अंत्यसंस्कार

पुरातत्त्ववेत्त्यांनी शोधलेल्या खूप जुन्या काळातल्या सामुदायिक दफनभूमी पाहता, अग्नीचा शोध लागायच्या आधी सर्व खंडांतील, सर्व प्रकारच्या मानव समुदायांनी मृतदेहांना एखाद्या झाडाखाली, गुहेमध्ये अथवा विवरामध्ये ठेवले असेल. पालापाचोळा आणि फारतर काही फांद्या इत्यादींनी ते मृतदेह झाकले असतील. कारण ‘खोल खोदणे’ हेसुद्धा मानवाच्या त्या आदिम अवस्थेमध्ये, अवजारांच्या अभावी सहज शक्य नसणार. बहुसंख्य ठिकाणी आपापल्या टोळीची जिथे जिथे जागा असेल, त्या जागांवर ते मृतदेह ठेवले जात असतील, कारण बऱ्याच ठिकाणी दगडांच्या मोठ्या वर्तुळात सांगाडे पहावयास मिळाले.

मृतदेहांची विल्हेवाट लावणे हे काम निसर्गाने विविध प्राण्यांना दिलेले आहे. मानवाच्या भावनिक बुद्धीचा विकास झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये आपल्या आप्तांच्या मृतदेहांचे प्राण्यांनी भक्षण करू नये असा विचार आला असावा. परंतु त्याचबरोबर या मृतदेहाचे काय करायचे? हा प्रश्नही त्याच्या मनात उभा राहिला असणार.

पूर्वीच्या काळी माणूस पूर्णपणे मेला आहे अथवा नाही हे समजणे अतिशय कठीण असेल. कारण त्या काळातील चाचण्या या स्वाभाविकच अतिशय सोप्या साध्या असणार. (ज्यामध्ये श्वास चालू आहे की नाही तपासणे अथवा शरीर गरम आहे की नाही हे पाहणे अथवा नाडी चालू आहे की नाही हे तपासणे अशाच त्या चाचण्या असतील). टाळूवर लोणी ठेवून पाहणे हे खूप नंतरच्या काळात सुरू झाले असणार. कोमामध्ये गेलेल्या अवस्थेत अथवा अतिशय शांत अशा निद्रेमध्ये श्वास अतिशय संथ झालेला, अथवा नाडी अतिशय संथ झालेली असणे अगदी स्वाभाविक असते.

खूप तापानंतर घाम येऊन गेला आणि ग्लानी किंवा मूर्छा आली तर शरीर थंड पडलेल्या आणि श्वास न जाणवणाऱ्या त्या देहाला मृत समजणे अगदी स्वाभाविक असेल. अशा मृतांना त्या त्या ठिकाणी ठेवल्यानंतर तशाही अवस्थांमधून बरे होणे (नैसर्गिकरित्या) शक्य होते. कदाचित यातील काहींना परत समाजात घेतले जात असेल किंवा भूत बनून परत आले म्हणून बहिष्कृत केले गेले असेल.

अशा परत आलेल्या व्यक्तीला जर त्याला टाकून दिल्याबद्दल राग आला असेल अथवा त्याच्या चीजवस्तू, बायका/पुरूष इत्यादी इतरांच्या झाल्या/झाले असतील, तर तो/ती त्याचा सूड घेण्यासाठी काहीही करत असेल. लपूनछपून रात्री-अपरात्री हिंसक कृत्यदेखील करत असेल, छळ करत असेल. त्याकाळात संध्याकाळपासून सकाळपर्यंतच्या अंधारावर मात करणे अति कठीण असणार. त्यामुळे अशा घटनांमध्ये माणसाचे पिशाच्च होणे आणि त्यांनी पछाडणे असे नाव दिले गेले असेल. अशांच्या अस्तित्वाची प्रचंड दहशत टोळीवर वा समाजावर असेल यात काहीच नवल नाही. त्यामुळेच काहीही करून भूत होणे टळले पाहिजे यावर समाजधुरिणांना विचार करायला भाग पाडले असेल. त्यानंतरच्या काळातील सामूहिक थडग्यांमध्ये असे आढळून आले आहे की सांगाड्यांचे पाय घोट्यापाशी तोडलेले असत… जेणेकरून तो/ती भूत बनून परत येणार नाहीत.

