ज्योतिष : शास्त्र की थोतांड

IGNOU ने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल गेले काही दिवस खमंग चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने काही चिंतन –

** ज्या शास्त्रात केलेली भाकितं अचूक ठरतात तेच खऱ्या अर्थाने शास्त्र असतं हे जर मान्य केले तर ज्योतिष हे शास्त्र ठरत नाही.
हा निकषच चुकीचा आहे. असं म्हटलं तर हवामानशास्त्र, निवडणूक निकालांचे अनुमान लावणारं आणि विश्लेषण करणारं शास्त्र (psephology), वैद्यकशास्त्र अश्या अनेक ज्ञानशाखांमधल्या विद्वानांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील भाकिते चुकतात. पण म्हणून त्या ज्ञानशाखा खोट्या ठरत नाहीत. ज्योतिषशास्त्रातही इतर शास्त्रांप्रमाणे चुकलेली मूळची गृहितके बदलून, नव्या गृहितकांना सिद्ध करून, त्याची शास्त्रोक्त मांडणी करून संकल्पनांचं पुनर्मूल्यांकन नक्कीच केलं जातं. नव्या माहितीनुसार पद्धतीदेखील बदलतात. याचे तपशील खाली (सर्वात शेवटच्या प्रतिसादात) दिलेले आहेत. [सध्या हे व्यापक प्रमाणित पद्धतीने होत नाही. कारण ज्योतिषशास्त्राची एखादी केंद्रीय अधिकृत प्रमाणीकरण करणारी संस्था अस्तित्वात नाही.]

** ग्रहगोलांच्या गतीचा मानवी जीवनावर परिणाम होतो या अंधश्रद्धेवर फलज्योतिष आधारित आहे. म्हणूनच फलज्योतिष ही अंधश्रद्धा आहे.
ग्रहस्थितीचा मानवी जीवनाशी कार्यकारणसंबंध वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. त्या कार्यकारणसंबंधावर ज्योतिषशास्त्र आधारित नाही. पण काही विशिष्ट ग्रहस्थिती असताना काही विशिष्ट घटना घडतात हे शतकानुशतकांच्या निरीक्षणाअंती दिसून आलेले आहे. फलज्योतिष आधारित आहे ते फक्त या निरीक्षण संचावर, त्यातल्या कार्यकारणसंबंधावर नव्हे.

** ग्रहांच्या स्थितीवर आधारित म्हणवणाऱ्या ज्योतिषशास्त्रात सूर्यमालेतील युरेनस, नेपच्यून, प्लूटो या ग्रहांची स्थिती विचारात घेतलेली नाही. उलट, राहू आणि केतू ह्या काल्पनिक पौराणिक राक्षसांना वास्तव विश्वातले खगोल समजून खगोलांमधे उगाचच स्थान दिले आहे. शिवाय, सूर्य हा तारा असूनही (ग्रह नसूनही) त्याची गती आणि स्थान विचारात घेतलं जातं. यातून हे दिसतं की ज्योतिषशास्त्राचा पायाच किती कमकुवत आहे.
सगळ्यात पहिलं म्हणजे ग्रह कुणाला म्हणावं आणि ज्योतिषशास्त्रात कुणाला स्थान द्यावं याबाबत काही गैरसमज आहेत. “तारा = स्वयंप्रकाशी खगोल आणि ग्रह = स्वयंप्रकाशी नसलेला, पण प्रकाश परावर्तित करणारा खगोल” या व्याख्येत बसणाऱ्या ग्रहांनाच ज्योतिषशास्त्रात स्थान दिले गेले पाहिजे असा ‘ग्रह’ (समज) करून घेतलेला आहे. सूर्य स्वयंप्रकाशी तारा आहे (परप्रकाशी ग्रह नाही) याची जाणीव खगोलशास्त्रज्ञांना व ज्योतिर्विदांना होती आणि आहे. ज्या खगोलीय पदार्थांचा प्रभाव जीवनावर पडतो असं ज्योतिषशास्त्राला आढळून आलं, त्यांची गती व स्थिती विचारात घेतली जाते (ते ‘ग्रह’च्या प्रचलित व्याख्येत बसत असले/ नसले तरीही).

राहू आणि केतू नक्की काय आहेत याबद्दल मात्र माहिती फार कमी असते. म्हणून थोडं विस्ताराने सांगतो. राहू, केतू हे खगोल नसून ते चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा आणि सूर्याची पृथ्वीभोवतीची भासमान कक्षा यांचे छेदनबिंदू आहेत. व्याख्येनुसारच ते नेहमी एकमेकांच्या आमनेसामने असतात (diametrically opposite). या बिंदूंना खगोलशास्त्रात महत्त्व असण्याचं कारण म्हणजे दोन्ही कक्षांची प्रतलं समान असतील (म्हणजेच राहू/ केतू, चंद्र आणि सूर्य जेव्हा एका राशीत असतील तेव्हा) ग्रहण शक्य होते.

जसं इतर प्रत्येक ग्रहाचे ज्योतिषीय महत्त्व आहे तसंच राहू/केतूचंही आहे. प्रत्येक ग्रहाला जीवनाच्या एकेका पैलूवर प्रभाव पाडण्याचं सामर्थ्य (ज्योतिषशास्त्रीय महत्त्व) आहे असं दिसून आले आहे. त्याचा संक्षिप्त तक्ता खालीलप्रमाणे –

चंद्र – मन (मानसिक स्थिती, दृष्टिकोन इ.)
सूर्य – आरोग्य, राग, शारीरिक बल
गुरू – ज्ञान आणि अपत्य
शनी – आरोग्य
शुक्र – संपत्ती, कौटुंबिक स्थैर्य, प्रेम इत्यादी
बुध – तर्क, गणित, बुद्धी इत्यादी

** एखाद्या व्यक्तीची जन्मपत्रिका समोर ठेवली असता व्यक्ती जिवंत आहे का?, मतिमंद आहे की हुशार?, येत्या निवडणुकीत/ परीक्षेत तिचा निकाल काय लागेल? याचं अचूक उत्तर देता आलं तरच फलज्योतिष हे शास्त्र आहे असं म्हणता येईल.
वरील भाकितं चुकण्याच्या कित्येक शक्यता असू शकतात. ज्याने ती पत्रिका बघितली त्या ज्योतिष्याची चूकही असू शकते. जन्मवेळ, जन्मस्थान किंवा इतर माहिती चुकीची असू शकते. मुळातच भाकीत चुकतंय का हे शास्त्र म्हणवण्याची किंवा न म्हणवण्याची कसोटीच असू शकत नाही. आव्हान ज्योतिष्याला देण्याऐवजी ज्योतिषशास्त्रीय नियमांना/ सिद्धांतांना दिलं पाहिजे.

** ज्योतिषशास्त्रीय नियम/ सिद्धांत नेमके कोणते? ते वैज्ञानिकदृष्ट्या नेमके कसे तपासता येतात?
चंद्र हा मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्र म्हणतं. म्हणजेच चंद्राच्या कोणात्मक स्थानावरून मानसिक स्थिती ठरते. असंच निरीक्षण आधुनिक ज्ञानशाखांनीही केलं आहे.

इतर दिवसांपेक्षा पौर्णिमा आणि अमावास्येला जास्त गुन्हे घडतात, जास्त अपघात होतात आणि मनोरुग्णांना जास्त झटके येतात ही निरीक्षणे नोंदवलेली आहेत. चंद्राचा मानसिक आरोग्याशी संबंध आहे ही बाब आधुनिक मानसशास्त्रानेही विचारात घेतली आहे. पण नेमका कार्यकारणभाव अजून कळलेला नाही. तो शोधावा लागेल. इतर ग्रहगोलांबाबतही अश्या प्रकारे कार्यकारणभाव शोधावा लागेल. या संदर्भातले संशोधन खालीलप्रमाणे –

पौर्णिमेला रस्त्यावरील अपघात अन्य दिवसांपेक्षा ५% अधिक आढळून आलेला एक अभ्यास आहे.
(या एका अभ्यासावरून “चंद्र हा मनाचा कारक असतो” ह्या ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतामागील causality (कार्यकारणभाव) सिद्ध होते असं माझं मत नाही. जास्त मोठे नमुना संच असलेले अधिक अभ्यास गरजेचे आहेत.)
https://www.researchgate.net/publication/326328485_Full_moon_and_traffic_accident-related_emergency_ambulance_transport_A_nationwide_case-crossover_study

हा दावा खोडणारी संशोधनेदेखील आहेत. पण त्याने फक्त कार्यकारणभाव खोडून निघतो. कार्यकारणभाव ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीत येत नाही. तो ज्योतिषशास्त्राचा केंद्रबिंदू नाही.

** ज्योतिषशास्त्रासारखा विषय – ज्याचे सिद्धान्त आजही सर्वमान्य नाहीत, ज्याचा गैरवापर करून अनेकांची आर्थिक लुबाडणूक केली जाते – विद्यापीठात शिकवावं का?
ज्याचे सिद्धान्त सर्वमान्य आहेत तोच विषय विद्यापीठात शिकवला जावा असा नियम कधीही नव्हता. आइन्स्टाइनच्या प्रत्येक सिद्धांताला जगभरातल्या विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञांनी हसण्यावारी नेलंच होतं आणि कित्येक दशकं स्वीकारलंही नव्हतं. आज आपण आइन्स्टाइनला त्याच्या सापेक्षता सिद्धांतासाठी जरी ओळखत असलो तरीही त्याला १९२१ चं भौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक मिळालं होतं ते प्रकाश विद्युत परिणामाबद्दल (photoelectric effect). सापेक्षता सिद्धांत आईन्स्टाईनने १९०५ ते १९१५ या दशकभरात क्रमाक्रमाने प्रकाशित केला. १९१९ च्या खग्रास सूर्यग्रहणानंतरच त्याच्या संशोधनाला जगन्मान्यता मिळायला सुरुवात झाली. हा घटनाक्रम जगजाहीर आहे. आज string theory आणि quantum mechanics मुळे सापेक्षता सिद्धांताला पुन्हा आव्हान मिळालं आहे. पण म्हणून सापेक्षता सिद्धान्त विद्यापीठात शिकवला जाऊ नये असं नक्कीच नाही.

…. आणि आर्थिक फसवणुकीचं म्हणाल तर, सार्वजनिक नळावरचा पाण्याचा ग्लाससुद्धा ढापणाऱ्या चिंधीचोरांचा देश आहे आपला. आर्थिक फसवणूक कोणत्या क्षेत्रात नाही? मग तर सगळीच क्षेत्रं बंद पाडावी लागतील.

उलट विद्यापीठाच्या अधिकारकक्षेत आणल्यानंतर ज्योतिषक्षेत्रातील आवश्यक विदा गोळा करता येईल. त्यावर आधारित प्रमाणीकरण, नियमन आणि कायदे पारित करून भामटेगिरीला आळा घालता येईल. आणि मुख्य म्हणजे यातील मिळकत आयकराच्या कक्षेत आणता येईल. प्रसिद्ध ज्योतिषी शरद उपाध्ये यांनीही म्हटलेलंच आहे की ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत जर ज्योतिष्यांचा व्यवसाय आणला तर ९९% ज्योतिषी आपापले धंदे बंद करतील.

** ज्योतिषशास्त्रात देवाचं स्थान काय?
देवाला ज्योतिषशास्त्रात स्थान नाही. फक्त ग्रहगती व ग्रहस्थाने यांच्या निरीक्षणावरच ज्योतिषशास्त्र आधारित आहे.

** ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जे “दोष” सांगितले जातात ते कालसर्पशांती, नारायणबळी-नागबळी, ग्रहशांती इत्यादी विधींनी दूर करता येतात का?
संकट टळण्यासाठी धार्मिक विधी करणे हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. एखादा धार्मिक विधी केला असता तो ज्यासाठी केला ते फळ मिळेलच किंवा मिळणारच नाही याबद्दल काहीही सांगणं अशक्य आहे. संकटात सापडलेल्यांना, रंजल्या-गांजलेल्यांना, भोळ्याभाबड्या जनतेला अश्या विधींची खोटी हमी देऊन घाबरवणारे किंवा खोटी आशा दाखवणारे लोक रक्तपिपासू पिशाच्च आहेत.

विशिष्ट ग्रहस्थिती असताना विशिष्ट परिणाम होतात इतकंच ज्योतिषशास्त्र सांगतं. ते परिणाम दूर करण्यासाठी कोणतेही यज्ञयाग/ ग्रहशांती वगैरे विधी/ कर्मकांड/ उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले नाहीत.

