ज्योतिषशास्त्राबद्दल थोडे

IGNOU चे हिंदीतील MA (ज्योतिष) आणि त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया

असे म्हणतात की भारतीय भविष्य (ज्योतिष) व्यवसाय हा ७०००० कोटींचा आहे. (https://www.exchange4media.com/marketing-news/shemaroo-enters-astrology-market-with-50-stake-in-dominiche-productions-96104.html) म्हणजे साधारण २० लाख ज्योतिषी. माझ्या मते हा आकडा अतिशयोक्त आहे. ज्योतिषी संघ असतात, त्यांच्या सभासदांची संख्या बघून नीट अंदाज बांधता येईल. कदाचित या आकड्यात प्रसिद्धीमाध्यमांचा समावेश असावा. त्यामुळे पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रवाहिन्या यांतील पैसा (त्याप्रमाणात) त्यात धरला गेला असेल. याशिवाय नारायण नागबळी, शांत अशा खर्चिक प्रकारांचा समावेश असणार.

माझ्या परिचयातील लोक साधारणपणे लग्न (पत्रिका जुळविणे) पत्रिका मांडणे आणि अडीअडचणीत सल्ला घेणे यापलीकडे ज्योतिषाकडे जात नाहीत. मोठा होऊन ज्योतिषी बनेन असे सांगणारी मुले मला दिसली नाहीत. ज्योतिषी हा बहुतेकांचा साइड बिझनेस (जोडधंदा) आहे. बहुतेक ज्योतिषी (मला भेटलेले) आपल्या मुलांना ज्योतिषी बनवू इच्छित नाहीत. केवळ भविष्य सांगून पोट भरणारे खूप कमी लोक असतात.

आमचे पूर्वज हे उत्तम विदा वैज्ञानिक होते आणि त्यांनी विदा चावून-चोथवून (crunching) जे तथ्य बाहेर काढले तेच वापरून आम्ही भविष्य सांगतो असे काही जण म्हणतात. अर्थात हे खोटे आहे. तसे असते तर ज्योतिषशास्त्रात अनेक भिन्न विचारांचे पंथ असायला नकोत. पण ते आहेत. भारतीय ज्योतिषात नक्षत्र हे मुख्य अंग आहे. जगभर त्यास फारशी किंमत नाही.

आपण ज्या राशी मानतो त्या नेमक्या कुठून सुरू होतात यावर मोठे वाद आहेत. एक रास 30 अंश कोनाची असते. पण ती कुठून सुरू होते यात साधारण 23 अंशाचे मतभेद आहेत. भारतीय परंपरेनुसार मकरसंक्रांतीनंतर दिवस मोठा व्हायला लागतो (१४-१५ जानेवारी). तर तीच मकरसंक्रांत इतरत्र २१-२२ डिसेंबरला होते. आणि दिवसही त्यानंतरच मोठा व्हायला लागेल. याच गणिताप्रमाणे काही हजार वर्षांनी आपली मकरसंक्रांत २१ जूनपर्यन्तदेखील जाणार आहे. आणि तेव्हा आपण लोक तीळगूळ देऊ. (भारतीय पद्धत ही कमालीची अशास्त्रीय आहे असे माझे म्हणणे नाही. पृथ्वीच्या precession मुळे हे होते. आणि यात डावे-उजवे करता येत नाही.)

खगोलशास्त्राचा विकास कित्येक हजार वर्षांपासून चालू आहे. साधारण दोन अडीच हजार वर्षांपासून ग्रहगणिते मांडण्यास सुरुवात झाली होती. पण याचा अर्थ असा नाही की जुने गणित अचूक होते. आर्यभट्टाची आकडेवारी ही त्यावेळी खूप चांगली होती. पण त्याचे ग्रहांच्या अंतराचे आकडे, तारामंडळांच्या अंतराचे आकडे हे शेकडो पटीने चुकीचे होते. त्याच्या ग्रहगतीच्या आकड्यातही भरपूर सुधारणा करण्याची गरज होती. तेव्हा आपल्या विदेचे crunching करणाऱ्या पूर्वजांनी वापरलेले गणित हे अचूक असण्याची सुतराम शक्यता नाही.

हे गणित अचूक नसल्याने, दहा वर्षांनी नेमकी ग्रहस्थिती काय असेल हे पाचशे वर्षांपूर्वी सांगता येत नसे. त्यामुळे एखादे मूल आज जन्माला आले तर त्याचे भविष्य वर्तवण्यासाठी पंचवीस वर्षानंतरची ग्रहस्थिती काय आहे हे जाणणे महत्त्वाचे होते. पण ते शक्य नसल्याने ज्योतिष्यांनी एक क्लृप्ती काढली. प्रत्येक दिवसाला एक वर्ष मानले. आणि पंचवीस वर्षांनंतरचे भविष्य पंचवीस दिवसानंतरच्या ग्रहस्थितीनुसार काढू लागले. या पद्धतीस दिन-वर्ष पद्धती म्हणतात. असेच काहीसे गणित भावाचलीत, अष्टोत्तरी पद्धतीत मांडले जाते (यात १०८ संख्येचा वापर असतो.) अर्थात या सर्वांत एक मत नसतेच.

माझी म्हैस हरवली आहे, ती कुठल्या दिशेला गेली आहे हे सांगण्यासाठी म्हशीची जन्मकुंडली लागणार. ती नसल्याने ज्योतिषी प्रश्नकुंडली मांडतात. म्हणजे प्रश्न कधी जन्मला त्याची वेळ घेऊन कुंडली मांडायची. आता म्हैस कधी हरवली हे प्रश्नकर्त्यास कधी समजले हे कळणे आवश्यक. पण ते माहिती नसेल तर मग तो ज्योतिष्याकडे कधी आला हे बघून तशी कुंडली मांडली जाते. अर्थात दोन पद्धतीने एक उत्तर येणारच नाही.

भृगुसंहितेत (तमिळ पट्टी) माणसांच्या नावाने त्यांची पत्रिका ओळखली जाते. तर हस्तसामुद्रिकात हात बघून. अशा अनेक पंथातून ज्योतिषविद्या विभागली आहे. त्यामुळे त्यांच्यातच एकवाक्यता नाही. तेव्हा वैज्ञानिक कसोट्यांवर त्यांना ठेवता येणे अशक्य आहे.

किती वाजून किती मिनिटे असा प्रश्न नेहमी विचारता जातो. लग्न ८.३७ ला आहे. जन्म १२.२७ ला झाला. मिनीट जरा जरी इकडे तिकडे झाले तर, सर्व बदलते. अर्थात हेही तितकेसे खरे नसते. म्हणजे सूर्य त्याची रास महिन्याभराने बदलतो. सगळ्यात वेगवान चंद्र रास बदलायला २-३ दिवस घेतो. शनी अडीच वर्षांनी रास बदलतो. जन्मरास (उगवतीला कुठली रास आहे ती) दर दोन तासाला बदलते. तेव्हा यात मिनिटा-मिनिटाला असे काही नसते. फक्त कुणी नेमका रास वा नक्षत्र बदलताना जन्मला तर मिनिटाने फरक पडतो.

पत्रिका मांडणे हे सातवीच्या मुलाला सहज शिकवता येईल. तर लग्नातील गुण जमतात की नाही हे काढणे पाचवीतल्याला जमेल. मुहूर्त काढणे हे असेच मिनिटाच्या हिशोबात बसत नाही. म्हणूनच एकाच दिवशी होणाऱ्या लग्नांमध्येही मुहूर्ताच्या विविध वेळा आढळतात.

महादेवशास्त्री जोशी यांनी सांगितलेली एक आठवण आहे. पत्रिका मांडणे आणि त्यावरून भविष्य सांगणे हे ते शिकले आणि त्याचा व्यवसायही त्यांनी सुरू केला. पण तो व्यवसाय काही चालेना. कारण पत्रिकेत जसे मांडले गेले तसे ते प्रामाणिकपणे सांगायचे. नंतर त्यांना कळले की नुसत्या गणिती भविष्यावर हा व्यवसाय फोल ठरतो. तर ग्राहकाला जे हवे ते जाणून घेऊन त्याच्या कलाने भविष्य सांगावे लागते.

ज्योतिष व्यवसाय हा बहुतांशाने हा समुपदेशन व्यवसायासारखा असावा. होमिओपॅथीदेखील बहुतांशाने तशीच असणार. आशा दाखवत राहणे, भविष्यात काहीही घडू शकते याची तयारी बाळगणे या दोन डगऱ्यांवर हा व्यवसाय चालतो. काही वाईट होणार असेल तर त्यास काही उपाय (शांती, व्रत, गंडे दोरे) सांगणे हा ज्योतिष व्यवसायाचा अभेद्य भाग आहे. यामुळे कुठलाही ज्योतिषी लग्न कधी होणार, मृत्यू कधी येणार, नोकरी कधी लागणार, व्यवसायात बरकत कधी येणार यावर नेमके भविष्य कधीच सांगत नाही. ना त्याचा ग्राहक नेमके भविष्य ऐकायला येतो. ग्राहक बहुधा आपली दुःखे ऐकवायला येत असतो.

लग्नाची पत्रिका जुळविताना गुण सांगणे हे एक तक्ता बघितले की लगेच सांगता येते. ते पूर्णतः गणिती आहे. पण ऐकणाऱ्याचा कल पाहून “गुण जुळले नाहीत तरी ग्रह जुळतात” असे सांगितले जाते. मुहूर्त शोधताना हॉलची उपलब्धता, सोयीची वेळ इत्यादी बाबींचा विचार करून सांगितली जाते. ऐकणाऱ्यास बरे वाटेल असाच सल्ला देणे हे ज्योतिष सांगणाऱ्याचे व्यवसायचातुर्य असते. “तर जरा बघा, नाहीतर दुसऱ्याकडे जाऊ” असे सांगणारा ग्राहकही असतो.

विवेकवादी प्रतिक्रिया:

इग्नुने या वर्षी या अभ्यासक्रमाची घोषणा केली आणि त्या विरुद्ध अपेक्षित प्रतिक्रिया उमटल्या. हा विरोध अनेक व्याख्याने, चर्चासत्र घेऊन प्रकट झाला. अर्थात याचा परिणाम या अभ्यासक्रमावर होणार नाही. तेथे जाणाऱ्या विद्यार्थीसंख्येवरदेखील याचा परिणाम होणार नाही. या विषयावर थोडेसे समाज विचार मंथन होईल अशा उद्देशाने हे उपक्रम हाताळले जातात आणि तेवढे ते सध्या करतात. पण ते समाज मंथन हे अधिक तोकडे पडते कारण ते ऐकायला येणारे बहुसंख्य हे ज्योतिषावर विश्वास ठेवणारे नसतात.

समाज विचार मंथनाचा एक दुष्परिणाम पण होऊ शकतो. तो म्हणजे इग्नुसारख्या सामान्य विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाला प्रसिद्धी मिळून तो जास्त लोकप्रिय होऊ शकतो. अशा प्रकारे विरोध तयार करून आपल्या कार्यक्रमास प्रसिद्धी मिळवायचे उद्योग करमणूक क्षेत्रात नेहमीच होत असतात. असे विरोध करणारे सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्यावर टीका करतात, “बंद पाडू” म्हणतात. कित्येकदा हा विरोध पैसे देऊन केला जातो. तेव्हा विरोध करण्याने काय साध्य होते हे नेहमीच तपासून पाहणे गरजेचे असते.

ज्योतिष विषयावरचा अभ्यासक्रम संस्कृत विभागाच्या अंतर्गत पहिल्यांदा जवळपास वीस वर्षांपूर्वी सुरू झाला. नागपूरजवळील संस्कृत विद्यापीठात हा अभ्यासक्रम तेव्हाच सुरू झाला होता. Nptel किंवा स्वयं या दोन्ही (का एकच) ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने यावर अभ्यासक्रम घेतल्या जातो. याशिवाय बिगर सरकारी क्षेत्रात याचे शिक्षण मोठ्या प्रमाणात होत आहेच. तेव्हा इग्नुने केले त्याचा परिणाम नगण्य धरायला हरकत नाही.

विवेकवादी टीकेचे स्वरूप हे विज्ञानाला धरून असते. पण हा अभ्यासक्रम विज्ञानात अंतर्भूत केला जात नाही. तो संस्कृत विभागाचा एक भाग आहे. बहुतेक विद्यापीठात (मी कालिदास विद्यापीठात चौकशी केली होती. आणि एक क्लासमध्ये जाऊन आलो होतो.) यासाठी प्राध्यापक नियुक्त केले जात नाहीत. इग्नुच्या अभ्यासक्रमासाठी असेच संस्कृतचे प्राध्यापक देवेश कुमार मिश्र यांचे नाव आहे. हे लक्षात घेऊन टीका करणे गरजेचे आहे.

ज्योतिषाचा बचाव करणारे बरेचदा विज्ञानशिक्षित असतात. त्यांना हे माहीत असते की गुरुत्वबलाने ज्योतिषविद्येचा बचाव होऊ शकत नाही. त्यामुळे ते “परस्परसंबंध (विदा विज्ञान) आहे पण तो का आहे हे माहीत नाही” असाच बचाव करतात. यासाठी ते ‘भरती ओहटी’ (ज्यात गुरुत्व बल आहे) आणि ‘मानसिक आरोग्य आणि पौर्णिमा/अमावस्या’ (जे खरे नाही) यांचा उल्लेख करतात. अशा वेळी मंगळ, गुरु, शनी यांचे गुरुत्वबल किती कमी असते असे सांगणे हे फारसे परिणामकारक नसते. आणि एवढेच नाही तर ते अर्धसत्य असते. कारण त्यांचे गुरुत्वबल हे प्रसूतीच्या वेळी जवळ उपस्थित असणाऱ्यापेक्षा जास्त असते.

‘ज्याचा दावा त्याची जबाबदारी’ हा मुद्दा विज्ञानास लागू होतो. पण ज्यांना विज्ञानात आपली विद्या बसवायची नाही त्यांना दावा सिद्ध करण्याची जबाबदारी घेण्यात रस नसतो. त्यांचा व्यवसाय अबाधित चालू असतो. काही वेळेस तुमचा दावा खोडण्याची जबाबदारी आमची असेही केले जाते. उदाहरणार्थ: होमियोपथी औषधांचा परिणाम होतो की नाही यासाठी वैज्ञानिकांनी काही अभ्यास केले आणि तो होत नाही हे त्यांना आढळले (परिणाम होतो हा वैज्ञानिकांचा दावा नसतानाही). परामानस (अतींद्रिय शक्ति मानणारे) दाव्यावर वैज्ञानिक अभ्यास झाले आहेत. तेव्हा भारतीय ज्योतिषशास्त्रावरही असा अभ्यास होऊ शकतो.

अपेक्षित रणनीती 

विरोधाची रणनीती काय असावी. अनुल्लेखाने मारणे, प्रचार करणे, विरोधकांना समजावणे, आव्हान देणे, आंदोलन करणे, निवेदन देणे, कोर्ट-कचेऱ्या करणे असे अनेक उपाय संभवतात. यातील अनुल्लेखाने मारणे हे सर्वात सोपा उपाय आहे ज्यात फारशी गुंतवणूक नसते. ‘प्रासंगिक प्रचार’ या रणनीतीत ज्योतिष अभ्यासक्रमाचा प्रचार होण्याचा धोका संभवतो.

ज्योतिष सांगणाऱ्यांना आव्हान प्रक्रियेत सहभागी होण्यात स्वारस्य नाही. कित्येक वर्षात कुठल्याही बाबतीत कुठलेही आव्हान कुणीही स्वीकारलेले नाही. त्यामुळे आव्हान हे बोथट शस्त्र बनत चालले आहे. बहुतेक ज्योतिषी “हे असे होऊ शकते” असे म्हणतात. नेमके “असेच होईल” असे सांगणारे ज्योतिषी नाहीत.

आंदोलन करणे, निवेदन देणे (lobbying) हे उपाय सद्य परिस्थितीत निरुपयोगी वाटतात. कोर्टात आव्हान दिले तर ज्योतिषशास्त्रावर होणाऱ्या शासकीय खर्चावर बंधन येऊ शकते. ‘त्यावर वैज्ञानिक अभ्यास करावा आणि मगच ते शिकवावे’ अशी याचना न्यायालयात करता येऊ शकते. सरकारी कार्यालयात धार्मिक चिन्हे असू नयेत, धार्मिक समारंभ होऊ नये असे निर्णय न्यायप्रक्रियेतून मिळाले आहेत. तसाच या बाबतीतही मिळू शकतो. वेळ आणि शक्ती असल्यास याचा निश्चित विचार व्हावा. संवाद साधणे हा उपायदेखील वाईट नाही. खरे मतपरिवर्तन हे संवादातून होत असते. प्रचारात उपरोध असल्याने संवाद साधला जात नाही. तेव्हा संवादात्मक कार्यक्रम कदाचित जास्त प्रभावी असेल.

ज्योतिषशास्त्र निराधार आहे. जुळलेली लग्ने मोडणे यापेक्षा त्याचे उपद्रवमूल्य फारसे नाही. पण आरोग्यविषयक अंधश्रद्धांचे काय? त्यावरील सरकारी मान्यता, निधी आणि व्यापारिक मूल्य हे कित्येक पटीने आहे. त्याचे उपद्रवमूल्य हे जीवाशी खेळणारे आहे. असे असून त्याविरुद्ध कुठलीही चर्चासत्रे, भाषणे, अर्ज, न्यायालयीन लढती होताना दिसत नाही. कुठेतरी दिशा चुकते आहे का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.