(१) येणारा काळ कठीण असेल
चक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेय
एक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंय
टाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊन
उपकाराची फेड केली जातेय,
हात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय.
दिवे लावा, दिवे मालवा म्हणत
देशाला जागं केलं जातंय
अंधाराची अफू देऊन
प्रकाशाला दूर पळवलं जातंय
कित्येक अडकलेले,
दूर कोठे घरापासून
आपली माणसं, आपलं गाव
पाहिलं नाही डोळे भरून.
अशांचा काही विचार हवा
भरीव रोकडे धोरण आखा.
येणारा काळ, काळ ठरेल
अशी आजची परिस्थिती आहे.
भविष्यात पोट भरायचं कसं,
हा रोकडा सवाल आहे.
नोकरी आहे ती टिकवायची कशी,
ही उराशी खंत आहे.
रिकाम्या हातांचं करायचं काय,
तरुणांना हा प्रश्न पडलाय.
तुम्हीच सांगा,
दिवे लावून पोट भरेल काय?
जागे व्हा जागे व्हा
दिवे लावून झोपू नका.
(२) रानातील चमचम काजवे
भल्या पहाटे कोणी काकड आरती करतं,
सकाळी मी डोंगराआडून उगवणारा, सूर्यनारायण पहातो.
कोणी देवळात जाऊन निरांजन लावते,
मी लावलेल्या झाडांना पाणी घालून येतो.
कोणी शांतचित्त प्राणायाम करतं,
मी डोंगर चढून आकाशाला भेटून येतो.
कोणी मनन-चिंतन-जप करतं,
मी नदीकिनारची शांतता ऐकतो.
कोणी नामस्मरण करतं, विठू नाम घेतं,
मी चाफा-बकुळीची टपटप फुलं वेचतो.
कोणी अंधारल्या सांजवेळी भैरवी गातं,
मी रानातले चमचम काजवे पाहून येतो.
मोबाईल : ८३६९५९७४७०
“येणारा काळ कठीण असेल ” ही कविता विशेष चांगली आहे. नुसते दिवे लावून पोट भारता येत नाही हा विचार अस्वस्थ करणारा आहे,