चेहऱ्यामागची रेश्मा

पुस्तक: चेहऱ्यामागची रेषा
मूळ लेखिका: रेश्मा कुरेशी
अनुवादक: निर्मिती कोलते

प्रकाशक: मेहता पब्लिशिंग

अगदी अलिकडेच वाचनालयातून पुस्तक वाचण्यासाठी समोर असलेल्या पुस्तकांवर नजर फिरवत होते आणि ‘चेहऱ्यामागाची रेश्मा’ या पुस्तकावर नजर खिळली. रेश्मा कुरेशी नाव ओळखीचे. कारण ॲसिड हल्ला झाल्याने अनेकदा बातम्यांमधून, टीव्हीवरून समोर आलेले. असे असूनही वाचण्यासाठी घ्यावे की न घ्यावे पुस्तक? यातील हल्ला झालेल्या रेश्माची दाहकता आपल्याला झेपेल का पुस्तक वाचताना? असा विचार आला. 

परंतु लगेचच दुसरा विचार मनात आला. ॲसिडमुळे हल्ला झालेल्या मुलीचे निव्वळ फोटो पाहून आपण पुस्तक घ्यावे की न घ्यावे या द्वंद्वात आहोत. पण ही अगदी काही वर्षांपूर्वीच घडलेली सत्यघटना! ज्या रेश्माने हे भयाण वास्तव अनुभवले आहे, तिने नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येऊन आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे आणि स्वतः लिहून पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणले आहे ते वाचून पाहू; समजून घेऊ या उद्देशाने ते पुस्तक मी घेऊन आले.

आपण किती स्व-कोशात जगत असतो! एखादी वास्तव घटना वाचतानादेखील मन कावरेबावरे होते, चरकते. मानवी स्वभाव वास्तवतेपासून किती दूर पळू पहात असतो! निव्वळ पुस्तक वाचावे की न वाचावे यासाठी? पण जेव्हा ते पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण केले, तेव्हा मात्र हे पुस्तक माझ्या वाचनात आले यासाठी मी माझेच वारंवार आभार मानले. कारण हे पुस्तक म्हणजे कित्येकजणांचे आधारस्थान आहे, प्रेरणा आहे, जीवनात येणाऱ्या अडचणींच्या काळात, भले त्या अडचणी आपल्या चुकीमुळे निर्माण झालेल्या नसतात, पण आपल्या नशीबी का ही संकटे यावीत? याचा टाहो फोडून अनेक जण आपले जीवनच संपवतात. अशांसाठी रेश्माची कथा म्हणजे जीवन कसे जगायला हवे हा वस्तुपाठ आहे.

रेश्मा कुरेशी यांनी सहलेखिका तानिया सिंगसोबत लिहिलेल्या ‘Being Reshma’ या पुस्तकाचा ‘निर्मिती कोलते’ यांनी केलेला हा अनुवाद आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे असे वाटले, म्हणून हा लेखप्रपंच. मी माझ्यावरून तर्क लावतेय, अर्थात हा चुकीचा असू शकतो. पण मुळात इंग्रजी वाचन करणारे कमी, त्यात स्त्रिया अन्य व्यवधानात वाचनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा अनुवाद करणाऱ्या निर्मितीताईंचेही मी आभार मानते. कारण अनुवादामुळे ही घटना माझ्या वाचनात आली.

अगदी ओघवत्या शैलीत आपली जीवनकहाणी सांगणारी ही कथा तमाम स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. जात-धर्माच्या पलीकडे स्त्रीला माणूस म्हणून पाहणेच जिथे नसेल तिथे तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव तिलाच होत नाही. ही आजची शोकांतिका आहे. आपली वेदना, आपले दुःख ही प्रदर्शनीय घटना नाही, हे जरी खरे असले तरी अन्यायाविरुद्ध दाद तर मागितली गेली पाहिजे. संधी समोर असते ती स्वीकारता आली पाहिजे. हे कित्येकदा समजूनच येत नाही. ती जिद्द, तो विश्वास समजून घ्यायला हे पुस्तक नक्कीच मदत करेल. या घटनेत चेहरा विद्रुप झालेली मुलगी अतिशय आत्मविश्वासपूर्वक रॅम्पवर मॉडेल म्हणून जाते. आपले वेगळे अस्तित्व निर्माण करते. पुढे जाऊन हीच मुलगी इच्छाशक्तीच्या जोरावर राजरोस होणाऱ्या ॲसिडविक्री विरोधात बंड पुकारते. हे सर्व वाचताना आपण ठरवले तर काय काय होऊ शकते याची प्रचिती येते. 

सगळ्यात आवश्यक पण सर्वात दुर्लक्षित अशा भ्रष्ट झालेल्या व्यवस्था म्हणजेच डॉक्टर आणि पोलीस! या प्रसंगामुळे रेश्माला खूप जवळून या दोन्ही व्यवस्थांचा परिचय होतो. कुठलेही हॉस्पिटल प्रथम पोलिसात तक्रार केल्याशिवाय तिला ॲडमिट करून घ्यायला तयार होत नसते. पोलिसस्टेशनमध्ये जावे तर तिची तक्रार लिहून घेताना होणारी टंगळमंगळ, त्याची चेष्टा यातून वाचकही या व्यवस्थेपुढे हतबल होतो. खरेतर अशा गंभीर केसेसमध्ये तक्रार नंतर केली तरी चालते. आधी प्राधान्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होता येते. पण कायद्याविषयक, नियमांविषयक अज्ञानामुळे बऱ्याचदा पेशन्टला नाहक अशा त्रासाला सामोरे जावे लागते. हा अनुभव रेश्मा आणि तिच्या कुटुंबियांनादेखील आला आहे. घडलेल्या प्रसंगात रेश्माचा संताप कसा रास्त आहे हे लक्षात येते. डॉक्टर म्हणजे जणू काही संवेदनशीलतेचा, माणुसकीचा अभाव याची जाणीव रेश्माला पदोपदी येते. आपला पेशन्ट म्हणजे काही भावना नसलेले खेळणेच! अशा आगीतून फोफाट्यात जाणाऱ्या बऱ्याच पेशंट्सना अक्षरशः वेदनादायी, महागडे उपचार नको, मृत्यू येईल तर बरा असे वाटत असते. अशा अनुभवांमुळे रेश्माही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. पण तिचे कुटुंबीय तिला कायमच आधार देतात. सजग राहतात. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेतात. 

वैद्यकीय सुविधांची वानवा, उपचारातील हलगर्जीपणा यामुळे रेश्माच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शिवाय समाजातून मिळणारे टोमणे निराळेच! चेहऱ्यावर ॲसिड फेकलेले असल्याने डोळ्यांनाही इजा झालेली. अश्यावेळी जरी डोळे बंद असले तरी रेश्माचे कान शाबूत होते. जेव्हा चक्क डॉक्टरच रेश्माच्या चारित्र्यावर संशय घेतात किंवा आजूबाजूच्या नर्सेस अशा अर्थाची कुजबूज करतात, तेव्हा रेश्माचे मन उद्विग्न होते. तेव्हा तिच्या मनातील विचार आपल्याला डोळस बनवतात. आपण सहजपणे कुणाबद्दलही नकळतपणे मत तयार करत असतो. पण जोपर्यंत आपल्यावर ती वेळ येत नाही तोवर आपण चक्क कानाडोळा करत असतो. समोरील व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन विचार करण्याची क्षमता (Empathy) आपण वाढवली पाहिजे. जग सुंदर आहे. आपली दृष्टी सुंदर बनवली पाहिजे. चेहऱ्यामागील वास्तव आपल्या नजरेत सहज नाही येत, कारण प्रत्येकजण आपली प्रतिमा वेगळी उभी करत असतो किंवा परिस्थिती तशी निर्माण झालेली असते. पण अश्यावेळी तर्क लावून ग्रह करत राहण्याऐवजी समोरच्याचे दुःख समजून घेतले तर व्यक्तीला समजून घेता येते. सुटून गेलेला बाण आणि जिव्हारी लागणारे शब्द मागे घेता येत नाहीत. उलट असे काही झाले तर ती सल मनात खदखदत राहते. पण समोर पर्याय नसतात. नात्यात दुरावा येतो. रेश्माच्या कुटुंबाने रेश्माला जीवापाड जपले. पण असे कुटुंब प्रत्येकाला मिळेलच असे नाही. त्यामुळे जशा आपल्याला भावना आहेत तशाच समोरच्या व्यक्तीलाही असतात आणि त्या जपल्या पाहिजेत. अर्थात या प्रवासात माणुसकीचे दर्शन देणारीही माणसे भेटतात. त्यामुळे वाळवंटातील ओयासिसचा अनुभव रेश्माच्या कुटुंबियांना येतो.

जी रेश्मा मुंबईच्या झोपडपट्टीत जन्माला आली, तिच्या विश्वात मश्गुल असणारी, आपल्या आईबाबांसोबत आणि भावंडांसोबत मनमौजी आयुष्य जगणारी, कोणाच्या अध्यात-मध्यात नसणारी १७ वर्षाची रेश्मा १९ मे २०१४ रोजी परीक्षा द्यायला बाहेर पडते काय आणि क्षणात झालेल्या ॲसिड हल्याने होत्याचे नव्हते होते काय! तिचे आयुष्यच जणू काही काळासाठी थांबल्यासारखे झाले. अशा कठीण प्रसंगात नेमकेपणाने काय करायला हवे, काय टाळायला हवे याचाही संदर्भ पुस्तकात आला आहे. कारण ॲसिड म्हणजे काय हे रेश्माच काय, तिच्या घरातील कोणालाही घटना घडेपर्यंत माहिती नव्हते. त्यामुळे ॲसिड पडलेल्या जळत जाणाऱ्या त्वचेवर काय करायला नको तेच त्या त्या वेळेला घडत गेले. तो होणारा त्रास, त्यातून ‘आपणच का?’ या सतत येणाऱ्या विचारातून आपल्या कुटुंबाबरोबर रेश्माने घातलेले वाद, प्रसंगी जिव्हारी लागेल असे बोलणे हे वाचताना सर्व कथानक चित्ररूपाने आपल्या डोळ्यांसमोर येते. इतके आपण रेश्माच्या जीवनाशी एकरूप होतो. तरीही तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी, तिला नैराश्याच्या खाईतून बाहेर पडण्यासाठी धडाडीने केलेला संघर्ष, पैशापेक्षा आपलं माणूस जगण्यासाठी केलेली धडपड, ही निराश मनाला उमेद आणणारी एक सत्य कहाणी आहे.

‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ या संस्थेच्या माध्यमातून रिया शर्मा रेश्माच्या आयुष्यात आली आणि रेश्माची जगण्याची उमेद वाढली. ही संस्था ॲसिड हल्यातील मुलींचे पुनर्वसन करते. त्यांना जगण्याच्या आशेसोबत मनोबल वाढण्यासाठी साहाय्य करते. आर्थिक मदतीबरोबरच शैक्षणिक आधार, तसेच आर्थिक स्थिरता येण्यासाठी स्वावलंबी बनविते. 

लिपस्टिकच्या किंवा कॉस्मेटिकच्या सामानापेक्षाही अत्यल्प किमतीत ॲसिड सहज उपलब्ध होते. या खुल्या विक्रीवर बंदी यावी यासाठी ही संस्था, रेश्मा आणि इतर सहकारी संस्था सरकार आणि प्रशासनासोबत पाठपुरावा करत राहिले. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. आणि सरकारने खुल्या ॲसिड विक्रीवर निर्बन्ध जाहीर केले. ॲसिड हल्ल्याने शरीर ओबडधोबड झाले तरी अंतर्मनातील विचारांची सुस्पष्टता अनेकींचे आयुष्य सुसह्य करणार आहे या विचाराने, ध्येयाने प्रेरित होऊन केलेले काम सुदृढ निरोगी माणसाला डोळस दृष्टी देणारे आहे. जीवनावर का आणि कसे प्रेम करावे याचे हे प्रतीक आहे. 

रेश्माचे या पुस्तकातील शेवटचे बोल हे डोळ्यात अंजन घालणारे आहेत. “आपल्यासमोर येणारी संकटे ही आपल्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी मोठी असतात. आपण मात्र आपल्या हातात जे जे असेल ते करत राहावं. असं करता करता आपल्या हातून अशक्य वाटणारे काहीतरी घडून जाते. छोटे छोटे बदल करतच मोठे काहीतरी मिळवता येते.”

असे सार सांगणारी ही सत्यकथा म्हणजे सामान्य मुलीची असामान्य कथा आहे.

संपादक, साप्ताहिक किरात
९२/२, खर्डेकर पथ, वेंगुर्ला
ता.वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग ४१६५१६
९६८९९०२३६७/९४०३३६४७६४

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.