बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.

जहाल निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स यांनी स्वतःची ओळख सांस्कृतिक ख्रिश्चन अशी करून दिली आहे. सांस्कृतिक ख्रिश्चन व्यक्ती निरीश्वरवादी असते. ती व्यक्ती देव/आत्मा/परलोक मानत नाही, येशू/होली-स्पिरिट/याहवे अशी ट्रिनिटी मानत नाही, येशूतील दैवी अंश नाकारते, येशू मेल्यावर पुन्हा जिवंत झाला असे मानत नाही. तरीही, सांस्कृतिक ख्रिश्चन व्यक्ती ही ख्रिश्चन सणांना ऐहिक स्वरूपात साजरे करते, ख्रिसमसला सुट्टी घेते, केक खाते, भेटवस्तू देते-घेते, रोषणाई-सजावट करते. ख्रिश्चन धर्मासाठी म्हणून बनलेल्या जुन्या/नव्या संगीत/चित्रकलेमुळे त्यांना एक अनुभवातीत (ट्रान्सेंडेन्टल) आनंद मिळतो, त्याला ती व्यक्ती आध्यात्मिक अनुभूती म्हणू शकते. त्या व्यक्तीच्या नैतिकतेवर येशूने शिकवलेल्या मूलभूत नैतिकतेचा (अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा, सत्यनिष्ठा, बंधुता, इत्यादी) थोडातरी  प्रभाव असतो. सांस्कृतिक ख्रिश्चनत्वाची अशी ढोबळ व्याख्या गेली दोन-तीनशे वर्षे प्रचलित आहे. त्याच धर्तीवर, भारतातील काही निरीश्वरवादी लोकही स्वतःची ओळख सांस्कृतिक हिंदू अशी करतात.

डॉकिन्स यांनी तशी भूमिका का घेतली याविषयी मला दोन कारणे सुचतात. ख्रिश्चनधर्मियांनी निरीश्वरवादावरील पुस्तके वाचावी, त्याआधीच निरीश्वरवादाविषयी कलुषित मत बाळगू नये, इत्यादी उद्देशांनी ख्रिश्चनधर्मियांचे तुष्टीकरण करण्यासाठी डॉकिन्स यांनी “मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही” हे पटवून देण्यासाठी स्वतःला सांस्कृतिक ख्रिश्चन म्हणवले असू शकेल. दुसरी शक्यता अशी की, ब्रिटनचा अधिकृत धर्म ख्रिश्चन आहे. त्यांची राणी ही ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची सर्वोच्च अधिकारी आहे. तेथील स्थानिक समाज हा एकजिनसीप्रकारे ख्रिश्चन आहे. तेथे धर्म आणि संस्कृती यांच्यातील द्वैत जाणवणे अवघड आहे.

