तुम्ही कुठल्या इंडियातले?

वीर दास ह्या विनोदी अभिनेत्याने “I come from two Indias” नावाचे कवितावजा स्फुट अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथील केनेडी सेंटरमध्ये नोव्हेंबरमध्ये सादर केले व त्याची दृकश्राव्य फीत समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. ह्या घटनेने एकच हलकल्लोळ उडाला. त्यानं सादर केलं आहे त्यावर “कसला भारी बोलला हा” इथपासून ते “कोण हा टिकोजीराव? ह्याला कुठे काय बोलावे याची काही अक्कल तरी आहे का?” इथपर्यंत सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रिया आल्या. ध्रुवीकरण झालेल्या आपल्या देशात आजकाल कुठल्याही लोकप्रिय नेत्याच्या विरोधात काही बोलणे म्हणजे देशद्रोह आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे ही देशप्रेमाची व्याख्या होऊ लागली आहे. त्यामुळे अशा टोकाच्या प्रतिक्रिया येणे अभिप्रेतच होते. अर्थातच वीर दासच्या बोलण्याचे राजकीय फायदे उठवणे, त्याचा संदर्भ घेऊन तीव्र प्रतिक्रिया देणे सुरू झाले.

वीर दास हा गेली कित्येक वर्षे या क्षेत्रात आहे. त्यामुळे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने हे केले असावे असे काही म्हणता येणार नाही. शिवाय त्याने सादर केलेले हे स्फुट त्याच्या मूळ कार्यक्रमाच्या शेवटी सादर केले आणि शेवटी “भारतासाठी टाळ्या वाजवा, आवाज करा” असे आवाहनही केले. त्याच्या ह्या सादरीकरणाने त्याच्यावर देशप्रेमी किंवा देशद्रोही शिक्का मारणे म्हणूनच आततायीपणा ठरेल!

खरंतर वीर दासने नक्की काय केले? भारतात घडलेल्या आणि घडत असलेल्या अनेक परस्परविरोधी घटना एकामागोमाग सांगितल्या. त्यातून आपण भारतीय दुट्टपीपणादेखील कसा सोज्वळपणे पांघरतो आणि प्रसंगानुसार आपल्याला सोयीस्कर अशी भूमिका घेतो ते अगदी सहज सोप्या शब्दांत सांगितले. त्याने देशावर, देशातील नागरिकांवर, नेत्यांवर अथवा धोरणांवर कुठलीच वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही. तसं पाहिलं तर त्याने त्या भाष्यातून केवळ आपल्यासमोर आरसा धरला. पण आरशात दिसणारी आपली प्रतिमा आवडत नाही म्हणून आरसाच चुकीचा म्हणणे किंवा तो फोडायला निघणे याला काय अर्थ आहे? गंमतीचा भाग हा की ज्या दोन ‘इंडिया’चा वीर दासने उल्लेख केला ते दोन ‘इंडिया’च खरंतर प्रतिक्रियेच्या स्वरूपात बाहेर आले आणि त्याचे म्हणणे किती खरे आहे हे त्यांनी दाखवून दिले!

त्याने दोन ‘इंडिया’ असं म्हटलं असलं तरी ही ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ मधली, ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ मधली आणि आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन किती दुभंगलेले आहे हे दाखवणारी कविता आहे. त्याने सांगितलेल्या घटनांनी हे फक्त परत एकदा अधोरेखित केले एवढेच! इंडियाचा विकास करताना भारताचाही विकास करायचा आहे – किंबहुना भारताचा विकास हाच इंडियाचा विकास आहे आणि भारताच्या विकासाशिवाय इंडियाचा विकास कदापि शक्य नाही हे मनोमन कळण्याची आवश्यकता आहे. ‘डिजिटल’ हे ‘ॲनालॉग’शिवाय अस्तित्वात येत नाही हे समजण्याची गरज आहे.

वीर दासने म्हटलेल्या कवितेची अगदी ओळीबरहुकुम छाननी केली तरी काय आढळते? कोविडबद्दल जागरूकता करणारे संदेश देणारे सरकार आणि दुसरीकडे सर्व नियम झुगारून मोठे मेळावे भरवणारे आणि आपण कोविडला हरवले आहे असे पोकळ दावे करणारे त्याच सरकारचे मंत्री! “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमते तत्र देवता” असं एकीकडं अभिमानानं सांगणाऱ्या भारतातच स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची वाढती संख्या! सरकारचे नियम जाचक वाटले म्हणून देश सोडण्याची पोकळ धमकी देणारे अभिनेते, त्यावरून विभागलेला देश आणि हे जणू प्रसिद्धीतंत्रच होते असे वाटावे अशा तऱ्हेने चित्रपटगृहात त्याच अभिनेत्यांच्या चित्रपटांना होणारी गर्दी! शेजारच्या देशाविरुद्ध क्रिकेट खेळताना अभिमान वाटावा अशी एकजूट दाखवणारा भारत जो केवळ काही राजकीय विधानांवर आता सरकार पडेल की काय अशी शंका यावी एवढा हमरीतुमरीवर येतो! “जुने जाऊ द्या मरणालागोनी” असं म्हणण्याची सुद्धा हिमंत नसल्याने “जुने ते सोने” म्हणून चुकीच्या परंपरांना कवटाळून बसणारा भारत!

ज्याला आपण कोटी किंवा play on words म्हणू शकू अशा अनेक बाबी या कवितेत आहेत. काही केवळ टाळ्या मिळाव्यात म्हणूनही रचलेल्या असतील. पण कुठलीच ओळ खोटी, मुद्दाम ओढूनताणून आणलेली वाटत नाही. प्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेल यांचं एक सुवचन आहे:

“If liberty means anything at all, it means the right to tell people what they do not want to hear.” ― George Orwell

आपण लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे खरे पुरस्कर्ते असू तर जे आहे ते, जसं आहे तसं सांगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला गेला पाहिजे आणि मुख्य म्हणजे ते स्विकारण्याची हिंमत आपण बाळगली पाहिजे. नाहीतर लोकशाही केवळ नावाला उरेल आणि फक्त “अहो रुपम् अहो ध्वनि:” म्हणणाऱ्यांची फौज गोळा होईल. ऑक्टोबर २०२१च्या ‘आजचा सुधारक’ मधली मनीषा चित्रे यांची ‘मन मेलं आहे’ ही कविता ह्याचं द्योतक आहे.

तसं होऊ द्यायचं नसेल तर आपणच आपलं स्वतःचं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन तटस्थतेनं अवलोकन करायची प्रचंड गरज आहे. आपण स्वतः दुभंगलेले असू – म्हणजे वैयक्तिक व सामाजिक जीवनात वेगवेगळे मापदंड वापरात असू तर समाजमन हे दुभंगलेलंच राहणार यात शंका नाही. असं स्वयंलोकन करताना आपण ज्यांना आदर्श मानतो ते त्या योग्यतेचे आहेत का हेदेखील तपासून पाहायची गरज आहे. आणि जे खरंच आदर्शवत आहेत, कुठल्याही प्रसिद्धीची हाव न बाळगता काम करत आहेत, त्यांना केवळ डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांच्या एक शतांश तरी गुण आपल्याला अंगिकारता येतात का हे पाहण्याची, किमान तसा प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ “मेरा भारत महान” अशा घोषणा देऊन तो महान होत नाही, तर तो का महान आहे ते समजून घेऊन, त्याचे महानपण जतन करावे लागते. ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून चालणार नाही कारण ही आपली सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे.

अभिप्राय 1

  • वीरदास या अभिनेत्याने अमेरिकेत केलेले दोन भारताचे विधान चुकीचे नाही. त्यामुळे त्यावर कौतुक किंवा आगपाखड करण्याची गरज नव्हती. पण त्याने ते जेथे केले त्या लोकांना वस्तुस्थिती ची जाणीव असणे शक्य नाही; आणि त्यामुळे तेथील लोकांचा भारताविषयी गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. होय आजही आपल्याला देशात आहेरे आणि नाहिरे या समाजात रुंद दरी आहे. पण ती का उद्भवली याचा विचार होणे आवश्यक आहे. आपला देश हजारो वर्ष मोंगलांच्या आणि ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता. स्वतंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या मूलभूत विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. त्यासाठी म. गांधीजिंच्या ग्रामोद्योग आणि ग्रामोध्दार या तत्वांची आवश्यकता होती. पण आपले पहिले पंतप्रधान नेहरू हे श्रीमंतित जन्मलेले आणि वाढलेले असल्याने त्यांनी त्या तत्वांचा अव्हेर केला. शहरांचा विकास करून खेडी भकास केली. सहकारी चळवळीत भ्रष्टाचार करून शेतकरी गरिबितच ठेवला. महाराष्ट्रात गरज नसताना उसाची लागवड करून धनाढ्य शेतकरी साखर सम्राट आणि नंतर राजकीय पुढारी झाले. असे खूप लिहिण्यासारखे आहे. दोन भारत होण्यास ही कारणं आहेत. पण आता भाजप सरकार मूलभूत विकासासाठी झटत असल्याने ही परिस्थिती बदलेल. पण त्यासाठी काही काळ लागेलचना आपल्या सारख्या खंडप्राय देशासाठी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.