** अंतराळातील ग्रहगोल पृथ्वीवर किती गुरुत्व बल लावतात याचं सूत्र न्यूटनने दिलेलं आहे. F = G (M1 x M2) / r^2 . ह्यात जर r = पृथ्वीपासूनचं अंतर, M1 = माणसाचं वस्तुमान, M2 = त्या त्या ग्रहाचं वस्तुमान हे आकडे घालून गुणाकार केला तर त्या ग्रहगोलांचा प्रभाव किती नगण्य आहे हे लक्षात येईल. अश्या नगण्य गोष्टीवर आधारलेलं ज्योतिषशास्त्र नगण्यच नाही का होत?
ज्योतिषशास्त्रात गुरुत्वाकर्षण किंवा इतर कोणतंही “बल” विचारात घेतलेलं नाही. “अश्या” ग्रहस्थितीत “तश्या” घटना घडायची शक्यता जास्त असते इतकंच ज्योतिषशास्त्र सांगतं. ग्रहस्थिती व घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव ज्योतिषशास्त्र सांगत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रात खगोलांची पृथ्वीपासूनची अंतरे विचारात घेतलेली नाहीत, फक्त कोणात्मक स्थिती (angular position) विचारात घेतलेली आहे. कोणात्मक स्थिती विचारात घेऊन जन्माच्या वेळची ग्रहस्थिती मांडली जाते. कोणता ग्रह कोणत्या राशीत किंवा नक्षत्रात होता यावरून संबंधित व्यक्तीच्या आयुष्याच्या एकेका पैलूवर काय भाकिते केली जातात किंवा त्याच ग्रहाचा तसाच प्रभाव कशामुळे पडतो या कार्यकारणभावाबद्दल ज्योतिषशास्त्र मौन आहे. ही ज्योतिषशास्त्राची एक प्रकारे त्रुटी आहे असंही म्हणायला जागा आहे.

** सर्व काही ग्रहस्थितीवरूनच ठरतं का? मानवी प्रयत्नांनाही काही महत्त्व असतं हे ज्योतिषशास्त्राला मान्य आहे का? ज्योतिषशास्त्रावर विश्वास असलेला माणूस नकळतपणे दैववादी निष्क्रिय बनणार नाही का? आणि महत्त्वाचे म्हणजे सुमुहूर्त बघून केलेली कामं का गंडतात?
ज्योतिषशास्त्र ‘दैव’ ह्या फक्त एका घटकाकडे सूचित करतं. Free will, इच्छाशक्ती, प्रयत्न, साधनं, कार्यपद्धती आणि इतर अनेक घटकांवरून अंतिम यशापयश ठरतं. आणि ही गोष्ट ज्योतिषशास्त्राला पूर्णत: मान्य आहे. ज्याला हे लक्षात आलेलं आहे तो “असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी” सारख्या दैववादी प्रवृत्तीच्या जाळ्यात फसणार नाही.

** ज्योतिषशास्त्र ही आपली संस्कृती आहे. त्याला विरोध करणारे हे भारतीय संस्कृतीला संपवू पाहणारे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारे आहेत.
भारतीय प्राचीन साहित्यात ज्योतिषशास्त्राचे समर्थक आणि विरोधक असे दोघेही आहेत. चाणक्याच्या अर्थशास्त्रातही ज्योतिषाची खिल्ली उडवलेली आहे.

** ज्योतिष्यांचा जर स्वतःच्या क्षमतेवर आणि शास्त्रावर इतका विश्वास असेल तर त्यांपैकी कुणीच करोनाची महामारी, जागतिक महामंदी, राष्ट्रीय निवडणुकांचे निकाल अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनांवर आधी भाकितं का केली नाहीत?
अश्या घटनांवर भाष्य/ भाकित करणं हे खरं म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या एका वेगळ्या शाखेच्या कक्षेत बसतं. त्याचे तज्ज्ञ ज्योतिषीसुद्धा आहेत. त्या ज्योतिषशाखेचंनाव आहे ‘मेदिनीय ज्योतिष’ (मेदिनी = पृथ्वी). या विज्ञानशाखेतील काही जगप्रसिद्ध तज्ज्ञांची नावं म्हणजे ग्रीनस्टन लोबो, अभिज्ञ आनंद इत्यादी. यांनी २०११, २०१५, २०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपचे निकाल, २०१८च्या FIFA वर्ल्डकपचा निकाल, २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल यांची भाकितं केली होती आणि ती सर्व अचूक ठरली होती. २०२४ आणि २०२९च्या निवडणुकांचीही भाकितं यांनी केलेली आहेत. बघूया खरी ठरतात का ते….