उद्देश काहीही असला तरी सांस्कृतिक धार्मिकत्व ही ओळखच निरर्थक आहे; कारण संस्कृतीची निर्मिती समाज करतो, धर्म नव्हे. नंतर त्या समाजात एखादा धर्म रुळला की त्या समाजात आधीपासून प्रचलित असलेल्या संस्कृतीला तो धर्म आत्मसात करतो. उदाहरणार्थ, इस्टर आणि ख्रिसमस ह्या सणांचा उगम ख्रिश्चन धर्माच्या आधीपासून आहे. ते सण ऐहिक प्रकारे साजरे केले तर त्यांना ख्रिश्चन सण म्हणूच नये. पूर्वीपासून प्रचलित अशा काही रूढी ख्रिसमस आणि इस्टर यांच्या सदृश होत्या, त्या रूढींनाच ख्रिश्चन धर्माने ‘आपले’ म्हणायला सुरुवात केली. भारतातील सांस्कृतिक धार्मिकांच्या बाबतीत ही बाब अधिकच प्रकर्षाने जाणवते. कोणाला भेटताना ग्रीटिंग्ज म्हणून हस्तांदोलनाऐवजी नमस्कार करावासा वाटल्यामुळे, किंवा तिळगूळ, पुरणपोळी किंवा मोदक खाल्ल्यामुळे कोणी स्वतःला सांस्कृतिक हिंदू म्हणवत असेल तर तीच व्यक्ती बिर्याणी खाऊन सांस्कृतिक मुस्लिम ठरेल, विंडचाईम लटकावून सांस्कृतिक रोमन किंवा बौद्ध ठरेल, जीन्स घालून सांस्कृतिक हिप्पी ठरेल, वाढदिवसाला केक खाऊन सांस्कृतिक ख्रिश्चन ठरेल. हे अ‍ॅब्सर्ड आहे, उथळ आहे. तिळगूळ, पुरणपोळी, मोदक हे समाजात आधीपासूनच असणार. हिंदू धर्माच्या कोणत्याही पारलौकिक धारणेसाठी त्यांची निर्मिती झाली नव्हती. साबुदाणा, शेंगदाणा इत्यादी उपासाचे अन्नपदार्थ भारताबाहेरून आलेले आहेत. कोणताही धर्म सुरू होण्यापूर्वीही बहिणींना भावांवर प्रेम वाटत असे. भावावर प्रेम व्यक्त करण्यासाठी राखीपौर्णिमेची वाट पाहणार्‍या सांस्कृतिक हिंदूपणापेक्षा, बहिणीने कोणतेही निमित्त/मुहूर्त न शोधता, वाटेल तेव्हा भावाविषयी प्रेम व्यक्त करणे अधिक मुक्त आहे. तिळगूळ, पुरणपोळी, मोदक, बिर्याणी, केक हे कधीही खाता येतात. आता औपचारिक (फॉर्मल) प्रसंगांतही जीन्स घालता येते ते हिप्पींच्या संस्कृतीशी विपरीत आहे.

२+२=४ हे सर्वप्रथम अगदी हिटलरने सिद्ध केले असते तरीही, २+२=४ मान्य केल्याच्या कारणामुळे कोणी आपोआप नाझी ठरले असते असे नाही. ते नाझींनी सांगितले असते तरी, ‘ते नाझींनी सांगितले’ या कारणामुळे ते आपल्याला पटले असते असे नाही. २+२=४ या सत्याचे आंतरिक स्वतोमूल्य (इंट्रिन्झिक व्हॅल्यू) आपल्याला मान्य असते. म्हणूनच आपण ते स्वीकारलेले असते. त्याचप्रकारे, रक्षाबंधन, मोदक, धोतर, इत्यादींना स्वीकारणार्‍या निरीश्वरवाद्यांनी त्या रूढी/अन्न/वस्त्र ह्यांना त्या रूढी/अन्न/वस्त्र ह्यांच्या आंतरिक स्वतोमूल्यामुळे स्वीकारलेले असते, त्या रूढी/अन्न/वस्त्र ह्यांच्या धार्मिक ओळखीमुळे नव्हे.

धर्माशी जोडलेले ऐहिक संस्कृतीचे श्रेय निरीश्वरवाद्यांनी जर त्या धर्माला दिले तर त्या धर्माच्या पारलौकिक धारणेलासुद्धा अप्रत्यक्षपणे प्रतिष्ठा मिळू शकते.  संस्कृतीमध्ये जसा उत्सव असतो तशी सतीप्रथा असते आणि चातुर्वर्णसुद्धा संस्कृतीचा भाग असतो. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी निरीश्वरवाद्यांनी स्वतःची ओळख ‘सांस्कृतिक धार्मिक’ अशी सांगू नये असे मला वाटते.

