हिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला

(एका हिंदू नास्तिकाचे धर्माच्या रक्षणाकरिता पुढे येण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवाद्यांना आवाहन)

“कां हो…? देवाचे अस्तित्व तुम्ही नाकारता असे म्हणता… पण तुमच्या घरात देवघर आहे; तुमच्या लग्नाच्या वेळी होम हवन केले होते, मुलाची मौंज केली, मरण पावलेल्यांचे श्राद्ध केले, दसरा दिवाळी तुम्ही साजरी करता, एकादशी,चतुर्थीला लक्षात ठेवून उपासाच्या नावाखाली वेगवेगळे पदार्थ करता. एवढेच कशाला, भक्ती पंथातील अभंगाच्या भावनांमध्ये तुम्ही सुद्धा (अभंग / गाण्यांच्या गुणवत्तेप्रमाणे) चिंब होता; नागपुरातल्या सगळ्या ऐतिहासिक देवळांमध्ये लोकांना घेऊन जाता आणि हा आपला वारसा कसा आहे, हे सांगत फिरता. मग हे नास्तिक असल्याचे नाटक कशासाठी…?”

देवाचे अस्तित्व नाकारणार्‍यांना आणि धर्माच्या स्वरूपापुढे प्रश्नचिन्ह उभे करणार्‍या माझ्यासारख्या सगळ्यांनाच ह्या प्रश्नांना सामोरे जावे लागते; पण तथाकथित आस्तिकांनी विचारलेल्या ह्या प्रश्नांचे परिणामकारक असे उत्तर थोडक्या शब्दात द्यायचे झाले तर असे म्हणावे लागते की तर्काच्या आधारावर देवाला नाकारले जाऊ शकते, देवळाला नाही. एक मात्र आहे, अनेक ख्रिस्ती लोकांना ज्याप्रमाणे नास्तिक असल्यामुळे त्रास सहन करावा लागला, त्यांचे बळी सुद्धा गेले, तितक्या कठोरपणे नास्तिकाला वागविण्याची पद्धत अजुनतरी आपल्या धर्मात आणि समाजात नाही; त्याकडे केवळ दुर्लक्ष करून, उपेक्षेने मारण्याची पद्धत आहे. 

पण ह्या प्रश्नांपेक्षा वेगळाच प्रश्न माझ्यासमोर नेहमी उभा असतो. देव नाही… हे तर (माझ्यासाठी) स्पष्ट आहे, (देव,शिक्षा करणारा किंवा संकटातून सोडवणारा म्हणजे तर अजुन हास्यास्पद संकल्पना आहे). तरी एवढा मोठा प्रगल्भ समाज इतका आस्तिक कसा? की लोकांना जे खरोखर वाटते ते त्याबद्दल बोलायला किंवा मांडायला ते कचरतात? की सत्य आणि तथ्य शोधण्यात किंवा मांडण्यात आपला समाज कमी पडतो? 

बहुसंख्य लोक सज्जन असल्यामुळे धर्मासकट कुठल्याही गोष्टीचा चांगला उपयोग करून घेणे हे सामाजिक पातळीवर आपोआप घडते. पण, धर्माचे मूळ स्वरूपही चांगलेच असणार अशी धारणा त्यामुळे निर्माण होते. लग्नकार्ये, उत्सव, नातेवाईकांशी गाठभेटीचे योग अशा चांगल्या आठवणींशी धर्माचा संबंध  जोडलेला असतो; ह्यापलीकडे कुणाला अजुन काय हवे असते? 

सगळे साधारणतः आपापल्या व्यक्तिगत पातळीवरील  सामाजिक वर्तुळात जगत असतात. ह्या वर्तुळांच्या सीमा उल्लंघून अधिक व्यापक विचार करण्याची बहुतेकांची प्रवृत्ती तर नसतेच, पण असे कोणी सूचित केले तर प्राप्त स्थिती (status quo) बदलल्यामुळे काहीतरी नुकसान होण्याचीच शक्यता आहे अशीच प्रतिक्रिया दूरचा किंवा गहन विचार करणे टाळणार्‍यांच्या मनातून होते. समाजात असेच लोक बहुसंख्येने असतात. 

परंतु परक्या धर्माकडे पाहिले, तर (ते) धर्म आणि धर्मावर आधारित (त्यांच्या) बऱ्याच चालीरीती मुळातून वाईट असतात अशी मुख्यतः ह्याच आस्तिक लोकांची उत्कट धारणा असल्याचे सुद्धा जाणवते. असे का होते?… ह्याचे उत्तर मिळावे म्हणून  देव आणि धर्म ह्यांचे मूळ स्वरूप, आणि त्यांच्यात होत गेलेली स्थित्यंतरे; त्यांचा संपूर्ण समाजावर होणारा एकंदरीत परिणाम ह्यांचा  धांडोळा घेतला पाहिजे असे मला वाटते. 

माझ्या लक्षात आलेली पहिली बाब अशी की देव आणि धर्म दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देव (आणि भुते खेते) ह्या संकल्पना निदान दोन तीन लाख वर्षे जुन्या आहेत (कदाचित होमो सेपीएन्सच्याही आधीपासूनच्या). औपचारिक धर्म आणि त्यांत देवांना दिलेले स्थान मात्र मानव स्थिरस्थावर झाल्यानंतरच्या काळापासून, म्हणजे केवळ १०-१२ हजार वर्षांपासून आहेत. मानव लहान लहान टोळ्यांनी भटकत होता त्या काळात त्याच्या देवाची स्थाने सुद्धा स्थिर नव्हती. मुद्दाम कुठल्यातरी मूर्ती तयार करून त्यांचे विशिष्ट इमारतीत अधिष्ठान करणे सतत स्थलांतर करणार्‍या माणसांसाठी गैरसोयीचेच असणार.  त्यापेक्षा, साहजिकच, तो भटकत असलेल्या निसर्गातील प्रभावित करणारे घटकच देवाचे (किंवा भुताचे) रूप धारण करीत असणार. अशावेळी एका टोळीचा देव किंवा भूत, दुसर्‍या टोळीसाठी  देव किंवा भूत असणे शक्य नाही. 

आपल्याकडील गोंड लोकांमध्ये देव हा ‘माहा’देव (म्हणजे ‘माझा’ देव) एवढा व्यक्तिगत होता (हे काही प्रमाणात अजूनही टिकून आहे). अगदी सुरूवातीला ह्या वैयक्तिक नात्यामधे धर्मांच्या मध्यस्थांची  गरजच  नव्हती. पचमढी हे गोंडांचे मूळ स्थान. पण तेथे आता ‘माहा’ (म्हणजे माझ्या) देवाचे हिंदू धर्माच्या प्रभावामुळे ‘महा’ (म्हणजे श्रेष्ठ) देव असे रूपांतर झालेले दिसते. त्यातही ‘बडा’‘महा’देव, ‘गुप्त’ महादेव अशी वर्गीकरणे झाली आहेत.    

