रामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते?

नुकताच १ जुलैला डॉक्टर्स डे होऊन गेला. महिन्याभरापूर्वी रामदेवबाबाने ॲलोपॅथी आणि डॉक्टर या दोहोंबद्दलही अनुद्गार काढून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला होता. नंतर जूनच्या मध्यावधीत “डॉक्टर तो भगवान के रूप होते हैं” असे म्हणत सारवासारव केली आणि आपणही लस घेणार असल्याचे सूतोवाच केले.

असो. मुद्दा तो नाही.

या चर्चांतून काही प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, पॅथी-पॅथींमधली (उपचारपद्धतींमधली) भांडणे ही आपल्या वृथा अभिमानाची आणि अज्ञानाची द्योतक आहेत हे शहाण्यासुरत्या लोकांना तरी का समजू नये? दुसरे म्हणजे, एखाद्या गोष्टीमागचे विज्ञान अजून आपल्याला पूर्ण समजले नसेल, किंवा अजून त्याचा शोध लागला नसेल तर विज्ञानालाच मोडीत काढणे योग्य आहे का? तिसरी गोष्ट, एखाद्या उपचारपद्धतीत त्रुटी असतील तर त्याचा दोष उपचारकर्त्याला (डॉक्टरला) देणे, किंवा डॉक्टरांमधल्या अपप्रवृत्तींमुळे समस्त उपचारपद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे कितपत योग्य आहे? आणि मुख्य म्हणजे, औषध शोधल्याचा दावा करून कुठलाही ठोस वा सबळ पुरावा न देता, केवळ “तुमची औषधं तरी कुठं परिणामकारक आहेत, मग माझ्याच औषधाच्या मागं का लागता?” असा धूर्त पण तकलादू कांगावा कुणी करत असेल तर त्या परिस्थितीत त्याला उत्तरे देण्यासाठी आपला वेळ आणि श्रम वाया घालविण्याची कितपत गरज आहे?

रामदेवबाबा हे कुणी सामान्य किंवा अडाणी व्यक्ती नाहीत. त्यांना ॲलोपॅथी आणि तिच्या उपयुक्ततेविषयी नक्कीच पुरेपूर कल्पना आहे, पण तरीही ते जेंव्हा असे दोषारोपणाचे खेळ खेळतात तेंव्हा त्यामागे अनेक छुपे हेतू असू शकतात.

संभ्रमित लोकांचा संभ्रम अजूनच वाढवून आपले उत्पादन त्यांच्या माथी मारणे, येथपासून ते मोदी आणि योगी यांच्यावरचा लोकांचा रोष आणि त्याबद्दलच्या बातम्या हेतुपुरस्सर बाजूला सारणे, असे अनेक हेतू असू शकतात. म्हणून अशा परिस्थितीत रामदेवबाबाला विनाकारण महत्त्व देत आयती जागा देऊन ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने, IMA ने चूकच केली का? असेही वाटून जाते. कारण रामदेवबाबांनी IMA ला विचारलेले प्रश्न पाहता, यांना विज्ञानाचा ‘व’ तरी माहिती आहे का? प्रश्न उपस्थित करण्याआधी यांनी एकाही सुज्ञ माणसाचा सल्ला घेतला नसेल का? की, या व्यक्तीला केवळ वेळकाढूपणा करायचा आहे?, असेच प्रश्न आपल्या मनात येतात.

असो.

आपण आजच्या या लेखात रामदेवबाबांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ॲलोपॅथी, रोग आणि औषधे यांविषयी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडेसे जाणून घेणार आहोत. ज्यातून ॲलोपॅथीची व्याप्ती आणि मर्यादा लक्षात येतील.

१. एखादा रोग किंवा विकार आपल्या शरीरात आल्यावर कसा वागेल, काय परिणाम करेल, कधी जाईल, याचा अभ्यास करणाऱ्या आधुनिक औषधोपचार पद्धतीतील (ॲलोपॅथीला आता आधुनिक उपचारपद्धती म्हणले जाते) विभाग म्हणजे ‘पॅथॉलॉजी’. आणि आपल्या शरीरात संसर्ग/ रोग गेल्यावर किंवा विकार झाल्यावर तो शरीरात जो धुमाकूळ माजवतो, त्याचा ‘नैसर्गिक ओघ’ कसा असतो, त्याला ‘पॅथोजेनेसीस’ म्हणतात.

कोरोनाचा कोविड-१९ हा विषाणू ८०-८५% लोकांमध्ये काहीच लक्षणे दाखवीत नाही, १०-१५% लोकांत सौम्य ते मध्यम लक्षणे दिसतात, ७-१०% लोक अतिदक्षता विभागात (आयसीयु) जातात, तर ३-५% लोक मरण पावतात, असा आतापर्यंतचा अभ्यास आहे. मग जर कोणी दावा केला, की आमचे औषध घेतलेल्या लोकांना कोरोनाचा काहीच त्रास झाला नाही, तर ते बरोबर नाही. कारण ८०% लोकांना तसेही काही होत नाही. त्यांनी निवडलेले लोक नेमके याच ऐंशी टक्क्यांमधले असू शकतात. त्यांच्या इतक्या मोठ्या false negative परिणामांना कमी करायचे असेल तर पन्नास-शंभर रुग्णांवर नव्हे, तर हजारो रुग्णांवर प्रयोग झाले पाहिजेत, तेही आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधील.

२. या पॅथॉजेनेसीसच्या कुठल्या टप्प्यावर कुठले औषध उपयुक्त आहे, हे वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, काही प्रतिजैविके bacteriostatic असतात (म्हणजे ती जीवाणूंची गुणात्मक वाढ थांबवतात), काही प्रतिजैविके bacteriocidal असतात (म्हणजे असलेले जीवाणू ती मारून टाकतात), तर काही दोन्ही असतात. Anti viral drugs चेही तसेच असते. एकच प्रतिजैविक सगळ्या जीवाणूंवर चालत नाही. ठराविक प्रतिजैविकेच जीवाणूंचे पेशीआवरण (Cell wall) भेदू शकतात किंवा इतर पद्धतीने मारा करू शकतात. म्हणून एखादा संसर्ग झाला तर त्या आजारात अमुक प्रतिजैविक ९९% परिणामकारक असते, दुसरे एखादे ९०% परिणामकारक ठरते, तर आणखी एखादे ५०% परिणामकारक आहे, असे असते. तर एखादे अगदी शून्य उपयोगाचे देखील असू शकते. म्हणून, गेल्यावेळी संसर्ग झाल्यावर डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या होत्या म्हणून आताही मी त्याच गोळ्या परस्पर खातो, हे बहुधा बरोबर असत नाही.

३. Strain म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे जीवाणू/ विषाणू उत्परिवर्तित (mutate) होऊन स्वतःचे रूप बदलतात. ह्या त्यांच्या वेगवेगळ्या रूपांना strains (किंवा उपप्रकार किंवा serotypes) म्हणतात. उत्परिवर्तन म्हणजे जनुकांच्या पातळीवर घडलेला सूक्ष्म बदल. समजा एखाद्या गोऱ्या युरोपियन व्यक्तिला आफ्रिकेत कडक उन्हात राहावे लागले, तर त्याच्या त्वचेवरचे melanin deposition वाढू लागते, त्वचा गडद किंवा काळी व्हायला लागते. काही पिढ्यांनंतर तर जन्मतःच मूल गडद अथवा काळे असायला लागते. म्हणजे तो बदल जनुकांमध्येच समाविष्ट होतो. DDT हे पिकांवरचे औषध आले तेंव्हा ते जितके परिणामकारक होते तितके ते आता उरलेले नाही. म्हणजे त्या रोगाच्या जंतूंमध्ये DDT सोबत लढायची ताकद (अर्थात प्रतिकारशक्ती) काही पिढ्यांनंतर तयार झाली आहे. समजा, तुम्ही क्षयरोगाच्या औषधाच्या मात्रा सतत चुकवल्या किंवा उपचार मध्येच सोडले, तर क्षयरोगाचे जंतू औषधांना प्रतिसाद द्यायचे कमी किंवा चक्क बंद करतात. त्याला MDR TB म्हणतात. (Multi drug resistant TB) यात मग दुसरी औषधे वापरावी लागतात किंवा जगण्याची शाश्वती नसते. 

म्हणजे, उत्परिवर्तन ही त्या जीवाणूची किंवा विषाणूची जगण्यासाठीची धडपड असते. ‘यजमाना’सोबत (host) जुळवून घेण्यासाठीचा त्याने केलेला प्रयत्न असतो. HIV विषाणूचेदेखील दोन strains सापडले आहेत.

या वेगवेगळ्या उपप्रकारांमुळे तो विषाणू किंवा जीवाणू शरीरात कसा वागेल हे बदलते. यांचा शोध लावू शकणारे परीक्षण-संच बदलतात. यांची लक्षणे, ओघ, घातकता बदलते आणि यांवरची लस आणि औषधेही बदलतात. म्हणून आमच्या पुस्तकात दोन हजार वर्षे आधीच लिहून ठेवले आहे वगैरे बढाया वैज्ञानिक कधीच मारीत नाहीत.

पूर्वी आलेले MERS आणि SARS हे विषाणूही कोरोना कुटुंबातीलच आहेत. सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कोविड-१९ चा विषाणू Novel corona virus आहे. वेगवेगळ्या देशातून त्याचे आतापर्यंत शेकडो उपप्रकार समोर आले आहेत. त्यातले तीन serotypes सर्वत्र आढळणारे आहेत. आणि जे परीक्षण-संच सध्या उपलब्ध आहेत, ते ह्या सर्वत्र आढळणाऱ्या उपप्रकाराचा शोध घेऊ शकतात, पण बाकीच्या उपप्रकारांचा शोध लावण्याचे तंत्र थोडे कच्चे असल्याने false negative परिणाम येऊ शकतात.

४. प्रत्येक परीक्षण-संचाचे विशिष्टता (Specificity) आणि संवेदनशीलता (Sensitivity) असे प्रकार असतात.

विशिष्टता म्हणजे नेमका तोच विषाणू शोधण्याची क्षमता. तर संवेदनशीलता म्हणजे दिलेल्या नमुन्यामधून अत्यल्प प्रमाणही शोधून काढण्याची क्षमता. जितकी विशिष्टता जास्त, तितके false positive येण्याचे प्रमाण कमी, आणि जितकी संवेदनशीलता जास्त, तितके false negative येण्याचे प्रमाण कमी असते. आणि विशिष्टता अन संवेदनशीलता ही कोणत्याही परीक्षणाच्या प्रकारानुसार आणि परीक्षण-संचाच्या प्रकारांनुसारदेखील बदलते. 

कोविड-१९ साठीचे सध्याचे जे rtPCR परीक्षण-संच आहेत, त्यांची विशिष्टता ९०% आहे. म्हणजे परिणामांची खात्री करायला कमीत कमी दोन परिक्षणे करावी लागतात. दोन परिक्षणांनंतर false negative चे प्रमाण १% उरते आणि तीन परिक्षणांनंतर ते <०.१% होते.