मानव विकसित होत आहे, तो राजेशाही नाकारून लोकशाही स्वीकारत आहे. विकासाचा केन्द्रबिंदू मानव असला पाहिजे ह्यासाठी, चांगले जीवन जगण्याची नियमावली तो विकसित करत आहे.  संसद, विधानसभा अशी कायदेमंडळे, संविधान, न्यायालये, ह्यांची अंमलबजावणी करणारी सरकारे तो विकसित करत आहे. हे करत असताना जुन्या कालबाह्य नियमांची मानवाला गरज राहिलेली नाही. एका अनिष्ट प्रथा आहेत, सोबतच अनिष्ट नसणाऱ्या प्रथा आहेत.

बहिणीने भावाला ओवाळावे, त्याच्या हातात राखी बांधावी आणि त्याबदल्यात भावाने तिला संरक्षणाची हमी द्यावी. मग कायदेमंडळे आणि न्यायालये यांची भूमिका काय? बहिणींचे संरक्षण करण्यास ते असमर्थ आहेत का? राखी न बांधता संरक्षण करणे शक्य नाही का? विकसित मानवला एवढी साधी समज नाही का?

धर्म म्हटला की एखादा ग्रंथ येतो, एखादा महापुरुष, गेला बाजार एखादी पौराणिक अथवा ऐतिहासिक वास्तू ह्यांचे उदात्तीकरण अपरिहार्य बनते.

लक्षात घ्या, “धर्म हा ईश्वरी कल्पनांना, श्रद्धांना, अंधश्रद्धांना, अनिष्ट रूढी, परंपरांना संरक्षित करतो म्हणून कोणत्याही रूपातील धर्म स्पष्टपणे आणि जमले तर जाहीरपणे नाकारावा.”

संघटन

बुद्धीला प्रमाण मानणारा असा मानवी समाज, जो देव-धर्म-पंथ-जातीपाती यांपलीकडे जाऊन विचार करू शकतो यांची एक ‘रचनात्मक समाजशक्ती’ उभारावी या दिशेने ‘ब्राईट सोसायटी’तर्फे आम्ही प्रयत्न केले. राज्यात, देशात आणि जगभरात अश्या अनेक संघटना आहेत, ज्यांनी असे विवेकी मानवांचें संघटन उभे केले आहे. आपणांस उमजलेले सत्य जगासमोर निर्भीडपणे मांडता आले पाहिजे. उंबरठ्याबाहेरील जाहीर भूमिकेसाठी अश्या संघटनात्मक कामाची गरज असते. एखादी भूमिका ज्यावेळी वैयक्तिक पातळीवरून सामाजिक पातळीवर मांडण्याची गरज भासते त्यावेळी संघटनात्मक शक्ती त्या भूमिकेला अधिक गतिमान करते.

एका बाजूस धर्माच्या नावाखाली मानवाचे संघटन करणे चालू आहे, तर दुसरीकडे जातींचे संघटन चालू आहे. खरं म्हटलं तर धर्म-जातींचे संघटन तुलनेने सोपे असते; कारण फक्त अमुक एका जातीत अथवा धर्मात जन्माला आलात ह्या एकमेव निकषावर तुम्हाला त्या संघटनेत सामील केले जाते.  त्यामुळे जातीच्या नावाने निघणारे करोडोंचे मोर्चे आणि भरगच्च धार्मिक संमेलने ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या सबलीकरणासाठी अडथळा आहेत. हल्ली जातींना ‘समाज’ शब्द वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे. ते चूक आहे; कारण समाज एक प्रगल्भ संकप्लना आहे. जसे की, मानवी समाज, इत्यादी. असो.

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांसाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज का निर्माण झाली? ते व्यासपीठ आणि संघटन कसे उभे केले? आणि अश्या संघटना उभ्या करून रचनात्मक कार्य कसे करता येईल ते थोडक्यात समजून घेऊ.

