कोपनहेगेन

युद्ध म्हटलं की आठवतं दुसरे महायुद्ध. अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि सारं जग ह्या कल्पनातीत संहारानी हादरून गेलं. ह्या प्रकारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले शास्त्रज्ञही पूर्णपणे हादरून गेले. अणुबॉम्ब हा जपानवर हल्ला होता, तसाच तो शास्त्रज्ञांच्या सद्सद्विवेकावरही हल्ला होता. कित्येकांनी निर्जीव फिजिक्स सोडलं आणि अधिक सजीव, अधिक मानवी असं जीवशास्त्र जवळ केलं. अणुबॉम्ब बनवण्यात आपण मोठी चूक तर नाही ना केली, अशी टोचणी अनेकांना आयुष्यभर लागून राहिली. तो भीषण आणि क्रूर नरसंहार घडल्यावर अनेकांच्या जगाविषयीच्या, जगण्याविषयीच्या, नीती-अनीतीविषयीच्या संकल्पनांना तडा गेला. हा विषय अनेक उत्कृष्ट इंग्रजी कलाकृतींचा विषय आहे. मराठीत मात्र ह्या विषयावर विशेष निर्मिती झालेली नाही. युद्धात आपला थेट सहभाग नव्हता आणि अणुबॉम्ब बनवण्यातही नव्हता; हे महत्त्वाचं कारण. वेळोवेळी भारतानं अणुस्फोट केला की चढणाऱ्या राष्ट्रवादाच्या तापाचे आपण पेशंट!

अणुबॉम्ब ही काही वर्षांच्या गुप्त, सुविहित, परिश्रमाची फलश्रुती होय. जोवर अण्वस्त्रांची शक्यता लक्षात आली नव्हती तोवर शास्त्राचं आणि शास्त्रज्ञांचं जग हे राजकारणापासून बरंचसं अलिप्त होतं. पण ही शक्यता लक्षात येताच विज्ञानाला आणि वैज्ञानिकांना प्रथमच ‘राष्ट्रीयत्व’ प्राप्त झालं. काही काळापूर्वी अगदी गुरुशिष्य, जिवलग मित्र, सहकारी असणारे शास्त्रज्ञ आता अचानक एकमेकांच्या शत्रूराष्ट्राचे ठरले. थेट शत्रूच ठरले. विज्ञानाला कधी नव्हे ती वेगवेगळी लेबलं लागली. हे जर्मन विज्ञान, सबब हे चालेल; हे ज्यू विज्ञान, हे अस्पृश्य. आइनस्टाईनसकट अनेक ज्यू शास्त्रज्ञांना जर्मनी सोडणं भाग पडलं.

नील्स बोहर हा डॅनिश प्रज्ञावंत. धर्माने ज्यू. कोपनहेगेनच्या (डेन्मार्क) इन्स्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल फिजिक्सचा निर्माता. त्याचा सख्खा विद्यार्थी हाईझेनबर्ग. हा जर्मन. ख्रिश्चन. तो अर्थात जर्मनीतच राहिला. तिथल्या अणुसंशोधनाचा मुख्यही झाला. लवकरच डेन्मार्कही जर्मनांनी काबीज केलं. मग बोहरला कोपनहेगेन सोडवंच लागलं. तो गेला अमेरिकेला. अमेरिकेशी त्याचे लागेबांधे होतेच. पुढे तिथल्या अणुबॉम्ब संशोधनात ह्याचाही हातभार लागला.

एकदा तो कोपनहेगेनमध्ये असताना त्याला भेटायला म्हणून हाईझेनबर्ग येऊन गेला. दोन शत्रूराष्ट्रांचे निष्ठावंत आणि बिनीचे अणुशास्त्रज्ञ युद्धाच्या ऐन रणधुमाळीत भेटतात! भलतंच नाट्यमय आणि गूढ आहे हे सारं. हाइझेनबर्ग हा जर्मन, अणुबॉम्बनिर्मितीसाठी झटणारा, त्या प्रकल्पाचा सर्वेसर्वा. अमेरिकेचा कट्टर स्पर्धक. आणि बोहर, डेन्मार्क जर्मनांनी बळकावले म्हणून मायभूला पारखा झालेला, हिटलरनं केलेल्या ज्यूंच्या निर्मम कत्तलींनी कडवट झालेला, अमेरिकी अणूप्रकल्पातला महारथी.

परिस्थिती अशी होती की अणुबॉम्ब शक्य आहे हे दिसत होतं. त्यासाठी काय करायचं हे ठाऊक होतं. फक्त कसं करायचं हे माहीत नव्हतं. जो प्रथम अणुबॉम्ब बनवेल तो या युद्धात जिंकणार हेही उघड होतं. नाझी शक्तींचा पाडाव व्हावा म्हणून अमेरिकेने अणुसंशोधनात पुढाकार घ्यावा असा, आईनस्टाईनसह अनेक शास्त्रज्ञांचा आग्रह होता. मग अमेरिकेत अणुबॉम्ब जन्माला घालण्यासाठी जन्माला आला, मॅनहॅटन प्रोजेक्ट. बोहर यातील एक कळीचा शास्त्रज्ञ. जर्मनीचे प्रयत्नही चालू होते. एक स्पर्धा सुरू होती. गुप्त, अघोषित स्पर्धा. दोस्तराष्ट्रे विरुद्ध नाझी जर्मनी. कोण किती पुढे आहे, ह्याचा थांगपत्ता कुणी कुणाला लागू द्यायचा नव्हता. शत्रूला बेसावध गाठायचं होतं.

अशा परिस्थितीत, परिस्थितीने आमनेसामने उभे ठाकलेले, हे एकेकाळचे गुरु-शिष्य, मित्र, सहकारी भेटतात. काय बोलतात? ते काय बोलले हे आजही अज्ञात आहे. हाइझेनबर्ग सांगतो की त्याने त्याच्या मनातली नैतिक खदखद गुरुपाशी मोकळी केली; तर बोहर सांगतो, अणुबॉम्बबद्दल हाइझेनबर्गच्या मनात कसलीही चलबिचल नव्हतीच. इतिहासकारांनी अनेक दस्तावेज ढुंढाळले, पण इतिहासाची ही पानं कोरीच राहिली आहेत.

नाटककार मायकल फ्रायन यानं आपल्या प्रतिभेने रिकाम्या जागात रंग भरले आणि आकाराला आलं एक अप्रतिम नाटक, ‘कोपनहेगेन’. (श्री. शरद नावरे यांनी त्याचे यथातथ्य मराठी भाषांतर केले आहे.)

ह्यातील पात्र म्हणजे नील्स बोहर, हाइझेनबर्ग आणि सौ. बोहर यांचे आत्मे. ते आता पूर्वायुष्याबद्दल बोलताहेत. त्या गूढ भेटीबद्दल, एकमेकांच्या आयुष्याबद्दल, एकत्रित केलेल्या पार्ट्या, फिरस्ती, फजिती, असं सगळं सगळं आठवतं आहे त्यांना.

पण यांचा संवाद चालतो तो बराचसा फिजिक्सच्या भाषेत. तिथल्या उपमा, उत्प्रेक्षा, आणि शब्दप्रयोग वापरून. आणि हीच या प्रयोगातली खरी गंमत आहे. इलेक्ट्रॉनची गती आणि स्थान याबद्दल अनिश्चितता, ‘अन्सर्टनिटी’ हे हाईझेनबर्गनी फिजिक्सला शिकवलेलं तत्त्व. प्रकाश, हा कधी लहरीसारखा वागतो तर कधी कणाकणानी बनल्यासारखा हे आणखी एक तत्त्व. शिवाय सापेक्षता, पुंजभौतिक, क्वांटम मेकॅनिक्स आणि इतरही आपल्याला अपरिचित अशी विज्ञानाची अनेक तत्त्वे ह्या चर्चेत येतात. पण बरेचदा ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना’, असा प्रकार. या तत्त्वांची सखोल समज प्रेक्षकांना असणं अजिबात आवश्यक नाही. नुसती तोंडओळखही पुरे. अशी ओळख करून देणाऱ्या अनेक जागा संवादात पेरलेल्या आहेतच. परिस्थितीतील ‘अनिश्चितता’, माणसाच्या वागणुकीचे माणसानीच केलेले ‘सापेक्ष’ मूल्यमापन, घटकेत एक तर, घटकेत भलतेच रूप धरण करणारे माणसाचे ‘लहरी’ स्वभाव, यावर भौतिकशास्त्राच्या परिभाषेत मधूनच गंभीर तर मधूनच गंमतीदार भाष्य करत नाटक पुढे सरकत जातं.

प्रतिभावान मंडळी आपल्या प्रतिभेच्या जोरावर सुतावरून स्वर्ग किंवा मानवी मनाचा तळ किंवा मानवी मनाचा पाताळसुद्धा गाठतात. हे नाटक याचा उत्कृष्ठ नमूना.

अभिप्राय 5

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.