समकालीन घटना आणि स्त्रीवादी दृष्टिकोण

सोशल मीडियावर काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही आणि जर ती गोष्ट स्त्री सुधारणेच्या विरोधात असेल तर मग काही सांगायलाच नको. पुरुषप्रधान मूल्ये कवटाळणारे लोक त्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायरल करतील की संपूर्ण स्त्री सुधारणा चळवळींनाच अगदी कवडीमोल ठरवतील. गेल्या २-३ महिन्यांमध्ये अशाच दोन घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि विस्तव विझावा तशा काही दिवसातच सगळ्यांच्या स्मरणातूनही गेल्या.

पहिली घटना म्हणजे, लखनऊ, उत्तरप्रदेश येथील एक विडीओ व त्या ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेज ज्यात एक मुलगी तिची चूक असूनही एका टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करते आणि तो इसम मात्र पलटवार न करता मदतीसाठी याचना करताना दिसतो. हे सगळे कृत्य एका वाहतूक नियंत्रण पोलिसाच्या देखत घडताना दिसते. ह्या प्रकारात सर्वस्वी त्या मुलीची चूक असल्याचे स्पष्टच आहे आणि तिला कायदा हातात घेतल्याबद्दल शिक्षा ही व्हायलाच हवी. पण ह्या घटनेमुळे काही लोकांनी चुकीचा समज करून घेऊन एकूण स्त्री सुधारणा चळवळींनाच, विशेषतः स्त्रीवादाला धारेवर धरले आणि अशा चळवळी पुरुषांसाठी किती घातक आहेत हे पटवून देणारे संदेश शेअर होऊ लागले.

मुळात ह्या घटनेचा दूर-दूरपर्यंत तरी स्त्रीवादाशी कसा काय संबंध लावला जाऊ शकतो ह्याविषयी नवल वाटते. स्त्रीवादाचा कणा ‘लिंगभेदाधिष्ठित शोषण नाकारणे’ हा आहे. मग स्त्रीवादी लोक ह्या कृत्याला कसा काय पाठिंबा देऊ शकतात हा विचार स्त्रीवादाला आणि एकूण स्त्री सुधारणा चळवळींना दोषी ठरवणाऱ्यांनी केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यावरून स्त्रीवादाचा अन्वयार्थ लावणाऱ्यांनी पुस्तकातून किंवा इतर माध्यमातून आधी स्त्रीवाद समजून घ्यावा आणि मगच कुठल्याही विचारसरणीला पिंजऱ्यात उभे करावे. अशा कृत्याला स्त्रीवाद समजलेली आणि अनुभवलेली कोणतीही व्यक्ती पाठिंबा देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. स्त्री सुधारणेचे विचार, स्त्रीवादी विचार हे एकाएकी तयार झालेले नाहीत. ते अनुभवजन्य आहेत. म्हणजेच ते अनुभवातून साकार झालेले आहेत. आजही दररोज स्त्रियांच्या वाट्याला येणारे दुय्यमत्व कोणीही नाकारू शकत नाहीत. त्यामुळे एखाद्या विचारधारेशी, जी स्त्रियांच्या सुधारणेसाठी उभारलेली आहे अशा चळवळीशी अशा कृत्याचा किंवा त्या व्यक्तीचा धागा जोडणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचे आहे आणि परत पुरुषसत्ताक व्यवस्था कवटाळण्यासारखे आहे. त्यामुळे ह्या एक-दोन घटनांमुळे “स्त्रियांना खरंच सबलीकरणाची गरज आहे का? त्यांचे स्थान माजघरातच आहे” ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचू नये.

सुखसोयीत राहणाऱ्या सर्व स्त्रियांनी आपल्या सुखसोयी समजून घेऊन जबाबदारीने वागणेही गरजेचे आहे. काही सुखवस्तू घरात जन्माला आलेल्या स्त्रिया त्यांना मिळालेल्या सुखसोयींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा चुकीचा उपयोगही करतात. मात्र त्यांच्या अशा वागण्याने किती उपेक्षित स्त्रियांचे नुकसान होते आहे हे त्यांनाही कळत नाही. स्त्रीवाद आपल्याला एकमेकींसाठी जबाबदारीने वावरणे शिकवतो. निष्काळजीपणे वागण्यामुळे सत्य घटनांकडे समाज दुर्लक्ष करतो आणि स्त्रियांकडे नेहमी चारित्र्य, खरेपणा, अबला ह्या चष्म्यातून पाहतो. हे अत्यंत चुकीचे आहे. मागील काही महिन्यांमध्ये गोव्यात लागोपाठ घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहेच. प्रत्येक घटनेत त्यातील पीडिता चारित्र्याच्या निकषांवर उतरते का हे पाहिले गेले. एवढेच काय दिल्लीमधील दलित मुलीवर पुजाऱ्याने केलेल्या बलात्काराच्या घटनेतही हीच नीच मानसिकता दिसून आली. ह्या प्रकारात मूळ आरोपी मोकाट असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे ठरवले पाहिजे की आपण डोळसपणे गोष्टींकडे बघावे की दिलेल्या चष्म्यातून बघावे.

दुसरी घटना, भारतीयांची मान अभिमानाने उन्नत केलेल्या ‘भारत की बेटी’ यांच्याबद्दलची आहे. टोकीयो ऑलम्पिक्समध्ये अनेक पदके मिळवून भारतीय स्त्री खेळाडूंच्या प्रथित यशाने भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि ईशान्येकडील राज्ये भारताचाच भाग आहे याची सर्वांना नव्याने आठवण झाली. ह्या खेळाडू अत्यंत संघर्षाने आणि कठीण परिश्रम घेऊन इथवर आलेल्या आहेत. मात्र खेळाबरोबरच त्या किती ‘आदर्श भारतीय नारी’ म्हणून आपल्या भूमिका बजावत आहेत, ह्यानुसार जेव्हा त्यांच्या परिश्रमाची प्रशंसा होते तेव्हा तो केवळ त्यांच्या किर्तीचा व संघर्षाचा अपमान नसतो; तर ज्या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एवढा खटाटोप केला त्याच चाकोरीत त्यांना पुन्हा अडकवणारे ते षड्यंत्र असते. एका बाजूला खेळाडूंचे छायाचित्र आणि दुसऱ्या बाजूला तिच्या घरच्यांसोबत असलेले, स्वयंपाकघरात काम करतानाचे छायाचित्र आणि त्याच्या खाली, “अशा मुलीशी लग्न करा, जी दोन्ही भूमिका निभावू शकते” अशा पद्धतीच्या विशेष सूचना देणारे काही संदेश मागील काही महिन्यांत बरेच सामायिक केले गेले. हा केवळ त्या खेळाडूंचा अपमान नाही तर सगळ्या स्त्रियांचा अपमान आहे.

एखाद्या स्त्रीचे कौतुक करायचे असल्यास दुसऱ्या स्त्रियांना कमी लेखले पाहिजे किंवा ‘तिच्यासारख्या बना’ असे वारंवार तिला सांगितले गेले पाहिजे असा कुठे नियम आहे का? नाही. मग प्रत्येकाला त्याने, तिने, त्यांनी कसे जगावे हे सांगणेही चुकीचेच आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्या की वारंवार एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, पुरुषप्रधान व्यवस्थेतील मूल्ये, संकल्पना, समजुती आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की आपण ठरलेल्या चाकोरीबाहेर कधी विचारच करत नाही. किंबहुना आपला त्यातून फायदा होत असल्यामुळे आपण शोषणव्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे पसंत करतो. सुखसोयीत राहणाऱ्यांनी कळत-नकळत केलेल्या कृत्यांचा एका मोठ्या उपेक्षित वर्गावर परिणाम होत असतो. त्यामुळे सर्वांनीच जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आपण एकमेकांच्या विरोधात कोणतीही लढाई लढत नाही आहोत. ही शोषणव्यवस्थेच्या विरोधातली लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने स्वतंत्र राहणे अपेक्षित आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अनेक मौलिक उपदेश दिलेले आहेत. त्यातीलच ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा एक. त्यामुळेच ‘तू-तू-मै-मै’ न करता आपण एकमेकींचा आधार बनूया, डोळसपणे विचार करूया आणि माणसाला माणूस बनवूया.

सहायक प्राध्यापक
कुंकळ्ळी शिक्षण संस्था (सी. ई. एस्) महाविद्यालय
कुंकळ्ळी गोवा.

अभिप्राय 2

  • Well said. स्त्रिया चुका करू शकतात, कायदे मोडू त्यांच्याकडूनही अपराध घडू शकतात हे आपल्या समाजाला मान्यच नाही. एक माणूस म्हणून स्त्रीला पाहिलं जात नाही तर एका विशिष्ट भूमिकेतूनच तिच्याकडे बघितलं जातं.

    • धन्यवाद.
      स्त्री ही माणूसच असते आणि ती ही चुकू शकते. पण चूक केली म्हणजे तिला अगदीच राक्षस, हडळ ठरवणे चुकीचे. त्याचबरोबर उदात्तीकरण करणे ही चुकीचे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.