इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!
अन् हिमतीसाठी.. गळ्यालाही हवी होती…थोडी दारू!

वर्दळीत उरलेत फक्त..
बांगड्यांचे तुकडे,
काही खरे..काही खोटे अश्रू,
इंडियन वाहिन्यांवरून
चमचमीत चेहर्‍यांनी दिलेल्या काही बातम्या,
पोकळ पंचनामावाल्यांच्या निर्विकार गाड्या!

दारू पिऊन आत्महत्या
केलेल्या इंडियाच्या यादीत
समाविष्ट झाले होते
अजून एका भारतीयाचे नाव!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *