अज्ञानाधारित अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) २०२१ पासून ज्योतिष विषयाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) प्रारंभ करण्याचे घोषित केले आहे.

“आकाशातील ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो.” हे ज्योतिष विषयाचे पहिले गृहीतक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की मानवी जीवनावर ग्रहतार्‍यांचा कोणताही परिणाम होत नाही; असे निरीक्षणांवरून सिद्ध झाले आहे. म्हणजे इग्नूच्या या अभ्यासक्रमासाठी कोणतेही सत्य गृहीतक नाही. म्हणून हा अज्ञानाधारित अभ्यासक्रम नकोच. अशी विज्ञानप्रेमींची मागणी आहे. 

फलज्योतिषाची भाकिते किती धादांत खोटी असतात याचे सत्यदर्शन घडविणारा लेख:…..

अष्टग्रही:-  फेब्रुवारी १९६२

तुम्ही जन्मकुंडली पाहिली असेल. कुंडलीत चार चौकोन आणि आठ त्रिकोण अशी बारा घरे असतात. त्यांना “द्वादश भुवने”, “द्वादश भावचक्रे” असे म्हणतात. ज्योतिषी अशी भारदस्त नांवे देऊन ‘पत्रिका महत्त्वाची असते’ असा आभास निर्माण करतात. या बारा घरांत १ ते १२ क्रमांक असतात ते राशींचे. मेष, वृषभ, मिथुन… इत्यादी बारा राशीनामे क्रमाने पाठ असल्यास कोणती रास कोणत्या घरात आहे हें त्या घरातील क्रमांकावरून कळते. 

ज्योतिषात बारा ग्रह आहेत.  (सूर्य, चंद्र, राहू, केतू, बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो) या ग्रहनामांवर कांही टिप्पणी नको. सर्व अज्ञान स्वयंस्पष्ट आहे. कुंडलीत राशीनामांची आद्याक्षरे लिहितात. बारा राशी-बारा ग्रह, म्हणून प्रत्येक राशीत एक ग्रह असे मात्र नसते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे ते कुंडलीत मांडतात. एखाद्या राशीत दोन किंवा तीन ग्रह असतील तर दुसरीत एकही नसेल. मात्र सर्व राशीत मिळून बारा ग्रह असणारच. समजा एका घरात (४, मं) असे असेल तर त्या व्यक्तीसाठी कर्केचा मंगळ आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क… असे ओळीने मोजले तर चौथी रास कर्क. (४, मं) असे एका घरात लिहिले असले; तरी अवकाशात कर्क रास मंगळापासून अब्जानुअब्ज कि.मी. दूर असतेच. 

एका राशीत अधिकात अधिक किती ग्रह दिसू शकतात? दि. ०५-०२-१९६२ या दिवशी मकर राशीत आठ ग्रह दिसणार होते. म्हणजे त्यादिवशी अष्टग्रही होती. ही स्थिती येणार हे गणिताने आधीच समजले होते. अष्टग्रही हा योग अशुभ असतो. पृथ्वीवर अनेक उत्पात घडतात. असे समज त्यावेळी होते. अजूनही आहेत.

अष्टग्रहीपूर्वी दीड वर्षे, म्हणजे एप्रिल १९६० ते ऑक्टोबर १९६१ या कालावधीत ‘ॲस्ट्रॉलॉजिकल मॅगॅझिन’ या संस्थेने ‘अष्टग्रही आणि तिचे जागतिक परिणाम’ या विषयावर लेखी परिसंवाद आयोजित केला. देशी-विदेशी मिळून २८ जगप्रसिद्ध ज्योतिष्यांनी प्रबंध सादर केले. त्यांत वर्तविलेली कांही भाकिते: 

* अष्टग्रहीनंतर एक नवे जग पृथ्वीवर अवतरेल.
* यूनोची इतिश्री होईल. 
* भारत-पाकिस्तान एक होतील.

त्याकाळचे प्रसिद्ध ज्योतिषी सी.पी सेन यांनी भाकीत वर्तविले की 
* अष्टग्रहीच्या काळात तिसरे महायुद्ध पेटेल. 

अष्टग्रहीच्या जोडीला खग्रास सूर्यग्रहण होते. जगात प्रलय होणार अशी भीती जनतेच्या अंगावर शहारे आणत होती. नेपाळहून आलेले गुरखे आपल्या गावी परतत होते. आपल्या गावी मरण आले तर स्वर्ग मिळतो असा समज होता. 

दै. केसरीच्या २६ जानेवारी १९६२ च्या अंकात ज्योतिषी द.ग.देव यांनी अष्टग्रहीचा भीषण परिणाम सांगणारा श्लोक दिला होता. 

अष्टग्रहा: एकराशिस्था: गोलयोग: प्रकीर्तीत:।
प्लवयन्ति महिं सर्वां रुधिरेण जलेन वा ॥
[अर्थ:- एका राशीत आठ ग्रह आले की त्या स्थितीला गोलयोग म्हणतात. त्यावेळी सर्व धरणी रक्ताने किंवा पाण्याने भरून जाते]

अष्टग्रहीच्या काळात जग निर्मनुष्य होईल अशी भीतीसुद्धा अनेक जण व्यक्त करीत होते. एका राशीत आठ ग्रहांची गर्दी! म्हणजे महाअरिष्ट येणारच. असे ज्योतिषप्रेमींना वाटत होते. 
(ही सर्व विश्वासार्ह माहिती प्रा.द.के.केळकर [१८९५-१९६९] यांच्या ‘बुद्धिवादाचा ध्रुवतारा’ [वरदा प्रकाशन, प्रथमावृत्ती १९७२] या पुस्तकातून घेतली आहे.)

