पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नीक-एकपतिक पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बरेचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.

यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक? अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. कारण ज्या भावनांच्या, कृतींच्या संदर्भात हे प्रश्न पडतात, त्यांच्यात आपल्या मन:स्थितीवर दूरगामी परिणाम करण्याची ताकद असते. आपल्या सामाजिक स्थानावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रेमभावना ही स्त्री-पुरुष संबंधांमधील निर्णायक भावना आहे. ही भावना प्रवाही असते, आणि प्रबळही. प्रेम म्हणजे नक्की काय, यावर अनेक अंगांनी बोललं जातं. ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या पुस्तकातील बर्ट्रांड रसेलचं एक विधान उद्धृत करायचा मोह आवरत नाही – Love is something far more than desire for sexual intercourse; it is the principal means of escape from the loneliness which afflicts most men and women throughout the greater part of their lives. जीवशास्त्रीय अभ्यास मानवी भावनांना अस्तित्वाच्या लढाईशी आणि प्रजोत्पादनाशी जोडतो. आणि ते बरोबरही आहे. आपल्या विचार-वर्तणुकीचा पाया जसा सामाजिक संस्कारांमध्ये आहे, तसाच तो आपल्या जैविक संरचनेतही आहे. ही बाब लक्षात न घेता त्या विचार-वर्तणुकीमुळे आनंदी/ दु:खी होत अपराधी वाटून घेणं हे हानिकारकच आहे. पण मुद्दा भावनांच्या तीव्रतेचा आहे. विशेषत: प्रेमाच्या बाबतीत पाहिलं तर प्रेम, आकर्षण जर प्रजोत्पादनापुरतं मर्यादित असतं तर त्याची तीव्रता लैंगिक इच्छेच्या मर्यादेत राहिली असती. पण प्रेमाची तीव्रता वाढते. प्रेम माणसाला व्यापून टाकू शकतं. माणूस जसा स्थिरावत गेला तसं प्रेमही स्थिरावत गेलं आहे. हे कशामुळे झालं? इथे एक थोडी विचित्र, पण सयुक्तिक तुलना करावीशी वाटते. ‘बलात्कार हे सिव्हिलायझेशनचं अपत्य आहे’ असं म्हणतात. त्याच न्यायाने तीव्र प्रेम, भावनिक गुंतवणूक, मनाचा हळवेपणा- एकूणातच विविध प्रकारचे भावनिक आवेग हीदेखील सिव्हिलायझेशनचीच अपत्ये म्हणता येतील. इथे दोन प्रश्न उपस्थित होतात: ही अपत्ये जन्माला घालावीत का? आणि जन्माला आली, तर त्यांच्या संगोपनाचा योग्य मार्ग कुठला?

लग्नव्यवस्थेने प्रेमभावनेच्या बाबतीत हा प्रश्न सोडवण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुष संबंधांचं नियमन करणारी व्यवस्था म्हणून लग्नव्यवस्था गेली अनेक शतके प्रचलित आहे. या व्यवस्थेला नैतिक अधिष्ठान आहे. लग्नसंस्थेविषयी साधकबाधक चर्चा सतत सुरू असली तरी अजूनही लग्नसंस्थेचं स्थान पक्कं आहे. लग्नाचं काहीसं लोकशाहीसारखं आहे. लोकशाहीत दोष आहेत, पण प्राप्त परिस्थितीत सर्वांना सामावून घेईल असा याहून चांगला पर्याय दिसत नाही. राज्यव्यवस्था लोकशाहीपाशी येऊन स्थिरावली आहे. आता या व्यवस्थेत सुधारणा होऊ शकतील, पण फार मूलभूत बदल होऊ शकत नाहीत, असं म्हटलं जातं. मात्र, लग्नव्यवस्थेच्या प्रचलित पद्धतीचा जो गाभा- एकपत्नीकत्व/ एकपतिकत्व- त्यात बदल होऊ पाहत आहे. त्याची व्याप्ती कमी आहे; पण बदल होत आहेत. खरं तर बहुपत्नीकत्व (पॉलीजिनी) वा बहुपतिकत्व (पॉलीअँड्री) या पद्धती आधी अस्तित्वात होत्याच. काही समाजांमध्ये त्या आजही आहेत. परंतु एकपत्नीकत्व/ एकपतिकत्व (मोनोगॅमी) याला बहुतांश समाजांमध्ये एक घट्ट अशी सांस्कृतिक-नैतिक बैठक मिळाल्याने इतर पद्धतींकडे काहीशा नकारात्मकतेनेच पाहिलं जातं.

लिव्ह-इन रिलेशन, ओपन मॅरेज (लग्न झालेल्या जोडप्याकडून एकमेकांच्या लग्नबाह्य लैंगिक संबंधांना मान्यता) अश्या व्यवस्था आज अस्तित्वात येताना दिसतात. अश्यासारखीच एक व्यवस्था म्हणजे ‘पॉलीअ‍ॅमरी’! ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत (२००६) पॉलीअ‍ॅमरीची व्याख्या अशी केली आहे.. The fact of having simultaneous close romantic relationships with two or more other individuals, viewed as an alternative to monogamy, esp. in regard to matters of sexual fidelity; the custom or practice of engaging in multiple romantic relationships with the knowledge and consent of all partners concerned. आज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या नैसर्गिक उर्मींना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहुविध नात्यांची व्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअ‍ॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो. ‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहून जास्त). तर ‘अ‍ॅमोर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’! या व्यवस्थेची पहिली अट अशी आहे की, संबंधित व्यक्तींपैकी प्रत्येकाला प्रत्येकाच्या इतरांशी असलेल्या प्रेमाच्या नात्याच्या स्वरूपाविषयी पूर्ण कल्पना असेल. मोनोगॅमीमध्ये स्त्री-पुरुषांनी स्वत:च्या नवरा-बायकोकडूनच प्रेम व शारीरिक सुख घेणं अभिप्रेत आहे. ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना माणसातल्या बहुविध ऊर्मींना बहुविध व्यक्तींमार्फत नियमित करण्याचा प्रयत्न करते. त्याअर्थी या व्यवस्थेला एकच एक साचेबद्ध चेहरा नाही. उदा. एखादं लग्न झालेलं जोडपं आहे. जोडप्यातील स्त्रीच्या आयुष्यात अन्य कुणी पुरुष आला तर त्या पुरुषाशी तिचं नातं केवळ भावनिक राहू शकेल, किंवा भावनिक-शारीरिक दोन्ही असू शकेल. हीच गोष्ट जोडप्यातील पुरुषालाही लागू होईल. प्रेम किंवा शारीरिक समाधान या गोष्टी एका व्यक्तीपुरत्याच आहेत, ‘एक्सक्ल्यूझिव्ह’ आहेत, या प्रस्थापित दृष्टिकोनाला आव्हान देणारी ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना काही प्रमाणात प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे लग्न यशस्वी किंवा अयशस्वी होतं, त्याचप्रमाणे नात्यांच्या या व्यवस्थेलाही यशाचा किंवा अपयशाचा सामना करावा लागतो. ही एक वेगळी संकल्पना असली तरी यात माणसंच सहभागी असल्याने व सहभागी माणसांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार, अंगभूत गुण-दोषांनुसार याही व्यवस्थेत अडचणी येऊ शकतात. परंतु या व्यवस्थेचं वेगळेपण माणसाला बंधनमुक्ततेचा अनुभव देण्यात आहे. शिवाय बंधनाबाहेर जायची मुभा असणं याचा अर्थ ‘कुठलंच बंधन कधीच न बाळगणं’ असा होत नाही. (हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. कारण ‘बंधन बाळगणे’ याची नेमकी व्याख्या करता येत नाही. तिथे तारतम्यच कामी येतं. सध्या हे नोंदवून पुढे जाऊ.)

‘पॉलीअ‍ॅमरी’चा गाभा सर्व संबंधित व्यक्तींना एकमेकांच्या नात्याच्या स्वरूपाची कल्पना असणे हा असला तरी त्याचे विविध ‘फॉर्म्स’ आहेत. यात वरील उदाहरणाप्रमाणे लग्नव्यवस्थेत असलेली जोडपीसुद्धा असू शकतात किंवा लग्न न करताही तिघे-चौघेजण एकत्र राहू शकतात. यात नात्यांमध्ये उतरंड असू शकते किंवा नसूही शकते. मुळात ‘पॉलीअ‍ॅमरी’ मुक्त व्यवस्था असल्याने तिथे कुठल्याच स्वरूपाच्या नातेसंबंधांना नकार नाही. विविध स्वरूपाच्या नातेसंबंधांचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. व्यक्तीला एकाहून अधिक व्यक्तींशी गांभीर्याने (हा शब्द महत्त्वाचा!) संबंध ठेवता येण्याची मुभा असलेल्या आणि प्रेम व लैंगिकतेबद्दलची नवनैतिकता प्रस्थापित करू पाहणाऱ्या या व्यवस्थेचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील. कारण आज बहुतेक जण अशा प्रकारच्या बहुविध संबंधांना मनातून तयार नाहीत. आणि यात कुणाचा दोष आहे असंही नाही. ही व्यवस्था नवीन आहे, माहितीची नाही. त्यामुळे ती स्वीकारणं जड जाणारच. शिवाय लग्नव्यवस्थेमुळे ‘एकाला एक’ हे आपल्या मानसिकतेत रुजलं आहे. ते आपण सहजासहजी पुसू शकणार नाही. या लेखात पॉलीअ‍ॅमरीच्या स्वरूपाविषयी आपण प्राथमिक चर्चा करणार आहोत. पण एका लेखात सर्व शक्यतांवर तपशिलात बोलणं शक्य होणार नाही. पॉलीअ‍ॅमरीविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. काही फिल्म्स, माहितीपटही उपलब्ध आहेत.

पॉलीअ‍ॅमरीची मूळ संकल्पना आपण पाहिली. आता त्यातल्या गुंतागुंतीकडे येऊ आणि त्यासाठी प्रेम व लैंगिकता या दोन गोष्टींचा विचार करू.

प्रेम व लैंगिक आकर्षण या पूर्णत: भौतिक गोष्टी नव्हेत. ‘पूर्णत:’ म्हणण्याचं कारण असं की, जाणिवेचा उगमही जडातच आहे असं आधुनिक विज्ञान सांगतं. त्यामुळे या भावनांच्या मुळाशीही ‘जड’ कारणे आहेत. परंतु जाणिवेचं अस्तित्व व स्वरूप मात्र अनुभूतीच्या पातळीवर आहे. या माणसाच्या अंतर्मनात प्रकटणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरं असं की, विविध भावभावनांचं जे स्वरूप एका व्यक्तीला अनुभवास येतं, ते तसंच्या तसं दुसऱ्या व्यक्तीच्या अनुभवास येईलच असं नाही. परंतु या दोन्ही गोष्टींचा खुलासा ‘आकर्षण’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून करता येईल. एकमेकांच्या भौतिक आणि/ किंवा मानसिक वैशिष्ट्यांमुळे व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट गुणधर्माची बरीच चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भातील विश्लेषण मॅट रिडलेसारख्या अभ्यासकांच्या पुस्तकात (रेड क्वीन : सेक्स अ‍ॅण्ड द इव्होल्यूशन ऑफ ह्युमन नेचर) व इतरही लेखकांच्या पुस्तकांत पाहावयास मिळेल. यासंबंधी एक गोष्ट नोंदवणं महत्त्वाचं आहे. मानवी उत्क्रांती हा विषय वर्तनामागील जैविक कारणे जाणून घेण्याच्या दृष्टीने, समाजशास्त्रीय विषयांची चर्चा करण्यासाठी अनिवार्य करावा, इतका महत्त्वाचा आहे. कारण उत्क्रांती हे माणसाचं विज्ञान आहे. त्यामुळे माणसाच्या पायाभूत रचनेकडे दुर्लक्षून आपल्याला सामाजिक प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत. समाजाची मूल्यात्मक बांधणी करताना या बांधणीच्या लघुत्तम एककाचं- म्हणजेच मनुष्याचं- ‘नेचर’ काय आहे, तो/ ती या ‘नेचर’ला सामाजिक चौकटीत बसवायचा प्रयत्न कुठवर ताणू शकेल, हा विचार व्हायला हवा. आज लग्नव्यवस्था अस्तित्वात असली तरी ‘मोनोगॅमी’ माणसाच्या आदिम ‘नेचर’च्या विरुद्ध असल्याने या व्यवस्थेला समांतर व्यवस्थाही सुरू असतात. पण त्याचा स्पष्ट उल्लेख होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘नेचर’चं महत्त्व इथे लक्षात येतं. मुळात सजीवसृष्टी अस्तित्वात येणं आणि तिच्यात बदल होत जाणं या प्रक्रियेत ‘प्रजोत्पादन’ हे सजीवांचं प्रमुख लक्षण राहिलं आहे. (समलिंगी संबंध याला अपवाद आहेत. या विशिष्ट जाणिवांचा खुलासा प्रजोत्पादनाच्या तर्काने करता येत नाही. जाणिवांची ही वेगळी वाट आहे, इतकंच म्हणता येईल.) समाजव्यवस्था ही ‘उत्क्रांत माणसा’ची गरज आहे; ‘उत्क्रांती’ची नाही. प्रजोत्पादनाच्या उद्देशामुळे स्त्री-पुरुषांमध्ये आकर्षण, लैंगिक ताण अस्तित्वात आहे. अर्थात आज प्रजोत्पादनालाही नियंत्रणात आणण्यात माणूस यशस्वी झाला आहे. पण म्हणून लैंगिक आकर्षण कमी झालेलं नाही. थोडक्यात, ‘माणूस कसा असायला हवा?’ हा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसाच ‘माणूस आतून कसा आहे?’ हादेखील महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचा अभ्यास आधी केला तर पहिल्या प्रश्नाची योग्य उत्तरं मिळू शकतात.

उत्क्रांतीच्या अभ्यासाचं महत्त्व नोंदवून प्रेम व लैंगिकतेच्या मुद्द्याकडे येऊ. उत्क्रांती आपल्यासमोर या दोन्हींचे सविस्तर विश्लेषण ठेवू शकते. मात्र, त्यावर सामाजिक नियमनाच्या उद्देशाने प्रभावीपणे काम करणं हे माणसाचं कौशल्य आहे. उत्क्रांतिजन्य जाणिवांना आपण नैतिक चौकटीत बसवलं आहे. या चौकटी कणखर असतात आणि बहुसंख्य माणसे या चौकटीत राहणंच स्वीकारतात. माणसाचं अंतर्मन हे अनेकविध तृष्णांचं कोठार असल्याने चौकट दिली नाही तर अराजक माजेल अशी भीती असते आणि ती अनाठायी नाही. हीच भीती स्त्री-पुरुष आकर्षणालाही लावली जाते आणि या आकर्षणावर बंधनं येतात. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना या आकर्षणाला, ओढीला नैसर्गिक व रास्त मानते आणि या ऊर्मींना वाट देण्याचा प्रयत्न करते. परंतु हे समजण्यासाठी ‘प्रेम’ या संकल्पनेचा विस्तार समजणं आवश्यक आहे. हा नाजूक मुद्दा आहे. कारण ‘प्रेम’ (एका वेळी तरी) एकाच व्यक्तीवर होऊ शकतं, हा जवळजवळ सर्वमान्य सिद्धांत आहे. याचा एक खुलासा असा केला जातो की, प्रेमभावना ही अतिशय तरल, मनोविश्व व्यापणारी, सखोल भावना असल्याने ती एका वेळी एकाच व्यक्तीच्या बाबत अनुभवता येऊ शकते. विशेषत: नात्याच्या आरंभीच्या काळात हे प्रकर्षांने जाणवतं. लैंगिक इच्छा प्रेमभावनेहून स्वतंत्र असली तरी एका व्यक्तीवरील प्रेमाची विस्तारित अभिव्यक्ती, मानसिक ओढीचं शारीरिक जोडलेपणात परावर्तित होणं अशा स्वरूपात लैंगिक संबंधाचं वर्णन केलं जातं. अर्थात कामेच्छा तिच्या स्वयंभू, प्रेमविरहित रूपातही अस्तित्वात असतेच. पण निव्वळ कामेच्छेला निव्वळ प्रेमाइतकी मूल्यात्मक मान्यता नाही. मुळात कामेच्छा ही ‘वाईट प्रवृत्ती’ या सदरातच ढकलली जाते. किमान आपल्याकडे तरी. (वास्तविक ‘प्रेम’ या भावनेचा ‘ट्रिगर पॉइंट’ शारीर आकर्षण आहे. विशेषत: स्त्री आणि पुरुषामध्ये जे जे काही असतं त्याचं मूळ लैंगिकतेत आहे अशीही एक मांडणी आहे. यात लैंगिकता केवळ शरीरसंबंध या अर्थाने येत नाही, तर ‘दोन व्यक्तींमधला निसर्गदत्त जैविक ताण’ या अर्थी येते.) तर मग ‘हे प्रेम एकाहून अधिक व्यक्तींबाबत शक्य होईलच कसं?’ हा प्रश्न येतो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की, हा प्रश्न अनुभूतीचा आहे. एखादी अनुभूती आपल्याला येत नाही म्हणजे ती अस्तित्वातच नसते असं नाही. यासाठी समलिंगी संबंधांचा दाखला देता येईल. समलिंगी संबंधांना आज इतरांकडून हळूहळू मान्यता मिळते आहे. अमेरिकेत समलिंगी लोकांना लग्नाची कायदेशीर संमतीही देण्यात आली आहे. समलिंगी संबंध ही नक्की काय अनुभूती आहे, हे माझ्यासारख्या हेटेरोसेक्शुअल लोकांना कळणार नाही. पण म्हणून मी या अनुभूतीला मोडीत काढू शकत नाही. मी या अनुभूतीचा धिक्कार करणं योग्य होणार नाही. त्यामुळे काही लोक जसे समलिंगी असतात किंवा काही लोक जसे डावखुरे असतात, तसेच एकाच वेळी दोन माणसांवर प्रेम करणारे काही ‘पॉलिअ‍ॅमरस’ लोक असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रेम ही एक गंभीर अनुभूती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रेमाकडे बऱ्याचदा थिल्लरपणा म्हणून पाहिलं जातं. वास्तविक प्रेम हा माणसाच्या भावनिक-लैंगिक आकांक्षांचा एक नैसर्गिक परिपाक आहे. आणि त्याला वाट करून देणं आवश्यक आहे. त्याचं नियमन करणं अगदीच गरजेचं आहे. कारण आपण आपल्या सर्वच इच्छा-आकांक्षांना एका ‘चॅनेल’मधून पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो. ‘आत्ता मला हे हवं आहे आणि हे मिळालंच पाहिजे’ या वृत्तीचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु प्रेमभावनेचं पूर्णपणे दमन करणं मात्र क्रूरपणाचं आहे.

भारतीय विचारामध्ये ‘स्वधर्म’ ही एक संकल्पना आहे. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या ‘व्यक्तिवादाचा उदय’ या लेखात या संकल्पनेच्या संदर्भाने म्हटलं आहे- ‘व्यक्तीच्या सामाजिक नात्यांना अनुसरून स्वधर्म अनेक रूपे धारण करतो. उदा. पतिधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, इत्यादी. स्वधर्म निश्चित असतो. त्याच्या अनेक विशिष्ट रूपांत – उदा. पतिधर्म आणि राजधर्म यांच्यात- संघर्ष येऊ शकेल किंवा संघर्ष आल्याचा भास होईल. तेव्हा विशिष्ट प्रसंगी स्वधर्माला अनुसरून आपले कर्तव्य काय आहे, हे ओळखणे कठीण असते. कर्म काय आणि अकर्म काय, याविषयी शहाणे लोकही गोंधळात सापडतील. पण ‘कर्म काय आहे’ याचे उत्तर सापडणे कठीण असले तरी त्याचे वस्तुनिष्ठ असे उत्तर असेल. आपले कर्तव्य काय, हे व्यक्तीने ‘ठरवायचे’ नसते, तर या प्रश्नाचे पूर्वनिश्चित उत्तर तिने ‘शोधून’ काढायचे असते. उत्तराला अनुसरून व्यक्तीने आचरण केले तर तिचे कल्याण होते. नाही तर तिला पाप लागते, तिचे अकल्याण होते. एवढेच कृतीपुरते स्वातंत्र्य व्यक्तीला असते. पण स्वधर्म काय आहे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तिला नसते.’

व्यक्तीला आपलं कर्तव्य ‘ठरवता’ येत नाही, तिला पूर्वनिश्चित उत्तर ‘शोधून’ काढावं लागतं, यात मेख आहे. बहुविध नातेसंबंधांमध्ये या गृहीत तत्त्वाला आव्हान दिलं जातं. कारण इथे पती-पत्नी-आई-वडील म्हणून करायच्या कर्तव्यांवर प्रश्न केले जात नसले तरी ‘माझं स्वत:प्रतिदेखील काही कर्तव्य आहे आणि मी त्याला न्याय देईन’ हा विचार प्रबळ आहे. आजच्या वर्तमानात बहुविध नातेसंबंधांबाबतची सर्वात मोठी अडचण ही आहे की, समाज म्हणून आपण अशा नातेसंबंधांना तयार नाही. प्रेम एकाच व्यक्तीवर असू शकतं, दुसऱ्याशी जे असतं ते ‘लफडं’ असतं, ही धारणा घट्ट आहे. प्रेमाकडे पहाण्याची आपली दृष्टीच मुळात स्वच्छ नाही. आपण प्रेम सहजतेने घेत नाही. ओझं म्हणून घेतो. त्यामुळे ज्या मोजक्या लोकांना दोन व्यक्तींबाबत ‘प्रेम’ वाटतं तेदेखील प्रस्थापित धारणेच्या दबावाखाली असतात. ‘स्वत:प्रतिचं कर्तव्य ठरवायचा’ प्रयत्न ते करतात, पण प्रस्थापित नीतीने निर्माण केलेल्या पेचातून त्यांचीही सहज सुटका होत नाही.

‘माझ्या लग्नाच्या जोडीदाराचा मला कंटाळा आलाय, अगदी नाइलाज म्हणून आम्ही एकत्र राहतोय’ अशा अवस्थेत अन्य कुणी आवडणं याला ‘पॉलिअ‍ॅमरी’ म्हणता येणार नाही. कारण यात एक नातं मुळात ‘रेटलं जातंय.’ तिथे प्रेम उरलेलंच नाही. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये एकाहून अधिक व्यक्तींवर ‘समान प्रेम’ अपेक्षित आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. प्रेम ही अनुभूती वाहती असल्याने तिचं एकच सार्वत्रिक ठोकळेबाज स्वरूप असत नाही. दोन व्यक्तींबद्दलच्या प्रेमाच्या जातकुळीत सूक्ष्म भेद असू शकतात. यात प्राधान्यक्रमही असू शकतो. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नातेसंबंधात असणारे अतिशय प्रगल्भ असावे लागतात. प्रेमाच्या पारंपरिक व्याख्येपासून, पारंपरिक अनुभूतीपासून वेगळं होऊन एका नव्या, अधिक समावेशक, प्रेम आणि लैंगिकतेतल्या ‘अहम्’ला बाजूला काढू शकणाऱ्या अनुभूतीपर्यंत ज्यांना जाता येईल तेच अशा व्यवस्थेत राहू शकतात. हे अवघड आहे. आणि आज तरी आपण समाज म्हणून या व्यवस्थेसाठी तयार नाही, हे नोंदवणं आवश्यक आहे.

लग्नसंबंधामध्ये जशा अडचणी असतात तशाच अडचणी बहुविध नातेसंबंधांतही येऊ शकतात. या व्यवस्थेतही माणूस अखेर माणूसच असतो आणि त्याचे अंगभूत गुणधर्म या व्यवस्थेलाही यशस्वी किंवा अयशस्वी करू शकतात. पण लग्नव्यवस्थेत जो एक मूळ ‘व्यवस्थे’चा म्हणून दोष आहे, तो या व्यवस्थेत नाही. एका माणसाने त्याच्या सर्व इच्छा एकाच माणसाकडून आयुष्यभर पूर्ण करून घ्याव्यात, हे मुळातच विवादास्पद आहे. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ही सक्ती नाही. इथे ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठ्या प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील. आपली आजची स्थिती अशी आहे की, तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यांत अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही ‘मन इन्स्टिंक्ट’चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या, त्या समाजाचे प्रस्थापित नीतिनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भाग बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरुष आवडतो आहे, हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे, हे वास्तव सहज स्वीकारू शकेल का? ‘सहज’ हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे, की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. आधी म्हटलं तसं जाणिवेचं जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचंही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मकदृष्ट्या बघा. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचं माणसाविषयीचं क्रौर्य काही अंशी तरी कमी झालं आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का, याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या, त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिक-लैंगिक बांधणी हेच असेल का, यावर विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या ‘उत्क्रान्तिजन्य जबाबदारी’च्या आधारे देता येऊ शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही, यावर विचार व्हायला हवा. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना प्रेमभावनेच्या बाबतीत हा पट विस्तारायचा प्रयत्न करते. प्रेमातील पझेसिव्हनेस, मत्सर या भावनांना बाजूला सारायचा प्रयत्न करते. समाजाची घडी चालावी म्हणून कायदेशीर मान्यता असलेल्या लग्नव्यवस्थेअंतर्गत किंवा या व्यवस्थेच्या बाहेर स्वतंत्रपणे ही व्यवस्था कार्य करू शकते. ही अखेरीस माणसांची व्यवस्था असल्याने यात परस्परसंबंध, मुले, पालकत्व असे अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. ही व्यक्तिसापेक्ष व्यवस्था आहे. आणि एका लेखातून या व्यवस्थेचे सगळेच कंगोरे दाखवणं शक्य नाही. त्याविषयी सविस्तर आणि सतत चर्चा करावी लागेल कारण ही व्यवस्था आपल्या प्रस्थापित मानसिकतेत बदल करू पाहते. पण लेखाच्या समारोपात या व्यवस्थेची काही मूलभूत लक्षणे सार रूपात पाहूया-

  • पॉलिअ‍ॅमरी’ ही माणसांच्या एकाहून अधिक गंभीर स्वरूपाच्या नात्यांची व्यवस्था आहे.
  • प्रेम एकाच व्यक्तीला देता येतं आणि तिथेच ते संपतं’ या प्रस्थापित धारणेला ही व्यवस्था आव्हान देते. प्रेम अमर्याद आहे आणि एका व्यक्तीवर तुम्ही ज्या तीव्रतेने प्रेम करता त्याच तीव्रतेने दुसऱ्या व्यक्तीवरही करू शकता, तुम्ही तुमचं ‘पूर्ण हृदय’ एकाहून अधिक व्यक्तींना देऊ शकता असं ही संकल्पना मांडते. या व्यवस्थेत प्रेम, प्रेमाच्या विविध छटा गांभीर्याने समजून घेणं अभिप्रेत आहे.
  • सामावून घेणं’ हे या व्यवस्थेचं प्रमुख लक्षण आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘पती, पत्नी और वो’मधला ‘वो’ या व्यवस्थेत त्रासदायक ठरत नाही. त्याला/ तिला सामावून घेतलं जातं. ही ‘तीन लोकांची आनंदी व्यवस्था’ असणं अपेक्षित आहे.
  • या व्यवस्थेत ‘वन नाइट स्टँड’ चा समावेश होत नाही. केवळ लैंगिक आकर्षण व लैंगिक संबंधांची इच्छा म्हणजे पॉलीअ‍ॅमरी नव्हे. पण पॉलीअ‍ॅमरीमध्ये लैंगिक संबंध वर्ज्य नाहीत. याबाबत संबंधित स्त्री-पुरुषांना ‘लैंगिक शेअिरग’साठी तयार असावं लागतं. आणि ते आव्हानात्मक असू शकतं. विशेषत: पुरुषांसाठी (आधी म्हटल्याप्रमाणे लैंगिकतेबाबतच्या स्त्री व पुरुष विशिष्ट जाणिवा उत्क्रान्तिजन्य आहेत आणि त्या उत्क्रांतीच्या अभ्यासाच्या आधारेच समजून घेता येतील व त्यावर कामही करता येऊ शकेल.)
  • सर्व संबंधित व्यक्ती एकाच छताखाली एकत्र राहिल्यास ही व्यवस्था प्रभावीपणे काम करू शकते.
  • प्रेम जर एकाहून अधिक व्यक्तींवर असू शकतं, मग ते दहा किंवा पन्नास जणांवर असू शकतं का? हा प्रश्न रास्त आहे. तत्त्वत: ‘असं असू शकतं’ हे मान्य करावं लागेल. पण आजचे सर्व वैयक्तिक व सामाजिक घटक, आपल्या मर्यादा लक्षात घेता व प्रेमभावना प्रतिसाद अपेक्षिते, हे लक्षात घेता आजच्या मानवाला दोन नात्यांमध्ये स्वत:ला विभागणं शक्य आहे. असं प्रस्तुत लेखकाला वाटतं. आजच्या मानवाची भावनिक, शारीरिक ऊर्जा त्याहून जास्त नाही.
  • ही व्यवस्था एकाहून अधिक व्यक्तींना कुटुंबाच्या कक्षेत घेणारी असल्याने मुलांचं पालकत्व ‘दोन आया’ किंवा ‘दोन बाबां’कडे जाऊ शकतं. जैविक पालकांची प्राथमिक जबाबदारी व इतरजण ‘विस्तारित पालक’ होऊ शकतात.
  • विवेक आणि तारतम्य हा कोणत्याही व्यवस्थेचा गाभा असतो. ‘विशिष्ट परिस्थितीत काय केलं तर ते योग्य होईल, हे संबंधित व्यक्तींनी समजुतीने ठरवणं म्हणजे विवेकाने वागणं’ असं म्हणता येईल. या व्यवस्थेतदेखील प्रत्येक टप्प्यावर हेच अपेक्षित आहे.
  • ही व्यवस्था फक्त सुखवस्तू समाजापुरती मर्यादित आहे का? याचं उत्तर ‘हो’ असं द्यावं लागेल. याबाबत संख्याशास्त्रीय अभ्यास करता येईल. पण ज्याप्रमाणे माणसाच्या भौतिक आकांक्षा तीव्र असल्या तरी त्या आर्थिक पाठबळाशिवाय प्रत्यक्षात येत नाहीत, तसंच भावनिक आकांक्षादेखील वर्गीय (आपल्याकडे वर्गीय व जातीय) मर्यादांमुळे घडतात/ बिघडतात, हे क्लेशदायक वास्तव आहे. या व्यवस्थेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये एका वेगळ्या प्रतीची प्रगल्भता असेल तरच या व्यवस्थेच्या यशाची शक्यता वाढते.
  • पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठ्या प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील.

(पॉलिअ‍ॅमरीबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. वाचकांनी ती अवश्य बघावी. morethantwo.com ही वेबसाइट पाहावी. पॉलिअ‍ॅमरीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाइटवर मिळतील. यूट्यूबवर काही फिल्म्स उपलब्ध आहेत, त्या बघाव्यात. १) Hidden Lives : Three in a bed २) 3 in a bed (ही बंगाली फिल्म आहे.)   फिल्म्सच्या शीर्षकात ‘बेड’हा शब्द असला तरी या फिल्म्स केवळ लैंगिक संबंधांबद्दल बोलत नाहीत. हा लेख लिहिण्यासाठी मला प्राजक्ता कोलते या मत्रिणीशी झालेल्या चर्चांचा पुष्कळ उपयोग झाला. या विषयावरील फिल्म्स, वेबसाईटची माहितीही तिनेच दिली आहे. प्राजक्ताचे आभार.)

(लोकसत्ता ‘चतुरंग’ ४ नोव्हेंबर २०१७ )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.