त्याच काळात मानवी समाजात कुटुंब, संपत्ती, वारसाहक्क वगैरे बाबी डोकं वर काढू लागल्या असतील. वैयक्तिक संपत्ती आणि स्वामित्व भावना ‘Have Nots’ पेक्षा ‘Haves’ मध्ये जास्त असणे, आणि तदनुषंगिक स्वार्थ व कौटुंबिक वाद यांमध्येही त्रैवर्णिक आघाडीवर असणे स्वाभाविकच होते, नाही का?

यात कधीतरी अग्नीचा शोध लागला; तो सांभाळून ठेवणेही कठीण होते. आणि तो काही दशके किंवा कदाचित काही शतके सर्वांपर्यंत पोहोचलाही नसेल. त्यामुळेच अग्नी हातात आल्यावर दहन विचार सुचला असावा. दहन केले की ते लोक भूत होऊन परतत नाहीत हे निश्चित झाल्यावर ‘त्रैवर्णिकांमधे’ दहन अन् ज्यांच्याकडे काहीच नाही अशांकडे दफन ही प्रथा रूढ झाली.

आपल्याला हिंदुंमध्ये दफन हे वाचूनच ४४० व्होल्टचा झटका बसेल. परंतु पूर्वी कोकणामध्ये बहुजन समाजाच्या बहुतेक सर्व गावांमध्ये मृतदेहांचे दफन करण्याची पद्धत होती. १९९९ ते २००० पर्यंत ती निश्चितच सर्वदूर वापरली जात होती. खास करून माणगाव, म्हसळा, तळा, इंदापूर या भागांमध्ये तर नक्कीच. त्यानंतर सरकारी विकासाच्या योजनांमध्ये, गावकऱ्यांनी कधीही कुठलीही मागणी न करता, एक स्मशान विकास योजना आली. मंत्रालयात ही योजना बनली. त्या योजनेचे कॉन्ट्रॅक्टर गावोगावच्या सरपंचांकडे पोहोचले आणि म्हणाले, “तुमच्या गावच्या स्मशानभूमीच्या विकासाची योजना आहे. दहनासाठी स्टँड आणि लाकडाच्या साठवणुकीसाठी शेड बनवायची आहे. त्याकरता निधी मंजूर झाला आहे. या कागदपत्रांवर सही करा. आम्ही ते काम करू. काही गावातील सरपंचांनी याला नकार दिला. परंतु सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्याची धमकी देऊन, त्यांना एकप्रकारे धाकदपटशा दाखवून या योजनेची पूर्तता करण्यात आली.

पूर्वी कोकणातल्या प्रत्येक गावांमध्ये देवराई होती. देवराई डोंगरमाथ्यावर किंवा डोंगरावरच्या उताऱ्यातील काही सपाट्यांवर पसरलेली असायची. या देवरायांबद्दल लोकांमध्ये आदर व भिती असायची. तिची काळजी सगळे ग्रामस्थ घेत असत. तिथे आग पोचू नये, तिथे वृक्षतोड होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जाई. सुयोग्य दफन देवराईमध्ये केले जात असे. तेसुद्धा अगदी घनदाट वृक्ष असलेल्या देवराईत आणि मृतदेहाला गोमयाने किंवा पुरेशा जीवामृताने संस्कारित करूनच. जेणेकरून विघटनामुळे प्रदूषण होणार नाही. ज्याठिकाणी मृतदेह पुरले जायचे, त्यातही ना कॉफिनचा वापर व्हायचा, ना दगडी किंवा सिमेंट-काँक्रिटची थडगी बनवली जायची. जमिनीचा पिढ्यानुपिढ्या, शतकानुशतके, पुनर्वापर होत असे. ती जमीन अतिशय घनदाट जंगलांनी झाकलेली असे. त्यामध्ये भरपूर जैवविविधता असे. पूर्वी ज्या गावातील मृतदेह जंगलांच्या निर्मितीला कारणीभूत ठरत होते तेच त्यानंतर जंगलांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू लागले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथीचे रोग, कुष्ठरोग अशाने मरण पावलेल्यांचे मात्र कटाक्षाने दहन केले जायचे. केवढा तर्कशुद्ध वैज्ञानिक विचार. आपल्या पूर्वजांना साष्टांग नमन.

एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया:-
जयपूरजवळ हिंगोनिया नावाच्या गावी एक गोशाळा आहे. येथे म्हातारे आणि निकामी झाल्यावर रस्त्यावर सोडून दिलेले २५,००० गाई आणि बैल सांभाळले जातात. तो एक प्रकारचा गायींचा वृद्धाश्रमच आहे. डॉक्टर, ऑपरेशन थिएटर, आयसीयू इत्यादी सुविधा असूनही त्यांच्याकडे दिवसाला १०-२० गाई-बैल नैसर्गिक वृद्धापकाळामुळे मरतात. ते मृत गाईंना मिठाचे थर देऊन पुरत असत.. तीन तीन वर्षे गाईंचे अवशेष उरत आणि दुर्गंधी पसरत असे. त्यामुळे पुढील दफन करण्यास जागा पुरत नाही अशी त्यांची समस्या होती. आणि त्यामुळे कुत्र्यांचाही खूपच त्रास होता. येथे मृत गाईंना त्वचेसकट पुरले जात असे. त्यामुळे डॉ. अजित गोखले आणि श्री. विजय दिवाण (जे विनोबाजींचे सहकारी आणि शिष्य आहेत) यांनी या गाईंपासून अहिंसक चामडे बनवणे योग्य राहील असा सल्ला त्यांना दिला. प्रात्यक्षिकही करून दाखवण्यास ते तयार होते. परंतु तिथे व्यवस्थापक म्हणून असणाऱ्या इस्कॉनच्या संन्याशांना लोकक्षोभाची भीती वाटली. ते म्हणाले, “हे शक्य नाही; अन्य काहीतरी उपाय सांगा.” (समाज व्यावहारिक विचार न करता जेव्हा फक्त भावनिक विचार करतो तेव्हा असले टाळता न येणारे प्रकार होतात).

यावर या दोघांनी सांगितले की मीठाऐवजी चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या (कंपोस्टच्या) थरांमध्ये गाईंना दफन करावे; त्यामुळे विघटन लवकर व चांगले होईल. आणि याचा त्यांना प्रत्यक्षात अनुभव आला. जिथे ३-३ वर्षे अवशेष पडून राहत होते, तिथे सहा महिन्यांच्या आत संपूर्ण सांगाडा मोकळा होऊन जमिनीत मिसळतो असे त्यांना पाहायला मिळाले. दुर्गंधी गेली. कुत्र्यांचा त्रास खूपच कमी झाला. आजूबाजूला वृक्षराजी चांगली वाढली.. जी आधी मिठामुळे वाढत नव्हती. जे तीन-चारशे किलोच्या प्राण्यांबाबत होऊ शकते ते माणसांच्या बाबतीत किती सहज शक्य आहे याचा विचार करा.

आज डोंगर वाचविण्याकरिता वृक्षारोपण करण्याचा विचार प्रामुख्याने मांडला जातो; परंतु प्रत्यक्षात खरी गरज आहे ती वणवे थांबवण्याची आणि लाकूडतोड थांबवण्याची. लाकूडतोड विविध कारणांनी होत आहे. बोटी, फर्निचर, बेकऱ्या, कारखान्यांचे बॉयलर आणि त्याहूनही मोठे कारण म्हणजे शहरांमधील मृतदेहांचे दहन. विचार करा अख्ख्या जन्मभरात एकही वृक्ष न लावणारा माणूस, मेल्यावर मात्र सोळाशे किलो लाकडे बरोबर घेऊन जळतो. हे न्याय्य आहे का?

आता लगेच असा प्रश्न येईल की हे एक वेळ गावात ठीक आहे हो! पण शहरात कसे शक्य आहे? आणि आता बरेच ठिकाणी तर विद्युतदाहिन्या वापरल्या जातात. त्यामुळे पर्यावर्णीय ऱ्हास कमी होतो आहेच की!! शहरांमध्ये पर्याय नाही असे आपण म्हणतो, ते सत्य आहे का? परवडणे म्हणजे काय? विजेची पर्यावरणीय किंमत किती? याचा नीट साकल्याने विचार केला तर असे लक्षात येते की सुयोग्य दफनापेक्षा दहन वाईट आणि लाकडी दहनापेक्षा डिझेल दहन वाईट आणि त्यापेक्षा विद्युत दहन वाईट.

आधी परवडणे पाहू:
एक साठ-सत्तर किलोचा माणूस त्याच्या जगण्याकरता दररोज साधारणपणे पाऊण ते दीड किलो अन्न खातो. सरासरी एक किलो धरले तरी वर्षाला ३६५ किलो होतात. चहा, दूध, फळे इत्यादी सुद्धा साधारणपणे वर्षाला ३६५ किलो तरी निश्चित खाल्ली जातात. म्हणजे वर्षाला आपण सातशे किलो अन्न ग्रामीण भागांमधून आणि डोंगरांमधून शहरांमध्ये आणतो. ७०० x ७० = ४९,००० किलो अन्न एक शहरी माणूस त्याच्या जीवनामध्ये भक्षण करत असतो. कागदाचा, कापडाचा आणि इतर सर्वांचा प्रवासही जंगल, शेते, ग्रामीण भाग ते शहरे असा होत असतो. ती सर्व संसाधने आणि अन्न जर राज्यभरातून, देशभरातून, जगभरातून त्याच्या घरी येत असेल आणि ते ‘परवडत’ असेल तर त्याचा मृतदेह जेथून त्याचे अन्न आले त्या डोंगरावरती, चांगल्या देवराईमध्ये दफन करणे का बरे नाही परवडणार?

मुळात आपण जगाचा विचार केला तर आपल्याला असे दिसते की एकोणिसाव्या शतकापर्यंत जगाची बहुसंख्य लोकसंख्या समुद्रापासून किमान पन्नास किलोमीटर दूर राहत होती. गोड्या पाण्याच्या जवळ, मोठ्या नद्यांच्या जवळपास. जागतिक व्यापारवाढ आणि पाण्याचे वहन करण्यासाठी पाईप व पंप सहज उपलब्ध झाल्यानंतर भराभर शहरीकरण वाढले आणि ते प्रत्येक देशाच्या समुद्रकिनाऱ्यांकडे सरकले. विविध प्रकारची बंदरे आणि व्यापारी शहरे समुद्रकिनाऱ्यांवर वाढल्यामुळे जागतिक लोकसंख्येच्या पन्नास टक्क्याहून जास्त भाग हा समुद्रकिनारी राहतो आहे (कदाचित त्याहीपेक्षा जास्त). याचा परिणाम म्हणजे डोंगरांवरून, पठारांवरून अन्नाचे वहन समुद्राच्या दिशेला केले जात आहे. अन्न म्हणजेच जमिनीचा कस; तो आपण डोंगराकडून समुद्राकडे वाहून नेत आहोत. आपले मलमूत्र मात्र आपण परत डोंगराला देत नाही. ते समुद्रातच वाहून जाते. निसर्गाच्या दृष्टीने ही शंभर टक्के चूक आहे. निसर्ग चक्रियतेने चालतो.

संसर्गजन्य विकार असलेल्या मृतदेहांचे दहन करणे चालू ठेऊ.. अन्य बहुसंख्य अपघात, वृद्धत्व, अन्य आजाराने वारलेल्यांचे सुयोग्य दफन उपकारकच ठरेल.

श्रीकृष्णानी इंद्र पूजन बंद करून गोवर्धन पूजन सूरू केले. गाई आणि गोपाळांना महापुरातून याच गोवर्धनाने वाचवले. आपणही आपल्या कुरीती सोडून स्वधर्म सूर्याचे दर्शन घेऊया.

परंतु आधुनिक शहरी मानवाला हे समजत नाही किंवा समजून घ्यायचे नाही आणि जरी पटले; तरी पचनी पडणे तर जवळजवळ अशक्य.

yeshwant.marathe@gmail.com

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.