आवाहन

स्नेह.

इतिहास ही घडलेल्या घटनांची नोंद असते. त्या त्या काळातील सत्य परिस्थिती काय होती हे जाणून घ्यायचे असेल तर इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसे झाले नाही तर इतिहासाकडे बघताना जे झाले ते योग्य/अयोग्य, चांगले/वाईट, नैतिक/अनैतिक हे व्यक्तिनिष्ठ, भावनेनुसार ठरवले जाते. काळानुरूप हे मापदंडही बदलतात. जुने संदर्भ मिटवण्याचा, झाकण्याचा, तसेच सोयीचे असणारे संदर्भ, तथ्ये समोर मांडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी इतिहास बदलत नाही. असे असताना जे झाले त्याचा नम्र स्वीकार करणेच योग्य नाही का? पूर्वी घडून गेलेल्या कुठल्याही घटनेबद्दल अभिमान किंवा लाज न वाटू देता त्याविषयीची स्पष्ट स्वीकृती महत्त्वाची नाही का? मुळात इतिहास बदलणे किंवा दुरुस्त करणे असंभव आहे, असा स्वीकार आला तरच बदलत्या सामाजिक मापदंडानुसार जे वाईट ते टाळण्याकडे आपोआपच आपला कल जाईल.

आजची परिस्थिती पाहता ऐतिहासिक तथ्यांना घेऊन बरेच वाद – प्रतिवाद चालले आहेत. त्यामुळे समाजात दुही माजत असल्याचे, द्वेष, उन्माद वाढत असल्याचे संकेत तर मिळत आहेतच. सजग, सुदृढ आणि विवेकी नागरिक या नात्याने आपल्याला यांच्या दूरगामी परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

WhatsApp, Twitter सारख्या समाजमाध्यमांतून चाललेली वाग्युद्धे नेमकी वैचारिक दिशा न दाखवता नुसतीच भरकटवणारी आणि भडकावणारी असतात. जनसामान्यांच्या विचारांत कट्टरता असणे राजकारणी लोकांच्या पथ्यावरच पडत असते. ह्या जनसामान्यांच्या मनात कट्टरतेचे विष पेरण्यात आजची समाजमाध्यमे यशस्वी तर होत नाही आहेत ना असा प्रश्न आहेच. अश्यावेळी विवेकाचा आवाज क्षीण होऊ नये एवढेच.

‘आजचा सुधारक’च्या आगामी अंकात असे अनेक विषय आणि प्रश्न समोर आणता येतील.

आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २५ जूनपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.

– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.