वरील आदिम प्रवृतींचा अंश अद्यापही असल्याने लोकांना आजही स्वतःचा वैयक्तिक देव असणेच इष्ट वाटते. आपल्याकडे प्रत्येक कुळाची एक कुलदेवता असते आणि तिच्याबद्दल मनात विशेष आपुलकीचा भाव असतो. तुकोबांची भक्ती पांडुरंगावर… तर मीरेची श्रीकृष्णावर. कोणाचा गजाननावर विश्वास तर कोणाचा गजानन महाराजांवर… त्याशिवाय अनेक देव/ देवता आणि संत / बाबा मंडळी आहेत. मात्र ह्यात एक मेख आहे, ज्यांना भक्तसंप्रदाय असेल तेच केवळ देव किंवा संत वा महात्मे मानले जातात. ज्यांचे समाजात फॅन किंवा भक्त नसतात त्यांना जनमनात फारसे (किंवा काहीच) स्थान नसते. म्हणजेच  देव स्वयंभू नसतो, भक्त असतील तरच तो असतो. वैदिक काळातील इन्द्र, वरुण ह्यां देवतांचे आता भक्त नाहीत. ब्रम्ह, विष्णू, महेश ह्या देवांपैकी ब्रम्हाचे निर्मिती करण्याचे काम संपले असल्यामुळे आता त्याला फार कोणी विचारीत नाहीत. आपल्याकडे ३३ कोटी देवदेवता असल्या तरी त्यापैकी मोजक्याच देवांवर लोकांचा विश्वास असल्याचे दिसते. सारांश असा की देव ही वैयक्तिक गोष्ट असते, ज्याला धर्मामार्फत सामाजिक स्वरूप दिले जाते.

तसे पाहता काही देवांबद्दल आपल्या मनात अविश्वास किंवा घृणा देखील असू शकते का? इजिप्शियन लोकांच्या कुत्रा आणि मांजर ह्यांचा चेहरा असलेल्या देवांबद्दल आपल्याला काय वाटते? हिंदूंना मानवी प्रेषितांनी निर्माण केलेल्या देव किंवा धर्माबद्दल काय वाटते? प्रेषितांच्या अनुयायांना पूर्वीच्या पेगन (आदिवासी) आणि हिंदू देवदेवतांबद्दल काय वाटते? हिंदूंना आदिवासी देवतांबद्दल काय वाटते? ह्याप्रकारे जर तपासून पाहिले तर जे स्वतःला आस्तिक समजतात त्यांचीही देवाबद्दल भावना अतिशय भक्ती, साधारण कुतूहल, मुळीच विश्वास नसणे, आणि त्याही पलीकडे अत्यंत घृणा अशी वेगवेगळ्या पद्धतीची दिसते. थोडक्यात म्हणजे कुठलाही विशिष्ट देव खरोखर अस्तित्वात नसतो, त्याचे स्वरूप भक्तांच्या मानसात (Psyche) असते आणि त्या मानसाप्रमाणे बदलते. पण मग त्याची संकल्पना इतक्या उत्कटपणे बहुतेकांच्या मानसाला आवश्यक का वाटते?

संघटीत, औपचारिक धर्माला अफूची गोळी म्हटले जाते ते उगीच नाही. देव ह्या वैयक्तिक संकल्पनेला ऐतिहासिक काळापासून काही विशिष्ट लोकांकडून संघटित धर्मात आणून सामाजिक आणि राजकीय स्वरूप दिले गेले आहे, आणि दूसरे काही माहिती नसल्यामुळे लोकांच्या मनावर ह्याचा जबरदस्त पगडा बसला आहे. ऐतिहासिक काळापासून सुरू असलेली ही प्रक्रिया संत / बाबा ह्यांच्या बाबतीत आजही घडत असलेली आपण रोज पाहतो. 

हे करण्याचे प्रमुख आणि मूळ (ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत) कारण हे असते की ह्यामुळे वर्चस्व आणि सत्ता स्थापन करता येते. ह्यात संत, बाबा, हयाबरोबरच राजसत्ता भोगणार्‍या ठेकेदारांचे हितसंबंध मोठ्या प्रमाणात गुंतलेले असतात. ह्या गोष्टीला इतर सगळ्या राजकारणाप्रमाणे, एकीकडे वेगवेगळ्या प्रकारचे बाहुबली, जे संख्येने कमी असतात, आणि दुसरीकडे गुलामगिरीची मानसिकता असणारे बहुसंख्य, ज्यांना मोजक्या लोकांचे मोठ्या समाजावर वर्चस्व असणे मान्य असते, हे दोन्ही गट जबाबदार असतात. समाज पुरेसा परिपक्व नसल्यामुळे हे दोन्हीही घटक समाजात ‘आवश्यक’ त्या प्रमाणात पिढ्यांन-पिढ्या अस्तित्वात असतात. शाळेत लहानपणापासून शिकवला जाणारा ‘राजकीय’ इतिहास; सिनेमा आणि लोकसाहित्यातून झळकणारी राजेशाही वा ठाकूरकीचा ‘मोठेपणा’; लहानपणापासून सांगितल्या,ऐकलेल्या राजा राणीच्या गोष्टी इत्यादींमधून समाजात ह्या मानसिकता टिकविण्याचे काम यशस्वीरीत्या होत असते. ह्यात सामान्य माणसांच्या रोजच्या चिंता, हताशा  ह्यांचाही मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जातो.

राजाला देवाचे स्वरूप मानणारा समाज इजिप्तमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी होता (असा समाज आजही आहेच, फक्त त्यांचे देव आणि धर्म बदललेले आहेत). असाच समाज भारतातही पाच हजार वर्षांपूर्वी होता आणि आजही आहे. ह्यात फरक एवढाच झाला आहे की समाजाचे अतिशय शोषण आणि अन्याय ह्या राजकीय कारणांमुळे इजिप्त मधील देवांचे / धर्माचे स्थान कोलमडले आणि स्वरूप ओळखू न येण्याइतके बदलले, तर भारतात समाजाचे शोषण आणि अन्यायाचा भाग कमी असल्यामुळे स्थित्यंतरे इतक्या ढोबळपणे झाली नाहीत. इजिप्त मधील जुन्या विस्मृतीत गेलेल्या धर्मांबद्दल पूर्णपणे न समजलेल्या हीरोग्लिफ (hieroglyphs) लिपीतील साहित्यातून  अंदाज बांधावे लागतात, पण भारतात वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता, भागवत, हे सगळे तत्कालीन मूळ स्वरूपात उपलब्ध आहेच, पण नंतरच्या काळात नवनवीन संतसाहित्य देखील त्याच परंपरेचा भाग म्हणून निर्माण होत आले आहे.

हिंदू धर्मातील स्थित्यंतरांकडे पाहिले तर सर्वप्रथम सनातन धर्माचा उल्लेख करावा लागतो. हा खरा धर्म असून कधीही न बदलणारा, म्हणजे ज्याचा आदि आणि अंत नाही असे ह्याचे स्वरूप आहे असे मानले जाते. ह्या संकल्पनेप्रमाणे धर्म ह्याचा अर्थ ‘गुणधर्म’ – म्हणजे नैसर्गिक प्रेरणा आणि मूलभूत प्रवृत्ती. सृष्टीतील सगळ्या चल-अचल  घटकांना हा धर्म लागू होतो. उदाहरण द्यायचे झाले तर झाडे श्वासात  कर्बाम्लवायू (CO2)घेऊन उच्छवासातून प्राणवायू सोडतात आणि माणसांसहीत सगळे प्राणीजगत श्वासात प्राणवायू घेऊन उच्छवासातून कर्बाम्लवायू सोडतात. ह्या धर्माचे पालन न करणे वरील कुणालाही शक्य नाही.   

