फलज्योतिष : विश्वसनीय?

“जन्मवेळेच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्या व्यक्तीच्या जीवनातील घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना कोणत्या” हे भविष्य वर्तवणे या पद्धतीला फलज्योतिष असे नाव आहे. या विषयावर जगभरात अनेक भाषांतून अगणित ग्रंथ निर्माण झालेले आहेत. स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारे अनेक जण या ग्रंथांचा उपयोग करून भविष्य वर्तवण्याचे काम करतात. काही हौशी, तर बहुतेक व्यावसायिक आणि जगातील असंख्य व्यक्ती त्यांचेकडून स्वतःचे भविष्य जाणून घेतात. त्यांचा विश्वास असतो की अशी भाकिते अनेकदा खरी ठरतात. पण खरोखर अशी भाकिते खरी ठरतात का हे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहणे जरूरीचे आहे.

शास्त्रीय पद्धती ही कार्यकारणभाव प्रयोगांनी सिद्ध करण्याची एकमेव विश्वसनीय पद्धती आहे. ‘क’ हे कारण असले की ‘ख ‘ हे कार्य होणारच व ‘ख’ हे कार्य घडण्यासाठी आधी ‘क’ हे कारण असावेच लागते हे प्रयोगांती सिद्ध केले की हा ‘क-ख’ कार्यकारणभाव सिद्ध होतो, विश्वसनीय ठरतो. भौतिकशास्त्रामध्ये असा कार्यकारणभाव सिद्ध केलेला आहे; एवढेच नव्हे तर त्याची गणिते पण बसवली गेली आहेत. दगड किती वेगाने वर फेकला हे माहीत असले की तो किती उंचावर पोहोचेल व नंतर खाली जमिनीवर आपटताना किती वेगाने आपटेल हेपण सांगता येते. परंतु असे अनेक बाबतीत घडत नाही. उदाहरणार्थ, शरीरशास्त्र. मलेरियाच्या जंतूशिवाय तो ताप येतच नाही, परंतु जंतू शरीरात शिरले तरी मलेरिया होतोच असे नाही. (कारण त्या शरीराची प्रतिकारशक्ती जास्त असते) येथे कार्यकारण भाव तपासून सिद्ध केल्यावरच ही संकल्पना विश्वसनीय ठरली आहे. फलज्योतिष वापरून आयुष्यातील घटनांची भाकिते करून ती खरी ठरतात का असे प्रयोग करून ठरविले आहे का? फलज्योतिष्यावरील एकाही ग्रंथात असा उल्लेख आढळत नाही.

कार्यकारण भाव

फलज्योतिषातील आधारभूत संकल्पना (theory) विश्वास ठेवण्यायोग्य वाटत नाही. अवकाशात अगणित किलोमीटर दूर असलेले ग्रह एखाद्या मानवी जीवनातील घटना ठरवतात? सर्व घटना पूर्वनियोजित असतात?व्यक्तीला आयुष्यात काहीही ठरवायचे स्वातंत्र्यच नसते? ग्रहांची स्थिती जन्मकाळाचीच का? हेच ८-९ ग्रह का? इतर का नाहीत? एकाच शहरात एकाच वेळी जन्माला आलेल्या शेकडो व्यक्तींचे – मुलगे आणि मुली – जीवन एकाच प्रकारच्या घटनाक्रमाचे असू शकेल? या व अशा अनेक प्रश्नांना उत्तरे आहेत या पद्धतीत, पण एकही उत्तर सिद्ध केलेले नाही. त्यामुळे भाकिते विश्वसनीय असणे शक्य वाटत नाही. असो. संकल्पना जरी तपासता आली नाही, तरी ती वापरून काढलेले निष्कर्ष नक्कीच तपासता येतील. असे निष्कर्ष प्रत्यक्षात खरे ठरले तर फलज्योतिष हे शास्त्र आहे व त्याची भाकिते विश्वसनीय आहेत असे म्हणता येईल.

भविष्यकथनाचे प्रकार

फलज्योतिषातील भाकिते दोन मुख्य प्रकारची असतात. पडताळून पाहता येतील अशी व पडताळणे अशक्य असलेली. “या मुलीचे लग्न २२व्या वर्षी होईल” हे भाकीत तपासता येते व बरोबर किंवा चूक असते. “धनयोग चांगला आहे” हे कसे तपासणार? “नातलगांना कर्ज म्हणून पैसे देताना जपून राहा.” हा उपदेश अथवा सल्ला आहे, भाकीत नव्हे! तसेच “तुमच्या राशीनुसार तुम्ही उमद्या मनाचे व निधड्या छातीचे आहात.” हे वर्णन आहे अन् ते आपल्याला लागू आहे असे सर्वांनाच वाटते. वर्तमानपत्रात रोज येणारी राशिभविष्ये ही या ‘न पडताळण्याजोगी’ प्रकारची असतात. स्वतःच्या राशीचे असले भविष्य वाचून प्रत्येकजण ते स्वतःला लागू आहे असा मनाचा समज करून घेतो! वाचकांनी एक प्रयोग करून पाहावा: प्रत्येक राशीचे त्या दिवसाचे/आठवड्याचे ‘भविष्य’ त्यांना स्वतःला लागू पडते आहे असे दिसून येईल! असे असल्यामुळे भाकिते खरी का अविश्वसनीय हे ठरवण्यासाठी पहिल्या प्रकारची – पडताळणीय – वापरावी लागतील.

एक शास्त्रीय तपासणी

प्रयोग १

प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे जनक नरेंद्र दाभोलकर व पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्राचे (स्टॅटिस्टिकस) प्राध्यापक यांनी मिळून फलज्योतिषाची शास्त्रीयता तपासण्यासाठी एक प्रयोग केलेला आहे. त्याची माहिती थोडक्यात खाली दिली आहे.

  • अचूकपणे जन्मवेळ नोंदवून त्या शहरातील त्या वेळच्या ग्रहस्थितीप्रमाणे ८० कुंडल्या जमविल्या; त्यातील ४० सर्वसामान्य बालकांच्या व ४० मंदबुद्धी बालकांच्या होत्या.
  • यांपैकीही एकेक घेऊन ४० जोड्या अशा जमविल्या की प्रत्येक जोडीत १ मंदबुद्धी व १ सामान्य बालक होते. १-२, ३-४, ५-६, असे क्रमांक दिलेले होते ७९-८० पर्यंत. परंतु सम व विषम क्रम यादृच्छिक (रँडम ) होते.
  • ज्योतिषी मंडळींना आवाहन होते की त्यांनी दर जोडीतील मंदबुद्धी कुंडली कुठली हे शोधून काढणे. जर ४० पैकी २८ उत्तरे बरोबर आली तर ज्योतिष हे शास्त्र आहे असे म्हणता येईल. उत्तरे १०० टक्के बरोबर असावयाची जरूर नव्हती कारण संख्याशास्त्राप्रमाणे येथे ७०% बरोबर येणे पण कठीण होते. (शक्यता केवळ १%)

अनेक वर्तमानपत्रांतून केलेल्या या सार्वजनिक आवाहनाला – किंवा आव्हानाला – ज्योतिषवर्गाकडून ३ प्रकारचे प्रतिसाद मिळाले .

  1. हे असले काही आम्ही ज्योतिषी करत नाही, आम्हाला प्रश्न विचारले जातात ते जीवनातील घटनांबद्दल. (मंदबुद्धी जीवनात नेहेमीचे काही घडत नाही, म्हणून त्या कुंडल्या सहजपणे वेगळ्या पाडता याव्या.)
  2. ‘फक्त ४० जोड्यांची तपासणी’ एवढ्या कमी सामग्रीवरून संपूर्ण शास्त्राविषयी निर्णय घेणार? आणि ४० च जोड्या का व ७० टक्केच का? (संख्याशास्त्राप्रमाणे यापेक्षा कमी जोड्या घेतल्या तर निष्कर्ष चांगला ठरणार नाही व दुपटीने वाढविल्या तरी विशेष उपयोगी ठरणार नाहीत – म्हणून ४० जोड्या पुरे आहेत.)
  3. अनेक ज्योतिष्यांनी भाग घेण्याचे सोयीस्करपणे टाळले. सुदैवाने ३० एक ज्योतिष्यांनी भाग घेतला व त्यांनी उत्तरे पाठविली.
  4. एकाही ज्योतिष्याचे उत्तर २६पेक्षा जास्त बरोबर निघाले नाही. (म्हणजे नाणेफेक करून प्रत्येक जोडीतील ‘मंदबुद्धी’ पत्रिका ठरवली असती तर जसे झाले असते तसेच येथेही झाले होते!)