५. लस म्हणजे व्हॅक्सिन. रोगाचा तो प्रतिबंधात्मक उपाय आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की उपाय आणि उपचार यातही फरक असतो. उपाय हे आधार देणारे असतात, तर उपचार हे नेमके असतात. वेदना कमी करण्याचे उपाय, लक्षणांवरचे उपाय, आणि प्रतिबंधात्मक (Preventive) उपाय, हा उपचारांचा भाग असतो. डोकेदुखीवर अमृतांजन लावणे या ‘उपाय’ झाला, ‘उपचार’ नाही. ती डोकेदुखी ताणतणाव किंवा इतर तात्पुरत्या कारणांनी असेल तर उपायांवर भागते, पण तसे नसेल तर मात्र MRI सारख्या तपासण्या करून योग्य निदान आणि त्याचे उपचार केलेच पाहिजेत. पण जर समजा कोणी अमृतांजन हाच डोकेदुखीचा उपचार आहे, असा प्रसार करू लागला तर ते शास्त्रीय दृष्टिकोनातून तितकेसे योग्य ठरत नाही.

लस ही रोग व्हायच्या आधीच प्रतिबंधात्मक म्हणून घ्यायची असते. ती खूप नेमकी असते, आणि ती त्या त्या रोगाच्या (मेलेल्या किंवा निष्प्रभ केलेल्या) विषाणूंपासूनच बनवली जाते. ती टोचल्यानंतर शरीरात त्या ठराविक विषाणूविरुद्धच प्रतिजैविके तयार होतात. म्हणून घाऊक प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी लस शोधल्याचा दावा करणे आणि कोणी त्यावर विश्वास ठेवणे हा तर अज्ञानाचा कळस आहे.

६. औषध म्हणजे तरी काय असते? ते रसायनच असते. एखादाच रेणू (molecule) किंवा मग संयुग (compound) असते. मग ते प्रयोगशाळेत बनवलेले असो किंवा जडीबुटीतून काढलेले असो, ते रसायनच असते.

आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) हे फार फार तर १५०-२०० वर्षांपासून आपली पाळेमुळे घट्ट करत आले आहे. ते काही आकाशातून पडलेले नाही! वनस्पती, खडक, बुरशी आणि इतरही अनेक नैसर्गिक स्रोतांपासून आपल्या रोगावर नेमका परिणाम करणारा रेणू (किंवा संयुग) आधुनिक पद्धतीने प्रयोगशाळेत वेगळे केले जाते. जसे जसे विज्ञानात निरनिराळे शोध लागत गेले तसे त्यांचा वापर या आधुनिक वैद्यकाने करून घेतला आणि अनेक रोगांवर नैसर्गिक मॉलेक्युल, अर्ध-कृत्रिम आणि पूर्णपणे कृत्रिम मॉलेक्युल शोधले. वैद्यकीय चाचण्या करून आणि पुरावा आधारित अभ्यास करून जास्तीत जास्त परिणामकारकतेच्या जवळ जायचा प्रयत्न केला. इतर दुष्परिणाम कमी कसे होतील हेही पाहिले. निरनिराळ्या विषाणूंचा आणि जीवाणूंचा अभ्यास (pathogenesis) करून त्यांच्या जीवनचक्रात औषधांचा वापर नेमका कुठे व कसा करू शकतो हे शोधले. त्यांच्यावर लसी शोधल्या.

उदाहरणार्थ, सर्पगंधा या वनस्पतीपासूनच Reserpin हे रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे औषध बनवलेले आहे. Papaver Somniferum या झाडापासून आपल्याला मिळते ती अफू. प्रयोगशाळेमधून त्याचा शुद्ध मॉलेक्युल मिळवला तर त्याला मॉर्फीन म्हणतात. मॉर्फीनच्या आण्विक रचनेतून (molecular structure) काही अणू बदलून आपण Diamorphine आणि Buprenorphin मिळवतो, ज्यात Morphine चे बरेच दुष्परिणाम कमी केलेले आहेत. आणि तशीच संरचना असलेले पण वेगळे असे Fentanyl, Alfentanyl, Sufentanyl ही अत्यंत भारी वेदनाशामक आपण पूर्णपणे प्रयोगशाळेमध्येच शोधलेली आहेत. ही मॉर्फीनपेक्षा कैक पटींनी भारी आहेत आणि सुरक्षितही आहेत. 

म्हणजे, अफू झाले वनौषधीसंबंधित औषध, Morphine झाले नैसर्गिक औषध, Buprenorphine झाले अर्ध-कृत्रिम औषध,  तर Fentanyl झालं कृत्रिम औषध. म्हणून, “वनौषधी म्हणजे चांगले आणि कृत्रिम म्हणजे वाईटच” असा आपल्याकडे समज आहे तो चुकीचा आहे. उलट कृत्रिम मॉलेक्युल ‘नेमका’ परिणाम करतो म्हणूनच तो शोधला गेलेला असतो आणि चाचण्या पास करून स्पर्धेमध्ये टिकलेलाही असतो.

७. कुठलेही औषध मग ते नैसर्गिक असो वा कृत्रिम, त्याचे pharmacodynamics ठरलेले असते. म्हणजे, ते तोंडावाटे दिले तर किती शोषल्या जाईल, स्नायूंत टोचले तर किती, सलाईनमधून दिले तर किती? वगैरे. दिलेल्यापैकी किती टक्के औषध ‘लक्ष्या’पर्यंत पोहोचेल, शरीरात किती काळ त्याचा सर्वाधिक परिणाम राहील, किती वेळानंतर मात्रा पुन्हा द्यावी लागेल, शरीरात आवश्यक तो परिणाम साधल्यावर त्याचे metabolism कसे होईल, शरीरातून ते बाहेर कसे पडेल? या सगळ्याचा अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. 

दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक औषधासाठी त्याचे सामर्थ्य (Potency) किती आणि कार्यक्षमता (Efficacy) किती हे माहिती असणे खूप आवश्यक असते. समजा एखादे औषध कॅन्सरवर खूपच परिणामकारक आहे, पण फक्त ५% लोकांतच तो परिणाम दिसतो, तर मग अशी औषधे पास होऊन बाजारात येऊ शकत नाहीत. चाचणी पास व्हायला ९० टक्क्यांच्या वर परिणामकारकता ५० टक्क्यांच्या वर तरी लोकांमध्ये दिसली पाहिजे. याला त्या औषधाचा ED50 इंडेक्स म्हणतात. Double blind study मध्ये औषधाची प्रतिकृती वापरून आपण परिणामकारकता किती आणि प्लासीबो किती ते तपासू शकतो.

उदाहरण सांगतो, क्रोसिन तापावर का चालते? तर ८०% लोकांत ते सर्वाधिक परिणाम (नव्वद टक्क्यांच्या वर) दाखवते म्हणून ते तापावर चालते. मग जर तुम्ही उरलेल्या वीस टक्क्यांत असाल तर तुम्ही म्हणता, “च्यायला, ह्या डॉक्टरचा गुण नाही आला, चला डॉक्टर बदलून बघू!” खरेतर तेंव्हा औषध बदलायची गरज असते. 

उद्या जर शरीरातील संप्रेरकातील (Hormonal) बदलांमुळे, प्रतिकारशक्तीतील किंवा जनुकांमधील बदलामुळे क्रोसिनला प्रतिसाद द्यायची आपली क्षमता कमी झाली, तर त्याला पर्याय म्हणून दुसरा मोलेक्युल शोधायची गरज आहे, क्रोसिनला कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाही. सतत अद्ययावत राहिली तरच ती उपचारपद्धती (पॅथी) टिकते. काहीही प्रतिक्रिया किंवा अभिप्राय न घेता, किंवा चाचण्या न करता तेच तेच औषध चालू ठेवले तर तुमच्या उपचारांची परिणामकारकता आणि उपचारपद्धती दोन्हीही काळाच्या कसोटीवर मागे मागे जाऊ लागतात. 

त्यासाठी सतत संशोधनाची गरज असते, वैद्यकीय चाचण्यांची गरज असते, अभिप्रायांच्या नोंदींची गरज असते. म्हणून पोकळ दावे करून काही उपयोग नाही, परिणाम मिळाले पाहिजेत आणि त्यात सातत्यही राहिले पाहिजे. 

उत्क्रांतीत प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रात बदल होत असतात. पिढ्या दर पिढ्या रोगप्रतिकारशक्तीत बदल घडतो, एकाच वेळेची समाजाची सामूहिक प्रतिकारशक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीगणीकही प्रभाव कमीजास्त होऊ शकतो. प्रत्येकाचे गुणसुत्रीय ढाचे वेगळे असल्याने औषधाचे pharmacodynamics बदलते. (दारू प्रत्येकाला वेगळी चढते, तसे काहीसे ) पर्यावरणीय, व्यावसायिक, आणि सामाजिक-आर्थिक घटकही औषधांच्या pharmacodynamics वर प्रभाव टाकत असतात. त्याचा सतत अभ्यास करून नोंदी ठेवाव्या लागतात. ‘सब घोडे बारा टक्के’ असं विज्ञानात नसते. 

८. औषधे ही रसायनेच असतात हे आपण पाहिले. जे एखादे रसायन आपण अन्न म्हणून खात असू, ते दुसऱ्या एखाद्या प्राण्यासाठी विषदेखील असू शकते. सडलेले मांस खाल्ले तर आपण मरू कदाचित, पण गिधाडे ते सहज पचवू शकतात, त्यांचे ते अन्न असते कारण ते पचवायची द्रव्ये (Enzymes) त्यांच्याकडे असतात. विंचवाच्या विषाचे भिंतीवरच्या पालीला काही होत नाही, कारण ते रसायन पचवायची/त्याला निष्प्रभ करायची/किंवा त्याचा परिणाम न होऊ द्यायची ‘व्यवस्था’ पालीत विकसित असते. तसेच माणसातही काहींना विंचू चढतो तर काहींना नाही. सापाच्या किंवा विंचवाच्या विषाचा एखाद्यावर कमी परिणाम झाला (किंवा परिणामच झाला नाही) तर नेमके त्यावेळी त्याला खायला दिलेल्या एखाद्या झाडपाल्याला किंवा कुठल्या मंत्रतंत्राला आपण मानणार असू, तर ते आपले निव्वळ अज्ञान असते. 

९. जेंव्हा कोणतीही गोष्ट औषध म्हणून शोधली जाते, किंवा तसा दावा करण्यात येतो तेंव्हा त्याच्या शास्त्रशुद्ध चाचण्या घ्याव्या लागतात. 

मी तर म्हणतो, एखाद्याने कोरोनावर उपाय म्हणून ‘माती’ जरी शोधली, तरी काही हरकत नाही. त्या मातीतील घटकांच्या रेणूंचे प्रमाणीकरण करणे, इतर प्राण्यांमध्ये त्याची आधी यादृच्छिक नियंत्रित चाचणी (randomized controleed test) घेणे, मग मानवी स्वयंसेवकांमध्ये Double blind study करून प्लासिबो परिणामांना नाकारणे, मोठ्या प्रमाणावर त्याच्या मानवी चाचण्या होणे आणि मग FDA कडून मान्यता मिळवणे. अशी चाचण्यांची जगमान्य पद्धत आहे, ती पार केली पाहिजे. औषधांच्याच बाबतीत नव्हे तर संशोधनाच्या इतर शाखांतदेखील चाचण्यांची अशीच पद्धत असते. म्हणून ‘आमच्या उपचारपद्धतीची औषधे तुमच्या चाचण्या लावून कशा तपासण्यात येतील’ असं म्हणणारा निव्वळ अज्ञानी असतो. 

रोगावरचे कोणतेही उपाय हे औषध नसतात, ते फक्त उपाय असतात. उपयुक्तता चाचणीतून गेल्याशिवाय आणि FDA ची मान्यता असल्याशिवाय कोणताही उपाय ‘औषध’ होत नाही. कोणाच्या भावनांना किंवा वैयक्तिक अनुभवांना तिथे स्थान नसते. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असा मामला असतो. केवळ ‘आमच्या पुस्तकांत लिहिलंय’, ही गोष्ट ‘सबब’ म्हणून चालून जाईल, पण ते शास्त्रशुद्ध होत नाही.

१०. अजून एक प्रकार कोणत्याही औषधाच्या बाबतीत महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्यांचे प्रमाणीकरण. एका मिलीग्राममध्ये किती सक्रिय रेणू असावेत, एक मात्रा किती मिलिग्रामचा असावी, याला प्रमाणीकरण म्हणता येईल. समजा एखादी कॅप्सूल लहान आतड्यात विरघळणारी बनवायची असते, कारण तिथे त्या औषधाला जास्त मात्रेत शोषून घेतले जाते, पण जर का ती जठरातच विरघळून गेली तर उपयोग होत नाही, अपेक्षित परिणाम मिळत नाही. 

घरगुती बनवल्या जाणाऱ्या औषधांच्या किंवा FDA चे काहीही नियंत्रण नसलेल्या औषधांच्या प्रमाणीकरणाची शाश्वती असेलच असे नाही. 

११. रोग आणि विकार हेदेखील वेगवेगळे आहे. रोग म्हणजे disease, आणि विकार म्हणजे disorder. ‘Order’ बिघडल्याने होणारे आजार म्हणजे disorders. मधुमेह हा विकार आहे तो रोग नाही. तसेच काही आजार हे मनोकायिक असतात. मनोकायिक म्हणजे Psychosomatic. याबद्दल गुगल करा, तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आपल्याला जालीम औषध मिळाले आहे, किंवा आपल्याला चांगला डॉक्टर भेटला आहे या विचारांनीसुद्धा रुग्णाच्या लक्षणांमध्ये फरक पडायला लागतो. “डॉक्टरने दोन शब्द गोड बोलले तरी निम्मा आजार पळून जातो” हे आपल्याकडे म्हटले जाते ते यामुळेच. पण याचाच फायदा बऱ्याच उपचारपद्धती घेतात. उपचारपद्धतीचे सोडा, याचा फायदा बाबा, बुवा, हकीम यांनादेखील होतो. मंत्रतंत्र, गंडादोरा यांनी होणाऱ्या काहीशा मनोकायिक परिणामांमुळे त्यांचे फावते, अन् त्याचीच प्रसिद्धी जास्त होते. पण ज्यांना काही फरक पडला नाही ते लोक मात्र गप्प बसतात अन उपचारांचा मार्ग बदलतात.

खूप साऱ्या लोकांना आपल्याकडे ‘आजाराचा स्वीकार’ करता येत नाही. आपल्याला आजार झाला आहे, किंवा आपला आजार बरा होणारा नाही, याला सामोरे जाता येत नाही. आजाराविरुद्ध लढण्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद कमी असल्यास माणूस चमत्कारांच्या आणि भोंदूच्या मागे लागतो. मग हे भोंदू लोक देवाधर्माच्या आधाराने किंवा सिद्धी प्राप्त असल्याचा बहाणा करत अनेक तंत्रमंत्र, तोडगे, झाडपाला, जडीबुटी विकतात आणि श्रीमंत होतात. घेणाऱ्याला पण आजारासाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळते. पण हा उपचार नसतो. त्याने तुम्ही आर्थिक आणि भावनिक दुष्टचक्रात सापडता.

“इसे सुबह शाम खाने से डायबेटीस, ब्लडप्रेशर, तथा हृदयरोग जैसी बिमारियां नष्ट होगी” म्हणणारी औषधे, एक महिन्यात वजन उतरवून शरीर पिळदार करणाऱ्या गोळ्या, स्तन सुडौल करणारी क्रीम्स, आणि भूक वाढवते, प्रतिकारशक्ती वाढवते म्हणत जाहिरातबाजीतून हातोहात खपणारी टॉनिके. ही सगळी याच श्रेणीतली.

असो.

आधुनिक उपचारपद्धतीमधली पूर्वी शोधलेली कितीतरी औषधे आज कालबाह्य झाली आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक परिणामकारक औषधांचे शोध लागले आहेत आणि अजून ते सुरूच आहे. एखादे औषध FDA मान्य झाले, पुस्तकांत छापले म्हणजे ‘ते आता कायमचे झाले’ असे होत नसते. प्रतिक्रिया घेण्याची त्याची प्रक्रिया चालूच असते. म्हणून २०० किंवा २००० वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात दिले आहे म्हणून आपण त्याच त्या औषधांची भलामण करत असू, (आणि त्यामुळे ते औषध प्रमाणित चाचण्यांना सामोरे जात नसेल), तर त्याच्या परिणामकारकतेची विश्वासार्हता कमी होते, जे आपल्याच उपचारपद्धतीसाठी घातक असते. समजा, आज जर कोणी डॉक्टरला म्हणाले की, “पेनिसिलिनचा वापर अलीकडे अजिबात सुरक्षित नाही”, तर बोलणाऱ्याच्या अंगावर धावून जाणारा ॲलोपॅथीक डॉक्टर मी तरी अजून पाहिलेला नाही. किंवा एकेकाळच्या प्रसिद्ध Nimesulide वर बंदी घातल्यावर USFDA ला कोणी शिवीगाळ केल्याचेही ऐकिवात नाही. 

आपली उपचारपद्धती टिकवायची असेल तर ती जास्तीत परिणामकारक आणि विश्वासार्ह होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. औषधांच्या सत्यासत्यतेवर कोणी शंका घेतली की नाराज न होता, त्यांनी काय संदर्भ घेतलेत, त्यांच्याकडील विदेचा (data) आधार काय आहे, नमुना-संख्या किती निवडली आहे, पूर्वग्रह नाकारले आहेत का, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. तरंच आपण विज्ञानाचे विद्यार्थी. आपण ‘औषध की तरफ से’, नाही तर ‘सायन्स की तरफ से’ असलो पाहिजे.

आपल्याला आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी माहिती असते, पण जगात मान्यता असलेल्या- नसलेल्या मिळून शंभरेक तरी उपचारपद्धती असतील. कोणत्याही एखाद्या उपचारपद्धतीच्या परिणामकारकतेविषयी बोलले की “तुम्हाला ज्यातील ज्ञान नाही त्याविषयी बोलता कशाला” असे प्रत्येकजणच विचारतो. वास्तविक हा तर्कदोष (Fallacy) आहे. प्रत्येकवेळी अनुभव घेतल्याशिवाय बोलूच नये असे नसते. त्या त्या विषयी संबंधित असलेल्या अंतरर्देशीय व्यासपीठांवर असलेल्या अभ्यासक चर्चा यांवरूनही आपल्याला निष्कर्ष काढता येतो.

एखाद्या औषधाविषयी किंवा उपचारपद्धतीविषयी बोलले की त्या उपचारपद्धतीचे लोक (डॉक्टर्स/वैद्य) ते स्वतःवरच का घेतात? समजा, ‘आपल्या उपचारपद्धतीवर खूप प्रेम आहे म्हणून!’ असे गृहीत धरले तर त्या उपचारपद्धतीच्या उन्नयनासाठी आपण काय प्रयत्न करतो? त्या उपचारपद्धतीची आपली निवड ऐच्छिक होती का? की, MBBS मिळालं नाही म्हणून नाईलाजाने आपण BAMS किंवा BHMS घेतले? आताही त्या उपचारपद्धतीचेच उपचार रुग्णाला देण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत किंवा स्वतःस घेण्यासाठीही किती प्रयत्नशील आहोत? आपल्या मुलांनापण त्या उपचारपद्धतीचेच शिक्षण देण्यासाठी आपण किती आग्रही असू? या प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनीच शोधायची आहेत.

“कोणत्याही औषधांबद्दल किंवा उपायांबद्दल अवास्तव दावे करताहेत तर करू देत की, ज्यांना घ्यायचे आहे ते घेतील, ज्यांचा विश्वास नाही, ते नाही घेणार”. असे आपल्याकडे सर्रास म्हटले जाते. त्यात ह्या कोविडच्या भीतीच्या काळात तर जास्तच. पण आपल्या या “काही तोटा तर नाही ना, मग करून बघायला काय हरकत आहे” अशा मानसिकतेचाच फायदा उठवतात लोक. आपल्या विश्वासावर आणि भावनांवर त्यांचा बाजार मांडतात, आणि कसलेही सुरक्षित, प्रभावी, प्रमाणीकरण वगैरेंचे शिष्टाचार न पाळलेले उपाय ‘औषध’ म्हणून आपल्या माथी मारू शकतात. ही फसवणूक नव्हे तर काय आहे? त्यामुळे एखाद्याच्या जीवावरदेखील बेतू शकते.

अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भोंदू लोकांच्या दाव्यांमुळे अन त्यांच्या तथाकथित औषधांमुळे लोक वैद्यकीय उपचार घ्यायचे सोडतात आणि मग अत्यंत विकार अतिशय वाईट पद्धतीने क्लिष्ट होतात. अनेकदा भोंदूच्या धंदेवाईक भिकारचोटपणापायी लोकांचे आजार बळावतात आणि ह्यांच्या नादी लागून सुरुवातीचा महत्त्वाचा वेळ घालवल्याने कॅन्सरसारखे आजार पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. म्हणून, पॅरॅलीसिसपासून कॅन्सरपर्यंत सगळे बरे करणारा सॅबिस्टीन असो, किंवा होली वॉटर पाजणारे भोंदू असो, उलेमा सुलेमा असोत किंवा कोणी दळभद्री बाबा बुवा असो, कोणी का असेना, माझे म्हणणे आहे, यांनी काहीपण गंडे दोरे बांधावे, कसलेही मंतरलेले पाणी पाजावे, पण लोकांना वैद्यकीय उपचार बंद करायला मात्र सांगू नये, अन् लोकांनीही त्यांचे ऐकून ॲलोपॅथीक उपचार बंद करू नयेत असे मला वाटते.

हे लोक स्वतःच्या औषधांच्या विक्रीसाठी जितकी विपणनतंत्रे वापरतात आणि जितकी प्रसिद्धी ते स्वतःच्या तात्पुरत्या परिणामांना देतात, तितकी अपकिर्ती त्यांच्या अपयशाची मात्र होत नाही. फसलेले लोक “आपल्यालाच पथ्यपाणी सांभाळणे झाले नाही” वगैरे, अशा प्रकारच्या काहीतरी समजूती करून घेऊन गप्प बसतात, आणि नवीन लोक फसतच जातात.

असो.

ॲलोपॅथी आरोपीच्या पिंजऱ्यात का उभी केली जाते? या मुद्द्याचा दुसरा भाग आता पाहू.

ॲलोपॅथी आणि डॉक्टर्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ॲलोपॅथी डॉक्टरांबद्दलचा किंवा महागड्या रुग्णालयांबद्दलचा सगळा रोष उपचारपद्धतीवरच निघतो. प्रत्येक औषधात, प्रत्येक आजारात, प्रत्येक वैद्यकीय प्रक्रियेत आणि प्रत्येक शस्त्रक्रियेत गुंतागुंत आहेच. आणि ती कधीही होऊ शकते. बऱ्याचदा ती होणे डॉक्टरांच्या हातात नसते. (योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा). बऱ्याच जणांना याची जाणीव नसते. डॉक्टरने सांगूनदेखील तेवढे गांभीर्य लोकांमध्ये येत नाही. उपचाराच्या मर्यादा लक्षात न घेता, केवळ उपचार स्वस्त मिळावा, डॉक्टर रात्रंदिवस उपलब्ध असावा, आणि रुग्णालयात नेलेला प्रत्येक रुग्ण बरा होऊनच बाहेर पडावा, अशी अवास्तव आणि अवाजवी अपेक्षा घेऊन भारतीय समाज वागतो आहे. काहीजण तर आपण जणूकाही डॉक्टरांमुळेच आजारी पडलोय असेच समजतात. दरवर्षी मी चेकअप करून घेतो, तरी कसे काय असे झाले? असा जाबही विचारतात. 

आजार झाल्याची, स्वतःच्या गुणसुत्रांची किंवा खाण्यापिण्याच्या सवयींची जबाबदारी कोणालाच नको असते. दारू पिऊन यकृत आणि काहीबाही खाऊन आतडे खराब झाले असले तरी रुग्णालयात दाखल झाले की लगेच फरक पडावा, किंवा डॉक्टरला हमखास यश यावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे दहा पंधरा दिवस अतिदक्षता विभागात प्रयत्न करूनदेखील यश मिळाले नाही तर आपल्या शरीराला दोष देण्याऐवजी लोक “उपचारांना अयशस्वी ठरले” असेच म्हणतात. आपले ‘पैसे वाया गेले’ अशीच भावना असते. डॉक्टरांनी आपल्याला लुटले असेच वाटत राहते. मग असे लोक आयुर्वेदिक जडीबुटीवाल्यांच्या किंवा होमिओपॅथीच्या कच्छपी लागले तर नवल नाही.

अलीकडच्या काळातील धकाधकीचे जीवन, त्यात आहार नीट नाही, व्यसनाधीनता, वाढते प्रदूषण, भेसळ, कीटकनाशकांचे वाढते प्रमाण, पुरेश्या झोपेचा अभाव, वाहने चालविण्याची शिस्त नाही, उपचारासाठी वेगळे बजेट काढून ठेवण्याची गरज वाटत नाही, स्वतःला म्हातारपणाचे आर्थिक नियोजन करता येत नाही. आणि मग छातीत दुखायला लागते, तेव्हा अतिदक्षता विभागात दाखल होतात आणि जिवंत बाहेर आल्यावर “डॉक्टरने कसे लुटले” हे सांगत फिरतात. इतकेच काय, पण सांगितलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्या सामान्य आल्या तर खुश होण्याऐवजी पैसे वाया गेल्याचे वाईट वाटणारे बरेच जण आहेत. अशा एक ना अनेक गोष्टींमुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे शंभर टक्के समाधान होणे अशक्य आहे. 

त्यामुळे डॉक्टरांच्या उपचारांनी गुण येत नसेल तर आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीला दोष देण्याऐवजी किंवा आरोग्यशास्त्राच्या मर्यादा लक्षात घेण्याऐवजी लोक डॉक्टरच्या हेतूवरच शंका घेऊ लागले आहेत. आणि “डॉक्टर, तुम्ही तुमचे प्रयत्न करा, बाकी आमचे नशीब” असा विश्वास आपल्या फॅमिली फिजिशियन वर दाखविणारी पिढी हळूहळू लुप्त होत गेली आहे.

वास्तविक पूर्वीपेक्षा आताच्या समाजात खूप बदल झालेले आहेत. व्यवसाय करण्यामागील हेतू ‘पैसे कमावणे’ हा होऊ लागला आहे. कारण समाजातील व्यक्तीची ‘पत’ ही त्याच्या ज्ञानावरून अथवा कौशल्यावरून न ठरता ती पैशावरून ठरू लागली आहे. मग याला डॉक्टर तरी अपवाद कसे ठरणार? डॉक्टरांमध्येदेखील ‘पैसे कमावणे’ ही भावना वाढीस लागू लागली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने वैद्यकीय पेशातील ‘गैरवर्तनां’ना सुरुवात झाली. मार्केटिंगची सुरुवात झाली. अशातच ‘ग्राहक संरक्षण कायदा’ (CPA) लागू झाला आणि परिस्थिती आणखीनच बिघडली.

डॉक्टरांमधील काही जण जे गैरवर्तन करतात त्याला अधिक तीव्र करून, अख्खे वैद्यकीय क्षेत्रच कसे भ्रष्ट आहे, याचा समाजावर भडक मारा करून डॉक्टरांविरुद्ध ‘सामाजिक युद्धा’ची परिस्थिती निर्माण करण्यात या इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. आणि गेल्या आठ-दहा वर्षांपासून तर परिस्थिती जास्तच चिघळवणे चालू आहे.

या व अशा अनेक गोष्टींमुळे ॲलोपॅथी आणि ॲलोपॅथी डॉक्टर या दोहोंबद्दल समाजात रोष वाढत राहतो, आणि त्याचाच फायदा रामदेवबाबांसारखे लोक घेत राहतात.

अहमदनगर

अभिप्राय 3

  • सुधारकी परंपरेला साजेसा उत्तम लेख. तरी असहाय्यतेचे मानसशास्त्र अधिक प्रभावी असते.

  • मुळात समाज मूर्ख आहे आणि आम्ही शहाणे आहोत असे जनरलाईज्ड स्टेटमेंट चुकीचे आहे. ॲलोपाथिक डाॅक्टर जाता येता आयुर्वेद आणि होमिओपाथिची टर उडवतात कोणता होमिओपाथ किंवा आयुर्वेदिक डाॅक्टर अंगावर धावून आलेला पाहिला का ? या देशातील preferred system ही ॲलोपाथिक मेडिसीन असताना का गळे काढता ?आयुर्वेद आणि होमिओपाथिक शिक्षणपद्धती ही अनेक वर्षे ॲलोपाथच सांभाळत होते. तंत्रज्ञान ही काही ॲलोपाथिची मक्तेदारी नाही मग इतर पॅथींच्या शिक्षण पद्धतीत नवीन तंत्रज्ञानाचा समावेश का करत नाही ? जर दुसरे मत, पॅथी अवैज्ञानिक वाटत असेल तर त्या बंदच होतील असे का पहात नाही? आपलाया आकलनापलिकडे जे घडते ते समजत नाही हे म्हणणे वैज्ञानिक आहे का उरलेले अनुभव हा निव्वळ भास आहे असे म्हणणे वैज्ञानिक आहे ? विज्ञानाची सुरवात here say with सोर्समधून होते आणि प्रयोगातून सिद्ध होते हेबरोबर आहे पण ते पुढे नेताना स्वतःचा वेगळा कप्पा का करता ? ज्या सर्पगंधापासून रेसेरपिन बनविले त्या रेसेरपिनला असलेले साईड इफेक्ट सर्पगंधाला का नाहीत ? ज्या सुश्रुताने सर्जरीची सुरवात केली त्या आयुर्वेदिक डाॅक्टरना सर्जरीची परवापगी दिली तर आय एम ए ला देशव्यापी संप का करावा वाटतो ? तेंव्हा हे लक्षात घ्यावे कोणी काही म्हणण्याने विज्ञानाला फरक पडत नाही पण संघटित व्यावसायिकंचा अहंकार दुखावतो म्हणून असे प्रसंग घडतात . तेव्हा समाजाला मूर्ख ठरविण्याआधी आत्मपरीक्षण करा. एवढेच.

  • डाँ. सचिन लांडगे यांनी हा लेख जरी रामदेवबाबांच्या विधानांना प्रतिरोध करण्यासाठी लिहिलेला असला तरीही त्यांनी एकूणच औषध निर्मितीच्या प्रक्रिये संबंधात उपयुक्त माहिती प्रस्तूत करून लागते ली आहे. पण आलोपाथी ही अधुनिक चिकित्सा पध्दत असली तरी आयुर्वेदिक, होमिओपाथी, युनानी औषधोपचार पध्दती कुचकामी आहेत असे म्हणणे तद्दन चूक आहे. त्यांनीच लेखात म्हटल्या प्रमाणे आलोपाथी ही अलिकडच्या एक, दोन शतकातच आस्तित्वात आलेली आहे. तत्पूर्वी आयुर्वेदिक आणि युनानी औषधंच घेतली जायची व ती उपयुक्तही ठरत असत. आज आलोपँथीमध्ये ऋग्ण डाँक्टरकडे गला की त्यालाच काय आजार आहे याबद्दल सांगावे लागते व ते ऐकून आलोपाथी डाँक्टर वेगवेगळ्या चाचण्या करायला सांगतात. चाचण्यांचे रिपोर्ट आल्यावर औषधोपचार करतात. पण निष्णात वैद्य नाडी तपासून ऋग्णाच्या आजाराचे निदान करून त्याला काय त्रास होत आहे ते ऋग्णाला सांतात व ऋग्णही ते बरोबर असल्याचे बोलल्यावर औषधोपचार करतात. दोन, तीन दशकांपूर्वी गल्लीतील फँमिली डाँक्टर ऋग्णाच्या नातेवाईकाने ऋग्णाच्या आजारासंबंधीची माहिती ऐकून औषध देत व ऋग्णाला आराम पडत असे. क्षयरोगाला राजयक्षमा असे संबोधले जायचे व त्यावर जालीम औषधंही उपलब्ध असायची. शुश्रुतमुनी वैदिक काळात शल्यचिकित्सासुध्दा करत असत. आजच्या प्लास्टिक सर्जरित शुश्रुतमुनिंनी सांगितलेली पध्दतच वापरली जात असल्याचे माझ्या वाचनात आलेले आहे. आज जरी सर्रास लोक आलोपाथी पध्दत स्वीकारत असले; तरी डाँ. लांडगेंनी त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे अलिकडे डाँक्टरांनी वैद्यकीचा व्यापार (मी व्यवसाय म्हणत नाही) केलेला आहे. नुसते पोट दुखत असले तरी अँसिडिटीचे किंवा दुसरे औषध देऊन न पहाता ऋग्णाला अनेक चाचण्या करायला सागितले जाते. कारण पँथ्यालाँजिस्ट कडून त्यांना चाळीस टक्के किंवा जास्त कमिशन मिळत असते. सगळेच डाँक्टर असे असतात असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण आता चालू असलेल्या करोना उद्रेकाच्या काळात अनेक डाँक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी रात्रीचा दिवस करुन सेवा देत आहेत; तर कांही डाँक्टर या साथीचा परवणी सारखा उपयोग करून ऋग्णांना लुटतच आसल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य जनता डाँक्टरला देव मानतात. पण अशा अपमतलबी काही डाँक्टरांमुळे लोकांचा डाँक्टरांवरील विश्वास उडतो आणि सज्जन डाँक्टरांनाही कधी बळीचा बकरा बनावे लागते ही दुर्दैवी स्थिती आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.