‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..!

आज मानव ‘विज्ञान’रूपी साधनांचा वापर करून निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेऊ शकतो. माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता तेंव्हा भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजून घ्यायला त्याच्या ‘मेंदू’ला कसरत करावी लागत होती. मग काय? मेंदूच्या आवाक्यातील गोष्टींनुसार तो या साऱ्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न करू लागला. तदनुसार तग धरून राहण्यासाठी उपाययोजनाही करू लागला. अर्थातच हे सारे ‘चुका आणि शिका’ स्वरूपात सुरू असताना मानवी मेंदूने अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली. एकप्रकारे मानवप्राणी त्याच्याकडे असलेले ‘मेंदू’ नामक अजब अस्त्र वापरून या गजब दुनियेत दिमाखात वाटचाल करू लागला. याच प्रवासाचा एक भाग म्हणजे ‘कुणी’तरी या जगाचा पसारा चालवत असावे हा ‘अंदाज’! सुरुवातीच्या काळात या गृहीतकामुळे त्याच्यासाठी बरेच प्रश्न ‘सोपे’ झाले. यामुळे मानसिक पातळीवर काही निर्णय घेऊन ‘पुढे’ जाऊन पाहता आले.त्यावेळी काही गोष्टी या गृहीतकाशी जुळल्याचा भास होत होता व पुढील प्रवास तात्पुरता सुसह्य होत होता. 

हे गृहीतक म्हणजे आजचे ‘आस्तिक्य’ आहे. ह्या गृहीतकाच्या आधारावरच आजही आस्तिक माणूस मानतो की हे जग चालवणारा ‘कुणी’तरी अति-नैसर्गिक शक्तिशाली निर्माता आहेच. त्याशिवाय का इतक्या सूत्रबद्ध रीतीने जगाचा पसारा नियमितपणे चालू आहे? अर्थातच, हा तर्क कितीतरी गोष्टी आपल्याला ‘अज्ञात’ आहेत या कारणास्तव पुष्टिदाखल पुढे रेटला जातो. 

या गृहीतकाला नाकारणारे ते ‘नास्तिक्य’. त्यासाठी विज्ञानाचा, वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेता येईल. विज्ञानामुळे मानवप्राणी निसर्गातील कोडी सोडवत आला आहे. त्याआधारेच कितीतरी गोष्टी, ज्या पूर्वी अगम्य स्तरावर होत्या, त्या आज समजू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांवर नियंत्रणही करणे शक्य झाले आहे. कित्येक गोष्टींची पुढील वाटचाल काय असेल, हेदेखील वर्तवणे सोपे झाले आहे. 

तर अशा विज्ञानाचे एक साधे तत्त्व आहे. एखादी गोष्ट ‘सत्य’ म्हणून कधी स्वीकारावी? तर विशिष्ट नियमांप्रमाणे ती गोष्ट सिद्ध करता यायला हवी. एवढेच नाही तर, त्यात खरेच काही तथ्य असेल तर त्या नियमांचा वापर करून अगदी कुणालाही त्याची सिद्धता मांडता यायला हवी. जर एखादी ठराविक प्रक्रिया असेल, काही कृती असेल तर जो कुणी ती कृती/प्रक्रिया पूर्ण करेल त्यांनाही तोच परिणाम दिसायला हवा. म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष सिद्धता… हीच सत्यता! 

तर… खरेच हे जग निर्माण करणारा असा ‘कुणी’तरी असेल, तर उद्या ही जगनिर्मितीची प्रक्रिया समजून घेऊन ‘कुणाला’ही अशी निर्मिती करता यायला हवी! निदान ‘हे जग कुणीतरी निर्माण केले आहे’ ह्या गृहीतकासाठीचे तर्क तरी सिद्ध करता यायला हवेत. तेव्हांच ते स्वीकारणे योग्य ठरेल… म्हणजेच, जोपर्यंत ‘आहे’ काय हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ते ‘नाही’च आहे!

अभिप्राय 1

  • बीजगणितातील निगमन पध्दतीचा (Deduction method) आधार घेऊन,आपण ‘हे जग कुणी तरी निर्माण केले आहे.’ या गृहितकाचा पडताळा घेता येतो का ते बघुया.जसे आपल्याला वर्गसमीकरणाची मुळे माहित नसतील,तर दिलेल्या माहितीनुसार…”ती मुळे ‘x’ आणि’y’ मानू ” असे म्हणून आपण सुरूवात करतो.अगदी त्याचप्रमाणे,”हे जग कुणीतरी निर्मीले आहे.” असे आपण तात्पुरते गृहित धरूया.मग असा प्रश्न विचारता येईल की: निर्मात्याने हे जग कसे निर्मीले? आधी काहीतरी होते,त्यातून निर्मीले काय? तसे असेल तर त्याला आद्यनिर्माता का म्हणायचे? किंवा मग आधी काही नव्हतेच त्यातून निर्मात्याने हे जग निर्मीले ? तर आधी काहीच नव्हते ,तरीही त्यातून काहीतरी निर्मिले.हे मान्य करणे कठीण आहे.अशाप्रकारे,जगनिर्मात्याचा युक्तिवाद कात्रीत सापडतो. जे.एस.मिल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे: माझ्या वडिलांनी मला शिकवले की, ‘मला कुणी निर्मिले ?’ हा प्रश्न विचारू नकोस,कारण लगेचच ,’ जगनिर्मात्याला’ कुणी निर्मीले?हा प्रश्न पुढे येईल.
    त्यामुळे,’हे जग कुणीतरी निर्मीले आहे.” हे गृहितक आपण माणसांनीच निर्मीले आहे ,यांची सतत जाण ठेवणे गरजेचे आहे.कारण ,या गृहितकावरूनतरी ,तो ‘आहे काय?’ हे निगामी तर्काने सिध्द करता येत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *