गांधीजींची जमीन, बाबासाहेबांचा किल्ला!

भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठेपणा याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात काही मतभेद जरूर होते. मात्र त्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. देशाचं आणि समाजाचं कल्याण हाच दोघांचाही ध्यास होता! दोघांनाही एकमेकांच्या असण्याची किंमत आणि महत्त्व माहीत होतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी दोघांनाही दोन पावलं मागं यावं लागलं असेल, तर ते त्यांनी मान्य केलं. पुणेकरार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर होते. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये दोघांचेही प्राधान्यक्रम वेगळे होते. गांधीजींच्या समोर सारा देश होता. बाबासाहेबांच्या समोर जनावराचं जीवन वाट्याला आलेला मागासवर्गीय समाज होता. एकाला संपूर्ण देशाची मुक्ती हवी होती. दुसऱ्याला आपल्याच देशातील करोडो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून द्यायचा होता. एकाला जगाचा राजकीय इतिहास बदलायचा होता, दुसऱ्याला मानवतेच्या इतिहासातील काळीकुट्ट पानं फाडून टाकायची होती. एकदा प्राधान्यक्रम बदलला की सारी मांडणीच बदलून जाते. अशावेळी यानं ‘हे’ का नाही केलं किंवा त्यानं ‘ते’ का नाही केलंअशी दोघांची तुलना करणं म्हणजे दोघांवरही अन्याय आहे. मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून दोघांच्याही जगण्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढं जाता आले पाहिजे. एकटे बाबासाहेब किंवा एकटे गांधीजी आपल्याला शेकडो वर्षे पुरून उरतील एवढे महान आहेत. त्यातलं पाच टक्केदेखील आपण आपल्या जगण्यात आणत नाही. पण मतभेदाचे मुद्दे चघळण्यात मात्र आपल्याला भारी भूषण वाटते. पुन्हा पुन्हा गांधीजी आणि बाबासाहेब असा वाद उकरून काढणारे लोकच आपापल्या महापुरुषांचे खरे शत्रू आहेत की काय, असे वाटायला लागते. अर्थात चिकित्सा झालीच पाहिजे, पण गांधींना शिव्या घालणारे लोक जास्त आक्रमक दिसतात. गांधीवादी मात्र तसे आक्रमक दिसत नाहीतबाबासाहेबांना महान ठरवण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची काय गरज आहे, हे मला अजूनही समजलं नाही. तुम्हाला जो महापुरुष आवडतो, त्याला आदर्श मानून तसे वागा, त्यात आपल्याला कुणी अडवलं? बरं, तुम्ही आम्ही महान म्हटल्यामुळे कुणी महान होतो का? किंवा लहान म्हटल्याने कुणी लहान होतो का? जागतिक इतिहासानं या दोन्ही महापुरुषांची जी काय नोंद घ्यायची ती घेतलीच आहे!

कोणत्याही महापुरुषाची आंधळी आणि अतिरेकी भक्ती त्या महापुरुषाच्या विचारांना हानिकारकच ठरते. एकदा आपण भक्ती किंवा व्यक्तीपूजेच्या आहारी गेलो, की विवेक हरवून बसतो.

देशाच्या स्वातंत्र्याचा निर्णय झाला नसता, तर संविधानसभा अस्तित्वात येण्याचा प्रश्नच नव्हता. बाबासाहेब हे संविधानसभेचे सभासद होते.एकूण ३८९ सभासद त्यात होते. फाळणी नंतर त्यात २९९ सदस्य राहिले. सत्तर सदस्य मनोनित करण्यात आले होतेसंविधानसभेतून पुढे २९ ऑगस्ट १९४७ ला मसुदा समिती निर्माण झाली. बाबासाहेब त्या समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीमध्ये अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी, के. एम. मुंशी, मोहम्मद शादुल्ला, बी. एल. मित्तर आणि डी. पी. खेतान असे अन्य सहा सदस्य होतेसमिती एकूण सात सदस्यांची होती.

मसुदा समितीच्या एकेका कलमावर संविधानसभेत चर्चा करून मान्यता मिळणे जरुरी होते. म्हणजे अंतिम निर्णय संविधानसभेचा होता.संविधानसभा हीच सर्वोच्च होती. संविधानसभेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते, बहुमत होते. डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधानसभेचे अध्यक्ष होतेअस्थायी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. हरेंद्र कुमार मुखर्जी आणि वी. टी. कृष्णमाचारी हे उपाध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य जे. बी. कृपलानी, गोविंद वल्लभ पंत, सरोजिनी नायडू, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज संविधानसभेमध्ये होते.

अश्यावेळी गांधी किंवा नेहरू यांच्या मनात बाबासाहेबांबद्दल द्वेष असता तर त्यांना त्यांच्या सूचना सहज फेटाळता आल्या असत्या. कुणी त्यांना अडवलं असतं का? त्यात अडचण होती का? बाबासाहेबांना घटनानिर्मितीचं श्रेय मिळू नये, असा तुच्छ विचार त्यांच्या मनात चुकून तरी आला असेल का? गांधीनेहरू हे तर स्वातंत्र्याच्या बुलंद लढाईचे असली हिरो होते! मग घटना बनविणे ही गोष्ट काय स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षा जास्त महत्त्वाची होती का, की ज्यामुळे गांधींना, नेहरूंना त्याबद्दल हेवा वाटावा? जगात इतर देशांना काय घटना नाहीत का?