अशा अनेक नैसर्गिक घटनाचक्रांमुळे (ज्यात दगड, पाणी ह्यासारख्या जड गोष्टींशी संबंधित घटनाचक्रं सुद्धा समाविष्ट आहेत) जो समतोल साधला जातो त्यामुळेच पृथ्वी नावाचा ग्रह ‘जिवंत’ आहे आणि आपण अस्तित्वात आहोत, आणि सध्या तरी ब्रह्मांडात आपण ‘एकमेव’ आहोत. ह्यामुळे ह्या धरातलावर अस्तित्वात असलेल्या सर्व चल-अचल घटकांची देवत्वाचा स्तर गाठण्याइतकी महत्त्वाची भूमिका आहे. कोट्यवधी प्रजाती आणि जड वस्तु पृथ्वीवर अस्तित्वात आहेत, म्हणूनच पृथ्वीवरील जीवन टिकून आहे… आणि म्हणूनच ३३ कोटी देव अस्तित्वात आहेत अशी मूळ धारणा…!!  

हयापैकी माणूस सोडून बाकी सगळ्यांना आपआपला धर्म कसा पाळायचा हे समजते; किंबहुना दूसरा कुठला मार्ग असतो हे त्यांना जाणवतही नसावे असे वाटते. माणूस मात्र त्याच्या बुद्धिमत्तेमुळे त्याच्या सोयीनुसार मूळ नैसर्गिक प्रवृत्ती आणि गुणधर्म सोडून निराळे वागू शकतो. अश्या वागण्यामुळे नुकसान होऊ शकते (हे तर स्पष्टच दिसते), पण असे नुकसान टाळायचे असेल तर त्याचा उपाय करण्याचा प्रयत्न हिंदू धर्मामार्फत फार पूर्वी केला गेला होता. तो उपाय म्हणजे असे वर्तन की जे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी ह्या सगळ्यांसाठी एकाचवेळी लाभकारक ठरेल… असे वर्तन म्हणजे पुण्य प्राप्त करून देणारे धार्मिक कार्य,… असा धर्म जो पाळेल तो मोक्षास प्राप्त होईल….. हिंदू धर्माचे हे मूळ अधिष्ठान आहे असे मांडले जाते. जर आपण त्याप्रमाणे वागत आलो असतो तर आजच्या सामाजिक  परिस्थितीची भीषणता आपल्याला टाळता आली असती, आणि  ह्याचा आपल्याला सार्थ अभिमानही वाटू शकला असता. पण असा धर्म कुणीच पाळताना दिसत नाही. 

काही विशिष्ट सामाजिक आणि राजकीय कारणांनी देवावरचा विश्वास टिकून आहे असे दिसून येते. पण राजकीय उद्दीष्टांच्या सिद्धीला अडचण ठरत असल्यामुळे ‘पुण्या’वर आधारित मोक्ष ही संकल्पना मोडीत निघालेली दिसते. मोक्ष ह्या संकल्पनेअंतर्गत पाप-पुण्याचे निकष प्रत्येक व्यक्ती स्वतः लावू शकत होती आणि त्याबाबत खबरदारी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच घ्यायची अशी ही व्यवस्था आहे. देवाच्या संकल्पनेपेक्षा ही जास्त प्रभावी आहे कारण एक वेळ देव भक्ती केल्यामुळे कोणाला पापाच्या भरपाईतून मुक्त करेल, पण मोक्ष ह्या संकल्पनेत स्वतःचेच मन ग्वाही देत असल्यामुळे मनाच्या टोचणीतून कुठलीही सवलत आणि सुटका नाही. ह्या व्यवस्थेला काडीमोड देऊन पाप-पुण्याच्या गणिताचे काम पोलिस, न्यायपालिका आणि तत्सम यंत्रणांकडे सोयीस्करपणे हस्तांतरित केल्यामुळे धर्माचा सगळ्यात भक्कम पायाच दुभंगून कुठलेही निर्बंध सामाजिक स्तरावर न पाळण्याची सोय झाली आहे. उदाहरणार्थ भ्रष्टाचार करण्याबद्दल मनातून टोचणी अनेकांना वाटत नाही, फक्त पकडले जाणार नाही एवढी काळजी घेतली म्हणजे झाले… अशी भावना ह्यामुळे निर्माण होते. फारशी चिंता न करता व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी ह्या सगळ्यांचेच अतोनात नुकसान करता येते. 

पोलिस, न्यायपालिका ह्यांवर काही लोकांची मजबूत पकड असते तर अशी पकड नसणारे सामान्य लोक ह्या व्यवस्थेत भरडले जात असतात. देव देतो तशाच सूटी आणि शिक्षांसारखीच ही व्यवस्था आहे, फार काही वेगळी नाही; ‘मोठया’ लोकांइतके सामान्य लोक पुण्यवान नसतात एवढेच. मात्र ही व्यवस्था मोक्ष ह्या संकल्पनेपेक्षा बर्‍याच खालच्या दर्जाची आहे ह्यात मात्र काही शंका नाही. अशा निराशाजनक परिस्थितीत केवळ सोपस्कार आणि पाखंड करून आज बहुतेक लोक स्वतःला धार्मिक आहोत असे मानतात. अशाप्रकारे जाणूनबुजून धर्माचा पायाच ध्वस्त करणार्‍या आस्तिक लोकांच्या धर्माचे अधिष्ठान कोणते? ह्या स्थितीत पोहोचताना  धर्माच्या स्वरूपात कोणते आणि कसे बदल झाले?  

हे पाहण्यासाठी हिंदू धर्माबरोबर इतर धर्मांचा देखील  थोडक्यात पण गंभीर आणि आवश्यक तेथे दोषदर्शी आढावा घेऊ. असा आढावा न घेतला तर पूर्वग्रहाचा आरोप होईल आणि सगळाच युक्तिवाद त्या चष्म्यातून पाहीला जाईल. दोन मुख्य अ-भारतीय धर्मांमधे, म्हणजे इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांमधे, देवाचा दूत हा माणसाच्या स्वरूपातील प्रेषित आहे. ह्या धर्मांमधे सृष्टीतील कोणाही मानवेतर घटकाला देवाच्या समीप स्थान नाही. ह्या धर्मांनुसार माणूस सृष्टीतील इतर प्रजातींपैकी एक नसून तो सृष्टीचा आणि इतर प्रजातींचा मालक आणि उपभोक्ता आहे. ख्रिस्ती धर्मात तर सृष्टीचा लवकरात लवकर विनाश करणे हे धार्मिक कर्तव्य आहे, कारण ‘सेकंड कमिंग ऑफ ख्राईस्ट’ त्यावर अवलंबून आहे असे काही कट्टरवादी evangelical लोक मानतात. अमेरिकन सिनेटसमोर सुप्रसिद्ध वैज्ञानिक जेम्स वॉट ह्यांनी विधान केले होते की “Protecting natural resources was unimportant in light of imminent return of Jesus Christ… After the last tree is felled, Christ will come back”.

मानववंश हा निसर्गातला एक अजब नमुना (freak) आहे. इतर सजीव सृष्टीशी तुलना केली तर विचित्र आणि ‘अनैसर्गिक’ आहे. मानव इतर सगळ्यांवर अधिकार गाजवू शकतो ह्या त्याच्या ‘गुणा’मुळे त्याच्यासमोर दोन पर्याय असतात… एक तर तो इतरांचा त्राता असू शकतो किंवा  विनाशक होऊ शकतो. सध्या जरी सर्व धर्मांतील लोकांची प्रवृत्ती जवळजवळ एकसारखीच  विनाशकारी असली, तरी मूलतः हिंदू धर्मामध्ये दैनंदिन जीवनात सृष्टीतील मानवेतर घटकांचा समावेश करण्याचा आणि तिचा सांभाळ करण्याचा संकल्प असल्याचे स्पष्टपणे जाणवते. 

ह्याच्या अगदी विरुद्ध प्रवृत्ती ख्रिस्ती आणि इस्लाम ह्या मानवाधिष्ठित (anthropocentric) धर्मांमधे दिसते. निसर्गावर जसा अधिकार गाजवता येतो आणि विनाश करता येतो त्याचेच विस्तारीत स्वरूप आणि त्याचीच परिणती इतर मानवजातींवर अधिसत्ता गाजवण्यामधे आणि त्यांचा सरसकट विनाश करण्यामध्ये होते हे आपल्याला ख्रिस्ती विस्तारवाद्यांच्या कृतींचा अभ्यास केल्यास दिसून येते. ख्रिस्ती धर्म आणि “व्हाइट मॅन’स बर्डन” (ईश्वराने गोर्‍या वंशावर इतरांना सुसंस्कृत करण्यासाठी टाकलेला भार आणि त्याकरिता दिलेली अत्याचार करण्याची मुभा) ह्या भयंकर संयोगामुळे मोठमोठ्या खंडांमध्ये एकामागोमाग नरसंहार आणि सृष्टीसंहार झाला. हयापेक्षा निर्घृण वागणूक मानवी इतिहासात सापडत नाही. ‘धर्म’ किती क्रूर होऊ शकतो हे ह्यातून स्पष्ट होते. ह्या ख्रिस्ती वागणुकीच्या मानाने इस्लाम बरा असे म्हणावे लागेल, कारण त्यात केवळ इस्लामच्या प्रसारासाठी जिहाद आणि ते करतांना मरण आले तर शहादत, म्हणजे माणसांच्या मरण्या-मारण्या वर समाधान मानले आहे; संपूर्ण सजीव सृष्टीला नामशेष करण्याचा विडा त्यांनी उचललेला नाही. 

येशू आणि मोहम्मद ह्या दोघांच्या सांगण्याप्रमाणे जे लोक त्यांना शरण जातील त्यांची सर्व पापे (अगदी नरसंहाराची सुद्धा) धुतल्या जातील आणि त्यांना स्वर्गात जागा मिळेल. अशी मान्यता म्हणजे धर्माच्या नावाखाली अघोरी आणि दुष्टपणाची कामे करण्यासाठी  जाणूनबुजून दिलेली सूट आहे. मानवी कमकुवतपणाचे सोयीस्करपणे देवाकडे हस्तांतरण केल्यावर आपण करीत असलेल्या पापाला अंतर्मनातून होणार्‍या विवेकपूर्ण विरोधावर मात करता येते, असे ह्या धर्मांचे लोक शिकले आहेत आणि त्याप्रमाणे ते वागतात. 

अशी हिंसेची सूट आता गोमातासंरक्षणाच्या निमित्ताने हिंदू धर्मातही मिळायला सुरुवात झाली आहे असे सद्ध्याच्या राजकीय परिस्थितीत जाणवते, परंतु अशा प्रकारच्या हिंसक पापांचे निराकरण करण्याची सूट आपल्याकडे पूर्वापार नव्हती. धर्म आणि अधिसत्ता गाजविण्याच्या बाबतीत आपण ‘उच्च’ जातींचे ‘नीच’ जातींवर अत्याचार एवढ्याच पातळीवर थांबलो होतो. निसर्गाचा सांभाळ करतानाही जसा त्यावर अधिकार गाजवता येतो त्याचे प्रतिबिंब आपल्याही समाजात दिसते. दुसर्‍यांवर ‘राज्य’ करण्याची घाणेरडी पण प्रबळ इच्छा आपल्याही समाजातील कपटकारस्थानी लोकांमध्ये असते आणि गुलामीच्या मानसिकतेने पछाडलेला समाजही  ‘राजधर्मा’ची पूर्णतः अनावश्यक प्रभावळ जबरदस्तीने निर्माण करून असे अधिकार  त्यांना प्रदान करतो. 

रोज केलेली वेगवेगळ्या प्रकारची पापे वर्षातून एकदा गंगेत धुण्याच्या संकल्पना सुद्धा आपल्याकडे सर्रास आहेत. देवाला शरण गेल्यावर अभय मिळण्याची सोय सुद्धा आपल्याकडे आहे. इतकेच नव्हे तर अनेक साधू, संत अशी हमी देण्यासाठी तत्पर असतात. खरंच ह्याचा काही उपयोग होतो का ह्याबद्दल तर शंका असतेच, पण पापे करणार्‍यांना अभय देणार्‍या देवांची पातळी आणि उद्दिष्टांबद्दलसुद्धा शंका घ्यावी अशी परिस्थिती आपोआपच निर्माण होते.  आस्तिकांनी लादलेल्या पापे धुण्याच्या अपेक्षांचे लाजिरवाणे ओझे देवांना निमूटपणे वाहावे लागते. 

अशा मानसातून (Psyche) मुक्त असणार्‍या नास्तिकांना पटवण्यासाठी (किंवा आस्तिकांच्या भावना दृढ करण्यासाठी) देवाच्या अस्तित्वाबद्दल एक युक्तिवाद नेहमी केला जातो, आणि तो म्हणजे वैज्ञानिकांचा आणि उच्च शिक्षितांचा हवाला… वर आपण वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा वैज्ञानिक जेम्स वॉट ह्यांचे विधान पाहिले. युक्तिवाद असा केला जातो की विज्ञानाशी जवळीक असलेल्या, जटिल समस्यांच्या संदर्भात विचार करू शकण्याची कुवत असलेले शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजीनियर आणि प्रोफेसर सुद्धा देवावर ठाम विश्वास ठेवतात, मग बाकी ‘सामान्य’ जनांनी त्यांचे अनुसरण करायला काय हरकत आहे? 

परंतु सांगोपांग व स्वतंत्र विचार करू शकणे ह्याचा विज्ञानाशी किंवा कुठल्याही औपचारिक शिक्षणाशी फारसा संबंध नसतो. विज्ञान, शिक्षण आणि धर्मभोळेपणा ह्यांच्या परस्परसंबंधांचा थोडक्यात परामर्श घेणे इथे आवश्यक आहे.

औपचारिक (शालेय आणि महाविद्यालयीन) शिक्षणाचा मूळ उद्देश वास्तविक सांगोपांग व स्वतंत्र विचार करू शकणे ह्याच्या विरोधात असतो. शिक्षितांचा उपयोग समाजातील ‘वरिष्ठ’ वर्गातील, राज्यकर्त्यांच्या जवळ असणार्‍या लोकांनी ठरविलेल्या साचेबद्ध पद्धतीने सुरू रहावा असा प्रयत्न शिक्षणयंत्रणेचा असतो. ह्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील ‘कामगार’ ठरलेल्या प्रमाणात समाजात निर्माण व्हावेत ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू असतात. औपचारिक शिक्षण सैनिकी प्रशिक्षणापेक्षा फारसे वेगळे नसते, अगदी अबोध बालवयापासून, हे ट्रेनिंग सुरू झालेच पाहिजे असा सामाजिक दंडक असतो. विज्ञानाशिक्षणात निसर्गजतनाला (अगदी अलिकडचा काळ सोडला तर ) अगदी नगण्य स्थान होते आणि पिढ्यान-पिढ्या असे केल्यामुळे निसर्गाचा सहजपणे विनाश करणार्‍या ‘विकासमार्गी’ शहरी आणि औद्योगिक ‘संस्कृतीचा’ उदय झाला. ह्याप्रकारे ‘शिकलेले’ लोक आत्ताच्या परिस्थितीत बाकी सगळ्यांवर भारी पडतात. ह्या प्रवाहा विरुद्ध जाऊन शिक्षण व्यवस्थेत स्वतंत्र विचार करण्यावर भर दिला, तर अश्या यंत्रमानवी (robotic) पद्धतीने स्वतःहून जन्मभर कामे करणारे गुलाम सैन्य कसे तयार होणार? अशा तर्‍हेने सध्याच्या शिक्षणपद्धतीत स्वतंत्र विचार करण्यापासून परावृत्त करण्याचेच प्रशिक्षण मुख्यतः मिळत असल्यामुळे उच्चशिक्षित, जे ह्या यंत्रणेत जास्त वेळ असतात, त्यांच्याकडे स्वतंत्र विचार करण्याची प्रगल्भता सापडणे अधिकच कठीण…!! 

आणि विज्ञानाचे काय? पुष्कळदा असे वाटते की धर्माप्रमाणेच ज्याबाबत जास्तीतजास्त अंधश्रद्धा बाळगल्या जातात ते म्हणजे विज्ञान. कुठलाही पुरावा नसताना (किंबहुना विरुद्ध दाखले असताना) विज्ञान आणि तंत्रज्ञान समग्र मानवजातीचे भले करील असे प्रतिपादन वारंवार केले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यातून निर्विवादपणे नवनव्या गोष्टी निर्माण होतात, पण ह्या प्रत्येक निर्मितीतून चांगले झाले आहे की वाईट ह्याचा ताळेबंद मांडण्याच्या भानगडीत मुद्दामच कोणी पडत नाही. टेलीव्हीजन (ज्याचे अनेकविध दुष्परिणाम आता लक्षात येत आहेत), तसेच  दळणवळणाच्या साधनांमुळे सोपा झालेला देशांतर्गत आणि जागतिक प्रवास (ह्यामुळे वेग-वेगळ्या स्तरावर नव-वसाहती वाढायला आणि संसाधने लूटायला मोठी मदत होते आहे.), कृषी क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे वाढलेला अन्नपुरवठा (ह्यामुळे लोकसंख्या वाढून रोज उपाशी झोपणार्‍यांची संख्या वाढली आहे) अशी काही उदाहरणे पाहिली आणि त्यांचा ताळेबंद जोडला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यामुळे सामान्य माणसाचे नुकसान अधिक आणि फायदा त्यामानाने फार मर्यादित, हे लक्षात येते. विज्ञान बहुधा मोठ्या आंतर्राष्ट्रीय निगमांच्या अखत्यारीत असते आणि विज्ञानामार्फत निर्माण होणार्‍या नवनव्या सुखसुविधांमधून वेगवेगळे दुष्परिणाम आणि सोबतच विषमतेमध्ये वाढ होते ह्याचा अनुभव आपल्याला रोजच येतो. काही लोक ह्या विधानाला छेद देण्याकरीता हे दाखवायचा प्रयत्न करतात की आंतर्राष्ट्रीय निगमांच्या अखत्यारीबाहेर सुद्धा प्रयोग होऊ शकतात आणि होतात, ज्यांचे उद्दीष्ट नेहमीच नफा हे नसते,… पण हे प्रयोग मर्यादित असून पुरेसे  परिणामकारक नसतात.  

धर्माला निदान नावापुरते तरी समाजाचे भले करण्याचे साधन म्हणून पाहिले जाते, पण विज्ञानाकडे असा सुद्धा काहीच आधार नाही. अण्वस्त्रांचा शोध लावणार्‍याचा उल्लेख विज्ञानाच्या प्रभावळीमुळे विनाशकारी माणूस असा न होता थोर शास्त्रज्ञ असा होतो. असा एखादा शास्त्रज्ञ संपूर्ण जगाचा नाश करू शकेल असे जर कोणी म्हटले तर ह्यात काहीच नवीन वाटत नाही… कारण हे तर मानवजातीने आधीच साध्य केले आहे..!! पण हयाविरुद्ध कोणी असे प्रतिपादन केले की एखादा शास्त्रज्ञ संपूर्ण जगातील सजीव सृष्टीला विनाशापासून वाचवेल, तर कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही…!! बहुतेक शास्त्रज्ञांचा कल त्यांच्या विषयाच्या संदर्भात एकांगी विचार करण्याकडे असतो; सामाजिक हिताच्या दृष्टीने पाहण्याकडे नसतो. पण सगळे असे विरुद्ध दाखले असतांनाही विज्ञानातील चमकदमक आणि चमत्कार ह्यामुळे विज्ञानामुळे मानवजातीचे सगळे प्रश्न सुटतील असा अनेक लोकांचा असा दृढ विश्वास असतो. हा विज्ञानभोळेपणा कुठल्याही देवभोळेपणापेक्षा वेगळा किंवा कमी हानिकारक नाही. 

असो… हिंदू धर्माच्या वाटचालीत पुढे काय घडले ते पाहू. सनातन धर्मानंतर वैदिक धर्मातील यज्ञयाग आणि बळी देण्याची प्रथा इतक्या प्रमाणात वाढली की त्यावर समाजात तीव्र प्रतिक्रिया झाली आणि पर्याय म्हणून बुद्ध धर्म सगळीकडे,- म्हणजे आसेतूहिमाचल – श्रीलंके पासून अफगाणिस्तानापर्यंत पसरला. ह्यावर मात करण्यासाठी हिंदू धर्मात मोठे बदल करावे लागले. यज्ञात बळी दिल्यानंतर त्याचे मांस अर्थातच नेवैद्य म्हणून भक्षण केले जात होते; सुरापानाचीही पद्धत त्यावेळी होती. पण बुद्ध धर्मातील अहिंसेच्या शिकवणीच्या जवळ जाण्याकरिता ब्राह्मणांनी त्यावेळी मांस खाणे, सुरापान करणे सोडले. पौराहित्य करणार्‍या ब्राह्मणांचा एक वेगळा वर्ग ह्यावेळी निर्माण झाला की पूर्वीपासून वैदिक काळातही असा वेगळा वर्ग होता हा एक शोधाचा विषय होऊ शकतो, मात्र पौराहित्य करणार्‍या ब्राह्मणांचे मांस खाण्यातील स्वारस्य संपल्यामुळे यज्ञात बळी देणे थांबले हे मात्र खरे. अश्याप्रकारे मूळ वैदिक विधी खरं तर संपुष्टात आले, पण पशुंच्या ऐवजी नारळ असे बदल करून जुने आणि नवे ह्यांची सांगड घातली गेली. ह्या पुरोहितांनी फक्त मांसभक्षण, सुरापान सोडले असेही नाही, बौद्ध भिख्खूंचे अनुकरण करण्यासाठी संपत्तीचा त्याग करून भिक्षुकीही स्वीकारली. ह्या त्यांच्या त्यागामुळे उरलेला हिंदू समाज मात्र त्यांच्या मूळ नैसर्गिक उत्सवप्रिय प्रवृत्तीप्रमाणे सामान्य ऐहिक जीवन जगायला मोकळा झाला. सर्वसंगपरित्याग ही भारतीयांची मूळ प्रवृत्ती कधीच नव्हती. ह्यामुळे बुद्ध धर्म मागे सारला गेला आणि हिंदू धर्माने पुन्हा आघाडी घेतली. 

अशी आघाडी घेण्यात अर्थातच ब्राह्मणांचा पुढाकार आणि हातभार होता, आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन त्यागही करावा लागला होता. पण त्यांनी समाजावर इतके दीर्घकालीन वर्चस्व गाजवू शकण्यामागचे रहस्य काय असावे? असे वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल तर व्यवस्थेची एक अभेद्य चौकट निर्माण करावी लागते. अशी व्यवस्था कशी निर्माण होते हे समजून घेण्याकरिता भिक्षुकी करणार्‍या ब्राह्मणांची तुलना अलीकडच्या काळात आपल्यासमोरच निर्माण झालेल्या वकिलीच्या व्यवसायाशी करणे उपयुक्त ठरेल. 

वकिलांची भाषा, त्यांची कायद्यांवर आधारित विचार करण्याची पद्धत आणि न्याय-अन्यायाची संकल्पना ही न्यायधीश आणि इतर वकील ह्यांच्या व्यतिरिक्त इतरांना समजणे फार कठीण असते. त्यामुळे न्यायालयात वकिलांच्या मध्यस्थीमार्फतच प्रवेश मिळू शकतो. न्याय मागणे चुकीचे आहे असे कोणी म्हणणार नाही, पण शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे जे म्हटले जाते ते ह्या अशा ‘कायदेशीर’ परिस्थितीमुळे. आपली भाषा इतरांना न समजणे हीच आपली हुशारी आहे असे वकील समजतात. बहुधा वकिली हा एकच व्यवसाय असेल जिथे पैसे देणार्‍या अशीलाशी पैसे घेणारा वकील उद्धटपणे आणि बेपर्वाईने आणि कधीकधी खोटेपणाने वागतो. ह्याचे एक कारण असेही आहे की वकीलपत्र दिल्यावर अशीलाकडे फार काही पर्यायच राहणार नाहीत अशी व्यवस्था न्यायदानाच्या ब्रिटिश-निर्मित आणि आजही मुद्दाम तश्याच सुरू ठेवलेल्या रचनेत असते. 

वकीलांचे न्यायाधीशाबरोबर असते तसे समीकरण ब्राह्मणांनी देवांसोबत जोडून ठेवलेले आहे; आणि त्याचाही आधार इतरांना न कळू शकणारी भाषा आणि समजू न शकणारा प्रपंच हाच आहे. ज्याप्रमाणे वकिलांशिवाय न्याय मिळू शकत नाही त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या मध्यस्थी शिवाय देवापर्यंत आपले मागणे पोहोचवता येत नाही. ह्या असहायतेमुळे दोघांकडूनही सर्वसामान्य लोक नाडले जातात आणि न्याय किंवा मोक्ष अशा उद्दिष्टांपासून वंचित राहतात. ह्या व्यवस्थेत भिक्षुकांमार्फत समाज धर्माच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर, पाखंडी स्वरूपाकडे ढकलला जातो.. त्यात भिक्षुकांचा आर्थिक फायदा अधिक असतो. 

हिंदू धर्मात झालेली यापुढील मोठी स्थित्यंतरे मुसलमानांच्या आक्रमणांनंतर झाली, पण ह्या स्थित्यंतरांना धार्मिक पेक्षा सामाजिक अशी उपाधी देणे जास्त योग्य होईल. मुसलमानी दरबारात ब्राह्मणांना काही विशेष स्थान असण्याचे कारण नव्हते. पण राजकीय वरदहस्त गेल्यावरही समाजात असलेले त्यांचे वर्चस्व सहजासहजी कमी झाले नाही. मुसलमानांनासुद्धा ब्राह्मणांच्या बाबतीत किंवा एकंदरीत हिंदू समाजव्यस्थेविषयी बदल करण्याची काही गरज वाटली नाही, कारण आधीच अस्तित्वात असलेल्या सामाजिक उच्च-नीचतेचा  उपयोग राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी करून घेणे फारच सोयिस्कर होते. नंतर आलेल्या इंग्रजांचाही अनुभव काही वेगळा नव्हता… त्यांच्या काळात तर ब्राह्मण बाबूगिरी, वकिली अशा कामांसाठी त्यांना फारच उपयुक्त ठरले. 

राजाचा वरदहस्त गेल्यानंतरच्या काळात ब्राह्मणांनी आणि इतर ‘उच्च’ जातीतील लोकांनी ‘खालच्या’ जातींकडे रोख केला. ह्या उच्च जातींना आपला सामाजिक दरारा टिकवून ठेवण्यासाठी ‘खालच्या’ जातींना त्यांच्या ‘नीच’ स्थानाची जरबेने जाणीव करून देणे  आवश्यक वाटले. ह्या हव्यासापायी अनेक अन्याय झाले आणि सामाजिक स्तरीकरणाची (stratification) प्रक्रिया सुरू झाली. हे फार महत्त्वाचे सामाजिक स्थित्यंतर होते. ह्याचे दुष्परिणाम आजही भोगावे लागत आहेत. इंग्रजांनी ह्याला चांगलेच खतपाणी दिले, ज्यामधून आज अस्तित्वात असलेला समाजातला जाती-जातींमधला द्वेष उफाळून आला. त्यापूर्वी जातींची संकल्पना उच्च/नीच समूह अशी नसून त्या-त्या समूहाकरिता आवश्यक असलेली पर्यावरणीय किंवा सामाजिक कप्प्याची उपलब्धता, आणि कौशल्यावर आधारित श्रम विभागणी अशी होती (occupying available ecological or social niche in accordance with skills developed and preferences exercised by communities or groups) असे अनेक अभ्यासक मांडतात. कुटिल राजकारण्यांनी मात्र जातींचा उपयोग करून लोकांमध्ये दुफळी माजविण्याचे इंग्रजांनी सुरू केलेले काम स्वातंत्र्यानंतर पुढच्या टप्प्यावर नेले. आज तर त्या मार्गाने जोरात वाटचाल सुरू आहे.

हयानंतरचा धार्मिक स्थित्यंतराचा पुढचा टप्पा म्हणजे आजच्या ‘हिंदुत्व’ ह्या संकल्पनेची प्रभावी आणि परिणामकारक अशी प्रस्थापना…!! ह्या संकल्पनेच्या मागे एक नकारात्मक मानसिकता आहे… आपल्यावर मुसलमानांनी आणि त्यानंतर इंग्रजांनी अनेक वर्षं राज्य केले. मूठभर लोकांनी आपल्या एवढ्या मोठ्या समाजाला लूटले. हयापैकी मुसलमानांशी आपले मुख्य भांडण; कारण त्यांनी आपल्या धर्मावर प्रत्यक्ष हल्ला केला. ते अजुनही हिंदू समाजावर पुन्हा राज्य करण्याची स्वप्ने पाहतात (असे सगळीकडे पसरवले जाते, आणि आश्चर्य म्हणजे मुसलमानही ह्याचे खंडन करताना दिसत नाहीत.) 