खरेतर प्रत्येक ग्रह आपल्या नियत कक्षेतून सूर्याभोवती सतत फिरत असतो. एका फेरीला लागणारा वेळ ठरलेला असतो. कक्षा कधी बदलत नाही. ग्रह क्षणभरही कुठे थांबत नाही. कोणत्याही दोन ग्रहांतील अंतर किमान कांही कोटी कि.मी. असते. मग ग्रहांची गर्दी कशी होणार? आठ ग्रह मकर राशीत जमणार म्हणजे काय? तर आकाशाच्या पडद्यावर ते मकर राशीत दिसणार. प्रत्यक्षात ते मकर राशीपासून पन्नासहजार अब्ज कि.मी.पेक्षा अधिक दूर असणारच. पण अनेक लोकांना ते कळत नाही. ज्योतिष्यांना तर नाहीच नाही. कारण पत्रिकेत ग्रह आणि रास एकाच घरात दाखवतात.

अष्टग्रहीच्या दिवशी सोमवार होता. रविवारच्या वर्तमानपत्रात पानोपानी अष्टग्रही! अष्टग्रहीवर लेख, अष्टग्रहीवर कविता, अष्टग्रहीवर संवाद. उद्या काय करावे, कुठल्या देवळात जावे, देवाला कसे साकडे घालावे, अशा माहितीने तो अंक भरला होता. खरेतर अनेकजण अंक वाचण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पण उद्यासाठी काही मार्ग सापडतो का पाहावे म्हणून वाचत होते. 

नेहमीप्रमाणे सूर्य मावळला. नित्य सवयीप्रमाणे लोकांचा दिनक्रम चालू होता. पण अनेकांच्या मनात “उद्या काय?” याची चिंता होती. धाकधुक होती. तर जे लोक “ज्योतिष हे थोतांड आहे.” हें जाणत होते ते निश्चिंत होते. इतरांची गंमत पाहात होते. 

शेवटी अष्टग्रहीचा दिवस, म्हणजे ५ फेब्रुवारी उजाडला! नेहमीप्रमाणे झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. त्यांना कसलीच भीती नव्हती. भीती, चिंता केवळ ज्योतिषभक्तांच्या मनात होती. “आतां काय?” “पुढे काय?” असे त्यांना क्षणोक्षणी वाटत होते. नैसर्गिक घटना नित्याप्रमाणे चालू होत्या. 

सूर्य उगवला. लोक जीव मुठीत धरून अरिष्टाची वाट बघत होते. आता काय घडेल ? कधी काय घडेल? हे समजत नव्हते. सूर्य वर आला. दुपार झाली. अपेक्षित असे कांही घडले नाही. तीन तासांनी संध्याकाळ झाली. तरी कांहीच वेगळे घडले नाही. अष्टग्रहीचे भविष्य सांगणारे जगप्रसिद्ध ज्योतिषी मनात देवाची प्रार्थना करू लागले, “देवा! कुठेतरी भूकंप होऊं दे. विमानाचा, रेल्वेचा एक तरी अपघात घडूं दे. लोकांना अष्टग्रहीची थोडीतरी प्रचीती येऊ दे. आम्ही एवढा अभ्यास करून वर्तविलेली भविष्ये थोडीतरी खरी ठरू दे रे देवा!” (मी हे केवळ कल्पनेने लिहिले आहे. त्यांचे विचार मला कसे कळणार?) 

निसर्गात कांहीच वेगळे घडत नव्हते. पुण्यात पानशेत धरणफुटीचा प्रलय झाला होता पण तो १९६१ या गत साली!

सोमवार अष्टग्रहीचा दिवस. तो संपला. नेहमीप्रमाणे मंगळवार उजाडला. आजचा पेपर आला. कुठे कांही विशेष घडलेच नव्हते! हीच विशेष बातमी होती. आतां ज्योतिषप्रेमींनी ‘आजचे राशिभविष्य‘ या आपल्या आवडत्या सदराचे पान उघडले आणि ते आपल्या राशीचे भविष्य उत्सुकतेने वाचू लागले. 

गेले वर्षभर त्यांनी अष्टग्रहीविषयी अनेक भाकिते वाचली होती. फार मोठ्या दुर्घटना घडतील. गंभीर अपघात होतील. भयानक नैसर्गिक आपत्ती येतील. सहस्रावधी लोक मृत्युमुखी पडतील. अशी भविष्ये अनेक सुप्रसिद्ध ज्योतिष्यांनी वर्तविली होती. ती सर्वच्या सर्व सपशेल खोटी ठरली. अष्टग्रहीच्या दिवशी कांही म्हणजे काहीच वाईट घडले नाही. तरी भविष्यप्रेमींची श्रद्धा जराही ढळली नाही. हे खरे श्रद्धावंत. स्वबुद्धीने कधीही विेचार करायचाच नाही हे आपले ब्रीद त्यांनी कटाक्षाने पाळले. 

+91 9404609126
ynwala@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *