जुने वैज्ञानिक सिद्धांत आणि मिथके

जुन्या सिद्धांताऐवजी अधिक व्यापक आणि अधिक अचूक असे नवे सिद्धांत येत जाणे ही विज्ञानाची रीत आहे. यातील जुन्या सिद्धांतांची कधी कधी चांगल्यापैकी हेटाळणी झालेली पाहण्यात येते. म्हणजे पृथ्वी जगाच्या केंद्रस्थानी आहे हा सिद्धांत हेटाळणीस प्राप्त झालेला दिसतो. गॅलिलिओने जे दुर्बिणीतून पहिले ते कुणीही पाहिले तर ताबडतोब पृथ्वी केंद्रस्थानी हे मान्य केले जाईल असे बऱ्याच जणांना वाटते. जुन्या टॉलेमीच्या सिद्धांतांना चिकटून राहणारे कूपमंडूक प्रवृत्तीचे असावेत अशी धारणा केली जाते. पण ते तेवढे खरे नाही. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर त्यामुळे जशी ग्रहांची वक्री गती होते तशी तारामंडळातील तारकांची का होत नाही या आक्षेपाचे उत्तर सूर्यकेंद्री स्थानीं सिद्धांतींना त्यावेळी देता येत नव्हते. अशा वेळी जे चिकटून राहिले त्यांच्याकडेही वैज्ञानिक कारण असू शकते याचा विसर आपल्याला होतो. 

अशाच एका वैज्ञानिक आक्षेप-उत्तरांच्या वाचनामुळे माझे कुतुहूल जागे झाले आणि त्यातून माझे चित्रप्रदर्शन घडले. त्याबाबत इतिहासावर वेगळा दृष्टिक्षेप टाकावा या दृष्टीने हा लेख लिहिण्यास मी उद्युक्त झालो. अल बिरुनी हा भारताचा अभ्यासक गजनीच्या मोहमदाबरोबर भारतात आला. त्याने भारतावर जे पुस्तक लिहिले (त्याने कित्येक भारतीय पुस्तकांचे भाषांतरदेखील करून घेतले ते वेगळे.) ते मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे. बिरुनीने मेरू पर्वताबद्दल विविध ठिकाणी आलेल्या उल्लेखाबद्दल लिहिले आहे. हा मेरू पर्वत अफाट उंचीचा आहे असे आपल्या आख्यायिकांद्वारे माहीत असते. अवघ्या ब्रह्माण्डाला उठून दिसेल, असा हा मेरू पर्वत. अल बिरुनीला त्याच्या उंचीबाबत वैज्ञानिक आक्षेप होता. अगदी भूमितीच्या साहाय्याने त्याने असे सिद्ध केले की एवढा भीमकाय पर्वत असता तर तो कुठूनही दिसला असता. (त्याची उंची साधारण १५ लाख कि.मी. असू शकते.) ज्या अर्थी तो दिसत नाही त्या अर्थी तो अस्तित्वात नसणार. या उलट आर्यभटाने त्याची उंची आणि ठिकाण दिले आहे. ही उंची खूप कमी आहे, तर ठिकाण हिमालयाच्या उत्तरेस आहे असे दिले आहे. ते त्याला जास्त योग्य वाटले. 

आपण भारतीय मिथके पहिली तर मेरू पर्वताबद्दल अगदी सतराव्या शतकापर्यंत (किंवा त्यापुढेही) भीमकाय मेरू पर्वताबद्दल काहीतरी लिहून आलेले दिसेल. निदान तोपर्यंत तरी हा भीमकाय पर्वत कुणाला दिसला नाही याबद्दल नवल वाटले नसेल का? अधिक वाचल्यावर हे लक्षात आले की हा पर्वत पृथ्वीच्या वर नसून तो बहुतांशाने जमिनीखाली आहे. अशीही वर्णने आढळली की तो अमुक झाडाखाली आहे किंवा तो पूर्णतः सोन्याचा आहे. म्हणजे हा कुणालाही तसा दिसणार नाही. जमिनीखाली म्हणजे नेमका कुठल्या दिशेला? 

पृथ्वी गोलाकार आहे हे पुरातन काळीच लोकांना माहीत होते. हे जेव्हा लक्षात आले तेव्हा ती कशाच्या पाठीवर उभी आहे हा प्रश्न महत्त्वाचा ठरू लागला असणार. ती कासवाच्या पाठीवर आहे, नागाच्या पाठीवर आहे, विशालकाय समुद्रात तरंगत आहे, हत्तीच्या पाठीवर उभी आहे असे अनेक उल्लेख सापडतात. पृथ्वी ज्या कशावर उभी आहे ते कशावर उभे आहे? विनोदाने असे म्हटले गेले की पृथ्वी कासवावर आहे ते कासव देखील दुसऱ्या कासवावर ते तिसऱ्या… 

विषववृत्ताच्या दक्षिणेस असलेल्या जगाची माहिती एकेकाळी कित्येक संस्कृतींना नव्हती. काही दर्यावर्दी लोकात ते ओलांडू नये यासाठी प्रघात पडला होता. दक्षिण दिशेस मेरू पर्वत असेल तर उत्तरेतील काही लोकांना तो दिसणार नाही असे माझ्या मनात आले. आणि त्यावरून मेरू पर्वताच्या सिद्धांताचा उलगडा झाला. मेरू पर्वताचा आकार पृथ्वीएवढा नसून ब्रह्माण्डाच्या अर्धा असावा. त्यावर गोलाकार पृथ्वी विराजमान असावी. टोकदार अक्षाभोवती ती स्वतःभोवती फिरू शकते. आणि म्हणून आर्यभट किंवा इतर भारतीय खगोलशास्त्री पृथ्वी स्वतःभोवती फिरत असावी असे मोघमाने म्हणायचे. 

पृथ्वी कदाचित स्वतःभोवती फिरत असावी असे निदान ॲरिस्टोटलच्या काळात केले गेले होते. कासवाच्या, हत्तीच्या, माशाच्या पाठीवरची पृथ्वी स्वतःभोवती फिरणे फार कठीण. पण तीच मेरूसारख्या टोकदार पर्वताचा अक्ष धरून स्वतःभोवती फिरू शकते. तेव्हा या सर्व सिद्धांतापेक्षा मेरू पर्वत सिद्धांत उजवा ठरतो. तसेच ब्रह्माण्डाच्या मुळापासून तो निघून कोण कशावर या प्रश्नास थोडे जास्त बरोबर उत्तर देतो. हे सर्व लक्षात आल्यावर मी काही चित्रे काढली ती येथे देत आहे.

पुढील काळात उत्तरेकडील मंडळी दक्षिण गोलार्धात जाऊ लागली आणि त्यांना एवढा उंच मेरू पर्वत काही दिसला नाही. यावरून या सिद्धांताचा अंत व्हायला हवा होता. पण तो झाला नाही. याचे कारण म्हणजे त्याविषयीची माहिती आता कयासातून धार्मिक मिथकात परिवर्तित झाल्या होत्या. आणि अशा मिथकांचे निराकरण अगदी हळूहळू होत गेले. सपाट पृथ्वी, पृथ्वीकेंद्री जग इत्यादी मिथकांचेही तसेच झाले असावे. 

मिथकांच्या, आख्यायिकांचा, दंतकथांचा अभ्यास करून इतिहासकाळाचे वेगळे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आधुनिक काळात होत असतो. त्यातील मिथकांचा वैज्ञानिक सिद्धांतांचा मागोवा घेताना माझी एक चित्रमालिका तयार झाली. 

अभिप्राय 11

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.