ऑगस्ट २०१३ ला डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. ही घटना देशातील बुद्धिप्रामाण्यवादी-विवेकी लोकांसाठी धक्कादायक होती. नंतर शृंखलित पद्धतीने देशात (महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू) आणि शेजारी बांगलादेश, पाकिस्तान येथील मुक्तचिंतक मिळून ११ जणांच्या हत्या करण्यात आल्या. एका बाजूने अश्या निर्घृण हत्या आणि दुसऱ्या बाजूस थेट राजकीय प्रतलावरील उन्मादी वातावरण! सोबत ज्येष्ठ राजकीय नेत्यांकडून केली जाणारी अवैज्ञानिक वक्तव्ये – जसे की गणपतीची प्लास्टिक सर्जरी, बदकाच्या पोहण्याने ऑक्सिजननिर्मिती, मोराचे अश्रू पिऊन लांडोरीने अंडी घालणे. एकुणात बुद्धिप्रामाण्याशी फारकत घेतल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. त्यात सोशल मीडियावरील सुमारांची सद्दी भरीस भर टाकत होती.

या पार्श्वभूमीवर मुक्तचिंतकांमध्ये संवाद वाढवणे, तसेच तुम्ही एकटे नसल्याची जाणीव करून देणे गरजेचे होते. बहुतेक संघटनात्मक कामात हे होत असते. पण जसें समविचारी लोकांशी संवाद वाढवणे महत्त्वाचे, तितकेच समांतर पद्धतीने विरोधकांची धार बोथट करणे महत्त्वाचे असते. यातून बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ, स्वतंत्र संघटन उभे करण्याची गरज निर्माण झाली. परीघावरील भूमिका घेणाऱ्या अनेक संघटना कार्यरत होत्याच पण ज्याला कोअर आणि स्पष्ट भूमिका म्हणतो अश्या संघटनेची गरज होती.

त्यासाठीचा कृतीकार्यक्रम तयार केला, त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

१) बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य ह्या विषयावर जाहीर आणि स्पष्टपणे भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींची एक मूलभूत समिती बनवून. प्रथम अंतगर्त चर्चा, वाद-संवाद, ध्येय आणि उद्दिष्टांवर एकमत घडवून आणणे.
२) महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आणि भारतातील प्रमुख शहरांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथल्या समविचारी व्यक्तींशी संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करणे.
३) प्रभावशाली व्यक्तींना भेटून त्यांनीसुद्धा या विषयांवर जाहीर भूमिका घ्यावी असा आग्रह धरणे. त्यात लेखक, वृत्तपत्रे, तसेच टीव्ही चॅनेल्सचे संपादक, सिनेसृष्टीतील कलाकार असे अनेकजण सामील करून घेणे.
४) सोशल मीडियावर ज्यांना हजारोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत, त्यांचा मार्फत बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी करणे
५) विरोधकांच्या भेटी घेऊन त्यांची धार बोथट करणे. जमेल तसे गैरसमज दूर करणे. इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, विरोधकांशी संवाद करण्याचे सूत्र मात्र अनेक समविचारी मंडळींच्या पचनी पडलेले नाही असे जाणवले कारण त्यामुळे अनेक आरोपांना, संघर्षाला सामोरे जावे लागले.
६) नास्तिक मेळावे आणि परिषदा यांचे आयोजन
७) पुस्तक व विशेषांक प्रकाशन
८) सोशल मीडियावर सातत्यपूर्ण लिखाण
९) संघटना आर्थिकदृष्ट्या सबळ असावी यासाठी गुणवत्तेची हमी. समाजातील विवेकी लोकांनी आम्हाला सढळ हस्ते आर्थिक मदत केली आहे. भविष्यात मदत करण्यासाठी आश्वस्त केले आहे.
१०) तरुणांचा सहभाग. तरुणांना सोबत ठेवण्यासाठी नवनवीन विचारांची आकर्षक मांडणी आम्ही सतत करत असतो.
११) संघटनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड.
१२) शासकीय नोंदणी. संघटनबांधणी हा एक निरंतर प्रवास असतो. नेतृत्वाच्या मर्यादा या संघटनेच्या मर्यादा होऊ नयेत यासाठी सदैव तत्पर राहावे लागते.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर; बुद्धिप्रामाण्यवादी विचारांना पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. ही मशागत करण्यात जसे आगरकर, कुरुंदकर यांची लांबरुंद परंपरा आहे तसे काही नियतकालिकांचें योगदानसुद्धा वादातीत आहे. या नियतकालिकांच्या यादीत ‘आजचा सुधारक’चे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. संघटनात्मक बांधणी करताना गेल्या ६-७ वर्षांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे आम्ही दौरे केले, समजातील विवेकी-विचारी लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या, तेव्हा तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या वाचनामध्ये ‘आजचा सुधारक’चा उल्लेख वारंवार येत होता. हा अनुभव विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सर्वत्र सारखा होता.

संघटन उभे करताना विचारवंत (think tank) आणि कृतिशील सहकारी या दोन्ही घटकांचे महत्त्व असते. सोबतच पार्श्वभूमी आणि आर्थिक साहाय्य हे घटकसुद्धा साहाय्यभूत ठरतात. मुळातच बुद्धिप्रामाण्यवादाची गरज संपूर्ण मानवी समाजाला आहे. वेळ, श्रम आणि पैसे अशा संसाधनांचे अपव्यय माणूस टाळू शकतो. आणि म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद हा मानवाच्या हिताचा ठरतो. त्यामुळे वरील मुद्दे हे भाषेच्या, प्रांताच्या चौकटीपलीकडील आहेत. याचे व्यवस्थित आणि सकारात्मक विवेचन समाजासमोर नेले पाहिजे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ म्हणजे काही नकारात्मक किंवा समाजाचे वैगुण्य आहे हा जो गैरसमज पसरला आहे त्याचे तार्किक युक्तिवादाने खंडन केले पाहिजे. संघटन करत असताना मूळ भूमिकेशी प्रतारणा न करता, बेरजेचे गणित मांडता आले पाहिजे. त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, संशयवादी, जडवादी, इहवादी, अज्ञेयवादी, मुक्तचिंतक, मानवतावादी अश्या आजूबाजूच्या व्यक्तींना – समूहांना सोबत घेतले पाहिजे.

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हा विषय सतत चर्चेच्या प्रतलावर राहण्यासाठी जाहीर उपक्रम, जसे नास्तिक मेळावे; की जिथे समविचारी मंडळींच्या गाठीभेठी होतात, नास्तिक परिषदा; की जिथे जाहीरनामा प्रसिद्ध करता येतो, आखीवरेखीव कृतिकार्यक्रम तयार करता येतो, वर्तमानपत्रात संबंधित लेख प्रकशित करणे, या विषयावरील लेखमाला, विशेषांक, पुस्तक प्रकाशित करणे, सोशल मीडियावर लिखाण, मीम्स, व्हिडिओ क्लिप्स, प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करणे, दूरचित्रवाणीवर मुलाखती देणे अशा अनेक अंगांनी आपण हा विषय चर्चेच्या प्रतलावर आणू शकतो.

वर म्हटल्याप्रमाणे, संघटनात्मक काम ही उंबरठ्याबाहेरील जाहीर भूमिका असते. त्यात आपला हेतू तर स्वच्छ हवाच, सोबत वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या आणि नव्याने येणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना व्यासपीठ मिळवून देणे हे काम कौशल्याने करावे लागते. दरम्यान आपला विरोधक कोण आहे त्यानुसार साधने (tools) वापरावी लागतात. धरणे, मोर्चे, उपोषणे, आंदोलने, सविनय कायदेभंग ही साधने जवळपास कालबाह्य झाली आहेत. नव्याने आलेले सोशल मीडिया, समूहांत जाऊन प्रबोधन करण्यापेक्षा त्या समूहाच्या निर्णयक्षम व्यक्तीला आपलं म्हणणं समजावून सांगणे कमी वेळात होण्यासारखे काम असते. समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आपली भूमिका समजावून देणे व त्यांना अशी भूमिका जाहीरपणे घेण्याची विनंती करणे हेसुद्धा एक प्रभावी साधन आहे. राजकारणी, लेखक, सिनेकलाकार अशा समाजमान्य घटकांमार्फत आपण बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्याचा विचार समाजापर्यंत पोचवू शकतो.