अर्थात, बाबासाहेबांच्या सहभागामुळे, समर्पणामुळे, भारतीय राज्यघटना मानवतेचा दीपस्तंभ बनली, मानवतेचा महामंत्र बनली, आरक्षण वगैरेंच्या सहभागामुळे करोडो शोषितांच्या मुक्तीचा युगप्रवर्तक दस्तावेज बनली. हे बाबासाहेबांचं श्रेय जसं मान्य करावं लागेल, त्याचप्रमाणे महात्मा गांधी हे स्वातंत्र्याच्या लढाईचे सर्वमान्य नेते होते, हेही मान्य करावंच लागेल. त्या लढाईतूनच देशाला हक्काची जमीन मिळाली. आणि जमीन मिळाली म्हणून बाबासाहेबांनी त्या जमिनीवर बुलंद किल्ला उभा केला. हा गांधींच्या सर्वसमावेशक आणि सकारात्मक राजकारणाचा परिणाम होता, हे आपल्याला नाकारता येणार नाही. काँग्रेसचे विरोधक असूनही नेहरू यांच्या मंत्रीमंडळात बाबासाहेबांचा समावेश करण्यात आला होता, यामागेदेखील गांधींचीच प्रेरणा होती, हेदेखील समजून घेतलं पाहिजे.

गांधीजींच्या नेतृत्वातील सत्याग्रह, असहकार, अहिंसा, कायदेभंग वगैरे सारख्या प्रयोगांमुळे त्यात जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात होतासामान्य माणूसही सहजपणे जोडला जात होता. काँग्रेसच्या नेतृत्वातील लढाईला देशव्यापी समर्थन होतं. त्यामुळे गांधी किंवा काँग्रेस यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं असं कळत-नकळत बोललं जाते, ते स्वाभाविक आहे. गांधी, नेहरू यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते दहा दहा वर्षे स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये राहिले आहेत, ते काही हवापालट म्हणून गेले होते का?

अर्थातच गांधींनी किंवा काँग्रेसने पुकारलेला मिठाचा सत्याग्रह असो, ‘चले जाव’सारखी इतर आंदोलने असोत, यांमध्ये आझाद हिंद सेनाकम्युनिस्ट, बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर काही संघटना सामील नव्हत्या. जशी काँग्रेसची लढाई त्यांच्या पद्धतीनं सुरू होती, तशीच इतरांची लढाई ते स्वतःच्या पद्धतीने लढत होते. त्यांचे त्यांचे स्वतःचे काही विचार होते. स्वतंत्र मार्ग होतेकाँग्रेसच्या नेतृत्वातील आंदोलनात सारेच सहभागी झाले पाहिजेत, अन्यथा ते स्वातंत्र्याच्या विरोधात होते, असा त्याचा अर्थ होत नाही.

दुसरं उदाहरण घेता येईल. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केला. भाजपाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सरकार पाडलं. देशात मंडलविरोधी दंगे घडवून आणले. जाळपोळ केली. आणि म्हणूनच भाजपा किंवा आरएसएस मंडलविरोधी किंवा ओबीसीविरोधी आहे, असा आरोप केला जातो. त्यात शंभर टक्के सत्य आहे.

दुसरीकडे काँग्रेसने पण व्ही. पी. सिंग सरकारच्या विरोधात मतदान केलं. म्हणजे त्यांनीदेखील मंडल आयोगाला समर्थन केलं नाही, त्याप्रसंगी तेही ओबीसीविरोधी वागलेत, असं म्हणता येईल. त्यांनी मंडल आयोगाला विरोध केला, हेही सत्य आहेच. मात्र वस्तुस्थिती अशी होती, की काँग्रेसची सत्ताच मुळी व्ही. पी. सिंग यांच्यामुळे गेली होती. अश्यावेळी काँग्रेसनं व्ही. पी.सिंग यांचं सरकार टिकावं म्हणून सरकारला पाठिंबा द्यायला हवा होता, असा युक्तिवाद करणं हास्यास्पद नाही का? किंवा पेशंटला वाचवण्यासाठी डॉक्टरने आपली एक किडनी का दिली नाही? ती दिली असती, तर पेशंट वाचला असता, असा युक्तिवाद करण्यासारखं नाही का? अर्थात काँग्रेस ओबीसीसमर्थक आहे, असं मी म्हणणार नाही. फार काय, कांशीराम आणि बसप हे मंडल आयोगाचे कट्टर समर्थक असूनही त्यांनीदेखील व्ही. पी. सरकारच्या विरोधात मतदान केले. याचा अर्थ कांशीराम किंवा बसप ओबीसींच्या विरोधात आहे, असा होतो का? तसा अर्थ कुणी घेत असेल तर तो मूर्खपणा नाही का? शेवटी त्या त्या वेळची परिस्थिती बघून राजकीय किंवा सामाजिक निर्णय घेतले जातात. त्या त्या पक्षांची काही भूमिका असतेप्राधान्यक्रम असतात. त्याप्रमाणे त्यांना निर्णय घ्यावे लागतात, घेतात. तेव्हा उगाच सुतावरून स्वर्ग गाठणे किंवा अर्थाचा अनर्थ करणेआपापल्या सोयीची भूमिका घेणे, आपल्यापेक्षा भिन्न मत असलेल्या व्यक्तीला लगेच शत्रू समजून खालच्या पातळीवर टीका करणे, हे प्रकार टाळायला हवेत. मतभिन्नता ही नैसर्गिक बाब आहे. तिचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. सभ्यपणे व्यक्त झालं पाहिजे. कुठलाही आकस ठेवून कुणाचीही निंदानालस्ती करण्यात येऊ नये. अन्यथा अंधभक्त आणि आपण यात काहीही फरक राहणार नाही.

कोणताही महापुरुष आयुष्यात कधी चुकलाच नाही, असं होत नाही. किंवा त्याच्यात काहीच त्रुटी नव्हत्या, असं म्हणता येणार नाही. भगवान बुद्धदेखील भिक्खू संघात महिलांना प्रवेश देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. पण नंतर तयार झालेत. याचा अर्थ बुद्ध स्त्रीविरोधी होते, असा विचार करणे योग्य होईल का? तो त्यांच्यावर अन्याय होणार नाही का?

बाबासाहेबांची भूमिकादेखील प्रसंग आणि परिस्थिती अनुरूप बदलत गेली. त्यात आश्चर्य वाटण्याचे किंवा आक्षेपार्ह असेही काही नाही. त्यांनी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. पण म्हणून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप करता येईल का? तो मूर्खपणा नाही का ठरणार? मुळात कोणतीही घटना किंवा भूमिका यामागील नेमका उद्देश लक्षात घेतला पाहिजे. गांधी यांनी तर आपलं सारं जीवन एक प्रयोगशाळा असल्याचं जाहीरपणे मान्य केलं आहे.

म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन महापुरुषांच्या भूमिका, त्यांचं महत्त्व आणि त्यांचं योगदान समजून घेताना आक्रस्ताळेपणा टाळूनच पुढे गेले पाहिजे. उलट गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभिन्नता बाजूला ठेऊन, परस्परपूरक मांडणी एकत्र करायला हवी. दोन्हींमध्ये योग्य समन्वय साधून नवी मांडणी केल्यास प्रगतीचे आणि समतेचे नवे पर्व सुरू होऊ शकते. तोच आमचा प्रयत्न आहे.

बाबासाहेबांवर प्रेम जरूर करा. जिवापाड प्रेम करा. पण त्यासाठी गांधीचा द्वेष करणं अनिवार्य आहे का? त्याची गरज का पडावी?

एक पाचसात लोकांचं कुटूंब चालवतांना कुटूंबप्रमुखाला केवढी सर्कस करावी लागते, स्वतःच्या इच्छा-अपेक्षांना मुरड घालावी लागतेवेळप्रसंगी काही तडजोडही करावी लागते. काही झालं तरी कुटूंब तुटू नये, ही भावना त्यामागे असते. अश्यावेळी कुणा एकाचाच हट्ट पुरवता येत नाहीआणि गांधींना तर सारा देश सांभाळायचा होता. त्यांच्यासमोर किती अडचणी असतील?

संघाचे लोक गांधींचा द्वेष करतात हे समजू शकते. पण काही आंबेडकरवादी किंवा आंबेडकरवादाच्या आडून काही अन्य लोक त्यांचा एवढा कट्टर द्वेष का करतात हे अनाकलनीय आहे! हे विष नेमके कोण पेरत असेल? आणि कशासाठी? मुळात कट्टरता किंवा हेकेखोरपणा हा बुद्धाच्या मूळ तत्त्वज्ञानाला मारक नाही का? व्यक्तिद्वेष हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा भाग असू शकतो का?

ओबीसी समाज हा भारतामध्ये सुमारे ५२ टक्के आहे. हा प्रामुख्यानं हिंदू आहे. हिंदुंची संख्या देशात ७८% आहे. म्हणजेच सुमारे १०४ कोटी हिंदू भारतात राहतात. पण वर्णव्यवस्थेनं यांना पार गुलाम करून ठेवलं आहे. चातुर्वर्ण्याच्या कसोटीप्रमाणे ओबीसी हे शूद्र आहेत. या वर्णवादी व्यवस्थेला कंटाळून बरेच हिंदू आधीच इस्लाम धर्माच्या आसऱ्याला गेलेत, कारण तिकडे असा जातिभेद नाही. मुस्लिम धर्मामध्ये ८०% लोक ओबीसी आहेत. खेड्यापाड्यात हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविंदानं राहतात. वर्धा जिल्ह्यातील मंगरूळ हे माझं गाव. तिथेही मुस्लिम समाजाची काही घरं होती. पण मी कधीही त्यांना धर्म या विषयावरून आपसात भांडताना पाहिलं नाही.

बाबासाहेबांचा जन्म हिंदू धर्मात झाला. त्या काळी हिंदू धर्मातील वर्णवादी लोकांनी उच्छाद मांडला होता. त्यातील विकृतीच्या विरोधात सुधारणावादी, समतावादी लोकांचे प्रयत्नदेखील सुरूच होते. वारकरी संप्रदायातील संतांची लढाई मनुस्मृतीच्या विरुद्ध सुरूच होती. हिंदू धर्मातील विकृती नष्ट व्हावी अशी बाबासाहेबांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आवाहनदेखील केलं. सुमारे २० वर्षे वाट पाहिली. पण त्याला हिंदू धर्मातल्या वर्णवादी ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी नाईलाजानं त्यांना करोडो अनुयायांसह हिंदू धर्म सोडून बुद्धाला शरण जावं लागलं! बुद्ध धम्म स्विकारावा लागला.

भगवान बुद्धांचा धम्म जरी बाबासाहेबांनी जवळ केला असला तरी महात्मा फुले, कबीर या महापुरुषांना बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं. तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रेरणा घेतली, फुले आणि शाहू महाराजांपासून आरक्षणाचा विचार घेतला. यातले तीन महापुरुष तर हिंदुधर्मीय होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब निर्विवाद महान होते. करोडो लोकांचा उद्धार या एका महामानवानं घडवून आणला. आपलं सारं आयुष्य त्यासाठी पणाला लावलं. दिवस रात्र एक केले. अनेक धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतरच त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. जर हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर? मानवतेचा इतिहास एका वेगळ्या उंचीवर गेला असता. मानवतावादी संतांची महान परंपरा आणि बाबासाहेबांसारखा क्रांतीदर्शी नेता असा अद्वितीय योग जुळून आला असता. आणि समतेच्या महामार्गावर हिंदू धर्माचा प्रवास वेगाने सुरू झाला असता.

अर्थात धर्म बदलला किंवा धम्माचा स्वीकार केल्यामुळे लगेच मागासवर्गीय समाजातील सारे दोष निघून गेले आहेत असं नाही. काही मौलिक परिवर्तन जरूर झाले. जीवनमान कमालीचे सुधारलं. वाचनसंस्कृतीचे आणि शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आर्थिक संपन्नता आलीपण मागासवर्गीय समजातल्या जाती मात्र अजूनही संपलेल्या नाहीत. ज्या नेत्यांनी आंतरजातीय विवाह केलेत, त्यांनी बहुधा उच्चवर्णीय मुलींशीच लग्न केले. त्यांना तथाकथित खालच्या जातीतील मुली का दिसल्या नसाव्यात? की त्यांच्या लायकीच्या मुली त्या जातींमधे जन्मल्याच नव्हत्याअसं त्यांना म्हणायचं आहे? म्हणजे माईकवरून समतेचा कितीही गजर केला, तरी मनातली उतरंड मात्र तशीच कायम आहे. खुद्द बाबासाहेब ज्या जातीत जन्मले त्या जातीतील साडेबारा पोटजाती तरी अनुयायांना संपवता आल्या का? धर्मांतर झालं आणि लगेच बाबासाहेब निघून गेलेत. ते जर आणखी काही वर्षे जगले असते, तर नक्कीच चित्र वेगळे राहिले असते!

बाबासाहेबांनंतर त्यांचं बसता उठता नाव घेणारे, स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे किती राजकीय लोक त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत? बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातून प्रेरणा घेऊन स्थापन झाला असल्याचा दावा करणारे आरपीआय पक्षाचे डझनावारी गट कार्यरत आहेतहे वेगवेगळे तंबू कशासाठी? की या लोकांना बाबासाहेबांपेक्षा राजकारण जास्त कळते, असे समजायचे? त्यातले अनेक सेनापती वर्णवाद्यांच्या राशनवर जगतात ही बाब कोणत्या आंबेडकरवादात बसते? बुद्धांना आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं प्रज्ञा शील करुणा ह्यातील शील अश्यावेळी नेमकं कुठे गहाळ होतं? ह्या गोष्टी धम्माला धरून आहेत का? ह्या असल्या विकृतीच्या विरोधात मग लढा का उभारला जात नाहीआरपीआय पक्षाच्या बहुतेक तुकड्यांचा आधार पोटशाखीय अस्मिता हाच आहे, ही वस्तुस्थिती नाही का? त्यात घराणेशाही आणि कंपूगिरी नाही का? आणि समजा आज बाबासाहेब असते, तर त्यांना हे सारे आवडले असते का? फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा जप करत करत उत्तरप्रदेशात सत्तेवर आलेल्या पक्षात खरंच लोकशाही आहे का? तो लोकशाहीचा कोणता जगावेगळा प्रकार आहे? तिथले मंत्री, पदाधिकारी नेतृत्वाची तात्त्विक चिकित्सा करू शकतात का? नेतृत्वासमोर गुलामासारखे उभे राहणे, ही कोणती समता आहे? ही कोणती लोकशाही आहेहा कोणता आंबेडकरवाद आहे?

