व्होल्गा ते गंगा – मातृवंशीय ते पितृसत्ताक भारतीय समाजाचा प्रवास

व्होल्गा ते गंगा
लेखक: राहुल सांकृत्यायन
मराठी आवृत्ती: लोकवाङ्मय गृह

‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे राहुल सांकृत्यायन आपल्याला टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात. इसवी सन पूर्व सहा हजारमध्ये निशा या मातृवंशीय समाजातल्या स्त्रीपासून ही कथा सुरू होते. कथेच्या सुरुवातीला निशाचा परिवार हा १६ जणांचा आहे. मात्र मातृवंशीय समाजाचे चित्र सांकृत्यायन आपल्यापुढे उभे करतात. ४५ वर्षांची निशा परिवाराची प्रमुख आहे. त्या काळात स्त्री-पुरुषात मुक्त संबंध असल्याकारणाने मुलांचा पिता कोण हे कळायचे नाही आणि मातेवरूनच मुलांची ओळख असायची. ही सर्व संताने निशाजन म्हणून ओळखली जायची आणि दिवा या पुढच्या कथेत त्यांचा उल्लेख निशाजन म्हणूनच आढळतो. व्होल्गेच्या काठावर राहणाऱ्या या परिवाराचे आयुष्य अतिशय खडतर आहे. शिकारीसाठी भटकणे, नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे आणि सततचे टोळीयुद्ध यांमुळे परिवाराचे आयुष्य संघर्षमय आहे. Survival of the fittest या डार्विनच्या थिअरीचा प्रत्यय आपल्याला सुरुवातीच्या कथांमधून येतो. कथेची नायिका निशा बलवान आहे. पुरुषांप्रमाणेच तीही ताकदवान आहे. शिकारीमध्ये ती सर्वांत समोर आहे, शौर्य गाजवण्यात ती सगळ्यात पुढे आहे. थोडक्यात, पुरुषी नायकाचे सर्व गुण तिच्यात आहेत. ती हिंस्र आहे, सावध आहे, टोळीतले आपले स्थान अढळ राहावे म्हणून प्रयत्नशील आहे. टोळीतील इतर स्त्रिया ज्या तिच्या मुली आणि नाती आहेत, त्यांना ती प्रतिस्पर्धी मानते. टोळीतील पुरुषांवर पहिला हक्क निशेचा आहे. टोळीतील इतर तरुण स्त्रिया आवडत असतानादेखील पुरुषांना तिच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागते. संभोगासाठी ती हवे तेव्हा हव्या त्या पुरुषाला बोलावू शकते. पुरुषसत्ताक समाजात पुरुषाला जेवढे म्हणून अधिकार असतात तेवढे अधिकार या निशामाँजवळ आहेत. आपल्या हातून सत्ता जाईल म्हणून ती भयगंडाने पछाडली आहे. आपली सगळ्यात बलवान मुलगी लेखा आपली जागा घेईल म्हणून तिला मारायचे मनसुबे निशामाँ रचते. नदीत तिचा गळा दाबून मारताना निशेचाही जीव जातो आणि दोघी मायलेकी व्होल्गाला अर्पण होतात.

पुढच्या कथेचे नाव दिवा आहे. निशा म्हणजे रात्र आणि दिवा म्हणजे दिवस. निशाच्या राज्यात परिवाराची संख्या १६ वरून ९ वर आलेली दाखवली आहे. हिंस्र श्वापदांचे हल्ले, आपसातील वैरभाव इत्यादी कारणांमुळे संख्या घटली. पण दिवाचा काळ भरभराटीचा आहे. निशानंतर २५०० वर्षानंतर जन्मलेल्या दिवाच्या परिवाराची संख्या ९ वरून १५० वर आली आणि पुढच्या फक्त २५ वर्षात ती ३०० च्या वर गेलेली दाखवली आहे. या परिवारातले लोक स्वतःला निशाजन म्हणतात. म्हणजे आता परिवारांची स्वतःची ओळख दीर्घकाळ टिकून असली तरी हा छोटा समाज मातृवंशीयच आहे. अजूनही स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी हे स्वातंत्र्य एका रात्रीपुरतेच आहे. दीर्घकाळ पति-पत्नीप्रमाणे एकाच जोडीदारासोबत राहणे या समाजात निषिद्ध मानले आहे. म्हणूनच दिवाला जरी तिचा आवडता पुरुष सूर याचेसोबतच संभोग करावासा वाटला तरी टोळी तिला तशी परवानगी देणार नाही हे तिला माहीत असल्यामुळे तिला तिची इच्छा दाबून टाकावी लागते. 

वि.का.राजवाडे यांनी ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या पुस्तकात मातृवंशीय भारतीय समाजाचे जे स्वरूप सांगितले आहे त्याच्याशी या कथांमधील समाजाचे साम्य आढळते. मानवाच्या प्रगतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मातृवंशीय संस्था उदयास आली हे पटवून देण्याकरिता राजवाडे महाभारताचे, ऋग्वेदाचे दाखले देतात. मुलांना आईच्या नावाने ओळखले जात असे, आणि वडिलांच्या आणि मुलीच्या संबंधातून ब्रह्माने प्रजेची उत्पत्ती केली इत्यादी दाखले राजवाडे देतात. आईच्या नावावरून मुले जेव्हापासून ओळखू जाऊ लागली तेव्हापासून विभक्त कुटुंबसंस्था उदयास आली असे राजवाडे सांगतात. टोळीतील स्त्री-पुरुष एकमेकांशी मुक्त संबंध ठेवत असले तरी सहोदर बहिणी आपापली मुले घेऊन स्वतंत्र झोपड्यांमध्ये राहू लागल्या आणि अशाप्रकारे ‘सामायिक मातृत्व’ जाऊन ‘वैयक्तिक मातृत्व’ आले असे राजवाडे स्पष्ट करतात.(१)

दिवा दीर्घायुषी आहे. ती ७० वर्षांहून जास्त काळ जगते. निशासारखीच ती व्होल्गा काठावरची रहिवासी आहे. तिच्यासारखीच सामर्थ्यवान आणि क्रूर, निष्ठूर आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आधीएवढा भूप्रदेश पुरत नाही. त्यामुळे शेजारच्या टोळीवर हल्ला करून तो भूप्रदेश दिवापुत्रांना बळकवावा लागतो. दिवा आणि निशाजन स्वभावाने मृदू असले तरी स्वपोषणासाठी त्यांना असा निर्णय घ्यावा लागतो असे सांकृत्यायन म्हणतात. पण एकदा युद्ध करायचे ठरल्यावर टोळीप्रमुख दिवा मागे राहत नाही. स्त्री-पुरुष एकत्र लढाईला निघतात. दिवा आईच्या स्तनांना लागलेल्या तीन अर्भकांचे डोके दगडावर आपटून मारते. कोणालाच जिवंत सोडायचे नाही असा प्रघात युद्धांमध्ये असतो. इतके क्रूर कृत्य केल्यावर स्वाभाविकच या आदिम जमातींच्या मनात खोल कुठेतरी पश्चात्तापाची भावना दडली असते. त्यामुळे शेजारच्या उषाजन या टोळीवर हल्ला करून तो भूप्रदेश दिवापुत्रांना बळकवावा लागतो. दिवाच्या टोळीचे प्रतिस्पर्धी उषाजन यांचा संहार दिवाजनांनी केला तेव्हा उषाजनांना जाळून मारले त्याठिकाणी रात्री आगीत भुते नाचत असताना अनेकांनी पाहिले होते. दिवालासुद्धा स्वप्नात तीन अर्भके तिचे स्तन ओरबाडताना दिसायची. निशाजन अग्नीची पूजा करायचे. अग्नीचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या कुळाची भरभराट झाली असे जननायिका दिवाला वाटायचे. अशाप्रकारे भुते, वाईट स्वप्न, देवता ‘भग’ या कल्पना अस्तित्वात आल्याचे सांकृत्यायन दाखवतात. याच काळात जनावरे पाळणे सुरू करून त्यांच्या चाऱ्यासाठी गवत पेरण्याचे तंत्र माणसाला अवगत झाले आणि शेतीसंस्कृतीचा उदय झाला. मनुष्य धान्य साठवून ठेवू लागला. उत्पादन शिल्लक पडू लागले. युद्धाची तीव्रता वाढली आणि निशाजन चढाई करण्याच्या आधीच पराभवाच्या भीतीने कुरुजन पळण्याचा विचार करू लागले.

यानंतरच्या अमृताश्व या इसपू २८०० वर्षी घडलेल्या तिसऱ्या कथेत समाजात खूपच बदल घडून आलेला आढळतो. अमृताश्व हा कुरुवंशीय आहे. आता स्त्रीवर पुरुषाची मालकी आहे. आपल्या अतिथीच्या सत्कारासाठी तो तिला त्याच्याशी शय्यासोबत करायला लावू शकतो. असे असले तरी स्त्रीला इतर पुरुषांसोबत अस्थायी संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. टोळीयुद्धात जिंकलेल्या पुरुषांना आणि बालकांना मारले तरी जेते स्त्रियांना पळवून नेत असत. बहुपत्नीकत्वाची चाल सुरू झाली होती. वरकड उत्पन्न, शेतीचे स्वामित्व आणि सततचे युद्ध पुरुषांकडे आले आणि स्त्रियांना त्यांनी घरात ठेवून त्यांचे अधिकार मर्यादित करण्याचा काळ हा इथूनच सुरू झाला. अग्नीची पूजा, सोमप्राशन इत्यादी वैदिककालीन गोष्टी दिसून येतात. पशुधन चोरणे, युद्ध करणे या कामात पुरुष व्यग्र दिसतात. स्त्रियांना युद्धात जाण्याचा अधिकार आता नाही. इथून पुढच्या कथांमध्ये हळूहळू स्त्रियांबद्दल वाईट उद्गार काढायला, तिच्यावर अंकुश ठेवायला सुरुवात झालेली दिसते. दासप्रथा अस्तित्वात आल्यावर तर स्त्रियांच्या शोषणाचे प्रमाण वाढतानाच दिसते. पुरुहुत या कथेचा काळ इसपू २५०० म्हणजे अमृताश्व कथेनंतर फक्त ३०० वर्षांनंतरचा काळ. पण या कथेपासून समाजात घडणारे बदल हे फारच वेगाने झाल्याचे समजते. पुरुहुत या कथेत मीठ, भांडे, तांब्याची हत्यारे, चिलखताचा शोध, सोने-चांदी यांचा शोध, गहू-तांदूळ या धान्याचा वापर, विपणन म्हणजे व्यापार, दासप्रथा इत्यादींचा उगम झालेला आहे. त्यासोबतच पुरुहुत इंद्राने घडवलेला समाज आणि इंद्र म्हणजे राजा ही संकल्पनापण दिसते. ३०० वर्षांत काही टोळ्यांनी केलेली प्रगती ही नेत्रदीपक आहे.

