भारतीय दांभिकता

काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती, एका १२ वर्षाच्या मुलाची. एका लग्नाच्या वरातीतील गाडीने त्याच्या सायकलचे नुकसान केले. जेव्हा त्याने आपले चाक दुरुस्त करण्यासाठी भरपाई मागितली तेव्हा काय झाले? वरातीतील लोकांना तो त्यांचा अपमान वाटला, त्या मुलाला मारहाण झाली आणि जवळच असलेल्या शेतात त्याला जाळून ठार मारले. ही कहाणी तेथील प्रादेशिक वर्तमानपत्रात फक्त उल्लेखण्यात आली, पण सार्वजनिक उद्रेक अजिबात दिसला नाही. त्यानंतर काही दिवसांनंतर, बोअरवेलमध्ये अडकलेल्या एका दोन वर्षांच्या मुलाची एक कहाणी, जी सर्वांनी अगदी अति महत्त्वाच्या घटनेप्रमाणे उचलून धरली. आणि आपला मीडिया तर काय विचारावा – बचावाच्या प्रयत्नांचा मिनीट-मिनीट अहवाल पुरवत होता. या दोन घटनांबद्दल मला आश्चर्य वाटले आणि मी एका अस्वस्थ निष्कर्षापर्यंत पोहोचलो की आपण भारतीय ढोंगी आणि पाखंडी लोक आहोत. बहुतेक समाजांमध्ये दांभिकता हा एक मोठा मुद्दा आहे, परंतु भारतातील ती एक समस्या आहे.

आपल्या देशाच्या व्यक्तिमत्वातच शतकानुशतकांचे दुभंगलेपण आहे. आपल्या देशाला तीन नावे – भारत, इंडिया आणि हिंदुस्थान, दोन राष्ट्रगीते – जन गण मन आणि वंदे मातरम्, दोन झेंडे – तिरंगा आणि भगवा. त्याशिवाय भाषा, धर्म हे तर अजून आहेतच. हे दुभंगलेपण आपल्या समाजात आणि आपल्या वैयक्तिक जीवनात इतके खोलवर रुजले आहे की ते आपल्या आयुष्याचा मार्गच झाले आहे.
आपल्या भारतीयांचा असा ठाम विश्वास आहे की ‘ममता’ ही एक पवित्र भावना आहे, पण तरीदेखील आम्ही आमच्या स्त्रियांना त्रास देतो. आम्ही लाच घेतो आणि मग आपल्या देवळांच्या दानपेटीत लाखो रुपये दान करून आपली पापे धुऊन टाकण्याची आशा करतो. आम्ही करुणेबद्दल बोलतो, परंतु आमच्या घरात काम करणाऱ्या नोकरांना गुरासारखे राबवून घेतो. आम्ही नागरिकता आणि नागरिकत्व याबद्दल फक्त शिकतो पण आमचा विचार स्वतःच्या कुटुंबाच्या बाहेर जातच नाही. आमची घरे आम्ही स्वच्छ ठेवणार पण रस्त्यांवर घाण करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे वागणार.

दररोज, या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात – व्यवसाय, राजकारण, सामाजिक कार्य किंवा क्रीडा, करोडो भारतीय दांभिक कृत्ये करत असतात आणि त्यामुळे ह्या गोष्टीला आता साथीच्या रोगाचे स्वरूप आले आहे.

ही दांभिकता कुठेकुठे आणि कशी आहे हे बघायचा प्रयत्न करूया.


