पटरी

मुंबई.

घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारं, ऐन रात्रीतही टक्क जागं राहत कधीच न झोपणारं शहर. स्वत:चं हे वेगळेपण जपण्यासाठीच का माहीत नाही, नेहमीप्रमाणं आजही ते झोपलं नव्हतं. याच जागरणं करणाऱ्या मुंबईतला सेंट्रल गव्हर्नमेंट हाऊसिंग कॉलनीमुळे सुप्रसिद्ध असलेला अँटॉप हिल विभाग. त्यालाच खेटून असलेली बांडगुळासारखी वाढत गेलेली कुप्रसिद्ध समजली जाणारी अँटॉप हिल झोपडपट्टी. रात्रीच्या म्हणा किंवा मग पहाटेच्या म्हणा तीनच्या ठोक्याला तिथल्या दोन खोल्यांतून अनुक्रमे मंदा केडगे आणि नाझिया खान या दोघी बाहेर पडल्या. मंदाच्या एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात पाण्यानं भरलेलं टमरेल. नाझियाच्या एका हातात टमरेल तर दुसरा हात तसाच मोकळा. मंदा चौतीशीची तर नाझिया एकतीशीची. दोघी आपापल्या वयातील अंतराएवढंच अंतर पार करूनझोपडपट्टीबाहेरून जाणाऱ्या रेल्वे पटरीवर आल्या.

पटरी पार करताच नाझियाने मोकळ्या हाताने नाकाच्या पाळ्या बंद केल्या. मंदा मात्र झोपडपट्टीच्या गर्दीतून मोकळ्या हवेत आल्यासारखी पुढे जायला लागली. तोच नाझिया ओरडली. “अरे, उधर किधर जा रही है? कितनी गंदी बास आ रही है देख. आ इधर. इधर पटरी पर ही बैठते है.” “अगं, पर ट्रेन आएगी तो?” मंदाची भीती बोलून गेली. “तीन बजा है अभी. अभी कहां से ट्रेन आएगी? बैठ इधरच पटरी पर.” नाझियाचं खरं होतं. पटरी आणि तिच्या आसपासचा काही फुटाचा भाग सोडल्यास सगळीकडे लोकांनी हागून घाण केली होती. मंदा मागे वळली. पटरीवरच्या मोकळ्या जागेत टमरेल ठेवूनदोघी हागायला बसल्या. थोडा वेळ श्वास रोखून, कुंथून पुढे त्या मोकळ्या झाल्या. दोघींनाही खूप मोकळं मोकळं वाटलं.

या मोकळं वाटण्याचाच परिणाम का माहीत नाही. मंदा तक्रारीच्या सुरात म्हणाली, “मेरी शेठाणी मुझे काम पर हागने को ही नही देती.” “क्यू?” नाझिया विचारती झाली. “बोलती है तेरे संडास की गंदी बास आती है. आता संडास की गंदी बास न्हाय येणार तरकाय येणार? उसके संडास को अच्छे सेंट या परफ्युम की बास आती होगी.” नाझियानं टोमणा मारला. शेठाणीला बोलण्यापुरतंका असेना हरवल्याचं समाधान घेऊन मंदा आणि ती हसायला लागल्या हसणं थांबताच मंदासारखंच काही काळ घरकाम केलेल्या नाझियानं स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात केली.

तीन महिन्यांपूर्वीच नाझिया एका गुजराती घरात घरकामाला जायला लागली होती. लोक चांगले होते. नाझियाला चांगली वागणूक मिळायची. अगदी तिची शेठाणी तिला तिच्या घरातल्या संडासात हागायलाही द्यायची. पण जेव्हा त्या घरातल्यांना नाझियाचा धर्म कळला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तिला कामावरून काढून टाकलं. आता स्वतःचा धर्म न लपवता गेल्या दोन महिन्यांपासून नाझिया कामच शोधत होती.

“कुछ काम मिलता है क्या देख किधर.” मघाशी शेठाणीला टोमणा मारणाऱ्या नाझियाचा सूर आता पराभूत झाला होता. “हां, देखती हूँ. टेन्शन मत ले तू.” मंदानं नाझियाला धीर दिला. आणि स्वतःच्याच विचारात असलेली ती पुढे म्हणाली, “मर्दों का अच्छा है ना? दिन मे इधर पटरी पर खुलेआम हाग सकते है. किसने देखा बिखा फरक नही पडता.” “औरत मतलब इज्जत होती है ना! किसी ने देखा, फोटो या व्हिडीओ निकाल लिया तो?, अभी तो हाथ मे ही कॅमेरा आया है.” “इसिलिए तो मै हमेशा रात को आती है. वैसे भी सुबह जल्दी काम पर जाना पडता है. तो यही टाईम पकड़ा है मैने.” “और अचानक दिन मे हुआ तो?” नाझियानं शंका उपस्थित केली. “दिन मे हुआ तो जाती है सुलभ मे. ज्यादातर कभी होता नही है दिन मे. अभी बॉडी को आदत पड़ गई है ना?” “हा. मेरा भी ऐसाच है. लेकिन हमारा छोड. हम ये सब कंट्रोल कर सकती है. लेकिन हमारे लडकियों का क्या? कभी सोचा है उनके बारे मे?”

नाझियाच्या आणि मंदाच्या चर्चेनं गंभीर वळण घेतलं. मंदाही गंभीर होऊन म्हणाली, “इसलिए तो डबल ड्युटी कर रही हू. जल्द से जल्द इस झोपडपट्टी से निकलकर किसी चाल या बिल्डींग मे रूम लेनेवाली हू.” “मै भी मेरे मर्द को ऐसाच बोलती हू. लेकिन वो अकेला क्या करेगा? अकेले के कमाई पर कबतक घर चलेगा? घर मे कभी खाने को मिलता है, कभी नही. ढंग का कपडा नही, कुछ नही. कभी कभी लगता है ऐसे जीने से मरना अच्छा है.” “अरे! ऐसा मत बोल पगली. इतने दूर से गाव छोडकर यहा मरने के लिए आई है क्या तू मुंबई मे?”

मंदानं नाझियाला धीर देण्याचा प्रयत्न केला. नाझिया मात्र स्वतःच्याच विचारात होती. अशात अचानक पटरी हलल्याचा भास झाला. काही कळायच्या आत समोरचं वळण पार करून एक मालगाडी आली. तिच्या दिव्याच्या प्रखर प्रकाशाने डोळयासमोर वीज चमकल्याचा भास झाला. आणि पुढच्याच क्षणी वाजलेल्याहॉर्नच्या आवाजात नाझिया आणि मंदाचं किंचाळणं हरवून गेलं.

हरवून जाणे किंवा हरवणे… आपल्या अनेकांच्या आयुष्यात किती दुर्मिळ शब्द आहे ना हा? पण अँटॉप हिल झोपडपट्टीसाठी हा शब्द काही दुर्मिळ-बिर्मिळ नाही. एकावेळी अगदी एकच माणूस जाईल एवढं अंतर ठेवून बांधलेल्या इथल्या झोपड्यांत कुणा लहानग्याचं बालपण हरवलेलं दिसेल. नुकतंच वयात आलेल्या कुणा तरुणीचं अचानक टॉयलेटला आलं तर कुठे जायचं या विचाराने तरुणपण हरवलेलं दिसेल. दहा बाय दहाच्या इथल्या खुराड्यांत जगताना कुणा विवाहित जोडप्याचं जगणं हरवलेलं दिसेल. इथल्या झोपडयांच्या गर्दीत धड सूर्यप्रकाशही आत न येण्याने कुणा म्हाताऱ्याच्या डोळयांतला प्रकाश हरवलेला दिसेल.

आज अगदी आत्ताही टॉवरांच्या आडून दर्शन देणाऱ्या सूर्याने अँटॉप हिल झोपडपट्टीचा हरवलेला दिवस उजाडला होता. आपण ज्याला प्रातर्विधी वगैरे म्हणतो तो सकाळचा टाळता न येणारा विधी उरकण्यासाठी झोपडपट्टीवाले पटरीवर उतरले होते. त्यातल्याच काहींना मंदाचं आणि नाझियाचं ओळखता न येणारं शरीर नजरेस पडलं होतं. थोडा धक्का-बिक्का बसून सावरल्यानंतर त्यांनी हे मंदाचा नवरा राम आणि नाझियाचा शौहर आझादच्या कानावर घातलं. मंदाची आणि नाझियाची तुटलेली शरीरं पाहून बिथरलेल्या त्यांनी अँब्युलन्सची वाट न बघता लागलीच त्यांना टॅक्सीत टाकून जवळच्याच सायन हॉस्पिटलमध्ये नेलं.

अर्थात हॉस्पिटलमध्ये नेऊन काही उपयोग नव्हताच. आधीच मृत झालेल्या नाझिया आणि मंदा यांची प्रेतं हॉस्पिटलबाहेर पडली. एकाच अपघातात म्हणा किंवा एकाच ठिकाणी म्हणा, मेलेल्या त्या दोघींच्या प्रेतांना त्यांचे धर्म वेगवेगळे असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निरोप देण्यात आला. ठरवल्याप्रमाणे सगळं काही गुपचुप उरकण्यात आलं. मात्र तरीही व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे मंदा आणि नाझियाच्या मरणाचा झोपडपट्टीत बोलबाला झालाच. त्याकडे लक्ष न देता मुंबईचं धावतेपण अंगात भिनलेले राम आणि आझाद सगळं काही जलद आटोपून आता आरपीएफ म्हणजे रेल्वे पोलिस फोर्सच्या किंग्ज सर्कल पोलिसस्टेशनबाहेर पोहचले होते.

ट्रेनमधील गर्दीतून सर्व बाजूंनी चेपून नुकतेच पोलिसस्टेशनमध्ये आलेले इन्स्पेक्टर पांडे खुर्चीत रिलॅक्सले होते. तेवढयात धीर करून राम आणि आझाद पोलिसस्टेशनमध्ये घुसले. स्वतःचा श्वास सावरत रामने पांडे साहेबांना एक कंप्लेंट असल्याचं सांगितलं. “क्या हुआ?” पांडेंनी ऐकू न आल्याच्या आविर्भावात विचारलं. आमच्या दोघांच्या बायका आज रात्री ट्रेन अँक्सिडेंटमध्ये मेल्या साहेब.” रामच्या श्वासात अजून थरथर होतीच. “ट्रेनमधून पडून मेल्या की पटरी पार करताना ट्रेनने उडवलं?” “पटरी पार करताना ट्रेननं उडवलं साहेब.” “रात को कितने बजे?” “दो बजे साब” “रात के दो बजे वो पटरी पर क्या कर रही थी?” पांडेंचा पुढचा प्रश्न.

पांडेंच्या या प्रश्नाने आझाद आणि राम गोंधळले. त्यांना सावरू न देता पांडेंनी पुन्हा विचारलं. “क्या पुछ रहा हू मै? रात के दो बजे वो पटरी पर क्यूं गइ थी?” “टॉयलेट. टॉयलेटसाठी गेल्या होत्या साहेब.” रामने पुढाकार घेतला. “लेकिन उन्हे ट्रेन ने उडाया.” “वो कैसे मालूम पडा?” “बहुत देरतक आयी नही इसलिए हम ने खुद जाकर देखा.” “तो अब यहां क्यू आए हो?” “कंप्लेंट करनेके लिए” “कैसी कंप्लेंट? अं?” “रेल्वे ॲक्सिडेंट में मरी है ना दोनो” आझादने पांडेंना उत्तर दिलं मात्र त्याच्या या उत्तराने पांडे उखडले.

“भैंचोद! चुत्या समझ रखा है क्या मुझे? उधर पटरी पर हागने के लिए जाते हो और ॲक्सिडेंट बोलते हो? रेल पटरी क्रॉस करना कानूनी अपराध है मालूम है ना तुमको? तुम लोग तो रेल पटरी क्रॉस ही नही, उसका टॉयलेट की तरह युज करते हो. कानून से तुम्हारी कंप्लेंट लेना छोड दो, रेल पटरी गंदा करने की उलटी कंप्लेंट करनी चाहिए तुम पर.” “अरे पर…” “अभी क्या बोला मै, सुना नही तुमने?” पांडेंनी बोलायचा प्रयत्न करणाऱ्या रामला अडवलं. “हा साब.” आझाद पडलेल्या आवाजात म्हणाला. “तो निकलो यहां से. दुसरे और भी काम है हमे.” पांडे गरजले. आता आझाद आणि रामला निघण्याशिवाय पर्याय नव्हता. ते निघाले. “भैंचोद! कौन कौन से लोग भरे है मालूम नही इस बंबई मे!” पोलिसस्टेशनमधून बाहेर पडलेल्या रामच्या आणि आझादच्या कानावर पांडे साहेबांचे निरोपाचे शब्द पडले होते.

पांडेंचा हा पाहुणचार घेऊन बाहेर पडलेल्या रामला मुळात पोलिसस्टेशनला जायचंच नव्हतं. पण “पोलिसस्टेशनमध्ये कंप्लेंट लिखेंगे तो ट्रेन ॲक्सिडेंट मे मिलनेवाला कॉम्पनसेशन मिलेगा” असं बोलून आझादने त्याला पोलिसस्टेशनमध्ये आणलं होतं. अर्थात झालेल्या प्रकाराचा राग आझादवर काढून उपयोग नव्हता. आणि ते इन्स्पेक्टर तरी काय चुकीचं बोलले? खरं होतं त्यांचं. मुळात ट्रेन पटरी क्रॉस करणे हा कायदेशीर गुन्हा होता. आणि ही लोकं तर पटरीच्या आजूबाजूला हागून घाण करत होती. पटरीची डागडुजी करणाऱ्या गँगमन्सची नेहमी कंप्लेंट असायची. कधी कधी वासाने किंवा प्रत्यक्ष हागणारे बघून हैराण झालेले प्रवासी तक्रारकरायचे. पण दोन तीन किलोमीटर पसरलेल्या झोपडपट्टीत कारवाई करून करून किती जणांवर आणि केव्हा करणार?

पोलिसस्टेशनमधून निघालेले राम आणि आझाद आता झोपडपट्टीच्या प्रवेशद्वारावर पोहचले होते. आपल्याला कुणी बघू नये आणि बघितलं तरी चौकशी करू नये म्हणून त्यांच्या पायांनी चालण्याचा वेग वाढवला होता. तेवढ्यात कट्टयावर सिगारेट ओढत बसलेल्या भाऊंनी हाक मारलीच. भाऊ म्हणजे झोपडपट्टीतले वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ नागरिक. त्यांना टाळणं आझादला आणि रामला शक्य नव्हतं. त्यांची चालणारी पावलं अखेर भाऊंसमोर येऊन थांबली. भाऊंनी आझादची चौकशी केली. आझादने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितला.

“अरे, पर तुम्हारे औरत लोग को भी पटरी पर ही जाना था?” भाऊ वैतागून म्हणाले. “तर कुठं जातील?” रामने त्यांना प्रतिप्रश्न केला. “अरे, हिकडं हाय ना सुलभ शौचालय.” “उधर एक टाईम का दस रूपया देने के लिए है किसके पास?आणि ते सुलभ शौचालय आहे घरापासून अर्धा तास दूर. अर्जंट किक लागली तर काय करायचं तिकडं जाऊन?संडासला काय सांगून होतंय?” अनुक्रमे आझादने आणि रामने सत्य परिस्थिती सांगितली. याच झोपडपट्टीत राहणाऱ्या भाऊंना अर्थातच ती नवीन नव्हती. मात्र मघाशी तोंडातून सोडलेल्या सिगारेटच्या धुरासोबत ते शेजारच्या टॉवरमध्ये पोहचले होते. धूर विरताच तिथून पुन्हा झोपडपट्टीत येऊन आदळलेल्या त्यांच्या मनाने आझादला आणि रामला आपल्या विभागाच्या नगरसेवकाला भेटण्याचा सल्ला दिला.

नगरसेवक दादासाहेब खारकर. अँटॉप हिल विभागाचे कार्यतत्पर, कार्यसम्राट नगरसेवक. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणाशीही खेळीमेळीने वागणारा माणूस अशी त्यांची अख्ख्या विभागात ख्याती होती. जोडीला चौघांचा पत्ता कट करून मिळवलेली दहशतही होतीच. अशा या खारकरांचं ऑफिस नेहमीप्रमाणं आजही गजबजलेलं होतं. ऑफिसमधील गर्दी कमी व्हायची वाट बघत राम आणि आझाद दोन तासांपासून बसले होते. तीनेक तासांनी एकदाची गर्दी कमी झाली. वाट बघून वैतागलेल्या रामने मोबाईलवर बोलत आत बाहेर करणाऱ्या खारकरांच्या पीएला आपण थांबलो असल्याची आठवण करून दिली. “सॉरी, सॉरी” म्हणत पीएने रामला आणि आझादला नेऊन खारकरांसमोर उभं केलं.

हाताच्या दहा बोटांत सोन्याच्या दहा अंगठ्या, गळ्यात नजरेत भरावी अशी साखळदंडाच्या आकारातील चेन. “बोला.” खारकरांच्या कमावलेल्या आवाजाने राम भानावर आला. तो काही बोलणार तोच पीएने खारकरांना रामची आणि आझादची व्यथा ऐकवली. “बोंबला! म्हणजे आता हे हगण्याचं प्रकरण पण माझ्याकडे. अरे, कुठून कुठून येता रे तुम्ही?” खारकर खिल्ली उडवल्याच्या सुरात म्हणाले. “मी बिहारमधून आणि हा बीडमधून आला आहे साहेब.” आझाद गंभीरपणे उत्तरला. “अरे, मी तुमचं गाव विचारलं नाही.” खारकरांना स्वतःचं हसू आवरता आलं नाही. “बरं, ते जाऊ दे. तुमची राहायची सोय झाली ना मुंबईत?” खारकरांनी हसू आवरत विचारलं. “होय साहेब.” आझाद कृतज्ञतेच्या सुरात म्हणाला. लगेच पीएने खारकरांना ही झोपडपट्टी आपणच उभी केली असल्याची आठवण करून दिली.

“हो हो, मीच उभी केलेली झोपडपट्टी. माहीत आहे मला. झोपडपट्टीचा इतिहास डोळयांसमोर उभा राहिलेल्या खारकरांची साखळदंडाच्या आकाराची चेन असलेली मान ताठ झाली. तोच “साहेब मागच्या दोन निवडणुकीत तुम्ही सार्वजनिक शौचालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं झोपडपट्टीत”, असे रामचे शब्द त्यांच्या कानावर पडले. रामच्या या शब्दांनी खारकरांची मान अवघडली. “हो मग?” खारकरांनी ताठ्यानेच विचारलं. “आम्ही सगळयांनी मतं दिली होती तुम्हाला.” “मग? मतं दिली म्हणजे काय झालं? उपकार केले का माझ्यावर? ही तुम्ही जी राहताय ना, ती बेकायदा आहे झोपडपट्टी. उद्या शासननिर्णय निघाला तर अख्ख्या झोपडपट्टीला लागेल बुलडोझर. मग कळेल. अरे, लाईटपासून पाण्यापर्यंत सगळं मिळवून दिलंय मी तुम्हाला. आणि काय मिळवून द्यायचंय?” खारकर अचानक हायपर झाले. झक मारली आणि या दोघांना साहेबांसमोर उभं केलं असा विचार मनात येऊन पीए अस्वस्थ झाला.

“साहेब, तो चुकून बोलला.” पीएची अस्वस्थता ओळखून आझाद समजुतीच्या सुरात म्हणाला. “अरे, चुकून काय? करूनही बोलल्यावर राग येणारच ना आम्हाला?” खारकरांचा राग अजून शांत झाला नव्हता. “हो. बरोबर आहे तुमचं साहेब. पण काय होतंय का बघा.” प्रकरण आणखी तापू नये म्हणून आझाद आणखी नरम झाला. रामने मात्र माफी मागण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही. त्यामुळेच का माहीत नाही पण, “मी कन्फर्म सांगत नाही. नाहीतर पुन्हा हे तुमचे साहेब म्हणायचे कन्फर्म सांगितलेलं आणि मदत केली नाही. बघतो पक्षाकडून काही मदत करता येते का,” असं बोलून खारकर गप्प झाले. “चालेल साहेब, चालेल. थॅंक्यू थॅंक्यू सावंत साहेब.” आझाद खारकरांचे आणि पीएचे एकाचवेळी आभार मानून उठला. त्याच्यामागून निघालेला राम नगरसेवकांचं ऑफिस सोडून कधीच रस्त्यावर पोहचला होता.

“क्या यार तू भी? वो व्होटिंग की बात निकालने की जरूरत थी क्या?” रस्त्यातून बेफिकीरपणे चाललेल्या रामला आझादने टोकलं. “हा तो? गेल्या सहा वर्षांपासून आपल्या झोपडपट्टीत संडास बांधून देण्याचं आश्वासन देत तो निवडणुका जिंकतोय. अगर झोपडपट्टी मे सार्वजनिक शौचालय होता तो आज हमारी बिवीया किसी कुत्ते की तरह पटरी पर नही मरती.” “अरे, मरती नही भाई. मर गई वो. वो अब नही है इस दुनिया मे. अब आगे का देख.” आझादने वास्तव व्यवहार मांडला. रामला तो पटला नाहीच.

“तुला काय वाटतं? बोलल्याप्रमाणे तो नगरसेवक मदत करेल आपल्याला?” “अरे, नाही केला तर नाही करेल. पण उगाच त्याला दुखवायचं कशाला? उद्या दुसरी काही गरज पडली तर समोर उभा करेल का तो आपल्याला?” आझादच्या या प्रश्नावर राम काही बोलला नाही. मात्र लागलीच त्याला त्याच्या एका मित्राची, न्यूज चॅनेलमध्ये असलेली ओळख आठवली. “त्यालाच फोन करतो आता. एक बातमी गेली की सगळे होतील आपोआप सरळ.” “वो सरळ करने का बाजू मे रख हा भाई. झालंय तेवढं बस झालं. आणखी नकोय लफडं.” आझादने रामला समजवण्याचा आणखी एक प्रयत्न केला. मात्र राम बधला नाही. त्याने मोबाईल घेऊन मित्राचा नंबर डायल केला.

“पोलिसस्टेशन हुआ. नगरसेवक हुआ. अब सच मे और कोई मदद करेगा?” आत्तापर्यंत आलेल्या अनुभवाने आझादच्या मनात प्रश्न उभा राहिला होता. तो किसलिए ये भागदौड? किसी की मददसे मरा हुआ इन्सान वापस आएगा? उलट संडासला पटरीवर जाणे हीच चूक ऐकवत फुकटचा अपमान वाट्याला. निदान एवढ्या वेळेत सर उपर कर के टॅक्सीची चार भाडी तरी मारली असती. विचारातच आझाद स्वतःच्या खोलीत पोहचला होता.

“आठ बाय दहाची खोली. किचन, बाथरूम त्यातच. डोक्यावरच्या सिमेंटच्या पत्र्यामुळे प्रचंड गरमी आणि हवा येण्या-जाण्यासाठीजागाच नसल्यामुळे दाटलेला कोंदटपणा. कशी राहत असतील यात लोकं?” रामच्या मित्राशी फोनवर झालेल्या बोलण्याप्रमाणे ‘न्यूज मराठी’ या न्यूजचॅनेलची पत्रकार, प्रणाली, रामच्या खोलीत पोहचली होती. राम आणि आझादकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवणाऱ्या प्रणालीला या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं नव्हतं. पण या अशा ठिकाणी ही लोकं हौस म्हणून राहत असतील का? काहीतरी कारण असेलच यामागे. डोक्यात गर्दी करणाऱ्या या विचारांतूनच प्रणालीने राम आणि आझादच्या मुंबईमध्ये येण्याची चौकशी सुरू केली.

राम. राम केडगे. तो मुळचा बीडचा. दुष्काळग्रस्त भागातला. शेतीत काही पिकत नाही. पिकलं तर विकत नाही. बाकीच्या शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करेल म्हणून बायकोच्या आग्रहाने सात वर्षापूर्वी तो मुंबईत आला ट्रेनने दादरला उतरला. दादरपासून अँटॉप हिल हा तसा जवळचा एरीया. एवढ्या कमी भाड्यात या एरीयात राहायला भेटत नाही म्हणून तो या झोपडपट्टीत राहायला लागला. दादरच्या मार्केटमधून भाजी आणून इथल्या गांधी मार्केटमध्ये विकायला लागला. सोबत मंदाही आजूबाजूच्या बिल्डींगमधल्या गुजरात्यांची धुणीभांडी करायला लागली. दोघांचे पैसे येत होते. सेव्हींग्ज होत होती. एक दोन वर्षात पैसे जमवून दुसरीकडे राहायला जायचं प्लॅनींग सुरू होतं आणि तेवढयात हे घडलं होतं.

आझाद. आझाद खान म्हणजे नाझियाच्या शौहरची यापेक्षा वेगळीच बात. तो मूळचा बिहारच्या खगडिया जिल्ह्यातला. कोसी नदीच्या सुपीक किनाऱ्यावर त्याची शेती होती. शेतीत

चांगलं चाललं होतं. मात्र धर्म आडवा आला. गावच्या ठाकुर लोकांच्या जाचाला कंटाळून तो दहा अकरा वर्षापूर्वी मुंबईत आला.टॅक्सी चालवायला लागला. थोडी स्थिरता आल्यावर त्याने बायकोमुलांना इकडे बोलावून घेतलं. सेंट्रल मुंबईत एवढी स्वस्त जागा मिळते कुठे? भाडं परवडतं आणि प्रवासही जास्त करावा लागत नाही, म्हणून तो या झोपडपट्टीतच सहकुटुंब राहायला लागला. “एक ये टॉयलेट का छोडा तो गाव से कई बेहतर जिंदगी जी रहे थे” असं आझादचं म्हणणं.

अनुक्रमे राम आणि आझादची माहिती घेऊन आणि त्यांची व्यथा टीव्हीवर दाखवण्याचं आश्वासन देऊन प्रणाली संपादकांच्या केबिनमध्ये पोहचली होती. वाढलेली न्यूजचॅनेल्स आणि त्यांच्यातीलवाढत्या स्पर्धेमुळे अपडेट राहण्यासाठी संपादक देशपांडे स्वतःच्या लॅपटॉपवर इतर चॅनेल्सच्या न्यूज पाहत बसले होते. सध्या त्यांच्या डोक्यात दिवसाचे चोवीस तास न्यूजचाच विषय घोळत असायचा. आताही “मे आय कम इन सर?” असं विचारलेल्या प्रणालीला “येस कम इन”ऐवजी त्यांनी “काय आहे नवीन न्यूज?” असं विचारलेलं. देशपांडेंची ही सवय माहीत असलेल्या प्रणालीने केबिनमध्ये येऊन त्यांना एक महत्त्वाची न्यूज आणल्याचंसांगितलं. देशपांडे न्यूजसाठी उतावीळ होतेच. लागलीच प्रणालीने तिची नोटपॅडमधील न्यूज वाचायला सुरुवात केली.

“मुंबई. राज्याचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी. मात्र याच राजधानीत ज्याला आपण प्रातर्विधी म्हणतो, तो संडास करण्याची सोय अनेक लोकांना आजही उपलब्ध नाही. याच अनुपलब्धतेमुळे काल रात्री संडाससाठी रेल्वे पटरीवर गेलेल्या अँटॉप हिल झोपडपट्टीमधील दोन स्त्रियांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. एकीकडे हे भीषण वास्तव आहे तर दुसरीकडे राज्य आणि केंद्रसरकार ‘हागणदारीमुक्त भारता’ची घोषणा करत त्याचे सोहळे साजरं करतं आहे.”

“एक मिनीट, एक मिनीट. ही पटरीवर संडास करताना ट्रेन अपघातात मृत्यू… ही आहे तुझी न्यूज?” प्रणालीची बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या देशपांडेंनी तिला थांबवलं. प्रणालीने हीच बातमी असल्याचा होकार भरला. त्याने देशपांडेंची अस्वस्थता शिगेला पोहचली. “अगं प्रणाली, हसतील सगळे ही न्यूज बघून. मुळात पटरी क्रॉस करणे हा गुन्हा आहे हे माहिती आहे ना तुला? त्यात ही लोकं पटरी क्रॉसकरणं सोड, पटरीवर संडास करताहेत. किती मोठा गुन्हा झाला हा?

आणि आपण या सगळयाला सहानुभूती देणारी न्यूज करतोय? अगं, ट्रेनमधूनप्रवास करताना बघतेस ना किती भयानक असतात ही दृश्यं?” अस्वस्थ देशपांडेंनी स्वतःचा अनुभव सांगितला.

“सर, पण या अपघातात मेलेल्या स्त्रियांना आणि बाकीच्या लोकांना संडाससाठी पटरीवर का जावं लागतं? याचा कधी विचार करणार आहोत का आपण? हे सगळे हौस म्हणून संडासला जातात का पटरीवर?” प्रणालीने स्वतःचा दृष्टिकोन मांडला. त्याने देशपांडेंची अस्वस्थता कमी होण्याऐवजी आणखी वाढली. “हे बघ प्रणाली, ही वादविवाद स्पर्धा किंवा मग कुठल्या एनजीओचं ऑफिस नाहीये, जिथे आपण या असल्या ज्वलंत समस्येवर वाद घालावा किंवा मग उपाय सुचवावा. हे न्यूजचॅनेल आहे. आणि इथे समस्या नव्हे तर, व्ह्यूअर्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. प्रचंड स्पर्धा आहे इथे. त्यात या असल्या संडासच्या फॉल्टी बातम्या देऊन माझं चॅनेल मला बंद करायचं नाहीये. समजलं?” देशपांडेंनी स्वतःच्या दृष्टिकोनासोबत बातमीचा निकाल लावला. आता ही बातमी लागणं अशक्य आहे हे समजलेली प्रणाली “तुमची बातमी नक्की टीव्हीला दिसेल” असं आश्वासन दिलेल्या रामला नेमकं काय सांगावं याचा विचार करायला लागली होती.

आत्ता यावेळी इकडे रामही प्रणालीसारखाच विचारात होता. सकाळी काही कळू न देता शाळेला पाठवलेल्या आणि आत्ता शाळेतून परतलेल्या मुक्ता या स्वतःच्या आठ वर्षीय मुलीला मंदाविषयी नेमकं काय सांगावं याच्या विचारात तो होता. तोच हातपाय धुऊन बाथरूमबाहेर आलेल्या मुक्ताने “पप्पा, अहो मम्मी कुठे आहे सकाळपासून?” असा प्रश्न केला. गडबडलेल्या रामने स्वतःला सावरत मम्मी सकाळी लवकर तिच्या शेठाणीच्या गावी गेल्याचं सांगितलं. “अशी कशी मला न सांगताच गेली?” मुक्ता रागावली. रात्री तू झोपल्यावर फोन आला कामावरून. त्यामुळे तुला न सांगताच गेली. रामने मुक्ताला समजावलं. पण त्याने मुक्ताचं समाधान झालं नाही. “तिचा फोन लावा बघू. मला बोलायचंय तिच्याशी.” मुक्ताने हट्ट धरला. आता काय करायचं? रामचा नाईलाज झाला. त्याने नाईलाजानेच बाजूला उभा असलेल्या मालतीकडे बघितलं.

मालती म्हणजे राम आणि मंदाची पंधरा वर्षे वयाची मोठी मुलगी. नुकत्याच वयात आलेल्या तिच्या झोपडपट्टीत होणाऱ्या कुचंबणेने राम आणि मंदाने दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी मंदाचा मृतदेह पाहून बिथरलेली तीच मालती अजून पूर्णपणे सावरली नव्हती. मात्र परिस्थितीचं भान ओळखून तिने “मम्मी आता कामावर असेल. आत्ता बोलणार नाही ती फोनवर,” असं मुक्ताला समजावलं. तोचधागा पकडून रामने मुक्ताला नंतर फोन लावून देण्याचं वचन दिलं. त्याच्याकडून या वचनाचा पुनरुच्चार करून घेऊन मुक्ता जेवायला बसली. सकाळपासूनच्या धावपळीत जेवणाचं भान न राहिलेला रामही तिच्यासोबत जेवायला बसला मात्र मंदाचा मृतदेह डोळयासमोर येताच त्याचा तोंडातील घास घशाखाली उतरला नाही.

“काय झालं रे? असे का बसलाय तोंडं पाडून?” खोलीच्या कट्टयावर बसलेले राम आणि आझाद भाऊंच्या आवाजाने भानावर आले. भाऊंना बसायला जागा करून देतआपली बातमी दाखवायला चॅनेलवाले नाही म्हणाले असं आझादने त्यांना सांगितलं. “आता?” आपली बातमी नक्की चॅनेलला दिसेल असा विश्वास बाळगून असलेल्या भाऊंनाधक्का बसला. काहीक्षण शांतता दाटली. “उपोषण करूयात का आपण? म्हणजे मी करतो उपोषण.” विचारात असलेला राम स्वतःशीच म्हणाला. “अरे, वेड लागलंय का काय तुला? एकतर आपण राहतोय अनधिकृत झोपडपट्टीत. त्यात वर उपोषण. वेड्यात काढून हसतील सगळे लोक.” भाऊंनी रामचा विचार निकालात काढला.

“मग, आपण आंदोलन करूया का आझाद? म्हणजे आपल्याला मदत नाही मिळाली तरी चालेल. पण लोकांना हा आपला प्रश्न तरी कळेल.” रामने पुन्हा एक विचार मांडला. “लेकीन ये आंदोलन किसको लेकर करेगा तू?” आझादने प्रश्न केला. रामने त्याला आपल्या झोपडपट्टीतल्या लोकांना तयार करू असं सांगितलं. “तुझे लगता है आएंगे लोग?” भाऊम्हणाला “तसे आधीच सगळे चोरासारखे राहताहेत. आणि तो नगरसेवक काय म्हणाला माहिती आहे ना? झोपडपट्टी बेकायदा आहे. तेरा ये आंदोलन देखकर सरकारने काही केलं तर आपलंच सोड. सगळ्यांच्या डोक्यावरचं छप्पर जाईल. काय भाऊ?” भाऊंनी आझादच्या म्हणण्याला होकार भरला. पण राम शांत होणाऱ्यातला नव्हता. त्याने अजून एक पर्याय सुचवला.

“आता आणि काय आहे पर्याय?” रामच्या पर्यायांनी आझाद वैतागला होता. रामने त्याला त्या पत्रकार मुलीने एका एनजीओचा नंबर दिला असल्याचं सांगितलं. “ही एनजीओ मदत करेल म्हणालेय तुम्हाला. एकदा भेटून या त्यांना.” “अब बहुत हुआ हा भाई. जो हुआ सो हुआ. अब ये भागम्-भाग छोडकर अपने काम मे लग जाते है.” आझादचा संयम संपला होता. तोच “अरे, राम म्हणतोय तर एकदा भेटून बघायला काय हरकत आहे?” असं भाऊंनी आझादला समजावलं. “तो चलो. और एक चक्कर काटकर आते है.” आझाद राम आणि भाऊसोबत नाखुशीनेच निघाला.

“भाऊ, हे पटरीवर संडासला जाताना मरणं याआधीही झालं असेल ना झोपडपट्टीत?” एनजीओकडे निघालेल्या रामने बोलता बोलता विषय काढला. “होय. नेमकी संख्या नाही सांगता येणार. पण आत्तापर्यंत खूप माणसं मेली अशी.” “मग, यावर काय केला तुम्ही?” “काय करणार? एकतर हे आपल्या झोपडपट्टीवाल्यांच्या अवघड जागेचं दुखणं. त्याच्याविषयी कुणाला सांगावं तर ते हे पटरीवर जातात संडासला म्हणून हसणार किंवा मग पटरी ही संडास करण्याची जागा आहे का म्हणून वैतागणार!म्हणून तर पटरीवर संडासला जाताना एखादा मेला तर कोण सांगत पण नाही कुणाला. सकाळी तुम्ही केला तसं सगळं गुपचुप उरकून टाकतात. आता हे एनजीओवाले तरी खरंच मदत करतील का रे आपल्याला?”

“हो. आम्ही आमच्या परीने नक्कीच मदत करू तुम्हाला.” विमुक्ता या एनजीओच्या प्रमुख, मिसेस गांधी, भाऊंच्या प्रश्नावर आपलेपणानं उत्तरल्या होत्या. पत्रकार प्रणालीशी फोनवर सविस्तर बोलणं झालेल्या गांधींनी घडलेल्या प्रसंगाबद्दल सहवेदना व्यक्त करून मूळ विषयाला हात घातला होता.मुळात विमुक्ता ही संस्था मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या महिलांना टॉयलेट्स उपलब्ध व्हावीत, त्यांची परवड होऊ नये यासाठी काम करणारी. याचमुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रियांची तर वेगळीच गोष्ट. त्यांच्या तर घरात किंवा मग जवळपासही कुठे टॉयलेटची सोय नसलेली. आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा प्रश्न हाताळावा असं अनेकदा गांधींच्या मनात आलेलं. पण मूळच्या लढ्यालाच यश नाही अजून. दहा वर्षे झाली. नुसत्या तक्रारी आणि आंदोलनं करून दमायला झालेलं. “आता कोर्टात पीआयएल दाखल केलीय. बघू काही होतं का ते.”

“एवढी मोठी एनजीओ आहे मॅडम तुमची. ठरवलं तर तुम्ही पण बांधू शकता ना संडास आमच्या झोपडपट्टीत?” भाऊंच्या आवाजाने विचारातल्या गांधी भानावर आल्या. अशा प्रश्नांची आताआता सवय झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटलं. “अहो,कुठं बांधणार काका? जमिनींना सोन्याचा भाव आलाय. आणि आज लोकांचे जगण्याचे प्रश्न इतके महत्त्वाचे झालेत की या असल्या नैसर्गिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळदेखील नाहीये.” गांधींनी भाऊंना समजवण्याचा प्रयत्न केला. “बरं, मग आमचं काय?” रामने थेट मुद्द्याला हात घातला. “मी तुम्हाला थोडी आर्थिक मदत करू शकते आमच्या संस्थेकडून. त्यापुढे काही करता येणार नाही.” “मदत खरंच करणार आहात की तोंडी आश्वासन?” राम पुन्हा थेट बोलला. “सॉरी मॅडम. थोडं स्पष्टच बोललो. पण अनेक ठिकाणी वाईट अनुभव आल्यावर मी हे असं स्पष्ट बोलण्याचं धाडस केलं.” आपल्या बोलण्याने गांधी दुखावलेल्यापाहून रामने स्पष्टीकरण दिलं. “एक मिनीट. मी आले पैसे घेऊन”. रामच्या स्पष्टीकरणावर काही न बोलता गांधी थेट केबिनबाहेर पडल्या.

दहा हजार…. दहा हजार म्हणजे मंदाचा दोन महिन्याचा पगार. या पैशाने मंदा परत येणार आहे का? त्यापेक्षा परत करावेत का हे पैसे? गांधींकडून पैसे घेऊन परतलेल्या रामच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरत होतं. त्याच चक्रात त्याने मुक्ता आणि मालतीसोबत रात्रीचं जेवण पोटात ढकललं. अंथरूण घालून सगळे झोपायच्या तयारीत होते. तोच मुक्ताने“आजची बटाट्याची भाजी काय बरोबर व्हायला नाही” अशी तक्रार केली. “मम्मी कितीमस्त करायची भाजी.” “अगं, ताईने केलेली भाजी. शिकतेय ती.” रामने मुक्ताला समजावलं. मात्र मालतीने भाजी केल्याचं ऐकून मुक्ताचा आवाज वाढला.”ईक!! हिने केलेली? आधी सांगितला असता तर खाल्ली पण नसती मी. उद्या पुन्हा हिने केली तर खाणार नाही हा मी भाजी. आधीच सांगून ठेवते.” “नको खाऊ. रहा उपाशी.” मघापासून गप्प असलेली मालती संतापली. तिच्या संतापण्याने मुक्ता लगेचच रडायला लागली.

“अरे! काय झालं? कोण काय बोललं माझ्या मुक्ताला?” रामने मुक्ताला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने अधिकच रडायला लागलेल्या मुक्ताने रामकडे आत्ताच्या आत्ता मम्मीला फोन लावण्याचा आग्रह धरला. “आता? अगं झोपली असेल ती. गावाकडे लवकर झोपतात लोक. उद्या फोन करूया तिला.” रामने मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुक्ता आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. “मुक्ता, अगं असा काय करतेयेस वेडेपणा? उद्या करूया फोन म्हणालो ना तुला?” स्वतःच्याच नकळत रामचा आवाज वाढला. त्याने मुक्ता गप्प झाली. “हे बघ. उद्या सकाळी लवकर शाळेला जायचंय ना तुला? मग? चल झोप आता.” राम समजुतीच्या सुरात म्हणाला. मुक्ता झोपायला तयार झाली. हीच संधी साधून मालतीने लाईट बंद केले. आणि काही क्षणांपूर्वीच युद्धस्थितीत असलेले ते सगळे शांतपणे अंथरुणावर पहुडले.

अंथरुणात पडून किती वेळ झाला माहीत नाही. रामला अजून झोप लागली नव्हती. मंदाच्या विचाराने अस्वस्थ झालेला तो जागाच होता. अर्थात रामच्या सोबतीला मुंबई जागी होतीच. अशात रामच्या शेजारी झोपलेली मालती अंथरुणातून उठली. उठवावं की न उठवावं या विचारात तिने रामला उठवायला सुरुवात केली. “काय झालं गं?” राम काळजीने धडपडत उठला. मालतीने दबक्या आवाजात तिला दोन नंबरला झालं असल्याचं सांगितलं. रामला धक्का बसला. स्वतःला सावरत त्याने मालतीला कळ काढ थोडी असं समजावलं. “मघापासून कळंच काढतेय. अहो..” मालती आत्ता यापुढे स्वतःला आवरू शकत नव्हती. “अगं, पण आता जाणार कुठं? सुलभपण बंद असेल.” “जाते पटरीवर.” मालतीसमोर दुसरा पर्याय नव्हता. तिच्या तोंडून पटरी हा शब्द ऐकताच भांबावलेल्या रामलाही आता पटरीशिवाय पर्याय नाहीये हे कळूनचुकलं. “थांब. त्या आझादच्या पोरीला पाठवून देतो सोबत,” असं म्हणत रामने लाईट लावली. तो स्वतःच्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर पडला आणि शेजारच्या आझादच्या खोलीचा दरवाजा ठोकायला लागला.

“आझाद. ऐ आझाद.” “क्या है?” आझादने वैतागतच दरवाजा उघडला. रामने त्याला पटरीवर संडासला चाललेल्या मालतीसोबत त्याच्या पोरगीला पाठवून द्यायला सांगितलं. “अरे, पण…” आझादचे पुढचे शब्द त्याच्या तोंडातच अडकले. समोर पाणीभरल्या बादलीसह अवघडून उभ्या असलेल्या मालतीला पाहून तो स्वतःच्या मुलीला उठवायला खोलीत शिरला. परवीन ही आझादची तेरा वर्षे वयाची मोठी मुलगी. आझाद तिला उठवायला लागला. “क्या हुआ?” सकाळचा आईचा मृतदेह डोळ्यांसमोर येऊन झोप उडालेली परवीन वैतागली. “अरे, उस मालती के साथ पटरी पर संडास के लिए जाना था.” आझाद समजुतीच्या सुरात म्हणाला. “मै नही जाऊंगी उधर. मम्मी का क्या हाल हुआ है देखा है ना आपने?”“अरे पर…” “मै नही जाऊंगी उधर. सुना नही आपने?” परवीनचा आवाज वाढला. त्याने गप्प झालेल्या आझादची कोंडी झाली.

इकडे दरवाजात कोंडी झालेले राम आणि मालती आझाद आणि त्याच्या मुलीची वाट पाहत अवघडून उभे होते. तोच बाजूच्या खोलीतून त्यांची शेजारीण अनिता बाहेर आली. मालती आणि रामची मघापासून चाललेली घालमेल ती पाहत होती. तिने रामला “काय झालं” असं विचारलं. रामने अवघडूनच मालतीला दोन नंबरला झाल्याचं सांगितलं. रामची घालमेल समजलेल्याअनिताने “थांबा. मी जाते सोबत,” असं म्हणत स्वतःच्या खोलीचा दरवाजा ओढून घेतला. आणि पायात चपला चढवून ती चालायला लागली. तिच्या मागोमाग मालतीही निघाली.

“पटरी क्रॉस करू नका हा. अलीकडेच बसून या.” रामची काळजी बोलून गेली. “हो. येतो. अनिताने त्याला आश्वस्त केलं. मात्र तरीही त्या दोघी नजरेआड होईतो राम त्यांच्याकडे पाहत राहिला. तेवढ्यात आझाद खोलीबाहेर आला. त्याने हताशपणे रामला मुलगी उठत नसल्याचं सांगितलं. मात्र समोर मालती दिसत नाहीये हे पाहून तो दचकला. रामला त्याने मालतीबद्दल विचारलं. “गेली ती अनिताताईंसोबत.” राम मालतीच्या मार्गावरील नजर न हटवता म्हणाला. आता आझादही अनिता आणि मालती गेलेल्या दिशेला पाहायला लागला. अनिता आणि मालती दिसेनाशा झाल्या होत्या. तोच अचानक ट्रेन धडधडत येत असल्याचा आवाज आला. पाठोपाठ हॉर्नचा कर्णकर्कश आवाज झाला. त्या आवाजासरशी राम आणि आझादचं काळीज लक्कन हललं. आणि नेमकं काय झालं असेल? ट्रेनने हॉर्न का वाजवला असेल? या विचारांनी भेदरलेले ते दोघेही पटरीच्या दिशेने धावत सुटले.

संपर्क : 9702636209

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.