अमृताश्वच्या काळात दगडी हत्यारांचा उपयोग टोळ्या करू लागल्या, तिथून पुढे तांब्याची तलवारीसारखी हत्यारे आली आणि युद्धाचे स्वरूप उत्तरोत्तर भयानक झाले.

राहुल सांकृत्यायन यांनी व्होल्गा ते गंगा या कथासंग्रहातील २० कथांमध्ये चार रिकरिंग थीमस् म्हणजेच लेईटमोटिफ ठेवले आहेत – सामंतशाही आणि राजेशाही, युद्ध, दासप्रथा आणि स्रीदास्य. व्होल्गातीरावर झालेल्या भारतीय संस्कृतीच्या उगमापासून गंगातीरी झालेला विकास आणि स्थिराव यांचा इतिहास म्हणजे दमनाचा, शोषणाचा, काही लोकांच्या सुखासाठी इतरांचे शोषण करण्याचा इतिहास आहे. पण काय हा फक्त भारताचा इतिहास आहे? हा संपूर्ण जगाचा इतिहास आहे कारण संपूर्ण जगात राजेशाहीची, सामंतशाहीची, सरंजामशाहीची कीड समाजाला लागली ती आजतागायत कायम आहे. जागतिकीकरणाने नवा मुखवटा लावून सत्तेची आणि विलासाची लालसा कायमच ठेवली आहे. संस्कृतीचा, सभ्यतेचा इतिहास हा रक्ताने, शोषणाने माखलेला इतिहास आहे. भव्य मंदिरे, पिरॅमिड्स, ताजमहाल यांसारख्या वास्तू गुलामांच्या शोषणावरच बांधल्या गेल्या आहेत. समाजात जे काही भव्य आहे त्याखाली रक्तामांसाचा चिखल तर नाही ना हे परखून पाहणे सयुक्तिक ठरते. माणसाला आपल्या स्वार्थासाठी, सुखासाठी एका बॅटरीसारखे वापरायचे ही हरेक संस्कृतीची, राजकीय व्यवस्थेची खोड आहे. राजकीय व्यवस्था कोणतीही असो, माणसाची सत्तेची, स्वार्थाची, सुखासीनतेची हाव हीच सर्वोच्च ठरते आणि विद्यमान व्यवस्थांचा उपयोग करून, त्यांना हवे तसे वाकवून आपल्या फायद्यासाठी वापरते. सांकृत्यायनच्या कथांमधील पुरुहुतु, बंधुलमल्ल, नागदत्त, प्रभा, अश्वघोष, सुपर्ण यौधेय, मंगल सिंह, सफदर, सकिना, शंकर, सुमेर या पात्रांप्रमाणे चांगले लोक असतात, ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, ते बदल काही काळपर्यंत प्रभावी ठरतात पण शेवटी माणसाची भोगलोलुपता जिंकते. असे वास्तववादी चित्र सांकृत्यायनांनी रंगवले आहे. सुमेर या शेवटच्या कथेत सांकृत्यायन यांनी कम्युनिझमचा खुलेपणाने पुरस्कार केला आहे. संपूर्ण कथासंग्रहच इतिहासाचे मार्कसिस्ट इंटरप्रिटेशन आहे असे म्हणता येईल. गांधींच्या असहकार चळवळीला, कनिष्ठ जातींना ‘हरिजन’ म्हणून ‘आहे तिथेच सडत राहा’ या वृत्तीला सुमेर नकार देतो, आंबेडकरांच्या मर्यादा सांगतो आणि कम्युनिझम हेच समतेचा युटोपीयन समाज प्रत्यक्षात आणण्याचे साधन आहे असे सांगतो. पण ‘इजम’ कोणताही असला तरी मानवी स्वभावातली सत्तेची लालसा, भोगलोलुपता, दुसऱ्याच्या जिवावर ऐश करण्याची वृत्ती मात्र तशीच असते. त्यावर सुमेध आणि पर्यायाने सांकृत्यायन काहीच भाष्य करत नाही.

संदर्भ

१. राजवाडे, वि. का., भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पान १६

https://marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.