Image by John Hain from Pixabay

धार्मिक दांभिकता:
हिंदुधर्म सरस्वतीला बुद्धीची आणि ज्ञानाची देवी म्हणून संबोधतो. २०१८च्या जाट दंगलीत, दंगलखोरांनी शाळेला आग लावण्यापूर्वी सर्वप्रथम देवी सरस्वतीचा पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवला. हसावे की रडावे तेच लक्षात येत नाही. गोवंशाच्या सुरक्षिततेच्या नावाखाली सध्याचे हिंदू कार्यकर्ते गोमांस खाण्याचा आणि गोहत्येचा निषेध करतात. परंतु जर एखाद्याने प्राचीन हिंदू ग्रंथांचा अभ्यास केला तर असे असंख्य उल्लेख आहेत जे अन्यथा सांगतात. ‘ब्राह्मणस’ या इ.स. पूर्व ९००मध्ये लिहिलेल्या प्राचीन विधीग्रंथांनुसार, एखाद्या बैलाला वा गाईला ठार मारून तिचे मांस पाहुण्याच्या आगमनाच्या सन्मानार्थ खावे. पवित्र कुराण असे नमूद करते की “धर्मात कोणतीही सक्ती होणार नाही” आणि तरीही अतिरेकींनी कुराणचे शब्द आपल्या स्वत:च्या हेतूसाठी हवे तसे वळवले आहेत. ‘जिहाद’ हा एक अरबी शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ ‘प्रशंसनीय हेतूसाठी संघर्ष करणे’ असा होता. परंतु सध्याच्या काळात हा शब्द इस्लामच्या नावाखाली हिंसाचार म्हणून वापरला जातो.

सामाजिक दांभिकता:
आपण सर्वजण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, काहीतरी वेगळेच बोलतो, काहीतरी वेगळेच करतो आणि दुसर्‍याकडून काहीतरी वेगळे करण्याची अपेक्षा करतो. सामाजिक दांभिकता अशीच जन्माला येते. बरे, समाज म्हणजे काय आणि तो कशामुळे बनतो? आपल्यासारखे लोकच समाज बनवतात. जेव्हा आपण वैयक्तिक बाबींचा विचार करतो तेव्हा आपण सर्वजण उदारमतवादी असतो. परंतु समाजात मात्र पारंपरिक मूल्ये आणि श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वैयक्तिक सोयीनुसार निर्णय घेण्याकडेच आपला कल असतो. प्रत्येकजण लोकांसमोर आपले मत व्यक्त करताना अगदी मोकळेपणाने आणि तथाकथित ‘आधुनिक विचारसरणी’ ठेवतो परंतु जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा त्याच आपणा सर्वांचा ‘समाजप्रिय’ किंवा ‘समाजानुरूप’ किंवा ‘समाजापेक्षी’ विचार करण्याकडे कल असतो आणि इतरांकडूनही तशाच वागण्याची अपेक्षा असते.

अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिले तेव्हा जनसामान्य त्यांच्या पाठीशी उभे होते. पहिल्यांदाच सर्वसामान्यांनी भ्रष्टाचार विरोधात तीव्र असंतोष व आंदोलन उघडपणे दर्शविले. दुर्दैवाने तीच आम जनता जेव्हा वाहतुकीचा कायदा मोडत असताना पकडली जाते तेव्हा मात्र अधिकाऱ्यांना लाच घेण्यास उद्युक्त करते. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की जे भारतीय लोकांमधील ढोंगीपणाशिवाय काहीच दर्शवित नाही.

फिल्म सेन्सॉर बोर्डने सिनेमाच्या पडद्यावर धुम्रपान करण्यास बंदी घातली आहे आणि त्यामागील कारण म्हणजे तशी दृश्ये प्रेक्षकांना, विशेषत: तरुण मुलांना धूम्रपान करण्यास प्रवृत्त करतात. जर एखाद्या नायकाने सिगारेट ओढल्यामुळे मुले धूम्रपान करण्यास प्रवृत्त होत असतील तर मग चोरी, अपहरण, खून किंवा बलात्कार करणार्‍या नटामुळे हे तरुण अत्याचारी गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाहीत का? मग ‘पाप’मुक्त सिनेमासाठी या सर्व गुन्ह्यांवरही बंदी का घालू नये? एखाद्या मुलाला आपला आवडता हिरो ऑनस्क्रीन सिगारेट फुंकताना दिसला नाही, तरीही तो आजूबाजूच्या लोकांना धूम्रपान करताना बघून त्या व्यसनाला बळी पडू शकतो. म्हणून मग जे लोक धूम्रपान करतात त्या सर्वांवर कारवाई करणार का? चित्रपटात बंदी घालून ही प्राणघातक सवय कमी करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत हे सरकारला फक्त दाखवायचे होते. प्रत्यक्षात हेही फक्त एक ढोंगच नाही का? लैंगिक गोष्टींबद्दल बोलणे तर आपल्या देशात महान पाप. परंतु ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि खरं म्हणजे मुलांबरोबर त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे जेणेकरून त्यांना त्याबद्दल पुरेसे आणि योग्य ज्ञान असेल.

व्हॅलेंटाईन-डेच्या आठवड्यात सक्रिय होणारे नैतिक पोलिस पार्क्समध्ये बसलेल्या जोडप्यांना मारहाण करतात, कारण असले काही आपल्या संस्कृतीत नसल्याचा त्यांचा दावा असतो. आपली संस्कृती प्रेमाच्या विरोधात आहे का? नग्न स्त्रियांना किंवा समलैंगिकांना रंगवणाऱ्या चित्रकारांच्या अनेक प्रदर्शनांवर या नैतिक पोलिसांनी हल्लादेखील केला आहे. हे कलाप्रकार प्रदर्शित करणे गुन्हा आहे काय? या लोकांच्या मते ते आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. येथे लक्षात ठेवायला हवे की ‘कामसूत्र’ मूळ भारतातून आले आहे आणि ते आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे. मग या कला आपल्या संस्कृतीच्या विरोधात कशा असतील? जरा डोळे उघडून खजुराहो आणि अशा अनेक देवळांवर नजर टाका, तेथेदेखील हीच तथाकथित नग्नता आणि समलैंगिकता दिसेल. तर हे नैतिक पोलीस आपल्या दांभिकतेचेच एक ज्वलंत उदाहरण आहे कारण हे दांभिक ज्याला विरोध करतात अशा प्रत्येक गोष्टीचा आनंद स्वतः मात्र लुटत असतात. लोकांचे लक्ष वेधण्यासाठीची ही सर्व नाटके असतात.

विवाह संस्था:
आपल्या देशातील विवाहव्यवस्था हे ढोंगीपणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. वैवाहिक संबंध बनविण्यापासून हे सुरू होते आणि मृत जोडीदाराच्या बाबतीत पुरुषांशी आणि स्त्रियांशी कसे वागले जाते येथपर्यंत पोहोचते. आपण सगळे फक्त बोलतो की आम्ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत, जेथे जातीच्या आधारे भेदभाव होऊ नये. तथापि विवाहबंधन करण्याचा विचार केला तर आपण सर्वजण समान जातीतील जोडीदार शोधतो. जेव्हा घरच्या मुलींचा विचार केला जातो तेव्हा तिला स्वतःला शिक्षण आणि करिअर करण्याचे सर्व स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आई-वडील तिच्यासाठी स्थळे शोधताना सासरच्या लोकांचे मन कसे मोकळे आणि उदारमतवादी हवे असे मत मांडतात. परंतु हेच दांभिक आपल्या घरात सून आणताना मात्र ती घर सांभाळणारी, नोकरी न करणारी असेल तर चांगले अशा विचारांचे असतात. ही दांभिकता नाही तर काय? लग्न करण्याचा विचार करताना प्रत्येक कुटुंब असे दर्शवितो की वरपक्ष आणि वधूपक्ष समान आहेत पण प्रत्यक्षात वराची बाजू नेहमीच वरचढ असते. चेहऱ्यावर हास्य आणून ते फक्त मागणी करतात. हा ‘हुंडा’ नाही असे म्हणायचे परंतु वराची बाजू असल्याच्या त्यांच्या अपेक्षा आणि अभिमान कधीच संपुष्टात येत नाही.

विधवा किंवा विधुर पुनर्विवाह:
जर विधुर असेल तर समाज त्याच्याबद्दल सहानुभूती दर्शवते आणि दुसरी पत्नी करणे हा त्याचा हक्कच आहे याला मान्यता देते. एखाद्या विधवेच्या बाबतीतही असेच घडले तर लगेच बोलले जाते की हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. ती तिच्या पतीच्या मृत्यूचा आदर करत नाही. अगदी त्या बाईचा तरुण मुलगा किंवा मुलगीसुद्धा असा विचार करत नाहीत की आपल्या आईचीदेखील ही गरज असू शकते. अश्यावेळी समाजाकडून तरी काय अपेक्षा ठेवायच्या? समाज तर स्त्रिच्या वागणुकीवर सर्व प्रकारच्या टिप्पण्या करायला टपलेलाच असतो, ज्यामुळे तिला तथाकथित ‘समाजा’चा भाग असण्यास अपात्र वाटायला लागते.

स्त्री आणि पुरुष:
भारतात मुलींवर बलात्कार आणि त्यांचा छळ यांसाठी त्यांनी कमी कपडे घातले याला जबाबदार धरले जाते. जर असे कपडे घातल्यामुळे बलात्कार होत असतील, तर जगभरातील महिलांवर बलात्कार झाले पाहिजे. सत्य हे आहे की प्रत्येक पुरुष त्याच्या घरात तथाकथित ‘सभ्य’ पेहरावाचा उपदेश करतो तर बाह्य जगात त्याच मनुष्याला तोकडे कपडे ‘सेक्सी’ वाटतात. आपण सर्वजण म्हणतो की आम्ही मुलांवर प्रेम करतो; मुलगा आणि मुलगी असा फरक करत नाही. तरीही आपल्या अंतःकरणात आपला वंश पुढे चालविण्यासाठी मुलगा हवाच असतो. काही लोक असेही आहेत की ज्यांना त्यांच्या मुलाला पण मुलगाच व्हायला हवा असतो पण मग त्याची दुसरी भयाण बाजू काय? तर मुलींची भ्रूणहत्या.

पुरुषाला स्वतःला बेबंद राहायचे असते, परंतु त्याच्या मालकीच्या स्त्रियांनी मात्र बंधनातच राहावं असे त्याला वाटते. विचित्र गोष्ट म्हणजे ‘आई’ ही त्याच्या लेखी ‘आदर्श स्त्री’ असते. तिचा त्याग, तिने स्वतःवर घालून घेतलेली बंधने, ती करत असलेली कर्तव्ये यांची तो पूजा करतो. त्याचवेळेस इतर स्त्रियांनी मात्र त्याच्याशी मोकळेपणाने वागावे, त्याने स्वतःही त्यांच्याशी मोकळेपणाने वागावे असे त्याला वाटते. सर्वच क्षेत्रांत त्याचा पुरुषी अहंकार फणा काढून उभा असतो आणि इतरांच्या वागण्यावर पाळत ठेवून त्यांच्याशी तो वाद घालतो. इतरांवर हुकूमशाही गाजवू लागतो. नीतिमत्तेच्या नावाखाली दुटप्पी वर्तन करू लागतो. पुरुषांसाठी वेगळा आणि स्त्रियांसाठी वेगळा न्याय लावू लागतो. म्हणूनच ‘खाप पंचायत’सारख्या यंत्रणा हिंसक आणि क्रूर बनतात. अशावेळेस मग हिंसाचाराचा हैदोस आणि शरीरसुखाचा उत्कटबिंदू हे जणू भावनिकरित्या समान पातळीवर येतात. दंगलींची कुठलीही हिंसक घटना पाहिली की, तिचे अंतिम पर्यवसान बलात्कारात होणे, ही त्या हिंसेची गरज असल्यासारखेच दिसते. जणू बलात्कार हा मर्दानगीचा आणि आपल्याला कोण हात लावणार, या बेदरकारीचा ट्रेडमार्कच बनतो. बलात्काराशिवाय भारतीय पुरुषी अहंकार खरोखरच अपूर्ण ठरतो.

एकेकाळी उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानातील, सतीप्रथेमध्ये नवऱ्याच्या धडधडत्या चितेत त्याच्या जित्याजागत्या बायकोला फेकले जायचे आणि मग ‘सती’ गेली म्हणत नंतर तिचे देव्हारे माजवायचे, असा प्रकार होता. १८२९मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीप्रथा बंद करेपर्यंत भारतात जिवंत स्त्रियांना नवऱ्याच्या चितेत सर्रास ढकलले जात होते. काही स्वखुशीने जात होत्या, कारण त्यांना नवऱ्यानंतर मागे राहिलेल्या बाईचे काय होते, याची जाणीव होती. म्हणून त्या नवऱ्याच्या चितेला जवळ करत. जिवंत बाईला जाळायचे आणि नंतर तिच्या व्रताची सतीचे वाण म्हणून प्रशंसा करायची, ही दांभिकता खास भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.

सुरक्षिततेनंतरची दुसरी हास्यास्पद कल्पना म्हणजे ‘इज्जत’, ‘प्रतिष्ठा’ किंवा ‘अब्रू.’ इज्जत याचा अर्थ मोठेपणा किंवा आत्मसन्मान नव्हे. तर स्त्रीवर मालकी हक्क दाखवणारी, घराण्याची स्वामीत्व भावनायुक्त इभ्रत असते ती. स्त्रीने मर्यादा ओलांडली तर तिला त्या कृत्याची किंमत चुकवावीच लागते. ‘ऑनर किलिंग’ हा जणू पुरुषाची अब्रू जपण्याचा विधीच आहे. पुरुषाची इज्जतच काय ती महत्त्वाची असते.

पुरुषांच्या दृष्टीने स्त्रीदेह हे कुरण आहे, त्यांच्या मालकीचा प्रदेश आहे. सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक म्हणूनही ते स्त्रीदेहाकडे पाहतात आणि स्त्रियांनीही ते मान्य करावे असा आग्रह धरतात. याठिकाणी असलेला दुहेरीपणा आपण समजून घ्यायला हवा. बहीण किंवा पत्नी म्हणून स्त्रीला मान असला तरी बाकीच्या स्त्रियांना प्रतीकात्मक मूल्यही नसते. अन्य स्त्रिया या तिरस्करणीय वस्तू असतात, केवळ वापरासाठी असतात. बलात्कारित स्त्री ही तर ‘काचेचे फुटके भांडे’ असते, ही केवढी दुर्दैवी बाब आहे. तिच्याशी नाते निघाले तर त्यामुळे कुटुंबाच्या इज्जतीला धक्का पोचतो. बलात्काराभोवती रचलेल्या कहाणीत त्या स्त्रीलाच दोषी धरले जाते. सामूहिक बलात्कार झालेल्या स्त्रीला तर पार वाळीतच टाकले जाते.

हेही सांगितलं पाहिजे की, वैवाहिक जीवनातील अत्यंत कंटाळवाणेपण हे त्यात भरच घालत असतं. पती-पत्नींना एकमेकांशी बोलण्यासारखे फारसे काही नसते. आनंददायी संभाषण ही संकल्पना तर कुणाला सुचतही नाही. हॉटेलात बसलेल्या भारतीय कुटुंबाचे निरीक्षण केले तर दिसते की, पुरुष एकटाच मोठ्या ऐटीत जेवतो आहे, तर स्त्री मात्र मुलांवर लक्ष ठेवण्यात गुंतली आहे. तिथे कोमलतेला थारा नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा नाहीत, काहीच नाही. जणू कर्तव्यपालन, त्याग आणि भोग यांच्यामधल्या अवस्थेत ते कुटुंब लोंबकळत आहे. चाळीशीनंतर तर प्रियाराधनाची उरलीसुरली हौस आणि त्यातील काव्य सारेच ओसरून जाते.

आज स्त्रीवर एखादा ॲसिड-हल्ला होतो, तेव्हा तिला यातना-अपमानांना सामोरे जावे लागते. प्रसारमाध्यमांना वाटणारी कणव म्हणून त्या घटनेचा फोटो छापणे एवढ्याने काही होत नाही. त्यातून तो पुरुष समाजकंटक आहे किंवा कामविकृत आहे एवढे कळून येते. पत्नीला जाळून मारणारा रॉकेलप्रेमी पती आणि हा ॲसिड हल्ला करणारा पुरुष – दोघांनाही वाळीत टाकले पाहिजे आणि माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या नेहमीच्या बातम्यांतून हा बहिष्कार प्रतिबिंबित झाला पाहिजे. संपूर्ण समाजाने त्याचा धिक्कार केला आहे, असे दिसले पाहिजे. नुकत्याच झालेल्या एका वेगळ्या बाबतीत समाजाने आपला प्रतिसाद खरमरीतपणे कसा व्यक्त केला त्याचे हे उदाहरण.

आपल्या देशाला एक खूप मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे आणि आपला जन्म या देशात झाला हे आपले भाग्य आहे. पण हेही तितकेच खरे की ह्या दर क्षणी वेगात बदलणाऱ्या या जगाशी जुळवून घ्यायचे असेल तर भविष्यासाठी अत्यावश्यक असे आधुनिकीकरण करणे क्रमप्राप्त आहे. परंतु ते करताना आपल्या संस्कारांची नाळ न तोडता आपल्याला आपल्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील आणि या दांभिकतेचा त्याग करावाच लागेल. अन्यथा आपल्या देशाची प्रगती आणि विकास होणे कठीण आहे. आपण फक्त आपल्या गौरवशाली इतिहासाला कुरवाळत आणि गोंजारत बसू आणि जग कुठल्या कुठे निघून जाईल. उठा, भारतीयांनो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही.

