काळ बदलत आहे

१.

जेव्हा केव्हा हुकमती राजवटीने मोडू पाहिला लोकशाहीचा कणा
फिरवून टाकल्या सत्तेच्या दिशा
पुसटश्या उजेडालाही झाकोळून टाकण्याच्या वाटल्या खिरापती
तेव्हाही या जुलुमशाहीच्या आखाड्यात कोणीतरी लढत होतंच
आणि आता शेतकरी आहेत…!

२.

तू आहेस म्हणून
काटेरी सत्तेला प्रश्नांनी देता येतात तडे
बेबंदशाहीच्या सिंहासनाची उखडता येतात पाळंमुळं
जेव्हा कधी नाकारला गेला जगण्याचा हक्क
तेव्हा तेव्हा नव्याने पुकारला एल्गार… तू आहेस संघर्षाची अमाप शक्ती

तू आहेस…
बुद्ध.. तुकोबा.. छत्रपती.. ज्योतिबा.. शाहू.. बाबासाहेब…!

३.

अजूनही का नाही सरत रात्र
म्हणून त्याने साऱ्याच खिडक्या उघडून ठेवल्या
दरवाजे कुलूपबंद ठेवून
दिस उजाडाची पाहत होता वाट… सारं करुन सुद्धा कुठे दिसलीच नाही उगवती

हे पाहून…
सोडून त्याचा पदर
भयभीत काळ्याकुट्ट अंधारातही
ती पेटून उठली मशानातून…
उखडून फेकल्या दरवाज्याच्या चौकटी
आणि उजळून टाकल्या मुर्दाड वस्त्या…!

जि. वाशिम
मो. 7875173828

अभिप्राय 1

  • या कवितांमधून कवीला नक्की काय सूचित करायचे आहे? आपल्या देशातील सद्यस्थिती बद्दल काही सुचवायचे असेल, तर आता भारतीय मतदार जागृत झाला आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना नागवले होते. भ्रष्टाचार फोफावला होता. पण आता निःस्प्रुह निःस्वार्थी नेता मिळाला आहे जनतेला. पण आजूनही विपक्षीय ज्यांना पुन्हा सत्तेवर येण्याची शास्वती नाही, तेच खो घालत आहेत विकासाच्या मार्गात. आता मतदारांनीच सावध रहायला हवे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.