या प्रयोगाने सिद्ध झाले की फलज्योतिष हे शास्त्र नाही: आणि म्हणून त्याची भाकिते विश्वसनीय असू शकत नाही. हा निष्कर्ष पण वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आला. पण यानंतर दुसराच एक विचार ज्योतिषवर्गाने केला. “आम्हाला नेहमी विचारले जाणारे प्रश्न घ्या व उत्तरे तपासा. त्यावरून काढलेला निष्कर्ष जास्त योग्य ठरेल.” हे त्यांचे मन्तव्य लक्षात घेणे जरूर होते.

प्रयोग २

हा प्रयोग मी स्वतः हाती घेतला होता.

पुण्यातील एका विख्यात ज्योतिष्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “अशा एका प्रयोगाने ज्योतिष हे शास्त्र नाही असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. माझ्याकडे २५००च्या वर अचूक कुंडल्या आहेत व त्यांची भविष्ये पण आहेत. त्या तपासून पहा म्हणजे कळेल.” यांच्याशी चर्चा करून असे ठरले की नेहमी विचारल्या जाणाऱ्या व पडताळून पहाता येतील अशा ४ बाबतींवर तपासणी करावी. लग्नाचे वय, शिक्षण किती व अभ्यासक्रम कुठला, संतती किती व नोकरी वा व्यवसाय कुठल्या क्षेत्रात. यांचे परीक्षण करून निष्कर्ष काढण्यासाठी फक्त २०० कुंडल्या खूप होतील व यातील १०० पुरुष व १०० स्त्रिया असाव्यात असेही नक्की केले. या २०० मंडळींकडून त्यांची खरी उत्तरे मागवून ती भाकितांशी ताडून पाहावी असे ठरले. ताडून पाहण्याची पद्धतीसुद्धा आधीच नक्की केली. उदा. ५ अभ्यासक्रम घेऊन त्यांचे एक ५ x ५ कोष्टक बनवावे. सगळी भाकिते योग्य असतील तर इंजिनियर प्रत्यक्ष – इंजिनियर भाकीत या चौकोनातच भाकिते भरतील. तसे नसल्यास भाकिते विखुरली जातील. इंजिनियर प्रत्यक्ष हा इतर चार भाकीत अभ्यासक्रमात पण थोडाफार सापडेल. जरी ८०% भाकिते योग्य ठरली तरी आपण ज्योतिष हे शास्त्र मानू असे ठरले.

संख्याशास्त्रानुसार अशा आकडेवारीत निरीक्षणांसाठी नमुन्यांची संख्या किमान ४० असावी. प्रत्यक्ष आणि वर्तवलेले भाकीत यांच्यामधील परस्परसंबंध ठरवण्यासाठी हा आकडा पुरेसा ठरावा. ४० पैकी २८ वेळा भाकीत अचूक ठरले (जसे खालील तक्त्यात इंजिनियर प्रत्यक्ष आणि इंजिनियर वर्तवलेला असे दाखवले आहे) आणि उर्वरित १२ साठी ते इतरत्र विखुरले गेले तरी ते भाकीत विश्वसनीय ठरले असे म्हणू शकतो. हे आकडे संख्याशास्त्रातील संभाव्यतेच्या संकल्पनेनुसार घेतले आहेत. यानुसार भाकिते अचूक असल्याचा निष्कर्ष ९५% विश्वसनीय ठरतो.

