धर्म आणि विज्ञानाची सांगड = सुखी मानवी जीवन

धर्म, मग तो कोणताही असो, त्याची चिकित्सा करायची नसते, त्यावर शंका घ्यायची नसते असेच संस्कार बालपणापासून प्रत्येकावर झालेले असतात. त्या संस्कारांचा पगडा एवढा जबरदस्त असतो की व्यक्ती कितीही शिक्षण घेऊन मोठी शास्त्रज्ञ झाली, आयएएस झाली तरी, धर्माची चिकित्सा करण्याचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवत नाही. कारण धर्म हा माणसापेक्षा मोठा, धर्मापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही हीच शिकवण आपल्याला देण्यात येते. शालेय अभ्यासक्रमातसुद्धा जुने जे धर्मचिकित्सक होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती दिली जात नाही. पण आता विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याची सवय लावली पाहिजे. मग तो धर्म असो की विज्ञान.

आपण धर्मग्रंथांमधील माहिती जर बघितली तर, बायबलनुसार पृथ्वी ही सपाट आहे. तिच्या वर स्वर्ग आणि खाली नरक आहे. पण बायबलचे हे म्हणणे कोलंबसने समुद्रपर्यटन करून खोटे ठरवले. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे हा शोध लावला. गॅलिलिओच्या दुर्बिणीच्या शोधामुळे व वापरामुळे विश्वरचनेच्या या संकल्पनेला जोरदार हादरा बसला. चंद्राला अग्निगोल मानणाऱ्या ग्रंथांना गॅलिलिओच्या दुर्बिणीने चंद्रावरील खडक आणि दऱ्या दाखविल्या. म्हणजेच चंद्रसुद्धा पृथ्वीप्रमाणे दगड-मातीचा बनलेला आहे हे सिद्ध झालं. सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग दुर्बिणीद्वारे दिसू लागले आणि ते सरकत आहेत हेसुद्धा दिसू लागले म्हणजे सूर्यसुद्धा फिरत असेल हे निदर्शनास आले. म्हणजेच विज्ञान जसजसे प्रगत होत गेले त्यामुळे आपल्या जुन्या संकल्पना गळून पडत गेल्या.

भगवान महावीरांच्या सांगण्यानुसार चंद्रावर देवांची वस्ती आहे. सर्व जैनधर्मिय हजारो वर्ष तेच सत्य मानत होते. कारण त्यावेळी ती गोष्ट तपासून बघण्याची सोय नव्हती. परंतु आता मनुष्य स्वतः चंद्रावर जाऊन आल्याने तिथे कुठलीच सजीव वस्ती नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

हिंदू धर्मग्रंथांप्रमाणे पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभी आहे. हजारो वर्षे हिंदुधर्मिय तेच सत्य मानत होते. परंतु विज्ञानाद्वारे प्रचंड आकाराच्या ब्रह्मांडाची मनुष्याला माहिती झाली. त्या ब्रह्मांडांत पृथ्वी अधांतरी फिरते आहे हा शोध लागला. त्यामुळे शेषनागाची कथा खोटी ठरली. हिंदू धर्मात समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले आहे. परंतु आज रोज करोडो लोक समुद्र ओलांडून जातात पण त्यांचं काहीही वाईट होत नाही. हिंदू धर्माचे आराध्य श्रीराम स्वतः समुद्र ओलांडून श्रीलंकेत गेले होते. हिंदू धर्मानुसार स्त्री-शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. पण आज त्या शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं काहीही वाईट झालं नाही, उलट कल्याणच झालं आहे.

बौद्ध धर्मदेखील बाबासाहेबांनी जसाच्या तसा स्वीकारला नाही. त्यातील कर्मकांड-अंधश्रद्धा काढून टाकून बौद्ध धम्म बनवला. त्यासाठी त्याकाळच्या सनातनी बौद्ध भिक्खुंनी बाबासाहेबांवर टीकेची झोड उठवली होती. पण अनेकांनी बौद्ध धर्मातील जे महायान आणि हीनयान हे दोन पंथ आहेत त्यात बाबासाहेबांनी काढलेला हा तिसरा भीमयान पंथ असे बाबासाहेबांचे समर्थन केले.

मुस्लिम समाजात मृत व्यक्तीला जमिनीत पुरण्याचे विधान आहे. परंतु चीनमध्ये प्रत्येकाला जाळलेच गेले पाहिजे असा नियम आहे. मग तिथे मुस्लिमांना सुद्धा जाळले जाते पण त्यामुळे कुणाचं काही वाईट झालेले नाही.

येशूख्रिस्त असतील किंवा महावीर, श्रीकृष्ण असतील किंवा गौतम बुद्ध हे लोक सर्वज्ञ होते म्हणजे त्यांनी जीवनातील अनुभवातून जे सत्य जाणले, त्यातून त्यांनी मनुष्यजीवनाबद्दल आपले आध्यात्मिक तत्त्वज्ञान मांडले. ते तत्त्वज्ञान आजही तंतोतंत खरे आहे. परंतु भौतिक आणि भौगोलिक बाबींबद्दल त्यांना त्याकाळी असलेली माहिती आजही मान्य होईलच असे नाही. सर्वज्ञ म्हणजे प्रत्येकच विषयातील अचूक ज्ञान त्यांना असेल असे समजणेपण चुकीचे आहे. जुन्या काळातील एखाद्या संताला आध्यात्मिक ज्ञान असेल पण त्याला चारचाकी गाडीचे पंक्चर काढायला लावले तर ते मात्र येणार नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या विषयात पारंगत असतो. त्याला इतर विषयांचे ज्ञान असेलच असे नाही. येशूख्रिस्त आज असते तर पृथ्वी गोल आहे हे त्यांनीही मान्य केले असते. महावीर आज असते तर चंद्रावर देवांची वस्ती नाही हे तर श्रीकृष्णांनी पृथ्वी अवकाशात अधांतरी आहे हे मान्य केले असते.

४५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली. २५० ते ३०० कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर एकपेशीय प्राणी निर्माण झाले. आणि १० लाख वर्षांपूर्वी दोन पायांचा माणूस या पृथ्वीवर चालायला लागला. म्हणजे माणूस निर्माण झाला १० लाख वर्षांपूर्वी आणि या जगातला कुठलाही धर्म (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख) निर्माण झाला तो जास्तीत जास्त ५००० वर्षांपूर्वी. म्हणजे ९ लाख ९५ हजार वर्षे माणसाला धर्माची गरज वाटली नाही. यावरून हे स्पष्ट होते की धर्म माणसाने बनवला. ५००० वर्षांपूर्वी मनुष्याला निसर्गाबद्दल, सूर्य-चंद्र-ताऱ्यांबद्दल, पृथ्वी आणि समुद्राबद्दल जे काही ज्ञान होतं, त्या आधारावर त्याने धर्म बनवला. त्यावेळी विज्ञानाद्वारे त्याला जी नवीन माहिती असेल ती मनुष्याने धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवली. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की विज्ञान कायम बदलत राहतं. कुठलाही शोध लागल्यानंतर ‘हे अंतिम सत्य आहे’ असे विज्ञानही मानत नाही. आपल्याकडे थ्रीजी मोबाईल आल्यानंतर आपण टूजी फेकून दिले, फोरजी आल्यानंतर थ्रीजी फेकून फोरजी स्वीकारले. अगदी असंच, आपण जसं इतर गोष्टींमध्ये चिकित्सा करून नवीन माहितीद्वारे स्वतः ला अपडेट करत असतो, त्याचप्रमाणे धर्माबाबतसुद्धा आपण कालानुरूप नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. कारण धर्म निर्माण झालेत ते आपलं जगणं सोपं व्हावं, सुसह्य व्हावं, जगण्याचे काही नैतिक नियम असावेत म्हणून, आपल्याला कायम गुंतवून-गुरफटून टाकण्यासाठी, त्रास देण्यासाठी नव्हे.

प्रत्येकच धर्मात काही चांगल्या, काही वाईट गोष्टी आहेत. मग आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या त्या धर्मातील वाईट गोष्टी, प्रथा, परंपरा आपण काढून टाकून आपला धर्म अधिक समृद्ध कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धर्माची चिकित्सा केली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणत असत की भारतात असा एक काळ होता, की गोमांस खाल्ल्यावाचून ब्राह्मण हा ब्राह्मण राहू शकत नसे. वेदात तुम्हाला आढळेल, की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा मोठा पाहुणा आला की उत्तम बैल मारण्यात येत असे. नंतर पुढे समाजाच्या लक्षात आले की उत्तम बैलांची हत्या केल्यास आपल्या शेतीवर संकट येईल म्हणून ही रूढी बंद पडली. त्यामुळे त्या काळी गोहत्या ही निषिद्ध मानली गेली. आज आपणाला भयंकर वाटणाऱ्या अशा रूढी एकेकाळी विद्यमान होत्या हे आपल्याला जुन्या ग्रंथावरून कळून येते. कालानुरूप दुसरे नियम केले गेले. धर्मातील असे नियम ज्यावेळी निरुपयोगी वा हानिकारक ठरतील त्यावेळी त्यांना बदलावं लागेल. धर्माचे आजचे विकृत स्वरूप हेच हिंदुस्तानाच्या अवनतीचे प्रमुख कारण आहे. “आज आम्हाला धार्मिक प्रचारकांची नव्हे तर औद्योगिक आणि भौतिकदृष्ट्या लोकांना शिक्षण देणारे प्रचारक हवे आहेत.” असे विवेकानंद म्हणत.

आपल्यापेक्षा आपल्या मागच्या पिढीला जास्त ज्ञान-माहिती होती हा गैरसमज आपण मनातून काढून टाकला पाहिजे. हे जर खरं असतं तर, आजपासून ५००० वर्षांआधीच मोबाईलचा शोध लागला असता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागच्यापेक्षा पुढील पिढीला जास्त माहिती असते. आज सर्वच धर्मातील या नवीन पिढीने जर आपापल्या धर्मातील मनुष्यांना त्रास होईल अशा कालबाह्य, जाचक रूढी-परंपरा, वाईट गोष्टी काढून टाकल्या आणि माणसाने धर्म निर्माण केलाय, धर्माने माणूस नाही हे सत्य स्वीकारलं तर जगातील अनेक समस्या क्षणात नाहीशा होतील.

धर्म आणि विज्ञान हे परस्परांना पूरक असले पाहिजेत. धर्म आणि विज्ञान यांना परस्परविरोधी ठरवून त्यांच्यात युद्ध लावून दिल्यापेक्षा जर धर्माची आणि विज्ञानाची योग्य सांगड आपण घातली तर मनुष्यजातीचे कल्याणच होईल यात शंका नाही.

अकोला
9822992666

अभिप्राय 1

  • लेख उत्तम आहे. माणसाने धार्मिक होण्याऐवजी विचारी व सुधारणावादी असायला हवे.”आताच्या पिढीपेक्षा पूर्वीच्या लोकांना अधिक ज्ञान असते” हा भाबडा समज आपण सोडून दयायला हवा हेच खरं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.