शुद्ध कुतूहलापोटी, पुस्तके रसाळ गोमटी

पुस्तक: कुतूहलापोटी
लेखक: अनिल अवचट
प्रकाशक: समकालीन प्रकाशन

‘कुतूहलापोटी’, हे डॉ. अनिल अवचटांचं नवं कोरं पुस्तक. 

‘शुद्ध कुतूहलापोटी, पुस्तके रसाळ गोमटी’ असं बेलाशक म्हणावं, इतकं हे बेफाट आहे. मुखपृष्ठावर आहेत, चक्क लहान मूल होऊन रांगणारे, या अफाट सृष्टीकडे कुतूहलानी बघणारे, दस्तूरखुद्द डॉ.अवचट. लहान मुलाची उत्सुकता, जिज्ञासा आणि आश्चर्य इथे त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे. हे पुस्तक रोएन्टजेन ह्या एक्सरेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला समर्पित आहे. एक्सरेचा शोध लावला म्हणूनच नाही, तर पेटंट न घेता हा शोध मानवजातीसाठी निःशुल्क उपलब्ध केल्याबद्दल. 

आत पानोपानी आपल्याला भेटतात मधमाश्या, साप, बुरशी, पक्षी, कीटक आणि मानवी शरीरातील अनेकानेक आश्चर्ये; अगदी जन्मरहस्यापासून कॅन्सरपर्यंत. शुद्ध कुतूहलापोटी या विविध विषयांची माहिती करून घेताना; वय, सामाजिक स्थान वगैरे कशाकशाची पत्रास न बाळगता डॉक्टरांनी कित्येकजणांना आपलं गुरु करून घेतलं आहे. उदाहरणार्थ किड्यांमधला किडा, असा कोणी वेडा, तरुण, संशोधक, हा त्या क्षेत्रातला डॉक्टरांचा गुरु. किडयामुंग्यांबद्दलचे त्याचे निरूपण डॉक्टर भक्तिभावाने ऐकणार. पण सामाजिक प्रश्नावर, व्यसनमुक्तीवर चर्चा सुरू झाली की भूमिका उलटपालट. असा सगळा मामला. ह्या लहान थोर माणसांचं गुरुपद त्यांनी निर्व्याजपणे मान्य केलं आहे. गुरु-शिष्य नात्याचं एक लोभस दर्शन या लिखाणात दिसतं.

पण ह्या पुस्तकात प्रत्येक विषयाची निव्वळ जंत्रीवजा माहिती नाही. निव्वळ कुतूहलापोटी ह्यातल्या प्रत्येक विषयाचा लेखकानी आपल्या खास शैलीत घेतलेला हा शोध आहे. या शोधात या साऱ्याबद्दलची आश्चर्ये एकामागोमाग एक उलगडत जातात. प्रत्येक विषयाच्या अगदी मुळाशी जातात डॉक्टर. आपल्याला बरोबर घेऊन, कोणताही आव न आणता, सारं काही सहजपणे समजावूनही सांगतात आपल्याला. ह्या साऱ्याचं आकलन होण्यासाठी लेखकानी चांगलीच तपश्चर्या केली आहे, अभ्यास केला आहे.

वयाच्या पंच्याहत्तरीतही बालकाचं कुतूहल आणि उत्साह अंगी असणाऱ्या, एका नादिष्ट, अवलिया माणसाने लिहिलेले हे लेख, अगदी सोप्या भाषेत, गप्पा मारावेत असे उतरले आहेत. जे आपल्याला समजलं ते इतरांना सांगून त्याचंही कुतूहल जागृत करावं, त्यांचाही विस्मय वाढवावा हा हेतू. 

ह्या जगड्व्याळ सृष्टीतील अनोखे कारनामे वाचून कुणालाही हा सगळा कोण्या सर्वशक्तिमान कर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा वाटतो. डॉ. अवचट यावर फारसं सखोल उत्तर द्यायच्या फंदात पडत नाहीत. कोणत्याही गोष्टीला एखादं अतिनैसर्गिक कारण डकवलं की त्यातली गंमत, त्यातला शोध, त्यातलं आश्चर्य ह्याला पूर्णविराम मिळतो, हा त्यांचा आक्षेप. तेंव्हा आश्चर्यमुग्ध होण्यासारखं, अतिनैसर्गिक, जादुई, चमत्कारसदृष काही असलं तरीही त्याची कारणमीमांसा विज्ञानातच शोधावी असा त्यांचा आग्रह आहे.

माणूस आणि प्राणिसृष्टी यांची तुलना या पुस्तकात ठायी ठायी येते. बुरशीकडून आपण निरलसपणे काम करायला शिकावं, असा, वैज्ञानिक पुस्तकात भाबडा वाटणारा, उपदेशही येतो.

पुस्तकात चित्रं नाहीत ही मात्र मोठीच उणीव आहे. डॉ. अवचट उत्तम चित्रकारही आहेतच. तेंव्हा खुद्द डॉक्टरांनीच आता पुढची आवृत्ती सजवण्याची जबाबदारी घ्यावी, असं सुचवावंसं जरूर वाटतं.

गप्पा मारल्यासारखे असल्यामुळे कित्येक लेख थोडे अस्ताव्यस्त आहेत. मांडणी सैलसर आहे, मुद्देसूद नाही. पण हेच तर ह्या लिखाणाचं बलस्थान आहे. सुगठीत, अद्ययावत आणि संपूर्ण माहितीसाठी गुगल आहेच. कुतूहल हा आजार वाचकांना होऊन त्यांनीही अगदी बेजार होऊन कश्याकश्याचा शोध घ्यावा, केवळ शोधायचा आनंद घ्यावा असा लेखकाचा सूर आहे. साहित्यात नवरस असतात तसा हा आधुनिक, दहावा, विज्ञानानंद नावाचा रस आहे. ‘सेवितो रस हा, वाटितो आणिका’, अशा वृत्तीने डॉक्टरांनी इथे तो मस्त उधळला आहे.

(पुस्तकात चित्रे असावी आणि डॉ. अवचटांनी ती जबाबदारी स्वत: घ्यावी अशी डॉ. शंतनू अभ्यंकर यांची सूचना डॉ. अवचटांपर्यंत पोहोचली असावी की नाही याची कल्पना नाही. परंतु आता ते होणे नाही याची सखेद निराशा मात्र राहील. – टीम, आजचा सुधारक)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.