यावर आपण काही बोलत नाही. बोलू शकत नाही. तरीही स्वतःला विचारवंत, पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी, समाजसेवक वगैरे वगैरे म्हणवून घ्यायची हौस मात्र आहे. ती कशी भागवायची? तर मग अश्यावेळी, आपण गांधींना पकडतो! त्यांची हवी तशी निंदानालस्ती करतोत्यातही आपली सोय अशी, की त्यांचे कुणी आंधळे भक्त नाहीत. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य असलेत, तरी ते त्यांच्या बाजूने भांडायला कधी रस्त्यावर येणार नाहीत, हे आपल्याला माहीत असते! त्यामुळे गांधींचे कपडे फाडणे अगदीच सोपे काम आहे!

गांधींवर खालच्या पातळीवर टीका करतांना आपण एवढेही लक्षात घेत नाही की, गांधी ही व्यक्तीदेखील सामान्य नव्हती. तेही विदेशातून शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले होते. भारतासारख्या खंडप्राय देशानं त्यांचं नेतृत्व स्विकारलं होतं, ते उगाच स्विकारलं होतं का? जातीपातीच्याधर्मपंथाच्या पलीकडे जाऊन ज्याचं नेतृत्व देशपातळीवर स्विकारलं गेलं, असा दुसरा कोणता नेता त्यावेळी देशाकडे होता? जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्याची लढाई म्हणजे गम्मत होती का? गांधीजींच्या आधी त्या लढाईत अनेक धुरंधर मंडळी होती. पण गांधींसमोर सारे नेते झाकोळले गेले. सारा देश त्यांच्या नेतृत्वात एकवटला होता. मागासवर्गीयांत किंवा दलित समाजातदेखील त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग देशपातळीवर होता. या साऱ्या गोष्टींना काहीच अर्थ नव्हता का? गांधीनेहरू इंग्रजांच्या विरोधात लढतांना ते वारंवार जेलमधे गेले होते. काही लोक तर गांधी कसे अडचणीत येतील, त्यांचे खच्चीकरण कसे करता येईल याचीच संधी शोधायचे. तरीही गांधींना शह देणे त्यांना जमले नाही. हजारो जाती, अनेक धर्म, शेकडो संस्थाने आणि करोडो लोक या सर्वांचे नेतृत्व एक फाटका माणूस करत होता, हे जागतिक पातळीवरील अनोखे उदाहरण आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे?

कधीकधी व्यक्तिद्वेषात आपण एवढे आंधळे झालेले असतो, की आपला विवेक कामच करत नाही. व्यक्तिपूजा करता करता आपण द्वेषाच्या आहारी केव्हा जातो, याचं आपल्याला भानही रहात नाही. व्यक्तिपूजा आणि मूर्तिपूजा ह्यातही फारसा फरक नाही. दोन्ही गोष्टींच्या आडून आपल्याला लबाडी करणे सोपे जाते! पूजा केली, आरत्या गायल्या, पोवाडे म्हटले की आपली जबाबदारी संपली. लगेच आपण आपली पापं करायला मोकळे!

अशी आक्रस्ताळी, एकांगी, अतिरेकी मांडणी करणारे विचारवंत हल्ली काही कमी नाहीत. त्यामुळे बिचारे गांधींचे चाहते असोत, नेहरुंचे चाहते असोत की हिंदू धर्मातील ओबीसी समाज असो, एकप्रकारचा हा वैचारिक दहशतवाद बघून हादरून गेलेले आहेत. त्यांना काही कळेनासे झाले आहे. दुसरीकडे अर्ध्या हळकुंडातील पुस्तकी मांडणी दिवसेंदिवस आणखीच बीभत्स होते आहे. अतिरेकी टोक गाठते आहे. वर्णवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याच्या बहाण्यानं या तथाकथित विचारवंताकडून जे वैचारिक बॉम्ब टाकले जातात, ते तिकडे वर्णवाद्यांच्या घरावर पडण्याऐवजी बिचाऱ्या ओबीसी, बहुजन, समतावादी हिंदूंच्या वस्त्यांवरच येऊन आदळतात. त्यांच्याच वस्त्या उध्वस्त होतात. आणि भेदरून मग हा हिंदू समाज पुन्हा वर्णवाद्यांच्या तंबूत आसरा शोधत असतो. वर्णवाद्यांचे काम आयतेच सोपे होते.

खरं तर आताचे वर्णवादी सरकार पुन्हा येण्याला किंवा विषमतावादी तंबू आणखी मजबूत होण्याला, असा हा सारखा सारखा गांधी नेहरूंचा विरोध आणि हिंदूंच्या नावानं गरळ ओकण्याचा काही लोकांचा धंदा, हेच जबाबदार आहेत. केवळ चार टक्के विशिष्ट लोकांनी आम्हाला हजारो वर्षे लुटलं, आजही ते आम्हाला काम करू देत नाहीत, अशी रडकी मांडणी करणारे लोक अजूनही आहेत. पण आत्मचिंतन करण्याची त्यांना कधीही गरज भासली नाही. स्वतःचा नाकर्तेपणा, अपयश झाकायला कुणीतरी हवं म्हणून गांधी नेहरू ब्राह्मण हे आयतेच बकरे त्यांना सापडलेत! तेवढे त्यांच्यासाठी पुरेसे आहे!

