ठिणगी

ए.सी.चे तिकीट न मिळाल्यामुळे मृदुलाला साधे स्लीपरचेच तिकीट काढावे लागले होते. रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी घरी जाऊन सगळे आवरायचे आणि पुन्हा ऑफिस गाठायचे. ए.सी.चे तिकीट मिळाले असते तर एवढा शीण नसता जाणवला. तरीपण ट्रेनमध्ये बसल्यावर तिला जरा निवांत वाटले. दोन दिवस सारखी लोकांची, पाहुण्यांची ये-जा. आईला बरे नव्हते म्हणून दोन दिवस ती आईला भेटायला आली होती. आजच सकाळी आईला डिस्चार्ज मिळाला म्हणून तिला निघता आले. आईला काही दिवस तरी मुंबईला आपल्याकडे घेऊन यायची तिची खूप इच्छा होती, पण आपले मुंबईचे एकंदरीत आयुष्य बघता ती गोष्ट किती अशक्य आहे हेही तिला कळत होते.

तिने डब्यात आजूबाजूला नजर टाकली. शेजारचे तीन-चार बर्थ्स रिकामेच दिसले. क्षणभर तिच्या मनात विचार आला, आजूबाजूला कुणी नाही तर जेवण करून घ्यावे का? पण अद्याप भूकही लागली नव्हती. थांबू या जरा. एकदोन स्टेशन्स गेली, गाडीने थोडा वेग घेतला की मग जेवण करावे आणि झोपून जावे, बस. सकाळीच उठायचे एकदम. नुसत्या विचारांनीच तिला तरतरी आली. 

तिने शरीर आणि मन दोन्हीही थोडे शिथिल सोडले. थोड्याच वेळात गाडी एका स्टेशनवर थांबली आणि लोकांची गर्दी वाढली. एकदम दहा बारा लोक डब्यात घुसले. तिच्या आजूबाजूचे बर्थ्स भरून गेले. यांत गावाला जाणारे तीन-चारच लोक होते. त्यांना सोडायला आलेलेच जास्त होते. त्यातला एकजण अजूनही खालीच प्लॅटफॉर्मवर फोनवर बोलत उभा होता. 

“अशक्या, अरं, अशक्या कुठं हाय?” कुणीतरी विचारले. 

“त्यो काय तिकडं. फोन कानाले लावून बसलाय. अबे, ये ना बे लौकर. गाडी सुटंल की आता.” गाडीत चढलेल्या एकाने त्याला आवाज दिला. उतरणाऱ्या लोकांची उतरायची घाई चालली होती.

“ए अशोक, चल ना यार…” पुन्हा कुणीतरी ओरडले. गाडी हळूहळू निघालीच होती. अशोक धावतच गाडीत चढला. 

“अरे काय यार तू पण ना? बायकोशी बोलायचं तर गाडीत चढून न्हाई का बोलता येत?”

“अबे आपल्या म्होरं बोलायचं नसंल बे त्याला.” तो दुसरा म्हणाला. 

त्या लोकांची मग सामान ठेवायची गडबड सुरू झाली. त्यातला एकजण त्यांचा पुढारी असावा. कारण सगळे त्याला “साहेब, साहेब” म्हणत होते. त्या साहेबांच्या कपाळावर कुंकवाचा उभा टिळा लावलेला होता. हातात फुलांचा गुच्छ होता. 

“ही तुमची सीट साहेब” एकाने मृदुलाच्या समोरची सीट आपल्या हातातल्या रुमालाने झटकली. 

“बन्सी, हं हे घे. हे ठेव तिकडे.” साहेबांनी आपल्या हातातला फुलांचा गुच्छ बन्सीच्या हातात दिला. मृदुला आपली एका कोपऱ्यात आपल्या सीटवर अंग चोरून बसली होती. त्यांच्या एकंदर वागण्या-बोलण्यावरून ते एखाद्या राजकीय पार्टीचे लोक असावेत आणि काहीतरी कामासाठी मंत्रालयात जात असावेत याचा तिला अंदाज आला. 

तेवढ्यात आणखी एक माणूस तिथे आला. 

“नमस्कार विक्रमसाहेब. आत्ताच कळलं मला तुम्ही इथे या डब्यात बसलात म्हणून. साहेब, पण तुम्ही इथे स्लीपरमध्ये कसे काय? ए.सी.च्या डब्यात कसे नाही?” तो माणूस म्हणाला.

साहेबांचे तत्पर उत्तर तयारच होते. “अहो, तिथे तुमच्यासारखे एवढे सगळे लोक कसे काय भेटणार? नाही का? जनसंपर्क वाढवला पाहिजे आता आपल्याला. त्याच्याशिवाय कसे ओळखणार कोणी? आता या बाजूच्या पंचवीस गावात विचारा, विक्रम कापसे .. सगळे लोक ओळखतात आपल्याला.” 

“हं.. हं.. खरंच आहे. पण साहेब, कमालच आहे तुमची. जातीनं विचारपूस करता बाबा तुम्ही समद्यांची.”

“तुम्ही इकडं कुठं ?”

“मुंबईला. तुम्ही पण मुंबईलाच जात असणार. मंत्रालयात ना?”

विक्रमसाहेबांनी मान हलवली.

“लई भारी काम केलंत विक्रमसाहेब तुम्ही.”

“अहो कसचं. अन् काम केल्याबिगर कसं होणार?”

“मग आता? निवडणुकीचं तिकीट पक्क झालं समजा की”. 

“हो. त्याच्यासाठीच चाललो आता मुंबईला. पक्षश्रेष्ठींना भेटायला.”

“साहेबांचं कसं हाये बघा, आधी काम करायचं न मग बोलायचं. काय केदार बरोबर ना?” बन्सी म्हणाला. केदार आणि अशोक दोघांनीही माना हलवल्या. “बलवीर कामून गप गप हाय?” बन्सी म्हणाला. 

बलवीरने उगाच हसून आपली मान हलवली.

म्हणजे ते विक्रमसाहेब होते, कोणत्यातरी पक्षाचे कार्यकर्ते आणि हे चार त्यांचे चमचे. मृदुला मनातल्या मनात म्हणाली.

“अहो, उगाच कसं कोणालाबी तिकीट मिळंल? तुम्ही काय काम केलं, तुमची काय वट आहे ते तर बघत्याल का न्हाई?” तो माणूसही त्यांचीच री ओढत म्हणाला. “मग काय पेपरला बातमी गितमी गेलीच आसंल.” 

विक्रमसाहेबांची छाती जरा आणखीच फुगली. 

“अरे हो, बरी आठवण केली. केदार, तो चौधरी पत्रकार ओळखीचा आहे ना तुझ्या. त्याला फोन करून एकदा बातमीचं काय ते कन्फर्म करून घे. पहिल्या पानावर आली पाहिजे म्हणावं बातमी. अन् आपला फोटो आहे का त्याच्याकडे ते पण विचार. नसला तर आत्ताच्या आत्ता एक फोटो काढून पाठव त्याला मोबाईलवर.” 

“हो साहेब. आत्ता करतो फोन.” केदार म्हणाला.

“साहेब, मी काढतो तुमचा फोटो.” बन्सी म्हणाला. “इकडं बघा. अरे ए, तो गुच्छ दे रे साहेबांच्या हातात.” 

विक्रमसाहेबांनी लगेच फोटोसाठी पोझ दिली. दोघा-तिघांनी त्यांच्या मोबाईलमध्ये क्लिक केले. केदार पत्रकारांशी फोनवर बोलू लागला. 

“हं, नमस्कार चौधरीसाहेब. केदार बोलतोय. साहेबांची बातमी आलीच आसंल तुमच्याकडे..”

“काय? तुम्ही अजून बघितली नाही? बघा बघा. आणि पहिल्या पानावर उद्याच बातमी आली पाहिजे. आपल्या आयाबहिणींवर कोणी डोळा ठेवला तर साहेबांसारखं वाईट कोणी नाही बघा. अहो, लोकांना कळायला पाहिजे ना त्यांनी केवढं मोठं काम केलं ते. मग पेपरमध्ये छापून आल्याशिवाय कसं कळणार? बातमी तयार झाली की वाचून दाखवा एकदा.”

“काय? पहिल्या पानावर जमत नाही? का? काय, प्रॉब्लेम काय आहे पण?” त्याने बोलता बोलता साहेबांकडे बघितले.

साहेबांनी खुणेनेच सांगितले “चालणार नाही.” 

“नाही.. नाही. दुसऱ्या तिसऱ्या पानावर नाही चालणार. बघा. प्रयत्न करतो नाही, जमवाच. अहो जमवलं की जमतं सगळं. आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे व्हय? चला ठेवतो. गाडीत आहे, मुंबईला चाललोय साहेबांबरोबर.”

“सांगितलं साहेब. छापतो म्हणाला” केदारने तत्परतेने साहेबांना सांगितले.

बाजूच्या सीटवर एक अनोळखी माणूस बसला होता. त्याने विचारले, “कसली बातमी?”

मृदुलाला पण उत्सुकता वाटतच होती. 

“अहो, हे आमचे साहेब आहेत, विक्रम कापसे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते.”

“हो, नाव ऐकल्यासारखं वाटतंय. पण बघितलं नव्हतं.” तो माणूस म्हणाला.

“तर हे आपल्या बाजूचं गाव हाय का न्हाई, तिथले काही गुंड पोरं आपल्या इथल्या झोपडपट्टीतल्या पोरींना पळवून नेऊ लागले. गेल्या चार महिन्यांत दहा बारा पोरी गायब झाल्या बघा. काही पत्ताच लागना झालं. लोकांना वाटलं, पळून जात असतील, आसंल काही लफडं बिफडं. पण एवढ्या पोरी कशा पळून जातील नाही का? त्यात काही लहान बी होत्या. साहेबांना वाटलंच काहीतरी भानगड आहे म्हणून. त्यांनी आपल्या काही लोकांना सांगून पाळत ठेवली. अन् पकडलं की दोघा तिघांना. पोलिसात दिलं सरळ.” केदार रसभरीत वर्णन करून सांगू लागला. 

“लई मारलं बे पोलिसांनी आज त्या लोकांला.” अशोक म्हणाला.

“त्या वस्तीवरच्या लोकांनीच लई मोठी मिरवणूक काढली आज साहेबांची. हे काय तिकडूनच आलो आम्ही आत्ता. आजच नेमकं मुंबईला जायचं बी ठरल हुतं” बलवीर म्हणाला. “आता मान वर करून तिकीट मागता येईल इलेक्शनचं” 

डब्यातले सगळे लोक गप्पांमध्ये सामील झाले होते. मृदुलाच्याही कानावर हे सगळे बोलणे पडतच होते. तिने घड्याळात बघितले. बराच वेळ झाला होता. तिने आपल्याजवळचा डबा काढला आणि जेवण करून घेतले. त्यांच्या गप्पा कानावर पडतच होत्या. येणारे जाणारे लोकही दोन मिनिट थांबून बोलून जात होते. 

त्यांच्या गप्पा किती वेळ चालल्या असत्या कोण जाणे. मृदुलाला झोपावेसे वाटत होते. तिने मग हळूच आपली सुटकेस बाहेर काढून त्यातून बेडशीट बाहेर काढली. ते बघितल्याबरोबर बलवीर आणि बन्सी दोघेही उठले. 

“अरे, चला रे उठा, उठा. मावशीबाईला झोपू द्या. थांबा मावशी, मी बर्थ टाकून देतो हा मधला, म्हणजे तुम्हाला इथे झोपता येईल खाली.” बन्सी म्हणाला. त्या दोघांनी बर्थ वर केले आणि मृदुलाला झोपायला सीट मोकळी करून दिली. मृदुलाचे निरीक्षण चालू होते. हे बन्सी आणि बलवीर थोडे बरे वाटतात. केदार थोडा उर्मट वाटतो आणि तो अशोक तर काय, आवाराच दिसतो. 

“साहेब, जेवण?” अशोक म्हणाला.

“आता पुढच्या स्टेशनवर आपले कार्यकर्ते घेऊन येणार आपलं जेवण, सगळ्यांसाठीच. मी म्हणलं कशाला? कशाला त्रास घेता? पण कोणी ऐकायलाच तयार नाही. मग मी केदारला सांगितलं फोन करून तुम्ही कोणी डबा आणू नका म्हणून. उगाच अन्न वाया जायला नको.” 

“हो सांगितलं केदारने, आम्ही नाही आणला डबा. बलवीर तू?”

“नाही बा. मी पण नाही आणला”. बलवीर म्हणाला . 

त्यानंतर पुढचे स्टेशन आले. पुन्हा काही लोक डब्यात घुसले, त्यांनी या लोकांसाठी जेवण आणले होते. त्यांचे येणे आणि पुन्हा जाणे. सगळी एकच गर्दी. त्या मसालेदार जेवणाचा वास सगळ्या डब्यात दरवळला. जेवणाबरोबरच त्यांच्या गप्पाही रंगत होत्या. 

मृदुलाला धड झोपही येईना. अंगावर पांघरून घेऊन ती नुसती पडून राहिली होती. 

शेवटी एकदाचे त्यांचे जेवण झाले. आवराआवरी आणि बर्थवर चादरी टाकणे सुरू झाले. कुणीतरी एकाने विक्रमसाहेबांना चादर टाकून दिली. जवळची हवेची उशी काढून ती फुगवून त्यांच्या उशाशी ठेवून दिली. पायथ्याशी चादर ठेवली. विक्रमसाहेब हात धुवायला गेले. कुणीतरी ओरडले, “बस झालं रे आता. लोकांच्या झोपा मोडत्याल.” थोडी शांतता झाली .

तेवढ्यात कुणाच्या तरी फोनची रिंगटोन वाजली. “याद आ रही है, तेरी याद आ रही है…” 

“अशक्या, फोन तुझा..” बलवीर ओरडला . 

“बायकोचा असणार” केदार म्हणाला.

“काय हे नवरा बायको एवढं फोनवर बोलत्यात काय माहीत?” बन्सी म्हणाला. “अबे, जा तिकडे जाऊन बोल तुला काय बोलायचं ते..”

“गप बे” अशोक म्हणाला आणि फोन उचलून आपल्या बर्थवर जाऊन बोलू लागला.

“नाही, तुला नाही, बोल.” तो बायकोला म्हणाला. 

“हं, झालं आत्ताच झालं जेवण. बेस्ट होतं. आगं, तुझ्या हातचं जेवण चांगलं नाही म्हणलं का म्या कधी? बरं, तू जेवलीस का नाही? अगं, मला फोन करून विचारायचं अन मंग जेवायचं, काहीतरीच किनी. मी जेवलो नसतो तर? अन् आत्ता फोन लागला नसता तर? रेंज नसती कधी कधी चालत्या गाडीत. बरं, जेव आता.”

“हं. हो बरोबर ना, हेच आम्ही सगळे, साहेब, बन्सी, केदार, बलवीर नेहमीचेच आपले “

“काय डब्यात? नाही तरणी नाही कोणी, मथारी हाय एक.” 

मृदुला एकदम चपापली. तो काय बोलत होता ते तिच्या लक्षात यायला काही सेकंद गेले. तिने थोडी चुळबुळ केली. आपण जागे आहोत आणि त्याचं बोलणं ऐकतोय हे तिला जाणवून द्यायचं होतं. 

“अगं, खोटं कशाला बोलू? तुझी शप्पथ. झोपली कवाच. अन् तरणी असती तरी बी काय?” ते शब्द तिच्या कानावर पडले आणि तिच्या अंगातून एकदम एक संतापाची लाट उसळली. डब्यात सध्या तीच एकटी बाई होती आणि हे बोलणे तिलाच उद्देशून होते हे कळायला तिला वेळ लागला नाही. ती सध्या पोक्तपणाकडे झुकली होती. केसही थोडे जास्तच पांढरे दिसत होते. चार महिन्यांपूर्वीच मोठ्या मुलीला मुलगी झाली होती आणि ती आजी झाली होती. लहानी मुलगी पण आता लग्नाला आलीच होती. हे सगळे खरे होते. ती वार्धक्याकडे झुकत होती हे खरे असले तरी त्याच्या बोलण्याला अश्लीलतेचा जो दर्प येत होता तो घपकन् तिच्या नाकात शिरला. तो चक्क म्हणत होता की मथारी बाई डब्यात आहे, काही करता येत नाही म्हणून. त्याच्या बोलण्याचा संदर्भ तिच्या लक्षात आला. तिला वाटले उठावे अन् सरळ जाऊन त्याला जाब विचारावा. अरे, आत्ताच आयाबहिणींच्या इज्जतीच्या गप्पा मारत होता ना तुम्ही लोक? आणि आता काय बोलताय, कसे वागताय काही भान आहे का तुम्हाला? तुम्ही कार्यकर्ते ना या साहेबांच्या पार्टीचे? तरणी काय, मथारी काय… बोलायचे एक, वागायचे वेगळे. किती घाणेरडेपणा. कसा विश्वास ठेवावा कुणावर? हे सगळे ती बोलली पण मनातल्या मनात. 

तिने चुळबुळ केलेली बघितली अन् ही गोष्ट बलवीरच्या लक्षात आली. तो एकदम ओरडला, 

“अशक्या. गप.”

बलवीरने आवाज चढवला. बन्सीने त्याच्या पायावर जोरात हात मारला. अशोक एकदम गप्प बसला. 

“ठेवतो..” म्हणून त्याने फोन बंद केला. 

तेवढ्यात विक्रमसाहेब हात धुऊन येता येता चार लोकांशी बोलून जागेवर येऊन बसले. 

“चला झोपा आता” ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले. कुणीच काही बोलले नाही. 

पण मृदुलाची मात्र झोपच उडाली. त्याचे ते वाक्य सारखे तिच्या कानात घुमत होते आणि तिच्या अंगाची संतापाने लाही लाही होत होती. कितीही राग आला तरी काय म्हणू शकणार होती ती? त्याने काही मान्य थोडेच केले असते? मी कुठं काय म्हणालो असे म्हणून मोकळा झाला असता आणि उगाच रात्रीच्या शांत वेळेस चार लोकांत तमाशा मात्र झाला असता. ती नुसतीच तळमळत राहिली. गाडीच्या तालावर मध्येच गुंगी लागत होती, मध्येच दचकून जाग येत होती. किती वाजले तेही कळत नव्हते. 

साधारणतः दोन अडीचचा सुमार असावा. सगळे लोक झोपेत होते. एका स्टेशनवर गाडी थांबली. लोकांचा कलकलाट सुरू झाला. त्यांच्या बाजूच्या बर्थवरचे दोन लोक खाली उतरले. नवीन लोक चढले. तेवढ्यात एका बाईचा जोरजोरात बोलण्याचा आवाज आला. 

“चला, या इकडं. हं. हळू, अंधार आहे. इथं.. हं इथंच आहे वाटते आपली सीट. थांबा, थांबा पडताल, सामान आहे रस्त्यात. मी लाईट लावते.”

ती बाई लाईट लावायला गेली आणि कुणीतरी झोपेतच ओरडले, “अरे, लाईट कोण लावते, लाईट लावू नका रे..” 

त्या बाईने लाईट लावायला आणि त्या झोपलेल्या माणसाने त्या लाईटच्या बटणवर हात ठेवायला एकच वेळ झाली. त्याचा हात त्या बाईच्या हातावर पडला. 

“अरे, कोण हाय रे त्यो भडव्या? लाज नाही वाटत? हात धरतो मेल्या?” ती बाई जोरात ओरडली. तिने जोरात आपला हात झटकला. खळ्ळकन् बांगड्या फुटल्याचा आवाज आला. लाईट लागला होता. बघितले तर काय, तो अशोक होता. सगळेच लोक दचकून उठले.

त्या बाईचा शिव्यांचा भडीमार सुरू झाला. त्या बाईचा म्हातारा नवरा बरोबर होता आणि त्या दोघांच्या सीट्स तिथेच होत्या. 

“काय झालं? काय झालं?” कुणीतरी विचारले.

“अहो, हात धरतोय मेला.”

“लाईट कशाला लावता हो बाई?” तरीही अशोक उद्धटपणाने म्हणाला. 

“कशाला म्हणजे? पुन्हा तोंड वर करून बोलतोस मेल्या? म्हातारं, आजारी माणूस हाय बराबर. सीट दिसायला नको? 

“मथाऱ्या माणसाला घेऊन रातीचा कशाला प्रवास करावा?” 

आता ती बाई एकदम त्याच्या अंगावर धाऊन गेली. “काय म्हणालास मेल्या? आं, काय म्हणालास? तुझे मायबाप काय तरणे हाईत काय रे? रिझर्वेशन मिळत नव्हतं. या गाडीचं मिळालं कसंतरी. या म्हाताऱ्याला दवाखान्यात न्यायचं हाय अन तू म्हणतोस रातीचं प्रवास कशाला करावा? तुझ्या बापाला न्यायचं काम पडलं तर काय करशील रे तू?”

सगळे लोक अर्धवट झोपेत होते. काय प्रकार झाला ते लक्षात यायला लोकांना वेळ लागला. 

विक्रमसाहेब उठून बसले.

“काय झालं आई? काय झालं? शांत बसा जरा. दमानं घ्या. कोणती सीट आहे तुमची?” ते म्हणाले. 

“हीच आहे. ही मधली आणि ही खालची साईडची. आजारी, म्हातारं माणूस बरोबर आहे. अंधारात दिसायला नको? लाईट लावावा लागंल की नाही?”

“हं. बरोबर आहे तुमचं. बसा. बसा आता शांत. सामान ठेवा.”

“अहो, लाईट लावायला गेले तर हात धरला या भडव्याने.” त्या बाईला जोर आला. तिने आपला हात दाखवला. खाली बांगड्यांच्या काचा पडल्या होत्या. तिच्या हातातून थोडं रक्तपण येत होतं. तिचा राग अनावर होत होता. “उतर खाली, मेल्या उतर खाली. आत्ता साखळी ओढून गाडी थांबवते अन् पोलिसांना बोलावते. कम्प्लेंट करते तुझी.” 

“जाऊ द्या ना बाई, सोडून द्या. कशाला त्रास करून घेता जीवाला?”

“अहो, एका परक्या माणसाने आपला हात पकडला म्हणजे जीवाला काय तरास होतो कळायचं नाही तुम्हाला. बाईचा हात धरायचा म्हणजे काय साधी गोष्ट वाटली व्हय तुम्हाला? तुमच्याबरोबर हाय का त्यो माणूस ?” तिने विचारले.

“नाही बाबा. आमच्याबरोबर नाही.” विक्रमसाहेब चक्क खोटे बोलले. त्यांनी अशोकला ओळख दाखवायला नकार दिला. मृदुलाला आणखी एक धक्का बसला. तिला वाटले जोरात ओरडावे, विक्रमसाहेबाला जाब विचारावा. आत्ताच दोघे एका ताटात जेवले, गप्पा मारल्या आणि आता हा म्हणतोय, मला माहीत नाही हा माणूस कोण आहे ते. डब्यातल्या कुणीच बलवीर, बन्सी, केदार कुणीच त्याला ओळख दाखवली नाही. 

“कोण आहे मंग याच्याबरोबर? का एकटाच हाय? पुढच्या स्टेशनवर पोलिसांनाच बोलावते आणि कम्प्लेंट करते. त्याच्याशिवाय नाही वठणीवर येणार हे लोक.” 

“मी काहीच केलं नाही, फक्त लाईट लावू नका म्हणलो” आता अशोकचा आवाज थोडा खाली आला होता. 

“लाईट लावू नको म्हणालास? हात धरलास मेल्या तू माझा.”

“तो लाईटच्या बटणवर होता.”

“हो, पण तुला कसं समजलं नाही बाईमाणसाचा आवाज आहे ते. एवढा कसला मुजोरपणा रे? आं ?”

“जाऊ द्या बाई. सोडून द्या. माफ करा त्याला. मोठ्या आहात तुम्ही.” 

“सोडून द्या काय सोडून द्या. थांब दाखवतेच त्याला चांगली. थोडं उजाडू दे आणि पुढचं स्टेशन येऊ दे. रात्रभर लाईट चालू ठेवणार आहे मी.” 

तिचा तो म्हातारा नवरा गप्पच होता. खोकत होता मधूनमधून.

“झोपा तुम्ही तिथं, साईडला खाली. मी झोपते इथं मिडलवर.” नवऱ्याला उद्देशून ती म्हणाली. तिने त्याला प्यायला पाणी दिले आणि खालच्या बर्थवर झोपवले. ती मृदुलाच्या पायथ्याशी बसून राहिली. रात्रभर ती बाई झोपली तर नाहीच पण तिने लाईटही चालू ठेवला अन् रात्रभर तिची बडबडपण चालू होती. 

ठाणे स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा चांगले फटफटले होते. एक टी.सी. डब्यातून जात होता, तो त्या बाईला बघून एकदम थांबला. त्याने तिला वाकून नमस्कार केला आणि विचारले,

“इधर किधर आंटी?”

“बंबई जा रहे. आदमीको हॉस्पिटलमे लेके जाना है.”

“ठीक है ना सब?” त्याने विचारले. 

“क्या ठीक है? पुलिस किधर मिलेगा, मुझे एक कम्प्लेंट करना है.”

“क्यूं क्या हुवा?” 

त्या दोघांचा संवाद ऐकून आता सगळे लोक जागे झाले होते. कोण आहे ही बाई? विक्रमसाहेबांना पण आश्चर्य वाटले. हा टी.सी. एवढा अदबीने तिच्याशी बोलतोय म्हणजे..?

“अरे ये देखो ना. अभी सोनेका नाटक कर रहा है. रातमे मै लाईट लगानेकू गई तो सालेने हात पकडा मेरा. ये देखो सब चुडी फुट गई, मार भी लगा. ये देखो खून निकल रहा है.”

“अरेरे … मगर गलतीसे हो गया होगा आंटी.”

“ऐसा कैसा होता है गलतीसे? आवाजसे औरत बात कर रही है ये समझमे नही आता क्या?” 

त्या टी.सी.ने सगळ्या डब्यावर नजर टाकली. एका नजरेत त्याने हेरले कोण लोक आहेत ते. काय परिस्थिती आहे ते त्याच्या लक्षात आले. 

“जाने दो आंटी. कायकू पडते वो पोलिसके झंझटमे.” नंतर अशोककडे बघून तो म्हणाला,

“ए, उतर खाली और माफी मांग आंटी की.” 

त्याने विक्रमसाहेबांना त्या बाईची ओळख करून दिली. 

“ये आंटी लीडर है ये एरीयेके. कोई भी औरतका कुछ भी प्रॉब्लेम होता है तो सीधा पुलीसके पास नही तो मिनिस्टरके पास जाते है. बहुत पहचान है इनकी. अन्याय बिलकुल सहन नही होता इनकू.”

“अरे वा. नमस्कार, नमस्कार मावशी. बरं झालं तुमची ओळख झाली.” विक्रमसाहेबांनी त्या बाईला वाकून नमस्कार केला. 

“ते सगळं झालं. पण त्या पोराचं काय करायचं ते सांगा.” अशोककडे बघून ती बाई म्हणाली. एव्हाना अशोक खाली उतरून खाली मान घालून बसला होता. त्याला तसे बसलेले बघून मृदुलाला थोडे बरे वाटले. तिच्या मनाला लागलेली टोचणी थोडी कमी झाल्यासारखी वाटली. 

“एवढी बार सोडून द्या मावशी. बरं झालं त्याला चांगला धडा मिळाला. आता पुन्हा कोणाकडे वाकडी नजर करून बघणार नाही. ए, माफी माग रे मावशीची” 

विक्रमसाहेब म्हणाले, “कसं वागता रे तुम्ही लोकं. थोडं सांभाळून वागावं, सांभाळून बोलावं. इज्जत करावी बायामाणसांची”

“माफ करा. माझं चुकलं” अशोक म्हणाला. 

“तसं नाही, तसं नाही. पाया पड मावशींच्या. पायावर डोकं ठेवून माफी माग.” 

अशोक मावशींच्या पाया पडला आणि म्हणाला, “माझं चुकलं. मला माफ करा.” 

“इथून पुढे वागतांना अन बोलतांना नीट विचार करत जा. आधी आपली आई, बहीण डोळ्यांसमोर आण. साधा नुसता बाईचा आवाज जरी कुठं आला तरी तिचं रक्षण करण्यासाठी पुढं व्हायचं. सगळ्याच काही अशा माझ्यासारख्या नसतात. गप्प बसतात बिचाऱ्या. तुम्ही लोक जास्त करता मग. एवढ्या वेळेस माफ करते, पण लक्षात ठेव.” मावशी म्हणाल्या. मृदुलाला मनातल्या मनात बरं वाटलं. 

पुन्हा एकदा त्या बाईला नमस्कार करून टी.सी. निघून गेला. दादर स्टेशन आलेच होते. त्या बाईला दादरला उतरायचे होते. बन्सी, बलवीर, केदार सगळ्यांनी त्यांना हाताला धरून सामान उतरायला मदत केली. मृदुलापण दादरलाच उतरली. ते सगळे लोक अर्थातच सी.एस.टी.ला उतरणार होते. कारण त्यांना मंत्रालयात जायचे होते. 

मृदुला घरी आली. दोन दिवस ती नव्हती तर घर बघण्यासारखे झाले होते. तिचे हातपाय गळून गेले. आता हे सगळे आवरून ऑफिसला जायचे? का ऑफिसमधून आल्यावर आवरायचे? तिची झोपही झाली नव्हती. डोळे चुरचुरत होते. अंग कसकसत होते. जाऊ दे, आज सुट्टीच घेऊ. बऱ्याच सुट्ट्या शिल्लक आहेत. दहा वाजले की साहेबांना फोन करून सांगू. आज आराम केला तर उद्या बरे वाटेल. असा विचार करून तिने मुलीचा आणि नवऱ्याचा डबा करून दिला. एकीकडे ती नवऱ्याशी आणि मुलीशी बोलत होती. अशोक तिच्याबद्दल जे काही बोलला होता ते एक वाक्य सोडून गाडीत काय काय झाले ते सगळे तिने सांगितले. त्यावर मुलगी पटकन म्हणाली,

“अगं आई, नुसती माफी मागून काय उपयोग? तो काय माफी मागेल आणि पुन्हा मोकळा होईल वाटेल तसे वागायला. त्या बाईने तिथेच फाडकन् त्याच्या थोबाडीत ठेवायला पाहिजे होती. नुसते तोंडी अश्लील कॉमेंट केले तरी गुन्हा मानल्या जातो आजकाल आणि कायदा नेहमी स्त्रियांच्या बाजूनेच असतो.”

मुलगी नुसती बोलत होती तरी मृदुलाला भीती वाटली. छातीत धडधडायला लागले. आणि एकीकडून आपली मुलगी तसे बोलली हे ऐकून तिला बरेही वाटले. 

मुलगी आणखी बरेच बोलत होती. “आता ‘मी टू…’ नावाची एक नवीन चळवळ निघाली आहे. तुला माहीत आहे का आई, अगं, मोठमोठ्या लोकांवर आरोप केले आहेत बायकांनी. कोर्टात खेचायच्या धमक्या दिल्या आहेत. तेपण पूर्वी कधीतरी, काही अश्लील वर्तन केले म्हणून.” 

नवऱ्याने पटकन् विषय बदलला. “तरी मी तुला म्हणत होतो रात्रीच्या वेळी एकटी दुकटी प्रवास करू नकोस. मला सुट्टी मिळाली की गेलो असतो आपण. पण तुम्हाला ऐकायचंच नाही.” 

म्हणजे चूक तिचीच होती. ती सुट्टी घेऊन घरी राहिली खरी पण ते विचार सारखे तिच्या डोक्यात येतच राहिले. त्या बाईचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हलेना. “आपल्याला का नाही जमले तसे वागायला? किती धीट होती ती. तिने जर खरेच त्याच्या थोबाडीत मारली असती तर काय झाले असते? पोलीस केस झाली असती आणि आपल्याला साक्ष द्यायचे काम पडले असते तर आपण काय केले असते? पण आपण तर अशा दुबळ्या, नेभळट. आपल्या रक्तातच आहे का ते दुबळेपण? आपल्याला लहानपणापासून तसे बाळकडूच मिळालेय का? समजुतदारपणाचे की शेळपटपणाचे? आपली आईही तशीच गरीब, सोशिक. पण तो काळच तसा होता. आताही आपण आजारी आहोत तर मुलाला आणि सुनेला आपले करावे लागते म्हणून तिलाच अपराध्यासारखे वाटत होते. आणि आपण? सासरच्या लोकांनी चांगले म्हणावे म्हणून आयुष्यभर खस्ता काढल्या. घर, नोकरी, मुलींना वाढवणे. काय मिळाले हे सगळे करून? काय सहभाग होता आपल्या नवऱ्याचा या सगळ्यांत? आपल्याला आपल्या आईने जसा सोशिकपणा शिकवला तसाच आपल्या नवऱ्याच्या आईने त्याला नवरेपणा शिकवला. आपणही आपल्या मुलींना तेच शिकवतोय. संस्कार करतोय त्यांच्यावर. पण आजकाल मुली नाही सहन करत असा अन्याय. अन्याय सहन करायला शिकवणे हा काही संस्कार नाही होऊ शकत. मुलींच्या बाबतीत मुकाट्याने सगळे सहन करणे म्हणजेच संस्कार नाही काही. आणि मुलांच्या बाबतीत? आपल्याला मुलगा नाही पण असता तर तो कसा वागला असता? गाडीत ते लोक होते त्यांच्यावर काय संस्कार झाले असतील? ते बाहेर असे वागतात हे त्यांच्या घरी बायकांना माहीत असेल का? का त्यांना अभिमान वाटत असेल आपल्या नवऱ्यांचा? आणि हेच लोक जनतेचे प्रतिनिधित्व करणार. गुंडांच्या तावडीतून मुलींना सोडवून आणले हे चांगले काम केले असले तरी त्याचे भांडवल करून पुढे आयुष्यभर हे त्याचा फायदा करून घेणार. आणि काय माहीत, त्यातल्याच एखाद्या मुलीला यांनी काही केले तर ती कुणाकडे जाणार? आई घरात घेईना आणि बाप भीक मागू देईना अशी गत व्हायची त्या मुलीची.”

दिवसभर अशीच विचारांच्या वावटळीत ती भरकटत होती. एकदा वाटले ऑफिसला गेलो असतो तर बरे झाले असते. रोजच्या कामात गुंतवून घेतले की झाले गेले सगळे विसरतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून उपयोग तरी काय? पण तिच्या संदर्भात अशोकने उच्चारलेले ते घाणेरडे वाक्य मात्र विसरल्या जात नव्हते. ते सारखे तिच्या मनात घोळत होते. नंतर त्या बाईने काढलेली त्याची खरडपट्टी. पायावर डोकं ठेवून मागायला लावलेली माफी. 

“आपण गप्प बसलो तो आपला स्वभाव. ती बाई बोलली तो तिचा स्वभाव. आणि ते सगळे लोक जे वागले ते त्यांचे स्वभाव. पण या अशा साध्या साध्या घटनांचीसुद्धा कुठे तरी काही तरी नोंद होतच असेल ना? आपल्या स्वभावाप्रमाणे आपण वागलो, काय चुकले आपले?”

दुसरे दिवशी पुन्हा रोजच्यासारखी सकाळची कामे अन् ऑफिसची घाई. मग कुठला वेळ मिळणार विचार करायला? तिने घाईघाईने सगळे आवरले. मुलीचा, नवऱ्याचा आपला स्वतःचा डबा भरला आणि तयार झाली. आठ छत्तीसची लोकल पकडणे आवश्यक होते. 

ऑफिसमध्ये गेल्यावर आणि आपल्या रोजच्या जागेवर बसल्यावर तिला थोडे हायसे वाटले. तिने एक नि:श्वास टाकला. मग रोजच्यासारखे काम, मैत्रिणी, हसणे, गप्पा सुरू झाल्या. ती गावाला गेली होती हे सगळ्या मैत्रिणींना माहीत होते. त्या तिच्या आईची चौकशी करत होत्या. आणि मग बोलता, बोलता लंचटाईममध्ये तिने मैत्रिणींना तो गाडीतला किस्सा सांगितला. अगदी त्या अशोकने तिच्यावर केलेली कॉमेंटसुद्धा. अगदी हळू आवाजात. खुसपुसत. कानात सांगितल्यासारखी. तेव्हा कुठे तिला जरा बरे वाटले. पोटातली मळमळ बाहेर पडून शांत झाल्यासारखे वाटले. आता ही घटना साधी घटना राहिली नव्हती. ती एक तोंडी बातमी झाली होती. त्या मैत्रिणी, त्यांच्या मैत्रिणींना, त्या मग त्यांच्या मैत्रिणींना, घरी, मुलांना, नवरे लोकांना, शेजारीपाजारी सगळ्यांना ती बातमी कळणार होती. कश्या स्वरूपात कळणार होती ते नाही सांगता येणार. पण मूळ स्वरूपापेक्षा ती नक्कीच वेगळी असणार. लहानपणी खेळत असलेला एक खेळ तिला आठवला. सगळ्यांनी गोल रिंगण करून बसायचे. एकाने जवळच्या मुलाच्या कानात एक वाक्य बोलायचे. दुसऱ्या मुलाने त्याच्या जवळ बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगायचे. असे करत करत पहिल्या मुलापर्यंत जाईपर्यंत ते वाक्य पूर्णपणे बदलून गेलेले असे. त्यावेळी या गोष्टीची मजा वाटायची. पण मोठे झाल्यानंतर त्यातला बारकावा कळला. तसेच आता झाले होते. तिने ऑफिसमध्ये तिच्या मैत्रिणींना सांगितलेली गोष्ट कुणाकुणापर्यंत पोचेल आणि कशा अवस्थेत ते तिलाही कळणार नव्हते. पण तिच्यात बदल नक्की झाले असणार. एवढे की अगदी कुठेतरी, कुणाच्या तरी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, रात्री एकटीने प्रवास करणाऱ्या एका बाईचा गाडीत कुणीतरी हात धरला आणि तिने त्याच्या थोबाडीत मारली आणि त्याने पाया पडून तिची माफी मागितली इथपर्यंत. कदाचित त्या बातमीवरून कुणाच्या तरी मनात चीड निर्माण होईल, कुणीतरी पेटून उठेल आणि एखाद्या लहान ठिणगीतून प्रथम धूर यावा आणि नंतर एकदम मोठ्ठा जाळ व्हावा असे काहीतरी घडेल. कुणाला तरी लढण्याची प्रेरणा मिळेल. बिचारी मृदुला नावाची एक गरीब, प्रौढ बाई, जिच्यामध्ये खूपच कमी धग आहे, पेटू का नको अशा अवस्थेत ती आहे, या ठिकाणी ती कुणालाही न दिसणारी, बारीकशी ठिणगी असणार होती. या बातमीची ती अदृश्य नायिका होती. 

आपले मन मोकळे झाल्यावर मृदुला तर ते सगळे विसरूनही गेली. पुन्हा गर्दीमध्ये थकून भागून संध्याकाळी घरी आल्यावर ती बाहेरच सोफ्यावर बसली. सोफ्यावर पेपर पडला होता. सकाळी नवऱ्याने वाचून तसाच पसरून टाकला होता. तिने पेपर हातात घेतला. आणि सहजच तिचे लक्ष गेले. पहिल्याच पानावर बातमी होती,

“विक्रम कापसे यांना निवडणुकीचे तिकीट” आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्यासमोरच काढलेला, हातात फुलांचा गुच्छ घेतलेला त्यांचा तो हसरा फोटो पेपरमध्ये झळकत होता. 

पण आता मात्र तिने ते बघून न बघितल्यासारखे केले कारण सध्यातरी संध्याकाळी काय स्वयंपाक करावा हा एक मोठा गहन प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा होता. 

१८०६, भूमी फ्लोरा, रहेजा इस्टेट 
कुलूपवाडी, नैशनल पार्क जवळ 
बोरीवली (पूर्व), मुंबई -६६ 
मोबाईल – ९००४०९४६१७
ईमेल – nandini.deshmukh@gmail.com

 

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.