कोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती

आतापर्यंत कोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती, सर्व नागरिकांच्या लक्षात आलेली असणार. सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये यासंबंधी भरभरून लिहिले गेले आहे. त्यामुळे, कोरोना महामारी, त्याने बाधित असलेल्यांचे आकडे, त्याची लक्षणे, त्याचे आरोग्यावर, समाजव्यवस्थेवर, अर्थकारणावर, राजकारणावर होणारे परिणाम, तसेच या आजारापासून आपला बचाव कसा करायचा, असे सर्व व या अनुषंगाने अनुलग्न इतर सर्व बाबी सविस्तरपणे चर्चिल्या गेल्या आहेत. सबब, त्या तपशीलात मी जाणार नाही. पण, हे सर्व डोळ्यांसमोर आणले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, संपूर्ण प्रशासन यंत्रणा, मग ते प्रशासकीय अधिकारी असोत, राज्यकर्ते असोत, आरोग्यसेवा देणारे, कायदा-सुव्यवस्था राखणारे, स्वच्छताकर्मचारी इत्यादी असोत, सर्वच आपापल्या ताकतीने ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ह्यातील अतिशय महत्त्वाची बाब म्हणून, नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडणे, वारंवार हात धुणे, अनावश्यक संपर्क टाळणे, गर्दी न करणे, एकमेकांमध्ये ठराविक अंतर राखणे, यांसारखे अगदी सहज सोपे पण परिणामकारक उपाय सुचवत आहेत. पण हे सर्व असतानाही फक्त भारतापुरतेच बोलायचे ठरवले तर, या पाच महिन्यांत, संसर्गाचे आकडे दिवसागणिक आणि प्रचंड वेगाने वाढतच गेले आहेत. या वाढीला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे ‘देव आणि धर्म’.

साथ-नियंत्रणाच्या आघाडीवरचे साधेसरळ, सोपे उपाय लोकांनी पूर्णपणे न स्वीकारल्यामुळे, या साथ-नियंत्रणाच्या दृष्टीने अपेक्षित यश प्रशासनाला मिळालेले नाही. जे जे कटाक्षाने टाळायला पाहिजे, अगदी तेच बहुसंख्य समाजाकडून होत आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात, कोरोनासंदर्भात लॉकडाऊनचा पर्याय शासनाने निवडल्यापासून खरंतर, देव-धर्म आणि त्या अनुषंगाने येणारे सणवार, उत्सव, गाठीभेटी, यात्रा-जत्रा, समूहाने एकत्र येणे आणि ते सण साजरे करणं, इत्यादी पूर्णपणे बंद होणे अपेक्षित होते. पण लोकांनी देव-धर्म, श्रद्धा, परंपरा वगैरेंना प्राधान्य दिल्यामुळे संसर्गाचा धोका वाढला, वाढतोय व पुढेही वाढेल. दरम्यान, लोकांची असली हट्टी मानसिकता बघून मग प्रशासनालाही लोकांच्या धार्मिक, श्रध्दाळू पारंपरिकतेसमोर नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. आणि लोकानुनयास्तव, प्रशासनाची उर्जा निव्वळ विधायक कामांसाठी खर्च होण्याऐवजी, धार्मिक कार्यक्रमांसाठी नियमावली बनवणे, सदर नियमावलीची अंमलबजावणी करणे, तसेच सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे ह्यात वाया जाऊ लागली.

कोरोना संसर्गाच्या शंका आणि शक्यता, दोन्ही, जर मुळापासूनच नाहीशा करायच्या असतील, तर अनावश्यक सार्वजनिक वावर आणि गर्दी पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. या अनावश्यक सार्वजनिक वावरांमागील कारणांपैकी, ‘देव आणि धर्म’ हे प्रमुख कारण आहे. आपली समाजव्यवस्था जर ‘देव आणि धर्म’ पूर्णपणे नाकारणारी असती, तर किती बरे झाले असते! संपूर्ण समाजच जर बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक असता, तर प्रशासनाची कितीतरी क्षमता व ऊर्जा सत्कारणी लागली असती हे मान्य करावेच लागेल.

