भय इथले संपत नाही…

घटना पहिली
राजा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा. तो चार वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. आईने अतिशय काबाडकष्ट करून भावाच्या शेजारी राहून अनेक खस्ता खात राजाला लहानाचा मोठा केला. कामापुरते शिक्षण घेतल्यावर तो बऱ्यापैकी कमावू लागला. वयात येताच आईने त्याचे लग्नही लावून दिले. राजाला साजेशी पत्नीही मिळाली. सासूने खाल्लेल्या खस्तांची तिला जाणीव होती. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. सारे सुरळीत असताना ४ एप्रिल २०२१ रोजी राजाला कोरोनाचे निदान झाले. तेथून पुढे १० दिवस दवाखान्यात भरती होऊन पाच लाख रुपये त्यांनी खर्च केले. परंतु साऱ्यांना सोडून राजा निघून गेला. पत्नीच्या डोळ्यातले अश्रू आटले. आई तर दोन दिवस काही बोललीच नाही. परंतु दोन लहान मुलांच्या विचाराने दोघींनीही काही दिवसांनी स्वतःला सावरले. राजाचा दहावा, तेरावी आटोपल्यानंतर आईकडे बोळवणासाठी गेलेली राजाची पत्नी चक्कर आल्याने धाडकन कोसळली आणि मेंदूतील रक्तस्रावामुळे जागीच गेली. या धक्क्याने तिची आई त्याच दिवशी रात्री गतप्राण झाली. आज दोन महिने लोटूनही राजाची दोन्ही मुले रात्री झोपत नाहीत. मुलांना कसे सांभाळायचे? हा प्रश्न त्या ७५ वर्षीय आजीपुढे आहे.

घटना दुसरी
निशांत आता दहावीत गेला. नववीच्या वर्गात त्याने (कोणत्याही विद्यार्थ्याने) शाळेचे तोंडही पाहिले नाही. आठवीच्या शेवटच्या परीक्षेच्या तोंडावर कोरोना आला आणि मुलांचे फावले. म्हणजे निशांत आता दहावीत असला तरी त्याला नववीचे काहीच येत नाही. आठवीतही परीक्षा झालेली नाही. वडील शिवणकाम करीत असल्याने परिस्थिती अतिशय बेताची आहे. आता दहावीत शिकायचे काय आणि कसे? हा प्रश्न या कुटुंबीयांपुढे आहे. शिकवणीवर्ग लावायचा म्हटले तर पैसा नाही, ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. करायचे तरी काय? 

घटना तिसरी
कोरोना आला आणि नोकऱ्यांवर गंडांतर आले. वृत्तपत्रसृष्टीवर तर अवकळाच आली. लॉकडाऊनपाठोपाठ लोकांनी कोरोनाच्या धास्तीने घरी येणारे वृत्तपत्र बंद केले. कोरोना वृत्तपत्रातून पसरत नाही, हे वारंवार सांगितले जात असताना आणि यामुळे आपल्याच इतर बांधवांच्या नोकऱ्या धोक्यात येतील, हे ध्यानात न घेता घरोघरी वृत्तपत्र घेणे कमी झाले. लाखोंचा खप हजारोंवर आला. आर्थिक मंदीमुळे जाहिराती मिळेनाशा झाल्या. परिणामी नोकऱ्यांवर गंडांतर आले. त्यात सर्वांत समोर होते ते वृत्तपत्रातील मुद्रितशोधक. सर्वांनाच नोकरीवरून कमी करण्यात आले. अशाच एका वृत्तपत्राच्या कॉस्टकटिंगचा बळी पडलेला विकास नोकरीच्या शोधात वणवण भटकत होता. नोकरीच्या शोधात असतानाच त्याला कोरोनाची लागण झाली. परंतु पोटाचेच वांधे असताना शरीरातील तापाकडे लक्ष देणार तरी कसे? चार-सहा दिवस ताप-कणकण अंगावर काढली. कालांतराने व्हायचे तेच झाले. ऑक्सिजन पातळी प्रचंड खालावली आणि दवाखान्यात नेत असतानाच विकासचा जीव गेला. दहावीत असलेला त्याचा मुलगा आणि पत्नी आजही या धक्क्यातून सावरलेले नाही. त्यावेळी रुग्णालयात भरती होण्यासाठी घरून गेलेला विकास पुन्हा त्यांच्या डोळ्यांना कधी दिसलाच नाही. 