बहुजनांच्या बहुतेक चळवळी अजूनही केवळ अहवालवाचनाच्या पातळीवरच आहेत. त्यातही अहवाल कमी आणि शिव्याच जास्त. अमक्याच्या गायी माझ्या शेतात घुसल्या, तमक्याच्या शेतातून डुकरं माझ्या शेतात घुसतात आणि म्हणून माझी शेती पिकत नाही, असला कांगावा करणं हाच, काही अपवाद सोडले तर, बहुसंख्य चळवळींचा लोकप्रिय अजेंडा असतो. पण त्यावर उपाय काय, बंदोबस्त कसा करायचा, याची मांडणी करतांना मात्र कुणीही दिसत नाहीत. इतरांच्या नावाने खडे फोडण्याचे हे कार्यक्रम आता आम्हाला बंद करावे लागतील. आपल्या विरोधात कारस्थानं होणार, संकटही येणार. आपल्याला त्याच्याशी सामना करता आला पाहिजे. बंदोबस्त करता आला पाहिजे. सोबतच नवी बांधणीदेखील करत राहावी लागणार आहे. शेजाऱ्याला चांगल्या तऱ्हेनं समजावून सांगावं लागेल. त्याचवेळी डुकरांचा बंदोबस्तही करावा लागेल.

समतावादी हिंदू धर्माचा विचार पुढे येण्याची गरज यातूनच निर्माण झाली. ज्या धर्मानं बाबासाहेबांना असे तीन तीन प्रेरणापुरुष दिले, तो धर्म एकदम निरर्थक असू शकतो का? समतेवर, मानवतेवर निष्ठा असलेले आणखीही बरेच संत हिंदू धर्मात होऊन गेलेत, तो ठेवा काय आपण कचऱ्याच्या पेटीत फेकून द्यायचा का?

शेवटी धर्म किंवा धर्मांतर ही तांत्रिक बाब आहे. एखाद्या धर्माची शिकवण किंवा महापुरुषांचे विचार कितीही महान असू द्या, प्रत्यक्ष जीवनात अनुयायी त्या तत्त्वांशी किती प्रामाणिक आहेत, यावरून त्याचा समाजावरील प्रभाव ठरत असतो. ‘शिकलेल्या माणसांनीच मला धोका दिला‘ असं तेव्हा बाबासाहेब स्वतः का म्हणाले होते? धर्म असो, संप्रदाय असो की धम्म असो, काळानुरूप त्यातही अंधश्रद्धा, विकृती वेगवेगळ्या रूपाने विकसित होत असतात. त्याचा बंदोबस्त त्या त्या धर्मातील लोकांनीच करायचा असतो. केवळ कागदोपत्रीची महानता व्यवहारात काही कामाची नाही! म्हणूनच आत्मचिंतन करणं, जे जे विकृत असेल त्याचा त्याग करणं आणि चांगलं असेल, त्याचा स्वीकार करणं, हाच योग्य पर्याय आहे.

केवळ चार लोक हजारो वर्षांपासून ८५ लोकांच्या छाताडावर बसून मूर्ख बनवत आहेत, हा दावा खरा असला किंवा खोटा असला तरी, ८५ टक्के लोकांचीच बदनामी करणारा आहे. त्यांच्या योग्यतेबद्दल शंका उत्पन्न करणारा आहे. त्याचा सरळ अर्थ असा होतो की, ते चार लोक खरंच हुशार असले पाहिजेत, मजबूत असले पाहिजेत आणि हे ८५ लोक तेवढेच बिनडोक असले पाहिजेत! तेव्हा ह्या मानसिकतेतून आपण लवकर बाहेर निघायला हवे. आत्मचिंतन करायला हवे. नवी आणि व्यावहारिक मांडणी करायला हवी. केवळ महापुरुषांच्या नावाचा गजर, आपल्या जातीची घमेंड आणि इतिहासाचे कागदी पोवाडे गाऊन हाती काही लागणार नाही. प्रामाणिकपणे मैदानात येऊन काम करावं लागेल. समतावादी हिंदू धर्माची मांडणी त्यातूनच समोर आलेली आहे. त्यावर गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.

आजवर अनेक मान्यवरांनी स्वच्छ हेतूने विविध चळवळींच्या माध्यमातून भरपूर काम केले आहे. काही चुका झाल्या असतील, त्या आता दुरुस्त करायला हव्यात. कोणता महापुरुष केव्हा काय म्हणाला, यापेक्षा आजची परिस्थिती आमच्यासमोर कोणती आव्हानं घेऊन हजर झाली आहेते समजून घेणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीशी कशी लढाई लढायची, याचं व्यावहारिक नियोजन करणं गरजेचं आहे.

कोण स्वदेशी, कोण विदेशी, कोण शाकाहारी, कोण मांसाहारी, कुणी गायीचे, कुणी बैलाचे मास खाल्ले, कोण इथले, कोण बाहेरून आलेलेह्यावर वाद घालण्यातच आमची केवढी शक्ती वाया जाते आहे? हजारो वर्षानंतर कसले हिशेब करत आहोत आपण? हजारो वर्षांपूर्वी सारेच रानटी अवस्थेत होते. त्यावेळी कुणाचेही पूर्वज असोत पण त्यांनी गायी, बैल, म्हशी, घोडे, हत्ती, उंट, कुत्रा, गेंडा सारेच खाल्ले असणार नाआणि त्यात वावगे तरी काय? ती अवस्थाच तशी होती! पण आम्ही मात्र आज इकडे खाण्यापिण्याच्या प्रश्नांवरून एकमेकांचे जीव घेत आहोतजेव्हा कुटुंबव्यवस्थाच अस्तित्वात यायची होती, तेव्हा विवाहसंस्था कुठून येणार? मग त्या अवस्थेत नातेसंबंध तरी कुठून आलेत? मग बहीण कोण? भाऊ कोण? मामा कोण आणि मावशी कोण? अश्या परिस्थितीतही मानववंशवृद्धी तर चालूच होती ना?

जसा जसा काळ पुढे गेला, माणूस अनुभवातून शिकत गेला. सोयीचं असेल ते स्विकारत गेला. बदलत गेला. बदल हाच निसर्गाचा नियम आहेमग आताचे संकेत आणि हजारो वर्षांपूर्वीच्या घटना (त्याही किती खऱ्या, किती खोट्या याचा कुणी साक्षीदार नाही. काही उपलब्ध झालेले विस्कळीत, खंडित पुरावे, आणि त्यात वेगवेगळ्या लोकांच्या संशोधनाचे वेगवेगळे आणि परस्परविरोधी दावे, अंदाज, तर्क, वितर्क) आणि त्यावरून आम्ही ठरवणार की तेव्हा चारित्र्यसंपन्न कोण आणि चारित्र्यहिन कोण होते? बरं, आज त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काय संबंध आहेआणि तरीही असली निरर्थक पोपटपंची करणाऱ्या लोकांना आम्ही विद्वान मानणार का? त्यांच्या म्हणण्यानुसार दंगे करणार का? आपले महापुरुष जातीनिहाय वाटून घेणार का? गायबैल वाटून घ्यावेत, तसे महापुरुषांचे हिस्से करणार का? याचा फोटो का नाही, त्याचे नाव का नाही, यासाठी भांडणार काजे जे कुणी समतावादी आहेत, मानवतावादी आहेत, ते ते आपल्यासाठी आदर्श आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, की कोणत्याही जातीचे असोत! त्यांच्याकडून जे जे मौलिक असेलकामाचे असेल ते ते आपण घेतले पाहिजे! त्यांची शिकवण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत नक्कीच काही मोठी माणसे होऊन गेली आहेत. ज्याला ज्याला जो जो समतावादी महापुरुष आपला वाटत असेल, त्याने तो खुशाल घ्यावा. त्या महापुरुषांचे विचार समजून घ्यावे आणि शिकवण आचरणात आणावी. प्रत्येकाने हे इमानदारीने करायचे ठरवले, तर सारा समाज आपोआप दुरुस्त होऊन जाईल. भांडणतंटे मिटून जातील. ना दंगे होतील, ना जाळपोळ होईल! महापुरुषांची भाषणातून नावे घेतली, झेंडे नाचवले, नारे लावले, फटाके फोडले की काम झाले, ही मानसिकता आपल्याला सोडावी लागेल. अर्थात कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांच्याच चुका झाल्या आहेत, हे आधी मोकळेपणानं मान्य करावं लागेल. त्यानंतरच पुढं जाता येईल.

ज्या चुका झाल्या त्या झाल्या! यापुढे वास्तव आणि व्यवहार याचा आधार घेऊन नवी मांडणी करू या! समतावादी हिंदू धर्माच्या भूमिकेकडे सकारात्मक नजरेने, खुल्या मनाने बघू या..! आपले आपले घर साफ करत पुढे जाऊ या! चालत राहू, काम करत राहू, चुकलोच तर पुन्हा चुका दुरुस्त करत राहू!

अध्यक्ष
लोकजागर अभियान
9822278988

अभिप्राय 8

 • आपला लेख वास्तववादी व अभ्यासपूर्ण आहे. आपण अपोआप समाज सुधारून जाईल असे म्हटले आहे. त्याला त्याला इलाजही सांगितला, की ज्याला जे पाहिजे ते त्याने घ्यावे, पण ते घेतलेले, स्वीकारलेले मनोमन घ्यावे. समजून घ्यावे व शेवटी तसे वागावे.
  आपल्या विचारांना अजून असाच उजाळा मिळत राहो. आपणांस खूप धन्यवाद.

 • vastav sanganara lekh. We have to put this view in society repeatedly.

 • लेख विस्कळीत वाटतो आणि लेखाचा नीटसा उद्देश स्पष्ट होत नाही

 • आपला लेख सध्याचे वास्तव उघड करणारा असला; तरी त्यात अनेक वास्तवांचा उल्लेख केलेला नाही. आपला देश गांधीजिंच्या सत्याग्रहाने स्वतंत्र झाला असे जे बोलले जाते ते अर्ध सत्य आहे. मंगल पांडे, राजगुरू, चाफेकर बंधू वगैरे अनेक क्रांतिकारककांनी केलेल्या बलीदानामुळे आणि सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या सशस्त्र लढ्यामुळे आणि दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ब्रिटनच्या पराभवामुळे इंग्रजांना देश सोडावा लागला होता, याचा उल्लेख होत नाही. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठीआरक्षणाचाची तरतूद मर्यादित काळासाठी केली होती. त्यांना वाटले होते आरक्षणाच्या तरतुदीचा लाभ घेऊन सुधारलेले मागासवर्गीय आपल्या नातेवाईक व गांवातील ज्ञाती बांधवांना सुधारतील. पण सुधारलेल्या दलितांनी तळागाळातील आपल्या नातेवाईककांशी सुध्दा संबंध तोडून ते उच्च वर्गियात वावरू लागले. इतकेच काय, पण सुधारलेल्या पण त्यांच्या पेक्षा निम्न जातीच्या लोकांना दूर ठेऊ लागले. उच्च वर्गीय मुलिंशी लग्न करून स्वतःला उच्च वर्गियात सामावून घेण्यासाठी धडपडू लागले. म्हणजे आपण जातीभेद पाळायचे पण उच्च वर्गियांनी जातीभेद मोडण्याची अपेक्षा. या संबंधात खूप लिहिता येईल, पण तूर्त येथेच थांबतो.

 • १) गांधीजींच्या जाती, वर्ण विषयक मतात कालांतराने फरक पडलेला दिसेल. वर्णाश्रमाला आणि जाती व्यवस्थेतील आहार, विहार, लग्न संबंधांच्या निर्बंधांना स्वयंशिस्तीचा भाग मानून त्यांचे समर्थन करणारे गांधीजी नंतर आपल्याच नातेवाईक मुलीला लग्नाच्या बाबतीत हरीजन मुलाला प्राधान्य दे असा सल्ला पत्रा द्वारे देऊ लागलेले दिसतात.

  २) गांधीजींच्या सत्याग्रह आणि अहिंसेचा भारताला स्वातंत्र्य मिळण्यात वाटा किती? दुसर महायुद्ध झाले नसते तर भारताला १९४७ मधे आणि त्याच्या आगे मागे इंग्रजांच्या जगभरातील इतर ७-८ वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले असते असं वाटत नाही. त्यावेळचा ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ऍटली (आणि त्यावेळचे ब्रिटिश राजकारणी आणि नोकरशाही) हे गांधीजींच्या सत्याग्रहाकडे एक सेफ्टी वॉल्व्ह म्हणून पहात होते असे मानायला जागा आहे. नेव्हल म्युटिनी ही उंटाच्या पाठीवरची शेवटी काडी ठरली असेही आपण म्हणू शकतो.

  ३) गांधीजींचे महत्त्व आहेच. पण ते भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले या पेक्षा सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्तेय या पंच यमांची खूण सांगणाऱ्या हिंदुत्वाची ओळख जगाला करून दिली या मधे आहे. भाजप-संघामधील मधील शीर्ष नेतृत्वाला याची कल्पना असावी. म्हणूनच भाजपच्या राष्ट्रवादात (अ) समरसता, (आ) अंत्योदय, (इ) स्वदेशी, (ई) संस्कृती (हिंदुत्व किंवा तसेच काही), (उ) न्यासिता (trusteeship) या गांधी विचारांच्या धारा दीनदयाळ उपाध्यायांच्या एकात्म मानवता वादात सैद्धांतिक रुपांत मानल्या गेल्या आहेत. भाजप – त्यांचे नेते, कार्यकर्ते आणि पाठीराखे – हे सर्व किती प्रमाणात अंमलांत आणतात हा वेगळा विषय.

  ४) आंबेडकर, सावरकर हे गांधीजींपेक्षा एकमेकांना वैचारिक आणि राजकीय दृष्ट्या – त्यांची काही मते न जुळणारी असूनही – अधिक जवळचे होते हे त्यांचे अभ्यासक मान्य करतील. यापैकी आंबेडकरांना संघाने त्यांच्या प्रार्थनेत स्थान दिले आहे. सावरकरांना भारतरत्न देऊन त्यांना वैधानिक राष्ट्रवादाच्या केंद्राजवळ स्थापित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. विक्रम संपथ चे सावरकरांवर चे दोन खंड हे या बाबतीत महत्त्वाचे ठरतील असे वाटते.

 • लेख अपूर्ण ,थोडासा उथळ वाटतो. उदा. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण संविधान लिहले नाही. त्यातील बराच भाग त्यांना मान्य नव्हता. यासाठी लेखकाने खालील ग्रंथ वाचावेत.
  १.भारतीय संविधान ः एक मायाजाल
  २. शोध महात्मा गांधींचा .खंड १& २
  ३. हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
  लेखक अरूण सारथी

 • लेख अपूर्ण ,थोडासा उथळ वाटतो. उदा. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण संविधान लिहले नाही. त्यातील बराच भाग त्यांना मान्य नव्हता. यासाठी लेखकाने खालील ग्रंथ वाचावेत.

  १.भारतीय संविधान ः एक मायाजाल
  २. शोध महात्मा गांधींचा .खंड १& २
  ३. हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
  लेखक अरूण सारथी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.