इंग्रजांशी असे भांडण नाही, कारण त्यांनी जी लुटालूट केली ती अघोरी असली तरी हुशारीने केली. त्यांनी निर्माण केले तसे साम्राज्य ‘super power’ बनून निर्माण करण्याचे आपलेही स्वप्न आहेच, त्यामुळे नव-वसाहतीतून (neo-colonialism) इंग्रजी पद्धतीने होत असलेल्या लूटीबाबत खेद कसा दर्शविणार?… जर अमेरिका, चीन ह्यासारखे ‘super power’ बनायचे असेल तर आपल्याला इतर कमकुवत देशातील लोकांचे शोषण करणे भाग आहे, आणि आपल्याला ते कठीण जात असले तरी आपल्याच देशातील कमजोर लोकांची संसाधने लुटणे हा तर ‘विकासाचा’ पक्का मार्ग आहेच. ह्या लूटीत राज्यकर्ते आणि अनेक उच्चभ्रू लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात, पण देशाचे खरे हित कशात आहे हे या ‘मोठ्या’ लोकांनाच समजते असे मानण्याची आपली परंपरा असल्याने त्यांचे समर्थन करणे हेच ‘प्रजेचे’ परम कर्तव्य असते. बलवान राष्ट्रे अशीच बनतात; दुसरा मार्ग अजुन इंग्रजांनी किंवा इतर कोणी दाखवलाच नाही, मग आपण गुलामगिरीची सवय झालेले लोक निराळे तरी काय करणार? 

ह्यासाठी पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी धार्मिक कलह माजविण्याइतके प्रभावी अस्त्र दुसरे नाही…!! ख्रिश्चनांनी आणि मुसलमानांनी तरी अजून निराळे काय केले? मग आपण मागे राहून कसे चालेल? आपल्या धर्माला हिंदुत्वाच्या माध्यमातून एकीकडे युरोपिय वंशवादाकडे आणि राष्ट्रवादाकडे नेणे आणि दुसरीकडे इस्लामचे अनुकरण करून कट्टरवादाकडे नेणे ह्यापेक्षा परिणामकारक मार्ग अजुन कोणता असू शकतो? हे हिंदूंनी आधी कधी केले नाही असे म्हणतात, पण आता ‘हिंदुत्वा’ च्या माध्यमातून ही चूक सुधारली जाते आहे. अश्याप्रकारे होणार्‍या हिंदू धर्माच्या ख्रिस्तीकरणासाठी आणि इस्लामीकरणासाठी मिशनऱ्यांची किंवा तालेबान्यांची सुद्धा काय आवश्यकता आहे? भगवान श्रीराम ह्यांच्या आशिर्वादाने  रा.स्व.संघ, भा.ज.पा. आणि त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभ्या असलेल्या अनेक ‘हिंदुत्ववादी’ संघटना हे काम करायला समर्थ आहेत. 

इन्शाल्ला आपला देश ह्या मार्गाने super power बनणारच!… आमेन!!

हे हिंदू धर्मातील अगदी आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात येत असलेले स्थित्यंतर आहे. हिंदुत्व प्रकल्प पूर्णपणे राबविल्यानंतर हिंदू धर्माचे नाव तेच राहील, पण स्वरूप मात्र पूर्वीपेक्षा एकदम वेगळे राहील. ह्या प्रकल्पामुळे हिंदू-मुसलमानांतच नाही तर हिंदू-हिंदूतसुद्धा दुफळी व्हायला लागली आहे. हिंदुत्ववाद्यांनी आतून हल्ले करून हिंदूधर्मांतर्गतच मुद्दामच गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. सध्याचे राज्यकर्ते आणि त्यांची माध्यमे ह्यांनी कट्टर समर्थकांसोबत विरोधकांना अतिशय गलिच्छ प्रकारे नामोहरम करण्याची मोहीम उघडली आहे. अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन धर्माची ‘ठेकेदारी’ संपूर्णतः त्यांच्याकडेच आहे असा दावा ते करीत आहेत. त्याविरुद्ध कुणी बोलण्याची हिम्मत करणार नाही अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पद्धतशीरपणे निर्माण केली जात आहे. त्यामुळे आपल्याच धर्माचा चेहरा विद्रूप होतो आहे ह्याची हिंदुत्ववाद्यांना चिंता नाही, तसेच संपूर्ण समाजाला दूरगामी दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल ह्याची सुद्धा पर्वा नाही. 

स्वतंत्र विचार करणार्‍यांच्या मनात मात्र स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याचा ‘गर्व’ वाटण्यापेक्षा धर्माच्या ह्या बदलणार्‍या स्वरूपाबद्दल निराशाच वाढत जाईल असे वातावरण निर्माण होते आहे. 

ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव अर्थातच बुद्धीप्रामाण्यवादी लोकांना आहे. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर अनेकदा लक्षात येते की त्यांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बुद्धीप्रामाण्यवादी नसून भावनावेशावर जास्त आधारित आहे. ह्यांपैकी बहुतेकांचा भर समाजाचे भले कसे होईल अशी स्वप्ने पाहण्यावर असतो, पण ही स्वप्ने उपलब्ध परिस्थिती आणि तथ्ये ह्यांच्या विरोधात असतील तर त्यांना त्याची पुरेशी जाणीव किंवा पर्वा नसते. उदाहरणार्थ ह्यांपैकी बरेचजण अशी मांडणी करतात की सर्व धर्म सारखेच आहेत आणि सगळ्यांचा मूळ उद्देश चांगलाच आहे. परंतु वस्तुतः धर्मा-धर्मामध्ये बराच फरक आहे; साम्य असेल तर ते एवढेच की सगळ्या धर्मांचा मूळ आणि मुख्य उद्देश समाजातील विशिष्ट वर्गाचे वर्चस्व स्थापन करून कायम ठेवणे…!!

वंशवादाचा उपयोग करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा यशस्वी प्रयत्न जसा हिटलरने जर्मनीत केला तसा बराचसा यशस्वी प्रयत्न धार्मिक भावना भडकवून हिंदुत्ववादी संघटना आज आपल्याला भारतामध्ये करताना दिसताहेत. ह्याला कट्टर लोकांचे प्रोत्साहन तर आहेच, पण बाकीचे असंख्य हिंदूसुद्धा सद्यपरिस्थितीत धर्माची मक्तेदारी ह्या आक्रमक लोकांकडेच आहे अशी मानसिकता बाळगून आहेत. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. हिटलरच्या काळात सुद्धा सामाजिक जबाबदारी पूर्णपणे राज्यसत्तेच्या हातात गेली, म्हणूनच ज्यू लोकांची सरसकट कत्तल करणे जर्मनीत शक्य झाले. आपल्या धर्माचा असा दुरुपयोग न व्हावा ह्याकरीता स्वतंत्र विचार करू शकणार्‍या हिंदूंनी अशा मक्तेदारांना आव्हान द्यायला हवे, अन्यथा आपल्या धर्माचा युरोपियन पद्धतीने ‘उपयोग’ केला जाईल हे हिंदुत्ववादी संघटनांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे. 

आबा (दिवाकर) मोहनींनी ही वाटचाल काही दशकांआधीच ओळखली, आणि ‘आजचा  सुधारक’ मधील त्यांच्या डोळे उघडायला लावणार्‍या लेखांमध्ये प्रकर्षाने हे मांडले की आक्रमक हिंदुत्ववादी संघटना सर्वसमावेशक, विशालहृदयी हिंदू धर्माच्या स्वरूपाला ढाल म्हणून वापरतील, आणि त्या ढालीमागून हिंदुत्वाच्या कोत्या तलवारीचे वार करतील. आज आपल्यासमोर हेच घडताना दिसत आहे आणि त्याचे प्रमाण वाढतच आहे. मात्र हे अजुन बहुतेकांच्या लक्षात आलेले दिसत नाही की हे वार ‘दुसर्‍यांवर’ तर होतातच, पण त्यांचा नकारात्मक परिणाम हिंदू समाजावरच अधिक होतो. 

पाताळयंत्री आणि कपटी राजकारणी ज्या धर्माचा अशाप्रकारे वापर करतात,त्यालाही राज‘धर्म’ असेच उचित नाव देतात. अशा ‘राजधर्मा’बद्दल समाजाने जागरूकता आणि सावधगिरी बाळगली नाही तर हिटलरच्या काळातील जर्मनीसारखे वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

धर्माचा मूळ उद्देश सुरुवातीपासूनच विशिष्ट वर्गाचे वर्चस्व प्रस्थापित करणे हाच होता, त्यामुळेच राज्यकर्त्यांच्या गरजेप्रमाणे त्याचे स्वरूप आणि उपयोग बदलत गेले आहेत. हे इतिहासाचे आणि सद्य:स्थितीचाचेही अवलोकन केले तर सहजपणे समजतं. ही वास्तविकता लवकर समजून घेणे आणि समजावून सांगणे हे ही बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे काम आहे. 

सरतेशेवटी इतकेच, की ३३कोटी देव असतांनाही निरीश्वरवादी असण्याची सोय असणे ही आपल्या धर्मातील विलक्षण चांगली गोष्ट आहे. कोणी निरीश्वरवादी झाल्यामुळे धर्माची निंदा-नालस्ती होते असेही हिंदू धर्मात मानत नाहीत. देव-देवतांशी नास्तिकांचे सिनेमात दाखविल्याप्रमाणे भांडणसुद्धा नसते. (जे मुळात अस्तित्वातच नाही, त्याच्याशी भांडायचे तरी काय आणि कसे?) बुद्धीप्रामाण्यवादी देव-धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास करू शकतात करतात आणि समजून-उमजूनच नास्तिक किंवा निरीश्वरवादी असल्याचे जाहीर करू शकतात. तर्क आणि अभ्यास ह्याच्या बळावर बुद्धिप्रामाण्यवादी समाजाचे वैचारिक नेतृत्व  करू शकतात, नव्या कल्पना पुढे आणू शकतात.

परंतु ‘धार्मिकपणा’शी जोडले जाऊ नये अशा मानसिकतेमुळे बुद्धीप्रामाण्यवादी नास्तिक स्वतःलाच समाजातून थोडे वेगळे करून घेतात आणि ह्याचे कारणही लेखाच्या सुरूवातीला मांडल्याप्रमाणे अनेकविध सामाजिक कार्यांची ‘धार्मिकते’शी घातलेली घट्ट सांगड हे असते. बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी स्वतःला ह्या कार्यक्रमांपासून दूर केले तर त्यांचे वर्तुळ आपोआपच मर्यादित होते. ह्या मर्यादित वर्तुळातल्या गटचर्चा आणि कृतीकार्यक्रम इतक्या वेगळ्या पातळीवर सुरू असतात की त्याचा वर्तमानात उपयोग आणि समाजावर प्रत्यक्ष काहीच परिणाम होताना दिसत नाही. ठराविक लोकांत शाब्दिक आणि तात्विक चर्चा होते, ज्याची जाणीवसुद्धा समाजात इतरांना होत नाही. इथेच बुद्धीप्रामाण्यवादी नास्तिक्याची गोची होते. 

कुठल्याही ‘धार्मिक’ बाबीला नेहमीच सामाजिक आणि राजकीय आयाम आणि पैलू असतात. त्यामुळे केवळ धार्मिक स्वरूप असल्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांनी सगळ्याच परिस्थितींमध्ये त्यांपासून दूर राहणे संयुक्तिक ठरू शकत नाही. धर्माच्या गैरवापरामुळे समाजाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते ह्याची हिंदुत्ववादाचा पगडा नसलेल्या खरे तर सगळ्याच हिंदूंनी दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यातून बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांनी स्वतःला वगळून घेणे योग्य नाही. त्यांनी सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी, – म्हणजे समाजातल्या मूलभूत उपयुक्त प्रवृत्ती आणि आपल्याच लोकांच्या नैसर्गिक प्रेरणा आणि गुणधर्म ह्यांच्या जतनासाठी… किंवा थोडक्यात म्हणजे आपल्या समाजातले भारतीयत्व टिकविण्यासाठी -, स्वतःहोऊन पुढे होऊन समाजमाध्यमे, लेखन आणि इतर उपलब्ध मार्गांनी समाजाचे उद्बोधन करून ‘हिंदुत्वा’च्या नावाखाली होणारा घरभेदी हल्ला परतविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे ही आजची गरज आहे. जर बुद्धीप्रामाण्यवाद्यांना खरोखर समाजात स्थित्यंतरे घडवायची असतील तर भावनावश न होता समाजात खोल रुजलेल्या धारणांच्या मुळांशी जाऊन त्यात आढळलेल्या चुका आणि विरोधाभास समाजासमोर स्पष्ट कराव्या लागतील. समाजाला त्याचा चेहरा स्पष्टपणे आरशात दाखविण्याचे हे काम आहे. समाजातील नास्तिकच कदाचित हे अधिक प्रभावीपणे करू शकतील.

अभिप्राय 2

  • I have seen spiritual persons as if they are in existence though they were not in existence . I had been saved by the spiritual person who was not in existence when I was going down the running train from platforn . I had undergone Nagbali , Narayanbali and Tripindi vidhi in Trimbkeshwar of Maharashtra state and given mukti to the extraordinary powerful tapsvi baba in 1982 and the Baba had also given me Darshan . Since then I have not seen the Baba till date . I have so far met many spirirual person in full hunan body with clothes though they were not in existence . I am not have any vidya or knowledge of vedic or related sanskruti , but I think that I must have some relations with the community of ghosts in my earlier birth before my present life .

    Due to the reason I believe in Gods. Though I have not seen them so far . I think when these spiritual identities are in existence God is also in existence . we must not run away fron the truth . The persons I don’t know and not in existence have met me . Even when I gone to Ahmedabad for my official work , approximately 15 to 20 small children in school uniform met me 2 times in the night when my collegue officer slept on nearby bed. It’s learnt that nearby school was gone underground by earthquake and many school children died but I don’t know why they come to meet me . Think of it and don’t be Nashik believe in God

  • माझ्या लक्षात आलेली पहिली बाब अशी की देव आणि धर्म दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देव (आणि भुते खेते) ह्या संकल्पना निदान दोन तीन लाख वर्षे जुन्या आहेत (कदाचित होमो सेपीएन्सच्याही आधीपासूनच्या). औपचारिक धर्म आणि त्यांत देवांना दिलेले स्थान मात्र मानव स्थिरस्थावर झाल्यानंतरच्या काळापासून, म्हणजे केवळ १०-१२ हजार वर्षांपासून आहेत.

    या कालगणनेचा पुरावा काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.