देव-धर्म आणि आनुषंगिक कार्यक्रमांमुळे समाजात मोठी आर्थिक उलाढाल होते, आणि त्यासाठी ते प्राधान्याने सुरू करावेत, यासाठी सर्वच राजकीय आघाड्यांवर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. पण मुळातच ही मांडणी खोडसाळपणाची आहे. साखर कारखान्यांमुळे सभोवतालच्या ग्रामीण भागात मोठी उलाढाल होते, पण त्यावेळी, पीक म्हणून ऊस व उत्पन्न म्हणून साखर, यांचे दुष्परिणाम दुर्लक्षित केले जातात. दारूमुळे राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर पडते, हीसुद्धा अशीच खोडसाळ मांडणी आहे. यात, आरोग्य व समाजव्यवस्थेवर दारूचे होणारे परिणाम सोयीने दुर्लक्षित केले जातात. अगदी तसेच, देव-धर्मामुळे आणि आनुषंगिक कार्यक्रमांमुळे समाजात मोठी उलाढाल होते ही मांडणी अशीच दिशाभूल करणारी आहे. कारण, मोठी आर्थिक उलाढाल होत असली तरी, ह्या अशा प्रकारच्या धर्माधारित सार्वजनिक कार्यक्रमांपोटी वाया जाणारी सामाजिक उर्जा, या विसंगत निरुपयोगी बाबींपोटी होणारा प्रशासकीय अपव्यय, ह्याद्वारे समाजाचे होणारे एकंदरीत शोषण इत्यादींमुळे सतत होणारे समाजाचे व पर्यायाने देशाचे प्रचंड नुकसान आपण खिजगणतीतही धरत नाही. हेच जर आपला समाज बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक असता, तर प्रशासनाला आपली ऊर्जा विधायक कामावर खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळाले असते.

या महामारीच्या नियंत्रणासाठी ज्या कायद्याच्या आधारे कारवाई केली जाते तो कायदासुद्धा सन १८९७ चा ‘साथ नियंत्रण कायदा’ आहे. त्यालासुद्धा प्लेग या साथीच्या आजाराची पार्श्वभूमी आहे. त्या काळात साथ नियंत्रणात येत नव्हती तेव्हा ब्रिटिश अधिकारी सक्तीने वागले. त्यांच्या त्या कडक कारवाईमुळे देव-धर्म, सोवळे-ओवळे भ्रष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. तेव्हाच्या सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. रँडच्या खुनालासुद्धा अशीच पार्श्वभूमी आहे. चाफेकरांच्या आत्मवृत्तात तसा उल्लेख आहे. हा संदर्भ देण्याचा उद्देश इतकाच की, जवळपास १२५ वर्षानंतरसुद्धा संसर्गजन्य आजारात आपण देव-धर्म आणि आनुषंगिक कार्यक्रमांना घट्ट धरून आहोत. माणसाची प्रगती झाली ती विज्ञान-तंत्रज्ञान या अंगाने पण देव-धर्म आणि श्रद्धा याबाबतीत तो अजून तिथेच आहे असं वाटतं.

या चार महिन्यांतील घटनाक्रम बघता, अगदी सुरुवातीच्या काळातील तबलीघी जमातीवर घेतला गेलेला कोरोनाच्या प्रसाराचा आळ, ते अगदी हल्ली आषाढीची वारी व सार्वजनिक गणेशोत्सव, या दोहोंबाबत समाजाने आणि राज्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिका निश्चितच विचार करण्यास भाग पडणाऱ्या आहेत. आपल्या समाजाच्या देवभोळेपणामुळेच ह्या सार्‍या गोष्टी घडू शकल्या. आपल्या समाजाचे बुद्धिप्रामाण्यवादी नसणे, आणि त्याउपर, कोरोनाच्या आपात्कालीन परिस्थितीतही देव-धर्म आणि आनुषंगिक कार्यक्रमांना प्राधान्य देणे, हेच आपल्या बहुसंख्य धार्मिक व राजकीय नेत्यांना, तसेच प्रसारमाध्यमांना अशी आततायी भूमिका घेण्यास उद्युक्त करते.

अभिप्राय 4

  • देवळे, मशिदी, चर्च बंद झाल्या. देव आपल्याला वाचवू शकत नाही हे लोकांना जाणवायला लागते होते.प्रशासनाने यात भर घालून ही भावना वाढवायला हवी आहे. उदा. हट्टाने देवदेव करणाऱ्याला , गच्ची मधे जाऊन सार्वजनिक नमाज पठण करणारे करोनाचे शिकार झाले, अशा बातम्या द्यायला हव्यात.
    अथवा भासिक अभिषेक, पूजा सुरू करून देवस्थाने आणि शासनाने चांगला महसूल गोळा करायला हवा.

  • Very True , fully agree sir

    our festivals and wrong beliefs force us not to take thing scientifically .

    People still beleive their God in temple will save hem from this pandamic.

  • Well penned. Very true – More awareness required in people and I think ‘Sudharak’ and people like you together are putting efforts towards it.

  • Mr.Mahajan, I read ur article. I fully agree with u the behaveir of some of people during the present situation of covid19 is not tolerable. I do agree it is not correct to demand opening of temples, masjids etc. But it doesn’t mean that there is no God. God is nothing, but a devine power which maintains the universe and running the afairs of whole world. ( there are some spelling mistakes, because I used to give dectetions and my stenografer was taking care)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.