असं केलं तर..

करोनाच्या लाटांवर लाटा फुटत आहेत. या साथीने आपल्या आरोग्यव्यवस्थेतल्या अनेक त्रुटी उघड्या पाडल्या आहेत. यातील काही आपल्याला आधीच माहीत होत्या. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमतरता ही त्यातली एक.  

पण ज्या साथीमुळे ही कमतरता ठसठशीत झाली, त्याच साथीदरम्यान, साथीसारख्याच पसरलेल्या तंत्रज्ञानाने, यावर मात करणे शक्य आहे. इंटरनेट आणि आभासी उपस्थितीतील शिक्षण आता अचानक पुढ्यात आले आहे. ह्याचे तोटे आहेत तसे फायदेही आहेत.  

आपल्याकडे फॅमिली डॉक्टरांची कमतरता आहे यामागील कारण अर्थातच आर्थिक आहे. एक एमबीबीएस डॉक्टर निर्माण करण्यासाठी प्रचंड पायाभूत सुविधा आणि भरपूर संसाधने लागतात. याला अवाच्यासवा खर्च येतो. तो सरकारला परवडत नाही. यावर उपाय म्हणून सरकारने हे क्षेत्र खाजगी क्षेत्राला मोकळे करून दिले आहे. इथे शिक्षण, अर्थातच, खर्च (अधिक संस्थाचालकांचा नफा) भरल्यानंतरच प्राप्त होते. या क्षेत्रातही बड्या भांडवलदारांसाठी एमबीबीएस आणि छोट्या भांडवलदारांसाठी अन्य पॅथीय कॉलेजेस अशी विभागणी झाली आहे. कारण मुळातच सरकारी नियमानुसार, अन्यपॅथीय शिक्षणासाठी संसाधने, पायभूत सुविधा, इत्यादी कमी लागतात. हा सरकारी निर्णय असल्याने असे का आणि कसे?, हा प्रश्न अप्रस्तुत आहे. 

आज प्राथमिक आरोग्यसेवा पुरवण्याचे काम अशी अन्यपॅथी शिकलेली मंडळी प्राधान्याने करत असतात. बरीच सक्षमपणे करत असतात. मात्र यात अनेक तोटे आणि धोकेही आहेत. वैयक्तिक आणि सार्वजनिकदेखील.

या डॉक्टरांना आधुनिक औषधशास्त्र शिकवलेलेच नसते. पण प्रॅक्टिसमध्ये तर आधुनिक वैद्यकीचीच औषधे वापरावी लागतात. त्यामुळे ते शिकणे आवश्यकच असते. आधुनिक वैद्यकीच्या जगात मागच्या दाराने प्रवेश मिळतो हे जाणूनच तर हे अन्यपॅथीय शिक्षण निवडलेले आणि सोसलेले असते. ‘जी पॅथी शिकला आहात तीच तेवढी औषधे द्यावीत’, असा नियम अंमलात आला तर ही अन्यपॅथीय महाविद्यालये, उद्या ओस पडतील. त्यामुळे स्वतः धडपडून, कोणाच्यातरी हाताखाली काम करत, हे डॉक्टर शिकतात. असे हे शिक्षण अर्थातच अर्धवट आणि कामचलाऊ असते. 

यामुळे आरोग्यव्यवस्थेत सतत एक दुय्यम गडी म्हणून वागणूक मिळते. करोनाकाळातही खुद्द सरकारनेच या डॉक्टरांना कमी मानधन देऊ केले. ही एक प्रकारची पिळवणूकच आहे. हे शोषणच आहे. सरकार दरबारी ही अवस्था म्हटल्यावर समाजात आणि वैद्यकक्षेत्रात पुरेसा सन्मान राखला जात नाही. पुरेशी बुद्धिमत्ता असूनही निव्वळ अन्यपॅथीय शिक्षण घेतल्यामुळे विकासाच्या, पदव्युत्तर शिक्षणाच्या, संशोधनाच्या संधींपासून वंचित राहावे लागते.

आता आयुर्वेद पदवीधरांना एमडी, एमएस वगैरे पदव्या दिल्या जातात. मात्र पदव्युत्तर पदवीचे हे भेंडोळे बरेचदा पोकळच असते. या अभ्यासक्रमात आधुनिक औषधोपचार करण्याचे ‘प्रशिक्षण’ (Training) तेवढे मिळते, ‘शिक्षण’ (Education) नाही. दुय्यमत्व काही संपता संपत नाही. उदाहरणार्थ आयुर्वेद करून तुम्ही, एमडी स्त्रीआरोग्यतज्ज्ञ, झालात तरीही नसबंदी, वैद्यकीय गर्भपात व सोनोग्राफी; या स्त्रीआरोग्यतज्ज्ञाने करावयाच्या प्राथमिक गोष्टी करण्यास तुम्ही कायद्याने पात्र ठरत नाही! कायद्याची तलवार सतत टांगती राहते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

पण या साथीनेच ठसठशीतपणे पुढे आणलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, एमबीबीएस / फॅमिली डॉक्टर / प्राथमिक आरोग्यतज्ज्ञ होण्यासाठी इतक्या मोठ्या सोयीसुविधांची गरज आता राहिलेली नाही. 

दोनच उदाहरणे देतो म्हणजे माझा मुद्दा स्पष्ट होईल. शरीररचना (अनॅटॉमी) शिकण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे, प्रत्यक्ष शवविच्छेदनापेक्षा कित्येक पट सरस असे दर्शन, व्हिडिओजच्या माध्यमातून सहज शक्य झाले आहे. आजची मुले हेच प्राधान्याने वापरत असतात. प्रामाणिकपणे सांगायचे तर, शवविच्छेदन आता थ्रिल आणि बाहेर मिरवणे, यापुरतेच उरले आहे. मृतदेहांची चिरफाड करून मिळणारे ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळणारे ज्ञान, यात प्राथमिक आरोग्यतज्ज्ञ होण्यासाठी, तंत्रज्ञानयुक्त ज्ञानच उजवे ठरेल.   

डॉक्टर होण्यासाठी निरनिराळे पेशंट प्रत्यक्ष तपासण्याची आवश्यकता असते. मात्र कोणत्याच डॉक्टरला सर्व प्रकारचे पेशंट बघायला मिळत नाहीत. अनेक आजार, त्यात दिसणारी लक्षणे, तपासण्यांच्या रिपोर्टमधील बारकावे, याची माहिती आता व्हिडिओच्या माध्यमातून सहजपणे शिकवता येते; शिकता येते. असे अत्यंत स्तुत्य प्रयत्न ठायी ठायी चालू आहेत. 

तेंव्हा बड्या बड्या इमारती, मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा, शेकडो रुग्णांसाठीची ऐसपैस इस्पितळे आणि भला मोठा स्टाफ; यातला बराचसा भाग नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनावश्यक ठरतो. याचा अर्थ ‘पत्रद्वारा (किंवा ऑनलाईन) डागदर’ बनता येईल असा मात्र नाही. प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष पेशंट, प्रत्यक्ष शिक्षक, त्यांनी शिकवणे; ह्याला पर्याय नाहीच नाही. पण प्राथमिक वैद्यकीय शिक्षणाचा डोलारा आता निव्वळ प्रत्यक्षावर उभारण्याची गरज नाही, एवढाच याचा अर्थ. आज प्रत्यक्षाहून प्रतिमाच उत्कट आहे. म्हणूनच हे नवे प्रतिमान सुचवतो आहे.  

उलट बड्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक आरोग्यसेवेचे शिक्षण मिळणे दुरापास्त असते. जेजे किंवा ससून म्हणजे काही प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रे नाहीत. यासारख्या रुग्णालयामध्ये येणारे आणि दाखल होणारे, बहुतेक पेशंट अतिशय गुंतागुंतीचे आजार घेऊन आलेले असतात. यासाठीच तर ही इस्पितळे उभारलेली आहेत. प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या मंडळींनी अशा आजारांचे निदान, उपचार, वगैरे करणे अजिबातच अपेक्षित नाही. मात्र साध्यासुध्या आजाराचे रुग्ण, अशा ठिकाणी पुरेशा संख्येने पाहायलाच मिळत नाहीत. सर्व यंत्रणा ही अतिशय तीव्र आणि गुंतागुंतीचे आजार असलेल्या लोकांच्या सेवेस गुंतलेली असते. आला जरी कुणी थंडी तापाचा पेशंट, तरी या यंत्रणेच्या चरकातून जाताना, भावी प्राथमिक आरोग्यसेवकांपर्यंत त्याची हाताळणी यथायोग्यरीत्या पोहोचतच नाही. सारी मंडळी चित्तचक्षुचमत्कारिक काय दिसते इकडे डोळे लावून बसलेली असतात. 

