रस्थापित करण्यामागे मुख्यत्वे पुरुषप्रभाव कार्यरत होता. जगातील सर्व तत्त्वज्ञाने प्रामुख्याने पुरुषांची निर्मिती आहे. स्त्रीला जग कसं दिसतं, तिचं चिंतन काय आहे हे अलीकडे, गेल्या काही शतकांपासून ठळकपणे पुढे येऊ लागलं आहे. मानवी इतिहासात एके काळी मातृप्रधान व्यवस्था होती असं अनेक अभ्यासांतून दिसलं आहे, परंतु ती टिकलेली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पुरुषप्रभावाचा जो परिणाम इतरत्र आहे तोच भाषिक रचनेबाबतही आहे आणि माणूस प्रामुख्याने ‘तो’ आहे. आता मुद्दा जर सोयीचाच आहे तर माणसाला ‘ती’ हे संबोधनही वापरता येईलच. खरं तर तो किंवा ती ही दोन्ही संबोधने आलटून-पालटून वापरायलाही हरकत नाही. अर्थात जैविक फरकांच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुष या दोन प्रमुख श्रेणी असल्या तरी एकूणात लिंगभाव ही एक प्रवाही संकल्पना आहे हे आज पुढे येत आहे. लिंगाधिष्ठीत अडथळे तोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लिंगसापेक्ष शब्दांची मर्यादा अधिकच जाणवते. ‘ती माणूस’ हा शब्दप्रयोग करायला मला आवडेल. इथून पुढे या लेखात हे संबोधन वापरूया. ‘ती व्यक्ती’ असा शब्द वापरता येईलच, पण ‘माणूस’ या संदर्भात ‘ती’ हे संबोधन वापरण्याचा एक प्रयोग या लेखात करून पाहू.

व्यक्त होण्यासाठी शब्द बरेचदा पुरेसे नसतात ही अनुभूती आपल्याला येत असते. शब्द, शब्दांचे प्रचलित अर्थ, केवळ शब्दांमधूनच प्रतीत होणारी/समजून घेऊ शकली जाणारी माणसाची मनोभूमिका, त्याचे मनोव्यापार यातून माणसाबद्दलच्या समग्र आकलनात थोडी त्रुटी राहतेच. हा त्रुटीचा मुद्दा संकल्पनांच्या बाबतीतही लागू होती. प्रतिगामी, पुरोगामी, बुद्धिवादी, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, विवेकी, अविवेकी, वैज्ञानिक, अवैज्ञानिक हे शब्द काही विचारांचं/कृतींचं मूल्यमापन करून त्यांना परिभाषित करतात. परिभाषित करणं व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक कारण परिभाषित केल्याशिवाय विशिष्ट लक्षणांना एक ‘नाव’ मिळू शकत नाही. त्यामुळे आधुनिकतेच्या संदर्भात समर्थनीय/असमर्थनीय ठरतील असे विचार/कृती अधोरेखित होऊ शकत नाहीत. प परिभाषित करणं म्हणजे एका अर्थी ‘मर्यादा घालणं’ही असतं. परिभाषित केल्याने ‘लेबलिंग’ होत असतं. कप्पे तयार होत असतात. अशा वर्गवारीतून, वर्गवारीचा हेतू संकल्पनांमध्ये भेद करण्याचा असला तरी प्रत्यक्षात माणसांमध्ये, समाजामध्ये विभाजन होऊ शकतं; किंबहुना होतंच. त्यातून मग माणसांचं ध्रुवीकरण होऊन माणसं ‘परस्पर अनन्य’ (म्युच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह) ठरतात/ठरवली जातात. उदा. श्रद्धाळू विरुद्ध विज्ञानवादी, परंपरावादी विरुद्ध बुद्धिवादी इत्यादी. प्रत्यक्षात माणूस एक ‘मिश्रण’ असू शकते/असते हे लक्षात घेणं आणि माणसांना कप्प्यात बंद न करणं सर्वच दृष्टीने हितकारक आहे.

सृष्टीशी संलग्न अशा विविध लहान-मोठ्या गुंतागुंतीच्या विषयांचा अभ्यास, ‘जे आहे ते तसं का आहे?’ या प्रश्नाचा शोध घ्यायची पद्धत याअर्थी ‘विज्ञान’ ही संकल्पना मात्र व्यापक, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक ठरते. जेव्हा आपण माणसाला ‘वैज्ञानिक’दृष्ट्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ‘श्रद्धा’ हा माणसाचा एक गुणधर्म म्हणून विज्ञानाचा अभ्यासविषय ठरतो. श्रद्धा ‘माणसाच्या विज्ञानाचा’ विषय ठरते. विज्ञान सृष्टीच्या जड आणि चेतन दोन्ही बाजूंचा अभ्यास करतं. या अभ्यासात, विशेषतः चेतन सृष्टीच्या अभ्यासात, ‘विज्ञान’ या ‘विचारपद्धती’ची ‘विवेक’ ही एक संवेदनाधिष्ठित बाजू आहे. ती विश्लेषणाची, भेद करण्याची शक्ती आहे. माणसाच्या अबोध इच्छा, अनेक प्रेरणा, या इच्छांचं आणि प्रेरणांचं कारण ठरणारं माणसाचं जैविक व सामाजिक वास्तव लक्षात घेऊन, माणसाला ‘ती आहे तशी’ समजून घेत, पुढे जाऊन ‘नवीन माणूस’ घडवण्याची आकांक्षा बाळगणारी ‘विवेक’ ही एक विचारपद्धती आहे. दुसरीकडे श्रद्धा, परंपरा, बुद्धी, निष्ठा या व इतर प्रभावांखाली असणार्‍या माणसासाठीही ‘विवेक’ ही कार्यक्षम विचारपद्धती आहे.

विवेकवादाच्या मूळ मांडणीसंदर्भात पुन्हा एकदा मे. पुं. रेगे यांची मदत घेऊ. सतराव्या आणि अठराव्या शतकातील युरोपियन तत्त्वज्ञानाचा इतिहास हा प्रामुख्याने विवेकवाद आणि अनुभववाद यांच्यातील विवादाचा इतिहास आहे असं नमूद करत रेगे ‘विवेकवाद’ या शब्दाच्या आजच्या अर्थांकनाकडे वळतात. –

विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची, किंवा असत्य व/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. आपले विश्वास, म्हणजे आपण स्वीकारलेली विधाने, सत्य कशावरून ठरतात आणि असत्य कशावरून ठरतात ह्याचा निकष विवेकवादापासून लागतो. विवेकवादी असणे म्हणजे ह्या पद्धतीला अनुसरून जी विधाने सत्य ठरतील तेवढीच सत्य म्हणून स्वीकारणे, जी सत्य ठरणार नाहीत ती सत्य म्हणून न स्वीकारणे; ही पद्धती म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. वैज्ञानिक पद्धती अनुभवावर आधारलेली असते ह्यात शंका नाही. पण अनुभवाला गोचर असणार्‍या पदार्थांचे आणि घटनांचे जे गुणधर्म आपल्या साक्षात प्रत्ययाला आले असतील तेवढ्याचे वर्णन करण्यावर वैज्ञानिक पद्धती समाधानी नसते. म्हणजे ‘हे पाणी त्या पाण्याहून अधिक गरम आहे’, ‘सूर्य उगवताना लाल दिसतो’, ‘ह्या झाडांची पाने डिसेंबर महिन्यात गळून पडली’, ह्यासारख्या आपल्या अनुभवांच्या आधारे ज्यांची सत्यता सिद्ध झाली आहे अशी विधाने नमूद करून वैज्ञानिक पद्धती थांबत नाही. ‘अणू’, ‘मूलभूत कण’, ‘विद्युतचुंबकीय क्षेत्र’, इत्यादी इंद्रियातीत – ज्यांचा आपल्याला साक्षात अनुभवातून प्रत्यय येत नाही अशा – पदार्थांचे आणि शक्तींचे अस्तित्वही विज्ञानात मानले जाते, आणि त्यांचे अस्तित्व व गुणधर्म वैज्ञानिक पद्धतीला अनुसरून प्रस्थापित झाले आहेत म्हणून मानले जाते.
(‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ या पुस्तकातील ‘विवेकवाद’ या प्रकरणातून)

वैज्ञानिक पद्धती अनुभवांच्या, दृश्य-अदृश्य घटितांच्या कार्यकारणभावात शिरते आणि त्याचा उलगडा करण्यासाठी गृहीतक (हायपॉथिसिस) रचून, त्यात इंद्रियातीत अशा कल्पित पदार्थांच्या आणि शक्तींच्या अस्तित्वाची कल्पना करायला पूर्ण वाव ठेवून, त्यांच्या कार्यामुळे काही परिणाम घडून आले हे निरीक्षणाने आढळून आलं तर ती कल्पित रचना ग्राह्य धरते. अन्यथा हे गृहीतक त्याज्य ठरतं. वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाविषयी आणि तिच्या अनन्य वैशिष्ट्यांविषयी रेगे यांनी वरील प्रकरणात फार विस्तृत आणि नेमकं विवेचन केलं आहे. ते मुळातून जरूर वाचावं. आपल्या विषयाच्या संदर्भाने या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी काही कळीचे प्रश्न विचारले आहेत. रेगे लिहितात,

विवेकवादाचे एक परिमाण किंवा अंग म्हणजे विश्वात खरोखर काय आहे ह्याचा निर्णय करण्याची विवेकवादाने पुरस्कारलेली रीत. विवेकवादाचे दुसरे अंग नैतिक आहे. माणसाने कसे जगावे हेही विवेकवाद सांगतो. या दोन अंगांमध्ये काय परस्परसंबंध असू शकेल? अस्तित्वाचे स्वरूप काय आहे ह्याचा शोध घेणारी वैज्ञानिक पद्धती माणसाने कसे जगावे ह्याचे नियमन करणार्‍या तत्त्वाला जन्म देऊ शकते का? वैज्ञानिक नीती, विज्ञानप्रणीत मूल्ये असे काही असू शकते का?

हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विवेकवादी चळवळीचा रोख या प्रश्नांकडे होता आणि आहे. मात्र मागील भागांत उल्लेख केल्याप्रमाणे वास्तवाचं आव्हान प्रबळ ठरल्यानंतर मूल्यसंकल्पनांचीही कसोटी लागते. प्रागतिक विचारातून सामाजिक वास्तव सुधारेल हे एका बाजूला खरं आहे, पण सामाजिक वास्तव – जे पूर्णपणे न्यायावर, समतेवर आधारलेलं नसतं, ज्यात दुःख, शोषण यांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव असतो – प्रागतिक विचाराला जमीन उपलब्ध करून देण्यात कमी पडतं. वास्तवातील झगडे वरचढ ठरून प्रागतिक विचार अव्यवहार्य वाटायची शक्यता बळावते. आजारी पडल्यावर अंगारे-धुपारे न करता डॉक्टरांचं औषध घ्यावं हे बरोबर, पण विशिष्ट डॉक्टरचा किंवा विशिष्ट आरोग्यविषयक सुविधेचा अनुभव कसा आहे, ती डॉक्टर/सुविधा परवडण्याजोगी आहे का हा विचार केला जाऊ शकण्याची शक्यता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जर एखादीने ‘आईला बरं वाटेल म्हणून बरेच उपचार केले. गुण आला नाही. शेवटी देवीसमोर बोकडाचा बळी दिला.’ असं म्हटलं तर त्यावरील आपला प्रतिवाद काय असेल? ‘आजवरच्या अनुभवावरून असं दिसतं की जर औषधांनी गुण आला नाही तर तो इतर कशानेही येत नाही. विशेषतः ज्यात स्वतः रोगी सहभागी नाही अशा उपायांनी तर नाहीच नाही!’ असं उत्तर आपण देऊ शकतो, ते पटवून द्यायचा प्रयत्नही करू शकतो. परंतु ती मनुष्य ‘बोकडाचा बळी देणे’ या कृतीकडे जर ‘उपाय’ म्हणून बघत असेल (तिला ‘अनुभव’ घ्यायचाच असेल) आणि जर कदाचित तिच्याकडे तिच्या समुदायातील कुणाकुणाच्या पूर्वानुभवाचा साठा असेल तर ती ती कृती करेल. कदाचित त्याविषयी साशंक असूनही करेल. या उदाहरणात आणखी एक उपमुद्दा आणून पाहू. औषधनिर्मितीदरम्यान (क्लिनिकल ट्रायल्स) प्राण्यांवर प्रयोग केले जातात आणि त्यात प्राणी दगावतात. आता यात हेतू संशोधनाचा आहे आणि प्राण्यांचा वापर जरी केला जात असला तरी त्यामागे काही विवेक आहे, ते अकारण केलं जात नाही, ‘मारणं’ हा हेतू नाही असा खुलासा करता येईल. परंतु ‘निष्पाप प्राण्याचा मृत्यू’ हा जर अंतिम निर्णायक मुद्दा असेल तर तो उरतोच. मग ‘ज्या मृत्यूतून काही निष्पन्न व्हायची शक्यता असते ते मृत्यू स्वीकारार्ह आणि ज्यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही ते मृत्यू स्वीकारार्ह नाहीत’ अशी वर्गवारी करावी का? अशी वर्गवारी करणं हा वैज्ञानिक नीतीचा एक भाग मानावा का? ‘साध्य’ आणि ‘साधन’ या अनुषंगाने पाहता आधुनिकतेच्या इतरही काही आयामांबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर विवेकापुढे आव्हान उभं राहतं. हे आव्हान विचार-कृतींच्या निर्णयनाचं आव्हान आहे. माणसाला सतत निर्णय घ्यावे लागतात. रोजच्या जगण्यातल्या लहान-सहान निर्णयांपासून राज्यव्यवस्थेच्या, न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत ही एक मोठी मालिका आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षातील आव्हानांशी जोडलेली असल्याने मूल्यसंकल्पनांशी तिचा संघर्ष होत राहतो. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस तिच्या तिच्या क्षमतेनुसार शोधते आणि विविध विचारदृष्टींच्या परिप्रेक्ष्यात त्या उत्तराचं मूल्यमापन केलं जातं. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून एखादा विद्यार्थी मंदिरात डोकं टेकतो, एखादं जोडपं ‘मूल होऊ दे’ म्हणून देवापुढे नवस बोलतं, कुणी व्रत ठेवतात, ईप्सित साध्य व्हावं म्हणून कुणी उपास धरतं, कुणी फार काही न करता बसल्या जागी हात जोडतं. याच मालिकेतील एक उदाहरण असं असू शकेल की जिथे कुणाला हताश, निराश वाटलं आणि हात जोडावेसे वाटले तरी ते आपण स्वीकारलेल्या निरीश्वरवादाच्या विरोधी होईल म्हणून ते केलं जाणार नाही. एखादं उदाहरण असं असेल की जिथे एखादीला काहीही झालं तरी हात जोडावेत किंवा देवा-धर्मासंबंधीचं एखादा कर्मकांड करावं असं अजिबात वाटणार नाही. इथे एक लक्षात घेऊ की ‘विवेक’ हा निकष केवळ देव-धर्म, श्रद्धा, भक्ती या संदर्भातच लागू होतो असं नाही. आपले परस्परसंबंध, त्यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये माणसांच्या वृत्तींमुळे येणारे अडथळे, समाजजीवनातील अनेक प्रश्न या सगळ्यातही ‘विवेक’ आपली भूमिका बजावत असतो. व्यक्तिगत पातळीवर विचार करता नीती-अनीतीबाबतचे माझे विचार काय आहेत, ते तसे का आहेत, माझ्या राजकीय विचारांची बैठक काय आहे, फेसबुकवरचा माझ्या वावर कसा आहे, पर्यावरणाबाबत मी कितपत सजग आहे, माझे ‘कंझंप्शन पॅटर्न्स’ कसे आहेत, याही बाबतीत ‘विवेका’चे निकष लावता येऊ शकतात.