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य हे समाजात मागणी असणारे मूल्य आहे. संघटनेच्या माध्यमातून त्याचे योग्य ‘विपणन’ करणे ही विवेकवादी विचारवंतांची जबादारी आहे. तंत्रज्ञानयुक्त, आर्थिक सक्षम आणि तरुणांचे संघटन किंवा नव्या पिढीस आकर्षित करणारे व्यासपीठ म्हणून आपण असे संघटन घडवू शकतो.

हे सर्व करत असताना, कुठल्याही प्रामाण्यात अडकणे हिताचे नसते. मग तो भगतसिंगसारखे जाहीर नास्तिक्य असेल, रसेलचे, आंबेडकरांचे किंवा कुरुंदकरांचे एखादे विवेचन असेल, त्याची चिकित्सा झाली पाहिजे. ते सहन करण्याची सजग प्रवृत्ती पाहिजे.

हे सर्व कशासाठी?

उत्तर आहे, बुद्धिप्रामाण्यवाद थेट मानवाच्या नफ्याशी संबंधित आहे. वेळ, ऊर्जा, पैसे यांची थेट बचत.

आधुनिक मानवाला ईश्वरासारख्या कपोलकल्पित घटकांची गरज उरली नाही. धर्म-जातीच्या पलीकडे विचार करणारा मानव अधिक प्रगल्भ असतो. बुद्धिप्रामाण्यवादाने घेतलेले निर्णय श्रेष्ठ आणि मानवास हितकारक असतात. थोडक्यात, देव-धर्मासारख्या निरर्थक घटकांचा मानवाने त्याग करावा. आणि एक सुंदर इहवादी जीवन जगावे ही प्रेरणा अशा कामांतून मिळते. आपल्या देशाचे संविधान बुद्धिप्रामाण्यवादास अनुकूल आहे. त्यात व्यक्तिस्वातंत्र आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. परंतु ‘ईशनिंदा बंदी’सारखे काही ‘कालबाह्य’ कायदे; जसे की 295A आणि 298 ही कलमे पूर्णपणे रद्द होणे आवश्यक आहे, तर कलम 153A मध्ये सुधारणा आवश्यक आहेत. अशा अनेक दीर्घकालीन नियोजनांसाठी संघटन अत्यावश्यक आहे.

त्यासाठीची शासकीय नोंदणी आणि सरकारी यंत्रणेची या विषयातील निष्क्रियता याबद्दल स्वतंत्र लेख लिहिता येईल.

वर म्हटल्याप्रमाणे, बुद्धिप्रामाण्यवादाने घेतलेले निर्णय श्रेष्ठ असतात. आपला देश एक धर्मनिरपेक्ष देश आहे, आर्थिक परिस्थिती बेताची आहे, नागरिकांना चांगले जीवन जगण्यासाठीची पुरेशी संसाधने नाहीत. राष्ट्रउभारणीसाठी लागणारे रस्ते, इस्पितळे, शिक्षण असे पायाभूत घटक अपुरे आहेत. अश्या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था जर देव-धर्म, सिंहस्थ-कुंभमेळे, मंदिरे अश्या निरर्थक गोष्टींवर संसाधने खर्च करीत असेल तर अश्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादी नागरिकांनी अधिक सजग झाले पाहिजे. बुद्धिप्रामाण्यवादाचा संघटित लढा उभा केला पाहिजे. राजकीय नेतृत्वापर्यंत आपली भूमिका पोहोचवली पाहिजे. फक्त भावनिक हिंदोळ्यावर समाजनिर्मिती होत नसते. चांगले जीवन कसें असावे यासंबंधी बॅट्रॅन्ड रसेल यांचे वाक्य उद्धृत करावेसे वाटते: “The good life is one inspired by love and guided by knowledge. Neither love without knowledge, nor knowledge without love can produce a good life.”

ईमेल: kumar.nage1@gmail.com

अभिप्राय 10

 • खूप छान मांडणी आणि सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितले आहे

 • अाज ह्या विचारांची मानव समाजाला नितांत गरज आहे. आपण ह्याची मांडणी फारच कुशलतेने केलेली आहे . वाचुन आनंद झाला . आपल्या कडुन असेच कार्य घडो हिच ईच्छा !

 • अत्यंत सुंदर लेख. पण धरणे, मोर्चे, उपोषण कालबाह्य झाले आहेत, हे पटलं नाही. जमल्यास स्पष्टीकरण द्यावं.

  • प्रतिक, प्रतिक्रियेचे स्वागत!
   विद्यमान राज्यकर्ते पुरेसे प्रगल्भ नाहीत. पुरेशी संवेदनशीलता नाही.
   त्यामुळे धरणे मोर्चे आंदोलने यातील वेदना त्यांना बोचत नाही.
   सोशल मीडिया, संबंधित व्यक्तींच्या गाठीभेटी , प्रिंट -इलेक्ट्रॉनिक मीडिया याचा वापर अधिक प्रभावी ठरत आहे .

 • बुद्धीप्रामाण्य वादा ला अनुसरून सामान्य लोकांन क़रिता
  नैतिक नियमावली असणे तरुण आणी किशोरवायिन समाजास आवश्यक असावे.

  • राजेंद्र सर, प्रतिक्रिये बद्दल आभार!
   विवेकी समाज कोणत्याही देशासाठी asset असतो. विवेकी समाज निर्मितीसाठी शासकीय पातळीवर जाणीवपूर्वक प्रयन्त झाले पाहिजेत ( जे होताना दिसत नाहीत). शाळा, कॉलेजेच्या किशोर/कुमार वयीन मुलांसाठी , अभ्यास क्रमात विवेकवाद “विचार आणि कृती ” स्वरूपात शिकवला गेला पाहिजे.

 • प्रतिक, प्रतिक्रियेचे स्वागत!
  विद्यमान राज्यकर्ते पुरेसे प्रगल्भ नाहीत. पुरेशी संवेदनशीलता नाही.
  त्यामुळे धरणे मोर्चे आंदोलने यातील वेदना त्यांना बोचत नाही.
  सोशल मीडिया, संबंधित व्यक्तींच्या गाठीभेटी , प्रिंट -इलेक्ट्रॉनिक मीडिया याचा वापर अधिक प्रभावी ठरत आहे .

 • लेख बहुतेक सर्व पटला आणि म्हणून आवडला. मला वाटतं धर्म हा संस्कृतीचा भाग समजावा, आणि चांगली आणि वाईट संस्कृती एवढाच भेद करावा. उदाहरणार्थ गणपती निमित्ताने एखादे व्याख्यान एखाद्या सभागृहात होणार असेल आणि त्याचा विषय “समाजासाठी नास्तिकता कशी उपयोगी आहे” हा असेल तर गणपती उत्सव उपचार म्हणून मानायला काही हरकत नाही. पण त्याच उत्सवाच्या निमित्ताने लोक दिवसभर रस्ता अडवून मिरवणूका काढणार असतील तर त्याला विरोध व्हायला हवा. थोडक्यात संस्कृतीचाच वापर संस्कृतीतला निरुपयोगी आणि वाईट भाग काढून टाकता येईल का हे बघायला हवे. संस्कृतीला सरसकट नकार हे शक्य नाही आणि आवश्यकही नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.