घटना चौथी
कोरोनामुळे झालेली हानी, उद्धवस्त झालेले कुटुंब, मोडलेले संसार हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. तब्बल सहा मुली आणि एक मुलगा असलेल्या आईला त्यांना मोठे करताना किती कष्ट उपसावे लागले असतील? परंतु कोरोनामुळे त्या मातेची मृत्यूनंतरही अवहेलनाच झाली. पाचही मुलींना चांगले घर मिळाले. एका मुलीने लग्न न केल्याने ती आईजवळ रहायची. एकुलता एक भाऊ खूप हुशार निघाला आणि त्याने अमेरिकेत नोकरी मिळविली. असे सारे वैभव ७६ वर्षीय सुमन यांच्या पायाशी लोळण घेत होते. म्हातारपणी अजून हवयं काय, असे सांगत त्यासुद्धा समाधानाने जीवन जगत होत्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुठून आणि कसे त्यांना कोरोनाने घेरले आणि सारेच संपले.
दुसरी लाट चरणसीमेवर असताना शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बेडच उपलब्ध होत नसल्याने सुमन यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. परंतु दिवसेंदिवस सुमन यांची प्रकृती ढासळतच गेली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. शासनाच्या नियमावलीनुसार लगेच मनपाला कळविण्यात आले. परंतु कर्मचारी आले नाही. रात्रभर मृतदेह घरीच होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या सुमन यांच्या दोन मुलींनी मनपा कर्मचाऱ्यांची वाट पाहात अख्खी रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत शववाहिका येईल असे सांगण्यात आले. कुटुंबातील सारेच आले; पण मनपाची शववाहिका काही आली नाही. दुपारी कधीतरी शववाहिका आली आणि अंत्यसंस्कार पार पडले. तब्बल दीड दिवस आईच्या मृतदेहाजवळ दोन मुलींनी रात्र काढली. महापालिकेकडून शववाहिका आणि मनुष्यबळाचे कारण सांगण्यात आले. परंतु यामुळे मृतव्यक्ती आणि दुःखी कुटुंबीयांची चांगलीच फरफट झाली. आईजवळ रात्रभर असलेल्या दोन्ही मुलींमध्ये कोरोना दिवसेंदिवस वाढत गेल्याने त्यांनाही हॉस्पिटलमध्ये भरतीकरण्यात आले. उपचारादरम्यात त्यातीत एकीचा मृत्यू झाला. 

वरील घटनांमधील सारेजण आजच्या समाजातील प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या कुटुंबांसारखी अशी कितीतरी कुटुंबे आहे, ज्यांच्यापुढे कोरोनाने प्रश्नांची मालिकाच उभी करून ठेवली आहे. 

कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात मोठा फरक पाडला आहे. महागाई न भूतो न भविष्यती अशी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब यांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आगामी काळात हे प्रश्न अधिक जटिल होणार आहेत. 

कोरोनामुळे श्रीमंतांच्या, खास करून सरकारी पेशातील व्यक्तींच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही. आरोग्याच्या समस्या सोडल्या तर त्यांचे टाळेबंदी काळातील आयुष्य कुटुंबासोबत मौजमजेत गेले आहे/जात आहे. मागील टाळेबंदीच्या काळात असा एकही पदार्थ राहिलेला नाही, जो आम्ही करून खाल्ला नसेल, ही एका सुखनैव कुटुंबातील गृहिणीची प्रतिक्रिया आहे. 

एकीकडे माणसांचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे टाळेबंदीत आनंद लुटणारे आपण बघितले आहेत. अर्थात यात त्यांचा काहीच दोष नाही. गरीब आणि श्रीमंत यांमधील दरी प्रचंड वाढते आहे. आगामी काळात या दरीतील संघर्षाला, अन्यायाला, अत्याचाराला वाचा फुटली तर दोष कुणालाही देता येणार नाही.

हीच दरी विद्यार्थ्यांमध्येही दिसून येते. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याबरोबर पालकांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर उड्या पडल्या. मोबाईलमुळे मुलांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून अनेकांनी लगेच लॅपटॉप खरेदी केले. तर दुसरीकडे कित्येक विद्यार्थ्यांना मोबाईलअभावी शिकता आले नाही. जिथे जगण्याचेच वांधे आहेत तिथे मोबाईल आणि रिचार्ज येणार तरी कुठून?

सध्या दुकानात कोणतीही वस्तू घ्यायला जा, तिचे दर चढेच आहेत. पेट्रोल, गॅस सिलेंडर, खाण्याचे तेल आदिंचे दर वाढल्यामुळे गरिबांच्या, सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खाजगी नोकऱ्या टिकवणे कठीण झाले आहे. सुरुवातीच्या टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. दोन वर्षांपासून पगारवाढ नसल्याने वाढत्या महागाईचे तोंड द्यायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्य आणि गरिबांपुढे आहे. 

त्यातच सरकारचेही काहीच कळत नाही. दुसऱ्या टाळेबंदीच्या सुरुवातीला ‘लगेच लॉकडाऊन लावा. तुम्हाला मृत्यूचे तांडव बघायचे आहे का?’, असे ओरडून ओरडून सांगणारे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री एका तासात टाळेबंदी उठवून मोकळे होतात. धक्कादायक म्हणजे एकीकडे तिसरी लाट येणार हे पुराव्यानिशी सांगितले जात आहे. त्यातही मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असे सारे असताना खबरदारी म्हणून टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्याने राबविणे गरजेचे नव्हते का? हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही. एकंदरीत भय इथले संपत नाही, अशीच स्थिती सध्या सर्वत्र आहे. 

(वरील सर्व घटना सत्यघटनांवर आधारित आहेत. नावांत तेवढे बदल केलेले आहेत.)

मोबाईल: ७७२२०४९८००   

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *