मानवी प्राण्यातील जाणीव भान (पूर्वार्ध)

मेंदूतील क्रिया–प्रक्रियांचे निरीक्षण
जगाच्या रहाटगाडग्यात वावरत असताना प्रत्येकाला हजारो समस्यांचा सामना करावा लागतो, प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. काही प्रश्न अगदीच क्षुल्लक असतात; परंतु आपणच त्यांना मोठे समजून आपला श्रम आणि वेळ वाया घालवत असतो. काही वेळा प्रश्न गंभीर असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे गोत्यात सापडतो. काही समस्या मात्र खरोखरच गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. काही समस्यांना उत्तरं सापडतात, काहींना अर्धवट अवस्थेत सोडून द्यावे लागते, व इतर कांहींच्या बाबतीत उत्तर नाही म्हणून गप्प बसावे लागते. उत्तर न सापडलेल्या अशाच समस्यांच्या यादीत जाणीव – सबोधता – (consciousness) – म्हणजे नेमके काय या समस्येचा/प्रश्नाचा क्रमांक कदाचित सर्वात वरचा असेल. जेमतेम एक किलोभर असलेले चेतापेशी आपण क्षणोक्षणी अनुभवत असलेल्या संवेदना, विचार, भावना, व स्मृती यांचा कॅलिडोस्कोप कसे काय दाखवू शकतात, याचे राहून राहून आश्चर्य वाटू लागते. एका समाजतज्ञाच्या मते, जाणीव ही एक फॅसिनेटिंग, तरीसुद्धा भासमय, धूसर अशी काही तरी आहे आणि त्याबद्दल आवर्जून वाचावेत असे लेख सापडत नाहीत.

या कठीण समस्येला अजून उत्तर सापडत नाही म्हणून त्याबद्दल कुणीच काही विचार करत नाहीत अशी स्थिती नाही, हेही तितकेच खरे. काही नसतज्ञ (Neurologists) जाणिवांविषयी नवीन काही सांगण्याच्या प्रयत्नात आहेत. जाणिवेची स्थिती लक्षात येण्यापासून ते जाणीव कामकरेनाशी होते तेव्हाच्या अडचणींपर्यंतचे वेध नसतज्ञ घेत आहेत.

जाणीव खरोखरच फॅसिनेटिंग आहे का? नसल्यास भासमय आहे का? कदाचित दोन्ही….

हृदयाघातामुळे दवाखान्यात दाखल केलेल्या एखाद्या जवळच्या नातलगाला जेव्हा आपण जाऊन भेटतो तेव्हा मन विषण्ण होऊन जाते. कालपर्यंत अतिशय व्यवस्थित असलेला व विश्वासपूर्वक जीवन जगणारा हा नातेवाईक काही तासातच एकदम लोळागोळा, लेचापेचा, गोंधळलेला व एखाद्या लहान मुलासारखा का वागतो हे एक न सुटलेले कोडे आहे. हा माणूस पूर्वस्थितीत येतो की नाही याची काळजी वाटू लागते. हे असे का घडते हा प्रश्न विचारावासा वाटतो. त्याची आध्यात्मिक सुसंगती लावण्याचा प्रयत्नही आपण करत असतो.

जाणीव ही शारीरिक अवस्था नसून त्याचा संबंध मेंदू किंवा मेंदूतील घटक यासारख्या शारीरिक अवयवांशी जोडू नये असे 400 वर्षापूर्वी ‘दे कार्त’ या तत्त्वज्ञाने केलेल्या विधानाशी आज आपण सहमत होणार नाही. कारण जाणीव हे मेंदूतील क्रिया–प्रक्रियांचे फलित आहे याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत. या नातलगाच्या मेंदूतील रक्ताचे गुठळेच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहेत, याची आपल्याला पूर्ण खात्री आहे.

आध्यात्मिक पातळीवर आपल्या मनात हजारो प्रश्न असतात. मला जसा रंग दिसतो तसाच रंग दुसऱ्याला दिसत असेल का? प्राण्यांना मन असते का? माणसाला माणूसपणाची जशी जाणीव असते तशी कुत्र्यांना ‘कुत्रेपणा’ची जाणीव असते का? इतर प्राण्यांना या ‘जाणिवे’चा अनुभव येत असेल का? हॉस्पिटलच्या खाटेवर पडलेल्या या नातलगाच्या जाणिवेचे काय झाले असेल? काही काळासाठी (किंवा कायमचेच) जाणिवेला समाधी अवस्थेत (हायबरनेशन) ठेवता येणे शक्य आहे का? जाणीव म्हणजे नेमके काय असते? यासारख्या अनंत प्रश्नांची उत्तरे यानंतर तत्त्वज्ञानात वा अध्यात्मात न शोधता मेंदू व/वा नस विज्ञानात शोधावी लागतील.

विज्ञानातील संशोधनाने चेतापेशींचा संबंध जाणिवेशी आहे हे स्पष्ट केलेले आहे. मेंदूमधूनच जाणिवेचा उगम कसा होतो हे आता कळू लागले आहे. जाणीव क्षीण होत होत पूर्ण जाणीवच नाहीशी झालेल्या vegetable स्थितीत असलेल्या माणसाच्या मेंदूच्या अभ्यासावरून हे निष्कर्ष काढले आहेत. आणखी जास्त अभ्यास करून मेंदू व जाणीव यांच्यातील अन्योन्य संबंधावर प्रकाश टाकणे शक्य होईल असे या क्षेत्रातील वैज्ञानिकांना वाटत आहे.

मेंदूचे स्कॅनिंग
या प्रकारच्या रुग्णाच्या मेंदूच्या मध्यभागी असलेल्या thalamusमध्ये काही बिघाड असल्यामुळे त्याच्यातील जाणिवेवर आघात झाला आहे, हे त्याच्या मेंदूच्या scanवरून कळते. Thalamus व prefrontal cortex – मेंदूचे हे घटक गुंतागुंतीच्या विचारांचा स्रोत असतात – यांच्या जोडणीत दोष निर्माण झाल्यामुळेसुद्धा जाणिवेला धक्का बसू शकतो. Prefrontal cortex चा संबंध भूल दिलेल्या मेंदूच्या स्कॅनिंगवरूनसुद्धा कळू शकतो. कारण भूल दिल्यानंतर जागरूकता कमी होत होत जाते; त्याचवेळी prefrontal cortexच्या पृष्ठभागाचे कार्य मंद होत जाते. व रुग्णाचा जाणिवेशी काही संबंध उरत नाही.

उद्दीपन (stimuli) या प्रकारच्या संशोधनातून आपण जागृतावस्थेत आहोत की सुप्तावस्थेत याचा मेंदूशी संबंध जोडणे शक्य झाले. परंतु मेंदूशी संबंधित अनेक गोष्टी आहेत की ज्यांची अजूनही आपल्याला कल्पना नाही. उदाहरणार्थ, आपण तांबड्या रंगाकडे बघितल्यानंतर नेमके काय होत असते?

ब्रेन स्कॅनच्या यंत्रासमोर उभे राहून मेंदूच्या पृष्ठभागावरील काही मोजक्या स्थित्यंतरांचा आढावा घेणे हे काही अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर होऊ शकत नाही. कारण डोळ्याने एखादे दृश्य बघत असताना मेंदूतील unconsciously होत असलेल्या प्रक्रिया, बघणारे डोळे, प्रकाश, आणि मेंदू यांच्यातील देवाण घेवाणीचे परिणाम अजूनही अज्ञात आहेत. ही समस्या डोळ्याप्रमाणेच इतर ज्ञानेंद्रियांबाबतीतही तितकीच खरी आहे. ब्रेन स्कॅनमध्ये डोके अडकवून घेऊन लाल दिव्याकडे पाहत राहण्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण सुप्तावस्थेतील मेंदूवर बाह्य दृश्यांच्या उद्दीपनामुळे काही प्रक्रिया सतत घडत असतात. त्यामुळे यातून मार्ग कसा काढता येईल हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

मेंदू जागृतावस्थेच्या आणि सुप्तावस्थेच्या काठावर असताना त्यावर होणाऱ्या उद्दीपकांच्या परिणामांच्या निरीक्षणावरून काही प्रमाणात याची कल्पना येऊ शकते. उदाहरणार्थ, क्षीण आवाजातील उमटणारा एखादा उच्चार, किंवा संगणकाच्या पडद्यावर काही क्षणासाठी उमटलेला शब्द – मेंदूवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास करता येईल. जाणूनबुजून शब्दांची नोंद होत नसल्यास किंवा मेंदूच्या पृष्ठभागावर काही प्रतिक्रिया उमटत नसल्यास हे दृश्यसंवेदनामुळे होत आहे असा निष्कर्ष काढता येईल. परंतु मेंदू आवाज वा शब्दाची नोंदच घेत नसल्यास मेंदूत होत असलेले बदल भलत्याच कुठल्या तरी ठिकाणी होत असावेत असे म्हणता येईल. तज्ज्ञांच्या मते याच्या नोंदी मेंदूच्या lateral prefrontal cortex आणि posterior parietal cortex च्या भागात होत असाव्यात. मेंदूचे हे घटक क्लिष्ट विचार व गुंतागुंतीच्या गोष्टींची नोंद करत असतात. आणि ह्या नोंदी, या घटकांच्या अंतर्भागात न होता पृष्ठभागावरच होतात, हे प्रयोगा-अंती लक्षात आलेले आहे.

इतर प्राण्यांच्या मेंदूमध्येसुद्धा thalamus असतो. परंतु मेंदूतील हा अतिसंवेदनशील पृष्ठभाग मनुष्य प्राण्याइतका मोठा नसतो. यावरून इतर प्राण्यांमध्येसुद्धा – क्षीण प्रमाणात का होईना – जाणिवा असतात. परंतु माणसामध्ये त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे रूप व आकार असतो.

माणसाच्या मेंदूतील thalamus, lateral prefrontal cortex आणि posterior parietal cortex चा सहभाग जाणीवभानात असतो. मेंदूच्या इतर भागापेक्षा neurons जोडण्या या तीन भागात जास्त आढळतात. या दाट जोडण्यामुळे मेंदूच्या इतर कुठल्याही पृष्ठभागापेक्षा माहितीचा स्वीकार, संकलन आणि विश्लेषण करण्यात याच भागाचा हातखंडा असतो. नसतज्ञांच्या मते माहितीचे या प्रकारचे संकलन व विश्लेषण हेच माणसाच्या जाणीवभानाचे वैशिष्ट्य असू शकते.

जाणीव प्रारूप
जेव्हा हॉटेलसारख्या ठिकाणी मी एखाद्याला घेऊन जातो, तेव्हा मी तुकड्या तुकड्याने त्याच्या सहवासाचा अनुभव न घेता त्याचे बाह्यस्वरूप, ध्वनी, त्याच्याबद्दलची असलेली जुजबी माहिती, त्याच्या आवडी निवडी इत्यादी गोष्टींचे एकसंध असे एक चित्र माझ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करत असतो. मला त्या व्यक्तीत व त्याच्यासंबंधातील इतर गोष्टी यात एक सहसंवाद दिसतो. हा मेंदू पृष्ठभागावरील सर्व माहितीचे संकलन करून अगदी कमी वेळात त्याची कशी काय घट्ट वीण बांधू शकतो, हे एक न सुटलेले कोडे आहे. एका गृहीतकानुसार संबंधित असलेल्या महत्त्वाच्या चेतापेशींच्या चलनवलनाचा वेग वाढत जातो. (आपण हे मेंदूच्या माथ्यावर ठेवलेल्या EEG मेंदूतरंगांतून बघू शकतो) thalamus पासून सुरु होऊन cortex पर्यंत पोचत असताना त्याच्या स्वरूपात होणाऱ्या वेगवान बदलातून जाणिवेची कल्पना येऊ शकते.

या प्रायोगिक माहितीवरून जाणिवेचे सैद्धांतिक स्वरूप global-neuronal workspace या प्रारूपात मिळू शकते. या प्रारूपानुसार डोळे, कान इत्यादी ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीचे पृथक्करण, प्रथम मेंदूच्या त्या त्या इंद्रियाशी संबंधित असलेल्या पृष्ठभागावर केली जाते. त्यानंतरच त्याची जाणीव आपल्याला होत असते. Prefrontal and parietal कॉर्टेक्स व मेंदूतील पृष्ठभाग यांना जोडणाऱ्या अती वेगवान मेंदूतरंगांच्या क्रियेनंतरच आपल्यात जाणीवभान येते.

हे प्रारूप आपण करत असलेल्या अगदी गुंतागुंतीच्या – जे मुळातच वेगवेगळ्या ज्ञानाच्या भेंडोळे असतात – क्रियांचा जाणिवेशी जोडल्याची साक्ष देते. Lateral prefrontal व posterior parietal कॉर्टेक्समध्ये वेगाने घडणाऱ्या घटनेवरून हे लक्षात येत असल्यामुळे या प्रारूपाला पुष्टी मिळत आहे. उदाहरणार्थ, नवीन जटिल समस्या सोडवत असताना यांच्या चलनवलनाचा वेग जास्त असतो. मात्र अगदीच routine काम असेल तर यांचा वेग मंदावतो.

परंतु या प्रारूपाला जाणिवेच्या सैद्धांतिक गणितीय प्रारूपाचा विरोध आहे. कारण या गणितीय प्रारूपात जाणीव हे वेगळे असे काही नसून मिळालेल्या माहितीची गोळाबेरीज आहे. हेच जर खरे असल्यास माझ्या मित्राला मी जेव्हा भेटतो तेव्हा केवळ ज्ञानेंद्रियातून मिळालेल्या माहितीपेक्षा अधिक काही तरी माझ्या मनात का येत असते? परंतु हे प्रारूप इंटरनेटच्या प्रारूपासारखे असू शकते असेही म्हणता येईल. या प्रारूपाचे पुरस्कर्ते, माणसाच्या वा उंदराच्या मेंदूत वा संगणक यंत्रणेत फरक न करता नेटवर्कद्वारे माहिती प्रक्रियेतून जाणीवेची कल्पना येते, अशी मांडणी करतात. फक्त आपल्याला नेटवर्कची रचना, त्यातील नोड्सची संख्या, त्यांच्या जोडणीचे स्वरूप इत्यादीविषयी माहिती कळल्यास जाणिवेचे स्वरूप कळू शकेल, असे त्यांना वाटते.

परंतु जसजशी नोड्सची संख्या वाढू लागली तसतसे प्रारूप क्लिष्ट होऊ लागले. गणितीय समीकरणे गुतागुंतीची होऊ लागली. अतिवेगवान संगणकांनासुद्धा ही समीकरणे सोडविणे अशक्य होऊ लागले. फक्त 300 चेतापेशी असलेल्या दोन – अडीच मिलीमीटर लांबीच्या जंतूतील नेटवर्कचे विश्लेषणसुद्धा आतापर्यंत जमले नाही. कदाचित भविष्यात या गणितीय प्रारूपात सुधारणा होऊन काही उत्तरं मिळतीलही.

गणितीय प्रारूप global-neuronal workspace प्रारूपापेक्षा अगदी वेगळे आहे. कारण गणितीय प्रारूपात मेंदूची रचना कशी आहे याचा साधा उल्लेखही नाही. मात्र या दोन्ही प्रारूपांत माहिती संग्रह आणि माहितीवर केलेली प्रक्रिया यामधून जाणीव भान येऊ शकते याबद्दल एकवाक्यता आहे. त्याचप्रमाणे ही दोन्हीं प्रारूपे माहिती प्रक्रियाच्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित करतात, हेही नसे थोडके! यावरून याविषयी थोडी फार प्रगती होत आहे हे विशेष!

मेंदूतील चेतापेशींची मोट आपण तांबडा रंग पाहत आहोत की पिवळा हे कसे काय ठरवतात, या जाणिवेच्या संदर्भातील प्रश्नाची अजूनही उकल झाली नसेलही. जाणीव ही वैज्ञानिकरीत्या मेंदूच्या अभ्यासातून स्पष्ट होणार याबद्दल नसतज्ञांना विश्वास वाटत आहे. इतिहासकाळात डोकावल्यास जेव्हा एखाद्या जटिल प्रश्नाचे उत्तर सापडत नसे – पाऊस का पडतो, गरम तव्यावरील भाकरी का फुगते, वा सूर्योदय कसा होतो इ.इ. – तेव्हा आपण अतींद्रियशक्ती किंवा दैवी चमत्कार या सदरात ढकलून देत होतो. कालांतराने अशा प्रकारच्या प्रश्नांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळू लागले व या विषयाबद्दलचे आपले कुतूहल व जिज्ञासा इतिहास जमा झाले. त्यामुळे जाणीव हे न सुटणारे कोडे असे वाटत आहे म्हणून या प्रश्नाचे सुलभीकरण करून बाजूला सारण्यात अर्थ नाही. भविष्यकाळात या गुतागुंतीच्या समस्येला नक्कीच उत्तर सापडणार आणि ही समस्या म्हणून राहणार नाही याबद्दल दुमत नसावे!

मला माहीत आहे हे माहीत असणे किती चांगले!
इतर प्राण्यांपेक्षा माणूस प्राणी वेगळा आहे याची प्रचीती माणसातील स्व-भानामुळे (self-awareness) आली. आपल्या घरातील पाळलेल्या कुत्र्याला अनेक गोष्टी समजत असतील – भूक लागली, फिरण्याचा कंटाळा आला, शी-शू आली, वा स्वयंपाक घरात काही चविष्ट पदार्थांचा वास येत आहे, (मोबाइलचा रिंग टोन वाजल्या वाजल्या मोबाइल आणून देतो) इ.इ. परंतु या कुत्र्याच्या मालकाला या प्रकारच्या संवेदनाबरोबरच आणखी वरच्या पातळीवरील क्रिया-प्रक्रियांचेसुद्धा ज्ञान असते. माणूस म्हणून आपल्याला यासंबंधातील इतर अनेक गोष्टी समजत असतात – भूक लागली असली तरी ही वेळ खाण्याची नाही, फिरण्याचा कंटाळा आला असला तरी घरी जाऊनच विश्रांती घ्यावी लागणार, शी-शूसाठी योग्य आडोसा शोधावा लागणार, चविष्ट पदार्थ तुम्हाला वाढेपर्यंत वाट पहावी लागणार, इ.इ. – या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असतात. व यातूनच आपल्या भावना व्यक्त होतात व योग्य निर्णय घेतले जातात.

एवढा वेळ फिरून आल्यामुळे मला थकवा जाणवत आहे. एक पाऊलही मी यापुढे ठेऊ शकत नाही. परंतु रात्रीच्या पार्टीला मात्र मी जरूर जाईन. हे फक्त माणसांच्या बाबतीतच घडू शकते. कारण शारीरिक उणीवांवर मात करण्यासाठीचे मनोधैर्य माणसात असते. माणसातील या गुणविशेषाला अंतर्निरीक्षण (meta-cognition) असे म्हटले जाते. स्वतःच स्वतःबद्दलची माहिती मिळवणे यात अंतर्भूत असते.

जाणीव विषयाच्या अभ्यासकांच्या मते स्वतःबद्दलची माहिती असणे, स्वतःचे विश्लेषण करणे या संबंधात माणूस हा एकमेव अपवाद नसेलही. परंतु मानवी मानसिकतेचा विकास या self-awareness मधूनच होत गेला असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. यापूर्वीच्या संशोधकांनी केवळ माणूस प्राण्यातच हे स्वभान असते की इतर काही बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या प्राण्यांतसुद्धा आहे याचा अभ्यास केला आहे. काही अभ्यासकांच्या मते डॉल्फिन वा वानर प्राणिवंशातील काही प्राण्यांमध्ये self-awarenessचे अंश सापडतात. परंतु काही चिकित्सक या निष्कर्षास संमती देण्यास तयार नाहीत.

स्वभानाविषयी माणूस विचार करत असताना त्याच्या मेंदूचे स्कॅनिंग केल्यास डोक्याच्या समोरील भागातील Prefrontal कॉर्टेक्समध्ये हालचाली दिसू लागतात. परंतु त्याचे मोजमाप करणे जिकिरीचे ठरत आहे. चाचणीच्या वेळी दिलेल्या उत्तराबद्दल कितपत खात्री आहे, या प्रश्नाचे उत्तर चाचणीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असू शकते. त्यामुळे आपण स्वभानाचे मोजमाप करत आहोत की बौद्धिक क्षमतेचे हा संभ्रम निर्माण होतो. एका अभ्यासगटाने यासंबंधीचे प्रयोग करताना करड्या रंगाच्या अनेक छटा असलेल्या पट्ट्यांचे चित्रं काढून दाखविण्याची व्यवस्था केली. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार रंगाच्या छटांमध्ये काही सूक्ष्म बदल केल्यामुळे चाचणीवर होणाऱ्या त्यांच्यातील दृष्टिदोषाच्या परिणामाला वगळणे शक्य झाले. त्यामुळे चाचणीच्या या भागासाठी प्रत्येकाला शंभरपैकी 70 पेक्षा जास्त गुण मिळाले. आता उरलेला प्रश्न म्हणजे प्रत्येकाच्या खात्रीपणाविषयी केलेले भाष्य. यात मात्र फार मोठा फरक जाणवला. चाचणीच्या वेळी प्रत्येकाच्या मेंदूचे स्कॅनिंग केले जात होते. त्यावरून ज्यांच्यात स्वभान जास्त कार्यक्षम आहे त्यांच्या anterior prefrontal cortex जवळील ग्रे मॅटर जास्त आहे हे लक्षात आले. यावरून इतर प्राण्यांपेक्षा माणसातच हा फरक जाणवत असेल का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

मेंदूचे कार्य कसे चालते यासाठी अजून एका प्रकारे चाचणी करणे शक्य आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे/नीटपणे काम करता येत नाही असे वाटत असताना मेंदूचे कुठले भाग कार्यरत असतात ही माहिती मिळवता येईल. याचे अंधदृष्टी वा blind-sight असे तांत्रिक नाव आहे. मेंदूला इजा झाल्यामुळे डोळे असूनसुद्धा काहींची दृष्टी गेलेली असते. परंतु काळजीपूर्वक चाचणी घेतल्यास अगोचरपणे त्यांना वस्तूंचे ज्ञान आहे हे लक्षात येते. जेव्हा त्यांच्या हातात एखादी वस्तू देऊन ओळखण्यास सांगितल्यास यदृष्टपणे वस्तू न ओळखता विचारपूर्वक सांगितल्याची उदाहरणे नक्कीच सापडतील. खरे पाहता त्यांच्यात दृष्टिदोष असूनसुद्धा अनकॉन्शियसली त्या वस्तूबद्दलची माहिती स्मृतिपटलातून ते मिळवत असावेत.

अंधदृष्टी हा प्रकार मेंदूच्या पाठीमागे असलेल्या visual cortex ला काही इजा झाल्यास होऊ शकतो. कारण येथे डोळ्यातील optical nerves मधून आलेली माहिती साठवली जाते. मेंदूतील प्रतिमांच्या अभ्यासात prefrontal cortex ला जोडणाऱ्या nervesनासुद्धा इजा झालेली असल्यास त्यांच्यातही हा दृष्टिदोष असू शकतो हे आढळले. त्यामुळे अंतर्निरीक्षण (meta-cognition) हा प्रकार असू शकतो या संकल्पनेला पुष्टि मिळाली.

मेटा-कॉग्निशनच्या प्राथमिक पातळीवर delusions, hallucinations वा schizophrenia च्या केसेस सापडतील. एका प्रयोगात संगणकातील कर्सर हलवण्यासाठी काही रुग्णांना व इतरांना प्रशिक्षण दिले. या सर्वांना आपण कर्सरवर नियंत्रण ठेऊ शकतो याची खात्री पटल्यानंतर प्रयोगकर्ती त्यांच्या नकळत कर्सरची हालचाल करू लागली. रुग्णांना नेमके काय होत आहे हे कळेनसे झाले व सर्व जण गोंधळले. परंतु रुग्ण नसलेले मात्र न गोंधळता काही तरी गडबड आहे हे ओळखत होते.

छिन्न मानसिकतेच्या रुग्णांना त्यांचे नियंत्रण दुसरेच कुणी तरी करत आहेत, त्यांच्या वर्तनात बदल घडवणारे दुसरेच कुणी तरी आहेत असे वाटत असते. उदाहरणार्थ प्रयोगाच्या वेळी लावलेला प्रोब काढून टाकला तरी आपले नियंत्रण प्रोब करत आहे अशी एक दाट शंका त्यांच्या मनात असते.

मेटा-कॉग्निशन या गुणविशेषाचा वापर करून अशा रुग्णांच्यावर उपचार करता येतो असे लक्षात आले आहे. 7 ते 11 वर्षे या वयोगटातील अशा रुग्णांना हे उपचार केल्यानंतर अंतःप्रेरणेतून निर्णय घेणे शक्य झाले. परंतु त्याची कारणमीमांसा करणे त्यांना जमत नव्हते. ज्या गोष्टी त्यांना माहीत होत्या तेथेच ते जास्त वेळ घुटमळत होते. परंतु नवीन काही शिकविल्यास ते घाबरत होते. याप्रकारच्या प्रयोगात भर घालून किंवा काही नावीन्यपूर्ण प्रयोग करून अशा रुग्णांच्यामध्ये सुधारणा करणे सहज शक्य आहे, असे अभ्यासकांना वाटत आहे. परंतु रुग्ण नसलेल्यांना मात्र याप्रकारचे प्रशिक्षण दिल्यास त्यांच्यातील जाणीव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे का? हेही अजमावण्यात आले. तुमच्यातील जाणिवा अगोदरच तांबड्या रंगाबद्दल खात्री बाळगून असल्यास अशा प्रशिक्षणातून हाती काही लागणार नाही. परंतु तुम्ही जे बघत आहात किंवा त्यासंबंधात एका निर्णयाप्रत पोचत आहात तेव्हा मात्र या स्वभानाच्या प्रयोगांचा खात्रीशीर उपयोग होऊ शकतो.

