शून्याला समजून घेताना

परंपरांचे ओझे 

ससा आणि कासव ह्यांच्या शर्यतीची गोष्ट सगळ्यांनीच ऐकलेली असावी. ससा वेगाने पळतो. कासव हळूहळू चालत जाते. ससा वाटेत झोपतो. कासव त्याला ओलांडून पुढे जाते आणि शर्यत जिंकते. गोष्टीवरून घ्यायचा बोध असा की वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे. बोध अगदी खरा आहे; पण मुळात असमान क्षमता असलेल्यांना एकाच स्पर्धेत उतरवणे कितपत न्याय्य आहे? तर तसे नाही; आणि म्हणूनच कथेतल्या कासवाला जिंकवण्यासाठी सश्याला झोपवावे लागते.

आयुष्यात कितीदातरी अश्या अतार्किक स्पर्धांचे आपण बळी पडतो किंवा पाडले जातो. येथूनच गरज पडते ती प्रत्येकाच्या शून्याला किंवा आरंभबिंदूला समजून घेण्याची.

सहज भेटायला म्हणून आलेल्या त्या दोघा-तिघा तरूणांपैकी एक जण अंध होता. ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावरील कॅंटिनमध्ये आम्ही गप्पा करीत बसलो होतो. “थोड्या वेळात येतो” असे सांगून तो उठून बाहेर गेला आणि जवळजवळ अर्ध्या तासाने परतला. आम्ही सहजच विचारले, “कुठे गेला होतास?” तर म्हणाला, “मी पूर्ण ऑफिस बघून आलो. मला तुमचे ऑफिस आवडले. छान बनवले आहे तुम्ही.” … त्याच्या उत्तराने मला विस्मयात टाकले आणि ऑफिस ‘बघितले’ या वाक्याने तर मी बुचकळ्यातच पडले. “तुमची गाडीदेखील मोठी आहे. मला एकदा तुम्हांला गाडी चालवताना बघायचं आहे.” एकदा ऑफिसमध्येच आलेल्या एका अंध मुलीच्या ह्या वाक्याने तर मी पार गारद झाले होते. ह्या वाक्यात तिचे अगदी नैसर्गिक कुतूहल होते. अंधत्व हे शारीरिक वैगुण्य किंवा एका महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियाची उणीव असे आपण समजत असलो तरी असे अनेक अंध तरुण-तरुणी स्वतःत एक परिपूर्ण आयुष्य जगतातच की! तीन मजले खाली उतरून ऑफिसचे इंटिरिअर ‘अनुभवणे’ किंवा एक स्त्री गाडी चालवत असताना तिच्या बाजूला बसून तिचा आत्मविश्वास, तिची सक्षमता ‘जाणणे’ हे त्यांच्यासाठी ‘बघणे’च होते की!

विद्यापीठाची सनद घेऊन ती खाली उतरली आणि अत्यानंदाने मी तिला कवेत घेतले. नवव्या वर्गात अनुत्तीर्ण झालेली, इंग्रजी, गणित ह्या विषयांच्या दडपणाखाली असलेली पूर्वीची ‘ती’ आणि समाजकार्य हा विषय घेऊन विद्यापीठात सुवर्णपदक मिळवणारी ‘ती’ ह्यांच्यात जमीन-अस्मानाचं अंतर होतं. समाजकार्याच्या अभ्यासासाठी ती माझ्याकडे राहायला आली. इंग्रजीशी तिचं सुरुवातीपासूनच वैर होतं. पहिल्या दोन वर्षांच्या परीक्षा तिनं मातृभाषेतूनच दिल्या. भाषा हे तिच्यासाठी निव्वळ ज्ञान मिळवण्याचे एक माध्यम आहे हे तिला एव्हाना उमगू लागले होते. अभ्यासासाठीचे अनेक संदर्भग्रंथ केवळ इंग्रजीतच उपलब्ध असल्याने हळूहळू तिची गाडी इंग्रजीच्या वाटेवर चढली. आज शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी व्यवस्थेशी झगडत असणाऱ्या एका संस्थेत ती उच्चपदावर कार्यरत आहे. आपल्या कामासाठी कितीतरी शासकीय/प्रशासकीय पदाधिकाऱ्यांशी तिला इंग्रजीतून संभाषण व पत्रव्यवहार करावा लागतो. हे सारे आता सरावाने ती उत्तमरित्या करू लागली आहे. शालेय वयात गमावलेला तिचा आत्मविश्वास पुढच्या शिक्षणाच्या काळात आणि आता कामाच्या संदर्भात तिने परत कमावला आहे.

