गुलाम संस्कृतीच्या लोकांनो

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो 
तुमच्यातून जात नाहीत आरपार किरणं
नसतो तुम्हाला कुठल्याच जाणिवेचा मागमूस
चामडी वाचविण्याच्या नादात असता मश्गूल

उजेडाला फाटे देऊन
गुंडाळून घेता अंधाराचं कवच
वर्तमान नाही भूतकाळासारखा
भविष्य नसेल वर्तमानासारखे
मग काळोखाच्या दरवाज्याआड
कुठल्या पिढीचं भविष्य दडवून ठेवलंय?

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो
षंढपणाच्या बाजारात लागेलही तुमचा वाढीव भाव
तरीही बुधवारपेठ, कामाठीपुरा किंवा गंगा-जमुनामधील
भाकरीचं मोल नसेल तुमच्या घरंदाजपणाला

एकवेळ काळोखातून उजेडात आले तरीही
अंधाऱ्या खोलीची ओढ
सोडता सोडवत नाही
कुठल्या भीतीच्या सावटाने पोखरलंय?

आदिपणाचा बाजार उठवून
मुद्दाम पाडल्या जातोय भाव
तरीही तुम्ही शांत?
कुठपर्यंत कवचात दडून ओढू लागसाल मागे?

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो
याच मातीतून जन्मले असंख्य सूर्य
धुळीस मिळाले कित्येक साम्राज्ये
क्रांतीच्या जोरावर

आताशी कुठेतरी दिसतायेत उजेडाची किरणे
आणि तुम्ही पुन्हा पुन्हा ओढू पाहताय काळोखाच्या महालात

लक्षात ठेवा…
अंकुराचं अस्तित्व टिकवण्यासाठी
शेवटी पेटवाव्याच लागतील स्वातंत्र्याच्या मशाली…!

जि. वाशिम
मो. 7875173828

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.