मनोगत

‘आजचा सुधारक’च्या एप्रिल अंकात शिक्षणक्षेत्रात अपेक्षित आमूलाग्र बदलांविषयी आणि त्या प्रयत्नात येत असणाऱ्या अडचणींविषयी लिहिताना अनेकांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाधारित विचार प्रगट केले. ह्या अनुभवांचे मूल्य कसे ठरवावे? कामे करत असताना होत असणारी निरीक्षणे, त्यात येणाऱ्या अडचणी आणि निघालेले/काढलेले मार्ग, एवढेच नव्हे तर, जे साधायचे आहे ते साधता येत नसल्याची तगमग समजून घेतली तर ह्या संस्थात्मक किंवा व्यक्तिगत प्रयत्नांना बळ पुरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे याविषयी शंकाच उरणार नाही.

समाजसुधारणेमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांचा, संस्थांचा जितका सहभाग, तितकाच विविध वैचारिक प्रवाहांचादेखील आहे. नवे विचार, मग ते सामाजिक असोत की राजकीय असोत, जातिविषयक असोत की कृतीविषयक असोत ते सातत्याने मांडले जाणे गरजेचे ठरते. कालच्या परिस्थितीवर ओरड करीत राहण्याने काहीही साध्य होत नाही. जसे, गांधीहत्येच्यावेळी ब्राह्मणांवर अधिक अत्याचार झाले होते की नव्हते, काश्मीरप्रश्न नेहरूंनी का चिघळत ठेवला, इत्यादी. त्यापेक्षा आजच्या परिस्थितीचा गंभीरतेने विचार करणे आणि उपाय आखणे गरजेचे आहे. जसे जातिनिर्मूलनाचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी काय व्हायला हवे किंवा शिक्षण आणि आरोग्य प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहचवता येईल, इत्यादी. यासोबतच बदलत्या सामाजिकतेच्या अनुषंगाने उद्याच्या परिस्थितीविषयीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी समाजमन तयार करणे असा सगळा सकारात्मक विचारांचा ओघ वाहता रहायला हवा असे वाटते.

एप्रिलच्या ह्या अंकासाठी सहभाग देणाऱ्या सर्वांचेच आभार.

प्राजक्ता अतुल
समन्वयक
०९३७२२०४६४१

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.