ह्यात एक आशेचा किरण म्हणजे सध्याची नवीन पिढी; जी आमच्या आणि त्या आधीच्या पिढ्यांपेक्षा खूपच जागरूक आहे. त्यांचा जुन्या चालीरीती मोडून काढण्यास अजिबात विरोध नाही ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांनीही एक लक्षात ठेवायला हवे की तो विरोध फक्त विरोधासाठी नसावा. आपल्या समाजातील ज्या प्रथा कालबाह्य झाल्या आहेत त्यांना तिलांजली द्यायलाच हवी या मताचा मी आहे. समाज म्हणजे आपणच आहोत त्यामुळे जेव्हा ही नवीन पिढी स्वतःमध्ये बदल घडवून आणेल तेव्हा तो समाजही हळूहळू बदलू लागेल.

yeshwant.marathe@gmail.com

अभिप्राय 4

 • I have followed the author’s Blog and this is the best article so far!
  It’s logical, well articulated and frank
  I would add one more example of such hypocrisy: The guy who stands in line for 3 hours for a Darshan, does lying, cheating, taking and giving bribe, etc. as soon as he steps out of the House of worship! Indians find no contrast in any of this behaviour and seamlessly traverse both worlds. Even those using the latest technology first use the computer for Astrology or Remote Pooja!

  It is a deep rooted and integral part of the culture where even the Gods do bad things while advising to do good. No wonder the ordinary people and the Babas and Gurus follow suit!

 • खूपच सुंदर लेख लिहिला गेलेला आहे. भारतातली ही दांभिकताच खऱ्या अर्थाने सामाजिक विषमतेचा पाया आहे. स्टिव्हन वाइनबर्ग नावाचा एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने एका लेखात म्हटले आहे- ‘धर्म हा माणुसकीला लागलेला एक कलंक आहे. धर्म असला काय आणि नसला काय वाईट वागणारे लोक वाईटच वागणार आणि चांगले वागणारे लोक चांगले. पण धर्मामुळे चांगले वागणारे लोक सुद्धा वाईट वागतात.’ एकूणात काय सामाजिक कल्याणासाठी जरी धर्माची निर्मिती झाली असली तरी जगाचा इतिहास असाच सांगतो कि, आतापर्यंत धर्मसत्तेने राजसत्तेशी हातमिळवणी करून सर्वसामान्यांचा छळच केला आहे. आपल्या जीवनातील संघर्षासमोर जेव्हा एखादी व्यक्ती हतबल होते तेव्हा ती कुठल्यातरी अद्भुताची आस लावून बसते आणि त्याचाच फायदा असे दांभिक लोक उचलताना दिसतात. खरंतर लहानपणापासून ऐकलेल्या चमत्काराच्या गोष्टींमुळे अशाच कुठल्या तरी चमत्काराने आपण सुखी व्हावे या हव्यासापोटी आपली क्रयशक्ती गहाण ठेवून टाकतात.
  वास्तववादावर आधारित जीवन जोपर्यंत हे लोक जगण्याचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची ही नेहमीच समाजाला छळत राहणार हे नक्की..

 • लेखन वाचताना सहज एक विचार मनात आला.
  भारतीय मनाचे मूल्यशिक्षण करण्यात विष्णू च्या दहावातारांच्या कथा प्रमुख पणे वापरल्या जातात. कृष्णावतार त्यातही सर्वाधिक लोकप्रिय.
  बहुतेक कथांमध्ये चातुर्य आणि अप्रामाणिकपण यात अभेद दाखवलेला असतो. अखेर वामनाचे ते चातुर्य आणि शकुनीचे ते कपट असा “बाळ्या-कार्टे” न्याय आपल्या सदसद्विवेकबुद्धीत मुरत जातो.
  स्वतः परमेश्वर युद्ध टाळण्यासाठी मथुरेहून द्वारकेला स्थलांतर करूनही जर इतरांना ‘युद्ध हे कर्तव्य असते, तिथे परिणामांचा विचार करू नये ‘ असा उपदेश करू शकतो. तर दांभिकतेचे संस्कार बाल वयातच आपल्या वर होणारच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.