प्रत्यक्ष ——>
भाकीत
इंजिनियर डॉक्टर वकील शास्त्रज्ञ कला स्नातक
इंजिनियर ******* **  *  ****  *
डॉक्टर * *****  **  *  *
वकील *  ****  **  **
शास्त्रज्ञ * *  *  **  *
कला स्नातक * *  **  *  *****

या २०० कुंडल्या व या चार बाबतीतली भाकिते आणि त्या ज्यांच्या आहेत त्यांची नावे, पत्ते व संपर्क मला पाठवण्याचे या ज्योतिषवर्यांनी कबूल केले. नंतर प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून प्रत्यक्षात या चार बाबतीत काय घडले आहे ते बघायचे काम मी करणार होतो.

बरेच दिवस गेले तरी परत परत आठवण करूनही ही माहिती आली नाही. वेगवेगळ्या कामांमुळे वेळ झाला नाही असे सांगण्यात आले. साधारण ७-८ महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की हा प्रयोग करण्याची या ज्योतिष्यांची तयारीच नाही. ‘हात दाखवून अवलक्षण कशासाठी?’ जर यशाची खात्री असती तर हा प्रयोग करून फलज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध करता आले असते!

या न होऊ शकलेल्या प्रयोगाने पण ‘सिद्ध’ होते आहे, की फलज्योतिष हे शास्त्र नाही. जर या निष्कर्षावर विश्वास ठेवणे पटत नसेल, तर असा प्रयोग करून दाखवायला कोणीही ज्योतिषी पुढाकार घेऊ शकेल.

समापन

असे लेख वाचून ज्यांचा कुंडली-भाकिते यांवर दृढ विश्वास आहे ती मंडळी त्यांचे मत बदलून ही अंधश्रद्धा सोडून देतील का? अनेकांचा पूर्वानुभव दाखवतो की असे मतपरिवर्तन फार थोड्यांचे, अगदी अपवाद म्हणूनच होत असते! या अनिश्चित जगतात ज्यांना खात्री किंवा आधार पाहिजे असतो तो या फलज्योतिषातून मिळतो. जे भाकीत जवळपास खरे ठरते त्याचा बोलबाला होतो. अगदी ८० टक्के भाकिते जरी खोटी ठरली तरी ‘हा ज्योतिषी तितका हुशार नव्हता’, ‘जन्मवेळ अचूक नसेल’ असे विकल्प काढून स्वतःचे समाधान केले जाते.

एक छोटासा प्रयोग करणीय आहे. एखादी व्यक्ती उत्साहाने एक विशिष्ट भाकीत खरे ठरल्याचे सांगत असेल त्यावेळी “याच ज्योतिष्याची तुमच्याविषयीची काही भाकिते चुकली असल्यास ती सांगा.” असे म्हणावे. एकही आठवणार नाही याची खात्री असावी! मनुष्याचे मनच तसे वागत असते, त्याला कोण काय करणार?

.

अभिप्राय 1

  • प्रयोग क्रं 1 ची अधिकृत व विश्वासार्ह माहीती
    A statistical test of astrology
    Jayant V. Narlikar, Sudhakar Kunte, Narendra Dabholkar and Prakash Ghatpande

    This paper describes a recent test conducted in Maharashtra to test the predictive power of natal astrology.It involved collecting 200 birth details of 100 bright school students (group A) and 100 mentally retarded school students (group B). These details were used to cast horoscopes or birth charts for these children.After recording these details the charts were mixed and randomized and astrologers were invited to participate in a test of their predictive ability. Fifty-one astrologers participated in the test. Each participant was
    sent a random set of 40 birth charts and asked to identify to which group each chart corresponded. Among the initial 51 participants, 27 sent back their assessment. Statistical analysis of the results showed a success rate marginally less than what would be achieved by tossing a coin. The full sample of 200 birth charts was given to the representatives of an astrology institute for identification. They also did not fare any better. The limited but unambiguous procedure of this test leaves no doubt that astrology does not have any predictive power as far as academic ability is concerned. Ways of extending the scope of this test are discussed for future experiments.
    करंट सायन्स मधील मूळ पेपर आपल्याल इथे वाचायला मिळेल. CURRENT SCIENCE, VOL. 96, NO. 5, 10 MARCH 2009

    https://drive.google.com/file/d/1zi5S3lWOfGrRsJUHppsanUwXiMr3fYT1/view?usp=sharing

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.