मग हे निकष काय आहेत? तर ते उदाहरणागणिक वेगवेगळे आहेत, ‘परिस्थितीसापेक्ष तारतम्या’वर आधारित आहेत, पण एक प्रमुख निकष ‘वृत्ती कशी घडते आहे?’ हे तपासण्याचा आहे. या संदर्भात काही नेमके मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. विवेकवादाच्या विशुद्ध रूपातील मांडणीपासून थोडं पुढे येत आपण वास्तवाच्या संदर्भात विवेकाचं स्वरूप काय असावं हा विचार करू. –

 • ‘मिश्र आणि सूक्ष्म विचार’ करता येण्याची क्षमता हे विवेकाचं एक लक्षण आहे. ‘ईश्वर आहे’ असं म्हणणारा आस्तिक आणि ‘ईश्वर नाही’ असं म्हणणारा नास्तिक यात नास्तिक केवळ नास्तिक आहे म्हणून प्रागतिक, पुरोगामी ठरतो का? आस्तिक केवळ आस्तिक आहे म्हणून प्रतिगामी ठरतो का? तर नाही. अशा मूल्यमापनासाठी इतर बर्‍याच निकषांचा विचार करावा लागतो. हा विचार करता येणं, तशी वृत्ती घडणं हाच मुळात ‘विवेक’ आहे.
 • ज्या विचारांबाबत/कृतींबाबत विवेकी/अविवेकी या स्वरूपात निर्णय करता येत नाही तिथे निर्णय देण्याचा अट्टाहास टाळून त्या विचार/कृती अधिक वैचारिक स्पष्टतेसाठी/आकलनातील वाढीसाठी खुल्या ठेवणं ही विवेकी कृती आहे.
 • श्रद्धेबाबत आपण एक लक्षात घेऊ की ‘श्रद्धा’ – अशी एक मनोभूमिका, मनोवस्था जिथे प्रश्न करणं शक्यच नसतं, जी मूल्यमापनाच्या पलीकडे आहे – ही मुळातलीच एक अडचण आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेद करण्याची व्यावहारिक पातळीवर आवश्यकता भासते हे खरं, पण मुळात या दोन्हींमध्ये फरक नाही. एखाद्या देवावर, विचारधारेवर, बाबावर, पोथीवर, ऐतिहासिक व्यक्तीवर श्रद्धा असणं आणि एखाद्या गोष्टीचा प्रभाव असणं, त्या गोष्टीविषयी कृतज्ञ असणं, त्या गोष्टीची परिणामकारकता जाणवणं यात फरक आहे. मुख्य मुद्दा चिकित्सेची दारं बंद करण्याचा आहेच. ‘श्रद्धा’, ‘निष्ठा’, ‘भक्ती’ यात प्रेमभावनेचाही आविष्कार होत असतो. हा संपूर्ण प्रदेश एका अबोध जाणिवेने झाकोळून गेलेला आहे. हे होणं अडचणीचं आहेच, परंतु मानवी वृत्तीची घडण लक्षात घेता ते मान्य केलं तरी ‘श्रद्धेचा विवेक’ काय असू शकेल? तर स्वतःला विचारलेले काही प्रश्न असू शकतील –
 • आपल्या श्रद्धेविषयी आपल्याला कुणी प्रश्न विचारले तर आपल्याला राग येतो की आपण शांतपणे चर्चा करू शकतो?
 • आपल्या श्रद्धेसंदर्भात कुणी विनोद केला तर आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो का? विनोद आवडला नाही तरी विनोद करण्याला आपला आक्षेप नाही असं आपल्याला वाटतं का?
 • आपण एखाद्या विषयावर चटकन मत देतो की तो विषय समोर आला की त्या विषयाबाबत आपण अभ्यास केला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
 • आपण चिकित्सक विचार करू शकतो का? प्रत्येक विषयाला विविध बाजू असतात आणि विविध बाजूंनी विचार करता यायला हवा हे आपल्याला मान्य आहे का? आपल्या श्रद्धेचा आपल्याला मनःशांतीसाठी उपयोग होत असला तरी त्याचा दूरगामी परिणाम आपल्या चिकित्सक विचारपद्धतीवर (क्रिटिकल थिंकिंग) होतो आहे का?
 • आपल्याला कोणकोणत्या ज्ञानशाखा माहिती आहेत? त्यातील काहींमध्ये आपल्याला रस वाटतो का? आपण नवीन काही शिकायला उत्सुक असतो का?
 • श्रद्धा हे आपलं ‘औषध’ न राहता आपलं ‘मुख्य अन्न’ होतंय का?
 • आपल्या वाचनात विज्ञानविषयक वाचनाचा अंतर्भाव असतो का?
 • मूल्यात्मक निर्णय देताना अधिकाधिक सूक्ष्म विचार करणं (वर म्हटल्याप्रमाणे निर्णय न द्यायचीही तयारी असणं), पुनर्मूल्यांकनाला तयार असणं आणि त्याचबरोबर वैचारिक/सामाजिक/राजकीय लढ्यात एक निश्चित भूमिका घेऊन उभंही राहणं अशी बहुस्तरीय वाटचाल विवेकाला सुरू ठेवावी लागते.