अश्या भाकितांसाठी वैयक्तिक जन्मकुंडलीपेक्षा वेगळं गणित मांडावं लागतं. वैयक्तिक जन्मकुंडलीतील ग्रहांपेक्षा वेगळ्या ग्रहांच्या गती आणि कोणात्मक स्थिती विचारात घ्याव्या लागतात. ग्रीनस्टन लोबोच्या मते वरुण (नेपच्यून), रुद्र/ यम (प्लूटो), कुबेर (गुरूच्या आणि शनीच्या मध्ये असलेला एक उपग्रह) यांच्या गती लक्षात घेतल्या असता ‘मेदिनीय ज्योतिषा’तील भाकितांची अचूकता वाढते. ग्रीनस्टन लोबोच्या मते प्लुटोची स्थिती विचारात घेतली तर काही विशिष्ट प्रकारच्या दीर्घकालीन भाकितांची अचूकता वाढवता येईल.

ग्रीनस्टन लोबो या ज्योतिर्विदाने केलेली भाकितं :

२०१८ FIFA वर्ल्ड कप विजेत्याचं भाकीत – https://www.dnaindia.com/sports/fifa/column-fifa-world-cup-2018-argentina-france-favourites-2625120
(लेख १४ जून २०१८ रोजी प्रकाशित झाला. २०१८ FIFA वर्ल्ड कपसुद्धा याच दिवशी सुरू झाला होता.)

२०११ क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्याचं भाकीत – https://www.dnaindia.com/sports/comment-whose-stars-are-shining-brightest-1522344
[लेख २१ मार्च २०११ रोजी प्रकाशित झाला. तोपर्यंत भारत नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरला होता. नवख्या आयर्लंडविरुद्ध हरलेल्या कमकुवत इंग्लंड संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. भारत वर्ल्ड कप जिंकेल असं भाकीत त्या वेळी कोणताच समालोचक करत नव्हता. हे भाकीत करताना ज्योतिर्विदाने युरेनस ग्रहाची स्थिती व त्याचा प्रत्येक संघाच्या कर्णधाराच्या जन्मवर्षावर पडलेला प्रभाव हा आधार घेतला होता. ही प्रचलित पारंपरिक भारतीय ज्योतिषशास्त्राची पद्धत नाही. ज्योतिषशास्त्राच्या पद्धती व गृहीतके बदलत असण्याचं हे एक उदाहरण आहे.]

२०१५ क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्याचं भाकीत – https://www.dnaindia.com/sports/column-stars-not-in-ms-dhoni-s-favour-unlikely-to-defend-world-cup-2060864
[अजिंक्य ठरलेल्या कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारत विश्व विजेता होईल अशी बहुतेक क्रिकेट तज्ज्ञांची भाकितं होती. पण वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी लिहिलेल्या या लेखात युरेनससोबत ज्योतिषशास्त्राला अज्ञात असलेल्या एका ग्रहाची स्थिती विचारात घेतली आहे. लेखात ग्रहाला Planet Y या नावाने संबोधले आहे.]
यातील Planet Y कोणता व तो कसा शोधला त्याची पद्धत व सविस्तर स्पष्टीकरण इथे मिळेल:
https://youtu.be/DaCvEYX2mxQ
त्याचप्रमाणे अन्य काही भाकितांमध्ये शोध लागलेला Planet X कोणता, तो शोधावासा का वाटला व तो कसा शोधला त्याची पद्धत व सविस्तर स्पष्टीकरण इथे मिळेल:
https://youtu.be/__DB60QET94

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्याचं भाकीत – https://www.deccanchronicle.com/sports/cricket/230419/team-india-wont-win-2019-wc-greenstone-lobo.html
(टीप : ग्रीनस्टन लोबो हा बुरसटलेला मणूवादी युरेशियण बामन नसून तमिळ ख्रिश्चन आहे.)

** जगभरात अनेक जनसमूहांमध्ये गेली शेकडो वर्षे ज्योतिष या ना त्या स्वरूपात टिकून आहे ते कशामुळे?
अज्ञात भविष्याची भीती आणि त्याबद्दलची उत्सुकता यामुळे. यात असहाय्यतेची, भोळसट भाबडेपणाची आणि हतबलतेची भर पडली की ज्योतिष हा धंदा बनतो. ते टाळण्याचा प्रयत्न केला तर ज्योतिष हा तसा निरुपद्रवी प्रकार आहे.

** मग असं असेल तर ज्योतिष हे नक्की शास्त्र म्हणावं की थोतांड?
शास्त्र किंवा थोतांड या दोन्हीपैकी एकही शिक्का लावण्यात व्यक्तिशः मला रस नाही. फलज्योतिषावर विश्वास असेल तर ज्योतिष्याचा सल्ला घ्यावा. नाही तर सोडून द्यावं. मी व्यक्तिशः ज्योतिष्याचा सल्ला घेत नाही.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.