आपला अबोल सांगातीः अनकॉन्शियस माइंड
आपण – मानव प्राणी म्हणून – आपल्यातील जाणिवांच्या वैशिष्ट्याबद्दल नेहमीच गर्व बाळगत असतो. आणि त्यात काही गैरही नाही. परंतु या जाणीव क्षमतेचा विचार करताना आपण नेहमीच आपल्या निर्णयप्रक्रियेवर परिणाम करत असलेल्या आपल्या अनकॉन्शियस माइंडच्या क्षमतेला विसरतो. अनकॉन्शियस माइंड लक्षणीय प्रमाणात आपल्या जाणीव क्षमतेत भर घालत असते.

1980च्या सुमारास या संदर्भात एक चाचणी घेण्यात आली. या प्रयोगात भाग घेणाऱ्यांना एक बटन दाबून त्याची अचूक वेळ नोंद करण्यास सांगितले. व दुसऱ्या एका घड्याळावर प्रयोगात सहभागी होण्याऱ्यांच्या नोंदी बरोबर आहेत की नाही हे तपासण्याची यंत्रणा होती. त्याचबरोबर या नोंदीच्या वेळी त्यांच्या मेंदूतील हालचालींची नोंद करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर एक प्रोब चिटकवले होते. या प्रोबद्वारे मेंदूत घडत असलेल्या विद्युतप्रक्रियेची नोंद होणार होती.

गंमत म्हणजे प्रयोग सुरू होण्यापूर्वीच मेंदूमधील निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले न्यूरॉन्स काम करू लागतात. fMRI च्या स्कॅनमध्येसुद्धा prefrontal cortex निर्णय घेण्यापूर्वीच्या काही क्षणापूर्वी कार्यरत होते हे लक्षात आले. हा निष्कर्ष माणसाच्या free will विषयी संशय निर्माण करतो असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यात free willची क्षमता आहे. परंतु त्याचे नियंत्रण जागृत मनाकडे नसून अनकॉन्शियस माइंडकडे आहे असा अर्थ यातून निघू शकतो. परंतु या निष्कर्षालासुद्धा विरोध दर्शवणारे तज्ज्ञ आहेत. यावरून फार फार तर जागृतावस्थेच्या बाहेर असलेल्या मेंदूतील प्रक्रियेचा मागोवा घेणे जिकिरीचे आहे असे म्हणता येईल. याच्या खरे-खोटेपणाविषयी प्रयोग करताना अगदी प्लँचेटचाही वापर केल्याची उदाहरणे सापडतील.

परंतु एवढ्या टोकाचे प्रयोग न करता अगदी साध्या चाचणीतूनसुद्धा यासंबंधी जास्त माहिती काढून घेता येणे शक्य आहे. डोळ्यासमोर एकानंतर एक या प्रमाणे चित्र दाखवून हा प्रयोग करता येईल. एक चित्र डोळ्यासमोर धरून काही क्षणातच काढून टाकल्यास नेमके चित्र कोणते होते हे ओळखणे जरा कठीण वाटेल. कारण जागृत मन react होण्याआधीच चित्र पुढे सरकलेले असेल. अशा प्रसंगी मेंदूत कसल्या हालचाली होतात, हे जाणून घेणे मजेशीर ठरेल. उदाहरणार्थ पहिल्या चित्रात चमचाभर मीठ दाखवल्यास पुढील चित्रात साखर असणार असे निद्रिस्त मन सांगण्याची शक्यता आहे. कोडे सोडवत बसलेल्याच्या समोरील कागद व पेन काढून ठेवले तरी त्याच्या विचारतंद्रीत फरक पडत नाही. त्याला आपल्यासमोर कागद नाही हे फार उशिरा कळेल.

अजून एका प्रयोगात काही जणांना खालील निकषांपैकी एक निकष वापरून एका चांगल्या फ्लॅटची निवड करण्यास सांगितले होते.

  • उत्स्फूर्तपणे निर्णय घेणे
  • काही वेळ साधक बाधक विचार करून निर्णय घेणे
  • फ्लॅटच्या खरेदीशी संबंधित नसलेल्या भलत्याच गोष्टींचा विचार करत निर्णय घेणे

गंमत म्हणजे भलत्याच गोष्टींचा विचार करणारेच उत्तम दर्जाचे फ्लॅट निवडू शकले. कदाचित भलत्याच गोष्टींचा विचार करणाऱ्यांचे मन अजाणतेपणाने चांगल्या फ्लॅटचे आडाखे बांधण्यात यशस्वी ठरल्यामुळे त्यांची निवड सरस ठरली असेल.

अशा प्रकारचे प्रयोग पुन्हा पुन्हा करण्याजोगे नसतात, हेही तितकेच खरे. त्यातून अपेक्षित वा निश्चित निष्कर्ष निघतील याची खात्री नसते. तरीसुद्धा आपल्यातील अनकॉन्शियस माइंड निर्णय प्रक्रियेत सहभाग घेत असते, असे ठाम प्रतिपादन तज्ज्ञ करत आहेत. निर्णय प्रक्रियेत अनेक घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या मनात काय घडत असते याचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागत नाही.

आपण सर्व झोंबी (Zombie) का नाही?
तुम्हाला रस्त्यावर एखादा झोंबी दिसल्यास तुम्ही त्याला ओळखू शकाल का? भयपटातील झोंबीला ओळखणे तेवढे दुष्कर नसेल परंतु तत्त्वज्ञांच्या विचार प्रयोगतील झोंबी हा वेगळ्या मुशीतला असतो. हा झोंबी इतरांसारखा दिसतो, वागतो; फक्त त्याच्या जाणीवा नाहिशा झालेल्या असतात.

या झोंबीच्या हाताला टाचणीने टोचल्यास इतरांप्रमाणे तो विव्हळेलसुद्धा! पंरतु त्या विव्हळण्यात प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action) जास्त व वेदना कमी किंवा नाहीच अशी स्थिती असते. मुळात झोंबींना इंद्रियानुभवाची जाण नसते. त्यामुळे तुमच्या भोवती वावरणारे झोंबी नाहीतच हे खात्रीपूर्वक तुम्ही सांगू शकत नाही.

या विचार प्रयोगातून आपल्याला एवढेच कळते की इतरांच्यात जाणीव आहे का नाही हे आपल्याला सहजपणे कळू शकत नाही. किंवा मी जितका संवेदनशील आहे, तितके इतर नाहीत असेही आपण म्हणू शकतो. त्यामुळे जाणिवेच्या गुणधर्मांचे संशोधन फार जिकिरीचे ठरत आहे.

या संबंधात अजून एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. उत्क्रांतीच्या मार्गक्रमणात आपल्या अस्तित्वासाठी या जाणिवेचा काही उपयोग झाला असेल का? थोडक्यात जाणीव उत्क्रांत का झाली?

आपल्यातील शारीरिक व मानसिक गुणविशेषांचा आपण नेहमीच उपयुक्ततेशी लावत असतो. भाषा, रंगसंगतींचे भान, दोन पायावर चालणे यांसारख्या गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी उपयुक्त ठरल्या व आपण होमोसेपियन म्हणून विकसित होण्यासाठी त्याचा फार मोठ्या प्रमाणात हातभार लागला हे आपण विसरू शकत नाही. परंतु जाणिवेच्या संदर्भातसुद्धा हे विधान आपल्याला करता येईल का? जर आपल्याला खात्रीशीर विधान करता येत नसेल तर आपण गोत्यात येऊ शकतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्याच्या शोधाची सुरुवात कुठपासून करायची हीसुध्दा एक समस्या ठरू शकते. त्यामुळे आपल्या अंदाजाला सुद्धा काही मर्यादा पडू शकतात. या द्विधामनस्थितीतसुद्धा आपण जाणिवांच्या संदर्भातील काही गोष्टींचे ठामपणे विधान करू शकतो. कारण त्यासाठी आपल्याकडे MRI स्कॅनरचे व मेंदूला ठिकठिकाणी लावलेल्या इलेक्ट्रोड्सच्या सहायाने केलेल्या नीरीक्षणांचे पुरावे उपलब्ध आहेत. जाणिवांच्या संदर्भातील एका work space प्रारूपानुसार दृष्टी व ध्वनी सारख्या इंद्रियगम्य उद्दीपनांची (stimuli) प्रक्रिया जाणिवेच्या आधाराविना होते व ही माहिती जाणिवेच्या पातळीवर गेल्यानंतर मेंदूच्या इतर भागातील न्यूरॉन्सच्या नेटवर्कला उद्दीपित करून पुढील प्रक्रिया कार्यान्वित होते.

या प्रारूपानुसार जाणीव मेंदूला भेडसावणारे, जास्त कठीण, गुंतागुंतीच्या समस्यांचा उकल करणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात करते. सर्व बाजूंनी माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करून एक खात्रीशीर दिशा दाखवणे हे जाणिवेचे स्वरूप असते. काही तज्ज्ञांच्या मते जाणीव माहितीचा संग्रह करून समस्येचे उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने सहभागी होत असते. एका प्रकारे गोळाबेरजेचे ती काम करते.

आपल्या मेंदूच्या कार्यक्षेत्रात आपण काही गोष्टीच एका वेळी सामावून घेऊ शकतो. परंतु गोळाबेरजेशी संबंधित इतर गोष्टींनासुद्धा समावून घेतल्यास संकल्पना स्पष्ट होत जाते व त्याचा मागोवा घेणे सुलभ होते. कदाचित जाणीव म्हणजे सर्व संबंधित गोष्टींना एकाच ठिकाणी आणून त्यांची मोट बांधणे असे सुद्धा म्हणता येईल. ही कल्पना जरी अंदाजपंचे वाटत असली तरी याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे उपलब्ध आहेत. गोळाबेरजेच्या वेळी Prefrontal and parietal cortex चे घटक उद्दीपित होतात, हे लक्षात आले आहे.

माणसाप्रमाणे इतर प्राण्यांतसुद्धा अशाच प्रकारचा ‘झोंबीपणा’ असू शकतो का? मुळातच जाणीव हा प्रकारच फार कमी प्रमाणात इतर प्राण्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांच्यातील ‘झोंबीपणा’ चटकन लक्षात येत नसावा. एप्स वा डॉल्फिन्ससारख्या प्राण्यांमध्ये जाणिवेचा अंश असला तरी तो फारच कमी प्रमाणात आढळतो.

या संबंधी अजूनही काही गृहीतकांचा विचार करावा लागेल. 1970च्या सुमारास दुसऱ्यांच्या मनात काय आहे या प्रश्नावरून आपल्या जाणिवेत बदल होत असतील का हा प्रश्न संशोधकासमोर उभा राहिला. काही तज्ज्ञांच्या मते आपल्यातील जाणिवा सुस्पष्ट नसतील तर इतरांच्या मनात काय चालले आहे हे समजणार नाही. इतर प्राण्यांच्यापेक्षा मानवी जाणिवांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळेच माणसात आक्रमकता व/वा स्पर्धेत उतरण्याची ईर्षा मोठ्या प्रमाणात असते. यावरूनच माणसात समूह करून जीवन जगण्याच्या जाणिवा विकसित झाल्या असाव्यात. परंतु ईर्षा, स्पर्धा वा आक्रमकता या गुणविशेषांबरोबरच सहकार्य, औदार्य, करुणा, दया इत्यादी गुणविशेषसुद्धा माणसात आहेत हे विसरता येत नाही. एवढेच नव्हे तर माणसांचा पूर्वानुभवसुद्धा जाणिवा विकसित करण्यात सहभागी झाला असेल. मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यास तेथे गुरांचा कळप होता का, क्रूर प्राण्यांची दौड आहे का यावरून पळायचे की सामोरे जायचे हे माणूस ठरवत होता. अशा प्रकारे जाणिवा विकसित होण्यामध्ये अनेक गुणविशेषांचा सहभाग होता. परंतु काहींच्या मते या गुणविशेषांचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. हे गुणविशेष माणसाच्या बुद्धीच्या विकासाला मदत करत असतील, जाणिवेला नाही. जाणीव ही एक गुंतागुतीची प्रक्रिया आहे हे मात्र नक्की!

एक मात्र खरे की, माणसं शांत वातावरणात योग्य निर्णय घेऊ शकतात. कारण चहूबाजूनी विचार करून, पुरावे – संदर्भ यांचा अभ्यास करून निर्णयाप्रत पोचण्यास अशा वातावरणात त्यांना फुरसत मिळते. परंतु झोंबीसुद्धा – त्यांच्यात reflection व retrospection यांचा अभाव असूनसुद्धा निर्णय घेतच असतात. खरे पाहता या दोन्ही गोष्टी जाणिवांसाठी अत्यंत आवश्यक आहेत असे मानले जाते. त्यामुळे कदाचित त्याचा पूर्वानुभव या कामी मदत करत असावा, असे म्हणता येईल. मैदानातील धूळ कशामुळे हे समजण्यासाठी पूर्वानुभव पुरेसा ठरू शकतो.

या सर्व गोष्टींचा विचार करता जाणीव विकसित होण्यासाठी भरपूर कारणं असावीत किंवा कदाचित यापैकी काहीही नसावीत, असेही म्हणता येईल. अस्तित्वाच्या झगड्यात याचा उपयोग झाला असावा किंवा बुद्धिमत्तेचे ते एक उपउत्पादन (by-product) असावे.

अपूर्ण

अभिप्राय 1

  • जाणीव-भानाच्या माहितीपूर्ण लेखांबद्दल (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) धन्यवाद.

    जाणीवेचे संपूर्ण ज्ञान-शास्त्रीय (epistemological) आकलन होणे अशक्य आहे असे काही जणांना वाटते:

    १. जाणीवेचा शोध जाणीवेनेच घ्यायचा असतो, या चक्रापत्तीमुळे जाणीवेचा काही भाग अज्ञात रहाणार.

    २. का (why) आणि कसे (how) असे दोन प्रकारचे प्रश्न. पहिला प्रकार अर्थात्मक आणि दुसरा प्रक्रियात्मक. अर्थात्मक प्रश्नांना जाणीवेचीच मर्यादा. येथेही चक्रापत्ती.

    ३. जाणीवेचा उद्भव (चिदुद्भव) जैविक प्रक्रियेतून होतो. जीवशास्त्र हे पदार्थ विज्ञानात समानेय (reducible) नाही. त्यामुळे जाणीवेचे आकलन भौतिक (पदार्थ) विज्ञानातून मिळणार नाही. किंबहुना जाणीव ही आजच्या विज्ञानात समानेय नाही.

    ४. जाणीव हा संपूर्ण प्रथमपुरुषी अनुभव. त्याला प्रयोगशाळेतील वस्तू प्रमाणे द्वितीय आणि तृतीय पुरुषी अनुभवातून समजून घेता येणार नाही. (“जाणीव ही सर्वव्यापी जगदाधिष्ठान” ही अध्यात्मिक-तात्त्विक भूमिका. विज्ञान या बाबतीत तटस्थ)

    हे चारही मुद्दे एकमेकांना जोडलेले आहेत.

    याचा अर्थ जाणीवेचा शोध घेऊ नये असे अजिबात नाही. उलट हे एक आव्हान समजून चिद्भानाचा शोध घेतला जातोय, विज्ञानाच्या कक्षा वाढवायचा प्रयत्न होतोय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.