समारोप

संकल्पनात्मक मांडणी, त्यातील वैविध्य आणि झगडे एका बाजूला सुरू राहतात आणि वास्तवात समाज त्याच्या एका आकलनाने, गतीने, सक्तीने त्याची वाट चालत असतो. याची सांधेजोड कशी करावी, आपल्या जगण्याचा पाया काय असावा, कोणत्या वैचारिक बैठकीवर आपल्या व्यवस्था उभ्या असाव्यात हे काही ‘मूळ प्रश्न’ आहेत. शिवाय माणूस, तिचे मनोव्यापार, तिचं समूहजीवन, त्यातील संघर्ष ही निरंतर प्रक्रिया असल्याने तो निरंतर अभ्यासाचा विषय आहे. प्रागतिक विचारदृष्टीने प्रेरित होणं गरजेचं आहेच, परंतु ‘हे तरी’ किंवा ‘ते तरी’ हा आधीच झालेला निर्णय, विचारदृष्टींना ‘कप्पेबंद’ करणं, हे संकल्पना आणि वास्तव – दोन्हींतले बारकावे समजून घेण्याच्या आड येऊ शकतं. विविध विचारदृष्टींमधील कालसुसंगत, समता-न्याय-स्वातंत्र्य या मूल्यांना पोषक असणाऱ्या नेमक्या विचारांच्या समावेशाने, माणूस समूहात राहत असताना निर्माण होणाऱ्या विविध शक्यतांच्या तयारीने सुसज्ज अशी वैचारिक बैठक आपल्यासाठी योग्य ठरते. (समता-न्याय-स्वातंत्र्य यांच्या अर्थाविषयी आणि उपयोजनाविषयी वेगळी चर्चा होऊ शकेल. या मूल्यांचं सारभूत स्वरूप म्हणून ‘शांततामय सहअस्तित्व’ हा शब्द वापरता येईल.) यातून मग आपण विशिष्ट विचारदृष्टीने प्रेरित झालेलो असलो तरी त्या विचारदृष्टीने भारून जाण्याचा टप्पा ओलांडून विविध विचारदृष्टींच्या मूल्यमापनात, त्यांच्या परिणामांच्या अभ्यासात आपल्याला रस वाटू लागतो. विशिष्ट विचारदृष्टीच्या उपयोजनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे, कलहांकडे आपलं लक्ष जाऊ लागतं आणि त्यातून आपण ‘वर्केबल मॉडेल’ तयार करण्याचा प्रयत्न करू लागतो.

विवेकवादापुढचं आजचं आव्हान मोठं आहे. भारतासारख्या देशात, जिथे अद्याप वैज्ञानिक प्रवृत्ती (सायंटिफिक टेंपरामेंट) पुरेशा प्रमाणात घडलेलीच नाही, धर्म आणि ईश्वर या संकल्पना कातडीला चिकटून बसल्या आहेत तिथे तर हे आव्हान फारच मोठं आहे. विवेकाविषयी, विवेकी निर्णयप्रक्रियेविषयी सातत्याने बोलत राहणं, प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार एकत्र येऊन करत राहणं, कृतीकार्यक्रम आखणं याला पर्याय नाही.

या एकूण चर्चेच्या संदर्भाने डॉ. नरेंद्र दाभोळकरांची आठवण होणं अपरिहार्य आहे. साध्या-सोप्या भाषेत लोकांशी जोडून घेत आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. मुख्य म्हणजे त्यांनी उभं केलेलं संघटनात्मक काम खूप व्यापक आहे. त्यांची आणि कॉम्रेड पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या विवेकवादी चळवळीला मोठा धक्का होता. त्याचबरोबर या हत्यांनी, आजच्या सर्वव्यापी उन्मादाने आणि समाजातील एका मोठ्या वर्गाच्या सामाजिक परिवर्तनाबाबतच्या अनास्थेने, विवेकवादी चळवळीची पुढील रूपरेषा काय असावी हा विचार करायलाही भाग पाडलं आहे. ही आपल्यावरची मोठीच जबाबदारी आहे.

ईमेल : utpalvb@gmail.com

अभिप्राय 3

 • तिन्ही भागांमध्ये खूपच सदृश ,विचारपूर्वक आणि मध्यम मांडणी केली आहे.. या लेखांमधून एक फलश्रुती तर नक्कीच होऊ शकते.ती म्हणजे वाचक आस्तिक असो वा नास्तिक त्याच्या विचारांना विवेकवादाची किनार लागायला नक्कीच मदत होईल .. आणि मला असं वाटत वाचक अस्तिकता आणि नास्तिकतेच्या अहंकारापुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल… तिन्ही लेख लिहिल्याबाबद्दल धन्यवाद…👌💐🙏

 • फारच छान विश्लेषण केलं आहे .विषय अवघड आहे ,तात्त्विक आहे, चिंतनाचा आहे, पण सोप्या भाषेत समजून सांगितले आहे.

 • https://www.youtube.com/watch?v=f911UvxLKn8

  या इहवादी अध्यात्म या व्याख्यानमालेतील भागात अस्तिक्य नास्तिक्य श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत विवेचन आहे. विशेषत: टाईम 22.57 नंतर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.