वरील दोन उदाहरणांतील ‘तो’ वा ‘ती’ कोणी व्यक्तिविशेष नाहीत. मुद्दा आहे तो एखादी विशिष्ट गोष्ट त्यांच्याकडे नसल्याने आलेल्या न्यूनगंडाचा किंवा ते बिचारे ठरू नये म्हणून त्यांना कराव्या लागणाऱ्या आटापिटीचा! समाजमान्य मापदंडांनाच प्रमाण किंवा अंतिम सत्य मानण्याचा!

आरंभबिन्दू

शालेय शिक्षणात आपण सगळे क्ष-अक्ष (x-axis) आणि य-अक्ष (y axis) शिकलो आहोत. हे दोन अक्ष ज्या एका बिन्दूवर एकमेकांना मिळतात तो (०,०) मूलबिन्दू अर्थात origin मानला जातो. मग मूलबिन्दूपासून ह्या दोन अक्षांच्या ईशान्य भागाकडील बिन्दूंचे मूल्य दोन धन (+,+), आग्नेय भागाला (+,-), नैरृत्येला दोन्ही ऋण (-,-) आणि वायव्येला (-,+) असते. हे सर्व आपण शिकलो खरे, पण पुढे जाऊन ह्या (०,०) चे महत्त्व फक्त गणितापुरतेच राहिले. गणितातील (०,०) ही संकल्पना कधीच बदलत नसली तरी व्यक्तिगत आयुष्यात प्रत्येकाचा स्वतःचा असा (०,०) असतो ह्याचे भान आपण ठेवले नाही. किंबहुना, आपण त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्षच केले. (०,०) मूल्य असलेल्या बिन्दूला ह्यापुढे आपण आरंभबिन्दू असे संबोधू या.

ज्याचे त्याचे आभाळ
Photo by Jeremy Bishop on Unsplash

आपल्या सामाजिक व्यवस्थेत आपण प्रत्येकाच्या आरंभबिन्दूंना समाजमान्य मापदंडांवर तोलतो. गुण, अवगुण, क्षमता आदिंचे काही विशिष्ट मापदंड संस्कृती, परंपरा व सामाजिक रचना ह्यांमुळे पिढ्यानुपिढ्या आपल्या मनात पक्के कोरले गेलेले आहेत. मग त्या मापदंडांनुसार उजवे ठरलेल्यांना आपण डोक्यावर चढवतो तर त्या मापदंडांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांना आपण हीन मानतो. पण कित्येक व्यक्तिंचा आरंभबिन्दू हा ‘प्रमाण’ मापदंडांपेक्षा वेगळा असू शकतो हे समजण्यात आपण कमी पडतो.

वरील उदाहरणांतच बघू या. एखादा ‘तो’ जन्मतः अपंग असेल तर आपल्या समाजात तो केवळ सहानुभूतीला, दयेला पात्र ठरतो.  सोयींचा, संधींचा व समानतेचा संपूर्ण अभाव हे त्याचे प्रारब्ध बनते; परिणामतः पुढे जाऊन तो स्वयंपूर्ण न होता मिंधेपणाचे आयुष्य जगतो. सतत कोणावर तरी अवलंबून असतो. अव्यंग वा सुदृढता हा माणसाच्या शारीरिक रचनेचा साधारण मापदंड आपल्या मनात पक्का बसला असल्याने अपंग व्यक्तीच्या शारीरिक वैगुण्याला आपण सर्रास दोन ऋण (-,-) मानतो. परंतु जन्मतः व्यंग असलेली व्यक्तीदेखील स्वतःत परिपूर्ण असते आणि ते व्यंग हाच तिचा आरंभबिन्दू अर्थात (०,०) आहे हे आपण ध्यानातच घेत नाही. बरेच लोक जन्मतः अपंग नसून पुढे कधीतरी आजाराने/अपघाताने अपंग होतात. येथे त्यांचे पूर्वीचे ‘धडधाकट’ आयुष्य जगत असतानाच्या शारीरिक क्षमतांचे आरंभबिन्दू ‘अपंगत्वा’मुळे आलेल्या नव्या परिस्थितीत वेगळ्या ठिकाणी सरकलेले असू शकतात. ह्या Shift of Originचा स्वीकार करण्याचे आपल्या आणि त्या व्यक्तिंच्याही लक्षातच येत नाही. अशा व्यक्तिंचा पुढचा प्रवास ह्या नव्या आरंभबिन्दूपासून होणार आहे हे समजून घेता आले तरच त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा, संधी उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी प्रयत्न होतील; तेव्हाच ते सर्वसामान्य पातळीवर येऊ शकतील.

दुसऱ्या उदाहरणातील ‘ती’ मातृभाषेतून शिकल्याने बरीच वर्षे तिला लोकांपुढे इंग्रजीतून बोलता येत नव्हते, येथवर ठीक आहे. पण इंग्रजी बोलता येणे हे दोन धन अर्थात (+,+) आणि ते बोलता न येणे हे दोन ऋण अर्थात (-,-) असे मानणे किंवा एखाद्या ‘ती’ला इंग्रजी, गणित, विज्ञान ह्याचे आकलन कठीण जाते म्हणजे तिची योग्यता दोन ऋण (-,-) समजणे हा तिच्यावर अन्यायच नाही का? तिची काही वेगळ्या विषयांची जाण उत्तम आहे, ती आपले मुद्दे आपल्या मातृभाषेत प्रभावीपणे मांडू शकते हे महत्त्वाचे असू शकत नाही का? अश्यावेळी आपण किती नकळत तिला न्यूनगंड देतो! वरील उदाहरणांतील ती घराबाहेर पडली नसती तर कदाचित तिची प्रगतीच खुंटली असते. इथे कुटुंबातील लोकांनी तिच्या बौद्धिक क्षमतांना समाजमान्य मापदंडावर बसवून तिचे मूल्य ठरवल्याने असे झालेले दिसते.

प्रत्येकाचा प्रवास हा त्याच्या स्वतःच्या आरंभबिन्दूपासून सुरू होतो. प्रत्येक व्यक्तीचा आरंभबिन्दू समजून घेऊन त्यानुसार आपला दृष्टिकोन ठेवला तरच आपण एक सुदृढ समाज निर्माण करू शकतो. वयानुसार, अनुभवांनुसार, क्षमतेनुसार, काळानुसार हे आरंभबिन्दू बदलायला हवे, तसे ते बदलतातही. गरज आहे ती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आरंभबिन्दूंना, तसेच, परिस्थितीमुळे किंवा काळामुळे बदललेल्या आरंभबिन्दूंना स्वीकारण्याची!

प्रत्येकाच्या आरंभबिन्दूचे गणित एकदा नेमकेपणाने समजून घेतले, तर कितीतरी गोष्टी सहज, सोप्या होतील. त्यातील गुंतागुंत संपेल. उच्च-नीचतेच्या श्रेण्यांमधून बाहेर पडून माणसाकडे माणूस म्हणून बघणे आपल्याला शिकता येईल.

मापदंड – किती योग्य, किती अयोग्य?

सामाजिक व्यवहारांत अंतिम वाईट समजल्या जाणाऱ्या काही गोष्टी असतात. जसे चोरी, गुंडागर्दी, भ्रष्टाचार, बलात्कार, मानवी हत्या वगैरे. आता भ्रष्टाचाराला जर आपण अंतिम वाईटाच्या, अर्थात दोन ऋण (-,-) च्या श्रेणीत बसवले आहे, तर भ्रष्टाचार न करणे हा सर्वसाधारण सगळ्यांचाच आरंभबिन्दू असायला हवा. ह्यात नेते, पुढारी, राजकारणी, प्रशासक सारेच आलेत. असे असता एखादा नेता जेव्हा भ्रष्टाचार न करता जनतेच्या कल्याणाचे काम करतो तेव्हा त्याच्या त्या वर्तणुकीला (+,+) समजून आपण त्याला नाहकच उंचावर नेऊन ठेवतो. लोककल्याणाचे काम हा तर नेत्याचा (०,०)! तसे करणाऱ्याविषयी आदरभाव असावा पण तो उपकारकर्ता आणि आपण त्याचे ऋणी असे वाटून घेऊन त्याला देवत्व देणे (+,+) व स्वतःला हीन ठरवणे (-,-) हे योग्य नाही.

माझे काका एका मोठ्या प्रशासकीय हुद्द्यावरून निवृत्त झालेले अधिकारी. त्यांचा एक किस्सा ह्या निमित्ताने आठवतो. निवृत्तीच्या आसपास वनबेडरूमहॉलकिचन असे ३ खोल्यांचे घर त्यांनी विकत घेतले. आपल्या नियमित पगारात महागड्या वसाहतीत मोठा बंगला बांधणे त्यांना शक्य नव्हते. खरे तर एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे घर इतर नोकरदार लोकांपेक्षा काय वेगळे असणार? पण प्रत्यक्षात इतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे महागड्या वसाहतीत भव्य, टोलेजंग बंगले असतात. ज्यांच्याकडे अर्थार्जनाचा इतर कुठला स्रोत नाही अशा ह्या अधिकाऱ्यांकडे काही वेगळ्या मार्गाने अधिक पैसा नक्कीच येत असणार. ह्या पार्श्वभूमीवर छोटेखानी घर असलेला हा अधिकारी (माझे काका) सामान्य जनतेच्या कौतुकास पात्र ठरतो. वस्तुतः, असे व्हायला नको. भ्रष्टाचारापासून दूर राहणे हाच तर कार्यक्षम अधिकाऱ्याचा प्रमाण मापदंड आहे. त्यामुळे तसे असणे हे अपार कौतुकाचे (+, +) नसून तसे नसणारे इतर अधिकारी डावे अर्थात (-,-) ऋण बाजूला असायला हवे. थोडक्यात काय तर, आपल्या हुद्द्याला साजेसे, समाजमान्य मापदंडात बसणारे वर्तन करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला आपल्या मनात उच्चपदावर नेऊन ठेवण्यापेक्षा, तसे न करणाऱ्यांना दोन ऋणच्या (-,-) श्रेणीत टाकायला हवे. भ्रष्टाचार न करणे हा सामाजिक व्यवहाराचा मुलभूत मापदंड आहे. सामान्यतः हा सर्वांचाच आरंभबिन्दू (०,०) असायला हवा. पण प्रत्यक्षात तसे नसते आणि म्हणून जे भ्रष्टाचार करीत नाहीत त्यांचे आपल्याला कौतुक वाटते. भ्रष्टाचार करणाऱ्यांचा उघडपणे धिक्कार करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. एवढेच नाही, तर काही सन्माननीय अपवाद वगळता, दुर्दैवाने आज आपल्या समाजात काळा पैसा हाच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समाजमान्य मापदंड ठरतो आहे आणि असे अधिकारी समाजात प्रतिष्ठितदेखील मानले जात आहेत.

समाजाने वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळे मापदंड आधीच ठरवून टाकल्याचे हे दुष्परिणाम आहेत. संस्कृतीचे, परंपरेचे नाव पुढे करून आपण या मापदंडांना कवटाळून बसलो आहोत. परिस्थितीनुसार काही ठिकाणी नवे मापदंड बनवावे लागतात किंवा जुन्यांत बदल करावे लागतात हे समजून घेण्याची आपली तयारीच नाही. जे उच्चशिक्षित तेच विद्वान, इतर सर्व अडाणी येथपासून तर जे उच्च जातीय तेच फक्त सन्माननीय, इतर सर्व दयेचे वा घृणेचे पात्र अशी आपल्या विचारांची दिशा असते. म्हणजे ज्याला गणित समजते तो हुशार, इतर सर्व बुद्धू! लग्नासाठी गोऱ्या मुलाला किंवा गोऱ्या मुलीला पहिली पसंती, काळ्या रंगाला नकार! स्त्री सुगरण, सुशील असेल, तर घरात तिचे महत्त्व, अन्यथा ती कस्पटासमान! अमुक इतका पैसा, सर्व सोयींनी युक्त स्वतःचे घर व गाडी असणे ही श्रीमंती! बाकी वैचारिक, शैक्षणिक, नैतिक श्रीमंती वगैरे फक्त तत्त्वज्ञान झाडण्यापुरती! असे कितीतरी निराधार मापदंड आपण मनात बाळगून असतो. आणि दुर्दैवाने हा आरंभबिन्दू मानला गेल्याने आपण सगळेच ह्या (०,०) च्या दडपणाचे बळी असतो.

आपल्या समाजात पाककौशल्य, गृहकृत्यदक्ष ह्या मानकांत बसणाऱ्या स्त्रियांना आदर्श समजले जाते. स्त्रियांसाठीचे हे मापदंड रूढ आहेत. ज्या स्त्रिया तसे करतात, त्या चांगल्या. परंतु स्वतःच्या प्रगतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी किंबहुना नुसतेच आपले इतर काही छंद जोपासायला म्हणून घरकामांसाठी कमी किंवा नगण्य वेळ देणाऱ्या स्त्रियांना आपण त्वरित दोन ऋण (-,-) स्थानावर नेऊन ठेवतो. अश्या स्त्रिया नेहमीच कुचेष्टेचा विषय असतात. घर दुभंगले जाणे हे स्रीचे अपयश समजले जाते. बदललेल्या ह्या कालखंडात हे जुने मापदंड कालबाह्य झाले आहेत ह्याचा स्वीकार करणे आपल्याला इतके कठीण का जावे? प्रत्येकाचे आरंभबिन्दू वेगवेगळे असतात हे स्वीकारता आलेच पाहिजे. तसेच गणिताने मान्य केलेले मूलबिन्दूचे स्थानांतरणही (Shift of Origin) आपल्याला मान्य करता यायला हवे.

३०० मीटर धावणाऱ्या एखाद्या धावपटूचा अपघात झाला आणि यापुढे तो कधी धावू शकणार नाही असे कळले, तर बदललेल्या आरंभबिन्दूचा स्वीकार करणेच त्याच्यासाठी हिताचे ठरेल. तसे करणे जमले नाही तर पुढे येणाऱ्या प्रचंड निराशेपासून त्याने स्वतःला कसे वाचवावे? कुमारवयात शरीरात प्रचंड ऊर्जा असते, हालचालींमध्ये लवचिकता असते. त्या वयात कितीतरी अवघड कामे सहजतेने होतात. त्या वयातील क्षमतेचा तो आरंभबिन्दू असतो. पुढे वय वाढले की शारीरिक लवचिकता आणि अनुषंगाने क्षमता कमी होत जातात. मग वाढत्या वयाला दूषणे देण्यापेक्षा शारीरिक क्षमतेचा आपला आरंभबिन्दू घसरला नव्हे तर बदलला आहे हे समजणे शहाणपणाचे नाही ठरणार का? एखाद्या आजाराने ग्रासले, तर निराशेच्या गर्तेत जाण्यापेक्षा बदललेल्या स्थितीला नवा आरंभबिन्दू समजून पुढचा प्रवास आपण अधिक आनंददायी नाही का करू शकणार?

बालपण भयंकर गेले असल्याने आजवर त्या धक्क्यातून बाहेर न पडू शकलेली एक तरुणी माझ्याकडे आली. स्वतःला कसे सावरायचे, आयुष्याचा समतोल कसा साधायचा ते तिला कळत नव्हते. बालपण भयंकर जाणे, बालपणीच काही मानसिक आघात होणे हे अंतिम वाईटात, म्हणजे दोन ऋण (-,-) कडे जात असल्याने आधी (०,०) पर्यंत पोहोचायचे आणि नंतर दोन धन (+,+) कडे कूच करायची याचे तिच्यावर प्रचंड दडपण होते. हा प्रवास दुष्कर वाटत असल्याने ती अधूनमधून नैराश्याच्या जाळ्यात अडकत असे. या मानसिक ताणतणावांना सामोरे जाण्याचे धैर्य ती गोळा करू शकत नव्हती. मी फक्त तिला सामाजिक मापदंडांहून वेगळ्या असलेल्या तिच्या आरंभबिन्दूची जाणीव करून दिली. कोणाचेही बालपण नासू नये हे खरे आहे. पण जे झाले ते सर्वसाधारण सगळ्यांचे होत नाही म्हणून आपण ऋण (-,-) बाजूला आहोत असे समजून अधिकाधिक निराश होण्यापेक्षा काही दुर्दैवी परिस्थितींमुळे आता आपण एका वेगळ्या आरंभबिन्दूवर (०,०) आहोत ह्याचा स्वीकार केला तर पुढे जाणे सोपे नाही का होणार? जसे आपण शारीरिक वैगुण्यांविषयी बघितले, तसेच हे मानसिक आघातामुळे झालेल्या वेगळ्या आरंभबिन्दूविषयी आहे.

संस्कृतीतील पोकळपणा

आरंभबिन्दूचे हे गणित नीटसे न समजल्यामुळेच आपण गफलतीत राहतो आणि मग बालपण नासलेल्या एखाद्याचे किंवा अपघातामुळे धावण्यापासून वंचित झालेल्या धावपटूचे किंवा घर टिकवू शकल्या नाहीत म्हणून कुचेष्टेला पात्र ठरलेल्या स्त्रियांचे मनोधैर्य उंचावण्यात तोकडे पडतो.

‘आनंदी वैवाहिक जीवन’ हा विवाहसंस्थेचा समाजमान्य मापदंड असतो. पण काही कारणाने तसे जमले नाही आणि त्या व्यक्तिला घटस्फोट घ्यावा लागला तर हा त्याचा वेगळा आरंभबिन्दू का समजला जाऊ नये? त्याच्या ह्या वेगळ्या आरंभबिन्दूचा स्वीकार करण्याचे बळ समाजात, त्याच्या आप्तस्वकियांत नसेल तर त्या व्यक्तीत तरी ते कसे येणार? बलात्कार झालेल्या स्त्रिया शारीरिक आघाताबरोबरच प्रचंड मानसिक आघाताला बळी पडतात. समाजात पुन्हा एकदा प्रतिष्ठेने उभे राहण्याचे बळ त्यांना देण्याऐवजी आपण त्यांचे मनोबल अधिकाधिक खच्ची करतो. त्यांच्या ह्या वेगळ्या (०,०) चा स्वीकार करण्याचे बळ आपण त्यांना का नाही देऊ शकत? बदलत्या समाजव्यवस्थेत काही वेगळ्या लैंगिक गरजा असणाऱ्यांचा वेगळा आरंभबिन्दू आजही आपण निखळपणे का स्वीकारू शकलेलो नाही? अगदी कायद्याने त्यांना अधिकार व संरक्षण दिले असले तरीही? कुटुंबियांशी बंड करून घराबाहेर पडलेला प्रत्येक तरुण आतातायी नसतो. त्याला त्याचा आरंभबिन्दू कळलेला असतो. घरातील इतरांच्या अपेक्षांच्या मापदंडाशी त्याचा ताळमेळ बसत नाही एवढेच. थोडक्यात काय, तर प्रत्येकाच्या आरंभबिन्दूतील वैविध्य हाच सुदृढ समाजव्यवस्थेचा प्राण आहे. एखाद्या सचिन तेंडुलकरला अमाप लोकप्रियता मिळते. पण इतर १० खेळाडू जर सचिन तेंडुलकरच असते तर कदाचित आपण एकही मॅच जिंकू शकलो नसतो. वेगवेगळ्या क्षमता तसेच वेगवेगळे आरंभबिन्दू असणाऱ्या इतर १० खेळाडूंमुळे मॅच जिंकली जाते हे नजरेआड करून कसे चालेल?

संस्कृतीचा टेंभा मिरवणारे लोक आपापल्या संस्कृतीतील समाजमान्य मापदंडांनाच त्यांच्यासाठीचे अंतिम सत्य समजतात. त्यामुळे इतर संस्कृतीतील अनेक गोष्टी ते (-,-) श्रेणीत टाकतात. प्रत्येक संस्कृतीचा स्वत:चा एक आरंभबिन्दू असणार आणि तो इतरांहून वेगळा असणार याचा स्वीकार आपल्यात आणावा लागेल. तसेच बदलत्या काळानुसार प्रत्येक संस्कृतीला स्वतःचा आरंभबिन्दू बदलावा लागेल हेही ओघाने आलेच. अश्यावेळी आपण आपल्या आरंभबिन्दूला दृढ, अचल ठेवून कसे चालेल किंवा तेच अंतिम सत्य मानणे कितपत योग्य ठरेल? ह्यातून समाज पुढे जाऊच शकणार नाही.

एखादा माणूस अमुक एक पद्धतीने वागला तर सर्वमान्य व्याख्येनुसार त्याचे ते वागणे प्रमाण नसेलही कदाचित; पण म्हणून निदान ते त्याचे (-,-) ठरू नये. आपल्या कुटुंबियांकडे, सहकार्यांकडे, इतर परिचित-अपरिचितांकडे बघताना प्रत्येकाचा आरंभबिन्दू जर आपण समजू आणि स्वीकारू शकलो, तर एक निरोगी आणि सकारात्मक समाजव्यवस्था उभी होऊ शकेल. प्रत्येकाच्या वेगळ्या व कधी परिस्थितीनुसार बदललेल्या आरंभबिन्दूंचा स्वीकार आपल्याला अवघड जाणार नाही. एखाद्या व्यक्तीला एकदम देवत्व देण्याकडे किंवा दुसऱ्या एखादीला अतिशय तुच्छ मानण्याकडे आपला कल जाणार नाही. सदर व्यक्तिंनाही त्यामुळे श्रेष्ठत्वाचा अहंकार किंवा न्यूनतेचा गंड येणार नाही. कोणालाही सरसकट वाळीत टाकणे किंवा कोणाविषयी अनाठायी भक्ती बाळगणे दोन्हींपासून आपण सावध राहायला हवे आहे. आदर्श मानल्या जाणाऱ्या व्यक्तितील काही दोष आणि अतिशय नालायक समजल्या जाणाऱ्या व्यक्तिमधील काही गुणांचा सहज स्वीकार तेव्हाच शक्य होईल.

एखाद्या देशातील वा जातिधर्मातील रूढी, परंपरा, वागणूकीचे नियम, सामाजिक वर्तन हे इतरांहून निराळे असणारच. काही धर्मांमध्ये उजव्या हाताला अधिक महत्त्व तर काही धर्मांत डाव्याला. काहींना रोज आंघोळ करणे प्रमाण वाटते तर काहींना तसे वाटत नाही. काहींकडे शौचानंतर पाण्याने धुण्याला प्रमाण मानले जाते तर काहींकडे कागदाने पुसणे. काही देशांत कच्चे खाणे प्रमाण आहे, तर इतर काही देशांत शिजवून खाणे. मांसाहाराचे मापदंड तर मैला-मैलावर बदलतात. जाती-उपजातींमधील रीतिरिवाजांचे मापदंड नेहमीच वेगळे असतात. आदिवासी जातिसमूहांत पशू-पक्षी-प्राणी रोजच्या खाण्याची सामग्री आहे तर नागरी संस्कृतीत कित्येकांसाठी ते किळसवाणे असते. 

माझे मापदंडच योग्य आणि श्रेष्ठ असे मानण्याने हे सारे होते. जाती-जातींमधील घृणेमागे हे कारण आहे. धार्मिक दंगलींमागे प्राधान्याने हेच कारण असल्याचे दिसते. वंशभेद, वर्णभेद, आर्थिक दरी ह्या सगळ्यामागे प्रत्येक व्यक्तिसमूहाचे आरंभबिन्दू वेगळे असण्याबाबतचा आपला अस्वीकारच दिसून येतो.

शून्याचा आविष्कार करणाऱ्या देशातील लोकांना गणितातील (०,०) चे, आरंभबिन्दूचे हे मोल समजू नये ही खेदाची बाब आहे.

अभिप्राय 2

  • स्टार्टिंग पाँइंटसाठी ससा-कासवाच्या गोष्टीचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. याचप्रमाणे या कासवापासून शिकण्यासारखे अजूनही काही आहे म्हणून हा लेखन प्रपंच

    कासव व ससा यांची बरोबरी होऊ शकत नाही, तरीसुध्दा शर्यतीला होकार दिलेली चूक उमगून त्यावर मात करण्याचा प्रयत्न कासवाने केला. कासवाला सश्यासारखे पळता येणार नाही हे माहीत होते. परंतु न डगमगता, बेफिकिर न राहता, निरुत्साही न होता, सातत्याने आपले काम करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल याची खात्री कासवाला होती. स्वत:ला शर्यत जिंकायचे आहे व त्यासाठी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे याची पूर्ण जाणीव कासवाला होती. शर्यतीतील अडचणी समजून घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न कासव करत होता. वाटेत अडथळे होते, शर्यतीचा मार्ग चढ-उतारांचा होता, तरीसुध्दा आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करण्याची धडपड कासव करत होती. नाउमेद न होता साध्य गाठण्याच्या प्रयत्नात होती. शर्यत जिंकणे हे एकमेव लक्ष्य तिच्यापुढे होते. त्यासाठी तिने जिवाचे रान केले व शर्यत जिंकली. जिंकल्यानंतर नम्रतेने आपले यश स्वीकारले.

    आपल्यातील उणिवा समजून घेऊन त्यावर मात करते, आपल्या मर्यादा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करते, स्वत:च्या गरजा ओळखून त्या मिळवण्यासाठी पुढाकार घेते, स्वत:ला काय हवे काय नको व त्याची कारणं कोणती यांचा विचार करू शकते, पुढचे पाऊल ठेवताना कुठल्या अडचणी येऊ शकतात याचे संपूर्ण भान ठेऊन पाऊल उचलते, आपले साध्य काय व त्यासाठी काय करायला हवे याची जाण असते, यश मिळाल्यानंतरही फुगून न जाता स्मित हास्याने पारितोषक स्विकारू शकते असे हे या कथेतील कासव आहे.

    आपणही आपले आयुष्य जगताना कासवाच्या गतीनेच जात असतो. परंतु या गोष्टीतील कासवासारखी चिकाटी, लक्ष्य गाठण्यासाठी अडचणींवर मात करण्याची मानसिकता, सततचा प्रयत्न इत्यादी गुणविशेष विकसित केल्यास आयुष्याची विषम स्पर्धा जिंकणे कठिण वाटणार नाही.

    प्रभाकर नानावटू

  • आज पर्यंत आजचा सुधिरक मध्ये प्रकाशित झालेल्यालेखातील उत्कृष्ट लेख! प्रत्येक व्यक्तीत जसे दोष असतात, तसे गूणही असतात. पण लोक त्यांच्या दोषांवर बोट ठेवून त्याची हेटाळणी करतात. त्यामुळे तो निरुत्साही होऊन जीवनात अयशस्वी होतो. पण माणसाने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्यातील क्षमतांचा विचार करून प्रयत्न केले, तर तो नक्कीच आपले ध्येय गाठू शकतो. श्री समर्थ रामदास स्वामिंची “केल्याने होत आहेरे, आधी केलेच पाहिजे” ही शिकवण अंगी बाणली तर जगात काहीच अशक्य नाही. म्हणून माणसाने लोकांकडे लक्ष न देता आपल्यातील क्षमतांचा विचार करून प्रयत्न करणे आवश्यक असते; अशी शिकवण देणारा लेख.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.