कूपमंडूक

मी मनु. नाही, तो पहिला मानव – पाश्चिमात्यांच्या ऍडमसमान – नाही. त्यानंतरच्या अनेक मनुंपैकीही नाही. ज्ञात/लिखित इतिहासात पृथ्वीवरून सोडलेल्या यानांमध्ये जन्मलेला मी पहिला मानव. त्यामुळे माझं नाव मनु ठेवलं यात काही आश्चर्य नाही. इतरांना वाटो न वाटो, पण त्यामुळे माझ्या शिरावर एक मोठी जबाबदारी आहे. ती निभावण्याकरता मला काही असाधारण पावलं उचलावी लागू शकतात. पण थांबा – तुम्हाला सगळी कथा सुरुवातीपासून सांगायला हवी. माझ्या जन्माच्या कितीतरी आधी ती सुरू होते. त्या दिवसाची वाट कितीतरी वर्षांपासून पाहणं सुरू होतं. समुद्रतळाची कुशस्थली सापडून ११७ वर्षे झाली होती. पाच पिढ्या सरल्या होत्या पण उत्साह तितकाच होता. इलेक्ट्रॉनिक तसंच इतरही मीडियामध्ये त्याबद्दलचीच चर्चा होती.

अमुकः तू पाहणार आहेस लाइव्ह?
तमुक: अर्थातच. आयुष्यात एखादवेळीच मिळणारी संधी कोण सोडेल?

किंवा

ही: ए, काय-काय सापडेल तिथे?
ती: कळेलच काही दिवसांत. पण असं म्हटल्या जातं की तिथे अमाप संपत्ती आहे.

आजचा मुहूर्तच तसा होता. कुशस्थलीच्या शोधानंतर थोडी चाचपणी झाली होती, पण मुख्य उत्खनन मात्र आज सुरू होणार होतं. इतके दिवस थांबावं लागलं होतं कारण याआधी गुरू आणि शनी योग्य ठिकाणी नव्हते. गुरुला प्रत्येक राशीत एक-एक वर्ष घालवत सूर्याची प्रदक्षिणा करायला १२ वर्षे लागतात. शनी अडीच-अडीच वर्षे लावत २७ वर्षे घेतो. त्यामुळे ते दोघंही एखाद्या विशिष्ट ठिकाणी यायचे झाल्यास वाट पहावी लागणारच. आणि त्या गोष्टीचं तितकं महत्त्व असेल तर लोक थांबणारच. त्या ११७ वर्षांत सूर्याभोवती गुरुच्या जवळजवळ दहा प्रदक्षिणा झाल्या होत्या, आणि शनिमहाराजांच्या जवळजवळ चार. पण इतक्या वर्षांत पहिल्यांदाच ते दोघंही हवे तिथे पोहोचले होते. जग मात्र यासाठी थांबलं नव्हतं. नशिबाने पाण्याखालील उत्खननाच्या पद्धतीमध्ये बरीच प्रगती झाली होती. किनाऱ्यावर अनेक मंडपांमधून प्रार्थना, श्लोक, होम-हवन वगैरे सुरू होतं. एक बोट सुशोभित केली होती. त्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि हेल्मेट घालून खास तयार केले गेलेले दोन पाणबुडे विराजमान होते. योग्य वेळ येताच त्यांचं गंगेच्या पाण्याने शुचिर्भूतीकरण केलं गेलं आणि त्यांनी त्या महत्त्वाच्या मिशनकरता पाण्यात उड्या टाकल्या. मीडियामध्ये सगळीकडे जणू याव्यतिरिक्त विषयच नव्हता. कुशस्थलीचा पौराणिक इतिहास, रैवतकांनी ती कशी वसवली, खुद्द विश्वकर्म्याने त्याचं केलेलं डीझाईन, त्यावरच नंतर द्वारका कशी वसली, काळाच्या ओघात तीही कशी जलमय झाली वगैरे. त्याचप्रमाणे गुरू-शनीच्या सद्यस्थितीचं महत्त्व, त्यामुळे शोध लागल्याबरोबर उत्खनन का नाही केलं वगैरे. नेहमी मंगळ-शनी करणाऱ्यांच्या मनातही पहिल्यांदाच गुरुला थोडं उच्चीचं स्थान मिळालं. सर्व उत्खननांप्रमाणे इथेही वेळ लागणार होता. नेहमीप्रमाणे लोकांचा उत्साह थोडा कमी झाला पण नियमित अहवाल मिळत होते. पुराणांमधील वर्णनांपेक्षाही ती नगरी भव्य होती. अपेक्षित असलेले अनेक अवशेष सापडले. खुद्द कुबेराचा असावा असा एक खजिनाही सापडला. मुख्य महालात मात्र कुणीच कल्पनासुद्धा केली नव्हती अशी एक गोष्ट सापडली. एक भलीमोठी सोनेरी पेटी. अतिशय जड. आत सोन्याचीच पानं असलेलं एक पुस्तक होतं. हा खरा खजिना होता कारण त्यात रैवतकांचा संपूर्ण इतिहास होता. थेट ब्रह्मापासून, कश्यप, मनु वगैरे करत रैवतकापर्यंत. यातील तपशीलामुळे वेगवेगळ्या पुराणांमध्ये यासंबंधीच्या ज्या विसंगती होत्या त्याही सुधारता येणार होत्या. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या प्रकरणाला साजेशी अशी ऋग्वेदातील एक ऋचा होती. शेवटचं प्रकरण मात्र जरा विचित्र होतं. कुशस्थली नेमकी कधी आणि कशी पाण्याखाली गेली याबद्दल एकमत नव्हतं. या शेवटच्या प्रकरणाची सुरुवात संपूर्ण नासदीय सुक्त उर्धृत करून झाली होती. ऋग्वेदातील त्या सशक्त शंका – ‘या सर्वाचं ज्ञान केवळ त्या सातव्या स्वर्गात असलेल्या देवालाच असेल. किंवा कदाचित त्यालाही नाही कारण तोही तर विश्वनिर्मीतीनंतरच आला’ – आणि त्यानंतरच्या मजकुरावरून असं वाटत होतं की समृद्ध कुशस्थलीही कस्पटासमान वाटावी अशा नगरीची जाण रैवतकाला झाली होती – एका परग्रहाच्या रूपात. आणि तो त्या सातव्या स्वर्गाकरता बहुदा रवाना झाला होता. त्या सोनेरी पुस्तकात आपली सूर्यमाला बारकाव्यांसहित दर्शवली होती आणि त्या ग्रहाचं वर्णनही. हे मात्र थोडंफार सांकेतिक स्वरूपात होतं. सामान्यांना सहजी कळणार नाही असं. हरप्पन स्क्रिप्टबद्दल ज्याप्रमाणे सुरुवातीला तज्ज्ञांचं एकमत नव्हतं असं म्हणतात, तसंच थोडंसं इथेही झालं.

आम जनतेत मात्र एक वेगळंच चैतन्य पसरलं.

हा: आयला, कुशस्थलीपेक्षाही मस्त म्हणजे काय असेल नं!
तो: आपल्याला जाता आलं तर …
हा: आपल्याला की नाही ते माहीत नाही, पण मिळालेल्या नकाशांवरून योजना सुरू झाल्या आहेत असं मी ऐकलं आहे.

किंवा

अमका: त्या आकाशशास्त्राच्या लोकांना या ग्रहाबद्दल काही माहीत नव्हतं म्हणे. दूरदूरचे ग्रह शोधतात, हातातलंच कांकण दिसत नाही.
तमका: त्यांना जास्त नावं नको ठेऊ. त्यांनीच तर आता त्या ग्रहाचं स्पेक्ट्रम मिळवून तो वस्तीयोग्य असल्याचं दाखवलं आहे.

खगोलशास्त्रीय रडारवर तो तारा नव्हता तरी पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांनी मोठ्या दुर्बिणींवर लागलेल्या स्पेक्ट्रोस्कोप्सच्या मदतीने तो केवळ ४० प्रकाशवर्ष दूर आहे आणि सूर्यासारखाच आहे हे दाखवून दिलं. त्या नवस्वर्गात पोचायला सगळे उत्सुक होते. त्याच्या मंत्रवत गुणांमुळे त्याचं नामकरण ‘फु’ असं करण्यात आलं. खगोलशास्त्रज्ञांना सापडलेले इतर ग्रह एकतर दूर होते, किंवा वस्तीयोग्य तरी नव्हते. प्रत्यक्ष निघायचं म्हटलं तेंव्हा मात्र थोडी पंचाईत झाली. फु-लोकी जाणारं यान – ‘फुग’ – तयार होतं. यान दूरवर पाठवायचं म्हणजे खूप इंधन लागतं. इंधनाची बचत करत बराच वेग पटकन घ्यायचा असेल तर चंद्र, सूर्य आणि ग्रहांची गुरुत्वाकर्षणीय बूस्ट वापरली जाते. म्हणजे यानाला एखाद्या जवळच्या ग्रहाकडे अशा पद्धतीने भिरकवायचं की ते यान त्यावर आपटणार नाही, पण पुरेसं ओढलं जाईल आणि सूर्य ज्याप्रमाणे धुमकेतूंना दूर फेकतो तसं ते फेकल्या जाईल. गणित नीट केलं असल्यास आपल्याला हवं त्या दिशेने यान पाठवता येतं. खगोलतंत्रज्ञ यात पारंगत होते. मात्र त्यासाठी लागणारी ग्रह परिस्थिती आणि ज्योतिषशास्त्रानुसार फुग(च्छ)ण्यासाठी लागणारी ग्रहपरिस्थिती ही एकदम मिळेनात. साडेतीन मुहूर्त तसे हुकुमी असतात. तेंव्हा काहीही केलेलं चालतं. पण अनेक वर्षांत त्यांच्या आसपासही योग्य गुरुत्वग्रहस्थिती सापडेना. मग कुणाच्यातरी लक्षात आलं की क्षयमासाआधीच्या अख्ख्या शुद्धमासात साडेतीन मुहुर्तांप्रमाणेच काही पहावं लागत नाही. सौर आणि चांद्रमास यांच्यातील तफावतीमुळे साधारण दर तीन वर्षांनी एक अधिकमास येतो. तेंव्हा लादलेले फरक साठत जाऊन काही दशकांनी एका चांद्रमासाचा क्षय होतो. ७० वर्षांनंतरचा दोन्ही शास्त्रांना पटेल असा क्षयमासात एक मुहूर्त एकदाचा मिळाला. लगोलग त्या संबंधित सर्व तयारी जोशात सुरू झाली.

काही लोकांनी शंका उपस्थित केल्या की ते सोनेरी पुस्तक ट्रॉयच्या घोड्यासारखं असावं. सबब कुशस्थली बनवणाऱ्या रैवतकाच्या काळी सूर्यमालेची रचना आपल्याला माहीत नव्हती वगैरे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रीक जसे ट्रॉयच्या बाहेर लाकडी घोडा सोडून निघून गेले होते तसंच कोणीतरी हे पुस्तक सोडलं आहे. आपण पुस्तकातील सूचना-बर-हुकूम काही केलं तर पृथ्वीला धोका होईल. पण अर्थातच अशा पाखंडी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ फक्त तुरुंगातील अधिकाऱ्यांकडेच होता. आणखी तीन पिढ्या उलटल्या. फुग यान उडण्याचा दिवस जवळ आला होता. आता तर उत्कंठा अधिकच वाढली होती. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ४० प्रकाशवर्षांचं अंतर यानातील लोकांसाठी – म्हणजे त्यांच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये – केवळ ३० वर्षांत सर होणार होतं. पृथ्वीवर संदेश परत पोचायला पूर्ण चाळीस वर्षं लागणार असल्यामुळे यानावरील या टीमची तयारी जय्यत होती. इतका मोठा प्रवास पहिल्यांदाच होत होता. यानावर तंत्रज्ञ, ज्योतिषी त्याचप्रमाणे मानसशास्त्रज्ञ पण होते. यानावरच पुढची पिढी तयार होणार होती आणि तीच ‘फु’वर फोफावणार होती. मागून पृथ्वीवरून येणाऱ्या टीम्सचे हेच नेते असणार होते. आणि याच पिढीचा मी आदिमानव, मनु. आमच्या नव्या पिढीला नियमांच्या चौकटी आत्मसात करायला वेळ लागला नाही. पृथ्वी जरी आम्ही पाहिली नव्हती तरी तिच्याबद्दलचा सगळा अभ्यास करून झाला होता. म्हणूनच तुम्हाला सगळं तपशीलवार सांगू शकतो आहे. आम्ही सगळे खूपच उत्साहात होतो. रैवतकाबद्दल काय नवं कळेल याकडे तर सर्वच डोळे लावून बसले होते. शनीच्या – गुरुच्या कृपेने सगळं व्यवस्थित होणार होतंच. हं, नव्या ठिकाणी मंगळ, गुरू, शनीऐवजी आम्हाला नवा पाया बसवावा लागणार होता, पण त्यासाठी ज्योतिष्यांनी आम्हाला तयार केलंच होतं.

आधी तो तारा दिसू लागला आणि त्यानंतर लवकरच ‘फु’. यानाच्या दिशेत थोडासाच बदल करून आम्ही थेट ‘फु’पाशी पोचलो. लँडींग व्यवस्थित झालं. बरोब्बर सोनेरी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तो ग्रह होता. तो तारा पण सूर्यासारखा G प्रकाराचाच होता. त्यामुळे आधी जे पृथ्वीवर होते त्यांना फार काही फरक जाणवला नाही. सुरुवातीला तंबूंमध्ये राहून घरांची उभारणी केली जाणार होती. एक टीम काय अवशेष सापडतात हे पाहणार होती. दुसरी पृथ्वीबरोबरच्या दळणवळणाचं पाहणार होती, तर तिसरी आकाशदर्शनाद्वारे पंचाग स्थापणार होती. अनेक दिवस शोधूनही काहीच अवशेष सापडले नाही. आणि मग अचानक आमच्या लक्षात आलं की गुरुविना सर्व अधूरं आहे, आपण अक्षम आहोत. इथे आपल्याला गाईड करायला गुरुच काय, कोणताच ग्रह नाही. आतापर्यंतच्या अवकाशीय निरीक्षणांनुसार या सुर्याला ‘फु’ हे एकुलतं एक बाळ आहे. आपली पूर्ण फिलॉसॉफीच कोलमडली आहे. नियमांची चौकटच नाहिशी झाली आहे. आपण फ्रेम केले गेलो आहोत. चौकटीशिवाय फ्रेम. नवा सूर्य असूनही भविष्य केवळ अंधकारमय आहे.

यातून मार्ग काढायचा असेल तर वेगळं काही करायला हवं. गरज पडल्यास जुनं झुगारून. गरज पडल्यास बंड करुन.

या मनुवर ती जबाबदारी आहे आणि ती निभावण्यास तो तयार आहे. नवं विश्व उभारूया, स्वहस्ते, स्वकर्तृत्वावर.

चित्राचं श्रेय – शीतल वागळे
पूर्वप्रकाशन: ऐसी अक्षरे, दिवाळी अंक २०१४

अभिप्राय 1

  • काल्पनिक लेख तसा छान आहे. पण ज्योतिष शास्त्राला विरोध करण्यासाठी काढलेल्या अंकात काल्पनिक का होईना, पण ज्योतीष शास्त्रावर आधारित लेख देण्याचे प्रयोजन कळले नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *