विक्रम आणि वेताळ – भाग ८

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, गेल्या खेपेत तू सर्वसमावेशक सुखाची व्याख्या ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवेहवेसे, आनंददायक वाटते आणि जे त्याच्यासाठी कल्याणकारक, समाधानकारक असते ते सुख आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख’ अशी केलीस. तसेच व्यक्तिगत सुखाची व्याख्या; ‘प्रत्येक व्यक्तीने जो अग्रक्रम ‘स्वतः’ निवडून एखाद्या गोष्टीस प्राधान्य दिले असेल त्यात त्या व्यक्तीला सुख वाटत असते, अशी केली होतीस.

त्या व्याख्या करतांना सुखदुःख कसं तुलनात्मक असतं ह्याविषयी तू बोलला होतास. परन्तु अशी तुलना करण्यासाठी सुखदुःख मोजण्याचा मापदंड तू कसा तयार करशील असा प्रश्न मी तुला होमवर्क म्हणून दिला होता.”

“अरे पण गोष्टिवेल्हाळा, आग्यावेताळा, आज तू काही गोष्ट वगैरे न सांगता डायरेक्ट मुद्द्यावर, म्हणजे प्रश्नावर कसा रे आलास?”

“का येऊ नये? घाबरलास की काय राजन्? मागच्या खेपेत मी दिलेला होमवर्क केलेला नाहीस वाटतं तू?”

“तसं नाही रे, म्हणजे, प्रश्न विचारण्यापूर्वी गोष्ट वगैरे सांगण्याचं तुझं काम हल्ली पार सोडूनच दिलं आहेस तू.”

“अच्छा म्हणजे माझा अंदाज खरा निघाला तर, तुला अजून थोडा वेळ लागणार दिसतंय सुखदुःखाचा मापदांड बनवण्यास. पण हरकत नाही. तुझे गुरुजी कोड्याचं उत्तर येत नसेल तर तुला दुसरं जरा सोपं कोडं द्यायचे ना? तसंच तुला एक गोष्ट सांगून थोडे सोपे प्रश्न विचारतो.आधी त्यांचं उत्तर दे, मग बनव मापदंड!

ऐक तर मग . . .”

“कोणे एके काळची गोष्ट आहे. कोशी नदीच्या तीरावर एक गुरु आपल्या शिष्यासोबत राहत होते. दोघांचाही अधिकांश वेळ भजनकीर्तनात व्यतीत होत असे.

एके दिवशी हे दोघेही गुरुशिष्य देशाटन करण्यास निघाले. भ्रमंती करत करत ते एका अनोळखी देशात पोहोचले. तेथील एका बगिच्यात त्यांनी डेरा टाकला. शिष्य गंगाधरास एक आणा देऊन गुरुजींनी बाजारातून भाजी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य गंगाधर जेव्हा बाजारात पोहोचला तेव्हा तेथील प्रकार बघून तो खूपच अचंबित झाला. बाजारातील सगळ्याच वस्तू एक आणा शेर ह्या भावाने विकल्या जात होत्या.

गंगाधरने विचार केला की भाजी तर आपण रोजच खातो त्यापेक्षा तेवढ्याच पैशात मिठाई का न खा? शेरभर मिठाई विकत घेऊन आंनदाने आपल्या डेऱ्यावर परतल्यावर त्याने ही सगळी कहाणी गुरुजींना सांगितली.

इथल्या बाजारात सगळ्या वस्तू एकाच भावात मिळतात म्हटल्यावर गुरुजी ध्यानमग्न झाले आणि थोडा विचार करून गंगाधरास म्हणाले, “वत्सा, आपण हे नगर आणि हा देश लवकरात लवकर सोडून जावयास हवे. कारण ही अंधेर नगरी आहे आणि इथला राजा महामूर्ख आहे. इथे राहण्यात आपल्या जिवाला धोका आहे. आपल्याला येथे न्याय मिळणेही दुरापास्त होईल.”

परंतु गंगाधरला मात्र गुरुजींचे हे म्हणणे पटत नव्हते. एरवी इतर ठिकाणी महाग मिळणाऱ्या वस्तू किंवा मिठाया इथे स्वस्तात मिळत होत्या. त्यामुळे गंगाधरला आणखीन काही दिवस इथेच राहण्याची इच्छा होती.

गुरुजींना गंगाधरच्या वागण्याचे हसू आले. परंतु तरीही ते म्हणाले, “ठीक आहे राहा आणखीन काही दिवस आणि खाऊन घे मिठाया. पण जर का तुझ्यावर काही संकट आले तर माझे स्मरण कर.” असे म्हणून गुरुजींनी तेथून प्रस्थान ठेवले.

गंगाधर रोज सकाळी भिक्षा मागून मिळालेल्या रुपयादोनरुपयांतून स्वादिष्ट मिठाई विकत घेऊन खाऊ लागला. असेच काही महिने गेले. स्वादिष्ट मिठाई खाऊन खाऊन गंगाधर आता चांगला लठ्ठ धडधाकट झाला होता.

इकडे, एके दिवशी कलावती नावाच्या एका गरीब विधवेची बकरी चुकून पंडित दीनदयाळच्या शेतात चरायला गेली. दीनदयाळला ह्याचा फार राग आला. त्याने बकरीला काठीने बदडल्यामुळे ती बकरी मरण पावली. कलावतीने राजाकडे ह्याविषयी तक्रार गुदरली. राजाने निर्णय दिला, जिवाच्या बदल्यात जीव, दीनदयाळला फाशी द्या.

परंतु जल्लादाने बनवलेल्या फाशीच्या फंद्यात सडपातळ दीनदयाळची मान नीट अडकेना. जल्लादाने ही अडचण राजाला सांगितली.राजाने लगेच आदेश दिला की ज्या व्यक्तीची मान ह्या फाशीच्या फंद्यात नीट अडकेल अश्या व्यक्तीचा शोध घ्या आणि तिला फाशी द्या.

आता जल्लाद कोतवालाला घेऊन अश्या व्यक्तीच्या शोधात निघाला. शोधत शोधत ते सर्व गंगाधरच्या कुटीजवळ पोहोचले. कर्मधर्मसंयोगाने फाशीचा फंदा लठ्ठ गंगाधरच्या गळ्यात बरोबर फसला. त्यामुळे कोतवालाने गंगाधरला पकडून दरबारात हजर केले.

फासावर चढवण्यापूर्वी राजाने गंगाधरला त्याची शेवटची इच्छा विचारली. तेव्हा गंगाधरने त्याच्या गुरुजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानुसार गुरुजींना बोलावण्यात आले. गुरुजी पोथी घेऊन गंगाधरजवळ गेले. आणि पोथी वाचून गंगाधरास म्हणाले की आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. जो आजच्या दिवशी मरेल त्याच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडेल आणि तो स्वर्गसुखे भोगेल. तू माझा शिष्य आहेस आणि तरीही तू मला अजून गुरुदक्षिणा दिलेली नाहीस. त्यामुळे तू गुरुदक्षिणा म्हणून आज मला फासावर चढू दे. गंगाधरला गुरुजींचा छुपा संकेत लक्षात आला. तो गुरुजींना म्हणाला की इतर कोणतीही गुरुदक्षिणा तुम्हीं मागा पण मला स्वर्गात जाण्यापासून वंचित करू नका, फासावर मलाच चढू द्या.

गुरुशिष्यांमध्ये फासावर चढण्यासाठी लागलेली अहमहमिका बघून राजाने दोघांना जवळ बोलावून त्याचे कारण विचारले.

गुरुजींनी राजाला त्यामागचे कारण सांगितल्यावर राजालाही स्वर्गसुखांचा लोभ अनावर झाला आणि गुरुशिष्यांना बाजूला सारून स्वतः राजाच फासावर चढला. अश्या तऱ्हेने अंधेरनगरीच्या त्या चौपटराजाचा अंत झाला.

त्यांनतर गुरुजी गंगाधरास जवळ बोलावून म्हणाले, “वत्सा, आता ह्या नगरीचा मूर्ख राजा मरण पावला असल्यामुळे तू त्याच्या जागी बसून राजशकट हाक. मी मंत्री बनून राज्यकारभार सांभाळण्यात तुला मदत करेन.

आता सर्वप्रथम नगरीत दवंडी पिटव की इतःपर येथे कुणाला ‘टका सेर भाजी आणि टका सेर खाजा’ मिळायचे नाही. प्रत्येक वस्तूचे येथे उचित मूल्यांकन होईल आणि योग्य भाव मिळेल. तसेच कोणाही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, प्रत्येक व्यक्तीला येथे न्याय मिळेल.”

राजन्, मला सांग की वस्तूंचे उचित किंवा योग्य मूल्यांकन गुरुजी किंवा राजा गंगाधर कसे करणार? वस्तूंच्या ठिकाणी असे काही स्वतोमूल्य असते काय ज्याचे मोजमाप करून त्या आधाराने त्यांची किंमत ठरवता येईल?

आणि हो, माझ्या ह्या प्रश्नांचे तू समाधानकारक उत्तर दिले नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे . . . “

“काय परिणाम होईल म्हणतोस?”

“काही नाही, जाऊ दे. तू म्हटलंस म्हणून मी गोष्ट सांगितली ना? आता मी विचारतो म्हणून तू उत्तरं दे.”

“OK, OK , देईन, पण आधी एक सांगू का? तुझ्या गोष्टीतला गंगाधर फारच बावळट असला पाहिजे!”

“असं का म्हणतोस?”

“अरे, महिनोंमहिने, बेटा नुसतीच मिठाई विकत घेऊन खात राहिला!”

“मग त्याने काय करायला हवं होतं म्हणतोस? काही दिवस भाजीही घेऊन खायला हवी होती?”

“नाही रे, सगळ्याच वस्तू टका शेर मिळत होत्या तर असतील नसतील त्या पैशातून टका शेर दराने सोन्याचे दागिने विकत घेऊन निघून नाही का जायचं! पण असो. काही झालं तरी शेवटी एक गोष्टच ती.

आता तुझ्या प्रश्नाकडे वळू, वस्तूंचा उचित दर ठरवण्यासाठी त्यांना काही स्वतोमूल्य असतं का? तर माझ्या मते तरी ह्या जगात स्वतोमूल्यवान अशी केवळ एकच गोष्ट आहे!”

“कोणती गोष्ट राजन्?”

“अरे आपला जीव आणि काय! बाकी सगळ्या गोष्टींचं मूल्य त्याच्या अनुषंगानी ठरतं.”

“म्हणजे रे काय?”

“म्हणजे स्वतःचा जीव टिकवण्यासाठी, त्याचं भरणपोषण करण्यासाठी, जीव अमर नसल्यामुळे त्यातून आणखीन जीव निर्मिण्यासाठी आणि जोपर्यंत जिवातजीव आहे तोपर्यंत त्या जिवाची मुंबई करण्यासाठी/सुखप्राप्तीसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल, त्यानुसार आपण त्या त्या गोष्टींचे मूल्यांकन करत असतो आणि आपल्याला परवडतील त्या वस्तू आणि सेवा आपण मिळवून/विकत घेऊन त्यांच्या उपभोगातून सुख प्राप्ती करत असतो. वस्तू जितकी जास्त सुखदायक तितकी ती आपल्याला जास्त हवीहवीशी वाटते आणि त्याप्रमाणात आपण तिची जास्त किंमत चुकवायला तयार असतो. अश्या तऱ्हेने बहुसंख्य ग्राहक ज्या किमतीस एखादी वस्तू घ्यायला तयार होतात आणि अर्थातच विक्रेते त्या किमतीस विकण्यास तयार होतात तो भाव म्हणजे बाजार भाव. तर बाजार भाव ही काही राजाने ठरवण्याची गोष्ट अजिबातच नाही.”

Photo by Наталия Котович from Pexels
Photo by Наталия Котович from Pexels

“राजन्, अरे, एकदम इतका भावूक, I mean Sentimental नको होऊस. बाजार भाव म्हणजे market sentiment, तो तर कमीजास्त होणारच हे कळतं मला.”

“तर वेताळा, मुद्दा असा की पैसा हे विनिमयाचं साधन आहे व त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे तो एक मापदंड आहे, आपल्या अंतरंगातला भाव मोजण्याची ती एक मोजपट्टी आहे. कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व देतो ह्याची. किंवा असं म्हणू की कोणती सुखदायक वस्तू किंवा सेवा आपल्याला किती हवीहवीशी किंवा ‘प्रिय’ वाटते ते ठरवण्याची, आपल्याला ती घेणं परवडतं की नाही ते ठरवण्याची…”

“ओहो म्हणजे ‘dearness’ ची मोजपट्टी म्हण ना सोप्या शब्दात.”

“हो, बरोबर. कशी गंमत असते बघ. आपल्याला काय परवडतं आणि काय नाही ह्याचा, तसेच कमीतकमी देऊन जास्तीतजास्त पदरात कसं पाडून घेता येईल ह्याचा आपल्या मनांत सतत विचार किंवा हिशेबच चालला असतो.”

“खरंय राजन्, आवळा देऊन कोहळा कसा काढता येईल ह्याचा आपण जसा सतत विचार करतो तसंच इतरांना काय परवडतं किंवा काय परवडायला हवं ह्याचाही विचार करत असतो. विक्रेते आपल्या मालाची किंवा सेवेची जाहिरात करून ती किती जास्त सुखकारक आहे हे ग्राहकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून तिच्या उपभोगातून तिच्या किंमतीच्या मोबदल्यापेक्षा जास्त सुख मिळवता येईल असा ग्राहकांचा समज व्हावा.”

“हो, म्हणजे वस्तू आणि सेवा किती सुखकारक आहेत हे आपल्याला अश्याप्रकारे शिकवलं जातं असंच म्हण ना. आणखीन एक गंमत असते बघ. आपण सगळे त्या सुखकारक वस्तू आणि सेवांच्या प्रत्यक्ष उपभोगातून सुख मिळवण्यापेक्षाही त्यांचा संचय करण्याचाच जास्त प्रयत्न करतो, भविष्यात आपल्याला त्यांचा उपभोग घेता यावा म्हणून…… कारण सुखाचा साठा करता येत नाही, मात्र सुखदायक वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी पैशाचा संचय आपण करू शकतो. भविष्यातील अनिश्चिततेच्या भीतीमुळे प्रत्यक्ष उपभोगातून मिळणाऱ्या सुखापेक्षाही मग संचयातून मिळणाऱ्या सुरक्षिततेत आपल्याला जास्त सुख वाटते.”

“ते खरंय राजन्, पण थांब, तू काहीतरी cheating करतो आहेस!”

“का रे, काय झालं?”

“अरे मी तुला सुखदुःखाची मोजपट्टी तयार करण्याबद्दल बोललो आणि तू मात्र सुखकारक वस्तू आणि सेवांच्या हव्यासासाठी ही पैशाची मोजपट्टी आधीच उपलब्ध आहे असं सांगून मोकळा होतो आहेस.”

“नाही रे बाबा, पूर्ण ऐकून घे आधी. मी दिलेलं उत्तर तुझ्या त्या गोष्टीमध्ये विचारलेल्या, ‘वस्तूंचे उचित मूल्य कसे ठरवणार’? ह्या प्रश्नाला होतं.

“आता, तू म्हटल्याप्रमाणे सुखदुःख हे सुखकारक वस्तू आणि सेवांपेक्षा वेगळं असतं हे तर मान्यच आहे. अगदी गरीब माणूस जरी असला तरीही तो अत्यंत दुःखी असेलच असं नाही आणि अगदी श्रीमंत माणूस सर्वांपेक्षा सुखी असेल असंही नाही. आणि तुलना करण्यासाठी ती मोजपट्टी वर्णनात्मक, म्हणजे तुकाराम महाराजांसारखं, ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’, अशी असून भागणार नाही हेही मान्य.तुलना नेमक्या संख्यांनीच करावी लागणार.”

“म्हणजे? मला शंभर सुख झालं किंवा एक लाख दुःख झालं असं?”

“ऐकशील का बाबा थोडं? आपण व्याख्या केली ना सुखदुःखाची? त्यातील सर्वसमावेशक सुखाचे वेगवेगळे घटक मोजू शकेल आणि प्रत्येक व्यक्तीस पटेल अशी मोजपट्टी असायला हवी, कारण वैयक्तिक सुखाच्या व्याख्येनुसार त्यातील कोणत्याही घटकाला प्राधान्य किंवा अग्रक्रम देण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.”

“बरोबर आहे राजन्.”

“तर, आपल्या पाच ज्ञानेंद्रियांतून होणाऱ्या जाणिवेची किंवा येणाऱ्या अनुभवाची वर्गवारी आपली बुद्धी सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ किंवा उदासीन ह्यांत करते. सकारात्मक अनुभवातून येणारी आनंदाची भावना हवीशी वाटते आणि तो अनुभव पुनःपुन्हा घेण्याची इच्छा होते, ह्याउलट नकारात्मक अनुभवातील वेदना, त्यातून निर्माण होणारी दुःख किंवा भीतीची भावना आपल्याला नकोशी वाटते. त्यामुळे ते अनुभव टाळण्याची आपली इच्छा असते.

आता हे हवेहवेसेपण एखादया गोष्टीतून किती आनंद मिळतो त्यावर अवलंबून असतं, आणि आनंद मोजण्याची… अगदी वस्तुनिष्ठ आणि आकड्यात मोजता येईल अशी जर मोजपट्टी हवी असेल तर मग आपल्याला जीवरसायनशास्त्राकडे वळावं लागेल.”

“अरे बापरे, आता हे काय नवीनच?”

“अरे आपल्याला आनंद होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ती द्रव्ये स्रवतात ना? किंवा जी स्रवल्यामुळे आपल्याला आनंद होतो ती, डोपामाईन,सेरेटोनीन, ऑक्झिटोसीन आणि एंडॉर्फिन वगैरे, ती किती स्रवली ह्यावरून किती आनंद झाला ते मोजता येऊ शकेल. अर्थात अजून ते अचूक मोजणं शक्य नसलं तरी भविष्यात आपण कदाचित तापमापकासारखा (thermometer) आनंदमापकही बनवू शकू. पण असो.

आपल्या सुखदुःखाच्या व्याख्येतला आणखीन एक महत्त्वाचा घटक ‘कल्याणाची शाश्वती’ हा आहे. आपल्याला वस्तू आणि सेवांच्या उपभोगातून तहहयात आनंद घेता येत राहावा ह्यासाठी पैशाचा संचय करून आपली ऐपत वाढवत राहण्याचा आपला प्रयत्न सुरू असतो.त्यासाठी पैसे कमावण्याच्या संधी आणि कमावलेल्या पैशाचा विनियोग करून उपभोग घेता येण्यासाठी स्वातंत्र्य, न्याय, स्थैर्य आणि सुरक्षेची शाश्वती देणारी व्यवस्थाही आवश्यक असते. न्याय मिळण्याची शाश्वती नसल्यामुळेच तर आपल्या गोष्टीतील गुरुजींनी अंधेरनगरीतून काढता पाय घेतला.”

“होय राजन्, वस्तू आणि सेवा किती हव्याहव्याश्या वाटतात हे मोजण्यासाठी तर तू पैशाची मोजपट्टी सांगितलीस; परंतु पैसे कमावण्याच्या संधी आणि त्याच्या उपभोगासाठी स्वातंत्र्य, न्याय, स्थैर्य आणि सुरक्षेची हमी देणाऱ्या व्यवस्थांतून मिळणाऱ्या कल्याणाच्या शाश्वतीचे मोजमाप आपण कसे करणार?”

“स्थलांतरावरून!”

“म्हणजे?”

“हे बघ, पाणी जसं उताराकडे वाहतं तसं लोक कमी सुखाकडून जास्त सुखाकडे आकर्षित होतात. त्यामुळे जिथली व्यवस्था जास्त सुखकारक किंवा कल्याणकारक वाटेल तिकडे स्थलांतराचा ओघ वाहतो. खेड्यांकडून शहराकडे किती लोक स्थलांतर करतात आणि शहराकडून खेड्याकडे किती लोक जातात, बिहार उत्तरप्रदेशातून महाराष्ट्रात किती येतात आणि महाराष्ट्रातून तिकडे किती जातात, किती भारतीय अमेरिकेचं नागरिकत्व घेऊ इच्छितात आणि किती अमेरिकी लोक भारताचं नागरिकत्व घेऊ इच्छितात, ह्याचं जर प्रमाण काढलं तर लोकांना कुठली व्यवस्था किती प्रमाणात जास्त सुखकारक किंवा कल्याणकारक वाटते ह्याचं प्रमाण आपल्याला कळू शकेल.”

“परंतु ‘प्रमाण’ हा तुझा शब्द चुकतोय राजन्… त्यापेक्षा तुलना करण्यासाठी ‘प्रतवारी’ हा शब्द जास्त योग्य होईल.”

“हो, बरोबर आहे. कल्याणाची/स्थैर्याची हमी देणाऱ्या राजकीय, सामाजिक, न्याय आणि सुरक्षा ह्या व्यवस्था वास्तवात किती सुखकारक आहेत ह्याची प्रतवारी ठरवण्यासाठी/जोखण्यासाठी, आपण आणखी काही निकष सर्वानुमते ठरवू शकतो.

उदाहरणार्थ, बेरोजगारीचे प्रमाण, दरडोई उत्पन्न, बालमृत्यू, कुपोषणाचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण, शिक्षण आणि आरोग्यासाठी उपलब्ध सोयी सुविधा इ.”

“OK राजन्, हवेहवेसेपण, आनंद आणि कल्याण ह्यांचं तर समजलं पण समाधान? ते कसं मोजणार?”

समाधानाचं असं आहे की ते कृतींतून, कर्मातून, कर्तृत्वातून, कर्तव्याच्या निर्वाहातून, कृतार्थतेतून, सार्थकतेतून मिळतं. आपण आपल्या कृती ज्या उद्देशाने करतो तो उद्देश किंवा अर्थ जितपत साध्य झाला असं आपल्याला वाटेल तितपत समाधान आपल्याला मिळतं.… तसंच शंकानिरसन झाल्याने किंवा आपल्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर, पूर्ण किंवा आंशिक, ज्या प्रमाणात पटलं असेल त्या टक्केवारीत आपल्याला समाधान मिळतं…. आणि हो, समाधान ‘मानण्यात’ही असतं. म्हणजे ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान!’ असं.”

“पण राजन्, माझं मात्र केवळ आंशिकच समाधान झालं आहे, संपूर्ण नाही.

लक्षात असूं दे, तुझ्या उत्तरांनी माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आपले दुःख निवारण करण्याचा व भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग तू शोधून काढल्याशिवाय मी काही तुझा पिच्छा सोडणार नाही. हां!

वेताळ आहे म्हंटलं मी… वेताळ!!

गोष्टिवेल्हाळ…..आग्यावेताळ…..!!!”

असे म्हणून वेताळ निघाला आणि झाडावर जाऊन उलटा लोंबकळू लागला.

क्रमशः

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.