छोटे दवाखाने आणि छोटी कॉलेजेस या त्रुटीवर सहज मात करू शकतील. छोट्या जागेत, अगदी सिव्हिल हॉस्पिटलच्या आश्रयाने, प्राथमिक आरोग्यतज्ज्ञ निर्माण करणारे महाविद्यालय सहज चालू होऊ शकते. अशी महाविद्यालये नव्याने उभरण्याचीही गरज नाही. सध्या अस्तित्वात असलेली अन्यपॅथीय महाविद्यालये जर अन्यपॅथीय डॉक्टर निर्माण करण्यासाठी सक्षम आहेत; तर ती प्राथमिक आरोग्यसेवा देणारे, कसबी एमबीबीएस डॉक्टर, निश्चितच निर्माण करू शकतील. मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळायला हवी आणि अभ्यासक्रमातही यथायोग्य बदल करायला हवेत. 

पदवीस्तरावर एमबीबीएस असा एकच अभ्यासक्रम असावा. अन्यपॅथीय अभ्यासक्रम, थेट पदव्युत्तर स्तरावर पर्याय म्हणून ठेवता येतील. यात अनेक फायदे संभवतात. फारशा पायाभूत सुविधा अथवा गुंतवणूक न करता, प्राथमिक आरोग्यतज्ज्ञांची चणचण मिटेल. लघु वैद्यकीय महाविद्यालयातून प्राथमिक आरोग्यतज्ज्ञ निर्माण करण्याची क्षमता जसजशी विकसित होत जाईल तसतसे सध्याच्या महाविद्यालयांचे हे काम कमी करून, त्यांना अनेक नवे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम चालवण्यास, संशोधनाधारित काम करण्यास मोकळीक मिळेल. 

आधुनिक वैद्यकीचे शिक्षण मिळाल्यामुळे, पदव्युत्तर अभ्याक्रमासाठी अन्यपॅथींकडे वळणारी मंडळी, त्या त्या पद्धतींकडे अधिक डोळसपणे पाहतील. केवळ भक्तिभावातून नव्हे, केवळ अभिनिवेशाने नव्हे, केवळ ‘मोले घातले रडाया’ म्हणून नव्हे; तर चिकित्सक दृष्टिकोनातून पाहतील. संशोधन, निष्कर्ष आणि केले जाणारे दावे, याबाबतीत अधिक सजग राहतील. या क्षेत्रातील उपयुक्त औषधे पुढे येतील. त्यावर चांगल्या दर्जाचे संशोधन सुरू होईल. आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यात धार्मिक आणि देशभक्तीचेही रंग आहेत. योग आणि आयुर्वेद हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ‘सॉफ्ट पॉवर’चा भाग आहेत. तेंव्हा विज्ञानाचा कस लावून यातील हीन आणि हेम वेगळे काढणे, हे तर आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणा ना! नव्या रचनेत, हे सहजपणे साध्य होईल. कदाचित होमिओपॅथीसारखे छद्मशास्त्रीय प्रकार, पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी, आपोआप बंदही पडतील किंवा (इग्नूचा ताजा ज्योतिष अभ्यासक्रम बघता) नवे छद्मवैज्ञानिक अभ्यासक्रम सुरूही होतील! कालाय तस्मै नम:, दुसरे काय?

अन्यपॅथीय डॉक्टर संघटना आज ब्रिजकोर्सची मागणी हिरीरीने पुढे रेटत आहेत. याचा रोकडा अर्थ असा की, सम्राट विवस्त्र असल्याचे आज कोणी निरागस बालक सांगत नसून, खुद्द दरबारीच सांगत आहेत. ब्रिजकोर्समुळे उजळ माथ्याने आधुनिक वैद्यकीची औषधे वापरता येतील, जे चालू आहे त्याला कायदेशीर मान्यता मिळेल, असा यामागचा विचार आहे. हा योग्यच आहे. प्रॅक्टिसची ३०-३५ वर्षे सतत कायद्याच्या धाकात काढणे कठीण आहे. बदलता वैद्यकीय माहौल लक्षात घेता, भलतेच कठीण आहे. थोडक्यात इथे ‘पुनर्वसनाची’ मागणी होते आहे आणि ते सन्मानपूर्वक केलेच पाहिजे. पण नवे अपंग निर्माण होऊ नयेत अशी काळजीही घेतली पाहिजे. नव्या रचनेनुसार हे साधले जाईल आणि कालांतराने हा प्रश्न कायमचा मिटेल. 

थोडक्यात फारशी गुंतवणूक न करता, वास्तव आणि आभासी वास्तव याची सुयोग्य सांगड घालून, कुशल प्राथमिक वैद्यकतज्ज्ञ निर्माण करणारी महाविद्यालये काढणे शक्य आहे. नव्या रचनेनुसार पदवीस्तरावर आधुनिक वैद्यकीचा, एमबीबीएसचा, एकसमान अभ्यासक्रम असावा. अन्यपॅथी, पॅथीप्रेमी/पॅथीपंथीय इच्छुकांसाठी, निव्वळ पदव्युत्तर स्तरावर शिकवल्या जाव्यात. 

