आवाहन – जुलै २०२१ च्या अंकासाठी

सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमाराला कोरोनाने जरा उसंत दिली होती, तो फेब्रुवारी संपेसंपेतो त्याने पुन्हा विशाल आणि विक्राळ रूप धारण केले. ही दुसरी लाट अचानक अंगावर आल्याने नेत्यांपासून सामान्य माणसापर्यंत सगळ्यांचेच धाबे दणाणून गेले. आरोग्यसेवेबरोबरच इतर अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या. यातील यशापयशाची अनेक कारणे दिली गेली. कुंभमेळ्यापासून ते बंगालमधील निवडणुका आणि आरोग्यसेवेतील अपुऱ्या आणि भ्रष्ट व्यवस्था या सर्वांवर एकतर ताशेरे ओढले गेले किंवा स्पष्टीकरणे दिली गेली.

आरोग्यसेवेच्या ढिसाळपणात व्यवस्थेतील गलथानपणाबरोबरच मानवी वृत्तीतील हव्यास अगदी ठळकपणे समोर आला. व्यक्तिगतरीत्या माणूसपणात आपण किती आणि कसे कमी पडलो, पडतो याचे विदीर्ण करणारे चित्र उघड झाले. आरोग्यक्षेत्रातील स्थिती सोन्याची खाण हाती लागल्यावर संधी मिळेल तिथे आणि जमेल तितके खणत जाणारी दिसली. ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद अशी एकमेकांवर चिखलफेक करताना माणसाचा जीव वाचावा म्हणून उपचार होत आहेत की रुग्णावर अंधपणाने विशिष्ट पॅथी लादली जाते आहे हा प्रश्न उपस्थित झाला.

या सगळ्या गोंधळात इतर काही आव्हाने पुढे उभी आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

मागील वर्षभरात मुलांचे शाळेत जाणे बंद झाल्याले वैकल्पिक शिक्षणपद्धती शोधल्या आणि वापरल्या गेल्या. आगामी वर्ष असेच राहिले तर ह्या वैकल्पिक पद्धतीच कदाचित रूढ होत जातील. त्यामुळे यांवर अधिक चिकित्सक विचार करावा लागणार आहे.

ह्याच दरम्यान भारताचा GDP गडगडला आहे. एकीकडे कोरोनामुळे मोठी आर्थिक तूट उद्भवलेली दिसते आहे, तर दुसरीकडे मोजक्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

प्रत्येक बाबतीत विषमता वाढली आहे की मुद्दाम वाढवली गेली आहे? आम्ही आणि ते, गरीब आणि श्रीमंत, बहुसंख्यक आणि अल्पसंख्यक, देशभक्त आणि देशद्रोही, एक राजा आणि बाकी प्रजा, इत्यादी असे धृवीकरण होते आणि वाढते आहे.

तरुणांच्या हाताला कामे उरलेली नाहीत. इतक्या प्रमाणात कामे मिळणेही सोपे नाही. बेरोजगारीच्या या काळात नव्या संधी शोधाव्या लागणार आहेत. तोपर्यंत ताठ आणि कणखरपणे जगण्यासाठी त्यांना मानसिक बळ द्यावे लागणार आहे.

साधारण अशा कुठल्या विषयावर चित्रे, व्यंगचित्रे कथा, कविता, लेख, निबंध, व्हिडीओ यांपैकी कोणत्याही स्वरूपात तुमच्या लेखणीतून व्यक्त होणारे तुमचे परखड विचार, तुमची मते `आजचा सुधारक’च्या जुलै २०२१ च्या अंकासाठी पाठवा. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २६ जून २०२१ पर्यंत aajacha.sudharak@gmail.com ह्या पत्त्यावर पाठवा.

`आजचा सुधारक’च्या www.sudharak.in संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

अभिप्राय 1

  • नक्कीच… या महामारी निमित्त समाज जिवन ढवळून निकाले आहे… काय गमावले, काय मिळवले; किती शिकवण, किती शिक्षा; या सगळ्याचा ‘हिशेब’ मांडायलाही कितीतरी काळ जावा लागणार आहे..
    या परीस्थीतील जे काही महत्वपूर्ण ‘कण’ हाती लागून मनातील विचार शब्दरूपात आणण्यासाठी प्रयत्न करू इच्छितो….
    धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.