बुद्धिप्रामाण्यावर संक्रांत

(२०१६ साली जलिकट्टू शर्यतींवर बंदी आली होती. त्या विषयावरील निखिल जोशी यांचा लेख ‘बिगुल’ ह्या मराठी ऑनलाईल पोर्टलवर जानेवारी २०१७ सालीं प्रकाशित झाला होता. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविली असल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या लेखाचे औचित्य वाटल्याने हा लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.)

गेल्यावर्षी दहीहंडीवर न्यायालयाने निर्बंध घातले होते. लहान मुलांना धोकादायक परिस्थितीत टाकण्याविरुद्ध आणि सार्वजनिक जागा व्यापून सण साजरे करण्याविरुद्ध आक्षेप घेणे अर्थातच योग्य असले तरीही, प्रौढांनी किती धोका पत्करावा त्याविषयीही सरकारने आणि न्यायालयाने अतार्किक निर्बंध लादले होते. प्रस्थापित पुरोगामी विचारवंतांनी अर्थातच या निर्णयाचे धर्मनिरपेक्षता म्हणून स्वागत केले होते आणि धर्मप्रेमींनी मात्र त्या निर्बंधांना धर्मविरोधी ठरवून बंदीला न जुमानता परंपरा साजर्‍या केल्या होत्या. यावर्षीही तमिळनाडूत जल्लीकट्टू या प्रथेविषयी तशीच परिस्थिती उद्भवली आहे. पोंगलच्या तिथी उलटून गेल्यावर वस्तुतः हा मुद्दा पुढल्या वर्षीपर्यंत बासनात जाऊ शकत होता. परंतु, मनापासून कठोर विरोध करण्याची सरकारला हिंमत नसल्याचे पाहून जल्लीकट्टू समर्थकांना संक्रांतीनंतर कवित्व सुचते आहे. जणू, जयललिता यांच्या निधनाच्या वेळेस खर्च न झालेली शक्ती आता प्रदर्शित करण्याची संधी आलेली आहे. या मुद्यावरील विविध मतांतरे पाहू. या लेखात केवळ प्राणीहक्कांचा विचार केलेला आहे. असल्या उत्सवांचा मानवांवरील दुष्परिणाम, उदा., साधनसंपत्तीचा अपव्यय, जात/लैंगिक विषमतेला मिळणारे प्रोत्साहन, इत्यादींचा विचार स्वतंत्रपणे करता येईल.

निसर्गाचे संरक्षण करणे आणि भूतदया दाखविणे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51Ag नुसार प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. एकूणच, विविध उपेक्षित गटांना हक्क देण्याच्या सामाजिक प्रगतीचा भाग म्हणून, प्राण्यांनाही हक्क देण्याच्या चळवळीला आदर्श ठरविले जाते. जल्लीकट्टूमध्ये बैलांना दारू पाजतात, डोळ्यात मिरचीपूड टाकून किंवा डिवचून प्रक्षोभित करतात आणि शर्यतीत बैल जखमी होऊ शकतात हे क्रौर्य संवेदनशीलवर्गाला सहन होत नाही. शिवाय, अशाच विजयी बैलांचा पुढच्या पिढीसाठी संकर केल्यामुळे एकूणच त्या वाणाचा आक्रमकपणा वाढत बसतो. बैलांच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर असे ‘दुष्ट’ संस्कार करणेसुद्धा निसर्गस्थितीवाद्यांना मान्य नाही. मानवापेक्षा कमी का होईना, प्राण्यांनाही बुद्धिमत्ता असते, त्यांनाही वेदना होतात आणि त्यांच्यातही रागलोभ इ. भावना असतात. विशेषतः सस्तन प्राणीतर, मानवांवर प्रेमसुद्धा करू लागू शकतात. त्यामुळे, त्यांना इजा पोचविणे अमानुष समजले जाते. स्त्रिया, विविध वांशिक गट, समलैंगिक, इ. मानवी समूहांना पूर्वी समतेची वागणूक मिळत नसे. त्यांच्या चळवळींचे उदाहरण देऊन प्राणीहक्क चळवळी असेही सांगतात की भूतदया ही समताविस्ताराची पुढची पायरी आहे.

बुद्धिप्रामाण्यवादी जडवादामध्ये (materialism) मात्र, नीतिनियम आखणार्‍या देवाचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारून नीतिमत्तेचा पाया शून्यातून शोधावा लागतो. मानवाच्या सजीवत्वालाच काही विशेष न मानल्यामुळे, भूतदयेलासुद्धा काही मूलभूत आधार मिळत नाही. मानवी व्यवहारांमध्ये नीतिमत्तेचे जडवादी नियम शोधण्यासाठी गेम थिअरी (game theory) या ज्ञानशाखेमध्ये गोल्डन रूल(golden rule) हे एक खूप महत्त्वाचे तत्त्व आहे. बुद्धिमान व्यक्तीने स्वतःचा दीर्घकालीन स्वार्थ साधण्यासाठी कसे वागावे त्याचे गणित केल्यास, ‘जशास तसे’ किंवा, ‘तुम्हाला इतरांनी कसे वागविलेले आवडेल तसे तुम्हीही इतरांना वागवा‘ हा नियम उपयोगी असल्याचे दिसते. मानवी व्यवहारांचे नियमन करणारे बहुतेक रास्त कायदे गेम थिअरीच्या नियमांतून सिद्ध करता येतील. वरवर पाहता, या गोल्डन रूलनेसुद्धा असेच सुचविले जाते की “तुम्ही उडत असताना तुमच्या पायात/पंखात नायलॉनचा मांजा अडकला तर कसे वाटेल? तुम्हाला बैलासारखे धाववण्यासाठी डिवचून मारहाण केल्यास कसे वाटेल? जर ते सहन होणारे नसेल तर तुम्हीही पक्ष्यांना/प्राण्यांना त्रास देणारे खेळ खेळू नका.”

परंतु, मुळात, गोल्डन रूल हा नियम केवळ, बह्वंशी तुल्यबळ कुवतीच्या बुद्धी/शक्तीच्या जीवांमध्ये खेळण्यासाठीच वापरता येतो. याचे कारण जॉन रॉल्स (John Rawls) यांच्या वेल ऑफ इग्नोरन्सने (veil of ignorance) स्पष्ट करता येते. कोणताही नियम बनविणार्‍या व्यक्तीने, एखाद्या नियमाचा फायदा घेण्याची कुवत आपल्यामध्ये असेल की तसा फायदा घेण्याची कुवत नसल्यामुळे तोटा होईल हे माहिती नसताना, खूप वाईट शक्यतेचे परिणामही सहन होणार असतील तरच प्रस्तावित नियम बनवावा असे हा वेल ऑफ इग्नोरन्स नियम सांगतो. पुरेशी संसाधने आणि वेळ देऊन माणूस विरुद्ध बैल, किंवा माणूस विरुद्ध पक्षी, किंवा, माणूस विरुद्ध भाजीपाला, यांच्यात द्वंद्वयुद्ध जाहीर केले आणि दोघा प्रतिस्पर्ध्यांना समजा एखाद्या जंगलात सोडून दिले तर, बहुतेक सर्वच शक्यतांमध्ये माणूसच जिंकेल. माणसा–माणसांमधील द्वंद्वात मात्र, कोण कोणाला मारेल ते खात्रीने सांगता येत नाही म्हणून कोणीच कोणत्याच माणसाला मारू नये असा कायदा बनतो. आपण बैल असतो, पक्षी असतो किंवा भाजीपाला असतो तर आपले आयुष्य हे संपविण्याच्या लायकीचेच क्षुद्र झाले असते असे आपण आत्ता मानतो. त्यामुळे त्या परिस्थितीत आपल्याला अमानुष वागणूक मिळाली तरी ठीकच होईल. अशा प्रकारे, तीव्र असमान पातळीवरील व्यवहारांचे नियम ठरविताना, गोल्डन रूलची आडकाठी होत नाही.

अगदी, नवजात बालकांनासुद्धा, पुरेशी संसाधने, शिक्षण आणि वेळ मिळाल्यास ती कोणत्याही प्रौढ व्यक्तीचा सामना करू शकतीलच. त्याउलट,रुग्ण, अशक्त, वृद्ध झाल्यावरही आपले कोणी शोषण करू नये म्हणून रुग्ण, अशक्त, वृद्ध व्यक्तींच्या शोषणाविरुद्धचे नियम निरोगी प्रौढ व्यक्ती मान्य करतात. रुग्ण, अशक्त, वृद्ध व्यक्तींना संरक्षण दिल्यास त्यांची उत्पादकता वाढून समाजाला फायदा होण्याची शक्यता असते. तसा काहीही लाभ मानवेतर प्राण्यांना संरक्षण देण्यातून मिळत नाही. उदा., गांडुळांची एकूण संख्या जमिनीत अमुकएक असली की पुरते, एखादे विशिष्ट (non fungible) गांडूळ जगते की मरते त्याने समाजाला काही फरक पडू नये. प्राण्यांचे शोषण केल्यामुळे एखाद्या मानव व्यक्तीची उत्पादकता वाढत असेल तर तसे शोषण करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला मिळणे उपयोगितावादाला(utilitarianism) सुसंगत आहे. एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या कृत्यामुळे दुसर्‍या व्यक्तीच्या भावना दुखविल्या जाण्याने त्या दुसर्‍या व्यक्तीचा उत्पादकतेमध्ये घट होणार असेल तरीही, पहिल्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादणे अनुचित समजले जाते – वेशभूषास्वातंत्र्य,अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, इ. अनेक मुद्यांसाठी आपण ते तत्त्व पाळतो. भावनांनी वर्तनाचे नियंत्रण करण्याऐवजी,बुद्धिगम्य ऐहिक लाभानुसार वर्तन ठरविणे बुद्धिप्रामाण्यवादात आदर्श असते. प्राण्यांना यातना देण्यातून आनंद मिळविणे गर्हणीय असले तरी त्या व्यक्तीच्या उत्पादकतेत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे ते स्वातंत्र्य देय आहे. भारतीय राज्यघटना खूप छान असली तरीही ती पूर्णपणे निर्दोष नाही. शिवाय, भूतदया इ. मूलभूत कर्तव्ये ऐच्छिक असून, त्यांच्यापेक्षा अधिक महत्त्व हे अनुच्छेद 21 मधील मनासारखे जगण्याच्या स्वातंत्र्याला आहे.

उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार सर्वच प्राणी ही मानवाची दूरची भावंडे आहेत या युक्तिवादाने प्राणीहक्क चळवळ मानवकेंद्री दृष्टिकोनाला विरोध करते. परंतु, मानवाला प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानले नाही तर प्राण्यांनाही वनस्पतींपेक्षा श्रेष्ठ मानता येणार नाही, उत्क्रांतीनुसार वनस्पतीसुद्धा आपल्या अतिदूरच्या नातेवाईकच आहेत. प्राणीहक्क चळवळी वनस्पतींच्या सजीवत्वाबाबत बेपर्वाच असतात. प्राण्यांना यातना देण्याला होणारा विरोध हा भावनिक आणि आत्मा संकल्पनेच्या प्रभावामुळे तर आहेच, शिवाय बैलांचा या विकृत उद्देशासाठी संकर करून त्यांना अधिकाधिक आक्रमक बनविण्याविरुद्धची तक्रारसुद्धा बालिश आहे. पाळीव किंवा मानवी उपयोगासाठी हजारो वर्षांपासून वापरले जाणारे प्राणी, पक्षी आणि वनस्पतीसुद्धा, त्यांच्या तथाकथित नैसर्गिक स्वरूपापासून प्रचंड बदलल्या आहेत. उदा., गायीगुरे त्यांच्या मूळ जंगली पूर्वजांपेक्षा माणसाळलेली आणि आकाराने छोटी झाली, जंगली केळ्यामधील बिया मानवाने निवडक लागवड करून नष्ट केल्या. संस्कृतीचा अर्थच प्रकृतीच्याविरुद्ध आहे. ‘नैसर्गिक ते चांगले, कृत्रिम ते वाईट‘ हे गृहीतक निराधार आहे. ‘मानवाला बुद्धी असल्यामुळे तो देवाच्या योजनेत ढवळाढवळ करण्याचे पाप करू शकतो‘ या निरर्थक अपराधीभावाशी ते सुसंगत आहे.

अर्थात, अशा तात्त्विक चर्चेची कुवत जनसमुदायाकडे नसते. त्यांना प्रेरित करण्यासाठी परंपरा, धर्म यांविषयीचे प्रेम, प्रादेशिक अस्मिता, इ.मुद्द्यांचाच वापर केला जातो. अगदी, फ्रान्ससारख्या तथाकथित प्रगत देशातसुद्धा, बदकांवर अत्याचार करून निर्माण केल्या जाणार्‍या फ्वा ग्रा (foie gras) या खाद्यपदार्थावरील युरोपिअन बंदीला टाळण्यासाठी, फ्रान्सच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीच्या वारशाची, परंपरेचीच साक्ष काढली जाते. ‘मनःपूत वर्तनाचे मानवकेंद्री(anthropocentric) स्वातंत्र्य’ या मूल्याचा फ्रान्सलासुद्धा विसर पडला तेथे नेते/अभिनेत्यांसमोर लोटांगण घालणार्‍या तमिळनाडूकडून तरी काय अपेक्षा करावी? महाराष्ट्रात दहीहंडीच्या चळवळीला जशी प्रादेशिक प्रेरणा होती तशीच जल्लीकट्टू चळवळीलासुद्धा हिंदीद्वेष्ट्या अस्मितेची प्रेरणा आहे.

“प्राण्यांना त्रास झाला तर तुम्हाला का दुखते?” असा प्रश्न विचारण्याऐवजी, “आम्ही बैलांवर प्रेमच करतो, त्यांना त्रास देत नाही” इ. मुद्दे सांगून मूलभूत मुद्द्यांवर मात्र आंदोलक तडजोड करीत आहेत. भूतदया या भावनेविरुद्ध लोकांना जमविण्यासाठी परंपरावाद या दुसर्‍या भावनेलाच उभे करण्यात आलेले आहे. परंतु, आज बैलांच्या आयुष्याचे अवमूल्यन करण्याची काळजी आपण घेतली नाही तर कदाचित भविष्यात उंदीर मारण्यावरसुद्धा बंदी येऊ शकेल. व्यावहारिक वादांमध्ये दोन वाईट पर्यायांपैकी कमी वाईट पर्याय निवडताना तर्कबुद्धीचा कस लागतो. सर्वसाधारणपणे, केंद्रीय नियंत्रणापेक्षा प्रादेशिकता ही अधिक अतार्किक आणि अनागोंदीची असते म्हणून एरवी तिला विरोध करावाच. परंतु, दहीहंडीच्या मुद्द्याप्रमाणेच, याही मुद्द्यावरील केंद्रीय नियंत्रण आणि न्यायालयीन हस्तक्षेपसुद्धा अनावश्यक आणि अतार्किकच आहेत, बंदीच्या मागण्याही भावनिक आणि एकजिनसीकृत(homogenized) नवधार्मिक अस्मितेने प्रेरित आहेत. भावनांऐवजी थंड तर्कबुद्धी वापरल्यास बैलांचे हक्क दखलपात्र उरत नाहीत. तमिळ परंपरावाद्यांचा जल्लीकट्टू समर्थनाचा उद्देश वेगळा असला तरी, त्यांची मागणी ही तर्कबुद्धीला पटणार्‍या निष्कर्षाशी सुसंगतच असल्यामुळे, त्यांना मुद्द्यांवर आधारित पाठिंबा देणेच योग्य ठरेल.

अभिप्राय 1

  • लेखाचे शिर्षक ‘बुध्दीप्रामाण्यावर संक्रांत’ पण लेखात भूतदयेवरच चर्चा केलेली आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मात सर्वाभूती परमेश्वर अशी धारणा आहे. माणसाने जंगली पशूंना माणसावून त्यांना आपल्या उपयोगात आणले. शेतीच्या कामात, प्रवासासाठी त्यांचा उपयोग केला. पण ते करताना त्यांच्यावर प्रेमही केले. शेतकरी आपल्या गुराढोरांना वैरण घातल्याशिवाय स्वतः जेवत नाही. गुरे-ढोरे, कुत्रे, घोडे ही माणसाला तसाच लळा लावतात. पण काही खुशालचेंडू आपल्या करमणुकीसाठी आणि कधी जुगार खेळण्यासाठी पशू-पक्षांचा उपयोग करताना दिसतात. दक्षीणेत जल्लीकट्टू हा त्यातलाच प्रकार आहे. त्या खेळत बैलांचे खूपच हाल होतात. त्यामुळे भूतदयावादींनी त्या खेळाला विरोध करून त्या खेळावर बंदी आणली, तर एव्हडी आगपाखड करण्यात काय अर्थ आहे? आणि त्यालाबुध्दीप्रामाण्यावरची गळचेपी म्हणून एव्हड्या उच्च पातळीवर नेणे अतीच म्हणावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.