गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २

(ब) 

एका वस्तूच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तूची देवाणघेवाण म्हणजेच वस्तूविनिमय होय. कालांतराने, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, मूल्यांच्या सामायिक मापदंडांचा अभाव, वस्तूचा साठा करण्याची अडचण, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण, विलंबित देणी देण्यातील अडचण यांसारख्या अनेक समस्यांमुळे वस्तुविनिमयव्यवस्था मागे पडली. तिची जागा मुद्राविनिमयाने घेतली. पशूमुद्रा, वस्तूमुद्रा, धातूमुद्रा, नाणी, कागदीमुद्रा यांपासून ते पतमुद्रा, प्लॅस्टिक मुद्रा, इलेक्ट्रॉनिक्स मुद्रेपर्यंत मुद्रेची उत्क्रांती आपल्या परिचयाची आहे. साहजिकच, आज आपल्यापैकी कुणीही मुद्राविनिमयापासून मुक्त नाही. व्यापार, विपणनव्यवस्था (market system) आणि उत्पादनप्रक्रियांचा पाया विनिमयप्रक्रिया (exchange process) हाच आहे. आधुनिक विनिमय प्रक्रियेचा मूलाधार मुद्रा (money) हाच आहे. त्यामुळे, मानवी गरजांची आणि तृष्णांची परिपूर्ती करणाऱ्या विनिमयप्रक्रियेचे स्वरूप समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

“एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असते.” ही अर्थशास्त्रातील सुप्रसिद्ध उक्ती आहे. त्यामुळे विनिमयाला खरेदी आणि विक्री या दोन बाजू असतात. खरेदीची बाजू उपभोगाचे, तर विक्रीची बाजू उत्पादनाचे प्रतिनिधित्व करत असते. तरीही अॅडम स्मिथ यांनी म्हटल्याप्रमाणे, “सर्वच उत्पादनप्रक्रियांचा अंतिम उद्देश उपभोग हाच असतो.” त्यामुळे विपणनव्यवस्था उपभोगावर उभी आहे, असे म्हणता येईल. अर्थातच, उपभोग ही व्यक्तिनिष्ठ संज्ञा असल्याने विनिमय हे मानवी गरजांचे व तृष्णापूर्तीचे साधन मानता येईल. मला जर माझ्या तृष्णांची अधिकाधिक पूर्ती हवी असेल तर, मौद्रिक विनिमयव्यवहारांत मला अधिकाधिक मुद्रानिर्मिती करावी लागेल किंवा मग मुद्रासंचय करावा लागेल. यासाठी मला क्रयवस्तूंची निर्मिती करून त्यांची विक्री करावी लागेल. क्रयवस्तूंच्या उत्पादनासाठी मला नैसर्गिक साधनसंपत्ती, श्रम, भांडवल व स्वत:चे कौशल्य यांचा उपयोग करावा लागेल. परंतु, क्रयवस्तुनिर्मितीमागचा उद्देश स्वत:च्या तृष्णांची पूर्ती असल्याने, क्रयवस्तुची विक्री करताना उत्पादनप्रक्रियेत उत्पादनघटकांवर आलेल्या उत्पादनखर्चापेक्षा अधिक किंमतीला मी ती वस्तू विकेन. अशाप्रकारे, जर मी उच्च किंमतीला वस्तूची विक्री करण्यात सफल झालो, तर मग क्रयवस्तूची विक्रीकिंमत (Selling price) आणि खर्चकिंमत (Cost price) यांतील जो फरक असेल, तेवढा माझा ‘नफा’ (Profit) असेल. 

परंतु, या नफ्यानेही माझे समाधान होत नसल्यास आणि त्याचबरोबर माझ्या वस्तूला असलेल्या मागणीची पूर्तीही मला करायची असल्यास, मला पुढील मार्ग अवलंबावे लागतील:
१) नैसर्गिक संसाधनांचा अतिरिक्त वापर करणे.
२) भांडवल संचय वाढविणे.

यांद्वारे, मी स्वत:च्या तृष्णांची पूर्ती करू शकेन. तात्पर्य, तृष्णा आणि त्यांची परिपूर्ती या गोष्टी निःसंशयपणे संसाधनांची निर्मिती आणि विस्ताराशी जुळलेल्या आहेत. या सर्वांचा अर्थ एकच, तो म्हणजे ‘विस्तार’ (extension) हा होय. याही पुढे जाऊन सर्वसामान्य व्यवहारात अनेक गैरप्रकार केले जातात, ते असे:
१) भेसळयुक्त वस्तूंची विक्री करणे.
२) दोषयुक्त (सदोष) वस्तूंची विक्री करणे.
३) चुकीच्या वजनांचा व मापाचा वापर करणे.
४) साठेबाजी आणि काळाबाजार करणे.
५) निश्चित केलेल्या कमाल विक्रीकिंमतीपेक्षा (MRP) जास्त दर आकारणे.
६) दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देणे. 
या सर्व गोष्टींची परिणती शेवटी ग्राहकांच्या शोषणातच (Exploitation of customer) होते. 

ज्याप्रमाणे माझ्या काही तृष्णा आहेत, तशाच इतरांच्याही तृष्णा असणे संभवनीय आहे. माझ्या वस्तूच्या विक्रीकरिता, इतरांना तिच्याविषयी तृष्णा असली पाहिजे किंवा तिची गरज भासली पाहिजे. अर्थातच, वस्तूला मागणी असली पाहिजे. वस्तूला अशी मागणी असते, तेव्हा मला चिंता करण्याची आवश्यकता नाही; परंतु माझ्या वस्तूला मागणीच नसेल तर माझ्यापुढे समस्या निर्माण होईल. अशावेळी मला लोकांमध्ये माझ्या वस्तूसाठी कृत्रिम मागणी (Artificial demand) निर्माण करावी लागेल. यासाठी लोकांमध्ये माझ्या वस्तूविषयी तृष्णानिर्मिती करावी लागेल. त्यांच्या मनावर हे बिंबवावे लागेल की त्या वस्तूंशिवाय त्यांचे जीवन सुसंस्कृत, सभ्य आणि उच्च दर्जाचे होणार नाही अथवा त्या वस्तूंशिवाय जगलेले जीवन म्हणजे मूर्तीमंत नरकयातनाच होय. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे माझ्या क्रयवस्तूंचे विपणन (जाहिरातबाजी) हे होय. 

श्री. एरिक फ्रॉम ह्यांनी हे सत्य अत्यंत चिकित्सकपणे प्रतिपादन केले आहे. ते लिहितात, “आधुनिक जाहिरातबाजी विवेकशक्तीला आवाहन करत नाही, तर भावनेला आवाहन करते. मोहिनी घालणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही सूचनेप्रमाणे ती आपले लक्ष्य असलेल्या व्यक्तींना भावनिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करते आणि नंतर बौद्धिकदृष्ट्या त्यांना वश व्हावयास लावते. या प्रकारची जाहिरातबाजी सर्व मार्गांनी ग्राहकांवर छाप टाकते. त्यापैकी काही मार्ग पुढीलप्रमाणे:
अ) त्याच त्या सूत्रांची पुनरावृत्ती करणे.
ब) एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या प्रतिमेचा प्रभाव पाडणे. उदा.: विशिष्ट छापाची सिगारेट ओढणाऱ्या प्रतिष्ठित महिलेच्या वा सुप्रसिद्ध मुष्टियोद्ध्याच्या प्रतिमेचा प्रभाव पाडणे.
क) सुंदर युवतीच्या चित्राद्वारे कामभावनेला आवाहन करून ग्राहकांना आकृष्ट करणे आणि त्याचवेळी ग्राहकांची विवेचक शक्ती क्षीण करणे.
ड) ‘शरीराची दुर्गंधी’ वा ‘श्वासाची दुर्गंधी’ निर्माण होण्याचा धाक घालून त्याला भयभीत करणे किंवा विशिष्ट प्रकारचा सदरा वा साबण खरेदी केल्यामुळे आपल्या समग्र जीवनप्रवाहामध्ये त्वरित बदल घडून येईल, अशाप्रकारची दिवास्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे.
इ) क्रयवस्तूंच्या वापराचा मानवी नात्यांशी संबंध जोडणे आणि त्याद्वारे नाती घट्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणून अमुक वस्तूचा वापर करण्यास उद्युक्त करणे. 

या सर्व पद्धती पूर्णपणे अतार्किक, अविवेकीपणाच्या आहेत. मालाच्या दर्जाशी त्यांचा काहीही संबंध नसतो. एखादे गुंगीचे औषध किंवा नि:शेष स्वरूपाची मोहिनी यांच्याप्रमाणे त्या पद्धती ग्राहकाच्या विवेकशक्तींना घुसमडून टाकतात आणि नष्ट करतात. दिवास्वप्ने निर्माण करण्याच्या आपल्या गुणधर्मामळे त्या पद्धती ग्राहकाला एक प्रकारचे समाधान देतात. चलचित्रपट ज्या प्रकारचे समाधान देतात, त्याच प्रकारचे हे समाधान आहे. परंतु त्याचबरोबर, या पद्धती ग्राहकाच्या विवेकशक्तीला नष्ट करून, त्याच्या मनात क्षुद्रता आणि दुर्बलता यांचीही भावना वृध्दिंगत करतात.”

श्री. फ्रॉम ह्यांच्या विवेचनावरून म्हणता येईल की, एकाच्या तृष्णापूर्तीकरिता विपणनाद्वारे लोकांच्या मनात क्रयवस्तूंविषयी तृष्णा निर्माण करून बाजारपेठेची पायाभरणी करणे शक्य होते. बरेचदा, बाजारपेठ विस्तारासाठी राजकीय शक्तींचाही उपयोग केला जातो. एखाद्या विवक्षित क्रयवस्तूला संरक्षण देण्यासाठी, तिला पर्यायी असणाऱ्या इतर वस्तूंवर जकात आकारणे वा त्यांचा वाटा ठरविणे किंवा मग आपलीच वस्तू हव्या त्या किंमतीला विकली जाईल, याप्रकारे ‘मक्तेदारी’ (monopoly) निर्माण करणे. क्रयवस्तूचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून वस्तूंची अधिक किंमतीला विक्री करणे, मूल्यविभेद करणे यांसारखी साधने मक्तेदार वापरत असतो. 

ही विनिमय व्यवस्थेतील शोषणाची बहुविध रूपे आहेत. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, अशा शोषक रूपांमुळे आधुनिक मानवाची विवेकशक्ती क्षीण होत चालली असून तो दिवसेंदिवस ‘तृष्णाग्रस्त’ बनत चालला आहे. या सर्वांचे पर्यावसन मानसिक गुलामगिरीत होईल की काय? अशी शंका आहे. 

जर आपल्या मनोधारणा अशा असतील की, मानवी तृष्णा अनंत आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या तृष्णांची परिपूर्ती करण्यासाठी अविश्रांत धडपड केलीच पाहिजेत. प्रगती, संस्कृती आणि देशाचा विकास तृष्णांच्या पूर्ततेच्या शक्तीवरच अवलंबून असतो; तर त्यांचा अटळ परिणाम म्हणून, आपल्या बाजारपेठांचा अधिकाधिक विकास झालाच पाहिजे. त्यांचे नियंत्रण व नियमन आमच्याद्वारेच झाले पाहिजे आणि आमच्या नफ्याच्या वाट्यात भागीदार होऊ पाहणाऱ्या व ग्राहकांना स्वत:कडे खेचणाऱ्या इतर विक्रेत्यांची बाजारपेठेतून, कोणत्याही मार्गांनी, हकालपट्टी करण्याचे प्रयत्न करण्यासाठी आम्ही स्वतंत्र असलो पाहिजे, ज्यायोगे आम्ही आमच्या तृष्णांची परिपूर्ती करू शकू, अशी उत्पादकांची भूमिका बनते. हे सर्व मानवी शोषणाचे तर्कशास्त्र आहे.

आपल्या ‘एक जग’ (one world) ह्या प्रसिद्ध लेखात श्री. सुरेंद्र बारलिंगे यांनी लिहिले आहे, “तृष्णा अनंत असतील आणि एका व्यक्तीच्या तृष्णा पूर्ण होणे हे दुसऱ्या व्यक्तीने आपल्या आकांक्षांना मुरड घालण्यावर अवलंबून असेल, तर सर्व व्यक्तीच्या तृष्णांची परिपूर्ती अशक्यच आहे. बाजारपेठांचा विस्तार करणे याचा अर्थ शेवटी असा होतो की इतरांच्या एका प्रकारच्या तृष्णांची परिपूर्ती करण्यासाठी परिस्थिती उत्पन्न करणे आणि त्याच्या मोबदल्यात स्वत:च्या दुसऱ्या प्रकारच्या तृष्णांची पूर्तता करणे. याचाच अर्थ असा होतो की, इतर व्यक्तींच्या एक प्रकारच्या तृष्णा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असलो, तरी आपण आपल्या ज्या तृष्णांची पूर्तता करू पाहत आहोत, त्यांच्या त्याच तृष्णांची पूर्तता करावी हे आपल्याला अपेक्षित नसते. हे शोषण आहे.”विनिमयव्यवस्थेच्या अशा शोषक स्वरूपामुळे अपरिहार्यपणे सामाजिक संबंधात एक दरी निर्माण होत जाऊन विषमतामूलक समाजाचा पाया आणखीनच बळकट होत जातो. “बाजारपेठेच्या शक्तींच्या क्रियाप्रतिक्रियांमुळे विषमतेत निरंतर वाढ होते.” असे जेव्हा श्री. गुन्नर मिर्डाल म्हणतात, तेव्हा त्यांचादेखील हाच सूचितार्थ असतो. 

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे. (तृतीयवर्ष (कला) -अर्थशास्त्र) 

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.