एका संथ, स्वस्त आणि वैद्यकविश्वावर विश्वास असणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून फॅमिली डॉक्टर ही संस्था उत्क्रांत झाली होती. जीवनशैली बदलली. विद्युतगती, अवास्तव अपेक्षा आणि फट् म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता; अशा वातावरणात फॅमिली डॉक्टर ही संस्था लयाला गेली. यात कॉर्पोरेट आरोग्य व्यवस्था, इन्शुरन्स आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव जागा हेही घटक आहेत. पण या साऱ्या गदारोळातून एका उपयुक्त व्यवस्थेला आपण जवळपास मुकलो आहोत. यावर उपाय म्हणून हा लेखनप्रपंच. ‘असे केले तर?’ असा विचार तरी करायला काय हरकत आहे? 

अभिप्राय 5

 • अत्यंत विचारपूर्वक लिहिलेला लेख आहे. हा लेख वर्तमानपत्रांमधे पण यायला हवा. लेखक स्वत: होमिओपथी अभ्यासक्रम पुर्ण करुन मग आधुनिक वैद्यकाकडे आल्याने एक वेगळी दृष्टी लेखात दिसते. आधुनिक वैद्यक इतर पॆथींना तुच्छ लेखतात हे आपण पहातो. काही स्पेशालिस्ट तर जनरल प्रॆक्टिशनरना ’जीपडे ” असे तुच्छतेने म्हणतात हे आंतरजालावर मी पाहिलेले आहे. लेख वाचताना अभय बंगांची आठवणे आली. चीनमधे असलेली बेअर फूट डॊक्टर ची गरज भारतासारख्या देशाला अत्यंत गरजेची आहे हे त्यांनी सांगितले होते. हा लेख धोरण कर्त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.

 • खूपच छान प्रस्ताव आहे. आणि तो व्यापक मंचावर चर्चेसाठी येणे आवश्यक आहे.
  याला जोडून जे ॲलोपथीतील पाठ्यपुस्तकाऩमध्ये अनुभवजन्य ज्ञानाचा साठा, नव्याने कारवायाची गरज असलेले संशोधन विषय अंतर्भूत करण्याची गरज आहे.
  उदा. स्त्री- आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत एकच उदाहरण, नसबंदीची शस्त्रक्रिया सरासरी वय अंदाजे २७ आहे. त्यानंतर मासिक पाळी साधारण २० वर्षे येत राहाते या लौकर झालेल्या नसबंदीचा स्त्रियांच्या मासिकपाळीच्या चक्रावर त्यांच्या सर्वसाधारण आरोग्यावर काय होतो याचे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

 • कुठल्याही एका उपचारपद्धतीचा बडेजाव न माजवता रोग्यावर होणारे उपचार अधिक महत्त्वाचे, मग त्यासाठी गरजेची ती पॅथी वापरणे महत्त्वाचे हा एक विचार अतिशय नि:पक्षपातीपणे समोर येतो. यावर आधुनिक वैद्यकशास्त्र (अर्थात ॲलोपॅथी), आयुर्वेद, होमिओपॅथी वा इतर कुठल्याही उपचारपद्धतीवर काम करणाऱ्या चिकित्सकांनी चिकित्सकपणे विचार करून योग्य ती पावले उचलावी. रोगावरचे उपचार जितके महत्त्वाचे तितकेच नवीन संशोधन आणि दस्तावेजीकरण महत्त्वाचे!

 • (१) आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती अपुरी आहे त्याचा प्रत्यय आपल्याला गेल्या १५ महिन्यात आला आहेच. (२) आपली वैद्यकीय शिक्षण पद्धतीत दरवर्षी काही हजार आयुर्वेद आणि होमिओपॅथी पदवीधर निर्माण होतात त्यांचे आपल्या आरोग्य व्यवस्थेतील स्थान काय? आपल्या आरोग्यव्यवस्थेत नेहमीच ऑलोपॅथी (MD, MS आणि MBBS) पदवीधरांचा वर्चस्मा दिसून आलेला आहे. कोरोना साथीच्या काळात पण ही सत्यस्थिती अधोरेखित झाली आहे. भविष्यकाळात आपल्या वैद्यकीय शिक्षण पद्धतीत कोणते बदल करावे लागतील हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ ठरवतील. परंतु एक बाब स्पष्ट आहे ती अशी की आयुर्वेद आणि होमिओपॅथी पदवीधर यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आपल्या देशातील करोडो नागरिकांसाठी योग्य वापर झाला पाहिजे.

  (३) ग्रामीण भागात MBBS डोक्टर व्यवसाय करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात पण MD डॉक्टरांचे प्रभावक्षेत्र वाढत आहे. पण सर्वसामान्यांना ही परिस्थिती फारशी सुखदायक आहे असे वाटत नाही. म्हणूनच आयुर्वेद आणि होमिओपॅथी पदवीधरांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आपली आरोग्यव्यवस्था सुदृढ करण्यासाठी यथायोग्य उपयोग केला पाहिजे असे माझे मत आहे. मी असे म्हणतो ते अशासाठी की या दोन्ही पदवीधरांचे आपल्या आरोग्यव्यवस्थेतील स्थान काय या प्रश्नाचे उत्तर आपण द्यायचे टाळत आहोत असे मला जाणवते आहे म्हणून आणि या विषयावर खुली चर्चा होणे आवश्यक हे हे अधोरेखित करण्यासाठी पण.

  (४) कोरोना साथीच्या काळात अधिक प्रकर्षाने पुढे आलेला आणखी एक मुद्दा म्हणजे इंडियन मेडिकल अससोसिएशन – IMA (जी ऍलोपॅथी औषधांच्या उत्पादकांची संघटना आहे) यांनी सुरु केलेला प्रचार. आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन पद्धतींचे गौण स्थान IMA अधोरेखित करत आहे. बाबा रामदेव हे IMA द्वारे लक्ष्य केले जात आहेत ते एक निमित्त आहे. IMA चा खरा उद्देश आयुर्वेदाला बदनाम करणे हाच तर नसेल?

  (५) एक मात्र खरे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जर सक्षम करावयाची असेल तर ती फक्त ऍलोपॅथी डॉक्टरांवर अवलंबून राहून तशी करता येणार नाही कारण तेवढे ऍलोपॅथी डॉक्टरच उपलब्ध नाहीत.

 • डाँ. शंतनू अभ्यंअर यांनी सर्व द्रुष्टिकोनातून योग्य विचार मांडलेले आहेत. अधुनिक वैद्यक शास्त्र हे हे दोन किंवा तीन शतकापूर्वीच अस्तित्वात आलेले आहे. तत्पूर्वी आयूर्वेदिक, युनानी वेळी द्यक पध्दती अस्तित्वात होती आणि त्या पध्दतीच्या उपचाराने ऋग्ण बरा होत असे. राजेरजवाड्यांच्या पदरी वैद्य असत आणि त्याच्या द्वारेच उपचार करण्यात येत असत. प्रसुतीसाठी सुईणिंची मदत घेतली जात असे. पण गुंतागुंतीच्या प्रसुतीत त्यांचा उपयोग होत नसे व स्री दगावण्याचेच प्रकार घडत असत. पण आयुर्वेदिक उपचार पध्दती अधुनिक डाँक्टर समजतात किंवा भासवतात तेव्हडी टाकाऊ नक्कीच नाही याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. अलिकडील सर्वच क्षेत्रातील आरक्षणामुळे कमी गुणवत्ता असलेले विद्यार्थी आलोपँथी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात व उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना नाईलाजाने इतर पँथीकडे वळावे लागते. कमी गुणवत्ता धारक विद्यार्थी एमबीबीएस पदवी मिळवतात, पण ते तेव्हडे निष्णात होऊ शकत नाहीत. उलटपक्षी उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थी इतर पँथीची पदवी मिळवूनही उत्तम वैद्यक (डाँक्टर) होऊ शकतात. पण अधुनिक वैद्यक पदवी नसल्याने दुर्लक्षित किंवा उपेक्षित रहातात. पण खेड्यापाड्यात आयुर्वेदिक किंवा इतर पँथीचेच डाँक्टर सेवा पुरवून वेळ निभाऊन नेत असतात; याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आरएमपी डाँक्टर तर कोणत्याही पँथीची पदवी नसताना अधिक्रुतपणे डाँक्टर म्हणून मान्यता मिळवतात. आपल्या देशातील लोकसंख्येमुळे पुरेसे एमबीबीएस डाँक्टर निर्माण करणे अशक्य असल्याने डाँक्टर अभ्यंकरांच्या सुचनांवर विचार करणे श्रेयस्कर वाटते. नाही तरी या आधीच्या सरकारने चार,पिच दशकांपूर्वी मलेरिया नियंत्रणासाठी जुजबी ट्रेनिंग देऊन आरोग्यसेवक पदावर नियुक्त की ले होतेच ना?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.